पळसाचं झाड माझं लक्ष वेधतं ते चैत्रात.सारा वृक्ष लाल फुलांनी बहरून जातो.झाड पर्णहीन होतं. साऱ्या झाडावर फुलंच फुलं दिसतात.वाटतं रंगाचं सरोवर आपण पाहात आहोत.रामायणात प्रभू रामचंद्र विंध्य पर्वताच्या पायथ्याजवळ आल्यावर सीतेला म्हणतात-
'आदीप्तानिव वैदेहि सर्वतः पुष्पितान्नगान् ।
स्वैः पुष्पैः किंशुकान्पश्य मालिनः शिशिरात्यये ।।"
सीते ! बघ,वसंत ऋतूत पळस जणू फुलांच्या माळा ल्याला आहे. फुललेला पळस पाहून वाटतं की, जणू तो आगीनं जळत आहे.
पळसाच्या लाकडात सुप्त अग्नी असतो.प्राचीन काळी यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करण्याकरिता पळसाच्या लाकडाचा उपयोग केला जाई.जणू वसंतात हा सुप्त अग्नी फुलांच्या रूपानं बाहेर पडतो.साहेबानं यालाच 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' म्हटलं.तेवढं आपल्या लक्षात राहिलं. साहेबांच्या देशात पळसाचं झाड नाहीच.त्यातील मूळ कल्पना संस्कृतातूनच घेतली आहे.
एरवी पळसाच्या झाडाइतकं अनाकर्षक जंगलात काहीच नसावं.आंबा व मोहाचा आकार डेरेदार असतो.तसा प्रत्येक वृक्ष बीजातूनच आकार घेऊन जन्माला येतो.पण पळसाचं झाड मात्र आकारहीन असतं.वनातील जमीन निकस व्हायला लागली की पळसाचं प्रमाण वाढू लागतं.गुरंढोरं,शेळ्यामेंढ्या पळसाच्या पानाला तोंड लावीत नाहीत.त्या निकृष्ट जमिनीत ती वाढू लागतात.पळस निकृष्ट जमिनीचं प्रतीक आहे.कुवार व चिरपल्लवी जंगलात तुम्हाला पळसाचं झाड दिसणार नाही.पळसाला जसा आकार नाही तसाच त्याच्या सुंदर फुलांना गंधही नाही.फुलांचा बहर संपू लागताच त्याला कोवळी पालवी फुटते.ती पाने मुंगसाच्या कानासारखी लालसर दिसतात.
पण फुललेला पळस मला आवडतो तो वेगळ्याच कारणाकरिता.पळस फुलला की गुलाबी रंगाच्या पळसमैना-रोझी पॅस्टर-यांचे थवेच्या थवे युरोप, आशिया,मध्यपूर्व प्रदेश,
तुर्कस्थान ह्या भागातून भारतातील पळसाच्या जंगलात येतात.आभाळात त्यांचे थवे पाहिले की वाटतं ढग आले आहेत.प्रचंड किलकिलाट करीत ते फुललेल्या पळसावर उतरू लागतात.पळसाच्या फुलांत भरपूर मध असतो.तो ते प्राशन करीत असतात.पळस-मैना पळसात परपरागन आणि परफलन घडविण्याला फार साहाय्य करतात.पक्षिनिरीक्षणाचे पहिले धडे फुललेला पळस देतो.पोपट,पाणपोपट,हळदू, कोतवाल,भृंगराज,साळुंकी,मैना,बुलबुल आणि सूर्यपक्षी असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात.सर्वांनाच मध हवा असतोच असं नाही. काही त्या फुलांतील कीटकांसाठी येतात.तो फुलांनी बहरलेला वृक्ष मधमाश्यांच्या गुंजारवानं निनादित होतो.तो अनाकर्षक वृक्ष फुलांवरील पक्षी व मधमाश्यांच्या आवाजानं जणू गाऊ गुणगुणू लागतो.ते झाड गाणारं झाड होतं.
