सदा मास्तर आल्यापासनं सोप्यातल्या माच्यावरच बसून हुतं.
आल्या आल्या वहिनीनं दिल्याला चहा घोटून कप तसाच हुंबऱ्यावर ठेवला.थोरला भाऊ रानातनं आला की,दोन सबुद बोलायचं आणि परत जायचं,या बेतानं सदा मास्तर आलं हुतं.दिवस मावळून आता बराच वकुत झाला.अंधार पडला तरी भाऊ अजून कसा आला नाय म्हणून मास्तरांच्या मनात सारखी कालवाकालव चाललेली.दारात तपकीर घाशीत बसलेल्या आईला इचारलं,"भाऊ अजून कसा काय आला नाय गं?"
"इल की येवढ्यात.आज वर बाद्यातल्या रानात नांगरी धरलीया.
एकादा कोपरा उरला आसल तर तेवढा उलटा करून येणार.
तेवढ्यासाठी पुण्यांदा औत एवढ्या लांब न्हायचं हुनार नाय."
"बरं आता तर दिसायचंपण बंद झालंया.अंधारात कसलं रान नांगरतुया?"
"म्या तर कवा नांगर धरली नाय,पर जातानाच सांगून गेल्याला.परत यायला वाडूळ हुनार म्हणून.तवर तू तरी कापडं बदल की.असा पोरगी बघायला आलेल्या नवऱ्यागत का नटून बसलायास?"
"भाऊ आला की गाठ घिऊन जाणार हाय मी परत. घरात सगुना एकटीच हाय."
"आणायचं हुतंस तिला बी.गेला असतास सकाळी उठून. इतक्या रातीला परत जाणं बरं दिसतं का?"
"त्येला काय हुतंय.गाडीला उजेड हाय की.म्या शाळेतनं थेट इकडंच आलुया.तिला आणि कुठं वाऱ्यात फिरवित बसू आजारी पडायला आणि विनाकारण दवाखान्याची भर करायला. "
"देवाऱ्यावर पुजून ठेव तिला.जरा म्हणून अंगाला पिळ पडायला नग.गंदपावडर लावून दिसभर घरात भावलीगत बसून काढलं की आजारी पडणारच की. जरा रानात आडवंतिडवं काम केलं,शाण थापलं, वैरणकाडी केली,धारा-पाणी केलं,तर खाल्ल्यालं अंगाला लागल आणि रोगराई बाजूला पण फिरकणार नाय."
"आज-कालच्या शिकलेल्या पोरी रानात काम करायला तयार हुतील का ? शाळेतल्या सगळ्या मास्तरांच्या बायका घरातच असत्यात.पोरांची उठाठेव करण्यातच त्येंचा दिवस जातुया."
"जेची बायकूपण नोकरी करती,ती घर सांभाळून नोकरी करीत पोरास्नी संभाळती.तिनं काय पोरास्नी वाऱ्यावर सोडल्यालं नाय."
"ज्येची-त्येची मर्जी.आता एखादीला नसल रानात जायाचं,तर तिला काय मारून टाकायची का?"
"तू बस बायकूच्या पदराला धरून.बाईला कुठला!" आईनं कोपरखळी हाणली.मायलेकाचं बोलणं चाललं हुतं तवर बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आला.
गोठ्यात बैलं बांधून वसंता सोप्यात आला.डोक्याला गुंडाळलेला टावेल सोडून तोंडावरचा घाम पुसला आणि झाडून खांद्यावर टाकीत कारभारणीला आवाज दिला, "जरा दिव्यातलं राकील आणि हाळद आन गं."
खाली बसत बसत सदाला विचारलं, "कवा आलास?"
"झालं की तासभर..."
"मग कापडं नाय बदललीस आजून."
"परत जायाच्या बेतानं आलुया.तुजी गाठ घ्यायची.दोन शब्द बोलून जावं म्हणून शाळेतनं तसाच आलुया."
सदा काही बोलणार तवर आई आत आली आणि विचारलं, "वसंता,आंगठ्याला काय करून घेतलंस रं?"
"काय नाय गं,जरा ढेकळात नख उचकाटलं.दिसभर त्यात माती घुसून ठसठसाय लागलंया.जरा राकीलनं पुसलं की हाळद बांधून टाकतू.हुईल चार दिसात बरं."
"त्यापरास दवाखान्यात जा.एखाद धनुर्वाताचे इंजिक्शन टुचून घे.परत सुजाय लागलं की बसशील पाय धरून..." आईनं पोटतिडकीनं सांगितलं तरीपण वसंतानं काय तिचं आईकलं नाय.
