* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कॅटो कपटपटूंचा शिरोमणी / Cato's head of impostors

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/४/२५

कॅटो कपटपटूंचा शिरोमणी / Cato's head of impostors

मार्कस पोर्सियस कॅटो हा रोममध्ये सार्वजनिक नीतीचे नियंत्रण करणारा मंत्री होता.कार्थेजचे वैभव त्याच्या हृदयात शल्याप्रमाणे सलत असे.ते त्याला पाहावत नसे. जेव्हाजेव्हा कॅटो सीनेटमध्ये भाषण करी,तेव्हा तेव्हा विषय कोणताही असो,त्याचा समारोप करताना तो पुढील वाक्य उच्चारल्यावाचून राहत नसे - 


" सभ्य गृहस्थ हो,म्हणून माझे निक्षून सांगणे आहे की, कार्थेजचा विध्वंस केलाच पाहिजे."


विनवुड रीड याने कॅटोचे पुढीलप्रमाणे उत्कृष्ट वर्णन केले आहे :कॅटो हा एक अवाढव्य माणूस होता,त्याचे डोळे मांजरासारखे हिरवे-करडे होते,केस कोल्ह्याच्या केसांसारखे होते,दात इतके मोठे होते की,ते जणू हत्तीचे सुळेच वाटत.त्याचा चेहरा अती कुरूप व भीषण होता. त्याचे तोंड पाहावे असे कोणासही वाटत नसे.

त्याच्यावर जनतेने शेकडो काव्यचरण रचले होते.त्यात त्याची भीषण कुरूपता वर्णिलेली असे.एका काव्यचरणात म्हटले होते की,यमाची नरकपुरीही कॅटोला आत घ्यावयाला धजत नसल्यामुळे त्याला तेथील वैतरणेच्या तीरावरच भटकत फिरत राहावे लागेल."


दुसऱ्याच्या सुखात बिब्बा घालण्यात त्याला परमसुख वाटे.काही रोमन लोक कंटाळले होते.जरा विसावा मिळावा; ग्रीक जीवनातील सौंदर्योपासनेचा थोडा आस्वाद घ्यावा,असे त्यांना वाटत होते.पण कॅटो त्याला तयार नव्हता.ग्रीक तत्त्वज्ञान,सौंदर्योपासना व कलापूजा यांचा तो पक्का द्वेष्टा होता.त्याने ग्रीक तत्त्वज्ञान्यांना हद्दपार केले,ग्रीक पुस्तके आक्षिप्त ठरविली व प्रतिष्ठित रोमनांनी पोरकट ग्रीक पद्धतीचा अवलंब करू नये असे जाहीर केले.

करमणुकीची ग्रीक साधने क्षुद्र व अश्लील आहेत,असे त्याने प्रतिपादिले.प्रत्येकाचे प्रत्येक रोमनाचे जीवन म्हणजे जणू मरणयात्रा.त्यात ना आनंद ना करमणूक,ना उत्साह,ना कला; असे त्याने करून टाकले. न्मल्यापासून मरेपर्यंत कंटाळवाणी व दीर्घ अशी स्मशानयात्रा म्हणजे जीवन,असे त्याने केले.


सर्व रोमनांना स्पार्टन शिस्त शिकवावी असे त्याचे मत होते.स्पार्टन क्रूरता व निष्ठुरता रोमनांच्या अंगात शिराव्यात,रोमन राष्ट्र स्पार्टन राष्ट्राप्रमाणे व्हावे;सर्व रोम म्हणजे जणू एक लष्करी छावणी व्हावी,असे त्याला वाटत होते.स्पार्टन लोकांचे गुण-अवगुण दोन्ही त्याच्या स्वतःच्या ठायी पराकाष्ठेने होते.तो पुरा पुरा शिपाईवृत्तीचा होता.त्याच्या नसानसांत शिपाईगिरी भरलेली होती.त्याला युद्धाविषयी मनोरम भ्रम नव्हते.युद्ध म्हणजे गंमत नसून मरण-मारण आहे,हे तो जाणून होता. युद्धात धीरोदात्तत्ता वगैरे गुण प्रकट करावेत,असे काव्य त्याच्याजवळ नव्हते. शत्रूचे लोक व त्यांची बायकामुले यांस जितक्या लवकर व जितक्या अधिक संख्येने मारता येईल तितके चांगले,असे त्याचे मत होते.कार्थेजियनांविरुद्ध स्पेनमध्ये जी रोमन लढाई झाली,तीत आपण रोज एक शहर धुळीस मिळवीत होतो,

अशी फुशारकी तो मारीत असे.


