* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ४.१ स्पॉटेनियस जनरेशन / 4.1 Spontaneous Generation 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/४/२५

४.१ स्पॉटेनियस जनरेशन / 4.1 Spontaneous Generation 

सतराव्या शतकाच्या मध्यात मायक्रोस्कोप्स आणि मायक्रोस्कोपिस्ट्स यांनी माणसाला आतापर्यंत न दिसलेलं सजीवांचं जग खुलं करून दिलं.पण त्यामुळे सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक कमी झाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा सजीवांच्या उगमाचा प्रश्न उपस्थित झाला.


मोठे जीव आपल्या आईच्या पोटातून किंवा अंड्यातून आपल्या लहानग्यांना जन्म देऊन आपली पुढची पिढी निर्माण करतात हे तर सगळ्यांनाच माहीत होतं.मग डोळ्यांना न दिसणारे हे सूक्ष्मजीव आपली प्रजा कशी निर्माण करतात आणि मुळात म्हणजे ते नेमके येतात तरी कुठून? धूळ-माती-दलदल,घाण,खराब झालेलं अन्न अशा ठिकाणी सापडत असतील तर ते कदाचित त्याच पदार्थांपासून तयार होत असावेत असं आता काहींना वाटायला लागलं होतं.त्यातूनच अशा निर्जीव घटकांपासून सूक्ष्मजीव,अळ्या,लहान किडे तयार होतात या संकल्पनेला 'स्पॉटेनियस जनरेशन' असं नाव मिळालं.अनेक वैज्ञानिक हे सिद्धही करून दाखवत होते.आपल्याच स्वयंपाकघरातल्या उरलेल्या अन्नामध्ये काहीच दिवसांत अळ्या किंवा लहान किडे तयार होतात,यावरून हे स्पॉटेनियस जनरेशन सिद्ध होत होतं.! आता जवळपास सगळ्याच बायॉलॉजिस्ट्सनी ही संकल्पना स्वीकारली होती.


पण रक्ताभिसरणामध्ये धमन्या आणि शिरा यांना जोडणाऱ्या अतिसूक्ष्म नळ्या (कॅपिलरीज) असाव्यात असं भाकीत करणाऱ्या विल्यम हार्वे यानं कदाचित हे सूक्ष्मजीव त्यांच्याही

पेक्षा लहान बिया किंवा अंड्यांतून तयार होत असावेत असा अंदाज केला होता ! 


पण त्या वेळच्या लोकांना जो माणूस अशा अतिसूक्ष्म नळ्यांचं (कॅपिलरीज) भाकीत करतो,तो काय कशाचंही भाकीत करेल,असं त्याच्याबद्दल वाटत होतं आणि त्यांनी हार्वेकडे फारसं लक्ष दिलं नाही.पुढे या कॅपिलरीज खरोखर असतात असं त्याचाच शिष्य माल्पिघी यानं सिद्ध केलं.


सजीवांचं वर्गीकरण,सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


या स्पॉटेनियस जनरेशनबद्दल हार्वेनं जे लिहून ठेवलं होतं,ते इटालियन वैज्ञानिक फ्रान्सिस्को रेडी (Francesco Redi) (१६२६ ते १६९७) याच्या वाचनात आलं आलं.