"शेतकरी माणसाला असं रोज रानात काय ना कायतरी लागतंया.कवा इळाखुरपं कापणार,कवा सड पायात घुसणार,
काटाकुटा टोचणार म्हणून काय रोज दवाखान्याची भर करायची का?" असं बोलत बोलत वसंतानं अंगठ्याला चिंधी गुंडाळली.
एखाद्या गरवार बाय गत सदा मास्तर मात्र चांगलाच अवघडलेला.एकदाचा मनातला विषय भावाच्या कानावर घालायचा आणि सटकायचं,एवढंच त्येच्या डोक्यात हुतं.
भावाला झालेल्या जखमेशी त्याला काय देणं-घेणं नव्हतं.
वसंत पंधरा-सोळा वर्षांचा असताना बाप वारला. त्यावेळेला सदा दहा-अकरा वर्षांचा हुता.वडलांच्या माघारी शेती करायला कोणतरी पायजे म्हणून वसंतानं शाळा सोडली.हातातली पुस्तकं टाकून कासरा घेतला. शेतं पिकली तर पोटपाणी चालणार.
दावणीला चार जनावरं हायती.त्यांची वैरणकाडी केली पायजे.बाप असताना त्यानं कवा आयला रानाचा बांध चढायला लावला नाय.मग बापाच्या माघारी आईला नीट सांभाळलं पायजे.आपली रानं आपुन पिकीवली तर बरं, नाय तर भावकी बांध इकडं-तिकडं दाबून कवा आर्धीनिम्मी रानं गडप करतील कळायचं नाय.धाकट्या सदाला शिकवून मोठा करू.नोकरीला लागला तर घराला हातभार हुईल या भाबड्या आशेवर वसंतानं सदाला शहरात शिकायला पाठवलं.लागल तेवढा पैसा दिला.नोकरीत कायम करायला रिन काढून पैसा भरला. आता सदा मास्तर झाला.त्याला सात-आठ वरसं झाली. नोकरीला लागल्यावर या-जायला फटफट घेतली. शहरातल्या पोरीसंगं परस्पर लगीन केलं आन् तिथंच संसार थाटला.जोडीदारांनी चारचाकी घेतली म्हणून आपुन बी चारचाकी घेतली.आता गाडीचं हाप्तं भरून झालं पर इतकी वर्षे भावानं काढलेल्या खर्चाला कवा हातभार लावला नाय.शेतात पिकणाऱ्या उसावर सगळं चैनीत चाललं असणार,या भ्रमात कवा विचारपूसपण केली नाय.
भाऊ शिकला.नोकरीला लागला.मोटारसायकल घेतली. चारचाकी घेतली.त्याची प्रगती हुतीया.भावकीत पैपावण्यात कौतुक हुतंया.या गोडगैरसमाजावर वसंत जगत हुता; पण झालं वेगळंच.सदानं थेट मुद्द्यालाच हात घातला.
"भाऊ,म्या शाळेजवळ जागा घिऊन घर बांधावं म्हणतुया.येण्या-जाण्याचा ताप वाचल म्हणून सगळ्या मास्तरांनी मिळून जागा घ्यायचं ठरीवलंय.सगळ्यांच्या संग घरपण हुईल.एकदा मागं पडलं तर पुन्हा हुयाचं नाय.भाडं भरण्यापरास सोताचं घर हुईल."
"एकदमच चांगलं हाय की.शाळंच्या शेजारी आसलं तर गाडीवरणं या-जायाचा घोर नाय.आमचा बी जीव निर्धास्त हुईल." वसंता समाधानानं म्हटला.
"पर जरा पैसं कमी पडत हुतं..." सदानं अडचण बोलून दावली.
"किती लागणार हायती?" आकडा हजारात आसल असं समजून वसंतानं विचारलं.
"म्या सोसायटीतनं दहा लाखाचं कर्ज घेतलंया.वरचं सात लाख लागणार हुतं." पानावर कात-सुपारी मागावी तसंच सदानं सात लाखांची मागणी केली.महिन्याच्या महिन्याला हजारात पगार घेणाऱ्या सदाला ते काय जास्त वाटत नव्हतं.पर दीड हजाराची खताची फरी आणायला दुधाच्या बिलाची वाट बघणारा वसंता चपापला.आकडा आयकून आईपण हुंबऱ्यातनं आत आली.
वसंतची मालकीण दारामागं उभा राहून हे सारं गप आयकत हुती.
"हे बघ सदा,इतकी मोठी रक्कम तर काय माझ्याजवळ नाय.
त्यापरास तुझ्याकडं जेवढं हायती तेवढ्यात बसंल तसं घर बांध.
सोन्याची सुरी मानंवर घिऊन चालणार नाय." वसंत बोलता बोलता मलुल झाला.
