सकाळचं साडेसात वाजून गेलं तरी देविकाचं आटोपलं नाही.७.५० ची लोकल पकडली तरच ऑफिसला वेळेत पोहोचणार,नाही तर लेट मार्क, पगारात कपात ठरलेलीच.
वरून सगळ्यांच्या समोर साहेबांची बोलणी खावी लागणार ते वेगळंच. शिवाय नंतरच्या गाड्यांना गर्दी फार अन् त्या गाडीत ओळखीचंपण कोणी नसतं.
दीड तासांचा कंटाळवाणा प्रवास.नेहमीच्या गाडीनं गेलं की कसं, आधीच्या स्टेशनवरून येणाऱ्या मैत्रिणी जागा पकडतात.निवांत बसून गप्पा मारत जाता येतं.आज उठायला जरा उशीर झाला,तर सगळी कामं मागं आली.घड्याळाचा
काटा काही थांबायला तयार नव्हता.पोरांची आवराआवरही सुरूच होती.
घाईतच देविकानं नवऱ्याला सांगितलं,"रमेश, उठायला उशीर झाल्यामुळं मी आज काही बनवलेलं नाही.जाता जाता पोरांच्या टिफीनमध्ये बेकरीतलं काहीतरी खाऊ घेऊन दे.तूपण ऑफिसमध्ये पार्सल मागव."
"ते ठीक आहे; पण आई-बाबांचं काय?" रमेशनं प्रश्न केला.
"आई बनवतील ना त्यांच्यासाठी काहीतरी ? देविका सहजच बोलून गेली.
"आणि तुझ्या टिफीनचं काय?"
"अरे,आज आमच्या ऑफिसमध्ये एकाचा वाढदिवस आहे.तो मागवणार आहे काहीतरी."
"अगं, तू आज उशिरा उठणार होतीस तर मला नाही का सांगायचंस.नाष्टा बनविला तेव्हाच स्वयंपाकपण करून गेले असते मंदिरात." रमेशची आई म्हणाली.
"जायच्या अगोदर दिसलं नव्हतं का मी उठले नाही ते.काय जायचं असतं रोज मंदिरात ?एखाद्या दिवशी नाही गेलं किंवा थोडं उशिरा गेलं तर देव घेणार नाही का आत?" खांद्यावर ओढणी टाकत बाहेर पडताना देविकानं तावातावानंच उत्तर दिलं.
"अगं पण..." सासू काहीतरी बोलणार तितक्यात देविकानं खाडकन् दरवाजा ओढून घेतला आणि बाहेर पडली.
आईनं रमेशच्या तोंडाकडं बघितलं,तर तो नाष्टा करत करत बोलला,"तुला माहिती आहे ना आई, दिवसभर ऑफिसमध्ये किती काम असतं बिचारीला.एवढ्या मोठ्या खासगी विमा कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना किती त्रास होतो ते तुला नाही कळणार.झोपली एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती तर नाष्टा बनवलास तेव्हा बनवूनच जायचंस ना जेवण ?"
नाष्टा संपवून रमेश मुलांच्या खोलीत गेला.रिकामे दोन टिफीन त्यांच्या बॅगेत ठेवले.कपडे बदलून बाहेर आला तरी मुलं अजून बुटांची लेस बांधत होती म्हणून त्यांच्यावर खेकसला,"चला ना पटकन् उशीर होतोय मला.आज बेकरीतपण थांबायला लागणार आहे."
तोपर्यंत हातात काहीतरी घेऊन आलेल्या आईनं विचारलं,"संध्याकाळी तू किती वाजेपर्यंत येशील?"
"महिनाअखेरची कामं सुरू आहेत.उशीर होईल यायला.काही काम आहे का?"
"काही नाही रे,तुझ्या बाबांचा हा चष्मा तुटलाय. तेवढा दुरुस्त करून आणशील का येताना?" हात पुढे करीत आईनं विचारलं.
"आई,आताच सांगितलं ना महिनाअखेर आहे म्हणून? आता थोडी कडकी आहे.बघू पुढच्या महिन्यात..." वैतागलेल्या रमेशनं सांगितलं.
"अरे पण चष्मा नाही वापरला तर त्यांना खूप कमी दिसतं,ठेच लागून कुठंतरी पडतील आणि नंबर बदलेल म्हणून म्हटलं."
"आठ दिवसांत नंबरात असा किती बदल होणार आहे,आणू पुढच्या आठवड्यात.नाहीतरी पेपर वाचण्यापलीकडं काय काम आहे त्यांना ? चार दिवस नाही वाचला तर कुठं बिघडतं?"
सोफ्यावर बसून वर्तमानपत्रात तोंड खुपसून चाचपटत बसलेल्या वडिलांकडे बघत रमेश बोलून गेला.
