एक जलअभियंता म्हणून मला कायमच हा प्रश्न सतावतो की,जसे सातारा जिल्ह्यामध्ये कोयनेत शिवसागर जलाशय बांधून आपल्या अभियंत्यांनी पोफळीमध्ये जवळपास २००० मेगावॅट एवढ्या प्रचंड क्षमतेचे जलविद्युत केंद्र उभारले.मग महाराष्ट्रात असलेल्या सह्याद्रीच्या इतर डोंगररांगेत पार अगदी रायगड पासून ते खाली सिंधुदुर्गपर्यंत असेच प्रचंड क्षमता असलेले आणखी एक धरण बांधणे शक्य नव्हते का?
या शक्यतेचा विचार तेव्हाच्या कुशाग्र अभियंत्यांनी केला नसेल का?
कोणीही या प्लॅनचा विचार केला नसेल का?
का हे अगदीच अशक्यप्राय होते?
तर याचे उत्तर 'हो' असेच आहे.मित्रांनो,कोयनेच्या धरणाच्या निर्मितीच्या भरपूर वर्षे आधी वर पडलेल्या शक्यतेचा विचार केला गेला होता.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी, शाहूवाडी,चंदगड,
गगनबावडा,भुदरगड या अगदी सह्याद्रीच्या खांद्यांवर असलेल्या तालुक्यामध्ये कोयनेसारखा भव्य दिव्य प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष कमी जास्त प्रमाणात आहेतच.
Technically बोलायचं झालं तर अशा भव्य प्रकल्पासाठी आवश्यक असलेला दगड,त्याची रचना,जागा,पाण्याचा कॅचमेंट एरिया,पाऊस आणी सर्वात महत्वाचं 'water हेड' अगदी कोयनेपेक्षा पण जास्त water head आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. विशेषतःत्यामध्ये राधानगरीचा विचार केला तर ही जागा कोयनेसारख्या भव्य प्रकल्प साकारण्यासाठी योग्य उपलब्ध पर्याय ठरली असती.
कोयनेच्या बऱ्याच आधी राधानगरीत तसाच भव्य वीजप्रकल्प तयार झाला असता.पण प्रश्न फक्त वीजप्रकल्प निर्मितीचा नव्हता तर प्रश्न रयतेचा होता.का ते पाहू चला.
त्यावेळी संस्थान काळात राधानगरीमध्ये बॉक्साइटच्या खाणी मोठ्या प्रमाणात होत्या म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी राधानगरी भागात असणाऱ्या बॉक्साइटच्या साठ्यांची पाहणी करण्यासाठी सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची नियुक्ती केली होती.सर विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी तंञज्ञानाच्या साहाय्याने उद्योग क्षेत्रात कायापालट घडवून आणला होता.यावर सखोल अभ्यास करून विश्वेश्वरय्या सरांनी पूर्ण अहवाल महाराजांना सादर केला.अहवालामध्ये असलेल्या माहिती व सूचनेनुसार बॉक्साइटपासून अल्युमिनियम तयार करण्याचा कारखाना काढता येणे सहज शक्य होते.मग राजाराम महाराजांनी राधानगरी येथे अल्युमिनियमचा मोठा कारखाना काढण्याची योजना आखली व त्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांच्याकडे ते काम सोपवले.
शेठ वालचंद यांनी बॉक्साइटपासून अल्युमिनियम निर्मितीच्या कारखान्यासाठी विजेची मोठ्या प्रमाणात गरज भासेल व ही वीज निर्माण करण्यासाठी राधानगरी धरणाचे पाणी फोंडा घाटाखालीपर्यंत नेऊन त्या पाण्याच्या वॉटर हेडचा (पाण्याचा दाब) वापर करून वीजनिर्मिती करून तयार होणाऱ्या विजेचा उपयोग कारखाण्यासाठी करता येईल असे महाराजांना सुचविले. (जसे कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या वॉटर हेड चा वापर करून घाटाच्या पायथ्याला पोफळीमध्ये वीजनिर्मिती केली आहे अगदी तसे) त्यासाठी उपलब्ध पाणी कोल्हापूराकडे न सोडता ते खाली फोंडा घाटाच्या पायथ्याशी वीजगृह बांधून सोडायचे.पण त्याचवेळी राधानगरी धरणाचे पाणी हे कोल्हापूर व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असल्याने धरणाचे पाणी वीज निर्मितीसाठी फोंडा घाटाच्या पायथ्याशी वीजगृह तयार करून सोडण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला.त्याकाळी,आज अस्तित्वात असलेल्या कोयनेपेक्षाही मोठा भव्य वीजनिर्मिती प्रकल्प करणे शक्य असताना व अल्युमिनिअम चा कारखाना पण शक्य असताना फक्त आपला विचार न करता महाराजांनी आपल्या प्रजेचा विचार केला,रयतेच्या कल्याणाचा विचार केला.