"पर तिथं सगळी घरं एकसारखीच हायती..."
"एवढी मोठी जुळना करायला मला जमल आसं काय वाटत नाय.उगाच तुला आशा लावून ठेवण्यात राम नाय बघ."
"औंदापण कारखान्याला गुदस्ताइतका ऊस गेलाय, त्याची बिलं आली आसतीलच की? आणि लाख रुपयांची बैलं घ्यायला पैसं हायती आन् घर घ्याला नायती,आसं कसं?" सदाचा सूर बदालला.
"हे बघ,उसाचं बिल आलं की पयलं सोसायटीला जातंया आन् बैलं नसली तर रानं पिकवायची कशी? तू फटफटी घेतलीस,चारचाकी घेतलीस तवा मी आडवा पडलो का तुझ्या? एक गाडी असताना दुसऱ्या गाडीची काय धार काढायची हुती का? म्या काय बैलावर बसून जत्रा फिरायला जात नाय.रानात बैलं हायती म्हणून चार दाणं पिकत्यात.
म्हणून पोटाला दोन घास मिळत्यात."
दोघांच्या बोलण्याचा रोख वादाकडं जाईल तसं घरातलं वातावरण तापलं .
"म्या मिळीवतोय,म्या गाड्या फिरीवतोय.तुझ्या ढुंगणाला चटकं बसायचं काम नाय.तुला जर जमणार नसल तर माझ्या वाटणीची रान सांग.मी ती इकून पैसं उभा करतू..." सदा एक घाव दोन तुकडं करण्याच्या बेतानंच आला हुता.
"रानं इकून कुणी घर बांधतंया का? गावाकडची शेतं इकून शहरात घर घ्यायला म्हातारपणी गावाकडं आल्यावर काय चिचुकं खाणार हाईस का?"
"माझ्या हिश्श्याचं रान इकून म्या चिचुकं खाईन नाय तर उपाशी मरीन,तुला काय करायचाय... आणि मला पेन्शन मिळतीया.
म्हातारपणात गावाकडं येऊन रान करणार कोण? सगळी रानं पिकवून तू आजपतूर चार पायली दाणं देतुस.त्यापलीकडं माझ्या हिश्श्याच्या रानात ऊस कवा पिकलाच नाय का? त्येचं बिल कुणी हाडप केलं? " सदा चौताळला.
"आरं, तुझ्या शाळंला आन् नोकरीला इतकं पैसं भरलं, ते काय झाडाला लागलं हुतं का? ऊस काय फटफटीवरनं फिरून पिकत नाय.त्येच्यासाठी गुडघाभर चिखलात राबाया लागतंया..."
"म्या काय चिखलात घुसणार नाय.मला तू माझ्या वाटणीवर कुठली रानं देणार ते सांग.माझं मी रान इकून घर बांधतो."
"रानं इकून घर बांधायचं माझ्या बुद्धीला काय पटत नाय;तरीबी तू आईकणार नसलास तर तुला जे पायजे ते ईकून टाक.उरल्याली रानं पिकवून आमी पोटाला चार घास खातो..." वसंता भावनेच्या भरात बोलून गेला.
"दारात गिऱ्हाईक आल्यावर आडवा पडू नगं म्हंजी झालं..." असं ठेक्यातच म्हणत सदा तडकाफडकी बाहेर पडला.
जाताना आईला येतोपण म्हणाला नाय.त्येच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत आईनं कपाळावर हात मारून घेतला.
आठवडाभरात गावातल्या दारूच्या दुकानदाराबरोबर नदीकाठच्या सगळ्या रानांचा व्यवहार ठरला. भावासाठी सगळी माळाकडची पडीक जमीन सोडली. देणार तर नदीकाठचा आख्खा तळ दे नाय तर नको म्हणून दुकानदारानं गळ घातली हुती.घर विकत घेऊन उरलेल्या पैशात बायकोला चार दागिनं करावं म्हणून सदानं परस्पर व्यवहार ठरविला.एका शब्दानं आईला नायतर भावाला बोलला नाय.वसंतनं गावातल्या शहाण्या माणसाकडनं सांगावा धाडून सदाची समजूत काढायचा प्रयत्न केला;पण घराचं डोहाळं लागलेल्या सदानं कुणाचं काय आईकलं नाय.त्याची बायकोपण घरासाठी तगादा लावून हती.गावाकडची जमीन इकली तर म्हातारपणी गावाकडं जाऊन रान करावंच लागणार नाय.शहरात मस्त आरामात राहू.पेन्शन हाय.पोरं नोकरी करतील.आपण मजा करू.काटी टेकायच्या वयात नांगर धरायला झेपणार नाय.हे सदाच्या मनावर त्येच्या बायकोनं चांगलंच ठशीवलं हुतं.व्यवहारात आडकाठी नको म्हणून वसंत आणि आईनं गपगुमान कागदावर सही केली.
