* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मे 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/५/२५

प्रारंभी / initially

" छोटा असो किंवा मोठा पण आपला प्रवास अगदी स्वतःपासून सुरू व्हावा."


सर्वांना धन्यवाद व नमस्कार,या लेखापासून एक नवीन लेखनमाला आपण सुरु करीत आहोत.सॉक्रेटिस यांनी म्हटल्याप्रमाणे,तुमचा मौल्यवान वेळ पुस्तके वाचण्यात घालवा,यामुळे या पुस्तकांच्या लेखकांना मोठ्या कष्टाने जाणून घेता आलेली प्रत्येक गोष्ट जाणून घेणे तुम्हाला सोपे होईल.


सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS


माझं वय 80 वर्षे असताना आणि वकिली सुरू करून 52 वर्षे झालेली असताना माझं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या एका दिव्यातून मला जावं लागलं.


बोस्टनमधल्या मध्यवर्ती भागात माझे ऑफिस आहे. वरच्या मजल्यावरच्या एका कोपऱ्यातल्या खोलीत एका मोठ्या महॉगनी लाकडाच्या टेबलाशी मी बसलो होतो. संगमरवरी प्रवेशदालनाच्या दारावरच्या पितळी जुनाट पाटीवर हॅमिल्टन,हॅमिल्टन आणि हॅमिल्टन असं नाव दिसतं.मी त्यातला पहिला हॅमिल्टन म्हणजेच थिओडर जे.हॅमिल्टन.उरलेले दोघे म्हणजे माझा मुलगा आणि माझा नातू.


अवघ्या बोस्टनमध्ये आमची फर्म सर्वात प्रतिष्ठित फर्म आहे असं नाही,असं मी म्हटलं तर तो माझा सावधपणे बोलण्याचा गुण असं म्हणेल कोणी,पण दुसरं कोणी असं काही म्हटलं तर मी अगदी सहमत होईन त्याच्याशी.


एकदा असाच मी माझ्या प्रशस्त आणि जरा जुनाट झालेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो.मनात विचार घोळत होता,आपण कुठवर येऊन पोचलो ? सुरुवात विधि-महाविद्यालयातल्या त्या धडपडीच्या दिवसांची होती.भिंतीवर माझे फोटो होते.ते पहातांना मला गंमतच वाटली.पाच तर अमेरिकेच्या गेल्या पाच अध्यक्षांबरोबरचे आणि इतर अशाच महत्वाच्या व्यक्तींबरोबर घेतलेले.


मग नजर गेली पुस्तकांच्या शेल्फांकडे.जमिनीपासून छतापर्यंत उंचीची ती कपाटे चामड्याच्या बांधणीतल्या पुस्तकांनी गच्च भरली होती.ते खानदानी चामड्याचं फर्निचर काय, शपूर्वेकडून आणलेला तो भला थोरला गालिचा काय,सारं माझ्यापेक्षाही आधीचं.हे ओळखी-ओळखीचं वातावरण मनात घोळवत मी आनंदात होतो.तोच टेबलावरचा फोन खणाणला. 


परिचित आणि विश्वासाचा मागरिट हेस्टिंग्जचा आवाज मी ओळखला. ती म्हणाली,"सर,जरा आत येऊन थोडं बोलू का तुमच्याशी ? "


आम्ही चाळीस वर्षांपेक्षा जरा जास्तच एकमेकांबरोबर काम केलं होतं.जेव्हा एखादी गंभीर बाब सांगायची असते तेव्हा तिचा हा उदासवाणा आवाज ती वापरते. "प्लीज आत ये." मी लगेच उत्तरलो.


मागरिट लगेच आत आली,दरवाजा लोटून माझ्या समोर येऊन बसली.तिच्या हातात कॅलेंडर,पत्रव्यवहार किंवा कागदपत्रे काहीच नव्हते.केव्हा बरं यापूर्वी ही अशी काही न येता माझ्या केबिनमध्ये आली होती असं मी आठवत होतो.तेवढयात काही प्रास्ताविक न करता ती एकदम म्हणाली, " मिस्टर हॅमिल्टन,थोड्यात वेळापूर्वी रेड स्टीव्हन्स मेला."


