संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या. इस्रायलमधला एक भटका तरुण साहसाच्या ओढीने अॅमेझॉनच्या जंगलात जाऊन पोहोचतो;पण हे साहस त्याच्या जिवावर उठतं.एका अपघातामुळे सोबत्यांपासून फारकत होऊन तो एकटाच जंगलात भरटकतो.एक-दोन नव्हे, तर तब्बल २१दिवस.काय घडतं त्या २१ दिवसांत ?
साल १९८१ इस्रायलच्या नौदलात तीन वर्षांची सेवा बजावून बाहेर पडलेला २१ वर्षांचा योसी घिन्सबर्ग दक्षिण अमेरिकेत फिरतोय.
सध्या मुक्काम बोलिव्हिया. योसी बॅकपॅकर आहे.पाठीवर एका पोतडीत मावेल एवढंच सामान घेऊन आव्हानांना सामोरं जात फिरणारा भटक्या.काही काळ आफ्रिकेत घालवून तो आता दक्षिण अमेरिकेत येऊन ठेपलाय.दक्षिण अमेरिकी देशांत अशा बॅकपॅकर्स मंडळींचा बराच राबता आहे.या देशांमधल्या प्राचीन संस्कृती
बरोबरच आकर्षण आहे ते अॅमेझॉनच्या जंगलाचं.अॅमेझॉन हे जगातलं सर्वांत मोठं पर्जन्यवन. नऊ देशांना व्यापून असलेलं.
अफाट विस्तार आणि मैलोन्मैल माणसांचा मागमूसही नसलेलं हे जंगल किती तरी भयानक प्राणी-कीटकांचं अन् विषारी वेली-वनस्पतींचं वसतिस्थान आहे.जवळपास वर्षभर कोसळणाऱ्या पावसामुळे जमिनीवर साचलेला पालापाचोळ्याचा थर,पुरामुळे अर्धीअधिक पाण्यात गेलेली अति उंच झाडं आणि वरून जमीन आहे असं भासवत आत खेचणाऱ्या दलदली.
जगण्यासाठी पूर्ण प्रतिकूल असल्यामुळेच की काय,हे जंगल माणसांना स्वतःकडे ओढून घेत असतं.
योसीच्या मनातही हे जंगल बघावं अशी सुप्त इच्छा आहेच.तशी इच्छा असणारे आणखी दोन फिरस्ते त्याला बोलिव्हियाच्या ला पाझ शहरात भेटतात.त्यातला एक अमेरिकेचा केव्हिन आणि दुसरा स्वित्झर्लंडचा मार्कस.दोघंही आपापल्या वाटेने फिरणारे.
या तिघांच्या मनातल्या साहसाच्या इच्छेला धुमारे फुटतात ते कार्ल नावाच्या ऑस्ट्रियन अवलियाच्या भेटीने.आपण अनेक वर्ष अॅमेझॉनच्या जंगलात संशोधन करण्यात घालवली असून आताही एका मोहिमेवर जंगलात चाललो असल्याचं कार्ल त्यांना सांगतो.
अॅमेझॉनमध्ये आजवर प्रकाशझोतात न आलेल्या काही आदिम जमातींची वस्ती आहे,तसंच जंगलांत काही ठिकाणी सोनंही सापडतं,असं त्याचं म्हणणं असतं.तो या तिघांना आपल्यासोबत मोहिमेवर येण्याचा आग्रह करतो.कार्ल म्हणतोय ते खरं असेल का,अशी शंका वाटत असूनही या तिघांच्या मनातली साहसाची ओढ त्यांना कार्लसोबत जंगलात जाण्यास प्रवृत्त करते.जंगलात फिरण्यासाठी अत्यावश्यक अशा किमान गरजेच्या वस्तूंची खरेदी करून ही चौकडी जंगलात जायला सिद्ध होते. महिनाभर जंगलात भटकून,अनुभव गाठीला जोडून आपण आपापल्या घरी जायचं असं ठरलेलं असतं.
