वाई - महाबळेश्वर या घाटाच्या रस्त्यानं पावसाळ्याच्या सुरुवातीस जाऊ लागलं,की पहिल्यांदा पाचगणीचं दुरून दर्शन होतं.पाचगणी हे गाव सिल्व्हर ओक वृक्षांच्या राईत वसलं आहे.विरळ ढगांच्या पडद्याआड सिल्व्हर ओकची उंचच उंच झाडं दिसू लागतात. काळपट रंगाचे सरळसोट बुंधे,त्यांवर एकही फांदी नाही, आणि शेवटी हिरवं छत. वाऱ्यामुळं हिरव्या पानांच्या पाठी चांदीसारख्या चमकत असतात.
पाचगणीपासून नऊ - दहा किलोमीटर अंतरावर हिरव्यागार जंगलाला सुरुवात होते.ही जंगलं सदापर्णी वृक्षांची आहेत.
पिसा,अंजन,हिरडा व आवळा या झाडांच्या गर्दीत जांभळीची झाडं प्रामुख्यानं दिसतात. या वनक्षेत्रातच गुरेघर वन-संशोधन केंद्र आहे.हे गुरेघर म्हणजे प्राचीन काळातील 'गुरुगृह' ही सिद्धभूमी आहे.इथं मी पावसाळ्याच्या सुरुवातीला जाई.नंतरही पावसाळ्यात आठ-दहा दिवस जावं लागे.तिथं विविध भूखंडांत रोपं लावण्याचं काम चालू असताना त्यांचं निरीक्षण करता येई.रात्री माझा मुक्काम तिथल्या वनकुटीत असे.आजूबाजूला घनदाट जांभळीची झाडी. त्यांच्या सावलीत लाल कौलांची वनकुटी उभी आहे. समोर विटा-सिमेंटनं बांधलेलं एक गोल टेबल आहे.त्या टेबलासमोर वेताच्या खुर्चीवर बसून मी केलेल्या कामाचा आढावा घेई,तर कधी लागवडीविषयी वनकर्मचाऱ्यांना सूचना देई.इथं सकाळी उठून बसलो असता,पहिल्या पावसाचा मृदगंध आसमंतात दरवळलेला असे.वर,समोर झाडांची घनदाट हिरवी छतं दिसत.आभाळाचं दर्शन होत नसे.मध्येच छतावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळं हिरव्या पानांच्या कितीतरी छटा दिसत.पानांवरील पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत.छोट्या रंगीत पाखरांची चांदीच्या घंटीच्या आवाजाची किलबिल चाललेली असे.झाडावरचे जांभळांचे घोस पिकून काळेभोर दिसू लागत.पावशा पक्षी एकमेकांना साद घालताना दुरून ऐकू येई.
एकदा इथं बसलो असताना ओढ्याच्या दरडीतून निघालेली घोरपड जंगलाकडं सरसर निघालेली दिसली.मध्येच ती थांबे,मध्येच पुढचे दोन पाय उंच करून उभी राही.इकडंतिकडं पाही,पुन्हा सरसर चालू लागे.ती शांतपणे जमिनीवर पडून होती.काही तरी पाहात होती.काही तरी एकाग्रतेनं ऐकत होती.डोकं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हलवीत होती.
कोणाची तरी साद तिला ऐकू येत होती.कोणाची,हे तिलाच माहीत ! मध्येच ती आपलं डोकं उंच करी.नंतर पुन्हा खाली आणी.जवळच असलेल्या वारुळातील वाळवींना कल्पना नव्हती,की त्यांच्या हालचालींची चाहूल बाहेर कोणाला तरी ऐकू येतेय आणि काहींचा मृत्यू बाहेर वाट पाहतोय. घोरपडीच्या उघड्या कानांना पंख फुटलेल्या लक्षावधी वाळवींच्या पंखांची सळसळ बाहेर ऐकू येत होती. अनुभवानं व अंतर्ज्ञानानं तिला कळलं,की आता आपल्याला मेजवानी मिळणार !
आकाश एकाएकी ढगांनी काळवंडलं.पावसाचे काही थेंब झाडांच्या छतावर पडून त्याची साद जंगलभर पसरली.या आवाजाबरोबर पंख फुटलेली वाळवी वारुळातून एखाद्या फवाऱ्याप्रमाणं बाहेर पडू लागली. तशी घोरपड त्यांच्यावर तुटून पडली.परंतु त्यांतील कित्येक कीटक तिच्या तडाख्यातून सुटून,हवेत आपल्या नाजूक,नवीन फुटलेल्या पंखांनी आसमंतात उडू लागले. त्यांचं हे पहिलं आणि शेवटचं उड्डाण होतं.
