मार्कस ऑरोलियसचा मुलगा कॉम्पोडस हा नीरो वगळल्यास इतर सर्व सम्राटांत अत्यंत दुष्ट व रानटी सम्राट होऊन गेला.पुढील तीनशे वर्षांतल्या सम्राटांचा इतिहास थोडक्यात सांगायचा,तर असे म्हणता येईल की,त्यांनी खून केले,कत्तली केल्या,जुलूम केले व शेवटी त्यांचेही खून झाले ! त्यांच्या दुष्कृत्यांचा इतिहास सांगत बसण्यात फारसा अर्थ नाही.तो म्हणजे कंटाळवाणी व वीट आणणारी मूर्खपणाची कथाच आहे.नावे व तारखा बदलल्या की सर्व प्रकार तेच !
मार्कस ऑरेलियस मागून झालेल्या अनेक सम्राटांपैकी कॉन्स्टंटाइन तेवढाच इतरांहून वेगळा आढळतो;पण तो इतरांपेक्षा अधिक चांगला म्हणून नव्हे तर त्याने ख्रिश्चन धर्म हा राज्याचा राष्ट्राचा धर्म केला म्हणून.तथापि,कॉन्स्टंटाइनचा ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्माहून वेगळा होता.
कॉन्स्टंटाईन इ.स.३१३ या वर्षी गादीवर आला.इतर साऱ्या उमेदवारांस ठार करूनच नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तो गादीवर आला.त्याचा बाप कॉन्स्टंटियस हा डायोक्लेशियन सम्राटांच्या कारकिर्दीत गव्हर्नर होता. त्याची आई हेलेना ही एका खानावळवाल्याची ख्रिश्चन कन्या पित्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या रक्तात उतरली होती व ती पुरी करण्यासाठी त्याने तिचा धर्म पत्करला.
गादीसाठी असलेल्या प्रतिस्पर्ध्यातल्या मॅक्झेन्टियसशी लढताना त्याला यश येईना.त्याने साऱ्या जुन्या देवदेवतांना प्रार्थिले,पण सर्वच दुसऱ्या कुठल्यातरी भानगडीत गुंतलेले असल्यामुळे कोणीच मदतीस येईना. त्याचा पराभव होऊ लागला.शेवटी हताश होऊन त्याने आपल्या आईच्या 'येशू' देवाची प्रार्थना केली;त्याला विजय मिळाला.तो नव्या देवाला केलेल्या प्रार्थनेमुळे मिळाला,असे त्याला वाटल्यामुळे त्याने शांततेचा धर्म देणाऱ्या येशूला रोमन साम्राज्याची 'युद्ध-देवता' बनविले.भोळसट रोमनांना युद्धात खरोखर ख्रिस्तानेच मदत केली हे पटवून देण्यासाठी त्याने एक चमत्कार-कथा रचली "मॅक्झेन्टियसवर चाल करून जाताना मला 'या चिन्हाच्या योगेच तुझा जय होईल' असे शब्द वर असलेला एक जळजळीत क्रॉस दिसला."
या नवीन ख्रिश्चन युद्धदेवतेमुळे कॉन्स्टंटाइनला इतका आनंद झाला की,त्याने ख्रिश्चन धर्म रोमचा राष्ट्रधर्म केला.तोपर्यंत ख्रिश्चन धर्म शांतिप्रियांचा होता,प्रतिकार न करणाऱ्यांचा होता.
पण आता तो अहंमन्यतेने व गर्वाने लढणाऱ्या लोकांचा चढाऊ धर्म झाला." रोमन सैनिकांनो,पुढे चला ' या युद्धघोषणेऐवजी " ख्रिश्चन सैनिकांनो,पुढे चला " अशी रोमची नवी युद्धघोषणा बनविण्यात आली व त्या सैन्याच्या पुढे,पाठीवर जड क्रॉस असलेला गॅलिलीचा तो थकलेला ज्यू मिरविण्यात येऊ लागला.