( योसी घिन्सबर्ग अॅमेझॉनच्या जंगलात २१ दिवस,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन पुणे )
पण प्रत्यक्षात घडतं ते वेगळंच.अशा काही घटना घडत जातात की चौघांनाही अचानक एकामागून एक संकटांशी सामना करावा लागतो.योसी अक्षरशः मरणाच्या दारातून परत येतो.त्या भयकर अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्यानंतर योसी हे अनुभव पुस्तकात नोंदवतो. हे पुस्तक आपल्याला पूर्ण उलटंपालट करतं.आपली सहनशक्ती जिथे संपते असं आपल्याला वाटतं तिथून पुढे योसीचा प्रवास सुरू होतो.
तो १९८१च्या नोव्हेंबर महिन्यातला पहिला आठवडा असतो.
रुरेनबाक नावाच्या एका छोट्या गावापासून मजल-दरमजल करत हे चौघं जंगलात प्रवेश करतात आणि सुरू होतो एक गूढ प्रवास
त्या भागातील जंगलाच्या कामचलाऊ नकाशावरून कार्ल त्यांच्या मोहिमेचा मार्ग नक्की करतो.घनदाट जंगलातून तंगडतोड सुरू झाल्यानंतर या तिघांच्या लक्षात येतं,की अॅमेझॉनच्या या अजस्र रूपाची आपण बाहेर बसून कल्पनाच करू शकलो नसतो.सलग चार पावलं टाकायला आणि सूर्यप्रकाश शिरायलाही जागा नसलेल्या या किर्र झाडीतून आपला मार्ग शोधणं त्यांना अशक्य वाटू लागतं.त्या अफाट पसरलेल्या जंगलातला कोपरान् कोपरा कुणालाच माहिती असणं शक्य नाही याचीही जाणीव होते आणि आपल्या कल्पनेतल्या साहसापेक्षा अॅमेझॉन हे काहीच्या काही पलीकडचं प्रकरण आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागतं.
पण आता माघार घेणं तिघांच्याही मानी मनाला झेपणारं नसतं.शिवाय पुढे काय याची उत्सुकताही असतेच. दिवसभर चालायचं आणि रात्री थोडी मोकळी जागा बघून तंबू ठोकायचे,
सोबत आणलेला शिधा शिजवायचा आणि झोपी जायचं.काहीसा थरार आणि काहीशी धाकधूक अनुभवत त्यांचा प्रवास सुरू राहतो.या प्रवासात कधी कधी आदिवासींच्या छोट्या वस्त्याही लागतात.त्यातल्या गावकऱ्यांना कार्ल ओळखत असतो. अशा वस्त्यांवर विश्रांती घ्यायची,नीट खाऊन-पिऊन घ्यायचं,पुढच्या प्रवासासाठी शिधा घेऊन पुढे चालू लागायचं,असं सुरू असतं.
काही वस्त्यांजवळ कार्ल आणि योसी सोन्याची शोधाशोधही करतात.बरंच खाणकाम केल्यावर योसीला सोन्याचा एक छोटा कण काय तो मिळतो,पण आदिम जमातीच्या वस्तीचा मात्र मागमूसही नसतो.आता मोहिमेला सुरुवात होऊन दहा-पंधरा दिवस होऊन गेलेले असतात.
अपुरं खाणं,दिवसभराची तंगडतोड,रात्री किडे डास आणि प्राण्यांच्या भीतीमुळे होणारी अर्धवट झोप यामुळे चौघांच्याही शरीरावर परिणाम दिसू लागलेला असतो.शिधा संपत चालल्यामुळे अनेकदा त्यांच्यावर प्राणी मारून खाण्याची वेळ येते.एकदा कार्ल एक माकड मारतो आणि रात्री तंबूसमोरच्या आगीवर भाजून खातो. केव्हिन आणि योसी मनाविरुद्ध का होईना,त्याचं मांस खातात,पण मार्कस ते खाऊ शकत नाही.