राधानगरीचे धरण बांधण्यासाठी शाहू महाराजांनी आपला संपूर्ण खजिना रिता केला.मनात आणलं असतं तर राजाराम महाराजांनी अल्युमिनिअमचा कारखाना उभारून त्यासाठी आवश्यक असणारी वीज ही राधानगरी धरणाचे पाणी फोंडा घाटाच्या पायथ्याशी वळवून वीजनिर्मिती करून मिळवली देखील असती व आपला सपंलेला खजिना परत मिळवला असता.पण महाराजांनी तसं केलं नाही. त्यांनी उद्योगापेक्षा शेतीला प्राधान्य दिलं.आपल्या रयतेच्या शेतीसाठी प्राधान्य दिलं.
राजे तेव्हाही म्हणाले होते,"जर आपल्या खजिन्यामुळे शेतकरी सुखी होणार नसेल तर तो खजिना काय कामाचा?" त्यांनंतर राधानगरी धरण पूर्ण झालं आणी सगळा पश्चिम महाराष्ट्र हिरवागार झाला. म्हणूनच खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असलेल्या राजर्षी शाहू महाराज व राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टीला माझा कोटी कोटी प्रणाम…
सलाम महाराजांच्या दुर दृष्टीला,खऱ्या अर्थाने रयतेचे राजे - अभिजीत सुनिल वाघमोडे,जलविद्युत अभियंता…
एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता.
त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं,पण ते लवकरच संपलं.गेले दोन दिवस तो पाण्याच्या एक थेंबासाठीही तळमळत होता.त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासांत पाणी मिळालं नाही,तर त्याचा मृत्यू निश्चित आहे.पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता.त्याने हार मानली नव्हती.
त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे पाणी मिळेलच.आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली.
सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
पूर्वीही त्याला मृगजळामुळे फसवणूक झाली होती.पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.कारण हीच त्याची शेवटची आशा होती.तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला. जसजसा तो जवळ गेला,त्याची आशा वाढू लागली. आणि या वेळेस नशीब त्याच्या बाजूने होतं.ती खरंच एक झोपडी होती.पण काय! झोपडी ओस पडलेली होती. असे वाटत होते की खूप वर्षांपासून कोणीही इथे आलेले नव्हते. तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला.आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.तिथे एक हँडपंप होता! पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं.तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला.पण हँडपंप कोरडाच निघाला. तो निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे.तो थकून खाली कोसळला.
तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली.कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोहोचला आणि ती उघडून प्यायला लागला,तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला.
त्यावर लिहिलं होतं — "हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका."
ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की तो पाणी प्यावं की पंपात ओतावं.
त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले — जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? पण जर पंप चालू झाला तर? जर गोष्ट खरी ठरली तर?
थोडा विचार करून त्याने शेवटी नक्की केलं. त्याने बाटली उघडली आणि थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपात ओतलं.
तो हँडपंप चालवू लागला — एक, दोन,तीन वेळा — आणि अचानक पंपातून थंडगार,निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं.
त्याने भरपूर पाणी प्यायलं.त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली.त्याचं डोकं काम करायला लागलं.त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशीच छताला बांधून ठेवली.
तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली.त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता,ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दर्शवलेला होता.
त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली.नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला.थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला. त्याने पाण्याच्या बाटलीवरच्या कागदावर लिहिलं —
"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."
ही गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल आहे.ती आपल्याला शिकवते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडू नये.
या कथेमधून हेही समजतं की काही मोठं मिळवायचं असेल,तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागतं — जसं त्या माणसाने अख्खं पाणी हँडपंपात ओतलं.
पाण्याचं या कथेत प्रतीक आहे — अशा गोष्टीचं, ज्या आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. कुणासाठी ते ज्ञान असू शकतं,कुणासाठी प्रेम,तर कुणासाठी पैसा.हे जे काही आहे,ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतींच्या पंपात टाकावं लागतं.आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेकपट अधिक मूल्य प्राप्त करतो.
एक व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत पोहोचत जाते,हेही ही गोष्ट आपल्याला शिकवते.
व्हाट्सअप च्या व नवाविष्कार ग्रुपद्वारे माझ्यापर्यंत आलेली ही गोष्ट आजच्या जगातील हरवत चाललेल़ं ज्ञान पुनश्च हे प्राप्त करा म्हणून सांगत आहे.