झाडांच्या छतावरून त्यांना आकाशाचं दर्शन झालं,तसं त्या गिरक्या घेत धरतीकडं पुन्हा झेपावल्या.काहींचे पंख गळून गेले.त्या जमिनीवर काहीही इजा न होता आदळल्या.बाकीच्या सहज उडत खाली आल्या.चपळ हालचालीनं त्यांचेही पंख झडून गेले.जिकडं तिकडं त्यांच्या पंखांचा खच पसरला.त्या पंखांच्या ढिगाऱ्यात त्यांनी जुगण्यासाठी आसरा घेतला.एकटी घोरपडच तिथं मेजवानी करीत नव्हती.थोड्याच वेळात तिथं कोतवाल आले.सात बहिणींचे थवे किलकिलू लागले.आकाशातून आभोळ्या झाडांच्या छता-छतांतून सहज उतरल्या.पावशा व कोकीळ हजर झाले.हा सारा पक्षिगण त्या वाळवीवर तुटून पडला.निसर्गानं या असहाय वाळवींना कसलंही संरक्षणाचं कवच दिलं नाही.माद्या धडपडत मातीच्या आश्रयाला गेल्या.त्यांच्या मागोमाग नर गेले.जंगलातल्या वाटेनं मी हिंडू लागलो, की नेच्यांचे कोंब जमिनीतून बाहेर येताना दिसत.
आरारुटाची हिरवी पानं फुटू लागत.अशा पाउलवाटांवर रानकोंबड्या,चकोत्री,तित्तिर आणि लावे यांचे कळप चरताना दिसत.माझी चाहूल लागताच कारवीच्या झुडपांत दिसेनासे होत.एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून तित्तिर उच्च स्वरात ओरडून पावसाचं आगमन सुचवी.
महिनाभरानं मृद् गंधआणि पाखरांच्या गोड गाण्याच्या आठवणी घेऊन मी पुण्यात परत येई.
जुलै महिन्यात तिथं पुन्हा गेलो,की तिथं चांगलाच पाऊस झालेला असे.असा पाऊस पडू लागला,की मला वनकुटीत बसून राहणं शक्य होत नसे.अंगात रेनकोट व पायांत गमबूट चढवून मी जंगलाची वाट धरी.अशाच मुसळधार पावसात उंच डोंगरावर चालत जाई. पावसाच्या धारा पहिल्यांदा झाडांच्या छतावर पडत असतात.नंतर छतावरचं पाणी हळूहळू जमिनीवर पडत राहातं.
उघड्यावरचा मुसळधार पावसाचा मारा आपण सहन करू शकत नाही;परंतु या झोडपण्याचा वेग जंगलात कमी होतो.
उंचावर आल्यावर मी आजूबाजूचा निसर्ग पाहात राहायचो.
पावसानं सारी वनश्री सुस्नात झालेली असे. समोरचं सृष्टिसौंदर्य क्षणोक्षणी बदलायचं.या क्षणी दिसलेलं दृश्य पुढच्या क्षणी बदलायचं.कधी ढगाळ वातावरणानं तिथल्या हिरव्यागार जंगलावर झाकोळ पसरे.वाटे,प्रचंड शिळांचा एखादा समूह हलतोय.परंतु तो आभाळी वातावरणाचा दृश्य परिणाम असे.मध्येच वाऱ्या वादळाचा प्रचंड झोत येई.झाडांची छतं त्या वाऱ्यावर वेडीवाकडी डुलायची.स्फटिकाप्रमाणं दिसणाऱ्या,
वाहणाऱ्या निर्झर व जलप्रपात यांचा निनाद ऐकू यायचा.असं दिवसभर पावसात न्हाऊन निघाल्यावर सायंकाळी मी वनकुटीत परत येई आणि पेटलेल्या आगोटीच्या नारंगी प्रकाशात उबेला बसून राही.ओले कपडे बदलून अंगात पायजमा व अंगरखा घातल्यावर पावसाचं ओझं काढून टाकल्यासारखं वाटे.नंतर मग मधून एक-एक घोट चहाचा आस्वाद घेण्यात मोठा आनंद असे.
