आपल्या सर्वांचे शतशःआभार व धन्यवाद...
तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे नोव्हेंबर १९९१ हे आहेत.याच पुस्तकातील लेख तीन भागामध्ये देत आहे. - विजय गायकवाड
यापूर्वी कधीही इतक्या देशांमधले इतके लोक बौद्धिक दृष्ट्या हताश,जणू बुडत चाललेल्या स्थितीत,नव्हते. कारण ते आता कल्पनांच्या झगड्यांच्या,गोंधळांच्या आणि विसंवादी कल्पनांच्या प्रचंड भोवऱ्यात सापडलेले आहेत.आपल्या मानस विश्वावर परस्परविरोधी दृष्टिकोणांचा अक्षरशः मारा होतो आहे.दररोज काहीतरी नवीच टूम निघते आहे,नवीन शोध लागत आहे.धार्मिक चळवळ सुरू होते आहे,नवीन घडामोड होते आहे,किंवा कशाची तरी नवीन अभि-व्यक्ती होते आहे.जाणिवांच्या पटलावर गूढवादी किंवा शास्त्रीय प्रवाह,उपप्रवाह वेगाने वहात आहेत,त्या प्रत्येकाला त्याच्या शास्त्रीय किंवा मानसिक गुरूचा, त्याच्या पुण्याईचा पाठिंबा लाभलेला आहे.कशाचा ना कशाचा,किंवा कशाचाही म्हणा,सतत शोध घेतला जातो आहे, इतकी एकूण अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
या एकूण गोंधळापैकी बराचसा गोंधळ वेगाने येत असलेल्या तिसऱ्या लाटेने तीव्र करत आणलेल्या सांस्कृतिक झगड्यातून निर्माण झालेला आहे. औद्योगिक युगातल्या प्रमुख कल्पनांची अवनती होते आहे,वजावट होते आहे,अपकीर्ती होते आहे.एका तात्विक क्रांतीद्वारा त्यांची तीनशे वर्षापूर्वीची कारकीर्द उलथून टाकण्याच्या दिशेने सुरूवातीची पावले पडू लागलेली आहेत.
शास्त्र,शिक्षण,धर्म व इतर हजारो क्षेत्रात विचारवंत सुधारकांनी शेतीप्रधान संस्कृतीच्या कैवाऱ्यांशी, प्रतिगाम्यांशी लढा देत औद्योगिक संस्कृती पुढे आणली, आता त्यांच्यावरच बचावाची वेळ आणली आहे !
निसर्गाची नवी प्रतिमा…
कल्पनाविश्वात उठलेल्या वादळाचे उत्तम उदाहरण म्हणजे निसर्गाची बदलती प्रतिभा.पृथ्वीची प्रकृती धोक्यात येत चालली आहे हे पाहून गेल्या दशकापासून परिसर-वाद्यांची चळवळ जगभर सुरू झालेली आहे.या चळवळीने प्रदूषण,अन्न टिकविण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने,अणुभट्टचा,महामार्ग,एरोसोल्सची दाटी, केस रंगविण्याची साधने इत्यादींना विरोध करून त्या प्रवृत्तींवर आघात करण्यापेक्षाही अधिक काही केले.
आता आपल्या निसर्गावलंबित्वाबद्दल पुनविचार करण्याची वेळ आली आहे.या विचारातील मूलभूत बदलामुळे निसर्गांची कत्तल करण्यात दंग रहाण्याऐवजी आपण एका ताज्या दृष्टीकोणातून पृथ्वीशी,निसर्गाशी सुसंवाद राखीत त्याच्या सर्वतोपरी बचावाला सिद्ध झालो आहोत.आपण विरोधाची भूमिका सोडून सहयोगाच्या भूमिकेकडे आलो आहोत.
निसर्गात असलेल्या पुनरावृत्त चक्रांचा,पुनर्नवता क्षमतेचा,आणि धारणा क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास करून त्याचा आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठीही आणि समाजाच्या पुनर्आखणोसाठीही उपयोग करून घेऊ लागलो आहोत.या गोष्टीचे प्रतिबिंब आपल्या निसर्गाबाबतच्या दृष्टीकोणात पडलेले आढळून येते. आपल्या बहुतेक कृतीतून आणि कलांतून निसर्गाविषयी आपणाला पुनःवाटू लागलेला आदरच प्रकट होतो.
