तिसरी लाट…१०.०४.२५ या लेखातील दुसरा भाग….
पूर्वी ' आणि ' नंतर' या गोष्टीला प्रत्येकाच्या दृष्टीतून वेगळा अर्थ आहे.
आजचे पदार्थविज्ञान बाहेरून विकसित होणारे तसेच आतूनही विकसित होणारे आहे,समावेशकही आहे. सिद्धान्ताला प्रतिसिद्धान्त हजर असतो.एक उदाहरण देण्यासारखे आहे : कृष्ण विवराबाबत आता पुष्कळांना माहिती झालेलो आहे.ते आपल्या आतील केंद्राकडे, आपल्या आवाक्यात येणाऱ्या प्रकाशासह - प्रत्येक वस्तु खेचून घेत असते...
रॉजर पेनरोज नावाच्या पदार्थविज्ञानाच्या प्रसिद्ध अभ्यासकाने आता श्वेत विवराची कल्पना मांडलेली आहे... कृष्ण विवरातील एक क्षण म्हणजे पृथ्वीवरची लाखो वर्षे असू शकेल! ज्यावेळी विश्वाच्या अनंतत्वाकडून आपण सूक्ष्माकडे जातो,तेव्हाही कोड्यात टाकणाऱ्या घटना घडत असल्याचे आपल्याला आढळून येते.कोलंबिया विद्यापीठातील डॉ.जेराल्ड फेनबर्ग यांनी टॅच्यॉन्स (Tachyons) नावाचे कण भारित केलेले आहेत ह्या कणांची गती प्रकाशापेक्षाही अधिक आहे.काही शास्त्रज्ञांच्या मते त्यांच्यासाठी काळाची गती उलट होते !
एक पदार्थशास्त्रज्ञ एफ्.काप्रा म्हणतो,की 'विश्वाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गतीने कालक्रमणा होत असते.' आपण काळाबद्दल एकवचन वापरणे योग्य होणार नाही.काळ अनेकविध असल्याने त्यांचा निर्देशही अनेकवचनी व्हावयास हवा.
काळाच्या सामाजिक वापरातही आता मूलभूत स्वरूपाची पुनर्रचना होते आहे हे आपण पाहिले आहेच.उदा.फ्लेक्स् टाइम कल्पनेचे आगमन इ.
काळाबद्दल सैद्धान्तिक शोध लागत आहेत. त्यांचा व्यवहारात काय उपयोग ? अणु विस्फोटाबाबतचा सिद्धान्त देखील एकेकाळी अव्यवहार्य वाटत होता !
काळाबाबतच्या कल्पनेतील या बदलांमुळे आपल्या स्थळविषयक कल्पनांना भगदाडे पडू लागली आहेत. कारण या दोन्ही गोष्टींचा एकमेकींशी अनेकविध संबंध आहे.परंतु काळापेक्षाही स्थळाबाबतच्या कल्पनांतील बदल लवकर घडत जाणारा असा आहे.
आपण रहातो त्या,काम करतो त्या,खेळतो त्या जागा आपण बदलतो आहोत.आपण कामाच्या जागी कसे, किती दूर,किती वेळा जातो या गोष्टीचा आपल्या स्थळ विषयक अनुभवांवर परिणाम होतो.हे सर्व बदलले जात आहेत.तिसऱ्या लाटेने स्थळ कल्पनेशी असलेल्या मानवाच्या संबंधात बदल घडवून नवीन टप्पाच सुरु केला आहे.तिसऱ्या लाटेने दुसऱ्या लाटेच्या युगात एकत्र गठ्ठा बनलेली लोकसंख्या विखरून टाकीत आपला अनुभव बदललेला आहे.जगाच्या ज्या भागात अजून औद्योगिकरण चालू आहे,तिथे लाखो लोक आजही एकवटत आहेत.परंतु तंत्रज्ञानात अतिशय पुढच्या टप्प्याची प्रगती करणाऱ्या देशात परिस्थिती याच्या उलट आहे.टोकिओ,लंडन,झुरिच,ग्लासगो आणि अशाच काही प्रचंड शहरांतील लोकसंख्या हळूहळू कमी होते आहे. आणि या उलट मध्यम आकारांच्या शहरांची सख्या वाढत चालली आहे.
अमेरिकन कौन्सिल ऑफ् लाइफ इन्शुअरन्सच्या मते ' अमेरिकेतील मोठे शहर ही आता भूतकालीन गोष्ट झाली आहे.'