तो इतक्या साधेपणाने वागे की,तो कंजूस आहे असे लोकांस वाटे.आपल्या शेतातील एका लहान झोपडीत तो राही व वकिली करण्यासाठी रोज घोड्यावर बसून तो जवळच्या शहरात जाई व तिसरे प्रहरी घरी परत येई. नंतर तो कमरेपर्यंत उघडा होऊन घामाघूम होईपर्यंत शेतांतील मजुरांबरोबर काम करी व त्यांच्यासारखेच साधे अत्र -कांदाभाकर खाई व त्यांचेच साधे पेय द्राक्षासव,पित असे.रात्री तो आपले अन्न स्वतःच शिजवी.तो ओटच्या पिठाची लापशी करी व त्याची बायको भाकरी भाजून देई.


स्वतः अविश्रांत काम करणारा असल्यामुळे आपल्या गुलामांनीही मरेपर्यंत काम करावे अशी त्याची अपेक्षा असे. 'गुलाम झोपलेला नसेल,तेव्हा काम करीतच असला पाहिजे,'असे त्याचे एक वचन होते.


घरी कधी मेजवानी वगैरे असली व त्या वेळेस त्याच्या गुलामांच्या हातून बारीकशी चूक झाली,तरी तो स्वतः गांठाळ वादीच्या चाबकाने त्यास फटके मारी.आपल्या नोकरांना शिस्त कशी लावावी,हेच जणू तो आलेल्या पाहुण्यास शिकवी.आपल्या म्हाताच्या झालेल्या गुलामांनाही तो शांततेने मरू देत नसे,त्यांना तो कमी किमतीस विकून टाकी,घाण झालेला,वाईट झालेला माल काढून टाकावा,तसा हा सजीव माल तो विक्रीस काढी.कॅटोचे चरित्र लिहिताना प्ल्युटार्क म्हणतो, " माझी सेवाचाकरी करून म्हातारा झालेला बैलही माझ्याने विकवणार नाही,

वृद्धगुलामाची गोष्ट तर दूरच राहो !"


कॅटो उत्कृष्ट वक्ता होता.तो संताप्रमाणे बोले;पण डुकराप्रमाणे कुकर्मे करी.'वाणी संतांची व करणी कसाबाची',असा तो होता.


शेजाऱ्याच्या अनीतीवर तो कोरडे उडवी,तरीपण तो स्वतःच्या काळातला सर्वांत मोठा पापशिरोमणी व शीलभ्रष्ट मनुष्य होता.पिळवणूक करू नये असा उपदेश तो लोकांस करी,पण स्वतः मात्र अत्यंत पिळवणूक करी.आपल्या मुलीदेखत पत्नीचे चुंबन घेतल्याबद्दल त्याने एका सीनेटरवर नीतिउल्लंघनाचा खटला भरला व कठोर भाषण केले.पण दुसऱ्यांच्या बायकांचे पती जवळ नसताना तो त्यांचे मुके खुशाल घेई ! सार्वजनिक भाषणात तो सदैव म्हणे," दुबळ्या म्हातारपणाला सद्‌गुणाच्या काठीचा आधार सदैव हवा." तो एकदा म्हणाला,"वार्धक्य आधीच विकृत व विद्रूप असते.ती कुरूपता व विकृतता आणखी वाढवू नका." पण एकदा आपल्या सुनेला भेटावयास गेल्या वेळी त्याने तिच्या दासीलाच भ्रष्ट केले! आणि त्या वेळी तो ऐंशी वर्षांचा थेरडा होता !


जे दुर्गुण त्याच्या रोमरोमांत भिनलेले होते,ज्या दुर्गुणांचा तो मूर्तिमंत पुतळा होता,त्याच दुर्गुणांसाठी तो दुसऱ्यावर मात्र सारखे कोरडे उडवीत असे.दुसऱ्याचे दोष पाहण्यात तो अग्रेसर होता.

स्वतःच्या वासना तो खुशाल तृप्त करून घेई;परंतु दुसऱ्यांच्या तसल्याच वासना मात्र दाबून ठेवून तो स्वतःच्या पापाचे जणू परिमार्जनच करी,दुसऱ्याच्या वासना दडपून टाकणे हीच जणू त्याला स्वतःला शिक्षा.स्वतःच्या देशावर त्याचे फार प्रेम होते.पण आपले आपल्या देशावर जितके प्रेम आहे त्यापेक्षा अधिक प्रेम आपल्या देशाने आपणावर करावे असे त्याला वाटे.तो देशाला जणू देवच मानी;पण देशबांधवांनीही आपणास देव मानावे असे त्याला वाटत असे.'कॅटो रोमचा जितका ऋणी आहे,त्यापेक्षा रोम कॅटोचे अधिक ऋणी आहे' असे तो म्हणे.आपणास इटालियन राष्ट्राचा भाग्यविधाता बनविण्यात परमेश्वराने फार उत्कृष्ट गोष्ट केली,असे त्याला वाटे." माझ्या हातांत इटलीचे भवितव्य सोपविण्यात परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली" असे तो म्हणे.आपण म्हणजे परमेश्वराच्या हातची अपूर्व कृती असे त्याला वाटे.