 'सूक्ष्मजीवांचीही अंडी किवा बीज असावेत काय?' या कल्पनेनं तो भारावूनच गेला आणि त्यानं या गोष्टीवर आणखी संशोधन करायचं ठरवलं.१६६८ मध्ये त्यानं हा प्रयोग हाती घेतला.त्यानं वेगवेगळ्या प्रकारचं मांस असलेल्या परीक्षानळ्या तयार केल्या.त्यातल्या त्यानं सील केल्या आणि तशाच उघड्या ठेवल्या. उघड्या परीक्षानळ्यांमधल्या मांसावर माश्या बसू शकत होत्या आणि बंद परीक्षानळ्यांवर माश्या बसू शकत नव्हत्या,हवाही जाऊ शकत नव्हती.उघड्या परीक्षानळ्यांत काहीच दिवसांत अळ्या तयार झाल्या आणि बंद परीक्षा नळ्यांतलं मांस तसंच राहिलं.त्यात अळ्या झाल्या नाहीत.पुन्हा रेडीनं आणखी काही परीक्षानळ्यांत मांस ठेवलं आणि त्यांना कापसाचे बोळे लावले.आता या नळ्यांमध्ये हवा येऊ जाऊ शकत होती,पण त्यांतल्या मांसावर माश्या बसू शकत नव्हत्या. याही मांसामध्ये अळ्या तयार झाल्या नाहीत.त्यातूनच मग या अळ्या मांसातून नाही तर माश्यांच्या अंड्यांतून तयार होतात असं सिद्ध झालं.


किमान लहान जिवांसाठी तरी स्पॉटेनियस जनरेशन लागू होत नाही हे सिद्ध झालं होतं.गंमत म्हणजे हा शोध लावणारा रेडी हा मुळात काही वैज्ञानिक नव्हताच ! तो एक कवी होता.१६८५ मध्ये प्रसिद्ध झालेलं त्याचं 'बॅको इन टॉस्काना' हे काव्य त्या काळातलं इटलीतलं सर्वश्रेष्ठ काव्य मानलं जातं !


रेडीनं जवळपास १८० पॅरासाइट्सचा (परोपजीवींचा) अभ्यास केला होता.त्यानं अर्थवर्म्स आणि हेल्मिंथ्स या सजीवांचे दोन वेगळे गट असतात हेही दाखवून दिलं आणि रेडीच्या या प्रयोगांमुळे रेडी पॅरासायटॉलॉजीचा प्रणेता मानला जातो.


पॅरासाइट्सच्या याच अभ्यासावरून पॅरासाइट्स बारीक बारीक अंडी घालतात,त्यातून त्यांच्या अळ्या बाहेर येतात आणि मग अळ्यांपासून पुढे मोठे पॅरासाइट्स तयार होतात हे रेडीनं पाहिलं होतं.


त्यातूनच त्याला स्पॉटेनियस जनरेशनचे प्रयोग सुचले असं मानलं जातं. पण काहीही असलं तरी सजीव हा आधीच्या धूळ, माती,घाण यांच्यापासून आपोआप निर्माण होतो या पूर्वापार चालत आलेल्या धारणेला स्वतः प्रयोग करून सत्य काय आहे ते पडताळून पाहणारा रेडी हा पहिलाच वैज्ञानिक होता.


याच दरम्यान लेव्हेनहूकनं माश्या आणि अळ्यांपेक्षा कितीतरी लहान असलेल्या प्रोटोझुआचा शोध लावला होता.प्रोटोझुआ त्या मानानं फारच साधे जीव होते. किमान त्यांनी तरी स्पॉटेनियस जनरेशननं प्रजनन करायला हवं होतं.यावरही अनेक प्रयोग झाले. 


सुरुवातीला प्रोटोझुआ नसलेल्या मांसाच्या सूपमध्ये नंतर प्रोटोझुआ तयार होताहेत असं लक्षात आलं.या प्रयोगानं रेडीनं स्पॉटेनियस जनरेशनच्या आधीच्या ठाम समजतीला चांगलंच आव्हान दिलं होतं.आता मात्र या प्रश्नानं चांगलीच उचल घेतली आणि वैज्ञानिकांचे चक्क स्पॉटेनियस जनरेशनच्या बाजूनं आणि स्पॉटेनियस जनरेशनच्या विरुद्ध असे दोन गट पडले.