वनकुटीच्या खिडक्या-दरवाज्यांना बारीक छिद्रांची जाळी लावल्यामुळं मच्छर,कृमिकीटक अथवा साप-किरडूंना प्रवेश नसे.परंतु त्याच वेळी बाहेरचा काळाकुट्ट अंधार पाहता येई.त्या अंधारात पडत असलेल्या पावसाच्या सरींचा प्रकाश दिसे.
जवळच असलेल्या देवदार वृक्षांच्या राईतून वाऱ्याचा सूऽसूऽऽ आवाज येई.वाटे,मी समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या निवासस्थानात राहतोय.झाडाझाडांवर बसलेल्या असंख्य काजव्यांच्या प्रकाशामुळं त्या झाडांना अंधारातदेखील आकार येई.
बेडकांचा डराँव डराँव आवाज ऐकू येई.रात्रभर कौलांवर पाऊस वाजत असे.अहोरात्र अशा त-हेनं संततधार पडणाऱ्या पावसाला एक प्रकारचा नाद असतो.
जेवणानंतर अंगाभोवती ब्लॅकेट लपेटून मी पलंगावर टेकून पावसाचा तो नाद ऐकत खिडकीबाहेर पाहात असे.
शमादानीवरच्या दिव्याची वात कमी करी.यामुळं खोलीत उजळ अंधार,तर बाहेर दाट काळोख ! मधूनच ढगांचा गडगडाट आणि विजेचा कानठळ्या बसवणारा आवाज येई.त्या क्षणिक प्रकाशात सारं जंगल उजळून निघे.अशा आनंदघन समयाला दुःखाची किनार का असावी? मी ग्रेसची कविता मनातल्या मनात गुणगुणत झोपी जाण्याचा प्रयत्न करीत असे :
पाऊस कधींचा पडतो
झाडांची हलतीं पानें
हलकेंच जाग मज आली
दुःखाची मंद सुरानें
मध्यरात्रीनंतर शुक्ल पक्षातील चंद्राचा प्रकाश ढगांआडून पाझरत साऱ्या जंगलभर पसरे,तेव्हा ही वनसृष्टी मोठी गूढरम्य दिसे.अशा वेळी पावशे पक्षी एकमेकांना साद घालीत गात असत.मधूनच रातवा पक्ष्याचा आवाज येई. मध्येच वाद्याची तार छेडावी,तसा घुबडाचा घुत्कार ऐकू येई.पुन्हा विलक्षण शांतता !
अशाच एका रात्रीनंतर पाखरांच्या गोड किलबिलाटानं जाग आली.बाहेर उजाडलं होतं.आदल्या दिवशी खूप पाऊस पडला होता.वादळानं उन्मळून पडलेलं एक झाड ओढ्याच्या प्रवाहाबरोबर वाहात जाऊन अरुंद पात्रात आडवं अडकून बसलं होतं.पाऊस थांबल्यावर ओढ्याकाठानं भटकताना मोठा आनंद होतो.मी त्या झाडाच्या मध्यभागी खोडावर बसून आजूबाजूला,वर खाली पाहू लागलो.काठावर वाढलेले पाचू रंगाचे नेचे हवेत डुलत होते.पाण्याचे तुषार त्यांवर पडले,की ते हिरकणीसारखे चमकत.दगडा शिळांवर हिरवंगार शेवाळ धरलं होतं.दाढी वाढावी तसं वृक्षावृक्षांतून शेवाळ लोंबत होतं.विणीच्या ओढीनं मासे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं उड्या घेत जाताना त्यांच्या चांदीसारख्या पाठी चमकत होत्या.दगडाच्या आडोशानं बीळ करून राहात असलेले खेकडे तिरप्या चालीनं पाण्यातून इकडून तिकडं जाताना दिसत होते.या जंगलात आढळून येणारे खेकडे फार मोठ्या आकाराचे होते.एक खेकडी प्रवाहात आपली पिलं सोडताना दिसली.तिच्या पोटाखाली हजारावर ढेकणांच्या आकाराची छोटी छोटी पिलं असावीत.प्रवाहाच्या मध्यभागी येऊन ती हळूहळू त्यांना नितळ पाण्यात सोडीत होती.पिलं प्रवाहाबरोबर वाहत जाताना स्वच्छ व निर्मळ दिसत होती.त्यांना असं निराधार करून पाण्यात सोडून दिल्यावर ती कशी जगत असतील,काय खात असतील,कशी वाढत असतील, शत्रूपासून आपला बचाव कसा करून घेत असतील, याविषयी फारशी माहिती उपलब्ध असलेली माझ्या पाहण्यात नाही. यानंतर केवळ तीन महिन्यांत त्यांची वाढ पूर्ण झालेली मी पाहिलेली आहे.