एकुणातच हे रौद्र जंगल त्याला सोसवत नाही.तो हळवा होतो.प्राणी मारायला तो विरोध करत राहतो.त्यातच त्याच्या पायावर मोठाले फोड उठतात आणि वेदनांनी त्याला चालणं अशक्य होत जातं.जंगलातल्या त्या प्रचंड थकवणाऱ्या आणि भीतिदायक प्रवासाला प्रत्येकाचा प्रतिसाद वेगळा असतो.तो समजून घेऊन एकत्र राहण्याएवढी ना सर्वांची ओळख असते ना तेवढी पक्वता.केव्हिन आणि मार्कस २९ वर्षांचे असतात,तर योसी अवघा २१ वर्षांचा.संकटं समोर येतात तेव्हा माणसांचे स्वभाव कसे बदलून जातात ते लक्षात येतं.एकमेकांसोबत सतत मतभेद सुरू होतात.केव्हिन आणि योसी भेदरलेल्या मार्कसला टाळू लागतात,कार्लवर शंका घेऊ लागतात,तर मार्कसच्या मनात मोहीम पुढे सुरू ठेवावी की नाही याबाबत गंभीर प्रश्न तयार होतात.चौघं एकत्र चालत असतात खरे,पण तो प्रवास आता एकजिनसी उरलेला नसतो.
या भटकंतीमध्ये पुढचा प्रवास अॅमेझॉनची उपनदी असणाऱ्या तुईची या नदीकाठून होणार असतो.नदीच्या किनाऱ्यावरचे पुढचे मुख्य टप्पे कार्लला माहिती असतात.नदीकाठाने किंवा नदीतून खाली उतरत गेलं की आधी क्युरिप्लाया या आदिवासींच्या हंगामी गावात आणि नंतर सॅन जोसे नावाच्या एका गावात आपण पोहोचू आणि तिथे आपल्याला मोहीम संपवता येईल, असं कार्ल म्हणतो.योसी आणि केव्हिनचं म्हणणं पडतं की नदीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा.खरं तर तुईची ही अॅमेझॉन जंगलातली मोठी आणि सर्वांत धोकादायक नदी.कुठे ती तळ्यासारखी शांत असते,तर कुठे प्रचंड वेगाने खळाळत डोंगरकड्यावरून खाली कोसळते.कुठे तिच्या काठी थोडी मोकळी जागा आणि किनारा असतो,तर कुठे निव्वळ डोंगरकडे आणि त्यावर पसरलेलं घनदाट जंगल.पण या बिचाऱ्या साहसवीरांना त्यातल्या धोक्याची कल्पनाही नसते.एका वस्तीतल्या लोकांच्या मदतीने ते लाकडाचा तराफा तयार करतात आणि नदीत उतरतात.
हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही हे त्यांना लवकरच कळून चुकतं.थोड्या अंतरावरच नदीच्या प्रवाहाला प्रचंड वेग असतो तिथे त्यांचा तराफा जवळपास उलटा होतो.नशिबाने चौघंही वाचतात आणि एका किनाऱ्याला लागतात.या अनुभवामुळे पुन्हा एकदा चौघांमध्ये पुढे काय करायचं याबाबत मतभेद सुरू होतात.कार्लचं म्हणणं असतं,परत फिरावं किंवा पायी प्रवास सुरू ठेवावा,तर योसी-केव्हिनला नदीतून पुढे जाण्याची ओढ असते.जखमी पायांमुळे मार्कस कार्लबरोबर परत फिरण्याचा निर्णय घेतो.
ख्रिसमसच्या आधी ला पाझमध्ये भेटायचं असं ठरवून योसी-केव्हिन दुसऱ्या जोडीचा निरोप घेतात.
जंगलाबद्दल ओ की ठो माहिती नसणारे योसी-केव्हिन जगातल्या सगळ्यात मोठ्या जंगलात आता एकटेच शिरलेले असतात.
तुईची नदीच्या प्रचंड पात्रातून तराफा वल्हवणं सोपं नसतं.
सुरुवातीला एक-दोन अवघड वळणं पार करत योसी केव्हिनचा तराफा शांतपणे प्रवास करत असतो. तेवढ्यात तुईची पुन्हा एकदा प्रचंड वेग घेत असलेली समोर दिसते.योसी-केव्हिन त्यातून तराफा वल्हवण्याचा प्रयत्न करतात;पण तराफा एका मोठ्या खडकाला थडकतो आणि दोघंही त्या वेगवान प्रवाहात फेकले जातात.
