यांना झाड म्हणायचं का?
झाड नक्की कशाला म्हणायचे ? शब्दकोशाप्रमाणे जिच्या खोडातून फांद्या फुटून वाढतात अशी लाकडी वनस्पती म्हणजे झाड.म्हणजे वरच्या बाजूला वाढणारे खोड हा झाडाचा मुख्य भाग असायला हवा.ज्या वनस्पतींमध्ये असे नसते त्यांना 'झुडूप' म्हटले जाते.पण या व्याख्येत आकाराचे काय महत्त्व आहे?
मेडिटेरेनियन भागातील जंगलांबाबत ऐकून मला थोडं खटकतं.झाडं कशी अजस्र असायला हवीत, ज्यांच्यासमोर आपण गवतातल्या मुंगी एवढे सामान्य वाटतो.पण कधी कधी पूर्ण उलटा अनुभव घेतो.जसा मला लॅपलॅन्ड मध्ये आला.इथल्या झाडांसमोर मला लिलिपुट राज्यामधील गलिवर असल्यासारखे वाटू लागले.
मी टुंड्रा भागातील खुजा झाडांबद्दल बोलत आहे.ही इतकी लहान असतात की चालतानाही ती तुडवली जातात.त्यांना साधारण आठ इंच वाढायलाही एखादं शतक लागतं.या वनस्पतीची विज्ञानात झाड म्हणून नोंद नाही आणि आर्क्टिक झुडपी बीच झाडांचीही नाही.या झाडाला दहा फूटांपर्यंत फांद्या येतात पण नजरेच्या खाली राहणाऱ्या या झाडाला गांभीर्याने घेतले जात नाही.पण हा निकष जर छोटे बीच आणि डोंगरी ॲश वनस्पतींना लावला तर त्यांनाही झाडे म्हणता येणार नाही.
हरिण आणि इतर सस्तन प्राण्यांकडून या दोन्ही झाडांची भरपूर चराई होते त्यामुळे त्यांना जमिनीतून अनेक फुटवे फुटतात आणि एका झुडपासारखे दिसू लागतात. एका दशकामध्ये ही त्यांची जेमतेम वीस इंच वाढ होते.
आणि जर एखादे झाड कुऱ्हाडीने कापून टाकले तर? ते मरून गेलंय असं समजायचं का? सुरुवातीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे जुनी खोडं काही शतकं त्यांच्या मित्रांच्या साहाय्याने आजही जिवंत अवस्थेत आहेत,त्यांना झाड म्हणता येईल का? आणि जर ते झाड नसेल तर मग त्यांना काय म्हणायचं? एखाद्या जुन्या खुंट्यातून नवीन खोड आले की अजूनच पंचाईत.
अनेक जंगलातून हे असं होत असतं.युरोपमध्ये अनेक शतकं पानझडी झाडांची अगदी बुंध्यापासून कापणी होत असे.याचे लाकूड कोळसा बनविण्यासाठी काढले जात असे.आणि याच खुंट्यातून नवीन खोड वर येते. आज इथे असलेली पानझडी जंगलं अशीच तयार झाली आहेत.अशा छाटणीला 'कोपायसिंग' म्हणतात.ओक आणि हॉर्नबीमची जंगले कोपायसिंग मुळे तयार झालेली आहेत.या जंगलातून झाडाची छाटणी आणि त्यातून पुन्हा झाड फुटणे हे अनेक दशकं चालू आहे. यामुळे इथली झाडं प्रौढ अवस्थेतील उंची गाठू शकत नाही.त्या काळात युरोपमध्ये गरिबी होती.त्यामुळे हे लोक झाड वाढायची वाट न पाहता कोपायसिंग करीत असत.युरोपियन जंगलातून फेरफटका मारताना असे अवशेष सहज नजरेस पडतात.वेळोवेळी छटाई केलेल्या झाडांना बुंध्यातून अनेक खुरट्या फांद्या येतात आणि पालवी दाट होते.आता ह्या फांद्यांना काय म्हणावं ? ती तरुण रोपं आहेत का हजारो वर्ष जुनी झाडं ?
हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडलेला आहे,विशेषतः डालरना, स्वीडन इथे प्राचीन स्प्रूस वृक्षांवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना.डालरना येथील सर्वांत प्राचीन स्प्रूस झाडाची मुख्य खोडाभोवती एखाद्या सतरंजी सारखी सपाट झुडपी वाढ झाली आहे.ही सर्व वाढ एकाच झाडाची आहे आणि त्याच्या मुळांचं कार्बन १४ पद्धतीने डेटिंग म्हणजे वय काढले गेले आहे.कार्बन १४ हा अणुकिरणोत्सर्जन करतो आणि हळूहळू कुजतो. याचा अर्थ अवकाशात कार्बन १४ आणि इतर कार्बन यांचे गुणोत्तर (रेशो) बदलणार नाही.एखाद्या अविचल जैविक मालात (उदाहरणार्थ लाकडात) कार्बन १४ असला तर त्याचे विघटन चालू राहते पण नवीन अणुकिरणोत्सर्जित कार्बन मात्र जमा होत नाही.म्हणजेच त्यामध्ये जितका कमी कार्बन १४ तितकंच त्याचं वय जास्त.
संशोधनातून असे दिसले की,ते स्प्रूस ९५५० वर्ष जुने होते.त्यातली काही - फुटवे हे इतके जुने नसले तरीही शास्त्रज्ञांनी त्यांना जुन्या झाडाचा भाग मानले.
आणि माझ्यामते हे अगदी बरोबर आहे.वयाचा अंदाज घ्यायला जमिनीवर असलेल्या वाढीचा विचार करण्यापेक्षा जमिनीखालचा भाग किती जुना आहे,हे लक्षात घेणे जास्त योग्य आहे कारण हे सगळं एकाच जिवाचा भाग आहे.
इतक्या शतकांचे हवामानाचे घाव या मुळांनीच झेलले आहेत.आणि वेळोवेळी मुळातूनच फांद्या फुटल्या आहेत.
मुळांना अनेक शतकांचा अनुभव आहे ज्याच्या आधाराने झाड आजपर्यंत जिवंत आहे.
या स्प्रूसवर झालेल्या संशोधनामुळे जीवशास्त्रातील काही विचारसरणी बाद झाल्या आहेत.या अभ्यासाआधी स्प्रूस पाचशे वर्षांपेक्षा जास्त जगू शकते, हे कोणाला माहीत नव्हते.लोकांना वाटत होते की हा सूचीपर्णी वृक्ष स्वीडनमध्ये बर्फ कमी झाल्यावर म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी दाखल झाला.आपल्याला जंगल आणि वृक्षांबाबत किती कमी ज्ञान आहे आणि या विश्वाची अजून किती गुपितं उलगडायची बाकी आहेत, याचं हे अनामिक झाड माझ्यासाठी प्रतीक आहे.
आता थोडं मुळांकडे वळू.हा झाडाचा सर्वांत महत्त्वाचा अवयव का बरं असेल? असं म्हणा की मुळ म्हणजे झाडाचा मेंदू.तुम्ही म्हणाल मेंदू ? हे जरा जास्तच होत नाहीये का? कदाचित असेलही पण आज आपल्याला माहिती आहे की झाडेही शिक्षण घेतात.याचा अर्थ असा की,हे ज्ञान त्यांना कुठेतरी साठवून ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी झाडांमध्ये अवयव असणार.हा अवयव नेमका कुठे आहे ते आपल्याला माहीत नाही पण मुळं हे काम अचूक करू शकतात.स्वीडन मधल्या त्या म्हाताऱ्या स्प्रूस वृक्षाला हे माहीत होतं की आपला जमिनी खालचा भाग हाच फक्त कायमस्वरूपी टिकणार आहे.मग तो ह्या शिवाय दुसरीकडे कुठे ज्ञानाचा साठा करेल?
