विनाकारण होणारा त्रास टाळा,त्यासाठी हे करा.
इ.स. १८९८ मध्ये न्यू यॉर्कमधील रॉकलँड शहरात एक दुर्घटना घडली.एका लहान मुलाच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी त्याचे शेजारी तयारी करत होते.त्याचवेळी जिम फेअरले त्याच्या घोड्यावरून धान्याच्या कोठाराकडे जात होता.हवा प्रचंड थंड आणि जमिनीवर सर्वत्र बर्फ पसरले होते.घोडाही बरेच दिवसांत फिरला नव्हता आणि जेव्हा त्याला पाणी प्यायला नेले तेव्हा अचानक त्याच्या जणू अंगात आले,तो उधळला आणि जिम फेअरले खाली पडून त्याचे प्राण गेले.अशा त-हेने स्टोनी पॉइंट खेड्यात त्या आठवड्यात दोन मृत्यू घडले.जिम फेअरलेच्या मागे त्याची पत्नी,तीन मुले आणि इन्शुरन्सचे काही पैसे उरले.
त्याचा मोठा मुलगा,दहा वर्षांचा जिम वीटभट्टीमध्ये कामाला जात असे.माती मळून ती विटांच्या साच्यात घालायची आणि विटा भाजायच्या अशी कामे तो करीत असे.जिमला लहानपणी शाळेत जास्त शिकता आले नाही,पण त्याच्यात नैसर्गिकरीत्या अगर दैवी देणगीदाखल म्हणा असा एक गुण होता की,
लोक त्याच्यावर प्रेम करायचे.कालांतराने तो राजकारणात शिरला आणि हळूहळू त्याने तिथे आपला जम बसवला. इतरांमध्ये फारशी नसलेली एक विलक्षण क्षमता त्याच्या अंगी होती व ती म्हणजे तो लोकांना नावानिशी लक्षात ठेवायचा.
तो कधीच उच्च माध्यमिक शाळेत जाऊ शकला नव्हता, पण वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षापूर्वीच त्याला चार कॉलेजेसनी डिग्री प्रदान केली होती आणि तो डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचा अध्यक्ष आणि युनायटेड स्टेट्सचा पोस्टमास्तर जनरल झाला होता.
एकदा जिम फेअरलेची मुलाखत घेत असताना मी त्याला त्याच्या यशाबद्दल प्रश्न विचारले.तेव्हा तो म्हणाला,काबाडकष्ट! त्यावर मी म्हणालो,माझी चेष्टा करतोस का?त्यावर त्याने मला विचारले की,मग तू सांग,माझ्या यशाच्या मागचं कारण ! मी म्हणालो,
तुम्हाला दहा हजार लोकांची पहिली नावे माहिती आहेत,
म्हणून असेल. नाही! फक्त दहा हजार नाही,मला पन्नास हजार लोकांची पहिली नावे माहिती आहेत.अर्थात अशी चूक मी परत करणार नाही.जेम्सच्या या विलक्षण क्षमतेमुळेच तर फ्रैंकलिन डी रूझवेल्टला त्याने व्हाईट हाउसमध्ये नेऊन बसवले. १९३२ साली फेअरलेने त्याचा प्रचार केला होता.
स्टोनी पॉइंटसारख्या खेड्यातील ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत असताना,तसेच जिप्समचा विक्रेता म्हणून फेअरले जेव्हा गावागावांतून फिरत असे तेव्हासुद्धा माणसांना त्यांच्या नावानुसार लक्षात ठेवण्याची त्याची स्वतःची एक यंत्रणा होती.
त्याची पद्धत अत्यंत साधी आणि सरळ होती. कोणत्याही नवीन माणसाशी ओळख झाल्यावर तो त्याच्या किंवा तिच्याबद्दल सगळी माहिती गोळा करत असे.तो त्याचे/तिचे संपूर्ण नाव,पत्ता,त्यांच्या सवयी, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी,त्यांचे नोकरी,धंदा,व्यवसाय, त्यांची राजकारणाबद्दलची मते हे सगळे माहिती करून घेत असे आणि त्याच्या मनात त्या व्यक्तीच्या चित्रासह ही सगळी माहिती नोंदवून ठेवत असे.नंतर ती व्यक्ती त्याला परत भेटल्यावर,मध्ये एक वर्ष जरी गेलं असलं तरीही तो त्या व्यक्तीची बारकाईने चौकशी करत असे.त्यात तो अगदी तिच्या परसदारातील झाडाचीसुद्धा चौकशी करी.