हे विखुरणे आणि लोकसंख्येचे विकेंद्रीकरण यांच्या योगाने आपल्या जगाविषयीच्या गृहित कल्पना आणि अपेक्षा बदलत जाणार आहेत.वैयक्तिक वापराच्या व मालकीच्या या कल्पना,
स्वीकृत अंतरे,घरांची दाटी, आणि इतर बाबतीत,बदलून जाणार आहेत.अशा बदलाप्रमाणेच तिसऱ्या लाटेने असा विवक्षित दृष्टिकोण निर्माण केला आहे,की ज्याद्वारे माणूस आपल्या स्वतःचा,
आपल्या जमातीचा,आपल्या शेजारपाजाऱ्यांचा म्हणजेच स्थानिक विचार करत राहील.आणि तोच माणूस त्याचवेळी वैश्विक विचार करील.पृथ्वीवर आपल्यापासून हजारो मैलांवर घडत असणाऱ्या घटनांबाबत व निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत त्याला विचार पडेल,काळजीही वाटेल.दळणवळण अतिशय मोठ्या प्रमाणात,
प्रगत अवस्थेत उपलब्ध आहे.आपण आता परत आपल्या घरीच,इलेक्ट्रॉनिक कॉटेजमध्ये, काम करण्यास सुरुवात करत आहोत.अशावेळी आपण अशा दुहेरी विचारकेंद्राना प्रोत्साहन द्यायला हवे. घराच्या व कुटुंबाच्या निकट राहतील आणि त्याच वेळी त्यांची मने दूरदूरच्या ग्रहांवर व त्यांच्याहून दूर अनंत विश्वात भ्रमण करून येऊ शकतील.तिसऱ्या लाटेत अशाप्रकारे जवळपणा आणि दूरपणा एकवटलेला असेल.आपल्या स्थलविषयक कल्पना अधिक स्पष्ट करणाऱ्या अधिक प्रभावी आणि सापेक्ष अशा प्रतिमा देऊ शकणारे प्रगत विज्ञान आज आपल्या सोबत आहे.
माझ्या ऑफिमध्ये न्यूयॉर्क आणि त्याचा परिसर चित्रित करणारी खूप मोठी छायाचित्रे लावलेली आहेत.उपग्रह आणि यु-२ यांनी घेतलेली ही छायाचित्रे इतको सुस्पष्ट आहेत,की त्यात मेट्रोपोलिटन म्युझिअम आणि ला गार्डीया विमानतळावर उभे केलेले एकूण एक विमाने देखील अगदी स्पष्ट दिसतात.या विमानांच्या स्पष्ट दिसण्याचा उल्लेख करून मी नासाच्या एका अधिकाऱ्याला विचारले,'फोटो आणखी मोठे केले तर या विमानांच्या पंखांवर रंगविलेले पट्टे आणि चिन्हे दिसतोल का ?'तो अधिकारी या प्रश्नाशी देखील खूप सहनशीलतेने वागून,किंचित हसून माझ्या बोलण्यात दुरुस्ती करत म्हणाला, " रिबीट देखील."
आपण काही केवळ स्थिरचित्रणाबाबतच्या प्रभुत्वावरच थांबणार नाही,तर यापुढे कदाचित् चलत् नकाशेही तयार होण्याला वेळ लागणार नाही.दशकाभरातच आपल्याला सजीव नकाशे एखाद्या शहराचे किंवा देशाचे पहायला मिळतील,ज्याद्वारे तेथे होत असलेल्या घडामोडी आपल्याला सजीवपणे पहायला मिळतील ! एखाद्या दशकाचाच अवकाश ! असे घडल्यावर नकाशे हे स्थिरचित्र असणार नाही,तर चलच्चित्र असेल. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग,
आपल्याला तेथे चाललेल्या घडामोडींसह,स्थरशः ही दिसेल.
एखाद्या पातळीच्या खालील उंचीवर किंवा वरील उंचीवर काय चालले आहे हेही समजू शकेल इतकी प्रगती तंत्र करेल.
दुसऱ्या लाटेच्या युगात सर्वत्र प्रचलित असलेल्या परंपरागत मर्केटर नकाशा-विरुद्ध नकाशा निर्मात्यांनी आवाज उठवलेला आहे.मर्केटरच्या पद्धतीतील अनेक त्रुटी त्यांनी दाखवल्या आहेत आणि आपल्या प्रतिपाद्य पद्धतीत त्या त्रुटी रहाणार नाहीत याची देखील काळजी घेतलेली आहे.पूर्वीच्या नकाशात स्कँडिनेव्हिया हिंदुस्थानापेक्षाही मोठा दिसतो.वास्तविक हिंदुस्थानच स्कँडिनेव्हियापेक्षा तिप्पट मोठा आहे ! आता अशा चुका होणार नाहीत याची कसून काळजी घेतली जाते आहे.
