* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गेल्यानंतरचा सोहळा / The ceremony after leaving.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१४/५/२५

गेल्यानंतरचा सोहळा / The ceremony after leaving.

जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आज पर्यंत माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत... 


जीव वाचला;परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत... ! 


मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात, परंतु जो जो रे बाळा जो म्हणत,मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो... ! 


परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची हि काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत... 


डाव्या हातात मुंग्या येतात....मानेपासून डावा हात इतका दुखतो;की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.... ! 


या त्रासामुळे मोटरसायकल चालवताच येत नाही....  


आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फिल्डवर, भिक्षेकर्‍यांमध्ये जाणे मनाविरुद्ध रद्द करावे लागते.... ! 


मागील महिन्यात दोन-तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या... 


तिथल्या आज्यांना औषधे देता आली नाहीत हि एक तळमळ... आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय ही दुसरी तळमळ... 


दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो. 


आज सोमवारी १६ तारखेला मात्र गेलो... 


मला काय त्रास होतो आहे,याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती.... ! 


खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो.... 


मला बघितल्यावर मग,हात वारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या...! 


आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ? वगैरे वगैरे...


शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या... ! 


माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही.... तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो.... ! 


उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून,मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं,'माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चीमटल्या हायेत... माजा डावा हात नीट काम करत न्हायी... तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो... फकस्त तुमच्यासाटी... ! 

आणि तुमि माज्याशी भांडायला लागला...' मी काकुळतीने बोललो... ! 


हि वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला...  


श्रावणात उन्हं असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच उन्हं पडतात...


माझ्या बोलण्यानंतर,रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता...


क्षणात मोसम बदलला होता...! 


श्रावणाचा महिना नसताना सुद्धा,भर थंडीतही, मावश्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यावर पडला... ! 


एकीने खांदा चोळला ... 

एकीने डावा हात हातात घेऊन त्याला मालिश केले... 

एकीने डोक्यावर हात ठेवून आला-बला काढली... ! 


साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी... पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला.... ! 


मी आपला सहज बोलून गेलो,'एक महिना नाही आलो तर इतकं बोलता... मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल ?'


या वाक्याने त्यांचा बांध फुटला... 


श्रावणाने पुन्हा मौसम बदलला...! 


एक रडायला लागली,डॉक्टरला मरू नको देऊ म्हणून तिने मंदिरापुढे अश्रूंचा अभिषेक केला...


एकीने रडत देवाला कौल लावला ...  


एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली, "डाक्टरच्या" मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती.... ! 


मी भारावून गेलो...  माझ्या डोळ्यात पाणी आलं...! 


मला खूप पूर्वी वाटायचं,आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासुन रडेल का ? 


आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं ? हे पाहायची काही सोय आहे का ? 


आता,हा प्रसंग पाहिल्यानंतर,माझ्या मृत्यू मागे कोण कोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती... !


मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं,आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली.... ! 


पण जाणीव झाली,आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांनं रडावं,असं आपल्याला वाटत असेल,त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं...!* 


It's damn reality.... !!!


असो...


मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो.... आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपत् त्यावेळी आपल्या वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं .... 


परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं...त्याला संवेदना म्हणतात ... समवेदना म्हणतात.... ! 


या माझ्या आज्या - मावश्या आज माझ्यासाठी रडल्या...  यात मला आनंद नाही...


माझी वेदना; त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली... यात आनंद आहे ! 


वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरु झाला आहे यात मी सुखी आहे.... ! 


आता मी कधीही गेलो तरी सुद्धा,आज्यांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन;याची मला जाणीव आहे.... 


आता माझ्या मागे कोण कोण रडेल याची मला फिकीर नाही.... !


माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणे पाहिला...!!! 


१६ डिसेंबर २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स


शब्दकोड्यातील एका शब्दाची माहिती..


मॅग्नस परिणाम :आपण पाहतो,की फुटबॉल खेळात बऱ्याच अंतरावरून गोल करण्याच्या तयारीत असलेला खेळाडू पायाने चेंडू अशा तऱ्हेने मारतो,की आपल्याला वाटते कुठेतरी वेगळ्याच दिशेला मारलाय,आणि आता गोल होणार नाही.पण तो स्वत:भोवती गरगरत जाणारा चेंडू हवेतून जाताना आपली दिशा बदलत राहतो आणि थेट जाळीत जाऊन धडकतो.या द्रायूमधून (फ्लुइड,इथे हवा हे माध्यम) स्वत:भोवती फिरत जाणाऱ्या गोलकांच्या दिशा बदलत राहण्याच्या क्रियेला 'मॅग्नस परिणाम' म्हणतात.हे नाव एच.जी.मॅग्नस या जर्मन शास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे.हा परिणाम क्रिकेट,टेनिस अशा खेळांतील चेंडूंच्या बाबतीतही होताना दिसतो.या परिणामाचा उपयोग मार्गदर्शित क्षेपणास्त्र (गाइडेड मिसाइल) आपल्या लक्ष्यावर अचूक पोहोचावे म्हणूनही केला जातो.


या परिणामाचे तत्त्व पुढीलप्रमाणे आहे,स्वतःभोवती फिरणारी वस्तू माध्यमाचा पातळसा थर घेऊन फिरते.वस्तू पुढे जाताना माध्यमातून मार्ग कापावा लागतो,त्या वेळी सुटे माध्यम आणि वस्तूला चिकटून फिरणाऱ्या थरामध्ये घर्षण होते.एका बाजूला फिरण्याची दिशा आणि पुढे जाण्याची दिशा एकच असते.सुटे माध्यम आणि फिरणारा थर एकाच दिशेने जात असल्याने त्या बाजूच्या माध्यमाचा वस्तू पार करण्याचा वेग वाढतो.याउलट,

वस्तूच्या विरुद्ध बाजूला सुटे माध्यम आणि फिरणारा थर यांची दिशा एकमेकांविरुद्ध असते,ते एकमेकांना विरोध करतात आणि त्यामुळे त्या बाजूच्या माध्यमाचा वस्तू पार करण्याचा वेग कमी होतो.ज्या बाजूला वेग कमी असतो,त्या बाजूला माध्यमाचा दाब वाढतो,विरुद्ध बाजूला माध्यमाचा दाब कमी होतो आणि वस्तूवर कमी दाबाच्या दिशेला बल कार्य करते.या बलामुळे ही द्रायूमधून स्वत:भोवती फिरत जाणारी वस्तू सतत आपला मार्ग बदलत राहते.


मराठी विज्ञान परिषद पत्रिका 

जानेवारी २०२३