"अरे पण..." आई पुढं बोलणार इतक्यात बाबांनी तिच्याकडं बघितलं आणि डोळ्यांनी खुणावत शांत बसायला सांगितलं.त्या खुणेन आईनं तोंडातले शब्द गिळले आणि रमेश मुलांना घेऊन निघून गेला.
प्रसंग दुसरा
आज रविवार असल्यानं रमेश अजून अंथरुणावर लोळत पडला होता.पोरंही उठायचं नाव घेत नव्हती.
देविका नुकतीच उठून तोंडात ब्रश धरून गॅलरीत उभा होती.आईनं हाक मारली,"रमेश, उठ की रे आता.घड्याळात बघ साडेनऊ वाजून गेलेत..."
आईच्या आवाजानं रमेश उठला आणि डोळं चोळत बाहेर आला."काय हे आई,आज सुट्टी आहे ना? आजतरी निवांत झोपू द्यायचं."
"अरे बाबा,आज कामाला सुट्टी आहे.पोटाला सुट्टी आहे का ? गरमागरम नाष्टा कर आणि मग झोप."
"काय बनवलंय आज?"
"थालीपीठ केलंय,आवडतं ना तुला!"
"रमेश,आज मला पिझ्झा खायचा आहे.जरा फोन करून ऑर्डर कर ना." ब्रश केल्यानंतर तोंड पुसत आलेल्या देविकानं लाडात सांगितलं.
तोवर आतून मुलंपण ओरडली, "अरे वा,पिझ्झा... मला पण.. मला पण.."
"ठिक आहे मागवतो;पण तुम्ही पटकन् आवरा." असं म्हणत रमेशनं फोन उचलला.मुलं उड्या मारत आत गेली.देविकानं पांघरुणाच्या घड्या घातल्या आणि चहाचा कप घेऊन गॅलरीत पेपर वाचत बसली.
थोड्या वेळानं बेल वाजली म्हणून बाथरूममधून बाहेर आलेल्या रमेशनं आवाज दिला,"देविका, उघड गं दार,बघ पिझ्झा आला असेल..."
गडबडीत जाऊन देविकानं दार उघडलं.समोर बघते तर काय,सारा भ्रमनिरास झाला. दारात जोंधळेकर काकू आणि त्यांचा नातू चिंतामणीला बघताच देविकाच्या चेहऱ्यावरील आनंदी छटा उतरली. जुन्या मैत्रिणीला भेटायला आलेल्या काकूंना तोंडात मारल्यासारखं झालं म्हणून काकूनी विचारलं,"दुसरं कोणी अपेक्षित हो काय ?"
"नाही नाही.असं काही नाही.या ना या..." देविकानं लगेच चेहऱ्यावरच भाव बदलला.
"वहिनी आहेत ना घरी?"
"आहेत की. या ना आत..." असं म्हणत देविका मागं सरकली.जोंधळेकर काकूंना दारात उभा बघताच आईनं आतून हाक मारली, "ये गं,अशी बाहेर का उभी आहेस ?"
काकू आत आल्या.त्यांच्या नातवानं बाबांना नमस्कार करताच त्याला शेजारी बसवत बाबांनी विचारलं, "काय, कसा आहेस?"
"मजेत..."
"स्वारी आज अचानक इकडे कशी? रस्ता कसा काय चुकली ?"
"काही नाही हो.बाजारात चालले होते.नेहमी बसनं जाते त्यामुळं मधे थांबणं होत नाही.इतक्या नवीन बिल्डिंगा झाल्यात की मला कळंतच नाही कुठं थांबायचं ते.आज हा गाडी घेऊन बरोबर आला. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जाऊ.बरेच दिवस झालं गाठभेट नाही."
"दिवस कसले महिने म्हणा.बरं झालं आलात.पूर्वी एका चाळीत रहात होतो,तेव्हा रोज दिसणारी माणसं बघायला आता डोळं उतावीळ असतात. येणं-जाणं असल्याशिवाय हालहवाला कळणार कसा? भेटल्यावर तेवढंच समाधान मिळतं.जुन्या आठवणी ताज्या होतात."
"होय ना..." जोंधळेकर काकू म्हणाल्या.
"रमेश,हा बघ चाळीतला आपल्या शेजारचा चिन्या. किती मोठा झालाय.ओळखलंस का?" आईनं विचारलं.
"हो हो, ओळखलं की..."
"नेहमी तुझ्यासोबतच असायचा.रात्री झोपताना त्याची आई त्याला ओढून घेऊन जायची."
वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन ,कोल्हापूर
रमेशच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळू लागल्या.
"काकूंच्या हातच्या स्वयंपाकाला चवच तशी आहे.एक एक पदार्थ आठवला की आजही तोंडाला पाणी सुटतं." असं म्हणत चिंतामणी हसला.
शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..।