आर्को पीटर्स याचा नकाशा दिसायला विचित्र असतो, कारण तो नेहमीच्या पठडीतला नाही.त्यातील यरोप आकसलेला वाटतो,तर अलास्का पसरलेला व चपटा वाटतो,कॅनडा व रशिया यांचीही तीच गत.द.अमेरिका, आफ्रिका,अरेबिया व भारत लांबलचक दिसतात ! तरी त्याच्यातील काही अचूकपणामुळे त्याच्या साठ हजाराहून अधिक प्रतींचे ' अविकसित' अनौद्योगिक देशांत वितरणही झाले आहे.ह्या विरोधाभासातून हेच स्पष्ट होते,की कुठलाही एक नकाशा 'बरोबर नाही.स्थलविषयक भिन्न प्रतिमा भिन्न उपयोगितेच्या आहेत.
शब्दशःच,असे म्हणणे खरे ठरेल,की तिसऱ्या लाटेने जगाकडे पहाण्याचा एक नवाच दृष्टिकोण दिलेला आहे.
पूर्णत्व आणि अर्धवटपणा…
दुसऱ्या लाटेने कोणत्याही बाबीचा स्वतंत्रपणे विचार करण्यावर भर दिला होता,तर तिसऱ्या लाटेच्या संस्कृतीत संदर्भ,संबंध आणि पूर्णत्वाच्या विचारावर भर दिला जातो.
इ. स. १९५० नंतर अभ्यासाला व संशोधनाला वेगळीच चालना मिळाली.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 'संशोधन मोहिमा' हातात घेतल्या गेल्या.परंतु त्याच्यापुढे नंतर फार प्रगती झाली.
स्वयंचलिताच्या क्रांतीला सुरूवात झाली आणि तिसऱ्या लाटेतील कारखाने व कचेऱ्या यांच्यातील कामासाठी एका नवीनच मूलभूतप्रणालीचा, तंत्राचा नव्याच प्रकाराचा जन्म झाला.
विचाराची नवी पद्धत सुरू झाली.या पद्धतीला 'सिस्टीम्स् ॲप्रोच' म्हणण्यात येते.या पद्धतीचा भर समस्येकडे पहाताना तिच्यातील छोट्या छोट्या विभागाला महत्त्व देण्याऐवजी संपूर्ण,सर्वांगीण अवलोकनाला महत्त्व देण्यावर असतो. घटकांचे एकमेकांतील संबंध,त्यांच्यातून निर्माण झालेल्या संपूर्णाशी असलेले त्यांचे संबंध,फीडबॅक संबंध,यांचा अभ्यास या पद्धतीत केला जातो.तिची भाषा आणि तिच्यातील विचार समाजशास्त्री व मानसशास्त्री,
तत्त्वज्ञ आणि परराष्ट्र व्यवहार विश्लेषक, तार्किक व भाषातज्ज्ञ,
स्थापत्य विशारद आणि प्रशासक यांच्याद्वारे वापरण्यात व योजण्यात येतात.
सिस्टिम थिअरीवादी आणि इतरही प्रणालींच्या पुरस्कर्त्यांनी समस्यांकड पहाण्याच्या अधिक एकात्मिक पद्धतीबाबतची आच प्रकट केली आहे.अव्यापक दृष्टीकोण दाखवणाऱ्या अतिविशिष्टीकरणाविरूद्धच्या उठावाला परिसरवाद्यांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांची भूमिका एकाच छोट्या बाबीची सोडवणूक करण्याची नसते,तर संपूर्णातील तोल राखण्याची असते.मानव आणि निसर्ग यांच्यातील विचार करणाऱ्यांचा आणि सिस्टीमवाद्यांचा प्रश्नाकडे पहाण्याचा दृष्टीकोण सारखाच आहे.ज्ञानाचे संमीलन आणि एकात्मता.