वयाची ऐंशी वर्षे ओलांडली की सवय होते मनाला कुटुंबातल्या किंवा मित्रांपैकी कोणाचा मृत्यू ऐकण्याची. पण काहींचे मृत्यू सहन करणं कठीण जातं.या मृत्यूने मी हादरलोच,साऱ्या भावना,सगळ्या आठवणी यांचा कल्लोळ होत असतानाच मला माझं कर्तव्य करायला हवं आहे याची जाणीव मला झाली.रेडची माझ्याकडून हीच तर अपेक्षा होती.


मी लगेच माझ्या वकिलाच्या भूमिकेत जाऊन मागरिटला म्हणालो,"आपल्याला त्याच्या सर्व कुटुंबियांना बोलवायला लागेल.निरनिराळ्या कार्पोरेट बोर्डाचे लोक,धंद्यातले लोक यांना सांगायला हवं.आणि हे बघ,त्या विविध वार्ताहरांना कसं काबूत ठेवायचं याची तयारी कर.ते आता केव्हाही टपकतील."


मिस हेस्टिंग्ज उभी राहून दाराकडे वळली. बाहेर जाण्याआधी वळून म्हणाली,"मी सांभाळते सर्व काही."


अस्वस्थता आली होती,व्यक्तिगत भावना आणि व्यावसायिक कठोर कर्तव्य यातील सीमारेषेचे भान ठेवत ती म्हणाली, "मिस्टर हॅमिल्टन,तुमच्या हानीबद्दल मला वाईट वाटतंय."


तिनं दरवाजा बंद केला.आणि मी एकटाच माझ्या विचारात गुरफटून गेलो.


दोन आठवड्यांनंतर रेड स्टीव्हन्सच्या निरनिराळ्या नातेवाईकां -

सोबत मी एका मोठ्या कॉन्फरन्स टेबलासमोर बसलो होतो.


मंडळी अटकळी बांधत होती. आणि ही लोभानं गुंतलेली

अटकळबाजीच जणू त्या खोलीत प्रत्यक्ष व्यापून राहिली होती. पुष्कळशा नातेवाईकांबद्दलच्या रेडच्या भावनांची मला कल्पना होतीच.त्याला हवं होतं तसं मी केलं.हा हळहळीचा काळ शक्य तेवढा लांबवला. 


मंडळींना चहा,कॉफी,सरबत किंवा आणखी काही हवं असेल तर द्यायला मागरिटला सांगितलं.समोरची प्रचंड कागदपत्रे मी पुन्हा पुन्हा चाळली.आणि अनेकदा माझा घसा साफ केला.आता जास्त ताणणे बरं दिसलं नसतं म्हणून उभा राहून मोट बांधलेल्या त्या गर्दीला उद्देशून बोललो.


"सभ्य स्त्रीपुरूष हो,तुम्हाला माहीत आहेच की हावर्ड रेड स्टीव्हन्स याचं मृत्युपत्र आणि इतर महत्त्वाचे कागद यांचं वाचन करायला आपण येथे जमलो आहोत.मला समजतंय की आपल्याला हे जड जातंय.आणि या कायदेशीर आर्थिक बाबींच्या काळजीपेक्षा तुमचं वैयक्तिक दुःख कितीतरी जास्त आहे."


मला माहीत होतं की जिथे कुठे रेड असेल तिथे त्याची या खोचक बोलण्यानं करमणूकच झाली असणार.


"या कायदेबाज प्रास्ताविक मजकुराला मी फाटा देतो आणि थेट मुद्याकडे वळतो.रेड स्टीव्हन्स सर्वच दृष्टींनी एक यशस्वी माणूस होता.त्याच्या सारखंच त्याचं हे मृत्युपत्रातलं मिळकतदानपत्र आहे.अगदी साधं, सरळ आणि स्पष्ट."