ख्रिश्चन धर्म अंगीकारून अगर त्याला चुकीने जो ख्रिश्चन धर्म वाटला तो घेऊन व रोमचा तो राष्ट्रधर्म करून कॉन्स्टंटाईनने आपल्या पत्नीचा,वडील मुलाचा व एका पुतण्याचा खून केला व रोमवर अनियंत्रित राजसत्ता गाजविण्यास सुरुवात केली.
त्याच्यापूर्वी डायोक्लिशन अंगावर रेशमी कपडे घाली,हाती राजदंड व डोक्यावर पर्शियन सम्राटांचा मुकुट धारण करी.पण कॉन्स्टंटाइन त्याच्याही पुढे जाऊन आपल्या राष्ट्राच्या भवितव्याचा एकमेव विधाता बनला.त्याने सीनेटची सर्व सत्ता संपुष्टात आणली,पर्शियन सम्राटांप्रमाणे निरनिराळे मंत्री व अधिकारी निर्माण केले,
चॅन्सेलर,खजिनदार, शरीररक्षक,दलांचे सेनापती,वगैरे पदाधिकारी नेमले. नाना रंगांचे व सोनेरी पदरांचे झगे तो अंगावर घाली. त्याच्या भेटीस येणाऱ्यांना त्याला साष्टांग प्रणिपात करावा लागे.
बॉस्फरसच्या सामुद्रधुनीवर वायझटियम शहर पुन्हा बांधून त्याने त्याला 'कॉन्स्टँटिनोपल' (म्हणजे कॉन्स्टाइनचे शहर) असे नाव दिले.आशियातील राजेमहाराजांप्रमाणे भव्य-दिव्य वैभवात राहू पाहणाऱ्या रोमन सम्राटांच्या निवासासाठी हे शहर बांधण्यात आले. त्याने सुरू केलेल्या या नव्या अनियंत्रित सुलतानशाहीचा थाटमाट टिकविण्यासाठी त्याने आधीच जबर असलेले कर वाढविलेपुष्कळशा रोमन नागरिकांस त्याने केवळ गुलाम केले.रोमन सुलतानांमध्ये तो सर्वांत निरंकुश होता.अर्वाचीन काळातील सारे झार व कैंसर यांची अवलाद त्याच्याचपासून सुरू झाली.
'रोमन इतिहासाची रूपरेषा' या आपल्या पुस्तकात प्रो.मॉर लिहितो,"अर्वाचीन युरोपातील साम्राज्यात ऑगस्टसचा तो पहिला साम्राज्यवाद नसून नंतरचा कॉन्स्टंटाइनचा साम्राज्यवाद आहे.तो पुन्हा प्रकट झाला आहे."
निकाई येथे ख्रिश्चन धर्मोपदेशकांचे संमेलन भरविल्याबद्दल कॉन्स्टंटाइन विशेष प्रसिद्ध आहे.इ.स. ३२५ मध्ये हे संमेलन भरले होते.ख्रिस्ताच्या दैवी विभूतिमत्त्वाबाबतच्या नाना मतांच्या चर्चेसाठी कॉन्स्टेंटिनोपलनजीकच्या नाइस शहरी ही धर्मपरिषद भरली होती.आजच्या प्रमाणेच कॉन्स्टंटाइनच्याही काळात मॉडर्निस्ट,फंडामेंटलिस्ट,पुराणमतवादी, नवमतवादी असे नाना विरोधी संप्रदाय होते व ते परस्परांचे गळे कापण्यास सदैव सज्ज असत.
नाइस येथे भरलेल्या धर्मपरिषदेकडे आपण आता जरा नजर फेकू या.
