* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: असा टाळा त्रास Avoid such trouble

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/४/२५

असा टाळा त्रास Avoid such trouble

टेक्सास येथील कॉमर्स बँक शेअर्सचे अध्यक्ष बेंटॉन लव्ह यांच्या मते,कंपनी जितकी मोठी तितकी अलिप्तता जास्त.ते सांगतात,

अशा ठिकाणी वातावरण अधिक उबदार ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांना त्यांच्या पहिल्या नावाने ओळखणे.जेव्हा एखादा अधिकारी मला म्हणतो की,मला एखाद्या कामगाराचे नाव आठवत नाही तेव्हा तो त्याच्या धंद्यातील महत्त्वाचा भागच विसरलाय असे मी समजतो आणि त्याचे कामही घसरत चालले आहे असे समजण्यास काही हरकत नसते.


कॅलिफोर्निया येथील TWA या एअरवेची फ्लाइट अटेंडंट कारेन क्रिश हिने एक निश्चय केला होता की, ती तिच्या केबीनमधील जास्तीत जास्त प्रवाशांची शक्य तितक्या वेळेस नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे चांगले फळ असे मिळाले की,

वैयक्तिकरीत्या तिला व तिच्या कंपनीला अनेकदा शुभेच्छा मिळाल्या, आशीर्वाद मिळाले.एका प्रवाशाच्या मते- मी यापूर्वी TWA मधून प्रवास केला नव्हता,पण आता इथून पुढे मी TWA शिवाय अन्य कशानेच प्रवास करणार नाही. तुम्ही माझ्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष पुरवले आणि माझ्या दृष्टीने ते सगळ्यात महत्त्वाचे आहे.'


लोकांना त्यांच्या नावाचा इतका अभिमान असतो की,ते चिरकाल,निरंतर टिकावे यासाठी ते कितीही किंमत मोजायला तयार असतात.पी.टी.बारनम हा प्रख्यात कलाकार अत्यंत बढाईखोर व कठोर हृदयाचा म्हणून प्रसिद्ध होता,पण आपले नाव लावणारे मुलगे आपल्याला नाहीत म्हणून तो अतिशय निराश होता.तेव्हा त्याने त्यासाठी त्याचा नातू सी.एच.सीले याला स्वतःबारनम सीले हे नाव लावण्यासाठी पंचवीस हजार डॉलर्स देऊ केले.


गेली अनेक शतके गर्भश्रीमंत मंडळी विद्वान लोकांना, कलाकारांना,लेखकांना,संगीतकारांना आश्रय देत आली आहेत ते अशासाठी की,त्यांची निर्मिती,कलाकृती त्यांनी या लोकांच्या नावे अर्पण करावी.


वाचनालये आणि संग्रहालये या ठिकाणी तर शतकानुशतके अशा महान,विद्वान कलाकारांचा, लेखकांचा आणि त्यांच्या महान कार्याचा कधीही विसर पडू देणार नाही,अशी व्यवस्थाच केलेली असते.


न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीमध्ये ॲस्टर आरि लेनॉक्सचा सुंदर संग्रह आहे.मेट्रोपॉलिटिअन म्युझियममध्ये बेंजामिन अल्टमॅन आणि जे.पी.मॉर्गन यांच्या कार्याचा गौरव केला आहे.प्रत्येक चर्चमध्ये खास फलक बनवलेले असतात,ज्यांच्यावर देणगीदारांची नावे लिहिलेली असतात.विद्यापीठाच्या परिसरातील प्रत्येक इमारतीवर त्या इमारतीसाठी ज्या कोणी पैशाची मदत केली असेल,त्याचे नाव दिलेले असते.


अनेक लोकांना नावे आठवत नाहीत.याचे अगदी साधे कारण हे असते की,नावे लक्षात ठेवण्यासाठी लागणारा वेळ व ऊर्जा खर्च करण्याची त्यांची इच्छा नसते.नाव पुन्हा पुन्हा उच्चारण्याचे श्रम ते घेत नाहीत.खरे म्हणजे ते अशी खोटीच कारणे सांगतात की,ते कामात खूप व्यग्र असल्यामुळे नावे त्यांच्या लक्षात राहत नाहीत.