स्पॉटेनियस जनरेशनच्या बाजूनं बोलणाऱ्यांचं तत्त्व स्पष्ट होतं.जर्मनीचा डॉक्टर जॉर्ज अर्स्ट स्टाल (Georg Ernst Stahl) (१६६० ते १७३४) हा या बाजूनं होता. त्याची फ्लॉजिस्टॉनची थिअरी प्रसिद्ध होती.


या थिअरीमध्ये त्याचं असं म्हणणं होतं,की सगळ्याच पदार्थांत फ्लॉजिस्टॉन असतं आणि तो पदार्थ जळायला लागल्यावर किंवा लोखंडासारखा गंजायला लागल्यावर त्या पदार्थांतलं फ्लॉजिस्टॉन त्यातून बाहेर पडतं.गंमत म्हणजे गंजल्यावर लोखंडाचं वजन वाढत असेल तर काहींनी या फ्लॉजिस्टॉनचं वजन ऋण असावं असंही सुचवलं होतं.त्यामुळेच लोखंडातून फ्लॉजिस्टॉन निघून गेल्यावर लोखंडाचं वजन वाढत असावं ! गंमत म्हणजे पूर्ण अठराव्या शतकात ही थिअरी योग्यच आहे असं मानलं जात होतं !


स्टालनं इतरही अनेक विषयांवर लिखाण आणि संशोधन केलं होतं.त्यात त्यानं सूक्ष्म सजीवांना वेगळेच नियम लागू होत असावेत असंही विधान केलं होतं. त्यांना माणूस आणि इतर प्राण्यांचे नियम लागू होत नाहीत असं त्यानं म्हटलं होतं.स्टालच्या अशा भंपक विधानांना डच डॉक्टर हर्मन बोर्वे (Hermann Boerhaave) (१६६८ ते १७३८) यानं आक्षेप घेतला होता.त्याच्या काळातला तो खूपच प्रसिद्ध डॉक्टर होता. त्याला डच हिप्पोक्रॅट्स म्हटलं जायचं. आपल्या स्वतःच्या पुस्तकात त्यानं मानवी शरीराचं खूपच सविस्तर वर्णन केलं होतं आणि मानवी अवयवांना केमिस्ट्री आणि फिजिक्स यांचे नियम कसे लागू होतात हे दाखवून दिलं होतं.

त्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचे नियम सजीव आणि निर्जीव या सगळ्यांमध्ये सारखेच चालतात असाही एक सूर या काळात उमटत होता.आणि जर सूक्ष्मजीव हे निर्जीव घटकांमधून निर्माण होत असतील तर ते सजीव आणि निर्जीव यांना जोडणारा दुवा असण्याची शक्यता होती.


त्याच वेळेस सूक्ष्मजीव हे असे निर्जीव पदार्थांपासून तयार होत नाहीत असंही अनेकांचं म्हणणं होतं.पण बायबलमध्ये कुठेतरी स्पॉटेनियस जनरेशनचा उल्लेख केलेला असल्यामुळे हे वैज्ञानिक त्या विरुद्ध बोलायला धजावत नव्हते.कारण त्या काळी धर्माविरुद्ध काही बोलणं म्हणजे जबर शिक्षेला आपणहून आमंत्रण दिल्यासारखंच होतं.


त्याचं असं झालं,१७४८ मध्ये जॉन टर्बेविल्हे निडहॅम (John Turberville Needham) (१७१३ ते १७८१) या इंग्लंडमधल्या कट्टर दैववादी वैज्ञानिकानं एक प्रयोग केला.त्यानं मटनाचं सूप उकळवलं आणि ते टेस्ट ट्यूबमध्ये भरलं.टेस्ट ट्यूबला बूच लावून त्यानं ती बंद केली.त्यानंतर काहीच दिवसांनी या सूपमध्ये सूक्ष्मजीव तयार झाले.त्यानं तर ते सूप उकळवून घेतल्यामुळे ते त्यानं 'स्टराइल' केलं होतं असंच त्याला वाटत होतं. त्यामुळे निडहॅमचा स्पॉटेनियस जनरेशनवर विश्वास बसला. शिवाय,

महत्त्वाचं म्हणजे त्यानं आपले निष्कर्ष चक्क रॉयल सोसायटीला पाठवून दिले आणि आपल्या सामाजिक वजनाच्या जोरावर रॉयल सोसायटीचं मानद सदस्यत्वही त्यामुळे या गोष्टीवर आक्षेप घ्यायला कुणी धजावणारंच नव्हतं.