केव्हिन कसाबसा किनाऱ्यापर्यंत पोहोचतो,पण योसी मात्र त्या अथांग प्रवाहात एखाद्या लाकडी ओंडक्यासारखा वाहत जातो.
नदीच्या पूर्ण तळापर्यंत जाऊन तो पुन्हा वर येतो.हाच तो आपल्या मृत्यूचा क्षण असं वाटत असतानाच त्याच्या हाताला दगड लागतात.बघतो,तर तो नदीच्या काठाला लागलेला असतो.तिथे किनारा असा नसतोच.दोन्ही बाजूंनी पंधरा-वीस फूट उंच गेलेले कडे आणि त्यावर घनदाट जंगल.त्यातून एखाद्या कॅनॉलमधून वाहिल्यासारखी तुईची वाहत असते.झाडांचा आणि दगडांचा आधार घेत योसी वर चढतो.किमान वाचलो तरी.आता थोड्याच वेळात केव्हिनही आपल्यापर्यंत पोहोचेल,असा विचार करत तो पडून राहतो.आता पहिली गरज असते ती तराफ्यावर बांधलेली सामानाची बॅकपॅक शोधण्याची.त्या बॅगखेरीज आपण जंगलात जिवंत असूनही मेल्यासारखे आहोत हे योसीला माहिती असतं. नशिबाने संध्याकाळ होण्यापूर्वी त्याला बॅग सापडते.
बराच वेळ होऊनही केव्हिनचा पत्ता नाही म्हटल्यावर योसी त्याला शोधत उलट्या दिशेने चालायला सुरुवात करतो;पण केव्हिनचा काहीच मागमूस नसतो.आपली ताटातूट नक्की कुठे झाली हेही योसीला कळू शकत नाही.हळूहळू अंधार व्हायला लागतो आणि योसीला जाणीव होते,की आजची रात्र आपल्याला एकट्यानेच काढावी लागणार आहे.सोबत लायटर असल्यामुळे योसीला आग पेटवता येते.बॅगेतल्या शिध्यातला थोडा तांदूळ आणि घेवडे शिजवून ते खाल्ल्यावर योसी अंगावर मच्छरदाणी आणि रेनकोट पांघरून तिथेच लवंडतो.आजूबाजूला नाना प्रकारच्या किड्यांचा वावर सुरू झालेला असतो.जंगलातल्या प्राणी-पक्ष्यांचे आवाज टिपेला पोहोचलेले असतात.एवढी भीती,एवढं एकटेपण आजवर योसीने कधीच अनुभवलेलं नसतं;
पण तरीही तो स्वतःला समजावत राहतो,'उद्या आपल्याला केव्हिन भेटेल.तो भेटला की दोघं जंगलातून पुढे चालत जाऊ. मग सगळं ठीक होईल. फक्त आजचीच रात्र...'
पण तसं घडणार नसतं.
सकाळी उठून पुन्हा केव्हिनचा शोध घेणं सुरू होतं.ज्या अर्थी केव्हिन अजूनही आपल्यापर्यंत पोहोचला नाही त्या अर्थी त्याचं बरं-वाईट झालं नाही ना,या विचाराने योसी पछाडला जातो.त्यातच त्याच्या लक्षात येतं,की जंगलात आवश्यक असणारं सगळं सामान आपल्याच बॅगमध्ये आहे... लाकडं तोडण्यासाठीचा कोयता, लायटर,शिधा,मच्छरदाणी.या सगळ्याशिवाय केव्हिन कसा जगणार? केव्हिनचा शोध घेण्याची तातडी आणखी तीव्र होते.स्वतःच्या भीतीवर मात करण्यासाठी त्याला केव्हिनची सोबत हवी असतेच,आता केव्हिनच्या काळजीचीही जोड मिळते.दुसऱ्या दिवशीही केव्हिनचा पत्ता लागत नाही.त्यातच पावसाला सुरुवात होते. 'अॅमेझॉनमध्ये डिसेंबरात पूर येतात,'योसीला कार्लने दिलेल्या माहितीची आठवण येते.रेनकोट घालून तो दिवसभर चालत राहतो.पण रात्री?दलदल आणि पानांच्या ओल्या थरांनी व्यापलेल्या या जंगलात रात्री झोपणार कसं? रात्र पडली तरी पाऊस थांबत नाही. त्यातल्या त्यात बरी जागा बघून योसी पथारी पसरतो. झोप लागणं शक्य नसतं.अफाट पसरलेल्या त्या जंगलात योसी कुठेतरी एकटाच हरवून गेलेला असतो.