आपल्या आयुष्यात कुणी पळसाचं झाड लावलं अन् त्यानं त्या झाडाची फुलं पाहिली असं सहसा घडत नाही.त्याचं कारण पळसाचं झाड फार हळूहळू वाढतं.वर्षानुवर्षं ते वनवणव्यात जगत-मरत असतं.जमिनीत मुळाचा कंद होत असतो.हा कंदच पुढं आनंदकंद होऊन फुलांनी बहरून आनंद देतो. कुणी तो आवडीनं घराच्या बागेत लावत नाही.पण परवा सर एडविन ऑर्नल्डचं 'दि लाइट ऑफ एशिया' हे बुद्धाचं चरित्र वाचताना मध्येच थांबलो. सिद्धार्थाची आई मायादेवी आपल्या राजवाड्याच्या उद्यानातील पळसाच्या वृक्षाखाली नित्य बसत असल्याचा उल्लेख आहे.मला पळसाविषयीची सप्तशतीतील सुंदर गाथा आठवली. " पोपटाच्या चोचीप्रमाणं लालभडक अशा पळस-पुष्पांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. जणू बुद्धाच्या चरणाशी वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षुसंघाप्रमाणं हे दृश्य दिसत आहे."
पळसाची लाल नारिंगी फुलं पोपटाच्या चोचीसारखी दिसतात.म्हणून पोपटाला किंशुक हे वैकल्पिक नाव आहे.
नवेगाव तळ्याकाठच्या जंगलात पिवळ्या फुलांचा पळस पाहिला,तसा पांढऱ्या फुलांचाही.हा पिवळा व पांढरा पळस फुलला की जपानी लोक चेरीची फुलं पाहायला जावेत तसा मी मुद्दाम तो फुलोरा पाहायला जात असे.आपल्याकडे अशी फुलं पाहायला जायची आवड कमी.
आपल्या संस्कृत व प्राकृत वाङ्मयात वसंतोत्सवाची विपुल वर्णनं आहेत.त्यावरून आपल्या प्राचीन जीवनातल्या निसर्गप्रेमाची साक्ष आपणाला मिळते.
पण ही निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे.ह्या उलट जपानमध्ये घडलं. त्यांनी निसर्गाचं हे वातावरण जीवनात आणलं आहे.नाही तर चेरीत व पळसात काय फरक आहे ? चेरीच्या फुलोऱ्याचे पंधरा-वीस दिवस सोडले तर इतर वेळी या झाडाचं रूप पळसासारखंच अनाकर्षक असतं.चेरीच्या मोहराला जपान्यांनी जागतिक माहात्म्य मिळवून दिलं.चेरीवर शेकडो लक्षावधी हायकू लिहिण्यात आल्या.चेरीचा मोहर पाहायला जगातील निसर्गप्रेमी जपानला जातात.
तुम्ही पळसवनात गेलात की पळसाखाली केसरी रंगाच्या फुलांचा सडा पडलेला असतो. कांचनमृगाला पळसाची फुलं खायला फार आवडतात.गाथा सप्तशतीत एक बहारीचं वर्णन आहे.
" रानात जागोजागी पेटलेल्या वणव्याच्या लाल ज्वालांच्या ओळींनी वनप्रदेशात प्रकाशित झालेली झाडं पाहून अज्ञ कांचनमृगाला ती फुलांनी बहरलेली पळसाची झाडंच वाटली.म्हणून बिचारा कांचनमृग अरण्यातून बाहेर पडलाच नाही." कोवळ्या पानाबरोबर लवकरच पळसाला चापट तांबड्या रंगाच्या शेंगा धरू लागतात.त्यांना पळसपापडी म्हणतात.वाटतं की झाड पुन्हा वेगळ्याच पानांनी बहरलं आहे.पळसपापडी इतकी हलकी असते की वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीबरोबर रुणुझुणु वाजू लागते.ती वाऱ्यानं सहज दूरवर विखुरली जाते.
'पळसाला पानं तीनच' ही म्हण मी अनेकदा वाचली आहे.पण तिचा अर्थ जाणवला तो कै. धनुर्धारीलिखित 'वाईकर भटजी' ही कादंबरी वाचताना.१८९७ साली लिहिलेली ही कादंबरी वाचताना गोल्डस्मिथच्या 'दि व्हिकर ऑफ वेकफिल्ड'ची आठवण होते.