पुढची तब्बल वीस वर्ष अशीच गेली.१७६८ मध्ये इटालियन बायॉलॉजिस्ट लझारो स्पॅलान्झानी (१७२८ ते १७९९) स्पॉटेनियस जनरेशन या गोष्टीचा पुरावा पाहण्याच्या वेडानं झपाटून गेला होता.जगातल्या सगळ्या गोष्टींचा जन्म होण्यासाठी पालकांची गरज असतेच का,की त्यातल्या काही गोष्टी आपोआप जन्मतात ? या प्रश्नानं भेडसावलं होतं. 


इटलीतल्या स्कँडिआनोमध्ये १७२९ साली लझारो स्पॅलान्झानी जन्मला.त्या काळातल्या समजुतींनुसार कित्येक प्राण्यांना जन्मासाठी आई-वडिलांची गरज नसायची!काही दैवी शक्तींमुळे बरेचसे जीव जन्मतात असं अनेकांना वाटायचं.उदाहरणार्थ-समजा, आपल्याला मधमाश्यांचं एक पोळं हवं असेल तर एका बैलाच्या डोक्यावर प्रहार करून त्याला मारायचं आणि त्याचा मृतदेह जमिनीतून त्याची शिंगं बाहेर येतील असं उभंच पुरायचं.मग एका महिन्यानं त्याची शिंगं तोडून टाकायची,की झालं,मधमाश्या तयार!असल्या वाट्टेल त्या पाककृती हवे ते प्राणी तयार करण्यासाठी त्या काळी प्रचलित असायच्या!पण स्पॅलान्झानीचा मात्र या सगळ्या भाकडकथांवर अजिबात विश्वास बसत नसे.हे सगळं झूठ आहे हे त्याला सिद्ध करून दाखवायचं होतं.