नाइस येथे भरलेल्या परिषदेतील नवमतवाद्यांना एरिएन म्हणत;
कारण ते रियसचे अनुयायी होते.आजच्या युनिटेरियन मताशी या एरियन पंथाचे सादृश्य होते.अॅरियस म्हणे," ख्रिस्त ही पवित्रांहून पवित्र व थोरांहून थोर विभूती होय.पण तो कितीही थोर असला, तरी काही देव नव्हे." याउलट फंडामेटॅलिस्ट, पुराणमतवादी किंवा सनातनी होते.ते म्हणत,"ख्रिस्तामध्ये ईश्वर,त्याचा पुत्र व पवित्र आत्मा असे तीन अंश आहेत.पिता + पुत्र + पवित्र आत्मा अशा विविध स्वरूपांची एक मूर्ती म्हणजे ख्रिस्त." हे मतभेद मिटविण्यासाठी भरविलेल्या त्या संमेलनाला सुमारे अडीच हजार धर्मभिक्षू व तीनशे अठरा बिशप हजर होते.त्यांना कॉन्स्टंटाइनने आपापले म्हणणे आपल्यासमक्ष मांडण्यास सांगितले.ही चर्चा ग्रीक भाषेतून चाले.कॉन्स्टटाइनला ग्रीक बोलता येत नसे व समजतही नसे.पण या चर्चतला एक विशिष्ट भाग मात्र त्याला सहज समजला.तो म्हणजे,सनातन्यांपैकी एकाने वादाच्या भरात ऑरियसवर केलेला प्रहार हा मुद्दा त्याला अगदी स्पष्टपणे कळला.त्याला त्यातील तर्कशुद्धता,तद्वतच सरळपणा नीट पटला !
कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन,मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन
चर्चा दोन महिने चालली.सनातन्यांचा आवेश,त्यांची मारामारी वगैरे पाहून त्यांचे म्हणणे बरोबर असा कॉन्स्टंटाइनने निकाल दिला.
विविध तत्त्वांवर विश्वास न ठेवणाऱ्यांना त्याने हद्दपार केले व रियसची पुस्तके होळीत टाकली.रियसचे पुस्तक कोणाजवळ आढळले, तर त्याला ठार मारण्यात येईल असे फर्मान त्याने काढले.
नंतर रोमन साम्राज्याच्या धर्तीवर चर्चची संघटना करण्यासाठी त्याने मदत केली.बिशप चर्चचे गव्हर्नर झाले.बिशप निवडून येण्यासाठी रोमन निवडणुकीतल्याप्रमाणे अन्-ख्रिश्चन प्रचार होऊ लागले.गिबन म्हणतो, "बिशप पदासाठी उभे राहणाऱ्या एकाने आपण उच्च कुळातले असल्याचे प्रौढी मारली;तर दुसऱ्या एकाने भरपूर खाना देऊन आपणासच निवडण्यात यावे यासाठी खटपट केली.तिसऱ्या एकाने तर याहीपुढे जाऊन चर्चमध्ये होणारी प्राप्ती देण्याचे,तीत वाटेकरी करण्याचे निवडून देणारांस आश्वासन दिले."आतापर्यंत बिशपची जागा सेवेची होती.नम्र व अधिक सेवा करणारा बिशप बने.पण आता ती अपवित्र डामडौल,अहंकार,
जुलूम व स्वार्थ यांची जागा झाली.धर्मपदावर आता नवीनच नमुन्याचे लोक येऊ लागले.या धर्मवीरांना कोर्टात बोलावणे येई,ते राजदरबारातील खान्यास जात, सम्राटाबरोबर युद्धातही जात.
थोडक्यात सांगायचे,तर ख्रिश्चन धर्मातील नम्रता गेली.ख्रिश्चन धर्म सत्तारूढ व संपन्न झाला,प्रतिष्ठित झाला,दूषित व अधः पतित झाला.पोप हा चर्चचा पिता.पोप या शब्दाचाच अर्थ पिता.रोमन साम्राज्यातील जनतेच्या मनोबुद्धीवर पोप निरंकुश सत्ता चालवी.ख्रिस्ताच्या नव्या राज्याचे तीन भाग झाले;स्वर्गाचे राज्य,रोमचे राज्य व चर्चचे राज्य.
नाझरेथ येथील तिरस्कृत परिव्राजकाच्या येशूच्या - साध्या,
सुंदर व मधुर धर्माच्या लोकशाही पुरस्कर्त्या व समतेच्या शिकवणीपासून नवीन प्रतिष्ठित ख्रिश्चन धर्म कितीतरी लांब गेला !