लाखो शहरवासीयांना ग्रामीण परिसराची ओढ वाटू लागलेली आहे.ग्रामीण परिसरातील वस्तीत होत असलेली वाढ लक्षणीय आहे.नैसर्गिक अन्न,नैसर्गिक प्रसूति,स्तनपान,जैविक लय,शरीराची काळजी या गोष्टींचे महत्व समजून येऊन त्याच्या महत्त्वाचे मनापासून समर्थनही होऊ लागलेले आहे.निसर्गाचे संरक्षण झालेच पाहिजे,त्याच्यावर अत्याचार होऊ नयेत यासाठी प्रचार चालू झालेला आहे.तंत्रज्ञानाचे निसर्गावर होणारे विपरीत परिणाम टाळायला हवेत,त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये असा विचार बळ धरू लागला आहे.
दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीत कोणी कल्पनाही केली नसेल इतकी निसर्गसंपत्तीची नासधूस झालेली आहे.पृथ्वी दुबळी होत चालली आहे.दिवसेदिवस विकास पावणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या विश्वाच्या पसाऱ्यात तिचा ठिपका लहान होत होत नाहीसा होईल की काय अशी भीति निर्माण झालेली आहे.
सुमारे २५ वर्षापूर्वी तिसरी लाट सुरू झाल्यापासून शास्त्रज्ञांनी,नव्या उपकरणांचा संपूर्ण संच,निसर्गाच्या दूरदूरच्या आवाक्याची कल्पना येण्यासाठी,तयार केलेला आहे.लेसर रॉकेट प्लाझ्मा,छायाचित्रणाच्या क्षेत्रात लावलेले विलक्षण शोध,
कॉम्प्युटर्स,किरणयुक्त साधणे या सर्वांनी आजवरच्या आपल्या समजुतींचा भोळा आवाका कमकुवत ठरवला आहे.
आपण मोठ्यात मोठ्या आणि छोट्यात छोट्या घटनांकडे आता पाहू शकतो.आणि त्या पहाण्यातील गतीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.दुसऱ्या लाटेच्या मानाने आपली कुवत फार वाढली आहे.
शोध घेण्यासाठी खुणावणाऱ्या विश्वाचा पसारा कमीत कमी १००,०००, ०००,०००,०००,०००, ०००, ००० इतक्या मैलांइतका आहे,त्याच्यातील १।१,०००,०००,०००,०००,००० व्या सेंटिमीटर क्षेत्रातील घडा-मोडींची आपण अचूक नोंद घेऊ शकतो.आपण सेकंदाच्या १।१०,०००,०००,०००,
०००,०००,०००,००० व्या भागात घडणाऱ्या घटनेचा अभ्यास करू शकतो;या तुलनेत पहा- आपले खगोलशास्त्री आपल्याला सांगतात, की विश्वाचे वय सुमारे २०,०००,०००,००० वर्षांचे आहे !
आणि गरगरायला लावणाऱ्या या विस्तारात, आपल्याला सांगण्यात येते की,जीवसृष्टी अस्तित्वात असलेले पृथ्वी हे एकच ठिकाण नाही.दूरच्या ताऱ्यांजवळ असणारे ग्रह, पग्रह,त्यांच्या उष्णतेबाबतचा अंदाज,त्यांच्यातील ओलाव्याचा अंदाज असे अनेक अभ्यास करून सांगण्यात येते,की इतरत्र ही जीवसृष्टी असण्याचा संभव आहे.
आणि या कल्पनेद्वारा,दुसरोकडेही जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेद्वारा,आपले निसर्गविषयक आकलन आणखीनच बदलते.इ. स. १९६० पासून शास्त्रज्ञ दूरदूरच्या अज्ञातातून आपल्याला काही संदेश मिळतील अशी अपेक्षा बाळगून बसले आहेत.आता या यानांच्या रूपाने आपले आधुनिक यंत्रांनी आणि साधनांनी नटलेले दूत दूर अज्ञाताचा वेध घेण्यासाठी वेगाने झेपावू लागलेले आहेत.