पण तुम्हीच सांगा,ते फ्रँकलिन डी.रूझवेल्टपेक्षा अधिक व्यग्र असू शकतील का? जर रूझवेल्ट वेळ काढून नावे लक्षात ठेवतो,अगदी त्याच्या संबंधात आलेल्या मेकॅनिकचे नावही त्याला आठवते,तर आपल्याला का नाही आठवत ? तुम्हाला हे सप्रमाण सिद्ध करणारी खरी घडलेली घटना सांगतो.मि.रूझवेल्ट यांचे दोन्ही पाय पॅरालाईज्ड झाल्यामुळे सर्वसामान्य गाडी ते चालवू शकत नव्हते.

म्हणून क्रिसलर कंपनीने मि.रूझवेल्ट यांच्यासाठी स्पेशल कार बनवली.मि.चेंबरलेन स्वतः एका मेकॅनिकला घेऊन व्हाईट हाउसमध्ये ती गाडी घेऊन आले.या अनुभवाचे कथन करणारे स्वतः चेंबरलेनने लिहिलेले पत्र माझ्या टेबलावर पडलेले आहे. तो म्हणतो- मी प्रेसिडेंट रूझवेल्ट यांना ती स्पेशल गाडी कशी हाताळायची हे शिकवले,कारण सामान्य गाडीपेक्षा त्यात खूप वेगळ्या गोष्टी होत्या,पण प्रेसिडेंटने मला माणसांना कसे कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळायचे ते शिकवले.जेव्हा मला व्हाईट हाउसमध्ये बोलावले गेले, तेव्हा प्रेसिडेंटने अत्यंत आनंदाने व उत्साहाने आमचे स्वागत केले.त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली. त्यामुळे मला खूप मोकळे वाटले आणि माझी मुख्यतः खात्रीही पटली की,ज्या गोष्टी मी त्यांना सांगणार आहे किंवा दाखवणार आहे त्यात त्यांना मनापासून रस आहे. ती गाडी अशा पद्धतीने तयार केली गेली होती की,ती वापरायला पायांची गरज नव्हती.ती पूर्णपणे हातांनी चालवता येणार होती.ती गाडी पाहण्यासाठी खूप गर्दी जमली,तेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्ट म्हणाले-मला असे वाटते की,ही सर्वोत्तम गाडी आहे.तुम्हाला फक्त काय करायचे आहे,तर बटणाला स्पर्श करायचा आहे.बाकी तुम्हाला काहीच कष्ट घ्यावे लागणार नाहीत.मला ही गाडी खूप आवडली आहे.ती कशी बनवली हे मला माहिती नाही, पण त्या गाडीच्या आत नेमके काय आहे ते जाणून घेणे मला आवडेल.जेव्हा रूझवेल्टच्या मित्रांनी आणि साहाय्यकांनी गाडीच्या मशीनचे कौतुक केले तेव्हा त्यांच्यासमोरच प्रेसिडेंट म्हणाले-मि.चेंबरलेन तुम्ही ही गाडी बनवण्यासाठी जे कष्ट घेतले व जो वेळ दिला त्याची मी सदैव आठवण ठेवेन.खरोखरच तुम्ही हे फार उत्तम काम केले आहे ! त्यांनी रेडिएटरचे कौतुक केले.मागचे पाहण्याच्या आरशाचे कौतुक केले.घड्याळाचे,स्पॉट लाइट्सचे,सीट कव्हर्स व कार्पेटचे,

ड्रायव्हर सीटचे आणि खास पद्धतीने बनवलेल्या त्या छोट्या सुटकेसेसचे आणि त्यावरील त्याच्या नावाच्या आद्याक्षरांचे;असे सगळ्यांचे कौतुक केले.वेगळ्या शब्दात सांगायचे,तर मी त्यांच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी दखल घेतली.त्यांनी या सगळ्या बारीकसारीक गोष्टी मिसेस रूझवेल्टला आणि मिस पर्कीन्सला म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीलासुद्धा समजावून सांगितल्या.