"मिस्टर स्टीव्हन्सने मागच्या वर्षीच पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला आणि तेव्हाच मी त्याचे सुधारित मृत्युपत्र तयार केले.

आमच्या दोघांतील वारंवार होणाऱ्या बोलण्यानंतर त्याची अंतिम इच्छा या कागदोपत्री अवतरली.मी आता ते प्रत्यक्षच वाचतो. आणि तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल की या कायदेशीर आणि बंधनकारक बाबींमधले काही उतारे प्रत्यक्ष रेडच्या शब्दांमध्ये येतात." "पॅनहँडल ऑइल अ‍ॅण्ड गॅस ही माझी पहिली कंपनी मी माझा सर्वात मोठा मुलगा जॅक स्टीव्हन्स याला देत आहे.हे मृत्युपत्र लिहीत असताना पॅनहॅडल कंपनीचं मोल 600 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे."


टेबलाच्या भोवताली कित्येकांचा आ वासला.तर त्याच वेळी एका दिशेने लांबलेला हर्षोद्गार ऐकू आला.मी टेबलाच्या कडेवर हातातली कागदपत्रं ठेवली आणि माझ्या वाचायच्या चष्म्याच्यावरून भुवया उंचावून बघितले.ती माझी नेहमीची कोर्टरूममधील लकब होती.


थोडं थांबून मी परत कागदपत्र उचलून वाचू लागलो.


"जरी कंपनीचा मालक पूर्णतःजॅक असला तरी सर्व कारभार आणि व्यवस्थापन पॅनहँडल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सभासदांच्या हाती असेल.या लोकांनी गेली बरीच वर्षे उत्तम काम बजावलंय.मी जिवंत असताना,जॅक तू कंपनीच्या कामात काहीच रुची दाखवली नाहीस.मी मेल्यावर आता तुला ती नसणारच असे मी मानतो.तुझ्यासारख्या माणसाच्या हातात पॅनहँडल सारखी कंपनी सोपविणे म्हणजे तीन वर्षाच्या बालकाच्या हातात भरलेली बंदूक देण्यासारखे होईल.तुला जाणवून देतो की मी मिस्टर हॅमिल्टनला सूचना दिल्या आहेत की जेणेकरून तू जर कंपनीवर ताबा मिळावा म्हणून लढलास किंवा बोर्डाच्या कामात ढवळाढवळ केलीस,एवढंच काय पण जरी नुसती माझ्या मृत्युपत्रान्वये मिळालेल्या देणगीबाबत तक्रार केलीस तरी पॅनहँडल ऑइल अ‍ॅण्ड गॅस कंपनी तत्काळ धर्मादायला दिली जाईल."


कागदांवरची नजर मी जॅक स्टीव्हन्सकडे वळवली. शक्य तेवढ्या सर्व भावनांचा कल्लोळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.सत्तावन्न वर्षांच्या त्या खुशालचेंडू माणसाला कधी स्वतःची रोजीरोटी कमावण्यातलं सुख कळलंच नव्हतं. त्याच्या हाती पॅनहँडल ऑईल अ‍ॅण्ड गॅस कंपनीची सूत्रं न ठेवण्याने त्याच्या बापाने त्याच्यावर काय उपकार केले आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.आणखी एकदा आपण आपल्या प्रसिद्ध बापाच्या नजरेत नापास झालो एवढंच त्याला वाटलं हे मला ठाऊक होते.


मला जरा जॅकची दयाच आली.मी त्याला म्हणालो, 


"मिस्टर स्टीव्हन्सने मृत्युपत्रात असं सांगितलंय की क्रमाक्रमाने मृत्युपत्र वाचतांना संबंधित माणसांचा भाग वाचून झाल्यावर त्यांनी निघून जावे."


गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे बघून तो उद्‌गारला, "काय?"


