स्पॉटेनियस जनरेशन खरं की खोटं?' या द्वंद्वात असतानाच बायॉलॉजीच्या क्षेत्रात आणखी एक प्रश्न उपस्थित झाला.तो म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या,न दिसणाऱ्या,माहीत असणाऱ्या आणि माहीत नसणाऱ्या अशा सगळ्याच जिवांचं वर्गीकरण कसं करायचं? सगळ्या सजीवांना एकाच विकासाच्या शिडीवर चढवायचं की त्यांचे वेगवेगळे गट करायचे?आपल्या सभोवती इतक्या प्रकारचे असंख्य सजीव आहेत. त्यांच्यात कमीअधिक प्रमाणात साधर्म्य आणि फरक आहेत,त्यामुळे यांच्यात वर्गीकरण कसं करावं हा प्रश्न आता अनेकांना सतावायला लागला.
वर्गीकरण करायला सुरुवात केल्यानंतर तर पुढे आणखीच वेगळे प्रश्न निर्माण झाले.सजीवांची प्रत्येक जात कोणत्या निकषांवर वेगळी मानायची?आपल्याला रस्त्यात दिसणारी सगळी कुत्री एकाच जातीची आहेत का? वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देणारी आंब्याची झाडं एकाच जातीची की वेगवेगळ्या ? मग कोणत्याही प्राण्याची स्वतंत्र जात किंवा स्पिशीज ही गोष्ट ठरवणार कशी? स्पिशीज या संकल्पनेची व्याख्या तरी करणार कशी ? स्पिशीज ही साधारणपणे कोणत्याही सजीवाची एकच जात असते.या जातीतले नर आणि मादी समागम करून त्याच जातीच्या सजीवांना जन्म देऊ शकतात आणि ही नवी पिढीही पुढे प्रजनन करून पुन्हा त्याच जातीच्या सजीवांना जन्म देऊ शकते,ज्या जातींच्या इंडिव्हिज्युअल्समध्ये (सदस्यांमध्ये) असे संबंध शक्य असतात त्याच जातींतले सगळे सजीव बाहेरून दिसायला जरी वेगवेगळे दिसले तरी ते एकाच जातीचे,स्पिशीजचे आहेत असं समजावं.यात मग आशियांतली माणसं असो की आफ्रिकेतली माणसं असोत,ती समागम करून पुढच्या प्रजननक्षम जिवांना जन्म देऊ शकतात,त्यामुळे सगळी माणसं ही दिसायला जरी भिन्न असली तरी ती एकाच जातीची आहेत.
पण गंमत म्हणजे आशियातले हत्ती आणि आफ्रिकेतले हत्ती दिसायला बऱ्यापैकी सारखे असले तरी ते प्रजनन करू शकत नाहीत,त्यामुळे ते दोन वेगवेगळ्या जातींत मोडतात ! गंमत म्हणजे कोणताही सजीव आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीवाशी समागम करून आपल्यासारखीच प्रजा निर्माण करतो आणि नंतर ती प्रजाही पुन्हा तशाच अनेक सजीवांना जन्म देते ही संकल्पना किती जुनी असावी? ही संकल्पना चक्क निओलिथिक काळापर्यंत मागे जाते !
खरं तर स्पिशीज ही संकल्पना इतकी मोठी आणि महत्त्वाची आहे की खुद्द जीवशास्त्राची अनेक अंगांनी प्रगती होत राहिली तरी गेल्या कित्येक शतकांपासून स्पिशीज या संकल्पनेची व्याख्या करण्यात वैज्ञानिकांचं अजूनही एकमत होताना दिसत नाही! सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत केल्या गेलेल्या स्पिशीजच्या किमान २६ महत्त्वपूर्ण आणि मान्यता पावलेल्या व्याख्या आहेत !