मित्र जोडा आणि प्रभावशाली बना अनु - कृपा कुलकर्णी मंजुल पब्लिशिंग हाऊस
रूझवेल्टच्या प्रेसिडेंटपदाच्या निवडणुकीपूर्वी साधारण काही महिने प्रचारमोहीम सुरू असताना जेम्स फेअरले याने पश्चिमेकडील आणि उत्तर-पश्चिमेकडील देशांमधील लोकांना रोज शंभर या हिशेबाने पत्रे लिहिली.नंतर ट्रेनमधून,घोडागाडीतून,
गाड्यांमधून आणि बोटींमधून, मिळेल त्या वाहनांमधून नव्वद दिवसांमध्ये जमेल तसा प्रवास करून वीस देश आणि सुमारे बावीस हजार मैलांचा प्रदेश त्याने पालथा घातला.एखाद्या शहरात गेल्यावर तेथील लोकांना चहा,नाष्टा,लंच,डिनर या वेळात भेटून तो त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करे आणि पुढच्या प्रवासाला निघे.नंतर तो जेव्हा पूर्वेकडे परत येत असे तेव्हा भेटलेल्या गावांतील एका माणसाला तरी पुन्हा पत्र पाठवत असे व तो ज्या ज्या लोकांशी बोलला होता त्यांची यादी घेऊन त्या हजारो लोकांना स्तुतिसुमने उधळणारी पत्रे फेअरलेकडून जात असत.या पत्रांची सुरुवात डिअर बिल किंवा डिअर जेन अशी असे आणि पत्रांखाली तो स्वतःची सही करे.त्याला अगदी लहानपणीच हे वास्तव समजले होते की,
सर्वसामान्यपणे प्रत्येक माणूस इतर कोणाच्याही नावापेक्षा स्वतःच्या नावाबद्दल फार जागरूक असतो.त्याला त्यामध्येच रुची असते.तुम्ही त्याचे नाव लक्षात ठेवले आणि त्याला त्या नावाने अचूकपणे संबोधले,तर तुम्हाला त्याच्याकडून फार हृद्य प्रतिसाद मिळतो,पण तुम्ही जर ते नाव विसरलात किंवा चुकीचे उच्चारलेत,तर लक्षात ठेवा,तुमचं काही खरं नाही!
तुम्हाला एक उदाहरण सांगतो,पॅरीसमध्ये अमेरिकन रहिवाशांसाठी असणाऱ्या जाहीर भाषणकलेसंबंधीचा कोर्सचे फॉर्म्स एक फ्रेंच टायपिस्ट टाईप करत होते. त्यांना इंग्रजी भाषा विशेष अवगत नव्हती.त्यामुळे त्यांच्याकडून टायपिंग करताना काही नावे चुकली.तेव्हा त्यावेळी पॅरीसमधील एका खूप मोठ्या अमेरिकन बँकेच्या मॅनेजरने मला पत्र लिहून चांगलेच फैलावर घेतले होते.उच्चार कठीण असणारी नावे लक्षात ठेवणे खूप अवघड असते.मग लोक ते नाव उच्चारण्याचे टाळतात किंवा ते लक्षात ठेवण्याचे कष्टही घेण्याऐवजी एखादे टोपणनाव ठेवून मोकळे होतात.सिड लेव्हीच्या निकोडेनस पॅपॅडौलस नावाच्या एका गिऱ्हाईकाला लोक निक म्हणत.लेव्ही मला सांगत होता,ते नाव लक्षात ठेवण्यासाठी मला विशेष मेहनत करावी लागली.त्याला मोठ्याने हाक मारण्यापूर्वी मी अनेकदा मनातल्या मनात रंगीत तालीम करत असे.त्यानंतर मी जेव्हा त्याला अभिवादन करून त्याचे पूर्ण नाव घेतले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले,कारण काही मिनिटे तरी तो स्तब्धच होता.त्याच्या तोंडून शब्दसुद्धा फुटत नव्हता.नंतर तो बोलला तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते.मि.लेव्ही, गेल्या पंधरा वर्षांपासून मी काम करत आहे,पण आजपर्यंत कोणीही माझे संपूर्ण नाव योग्य रीतीने उच्चारण्याचा प्रयत्नही केला नाही.
आता कळले ना तुम्हाला ॲण्ड्रयू कार्नेगीच्या यशामागे कोणते सत्य दडले आहे?
स्टीलकिंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ॲण्ड्रयू कार्नेगीला स्टीलच्या उत्पादनाबद्दल खरंतर फारच थोडी माहिती होती.त्याच्याकडे काम करणाऱ्या शेकडो लोकांना या कामाची त्याच्यापेक्षा अधिक माहिती होती.पण ॲण्ड्रयू कार्नेगीला हे माहिती होते की लोकांशी कसे वागावे ? त्यामुळेच तर तो एवढा श्रीमंत झाला होता.