कॉस्टंटाइनने ख्रिश्चन धर्म स्वीकारला व तो राष्ट्राचा धर्म केला,तेव्हा रोमन साम्राज्यात जवळजवळ साठ लक्ष ख्रिश्चन होते.पण ख्रिश्चन धर्म राष्ट्रधर्म झाल्यावर त्याच्या अनुयायांची संख्या तलवारीच्या योगाने वाढू लागली. जगाचा बराचसा भाग ख्रिश्चन झाला रक्ताचा बाप्तिस्मा दिला गेला,पश्चिमेचा प्रभावी धर्म म्हणून ख्रिश्चन धर्म सर्वत्र ओळखला जाऊ लागला.पण तो प्रभावी झाला तरी ख्रिस्ताचा मूळचा सुंदर शिवधर्म मात्र राहिला नाही.
मृत्यूशय्येवर असताना कॉन्स्टंस्टाइनला बाप्तिस्मा दिला गेला.चर्चच्या प्रेमळ बाहूत असताना मरण आले तर केलेल्या सर्व पापापासून मुक्ती मिळेल,असे त्याला वाटले.तो मरताना चौसष्ट वर्षांचा होता.त्याने चोवीस वर्षे राज्य केले. इ.स. ३३७मध्ये तो मरण पावला.
सर्व रोमन सम्राटांपेक्षा कॉन्स्टंटाइन अधिक अवडंबर माजविणारा होता.त्याचा थाटमाट अपूर्व असे.त्याची कारकीर्द रानवट वैभवाने भरलेली आहे.पण ती मृत्यूच्या वादळाची भव्यता होती.रोमची शक्ती क्षय पावू लागली होती.कृष्ण पक्ष सुरू झाला होता.ओहोटी लागली होती. उत्तमोत्तम तरुण मारले गेले होते.प्लेगाच्या साथीमुळेही लोकसंख्या खूप घटली.युद्धामुळेच प्लेग सर्वत्र साम्राज्यभर पसरला.रोमनांनी सर्वत्र पेरलेल्या रक्तपाताच्या बीजांची फळे भोगणे त्यांना प्राप्त होते. रोमन सत्तेच्या ऱ्हासाची मीमांसा करणारे लठ्ठ लठ्ठ ग्रंथ लिहिण्यात आले आहेत.
गिबनपासून आतापर्यंतच्या साऱ्या इतिहासकारांनी रोमन सत्तेचा ऱ्हास नक्की कोणत्या तारखेस सुरू झाला,हे ठरविण्याची खूप खटपट केली आहे.पण हा प्रश्न अगदी सोपा आहे.त्याचे उत्तर दोनचार वाक्यांत सांगता येण्यासारखे आहे.
ज्या क्षणी रोम जग जिंकण्यास निघाले,त्याच क्षणी त्याला कीड लागली.त्याच क्षणापासून त्याचा ऱ्हास सुरू झाला.तलवारीवर विसंबल्यामुळे हे तलवारीनेच मेले- तलवारीलाच बळी पडले ! कसे मारावे हे रोमने रानटी लोकांस शिकविले व मग त्याच रानटी लोकांनी उलटून रोमला ठार केले.
कॉन्स्टंटाइनच्या मरणानंतर बरोबर एकशे एकोणचाळीस वर्षांनी म्हणजे इ.स. ४७६ मध्ये रोमचे लष्करी यंत्र हूण,व्हेंडॉल व गॉथ यांच्या हल्ल्यांसमोर कोलमडून पडले ! असीरियन साम्राज्याप्रमाणे रोमन साम्राज्यही स्मृतिशेष झाले ! जगावर सत्ता,गाजवू पाहणारी सारी राष्ट्रे अखेर ज्या गतीला गेली,तीच गती रोमन साम्राज्याचीही झाली.आपल्या महत्त्वाकांक्षेलाच ते बळी पडले.महत्त्वाकांक्षेमुळेच त्याला मरण आले.