मुळात जगात अस्तित्वात असलेल्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण करताना उद्भवलेला हा स्पिशीजचा प्रश्न आहे. वर्गीकरणाचा अभ्यास करणाऱ्या बायॉलॉजीच्या शाखेला 'टॅक्सॉनॉमी' म्हणतात.आणि त्यातही प्रचंड खोलात जाऊन स्पिशीज कशाला म्हणावं किंवा दोन खूपच सारखे असणारे सजीव एकाच स्पिशीजमध्ये येतात की वेगवेगळ्या ? या प्रश्नाचा मागोवा घेणारी समस्या इतकी मोठी झाली,की याच प्रश्नाची चक्क विज्ञानाची एक नवीच शाखा निर्माण झाली.तिला 'मायक्रोटॅक्सॉनॉमी' म्हणतात !
या मधला सगळ्यात अवघड प्रश्न हा आहे,की सजीवाची कोणती जात कोणत्या स्पिशीजमध्ये मोडते हे कसं ठरवणार? कारण वरवर सारखे दिसणारे प्राणी किंवा वनस्पती आपापसात लैंगिक संबंध प्रस्थापित करून प्रजनन करू शकतातच असं नाही.शिवाय,
बऱ्यापैकी वेगळ्या दिसणाऱ्या वनस्पती आणि प्राणी आश्चर्यकारक रीतीनं एकाच स्पिशीजचे घटक असतात आणि ते चक्क प्रजननही करू शकतात ! त्यातून सूक्ष्मजीवांमध्ये तर आणखीच घोळ होते.ते सगळेच आकारानं खूप लहान. त्यातून मायक्रोस्कोपखाली पाहिलं तर त्यांचा फक्त बाहेरून आकार कळणार.मग दंडुक्यांच्या आकाराचे,गोलाकार,मण्यांच्या माळेच्या आकाराचे,स्वल्पविरामच्या
(,)आकाराचे असे कित्येक सूक्ष्मजीव होते,आहेत.मग यांच्यातही काही जाती,उपजाती आहेत का ?
यातही मजा म्हणजे गाढव आणि घोडा हे वेगवेगळ्या प्रजाती असून ते कधीकधी ते चक्क समागम करतात आणि खेचराला जन्म देतात! प्राण्यांच्या आणि काही वेळा वनस्पतींच्याही अशा विचित्र वागण्यामुळे स्पिशीजचा हा प्रश्न खरं तर न उकलणारा गुंताच होत चालला होता.
खरं तर असं आहे,की स्पिशीजमध्येसुद्धा एक सलगता आहे.जसं लाल आणि पिवळा या दोन रंगांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये मरून,
वाइन कलर,भगवा, केशरी,आंबा रंग अशा अनेक छटा येऊ शकतात.त्यातल्या काही लाल रंगाकडे जास्त झुकणाऱ्या आणि पिवळ्या रंगाकडे कमी झुकणाऱ्या तर काही पिवळ्या रंगाकडे जास्त झुकणाऱ्या आणि लाल रंगाकडे कमी झुकणाऱ्या असतात.प्राण्यांच्या बाबतीतही दोन भिन्न वाटणाऱ्या स्पिशीजमध्येही काही थोड्या सारख्या, काही थोड्या वेगळ्या अशा अनेक प्रजाती असू शकतात.काही वैज्ञानिकांच्या मते यांच्यामध्येही वेगवेगळ्या प्रमाणात प्रजनन होत असतं आणि त्या सजीवांचं संपूर्ण पॉप्युलेशनच या सलगतेच्या धाग्यावर कोणत्याही दिशेनं प्रवास करू शकतं ।
आणि आपल्याला आता दिसणारे सजीव हे कायम असेच आहेत असंच माणूस त्यांचा अभ्यास करताना गृहीत घरतो,ही त्यात माणसानं केलेली चूक आहे. उत्क्रांती होताना एका मूळ सजीवापासून पुढे जसे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण होताना दिसतात,हे होताना त्यांच्यात होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात,पण तेवढ्यात नव्या प्रकारच्या जिवांनी आपल्या मूळ स्पिशीजपासून फारकत घेतलेली असते! त्यामुळेच त्यांना वेगवेगळं ओळखणं ही अनेकदा खूपच अवघड गोष्ट होऊन बसते.