नवीन अभ्यासातून असेही दिसते की,झाडाच्या नाजूक मुळांच्या जाळ्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत.
या जाळ्यातून झाडाच्या रासायनिक हालचाली चालू असतात,असे आता शास्त्रज्ञ मानतात.यात काहीच आश्चर्य नाही.मानवी अवयवांचे क्रियाकलापही रासायनिक संदेश वाहकांकडून नियंत्रित ठेवले जातात. मुळं जमिनीतले पदार्थ शोषून घेतात आणि ते झाडाला आणून देतात.आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश संश्लेषणातून उत्पादित पदार्थांचे मुळांमार्फत बुरशी अवस्थेतील झाडांच्या साथीदारांना वाटप करतात. त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्यांना धोक्याचे संदेशही पोचवतात.पण तरीही मुळांची बरोबरी मेंदूशी होईल का?आपण ज्याला मेंदू म्हणतो,त्यात मज्जातंतूंमार्फत होणारे संदेशवहनाचे कार्य असायला हवे आणि ते कार्य सुरळीत होण्यासाठी रासायनिक प्रक्रियेबरोबरच विद्युत आवेगांचाही वापर असायला हवा.आपल्याला झाडामधल्या नेमक्या याच क्रिया टिपता येतात.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन
एकोणिसाव्या शतकातच आपल्याला हे शक्य झाले. गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांमध्ये एक नवीन चर्चा चालू आहे.
झाडांना विचार करता येतो का? त्यांना बुद्धिमत्ता असते का?
बॉन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सेल्युलर अँड मॉलिक्युलर बॉटनीमध्ये कार्यरत असलेले फ्रँटिसेक बलुसका आणि त्यांच्या बरोबरीच्या संशोधकांच्या मते,मुळाच्या टोकांशी मेंदू सारखे अवयव असतात.हे संदेश पोचवण्यात कार्यरत असतात,पण याव्यतिरिक्त तिथे जनावरात सापडणारे काही अणू आणि विशिष्ट प्रणालीही असतात.जेव्हा मुळांची वाढ होऊन पुढे सरकण्याची क्रिया चालू असते तेव्हा त्यांना काही उत्तेजनांची जाणीव होते.मुळं जेव्हा अशा संक्रमणाच्या क्षेत्रातून पुढे सरकत असतात तेव्हा त्यातून होणारा विद्युतप्रवाह या संशोधकांनी टिपला.पुढे सरकताना मुळाला जर विषारी पदार्थ,मोठे दगड किंवा दलदल लागली तर आपल्या वाढीमध्ये योग्य बदल करण्याच्या सूचना मुळाकडून झाडाला जातात.अशा परिस्थितीत वाढणाऱ्या मुळाचे टोक आपली दिशा बदलते आणि ते क्षेत्र टाळून पुढे जाते.
अशा वागणुकीतून झाडाची बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती किंवा भावना दिसून येतात,असा वाद शास्त्रज्ञांमध्ये आज चालू आहे.याचे एक कारण म्हणजे जनावरातूनही अशा प्रकारच्या नोंदी केल्या जातात त्यामुळे झाड आणि जनावर यांच्यातले विभाजन धूसर होत जाईल,अशी भीती असू शकेल.
पण मग काय झाले? त्यात एवढं भयानक काय आहे? शेवटी जनावर आणखी वनस्पती यातील भेद मुख्यतः स्वतःसाठी ते अन्नपुरवठा कसा करू शकतात यावरून असतो.वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात तर जनावरे इतर सजीवांना खातात.
आणि दुसरा मोठा फरक म्हणजे हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचे क्रियेत रूपांतर होण्यास किती काळ लागतो,हा होय.मग याचा अर्थ असा होतो का की,जे सजीव संथगतीने जीवन जगतात त्यांना कमी लेखायला हवं? मला कधी कधी असं वाटतं की,जर आपल्याला वनस्पती आणि जनावरातील समानता निःशंकपणे दाखवता आली तर आपण वनस्पतींना जास्त मान देऊ !