तत्परतेने मिस मागरिटने त्याचा हात धरला आणि म्हणाली,"मिस्टर स्टीव्हन्स,मी तुम्हाला दारापर्यन्त सोडते." सर्वजण आपापल्या जागी बसल्यावर अटकळी बांधणे पुन्हा तापू लागले.मी चालू केले."माझी एकुलती कन्या रूथ हिला राहते घर,ऑस्टिन-टेक्ससमधले रँच आणि त्यातली गुरेढोरे यांचा व्यवहार यांची मालकी मिळेल." रूथ टेबलाच्या टोकाशी,तिचा संभ्रमावस्थेतला नवरा आणि अपत्य यांच्यासह बसली होती.एवढ्या अंतरावरूनही हावरटासारखं टाळी वाजवून वाजवून खुषीत हातावर हात चोळणं ऐकू येत होते.ती मंडळी स्वतःतच इतकी दंग होती की एकूण कारभारापासून त्यांना दूर ठेवलंय आणि ते स्वतःचे किंवा दुसऱ्या कोणाचे भलं बुरं काही करू शकणार नाहीत हे त्यांना कळलं की नाही कोण जाणे.मिस् हेस्टिंग्जने त्यांना तत्काळ दारापर्यंत पोचवले.


मी घसा साफ करून वाचन चालू केले."राहता राहिला माझा सर्वात धाकटा मुलगा बिल.त्याला मी माझे सर्व शेअर्स,बॉण्ड्स आणि निरनिराळ्या ठिकाणची गुंतवणूक यांचे उत्पन्न देतो.पण याची सर्व देखभाल मिस्टर हॅमिल्टन आणि त्यांची फर्म यांच्याकडे राहील.

असं करून तुझं मृत्युपत्र कोणी जेव्हा वाचेल तेव्हा काही वाटणी करायला शिल्लक असेल."


दूरच्या नातेवाईकांना काही ना काही मिळाले. उत्सुकतेने ते इतका वेळ ताटकळत बसले होते.खोली बरीचशी रिकामी झाली मी आणि मिस मागरिट सोडून आता फक्त एक जणच उरला.


चोवीस वर्षाच्या जेसन स्टीव्हन्सला मी टेबलाशी बसलो असतानाच पाहिले.माझ्या आयुष्यभराच्या जिगरी दोस्ताचा तो पुतणनातू होता.राग,अनादर आणि अवज्ञा यांनी ओतप्रोत भरलेल्या नजरेने मो माझ्याकडे टक लावून बघत होता.

आयुष्यभर स्वयंकेन्द्रीपणा आंगवळणी पडलेल्यालाच तसं बघणं जमणार होतं.


टेबलावर त्याने हात आपटला आणि गुरकावत मला म्हणाला,"त्या खवचट थेरड्याने मला काहीच ठेवलं नसणार.माझी नेहमी निर्भर्त्सनाच करायचा तो." उभा राहून तो जायला निघाला सुद्धा.


"अरे,अशी घाई नको करू.तुझं नाव आहे या मृत्युपत्रात." मी म्हणालो.


पुन्हो तो खुर्चीत येऊन बसला.वाटलेली आशा लपवण्याचा प्रयत्न करीत मख्ख चेहऱ्याने माझ्याकडे टक लावून बघू लागला.


मी पण तशाच मख्खपणे त्याच्याकडे पाहिले.मी ठरवलं होतं की हा बोलेपर्यंत आपण बोलायचं नाही.ऐशी वर्षांचं वय झाल्यावर धीर धरणे सोपे जाते.


असह्य झाल्यावर तो म्हणाला, "ठीक आहे.काय दिलं आहे मला त्या बुढ्याने ?"


मी खाली बसून कागद चाळू लागलो.जेसन स्टीव्हन्स पुटपुटला, " काहीही नसणार."


मी माझ्या खुर्चीतून त्याच्याकडे स्मित करून म्हटले, "अरे गड्या,म्हटलं तर सगळं काही आणि म्हटलं तर काहीच नाही असं एकाच वेळी आहे बघ."


शिल्लक राहीलेले भाग क्रमशःप्रसारित होतील..।