सतराव्या शतकापर्यंत स्पिशीज हा शब्द फारच ढोबळमानानं वापरला जात होता,कोणत्याही प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या वरवर सारख्या दिसणाऱ्या गटासाठी तो वापरला जायचा. १६८६ मध्ये जॉन रे यानं 'स्पिशीज' हा शब्द फक्त कोणत्याही सजीवाच्या एक आणि एकाच गटासाठी वापरला.आणि पाहता पाहता या शब्दाचं संकल्पनेत रूपांतर झालं.
जे सजीव आपापसातल्या समागमातून पुढची प्रजननक्षम प्रजा निर्माण करू शकतात,पण त्यांच्यातल्या त्यांच्यात थोडाफार फरक असू शकतो अशा सजीवांची एकच जात स्पिशीज म्हटली पाहिजे, अशी व्याख्या जॉन रे यानं मांडली.म्हणजे पिवळं फूल देणारी जास्वंद आणि लाल फूल देणारी जास्वंद ही दोन वेगळी झाडं दिसली तरी ते आपापसात प्रजनन करू शकतात आणि त्यांची स्पिशीज ही एकच आहे.
यानंतर कार्ल लिनियस यानं प्रत्येक जिवाला स्वतंत्र ओळख मिळावी या दृष्टीनं जीनस आणि स्पिशीज या दोघांचं मिळून त्या सजीवांना नाव देण्याची पद्धत निर्माण केली.पण या गोष्टीनं काही स्पिशीजची व्याख्या कशी करावी हा प्रश्न काही सुटला नाही हे मात्र खरं.
सजीवाच्या एका जातीतून दुसरी जात विकसित होत जाते ही स्पिशीज निर्माण होण्याची प्रक्रिया डार्विनच्या काळापर्यंत लक्षात आलेली नव्हती.त्यामुळे सगळ्या स्पिशीज या कधीही न बदलणाऱ्या स्वयंभू असतात असंच मानलं गेलं होतं.
त्यातून या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना माणसाला अनेक इतरही गोष्टी कळत गेल्या.
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातल्या अॅरिस्टॉटलपासून एकविसाव्या शतकातल्या अनेकांनी या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.अॅरिस्टॉटलनं सारखी कार्य करणाऱ्या सजीवांना एका स्पिशीजमध्ये टाकलं.त्यानं यात सारखे गुणधर्म असलेल्या सजीवांना लक्षात घेतलं नव्हतं.
थोडक्यात,त्यानं सजीवांच्या सारख्या गुणधर्मांपेक्षा खाण्यायोग्य वनस्पती,पाळीव प्राणी अशा प्रकारे सारख्या प्रकारची उपयुक्तता किंवा कार्यं यांना विचारात घेतलं होतं.
१७३५ मध्ये लिनियसनं स्पिशीज स्वयंभू म्हणजे कधीही न बदलणाऱ्या असतात असं मानलं,पण त्यानंतर काहीच काळात त्याला त्यांच्यात हायब्रिडायझेशन शक्य आहे हे लक्षात आलं!आणि हायब्रिडायझेशनमधूनच नव्या स्पिशीजचा उगम होतो हेही त्याला कळलं.हीच गोष्ट पुढे चार्ल्स डार्विननं आपल्या 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज'मध्ये मांडली.खूप काळ लोटल्यावर नव्या स्पिशीज कशा निर्माण होतात हे त्यानं सांगितलं होतं.पण मूळ स्पिशीजपासून दोन वेगळ्या स्पिशीज कशा निर्माण होतात हे डार्विननं सांगितलं नव्हतं.मूळ स्पिशीजपासून वेगळी स्पिशीज निर्माण होताना मधली कोणतीतरी ओळखू न येणारी स्थिती असेलच की.
पुढे १९२० आणि ३०च्या दशकात मेंडेलियन इनहेरिटन्स थिअरी आणि डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी एकत्र करून मॉडर्न सिंथेसिस नावाच्या नव्याच थिअरीचा पाया घातला.