अॅमेझॉनमध्ये एकटं पडल्याला पाच दिवस होऊन गेलेले असतात.या पाच दिवसांत योसीने फारसं काही खाल्लेलं नसतं.जंगलात चालून कपडे फाटू लागलेले असतात.अंगभर ओरखडे आणि जखमा झालेल्या असतात.कपाळावर एक मोठा फोड वाढत चाललेला आणि त्या फोडाखाली कसली तरी हालचाल होत असलेली जाणवू लागलेली असते.पाय आगीतून चालल्यासारखे जळत असतात.बूट काढून पायाला नेमकं काय झालंय ते पाहण्याचीही शक्ती योसीकडे नसते.एके रात्री पाऊस थोडा थंडावल्यावर योसी बूट काढतो.सॉक्स काढू लागतो,तर त्याबरोबर पायाची त्वचाही निघून येऊ लागते.त्याच्या पायालाही मार्कससारखेच प्रचंड फोड येऊन जखमा झालेल्या असतात.बोटं एकमेकांना चिकटून त्यांच्यामध्ये मांस, रक्त आणि पू यांचा लगदा तयार झालेला असतो.त्या वेदना सहन करताना त्याच्या लक्षात येतं,की आपण मार्कसच्या त्रासाकडे किती अलिप्तपणे पाहत होतो ! पाय कोरडे व्हावेत यासाठी योसी आग पेटवून त्यावर ते शेकण्याचा प्रयत्न करतो.पण सकाळी उठल्यावर पुन्हा सॉक्स आणि बूट घालण्याशिवाय पर्याय नसतो.
पुस्तकातलं हे वर्णन वाचताना आपणही योसीसोबत चालत राहतो आणि त्याच्या पायांच्या वेदना आपल्या पायांवर अनुभवतो.आता उद्याच्या सकाळी तरी त्याचा हा त्रास संपू दे,अशी मनोमन प्रार्थना करत राहतो.आता याहून आणखी वाईट काय होऊ शकतं,असं मनात येत असतानाच योसी शांतपणे आपल्याला पुढच्या अग्निपरीक्षेत घेऊन जातो.
पाऊस हा जंगलातला एकमेव धोका नसतो.ज्या जंगलाचं आजवर योसीला आकर्षण वाटत आलेलं असतं ते आता त्याच्यावर चाल करून यायला लागतं. एका संध्याकाळी एका झाडावरची फळं काढत असताना लक्षात येतं की हाताच्या अंतरावर एक विषारी साप आहे.तो ओळखू येण्याचं कारण कार्लने सांगितलेलं असतं : हा साप लांबूनही माणसाच्या डोळ्यांत विष टाकून त्याला आंधळं करतो.एक क्षण भीतीने योसी थिजतो,पण दुसऱ्या क्षणी भीतीचं रूपांतर रागात होतं.एक भला मोठा दगड घेऊन तो त्या सापाचं डोकं ठेचून काढतो.जणू तो फक्त सापावरच नव्हे,तर स्वतःच्या हतबलतेवर राग काढतोय.रोज रात्री प्राण्यांचे आवाज त्याला घाबरवून टाकतात.मनात भीती घर करून बसलेली असल्यामुळे अनेकदा पालापाचोळ्यातून साप येत असल्याचा भास होतो,तर कधी प्राण्यांच्या दबक्या हालचाली ऐकू येतात.
हे आपल्याच मनाचे खेळ आहेत की खरोखरच आपल्या आसपास प्राणी फिरताहेत हेही त्याला अनेकदा कळेनासं होतं.कोणी प्राणी आलाच तर काय करायचं याचेही अनेक प्लॅन्स योसी आखतो.