बौद्धिक जीवनातील हे बदल संस्कृतीच्या इतर अंगातही प्रतिबिबीत झालेले आहेत.पूर्वी,पूर्वेकडील धर्मांबद्दल फार थोड्या प्रमाणात आस्था दाखवली जात होतो. आता,दुसऱ्या लाटेचा भर ओसरू लागल्यावर पाश्चिमात्य तरुण लोक हिंदू स्वामींचे भक्त बनलेले आढळतात.एका सोळा वर्षाच्या गुरूचे प्रवचन ऐकायला,रागदारी ऐकायला,हिंदू पद्धतीच्या शाकाहारी रेस्टॉरंटचे उद्घाटन करायला आणि फिफ्थ ॲव्हेन्यूवरून नाचत,गात जायला त्यांची एकच गर्दी उसळलेली दिसते.ते गातात.त्यांच्याबरोबर जगही गाते.पूर्णत्वाचे पोवाडे.एकत्वाचे गान.मानसारोग्याच्या प्रांतात मानसोपचारतज्ज्ञांनी 'संपूर्ण मानवा'ला बरे करण्याचे मार्ग शोधून काढले.गेस्टाल्ट उपचार पद्धतीचा अवलंब त्यासाठी केला.लवकरच या पद्धतीचा अवलंब सर्वत्र करण्यात येऊ लागला.या पद्धतीनुसार व्यक्तीच्या जाणीवेतील जागरूकता,
आकलन व बाह्य जगताशी असलेल्या संबंधाबाबतच्या मानवी कार्यशक्तीची वृद्धी, एकात्मितेच्या प्रक्रियेचा अवलंब करून केली जाते.
औषधांच्या प्रांतात 'होलिस्टिक हेल्थ' नावाची चळवळ सुरू झालेली आहे.ती या कल्पनेवर आधारलेली आहे, की माणसाचे स्वास्थ्य शारीर,आत्मिक आणि मानसिक मेळावर अवलंबून असते.'सायन्स'ने म्हटले आहे,की " काही वर्षांपूर्वी एखाद्या लोकशाही सरकारने श्रद्धा उपचार,इरिडॉलॉजी, ॲक्युप्रेशर,बुद्धमार्गीय ध्यान आणि इलेक्ट्रो मेडिसिन अशा विषयांनी युक्त अशा आरोग्य परिषदांना आश्रय देणे ही गोष्ट अकल्पनीयच होती.परंतु अशा पर्यायी उपचारपद्धतीबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि आस्था निर्माण झाली आहे.आणि या सगळयांचे नामकरण होलिस्टिक हेल्थ असे करण्यात आले आहे.
या प्रकारची प्रत्येक चळवळ,चूस आणि सांस्कृतिक धारा वेगवेगळी,स्वतंत्र अशी आहे.परंतु तिच्या मागचे तत्त्व एकच असल्याचे स्पष्ट दिसून येते.सुट्या भागांचा अभ्यास केल्याने मळ संपूर्ण समजते,या गृहीतकावरचा हल्ला त्यातून प्रतीत होतो.
भागाशःकिंवा विश्लेषणात्मक विचारावरचा हल्ला इतका तीव्र झालेला आहे.की अखंड वस्तूच्या विचारांच्या फार मागे लागल्यामुळे तिच्यात काही भाग असतात याचाही विसर पडत चालला आहे.त्यामुळे अखंडत्वाचा,संपूर्णत्वाचा विचारहीं खंडशः होऊन त्याला अर्धवटपणाची झाक प्राप्त झालेली आहे !
परंतु अधिक विचारवंत असलेले लोक दुसऱ्या विश्लेषणात्मक कौशल्याचा,संश्लेषणात्मक अभ्यासाला महत्त्व देत त्याच्याशी,तोल साधू पहात आहेत.
दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीच्या बौद्धिक परिसरावरचा हा हल्ला कार्यकरणभावाबाबतच्या एका नव्या दृष्टिकोणाला जन्म देत आहे.
दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीने आपल्याला घटना का घडतात हे आपल्याला समजू शकते असा एक सुखद विश्वास दिला होता.तिने आपल्याला असे सांगितले होते,की प्रत्येक घटनेला विशिष्ट,सुनिश्चित असे स्थलकालनिबद्ध ठिकाण ठरलेले असते.तिने आपल्याला असे सांगितले की ठराविक गोष्टींचे नेहमी ठराविकच परिणाम होतात.तिने आपल्याला असे सांगितले,की विश्वात सर्वत्र कार्यकारणभाव,कारण व परिणाम यांच्या विशिष्ट संयोगाची दाटी झालेली आहे.
कार्यकारणभावाबद्दलचा हा का काहीसा यांत्रिक दृष्टिकोण अत्यंत उपयुक्त ठरला व अजूनही ठरत आहे. त्याची आपल्याला रोग निवारणात,गगनचुंबी इमारती उभारण्यात,
विलक्षण कल्पक यंत्रांचे आराखडे करताना, मोठ्या रचनांची जुळणी करताना मदत होते.परंतु साधे यांत्रिक स्पष्टीकरण करण्यास तो जरी समर्थ असला,
शिल्लक भाग १४.०४.२५ या लेखामध्ये…