जंगलातील बेडकांच्या विणीची तऱ्हा वेगळीच असते. अंडी घालण्याची वेळ जवळ येताच बेडकी नराला आपल्या पाठीवर घेते.दोघे मिळून ओढ्यावर ओणवलेल्या झाडाच्या फांदीवर जातात.उभयता आपल्या पायांनी पानं धरून गुंडाळतात.मादी त्यात अंडी घालते.त्यात नर बीज सोडतो.परिणामी,सुमारे शंभर एक अंड्यांतून अर्भकं निर्माण होतात.
प्रथमावस्थेत त्या पानांभोवती साबणाच्या फेसासारखं आवरण असतं.या फेसामुळंच पानांची टोकं एकत्र चिकटली जातात.मग ही बेडूक नर-मादी घरटं सोडून निघून जातात.अंडी विकसित झाल्यावर अर्भकं पानं फाडून खालच्या वाहत्या पाण्यात पडतात आणि प्रवाहाबरोबर वाहात जातात.
पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी,नागपूर
वन्य जीव जन्माला येताना क्वचितच दिसतात.कधी कधी ओढ्याकाठानं भटकत असताना त्यांच्या जन्माची रहस्यं अशी सहज दृष्टीला पडतात.इथं आभाळातून पडलेला एखाद-दुसरा थेंब विलीन होताना दिसे.वेली सर्पासारखे वेढे घेत वृक्षावर चढलेल्या होत्या.नुकत्याच दिसू लागलेल्या सूर्यप्रकाशात कोळ्याची जाळी चांदीच्या तारांसारखी चमकत होती ते विलक्षण दृश्य होतं !
श्रावण महिन्यात जिकडं-तिकडं हिरवंगार दिसे.पाऊस कमी झालेला.मधूनच पावसाच्या सरी येत.या दिवसांत अवर्णनीय सृष्टिसौंदर्याचं दर्शन होतं.जंगलातील झाडं वाढताना दिसतात.कधी तरी अनेक वर्षांपूर्वी बालकवी ठोमरे या जंगलात भटकताना त्यांना मराठी साहित्यात अजरामर झालेली 'फुलराणी' ही कविता स्फुरली :
हिरवे हिरवे गार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती...
या दिवसांत जंगलातील खडकाळ वाटांनी फिरण्यात मोठी मजा असते.जंगलं नेहमीच सुरक्षित नसतात. पावसाळ्यात जंगलातील भटकंती कधी कधी जीवघेणी असते.इतर क्षेत्रांपेक्षा जंगलं विजेला अधिक आकर्षित करतात.प्रचंड वेगानं वाहात असलेल्या प्रवाहात तुमचे पाय क्षणभरही तळाला लागत नाहीत.निसरड्या पात्रातून घसरलात,तर तुम्ही सरळ वाहात जाल ! विषारी फुरशी झाडांच्या छतावरून उड्या घेत असतात. आताही वाटेनं जाताना रस्त्यावरच पट्टेरी मण्यार वेटोळं घालून बसली होती.एखाद्या बचनागाच्या फुलासारखी सुंदर दिसत होती.अंदाजे तीन फुट लांबीची.
तिच्या अंगाभोवती गोलाकार काळे आणि पिवळे जर्द पट्टे होते. मण्यार सहसा दंश करीत नाही;परंतु चावली,तर या 'महासर्पा'च्या विषावर इलाज नाही.माझी चाहूल लागताच ती फुलवातीसारखं डोकं वर काढून झुडपाकडं सरपटत निघून गेली. पण म्हणून पावसाळ्यात जंगलात जाऊ नये,असं नव्हे. वर्षा ऋतूत जंगलाचं एक आगळंवेगळं सौंदर्य दिसतं जे एरवी कधी अनुभवता येत नाही.पायांची चेहऱ्याइतकीच काळची घेऊन जागृतपणे वनभ्रमण केलं,तर ते अत्यंत फलदायी ठरतं.संत कबीर यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे :
जिन जागा तिन मानिक पाया।
अशा वेळी त्याची आठवण होते आणि मन सुखावतं.