तिसऱ्या लाटेच्या उदयानिशी आपला स्वतःचाच ग्रह आपल्याला खूप लहान व क्षुद्र वाटू लागला आहे. विश्वाच्या पसाऱ्यात आपले स्थान काही फारसे आदरणीय नाही याची जाणीव होते आहे,आणि आपण एकटे नसून आणखी कोणी तरी,कुठे तरी अस्तित्वात आहे ही कल्पना काळजाचा ठोकाच चुकवते.
निसर्गाबद्दल झालेली आपली कल्पना पूर्वीसारखी राहिलेली नाही.
उत्क्रान्तीची योजना…
उत्क्रांतीबद्दलच्या तर कल्पनेतच काय,खुद्द उत्क्रांतीतही बदल घडू लागला आहे !
जीवशास्त्रज्ञ,पुरातत्त्वज्ञ,मानववंशतज्ज्ञ उत्क्रांतीबाबतची रहस्ये शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.त्याचवेळी त्यांना असे आढळून येते आहे,की पूर्वी आपण कल्पना केलेल्या जगापेक्षा हे जग कितीतरी मोठे आणि गुंतागुंतीचे आहे.एके काळी जे नियम वैश्विकता व त्रिकालाबाधितता पावले होते,ते म्हणजे काही विशिष्ट बाबी-बद्दलचे,घटनांबद्दलचे निष्कर्ष होते.त्यांचा आवाका फारच छोटा होता.
" डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडल्यानंतर जीवशास्त्रज्ञांनी उत्क्रांतीच्या यांत्रिकतेचा एक आराखडाच तयार केला.आणि त्याच्या आधारे त्यांनी सर्वच उत्क्रांतीचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला-वैश्विक,रासायनिक,सांस्कृतिक,सामाजिक कल्पनांच्या उत्पत्तिशास्त्रविषयक सर्वांची एकाच यांत्रिकतेने उत्क्रांती झाली अशी त्यांनी कल्पना करून घेतली.परंतु या सर्व ज्ञानाचा शेवट होईल असे,प्रत्येक पातळीवर,नियम बदलत गेले. " असे प्रसिद्ध अनुवांशिकता शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेता,फ्रँकोइस जेकब यांनी म्हटले आहे.
पूर्वापार मानण्यात आलेली अनेक गृहीतके हादरून गेली आहेत.उत्क्रांती ही सुरळित प्रक्रिया न रहाता अचानक घडून येणाऱ्या घटनांतून उत्पन्न होणारी असल्या-मुळेच इतिहासात घडलेल्या 'खंडां'ची आणि 'झेपां'ची उपपत्ती लावता येणे शक्य होते;असे शास्त्रज्ञ म्हणतात.अचानक घडणाऱ्या रचनात्मक बदलांचा काही जण अभ्यास करतात.
या ज्ञानशाखेतील अनेक परस्परविरोधी घटना खुज्या ठराव्यात अशी गोष्ट इ. स. १९५३ मध्ये घडली.या आश्चर्यकारक घटनेने जणू या शाखेतील ज्ञानाला ऐतिहासिक वळण दिले.इंग्लंडमधील केंब्रिज येथील एका शास्त्रज्ञाने,फॅन्सिस क्रिक याने,दावा केला की, आम्हाला जीवनाचे रहस्य सापडले आहे. DNA ची रचना क्रिक व त्या शास्त्रज्ञ मिग जॉन बॅटसन याने स्पष्ट केली.यानंतर होत गेलेल्या अभ्यासातून आणि संशोधनातून इतकी प्रगती झाली की आज जगातील प्रयोगशाळांतून काम करणाऱ्या अनुवांशिकता शास्त्रज्ञांनी,आपण उत्क्रांतीवादाचा शेवट केला आहे असा दावा केला.