रोमच्या नावाने स्वतःची महत्त्वाकांक्षा पुढे ढकलावी, आपले स्वार्थ साधावेत,अशी त्याची इच्छा होती.नाव रोमचे,स्वार्थ आपला ! रोमचे नुकसान झाले तरी हरकत नाही;पण आपला स्वार्थ साधलाच पाहिजे, असे त्याचे मत होते.पहिल्या प्रथम आपला स्वार्थ,मग रोमचा ! आधी आपली पूजा,नंतर रोमची ! पहिली महत्त्वाकांक्षा स्वतःच्या मोठेपणाची,दुसरी रोमच्या वैभवाची! रोमला बाजूस सारून तो आपला मोठेपणा साधी व जगाची होळी करून रोमला मोठे करू पाही. आपल्याच देशबांधवांना लुटून,

सावकारी करून तो स्वतःसंपन्न झाला व इतरांना लुटून तुम्ही श्रीमंत व्हा,असे त्याचे आपल्या देशबांधवांना सांगणे असे.'कार्थेज लुटा,धुळीस मिळवा व गबर व्हा'असे तो बिनदिक्कत उपदेशी व त्यासाठी वक्तृत्वातील सर्व प्रकार व साऱ्या हिकमती तो योजी.

उपरोध,आरोप,प्रार्थना,अश्रू, गडगडाट सारे प्रकार,साऱ्या भावना,तो उपयोगात आणी.रोमन लोकांच्या स्वार्थी भावना जागृत करण्यासाठी.त्या जागृत होऊन ते पक्के दरोडेखोर बनावेत;व त्याच्या गुन्हेगारी वृत्तीही जागृत व्हाव्यात म्हणून तो अपूर्व भाषणे करी.तो पराकाष्ठेचा नाटकी होता.त्याचे हावभाव,त्याचा आवेश त्याचे सारे काही बेमालूम असे.एकदा आपले सीनेटमधले भाषण त्याने संपविले न संपविले,तोच त्याच्या झग्याच्या टोकाला बांधलेले अंजीर गाठ सुटून एकदम भराभर खाली पडले.काही सिनेटरांनी ते अंजीर उचलले व किती सुंदर केवढाले तरी मोठे हे.अशी त्याची प्रशंसा केली.लगेच कॅटो जणू सहज म्हणाला,असे अंजीर कार्थेजच्या आसपास होतात.गलबतांतून रोमपासून तेथवर जाण्याला फक्त तीन दिवस लागतात.


सिनेटमधील त्याची भाषणे म्हणजे द्वेष-मत्सरांची जणू उपनिषदेच असत.ती धटिंगणांसमोर गायिलेली जणू द्वेषाची गीतेच असत.

त्याचे शब्द ऐकण्यास श्रोते जणू उत्सुक असत.त्याचे रानवट बेत हाणून पाडण्यासाठी मूठभर प्रामाणिक लोक प्रयत्न करीत,