दरम्यान,त्याला निडहॅमच्या प्रयोगांबद्दल कळलं होतं. त्याला निडहॅमच्या प्रयोगातलं सूप पुरेसं उकळलंच गेलं नसावं असं वाटलं.त्यानं आपला प्रयोग करताना अशाच प्रकारचं सूप अर्धा-पाऊण तास चांगलं उकळवून घेतलं आणि मग त्यानं ती टेस्ट ट्यूब सील केली.आता या वेळी मात्र त्यात सूक्ष्मजीव तयार झाले नाहीत.आता यातून कोणतेही जीव हे निर्जीव पदार्थांतून अचानक जन्म घेत नाहीत असं जवळपास सिद्ध झालं होतं.पण स्पॉटेनियस जनरेशनवर विश्वास ठेवणाऱ्या शंकेखोर लोकांनी त्यातूनही वाद निर्माण केला आणि स्पॅलान्झानीनं ते सूप खूपच उकळवल्यामुळे जीवनाला आवश्यक असलेलं व्हायटल प्रिन्सिपल त्यातून हवेत उडून गेल्यामुळे त्यात कोणताच जीव जन्म घेऊ शकत नाही असा युक्तिवाद केला.स्पॅलान्झानीनं मग काचेच्या काही भांड्यांमध्ये मटनाचं सूप,अन्नपदार्थ असं काही काही घेतलं आणि ती भांडी उकळवण्यापूर्वी बंद केली. म्हणजे व्हायटल प्रिन्सिपल नावाचं काही असेल तर ते या वेळी भांड्यातून उडून जाणार नाही.त्यानं त्या भांड्यांचं तोंड चक्क ती भांडी वितळवूनच सीलबंद केलं,या कामात त्याचे हात भाजले तरी त्यानं आपलं काम थांबवलं नाही.मग त्यानं ही काचेची सीलबंद भांडी आणि आतलं सूप गरम केलं.ती तापवण्याचा आणि आतले जीव मरायचा काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी त्यानं एक भांडं थोडाच वेळ तर दुसरं चांगलं तासभर गरम केलं.तसंच ज्यातून हवा जाऊ शकेल असं नुसतंच बूच लावलेलं एक भांडंही त्यानं असंच तापवलं.मग त्यानं ही सगळी भांडी काही दिवस तशीच ठेवली.त्यानंतर काही काळानं त्यानं ती अतिशय काळजीपूर्वक उघडली तेव्हा पूर्णपणे सीलबंद करून तासभर तापवलेल्या भांड्यात त्याला भिगातून पाहताना एकही सुक्ष्मजीव आढळला नाही,पूर्णपणे सीलबंद करून थोडाच वेळ तापवलेल्या भांड्यात त्याला थोडे सूक्ष्मजीव तरंगताना आढळले,मात्र नुसतंच बूच लावलेल्या भांड्यात त्याला कित्येक जीव पोहताना दिसले.याचाच अर्थ हे सगळे जीव त्या भांड्यांमध्ये आधीच असणार आणि ते तसेच जिवंत राहिले असणार किंवा मग ते भांडं पूर्णपणे बंद केलेलं नसल्यामुळे बाहेरच्या हवेतून ते आत घुसले असणार.पण निडहॅम म्हणतो तसं ते काही त्या भांड्यातच तयार झालेले नसणार हे नक्की,अशी खूणगाठ त्यानं मनाशी बांधली.


स्पॅलान्झानीनं आपले निष्कर्ष रॉयल सोसायटीला कळवून बुचकळ्यातच पाडलं.निडहॅमचं म्हणणं खोटं असेल की काय हे त्यांना आता समजेना.पण निडहॅमनं आपला दावा काही सोडला नाही.उलट तो पॅरिसला आपल्या मटनाच्या सूपमधून जन्मलेल्या जिवांविषयी व्याख्यानं द्यायला गेला आणि तिथल्या एका उमरावाशी त्याचं सूत चांगलंच जमलं.आता निडहॅम प्रयोग करायचा आणि हा उमराव त्या प्रयोगांची वर्णनं लिहायचा.हे करताना तो उमराव प्रयोगशाळेतसुद्धा आपल्या रेशमी कपड्यांना कुठेसुद्धा घाण लागू नये तसंच त्यांना घडी पडू नये याची काळजी घ्यायचा.स्पॅलान्झानीचं म्हणणं खरं आहे हे कळत असूनही कुठल्या तरी दैवी शक्तीमुळे आपल्या मटनाच्या सूपमध्ये जीव निर्माण होतात असा दावा त्यांनी आता केला.रॉयल सोसायटीनं निडहॅमला मानद सदस्यत्व देऊन स्पॅलान्झानीच्या चिडचिडीत आणखीनच भर टाकली.पण तेवढ्यात निडहॅमनंच एक घोळ केला.त्यानं स्पॅलान्झानीवर टीका करताना 'तू तुझ्या भांड्यांना एक तासभर गरम करून त्यातली दैवी शक्ती नष्ट करतोस' असा त्याच्यावर आरोप केला.मग स्पॅलान्झानीनं अनेक भांडी घेऊन त्यात पाणी आणि वेगवेगळ्या बिया टाकून त्या भांड्यांना आधी बूच लावलं आणि नंतर ती तापवली.एक तर त्यानं ती सीलबंद केली नव्हती आणि दुसरं म्हणजे ती तापवायचा काळ वेगवेगळा होता.काही भांडी त्यानं अर्धा तासच तापवली तर काही एक तास,तर काही दोन तास.आता जर निडहॅमचं म्हणणं खरं असेल तर एक तास किंवा त्याहून जास्त वेळ तापवलेल्या भांड्यांमधली सगळी 'व्हायटल प्रिन्सिपल' नष्ट झाल्यामुळे एकही सूक्ष्मजीव दिसायला नको होता.पण तसं न घडता सगळ्याच भांड्यांमध्ये सूक्ष्मजीव मस्त वळवळ करत होते की!म्हणजेच भांड्यांवर लावलेली बुचं सीलबंद प्रकारची नसली की बाहेरच्या हवेतून त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीव जातातच हे स्पॅलान्झानीचं म्हणणं खरं ठरत होतं आणि निडहॅम आणि कंपनीला दैवी शक्तीचं थोतांड बंद करणं भाग होतं.