लायटर पेटवून त्यावर जवळचा मॉस्किटो रिपेलंट स्प्रे मारला की आगीचा एक लोट तयार होईल आणि प्राणी त्याला घाबरून पळून जाईल,असा त्याचा अंदाज असतो.
एके रात्री त्याला अशीच खसफस ऐकू येते.हा भास आहे की नाही याचा विचार करत योसी डोळे न उघडता बसून राहतो;पण नंतर त्याला जाणवतं की खरोखरच आपल्या जवळ कुठला तरी प्राणी आलेला आहे.डोळे उघडून पाहतो तो त्याच्यापासून दहा-बारा फुटांवर अॅमेझॉनमधला खूँखार पँथर जॅग्वार उभा असतो.आधी योसी त्याच्या अंगावर फ्लॅशलाइट टाकून पाहतो.पण त्याला ना तिथून जाण्याची घाई असते ना योसीजवळ येण्याची.तो शांतपणे योसीकडे पाहत राहतो.आधीच भीतीने गोठलेल्या योसीला जणू त्या अजस प्राण्याची भुरळ पडते.तो किती तरी वेळ जॅग्वारकडे नुसताच बघतच राहतो.भानावर आल्यावर त्याला लायटर आणि स्प्रेचं शस्त्र आठवतं.पण मनात विचारांचा कल्लोळ माजलेला. 'काय करावं? त्या आगीमुळे हे शांत जनावर चिडलं तर? कदाचित काही न करता हा जॅग्वार इथून जाईलही.' पण दुसरं मन म्हणतं,'तसं न होता तो पुढे माझ्याच दिशेने चालून आला तर काय करायचं?'अखेर न राहवून योसी लायटर काढून त्यावर स्प्रे मारतो. जॅग्वारच्या दिशेने आगीचा एक लोट जातो.लायटर बंद होतो तेव्हा जॅग्वार गेलेला असतो.त्याचा निर्णय योग्य ठरलेला असतो.
जंगलामध्ये योसीला सर्वाधिक त्रास होतो तो या द्विधा मनःस्थितीचा.काय करावं आणि काय करू नये याचे निर्णय घेणं सर्वाधिक अवघड ठरतं.आपण पुढे चालत राहिलो आणि आपली सुटका करण्यासाठी येणारी माणसं त्याच्या विरुद्ध दिशेला शोधत असली तर? आपण इथेच थांबलो आणि केव्हिन आपली पुढे वाट पाहत असेल तर?आपण नदीच्या काठाने चालत राहिलो आणि जंगलात आतल्या दिशेला एखादं गाव असेल तर? डोकं ताळ्यावर ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं अशक्य होऊन बसतं.काय योग्य,काय अयोग्य याचे निकषच इथे बदललेले दिसतात.
जंगलातलं भरकटणं सुरू असताना योसीच्या मनात सतत आठवणी दाटून येत राहतात.आपण कार्लचं का ऐकलं नाही,
आपण मार्कसची थट्टा का केली,नसतं धाडस करत बसण्यापेक्षा आपण जंगलातल्या एखाद्या वस्तीतच का राहिलो नाही,असे नाना प्रश्न त्याच्या मनात सतत गर्दी करतात.रात्री झोप लागू लागली की मार्कस त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.जणू योसी त्याला सोडून का गेला,
असा जाबच तो विचारत असतो. कोणतंच सामान नसताना केव्हिन जंगलात भटकतो आहे नि आपण त्याचा शोध न घेता स्वार्थीपणे पुढे पुढे चाललोय असं त्याला वाटतं आहे,असे विचार योसीच्या मनात येऊ लागतात.त्याला स्वप्न पडतं,की तो झोपेत असताना केव्हिन एक मोठा कोयता घेऊन त्याच्या कवटीचे दोन तुकडे करतोय.झोपेत,दिवसा चालता चालता तो केव्हिनशी बोलत राहतो,'मी तुला सोडून गेलेलो नाही,
प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.'
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…