त्यांनी त्यांच्या व्हाईट हाउसमधल्या हमालालासुद्धा या प्रसंगात सामावून घेतले.ते म्हणाले - जॉर्ज,आता गाडीतील या सुटकेसेसची काळजी तुलाच घ्यायची आहे.


जेव्हा प्रेसिडेंटची शिकवणी पूर्ण झाली तेव्हा ते माझ्याकडे वळले व म्हणाले - अच्छा मि.चेंबरलेन,एक बोर्ड मीटिंग अर्ध्या तासापासून थांबवून ठेवली आहे. त्यामुळे मला आता तिकडे गेलेच पाहिजे.


मी माझ्याबरोबर तो मेकॅनिक व्हाईट हाउसमध्ये नेला होता.

त्याचीही मी रूझवेल्ट यांच्याबरोबर ओळख करून दिली होती.तो त्यांच्याशी फारसे बोलला नव्हता आणि रूझवेल्टनीसुद्धा त्याचे नाव एकदाच ऐकले होते.तो मेकॅनिक अत्यंत लाजाळू होता.तो शांतपणे सगळे ऐकत होता,पण निघण्यापूर्वी रूझवेल्टनी या मेकॅनिकचीसुद्धा दखल घेतली होती.त्याच्याबरोबर हस्तांदोलन केले होते. त्याला त्यांनी नावाने हाक मारली होती आणि वॉशिंग्टनला येण्याबद्दल त्याचे आभारही मानले होते. रूझवेल्ट यांनी जे मनात आले ते त्यांनी केले आणि ते मनापासून केले.उगीच घाईघाईने उरकून टाकल्यासारखे त्यांचे वागणे नव्हते,हे मला जाणवले.


न्यूयॉर्कहून परत आल्यानंतर काही दिवसांत मला रूझवेल्ट यांनी सही केलेला एक फोटोग्राफ आणि माझ्या मदतीबद्दलचे आभाराचे चार शब्द असलेले पाकीट मिळाले.रूझवेल्ट यांना एवढे सगळे करायला वेळ कसा मिळतो याचे मला खूप आश्चर्य वाटले.


फ्रैंकलिन डी.रूझवेल्टला हे माहिती होते की, लोकप्रियता मिळवण्याचा सगळ्यात सोपा,खात्रीचा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे लोकांची नावे लक्षात ठेवणे आणि त्यांना महत्त्व देणे,पण आपल्यापैकी किती लोक हे करतात ?कित्येकदा जेव्हा आपली नवीन कोणाशी ओळख होते तेव्हा आपण थोडा वेळ गप्पा मारतो आणि गुडबाय म्हणण्यापूर्वीच त्याचे किंवा तिचे नाव विसरूनसुद्धा जातो.राजकारणी व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या मतदारांची नावे लक्षात ठेवणे हे मुत्सद्दीपणाचे लक्षण आहे आणि त्यांची नावे विसरल्यास तो स्मृतिभ्रंश समजावा.तुमच्या उद्योगधंद्यात आणि सामाजिक जीवनात नावे लक्षात ठेवणे जितके महत्त्वाचे आहे,तितकेच ते राजनीतीमध्येसुद्धा महत्त्वाचे आहे.


तिसरा नेपोलियन हा फ्रान्सचा राजा होता आणि नेपोलियन दि ग्रेटचा पुतण्या होता.तो नेहमी अभिमानाने सांगत असे की,राज्यकारभाराच्या कर्तव्याखेरीज तो त्याला भेटलेल्या सगळ्या लोकांची नावे लक्षात ठेवे.त्याची काय युक्ती होती? एकदम सोप्पी ! त्याला जर ते नाव स्पष्ट ऐकू आले नाही,तर तो म्हणायचा- माफ करा ! मी नीट ऐकले नाही आणि जर ते नाव जरा विचित्र वाटले,तर तो म्हणायचा - तुम्ही त्याचे स्पेलिंग काय लिहिता ?आणि त्याच संभाषणात तो पुन्हा पुन्हा अनेकदा ते नाव उच्चारून मनातल्या मनात त्या माणसाचा आणि नावाचा संदर्भजोडून ठेवत असे.त्याचे हावभाव,त्याचे व्यक्तिमत्त्व याचीही नोंद ठेवत असे.