कारण संपूर्णतया नवे जैविक आकार ते आता तयार करू शकतात.त्यांनी पेशींतील अनुवंशिकता बदलण्यात यश मिळविले आहे.तिसऱ्या लाटेतील विचारवंतांनी ह्या गोष्टीला तोंड दिले पाहिजे की आपण उत्क्रांतीचो योजना करू शकतो.आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही करू शकतो.उत्क्रांती आता कधीच पूर्वीसारखी असणार नाही.उत्क्रांती या प्रक्रियेचेही पुनर्कल्पनाविष्करण झाले आहे.
प्रगती….
प्रगती विषयीच्या आपल्या कल्पनांचेही पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आलेली आहे.दुसऱ्या लाटेच्या युगात लागणारा प्रत्येक शास्त्रीय शोध व सुधारित उत्पादन हे मानवाच्या पूर्णतेकडे पडणारे प्रगतीचे आणखी एक पाऊल समजले जात होते.परंतु नंतर हे चित्र पालटले, आशावादाची जागा निराशेने आणि हताशपणाने घेतली.
चित्रपट,नाटके,कादंबऱ्या,कला यांच्यातून हा निराशावाद प्रकट होऊ लागला.तंत्रज्ञानाचे चित्रण प्रगतीचे इंजिन असे होण्याऐवजी मानवाचे स्वातंत्र्य आणि त्याची परिस्थिती,परिसर नष्ट करून टाकणारी एक विध्वंसक शक्ती म्हणून होऊ लागले.
परिसरवाद्यांच्या दृष्टीने 'प्रगती' ही एक शिवीच होऊन बसली.
प्रगतीच्या सरळसोट मार्गाची अपरिहार्यता,जी उद्यमवास्तवाचा एक आधार स्तंभ होती,तिचे फार थोडे कैवारी,औद्योगिक युगाचा शेवट येऊन ठेपल्यावर,उरले.
आता जगभर असे मानले जाऊ लागले आहे,की आता प्रगती केवळ तंत्रज्ञान किवा ऐहिक जीवनमानाच्या स्तरानुसार गणली जाणार नाही;तर जो समाज नैतिक दृष्ट्या, सौंदर्याभिरुची दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या किंवा परिस्थिती दृष्ट्या जर खालावलेला असेल तर त्याला केव्हाही सुधारलेला म्हणता येणार नाही;मग तो कितीही श्रीमंत असो,किंवा आधुनिक बनलेला असो.प्रगतीच्या बाबतची कल्पना आता अधिक बहुव्याप्त झालेली आहे. समाज अनेक मार्गांनी बहुव्याप्त विकास करून घ्यायला समर्थ झालेला असला पाहिजे. गेल्या काही दशकांकडे पाहिल्यावर आपल्याला असे आढळून येईल की निसर्ग,उत्क्रांती व प्रगतीबाबतच्या कल्पनांचा आपल्याला पुनःविचार करणे भाग पडले.या कल्पना काळ,स्थळ,भौतिक वस्तु,कार्यकारणभाव याबाबतच्या गृहीतकांबर आधारलेल्या होत्या.तिसरी लाट ही पूर्वीची गृहीतके विरघळून टाकत आहे.दुसऱ्या लाटेने धारण केलेली बौद्धिक झळाळीच नाहीशी करून टाकत आहे.
भवितव्य काळाचे…
नव्याने उदय पावत असलेली प्रत्येक संस्कृती दैनंदिन जीवनात लोकांनी काळाची हाताळणी करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतेच,शिवाय काळाबद्दलच्या मानसिक नकाशातही बदल घडवून आणते.तिसरी लाट देखील असे कालनिर्देशक नकाशे पुनः एकवार नव्याने तयार करत आहे.दुसऱ्या लाटेच्या अगोदर काळाची कल्पना चक्राकार होती.नंतर,विशेषतः न्यूटन नंतरच्या काळात काळ एका सरळ रेषेत गती घेणारा ठरला. आणि जगाच्या सर्व भागात आणि सर्व काळात तो एकसारखाच असून त्याचा प्रत्येक तुकडा मागील पुढील भागासारखाच हुबेहूब असणार याची खात्री वाटत होती.
शतकबदलाच्या सुमाराला ऑइन्स्टाइन याने कालसापेक्षतेचा सिद्धान्त मांडला.
शिल्लक राहिलेला भाग १२.०४.२५ या लेखामध्ये…