स्पॅलान्झानीनं आपले निष्कर्ष पुन्हा रॉयल सोसायटीला कळवले आणि या वेळी मात्र त्यांच्या भुवया एकदम विस्फारल्याच ! पण एवढ्यानं स्पॅलान्झानीचं समाधान झालं नव्हतं.हे सूक्ष्मजीव कसे जन्मतात याचा विचार करता करता त्यानं आपलं लक्ष इतर सजीवांकडे वळवलं.नर बेडूक फक्त नव्या जिवाला जन्म देण्यासाठीच अतिशय तीव्र भावनेनं मादीशी रत होतो की त्यामागे दुसरंही काही कारण असतं असे प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होतेच. ्त्यांचा विचार करता करता त्यानं एकदा एक नर बेडूक मादीशी समागम करत असताना त्याचे मागचे दोन्ही पाय चक्क कापून टाकले आणि तरीही मरता मरता त्या बेडकानं आपली मादीवरची पकड काही सैल केली नाही. यावरून स्पॅलान्झानीनं काढलेल्या निष्कर्षात त्या बेडकामध्ये बिनडोक भावना नसून,प्रचंड कामभावना असल्यामुळे असं होत असल्याचं लिहिलं.हे असले विचित्र आणि क्रूर प्रयोग त्यानं फक्त प्राण्यांवरच केले असं नाही.

आपल्या पोटात अन्नाचं पचन कसं होतं हे पाहण्यासाठी त्यानं लाकडाच्या लहान सच्छिद्र पेटीत मांस भरून ती पेटी गिळली आणि त्यातल्या अन्नाचं काय झालं हे पाहण्यासाठी थोड्या वेळानं पुन्हा उलटी काढून ती पेटी बाहेर काढली !


स्पॅलान्झानीनं काळोखातही वटवाघूळ कसं न अडखळता उडू शकतं यावरही अनेक प्रयोग केले होते. आधी त्यानं काही पक्ष्यांवर प्रयोग केले.त्या प्रयोगांमध्ये अंधार झाला की इतर पक्षी अडखळून पडत तरी होते किंवा कशाला तरी धडकत तरी होते.पण आपल्या डोळ्यांत बोट घातलं तरी आपल्याला कळणार नाही इतका अंधार केल्यानंतरही वटवाघळं मात्र एकदाही धडकले नाहीत,की कशाला अडखळून पडले नाहीत. यावरून स्पॅलान्झानीनं जो आपल्याला अंधार वाटतो तो निश्चितपणे संपूर्ण अंधार नसावा,कारण प्रकाशाच्या अभावी वटवाघळांना दिसणं शक्यच नाही.असं त्यानं आपल्या नोंदींमध्ये लिहिलं होतं.यातून त्यानं चूकून का होईना,पण माणसाला न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असणाऱ्या मानवी दृष्टीच्या पलीकडच्याही प्रकाशाचे स्पेक्ट्रम असण्याची शक्यताच वर्तवली होती !