जर ती व्यक्ती विशेष महत्त्वाची असेल,तर तो आणखी विशेष कष्ट घेत असे.जेव्हा तो एकटा असे तेव्हा तो एखादा कागद घेऊन त्यावर ती नावे लिहीत असे.ती पुन्हा काळजीपूर्वक वाचत असे.त्या अक्षरांवर लक्ष केंद्रित करत असे आणि मनामध्ये त्या नावाची खूणगाठ बांधत असे आणि मग तो कागद तो फेकून देई.अशा प्रकारे तो ती नावे डोळ्यांमध्ये आणि कानांमध्ये साठवून ठेवत असे.


इमर्सन म्हणतो - या सगळ्यामध्ये बराच वेळ जात असे, पण चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी छोटे-छोटे त्याग करावेच लागतात.


आपल्या संपर्कात येणाऱ्यांची नावे लक्षात ठेवून त्याचा योग्य वेळी वापर करणे हे काही फक्त राजे किंवा उच्च अधिकाऱ्यांसाठी उपयोगी ठरते असे नव्हे,तर सगळयांनाच त्याचा कधी न कधी उपयोग होतो.केन नॉटिंगहॅम हा इंडियाना येथील जनरल मोटर्समध्ये काम करणारा एक कामगार होता.सहसा त्या परिसरातील हॉटेलमध्येच तो दुपारी जेवण घ्यायचा.एका काउंटरमागे जी स्त्री सँडविचेस बनवायची तिचा चेहरा खूप रागीट होता व तिच्या कपाळावर सदोदित आठ्या असायच्या. ती कोणाचीच फारशी दखल घेत नव्हती.तो म्हणाला- मी जेव्हा तिला मला काय पाहिजे ते सांगितले तेव्हा तिने एका छोट्या तराजूवर हॅमचे माप केले आणि एक लेट्यूसचे पान आणि बटाट्याच्या चकत्या घालून मला सँडविच दिले.दुसऱ्या दिवशी तेथेच मी रांगेत उभा होतो. तीच स्त्री ! त्याच आठ्या! फक्त फरक हा होता की, आज तिच्या गळ्यात तिच्या नावाचा टॅग होता.मी ते वाचले व तिला म्हणालो,हॅलो युनिस ! आणि काय पाहिजे ते तिला सांगितले.आज ती तराजू विसरली.तिने हॅमची चळत आणि तीन लेट्यूसची पाने माझ्या सँडविचमध्ये घातली आणि प्लेटमधून उतू जातील एवढे बटाट्याचे चिप्स घातले.


म्हणूनच मी पुन्हा सांगतो,नावात किती जादू आहे ते समजून घ्या आणि ज्या माणसांच्या आपण सहवासात येतो,त्या-त्या प्रत्येक माणसाचे स्वतःचे असे एक खास वेगळेपण असते,

वैशिष्ट्य असते,वेगळे व्यक्तिमत्त्व असते हे लक्षात घ्या.त्याचा स्वीकार करा.नावच त्या वेगळेपणाला लेबल लावते.आपण एखाद्याचे नाव घेऊन जेव्हा एखादी विनंती करतो किंवा त्याच्याबद्दल विशेष माहिती गोळा करतो तेव्हा त्या विशिष्ट परिस्थितीत आपले काम होण्याची शक्यता निर्माण होते,

अन्यथा नाही.अगदी एखाद्या वेट्रेसपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत नावातच सगळी जादू असते.


लक्षात ठेवा,अगदी कोणत्याही भाषेत प्रत्येक माणसाला त्याचे नाव हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचे वाटते व ऐकण्यास सर्वांत गोड असा तोच एक शब्द आहे,असे त्याचे मत असते.


०४.०४.२५ या लेखातील दुसरा भाग…