बघता बघता सदाचा बंगला बांधून झाला.वास्तुशांतीला फकस्त आईलाच घेऊन गेला.गावातलं मैतर,जमीन विकत घेणारा दुकानदार,सासुरवाडीचं पैपावणं,सगळ्या मंडळीस्नी आवातनं दिलं;पर पैसं न देणाऱ्या थोरल्या भावाला काय बोलीवलं नाय.मोती पिकणारी नदीकाठाची जमीन गेली.ती डोळ्याम्होरनं जात नव्हती, तवा वसंताला परगावात बांधलेल्या बंगल्याचं काय कौतुक ? माळाकडची रानं पिकीवताना वसंत झिटाललेला.
दुधाच्या पैशावर घर चालवून आईला औषध-पाणी करायचा.जी जमीन वाचवण्यासाठी आर्ध्यावर शाळा सोडून भावाला शिकीवलं त्यो भाऊ मास्तर झाल्यावर गाव सोडून जमीन इकून गेला.आपण पुढं शिकून नोकरी कराय पाहिजे हुती,आसं कवा कवा वसंताला वाटायचं.नोकरीच्या नादात गावाकडची सोन्यासारखी रानं इकायची की पिकल ते खाऊन आई-बापाला सांभाळाणं,यात पुण्याई मानायची? याचं कोडं वसंताला काय केल्या सुटत नव्हतं.
एक दिवस दुपारच्या पारी पोलीसपाटील वसंतच्या घराकडं आलं आणि म्हणालं,"तुझ्या सदा मास्तरच्या गाडीला ट्रकनं ठोकलंय.नवरा-बायको आणि पोरगा सगळी दवाखान्यात हायती.तुला पोलिसांनी बोलिवलया..." हे आयकून वसंतच्या पायाखालची जमीनच सराकली.आईनं तर बडवूनच घ्यायला सुरुवात केली.वसंतच्या घरातला कालवा ऐकून शेजारपाजारी गोळा झालं.जास्त लागल्यालं नाय.खरं तर औषधपाण्याचा खर्च करायला घरचं कोणीतरी पायजे म्हणून सांगितल्यावर हुंदका आवरला.
"हितं तर दातावर मारायला बंदा रुपया नाय. दवाखान्याचा खर्च कोण करणार?" अशा चिंतेत असलेल्या वसंताच्या हातावर आईनं गळ्यातली माळ काढून ठेवली.बायकोनं कानातली फुलं काढून दिली. शेजारच्या दोघा-तिघांनी कोणी शंभर,कोणी पाचशे रुपये वसंतच्या हातात ठेवलं.पलीकडच्या गल्लीतला गण्या सदाचा वर्गमित्र.त्यो मोटारसायकल घिऊन आला. लगबगीनं वसंताला घिऊन दोघं दवाखान्यात आली. आल्याबरोबर नर्सनं औषधाची लांबलचक चिठ्ठी वसंताच्या हातावर ठेवली.उलट दिशेनं येणाऱ्या मोटारसायकलला वाचवण्याच्या नादात सदाची गाडी ट्रकला धडकली हुती.बायकोला आन् सदाला जबर मार लागला हुता.
पोरगं मागच्या सीटवर हुतं,त्यामुळं त्येला जरा कमी जखम झाली हुती.धोका नव्हता,पण सदा आजून भानावर आला नव्हता.डोळं उघडत नाय तवर डेंजर हाय असं नर्स सांगत हुती.
चार दिसांनी सदा शुद्धीवर आला.त्याचं दोन्ही पाय मोडलं हुतं.
डोक्याला मोठा मार लागला हुता. बायकोचापण पाय मोडला हुता.तिची आई तिच्या सेवेला आली हुती.सदाच्या शाळेतलं सगळं मास्तर, गावातली मंडळी,पैपावणं,जे जे वास्तुशांतीला आलं हुतं ती समदी मंडळी सदाला भेटायला येऊन हातावर बिस्किटाचा पुडा ठेवून गेली.आता उरला त्यो फकस्त भाऊच.सदाला जनरल वॉर्डात नेल्यावर हालचाल वाढली.पर संडास धुण्यापासून खायला घालण्यापर्यंत समदं काम वसंताला करावं लागत हुतं.सदाच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता.आपल्या हिश्श्याची गावाकडची जमीन तर इकली हुती; पण आपली नाती कुणाला इकवणार..?"