पण अशा मूठभरांच्या विरोधाला कोणी भीक घालीत नसत, तिकडे कोणी लक्षही देत नसत. वृद्ध व पोक्त सिनेटरही युद्धासाठी उत्सुक होते.कारण,लढणारा व मरणारा तरुण;व विजयध्वज मिरवून वैभवाचे वारसदार होणार मात्र वृद्ध सिनेटर,अशी वाटणी निश्चित होती. पैसेवाले,पेढीवाले हेही कॅटोच्याच बाजूचे होते.कारण, त्यांना कार्थेजियनांच्या स्पर्धेची दहशत वाटे.कार्थेजची सत्ता,संपत्ती व वैभव ही वाढली तर रोमचे कसे होणार, आपल्या व्यापाराचे काय होणार,अशी साधार भीती त्यांना सदैव भेडसावीत असे.कॅटोप्रमाणे त्यांनाही वाटे की,रोमची भरभराट व्हावयास पाहिजे असेल तर कार्थेजचा नाश झालाच पाहिजे.कार्थेजच्या स्वारीची सर्व सिद्धता झाली. पण स्वारी करण्याला कारण मिळेना.योग्य सबब सापडेना.पण कॅटोचे बेत अशाने थोडेच अडणार होते?असल्या क्षुद्र गोष्टी त्याच्या मनोरथांच्या आड येणे शक्यच नव्हते. निमित्त सापडत नसेल,तर निर्माण केले पाहिजे,असे तो म्हणे,युद्ध करण्यासाठी एक सबब त्याने तयार केली. ज्याप्रमाणे त्याने रोमन जनतेत युद्धाची इच्छा उत्पन्न केली.त्याप्रमाणे त्याने रोमन जनतेत युद्धाची इच्छा उत्पन्न केली,दुसऱ्या प्यूनिक युद्धाच्या अखेरीस 'रोमशी मित्रभावाने वागणाऱ्या कोणत्याही राष्ट्राशी आम्ही लढाई करणार नाही',असे कार्थेजियनांनी कबूल केले होते. पण त्यांना केलेला करार मोडणेच भाग पडावे अशी परिस्थिती कॅटोने उत्पन्न केली.नुमिडियाचा राजा मॅसिनिस्सा याला त्याने कार्थे जियनांच्या प्रदेशावर स्वारी करण्याचा हुकूम दिला.कार्थेजियनांची शेतेभाते जाळा,गुरेढोरे पळवा,अशी आज्ञा त्याने केली. मॅसिनिस्साने आज्ञेनुसार केले.

शक्य तोवर कार्थेजियनांनी कळ सोसली;पण शेवटी बचावासाठी म्हणून त्यांनी परत प्रहार केला नव्हे,तसे करणे त्यांना भागच पडले.योजिलेले कारस्थान सिद्धीस गेलेले पाहून रोमन लोकांना मनातल्या मनात खूप आंनद झाला.ते म्हणू लागले," कार्थेजने हे काय केले? यांनी असा कसा करारभंग केला? आम्ही तर थक्कच झालो या नीच कृत्यामुळे फसवे व अप्रामाणिक आहेत तर एकूण हे! रिपब्लिकच्या मित्रावर हल्ला करण्याचे पाप यांनी कसे केले?" सिनेटरांनी कार्थेजला तत्काळ कळविले, " तुमची व आमची लढाई सुरू झाली आहे."


कार्थेजियन जाणत होते की,ते युद्ध म्हणजे त्यांना मरणच होते.

त्यांनी तहासाठी रोमला वकील पाठविला व कळविले,

मॅसिनिस्सावर आम्ही चाल केली खरीच.ही जी दुर्दैवी घटना घडून आली,त्याबद्दल कराल ती शिक्षा भोगावयाला आम्ही तयार आहोत.मॅसिनिस्सावर हल्ला करणाऱ्यात जे दोन प्रमुख पुढारी होते,त्यांना त्यांनी रोमच्या समाधानार्थ व ते तशी मागणी करतील हे आधीच ओळखून ठार करून टाकले.रोमन लोकांची मैत्री परत मिळावी म्हणून काहीही करावयास ते तयार होते. 'तुमच्या मैत्रीच्या अटी कृपा करून कळवा' असे त्यांनी रोमला परोपरीने विनविले.


मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन,जगातील कपटपटूंचा शिरोमणी कॅटो


"ठीक आहे," सीनेटरांनी उत्तर कळविले,"ज्याअर्थी तुम्ही नीट वळणावर आला आहात,त्याअर्थी तुमचा देश कायदे,तुमची कबरस्थाने,तुमची मालमत्ता,तुमची स्वतंत्रता,सारे आम्ही तुम्हाला परत देत आहोत.पण तुम्ही आपल्या सिनेटरांचे तीनशे मुलगे आमच्याकडे ओलीस म्हणून पाठवा.तसेच अतःपर आमच्या वकिलांचे सांगणे सदैव ऐकत जा,व ते सांगतील ते ते बिनबोभाट मान्य करीत जा."


ही रानवट व खुनशी मागणीही कार्थेजियनांनी कबूल केली.त्याने रोमन वकिलांच्या ताब्यात तीनशे मुलगे दिले. एका गुलामवाहू जहाजात गुराढोरांप्रमाणे कोंबून हे अभागी जीव रोमला पाठविण्यात आले! ते तीनशे मुलगे मिळताच रोमची आणखी नवी मागणी आली, "कार्थेजने निःशस्त्र झाले पाहिजे,सारी हत्यारे खाली ठेवली पाहिजेत." पुन्हा एकदा खाली मान घालून कार्थेजियनांनी हीही अट कबूल केली.शस्त्रागारे व दारूची कोठारे रिकामी करण्यात आली.खाजगी घरांच्याही झडत्या झाल्या.बचावाचे प्रत्येक साधन हिरावून घेण्यात आले.दगड वगैरे फेकण्याची तीन हजार यंत्रे व दोन लाख चिलखते रोमन लोकांच्या स्वाधीन करण्यात आली. रोमने जी जी मागणी केली ती ती कार्थेजने मान्य केली.कार्थेज अगतिक व दुबळे होऊन पडले होते.पुन्हा एकदा कार्थेजचे वकील रोमन वकिलांकडे जाऊन विचारते झाले. "रोमनांना अजून काही पाहिजे आहे का?"