खूप वर्षांपूर्वी मी पळसावर एक कथा लिहिली होती.
"त्या माळरानातून तो बौद्ध भिक्षु रोज भिक्षेसाठी गावात जाई.तो एक महान शिल्पकार होता. माळरानातून जात असता समोरच्या डोंगरमाथ्यावर पळसाचं वन होतं.
पळसाच्या तीन बहिणी हातात हात घालून वाऱ्याबरोबर नृत्य करू लागल्या की तो कलाकार त्यांच्याकडे कौतुकानं पाहात पुढं निघून गेला की त्या खुदकन् हसत.तीन बहिणींचे ते मधुर स्मित त्याच्या मनातच राही.
गावात एका वेश्येच्या दारात उभा राहून त्यानं भिक्षा मागितली.मोत्याचा शुभ्र हार तिनं त्याला स्वागतार्थ प्रदान केला.तो तिला म्हणाला,'नको.मला पळसाच्या द्रोणात पाणी हवंय.बुद्धदेवांच्या चरणांवर वाहण्यासाठी.'
फार वर्षांपूर्वी मी नांदेड जिल्ह्यातील पैनगंगेकाठच्या सहस्रकुंडाला होतो.नदीच्या काठचा प्रदेश सपाट व विस्तृत.या घनदाट झाडीत वसंत आला की त्यातील पळसवनाला फुलांचा बहार येई.
जंगलांचे देणे,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर
जंगलात ठिकठिकाणी मथुरा लमाणांचे तांडे होते. त्यांचा मुख्य धंदा गाई पाळण्याचा.मथुरा लमाणांच्या स्त्रिया दिसायला फार सुंदर असतात.राधेच्या कुळातील म्हणून की काय !
ऐन दुपार झालेली.वृक्षाच्या छाया देखील तळाशी लपलेल्या.
आमची बैलगाडी अशाच एखाद्या तांड्याजवळ आलेली.
ओढ्यातील खडकावर बसून न्हात असलेल्या स्त्रिया दुरून दिसायच्या.गाडीच्या धावांच्या खडखडाटाचा आवाज कानी पडताच त्या तरुणी एखाद्या सुसरीप्रमाणं चपळतेनं पाण्यात शिरायच्या.सुंदर चेहरा,डोक्यावर केसांचा उंच खोपा.
लज्जावनत सुंदर चेहऱ्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं.म्हणून गाथा सप्तशतीकारानं तरुणांना सावधगिरीची सूचना दिलीय. "पळसाच्या फांद्यांवर पिवळसर तांबडी फुलं डवरली आहेत.मुला,या बहरात वसंताचे सामर्थ्य दिसत असल्यामुळे लोकांना त्याची भीती वाटते."
होळी जवळ आलेली.पळसाच्या लाखेपासून तयार केलेल्या रंगीत रोंगणाने त्या तरुणी आपल्या लांबसडक बोटांची नखं रंगवायच्या.पळसाच्या फुलापासून पिवळाधमक रंग तयार करून वनाधिकाऱ्याची त्या वाट पाहात असायच्या. वनाधिकारी म्हणजे त्या भागातील सर्वात मोठा अंमलदार.मी अनेकदा त्या रंगात न्हालोय.सुटका व्हायची ती भरपूर बक्षीस दिल्यावरच.आता ह्या गोष्टीला अनेक वर्षं झालीत.पण असा वसंत आला की वरील साऱ्या प्रसंगाची आठवण होते.त्या वेळी मी बावरून जाई.आता त्याचे विलासविभ्रम आठवतात.त्यांचं जाणीवपूर्वक स्पर्शसंक्रमण आठवतं.
गुलालानं भरलेले त्यांचे गोरे चेहरे आठवतात.'पाठ असलेल्या एखाद्या कवितेचा गर्भित अर्थ लागावा पण खूप विलंबानं तसा...'