पण गंमत म्हणजे वटवाघळं समोर अडथळा आहे की नाही हे समजायला डोळ्यांचा किंवा प्रकाशाचा वापर करत नाहीत हे त्याला पुढच्या प्रयोगांतून कळलं. पुढच्या प्रयोगात त्यानं वटवाघळांच्या डोळ्यांना पट्टी बांधली तरी ते वटवाघूळ व्यवस्थित उडत होतं. त्यानंतरच्या प्रयोगात तर त्यानं त्या वटवाघळाचे डोळेच चक्क ऑपरेशन करून काढून टाकले आणि आता पुन्हा त्याला उडवलं.तरीही ते वटवाघूळ छानपैकी उडालं आणि दोन इंच रुंदीच्या फटीत जाऊन व्यवस्थित लपलं! त्यानंतर त्यानं वटवाघळांच्या कानांत चक्क मेण, रॉकेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे कानांचे बोळे वापरून उडायला लावलं तेव्हा मात्र ती वटवाघळं खरोखरच अडखळली आणि वाट चुकायला लागली.

त्यातूनच स्पॅलान्झानीनं वटवाघळांना कानांनी अडथळे समजतात हा बायॉलॉजीतला खूपच महत्त्वाचा निष्कर्ष काढला.


काही काळानं स्पॅलान्झानीचं महत्त्व सगळ्यांनी मान्य केलं आणि त्याला मानाची पदंही मिळाली.निडहॅमच्या बंडल प्रयोगांना आणि निष्कर्षांना गुंडाळून ठेवण्यात आलं.


सुक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना सहज दिसत असलेल्या प्राण्यांसारखेच असतात हे सिद्ध करण्यासाठी स्पॅलान्झानीनं त्या सूक्ष्मजीवांवर जळत्या तंबाखूचा धूर तसंच विजेचे लोळ सोडून बघितले.या सर्वांपासून बचाव करण्यासाठी हे जीव माणसं किंवा प्राण्यांसारखेच धडपडतात असं त्याला आढळून आलं.तसंच एका सूक्ष्मजीवातून दुसरा कसा जन्म घेतो याचा शोध अजून त्याला लागलेलाच नव्हता.म्हातारपणातही हे शोधून काढण्याची त्याची धडपड सुरूच असायची.


स्पॉटेनियस जनरेशनवर १८५९ मध्ये शतकात लुई पाश्चरनं प्रयोग केले होते.त्यानं एका लांब नळीसारख्या आडव्या एस च्या आकाराच्या निमुळत्या तोंडाच्या चंबूमध्ये (फ्लास्कमध्ये) सूपचं मिश्रण घेतलं आणि आधीचे जंतू मारण्यासाठी उकळवलं.पण त्यात हवा जाऊ शकत नसल्यामुळे त्या चंबूमध्ये सूक्ष्मजीव निर्माण झाले नाहीत.पण त्यानं आता फ्लास्क थोडं तिरकं केल्यानंतर त्यातलं सूप त्या फ्लास्कच्या निमुळत्या तोंडामध्ये जिथपर्यंत हवा आत येऊ शकते,तिथपर्यंत आलं तर मात्र त्यात सूक्ष्मजंतू वाढतात हे त्यानं दाखवून दिलं.या सगळ्या प्रयोगांतून स्पॉटेनियस जनरेशन शक्य नाही हे लुई पाश्चरनं १९व्या शतकात पुन्हा दाखवून दिलं आणि कोणताही जीव हा निर्जीव गोष्टींपासून जन्म घेऊ शकत नाही या निष्कर्षानं स्पॉटेनियस जनरेशनच्या प्रश्नावर कायमचा पडदा पडला!पण थोड्याच काळात बायॉलॉजीच्या रंगमंचावर 'पृथ्वीवर पहिला जीव केव्हा आणि कसा निर्माण झाला?' या प्रश्नानं प्रवेश करून पुढे येणाऱ्या काळातल्या वैज्ञानिकांना आव्हान दिलं होतं.