कॉन्सल्सनी उत्तर दिले, "आता आणखी फक्त एकच गोष्ट पाहिजे;

कार्थेजचा संपूर्ण नाश!" हे शब्द ऐकून कार्थेजच्या वकिलांना अपार दुःख झाले,सहस्र वेदना झाल्या.पण त्यांनी सारे दुःख गिळून शांतपणे सांगितले, "ठीक, आम्हाला शहर सोडून जाण्यास थोडा वेळ द्या. आम्हाला आमच्या घरादारातून हाकलून देण्यापूर्वी सामानसुमान बांधावयाला तरी थोडा अवसर द्या की!" रोमन कॉन्सल्सनी औदार्याचा मोठा आव आणून ही विनंती मान्य केली व त्यांना थोडा अवधी दिला.


काही दिवसांनी कार्थेजच्या दरवाज्यासमोर रोमन फौजा दाखल झाल्या.शहरात शिरून विध्वंसनाचे काम सुरू करावयाला रोमन सैनिक फार अधीर झाले होते.पण त्यांना जेथे जे दिसले त्यामुळे ते द्विडमुख झाले.शहराचे दरवाजे बंद होते व बुरुजाबुरुजाचे ठिकाणी सशस्त्र थवे उभे होते.कार्थेजियनांनी आपल्या सर्व गुलामांना मुक्त केले होते.शहराच्या रक्षणार्थ सारे स्त्री-पुरुष,सारी मुलेबाळे,

लहानथोर हत्यारे घडवीत होते.शस्त्रे बनविण्याचे काम रात्रंदिवस अखंड चालू होते.लोखंड वगैरे धातू मिळावेत म्हणून मोठमोठ्या इमारती पाडून टाकण्यात आल्या.संरक्षक यंत्रे बनविण्यासाठी त्यांचे लाकूड घेण्यात आले.त्या यंत्रांना बांधण्यासाठी दोऱ्या हव्या होत्या;म्हणून स्त्रियांनी आपले लांब केस कापून त्यांच्या दोऱ्या बळून दिल्या ! आपल्या शहराचे प्राण ते विकणार होते;पण शत्रूकडून जास्तीतजास्त किंमत वसूल केल्याशिवाय मात्र शहर ताब्यात द्यावयाचे नाही असा निश्चय त्यांनी केला होता.


शहराचे तट भंगून रोमनांकडे कब्जा जावयास तीन वर्षे लागली.शहर घेतल्यावर त्यांतील सर्व नागरिकांना ठार करण्याला त्यांना सतरा दिवस लागले.कित्येक लाखांची वस्ती ! पण अखेर त्यांतील केवळ मूठभर शिल्लक राहिले! शेवटी त्यांनाही गुलाम करून विकण्यात आले.साऱ्या शहरात एकही उभी भिंत राहिली नव्हती.शिपायांचे हे विध्वंसनाचे काम संपले तेव्हा मारलेल्या पाच लाख कार्थेजियनांच्या शरीरांवर सर्वत्र सहा फूट उंचीचा राखेचा ढीग शहरभर पडला होता! रोमच्या लष्करी भव्यतेचे हे केवढे थोर स्मारक !


मिळालेल्या विजयाचा समारंभ करण्यासाठी रोमन फौजा परत आल्या.पण त्यांचे स्वागत करण्याला समारंभाचा तो स्वामी कॅटो तिथे नव्हता.कार्थेजियनांच संबंध जातच्याजात नष्ट करुन टाकण्यात अत्यंत दुष्ट कुकर्माचा तो मुख्य योजक होता.त्या लाखो अगतिक लोकांच्या करूण किंकाळ्या त्याच्या वृद्धकानांना मधुर संगीताप्रमाणे वाटल्या असत्या.पण त्याच्या अनंत खटपटीने ते फळ देवांनी त्याला पाहू वा चाखू दिले नाही.ख्रि.पू. १४९ साली तो मरण पावला.कार्थेजचा संपूर्ण निःपात होण्यापूर्वीच तीन वर्षे तो मेला.