आयुष्यात त्याने फार लहानपणापासूनच संघटनकौशल्य, नेतृत्वगुण दाखवले होते.फक्त दहा वर्षाचा असतानाच स्वतःच्या नावाचे लोकांना किती अप्रूप असते.ते त्याला समजले होते आणि लोकांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्याने या गोष्टींचा चांगला उपयोग करून घेतला.त्याची एक गंमतशीर आठवण आहे.
तो जेव्हा स्कॉटलंडमध्ये राहणारा एक लहान मुलगा होता,तेव्हा त्याने एक सशीण आणली ! ती गरोदर होती. थोड्याच दिवसात तिला पिल्ले झाली.इतक्या पिल्लांना खायला घालायला छोट्या ॲण्ड्रयूकडे काहीच नव्हते, पण त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.त्याने त्याच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना सांगितले की, त्यांच्यापैकी जे कोणी या पिल्लांना खायला आणेल त्या प्रत्येकाचे नाव त्यांच्या सन्मानार्थ एकेका सशाला देण्यात येईल.आणि मग जादूच झाली!ॲण्ड्यूची समस्या चुटकीसरशी सुटली! त्याने मोठा झाल्यावरसुद्धा अशाच युक्त्या वापरून आणि याच मानसशास्त्राचा आधार घेऊन लाखो रुपये कमावले.एकदा कार्नेगीला पेनिसिल्व्हानिया रेलरोडला स्टील विकायचे होते. पेनसिल्व्हानिया रेलरोडचा प्रेसिडेंट थॉम्पसन होता.मग कार्नेगीने पिट्सबर्गमध्ये एक स्टील उत्पादनाचा भव्य कारखाना उभारला आणि त्या कारखान्याला,थॉम्पसन स्टील वर्क्स असे नाव दिले.
आता तुम्हाला एका कोड्याचे उत्तर शोधायचे आहे.जेव्हा पेनिसिल्व्हानिया रेलरोडला स्टील हवे होते,तेव्हा थॉम्पसनने ते कुठून विकत घेतले असेल ? सिअसरी बक यांच्याकडून ? छे! छे! तुम्ही चुकलात.
कार्नेगी आणि जॉर्ज पुलमन स्लिपींग कार बनवण्याच्या श्रेष्ठत्वावरून भांडत असताना कार्नेगीला म्हणजे स्टीलकिंगला पुन्हा आपल्या बालपणीच्या सशांची आठवण झाली.ॲण्ड्रयू कार्नेगीच्या ताब्यात असलेल्या दि सेंट्रल ट्रान्सपोर्टेशन कंपनीचे पुलमनच्या मालकीच्या कंपनीशी स्लिपींगकारचा उद्योग मिळवण्यासाठी भांडण चालू होते.हे कॉण्ट्रॅक्ट युनियन पॅसिफिक रेलरोडकडून मिळवायचे होते.कमी किमतीचे टेंडर भरणे,
लांगूलचालन करणे,एकमेकांच्या चहाड्या सांगणे असे सगळे प्रकार केल्यानंतर पूलमन व कार्नेगी दोघेही युनियन पॅसिफिकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेले.त्यावेळी दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा कार्नेगी म्हणाला,मि.पुलमन, गुडमॉर्निंग ! तुम्हाला असे वाटत नाही का की,आपण दोघेही स्वतःला मूर्ख सिद्ध करत आहोत?
पुलमन म्हणाला- म्हणजे ? मला समजले नाही !
त्यावर कार्नेगीने त्याच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगितले.
त्याच्या मते दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे काम करणे इष्ट होते.
एकमेकांच्या विरोधात काम करण्यापेक्षा एकमेकांच्या साथीने काम केल्यास दोन्ही कंपन्यांचा किती जास्त फायदा होईल याचे अत्यंत आकर्षक चित्र त्याने पुलमनसमोर उभे केले.पण अजूनही पुलमनला ते संपूर्णपणे पटले नव्हते.शेवटी त्याने विचारले,आपल्या या नवीन कंपनीचे नाव काय असेल? कार्नेगीने त्यावर तत्काळ उत्तर दिले- त्यात विचार काय करायचा? दि पुलमन पॅलेस कार कंपनी असेच असेल.पुलमनची कळी खुलली.आणि त्यानंतर एक औद्योगिक इतिहास घडला. वैयक्तिक पातळीवर लोकांना जाणून घेणे आणि त्यांच्या सन्मानार्थ काही करणे या कार्नेगीच्या हातोटीमुळेच कार्नेगी इतका यशस्वी झाला आणि म्हणूनच न मागता त्याला लोकांनी पुढारीपण बहाल केले.तो नेहमी अभिमानाने त्याच्या कामगारांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारत असे.तसेच त्याला रास्त अभिमान होता की जोपर्यंत वैयक्तिकरित्या सूत्रधार होता तोपर्यंत त्याच्या कारखान्यात एकदाही संप झाला नव्हता.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…