या थिअरीला कधीकधी निओ-डार्विनिझमही म्हणतात.त्यातून स्पिशीजच्या संकल्पनेला पुन्हा चालना मिळाली. या प्रक्रियेत एडवर्ड बॅग्नाल पोल्टन (Edward Bagnall Poulton) (१८५६ ते १९४३) यानं स्पिशीजच्या संकल्पनेत आणखी अनेक महत्त्वाचे मुद्दे घातले.तो डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन थिअरीचा जोरदार पुरस्कार करायचा.डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशीज' हे पुस्तक त्याला सगळ्यात महान पुस्तक वाटायचं.एकाच भौगोलिक ठिकाणी निर्माण झालेल्या नवीन स्पिशीजना त्यानं 'सिंपॅट्रिक' असं नाव दिलं
सजीव, अच्युत गोडबोले, अमृत देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन
पुढे थिओडोशियस डोब्झान्स्की आणि अर्स्ट मेयर यांनी या संकल्पनेचा विस्तार केला. मेयर यानं तर आपल्या पुस्तकात जेव्हा एका स्पिशीजपासून दुसरी स्पिशीज वेगळी होते तेव्हा नव्या स्पिशीजमध्ये जनुकीय पातळीवर होणाऱ्या बदलांचं वर्णन केलं होतं.याला त्यानं 'रिप्रॉडक्टिव्ह आयसोलेशन' म्हटलं होतं.
यानंतर तर स्पिशीजच्या संकल्पनेला अनेकांनी हात घातला,पण याचा परिणाम स्पिशीज म्हणजे नेमकं काय,हा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्या प्रश्नाचे वेगवेगळे पैलूच समोर येत राहिले.त्यापैकी काहींनी तर म्हटलं की स्पिशीजचा प्रश्न हा इतका गुंतागुंतीचा प्रश्न आहे,की तो जितका सोडवण्याचा प्रयत्न करू तितका त्यातला गुंता वाढत जाईल ! आतापर्यंत स्पिशीजची व्याख्या करताना अनेकांनी अनेक विधानं केलेली आहेत.त्यातली काही अशी :
बायॉलॉजीमध्ये स्पिशीज या संकल्पनेइतकी अवघड संकल्पना कोणतीच नाही.आणि या संकल्पना विशद करताना वैज्ञानिकांत कधी नव्हे इतकी वेगवेगळी मतं आहेत. - निकोल्सन १८७२. ("No term is more difficult to define than 'species,' and on no point are zoologists more divided than as to what should be understood by this word." - Nicholson 1872).
एखादी स्पिशीज वेगळी ओळखू आल्यानंतर,स्पिशीज या संकल्पनेची वैश्विक व्याख्या करणं सोपं जाईल,पण आधी स्पिशीज वेगळी ओळखता येणं गरजेचंच आहे.थोडक्यात,हे दोन एकमेकांवर अवलंबून असलेले प्रश्न आहेत ! - डोब्झान्स्की (१९३७)
स्पिशीजच्या व्याख्येच्या यशातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे,की वस्तुस्थिती काय आहे यापेक्षा आपण त्यातले हायपोथिसिस किती व्यवस्थित मांडू शकतो यावर त्या व्याख्येचं यश अवलंबून आहे. - ब्लाँड (१९७७)
स्पिशीजची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणं हे बायॉलॉजिस्ट्सचं फार जुन्या काळापासून चालत आलेलं अपयश आहे. हे २००१ मध्ये केलं गेलेलं विधान आहे.
या सगळ्यावरून आपल्याला एकच गोष्ट कळते.ती म्हणजे स्पिशीज ही सेक्शुअल रिप्रॉडक्शननं सतत बदलत जाणारी प्रवाही गोष्ट आहे.शेवटी स्पिशीज या गोष्टीची व्याख्या करणं म्हणजे नदीच्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या पाण्याच्या एका रेणूचा पाठलाग करण्यासारखंच हे आहे!