* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अंजन  / Anjan

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

८/५/२५

अंजन  / Anjan

" तूपण किती चुटकीसरशी मदत करायचास मला. मी जागेवरून उठायच्या आधी मला हवी ती वस्तू कपाटातून काढून हातात द्यायचास.एवढ्या लहानपणी किती समंजस होतास.." आईनं चिन्याचं कौतुक केलं.


"तुम्ही तरी काय कमी कष्ट उपसलेत;घरच्या चार माणसांसोबत चाळीतल्या १० माणसांचं डबं सकाळी ८ वाजता तयार असायचं.पहाटे पाच वाजता स्टोव्ह सुरू झाल्यापासून तुमचं काम सुरू व्हायचं आणि रात्री ११.३० वाजता अंथरुणावर पाठ टेकायचा.खानावळीचं डबं,पोरांची शाळा, दुपारी भाज्यांची निटवाट करून परत संध्याकाळची तयारी.रविवारी सुट्टीच्या दिवशी तर डब्यांच्या लोकांना मटणाचा स्वयंपाक.किती कष्टानं शिकवलं आहे पोरांना.

चाळीतल्या दोन खोल्यांत दाटीवाटीत काटकसरीनं दिवस काढले म्हणून चाळीतनं फ्लॅटमधे पोहोचलात..." बोलता बोलता जोंधळेकर काकू भावूक झाल्या.


"रमेशनं नोकरी मिळताच इथं फ्लॅट घेतला.नाही तर गिरण्या बंद होत चाललेल्या.यांच्या रिटायरमेंटनंतर मुंबईत खोलीभाडं द्यायचं वांदं झालं असतं.पोरानं धाडस करून घर घेतलं म्हणून बरं झालं.यांचा फंड तर पोरीच्या लग्नात खर्च झाला.

उरलेल्या पैशात जगणं मुश्किल होतं.रमेशला चांगली नोकरी मिळाली म्हणून बरं झालं..." आईनं समाधान व्यक्त केलं.


"कितीला भेटला हा फ्लॅट तुम्हाला?" चिंतामणीनं विचारलं.


"त्यावेळी ३५ लाख रुपये बसले.बाबांनी फंडातील पैशात डाऊन पेमेंट दिलं.उरलेल्या रकमेचं कर्ज घेतलं..." रमेशनं सांगितलं.


"बरं झालं बाबा.निदान निवारातरी झाला..." जोंधळेकर काकू म्हणाल्या.


"हे घे थालीपीठ.तुला आवडतं ना माझ्या हातचं?" असं म्हणत आईनं चिन्याला आणि जोंधळेकर काकूंना दोन दोन थालीपीठं दिली.


"तुम्ही नाही घेतलं?"


चिंतामणी.


"आमचं आताच खाऊन झालंय.तोवर तुम्ही आला..." बाबा म्हणाले.


रमेश आत गेला.आता पिझ्झा आला तर यांच्यासमोर खाताना सगळ्यांना द्यायला लागणार म्हणून देविकानं आणखीन दोन मागविता का म्हणून विचारलं,तर आतापर्यंत तो मुलगा बाहेर पडला असेल.असं रमेश म्हणाला.दोघांची आत कुजबूज चालू होती.तोवर पुन्हा बेल वाजली म्हणून रमेश पैसे हातात घेऊनच दारात गेला.पिझ्झाचा बॉक्स बघताच मुलांनी दंगा चालू केला.


रमेशनं पिझ्झा आत किचन कट्टयावर ठेवला आणि चिन्याला विचारलं,"तू खाणार का रे पिझ्झा?"


"नको नको,आज काकूच्या हातचं थालीपीठ खाऊन घेतो.

पिझ्झा काय कुठंही मिळतो;पण अस्सं थालीपीठ बाहेर कुठंच मिळत नाही."


प्रसंग तिसरा -


सकाळी सकाळी आलेल्या जोंधळेकर काकू चांगल्या तासभर थांबल्या होत्या.जुन्या आठवणी,चाळीतली लोकं,त्यांच्या गमतीशीर आठवणींत आई-बाबा दोघेही रमून गेले.फ्लॅटमध्ये दिवसभर त्यांच्यासोबत बोलायला,गप्पा मारायला कोणी नव्हतं.अनोळखी लोकांना बोलण्यात स्वारस्य नाही आणि ओळखीची मंडळी आपापल्या कामात गुंतलेली.दिवसभर टीव्ही तरी किती वेळ बघणार?


दिवसभर खेळून दमलेली मुलं लवकर झोपली. रमेश नुसताच आडवा पडला होता.देविकानं लाडात रमेशच्या छातीवर हात फिरवत म्हटलं,"मी काय म्हणते..."


"बोल..." रमेश निर्विकारपणे उत्तरला.


"चाळीतल्या गप्पांमध्ये आई-बाबा किती रमून गेले होते ना?"


"हो ना.अर्ध्याहून जास्त आयुष्य जगलेत ते त्या चाळीत.फार मनमिळाऊ लोकं आहेत ती.आम्ही तिथं असताना प्रत्येक दिवस चाळीत जिवंतपणा असायचा आणि सणासमारंभात तर काय विचारूच नकोस.किती धमाल,किती उत्साह,सगळे जणू एकाच कुटुंबातील.थोडेफार वाद व्हायचे;पण जेवढ्यास तेवढे.परत सगळे एकत्र.एकमेकांच्या अडचणींना धावून यायचे."


"इथं त्यांना एकटं एकटं वाटत असेल ना?"


"आपण दिवसभर कामात असतो.घरी त्यांचा दिवस कसा जात असेल माहिती नाही."


"चाळीत पटकन् जाऊन यायचं म्हटलं तरी जाणार किती वेळ आणि थांबणार किती ? पाहुण्यासारखं गेलं की उतरणार कुणाकडं हा प्रश्न आहेच..."


"हो ना.."


"मी काय म्हणते,आपण तिकडं एक खोली भाड्यानं घेऊया का?"


आणि तिथं राहणार कोण ?"


"आपण काय करू,आई-बाबा तिथं रहायला जातील.आपण दर विकेंडला निकडं जाऊ.मग त्यांनापण आपल्या लोकांमध्ये मिसळता येईल आणि तुलापण जुन्या मित्रांना भेटता येईल."


"आहे ना इथं त्यांना एक बेडरूम.मग काय गरज आहे शिफ्ट करायची.इथे या घराचा हप्ता आणि तिकडचं भाडं खर्चपण वाढणार."


"अरे,तुला कळत कसं नाही? त्यांचं तिकडं मन रमेल आणि आपलं इकडे.मुलं मोठी झाली आहेत आता.त्यांना नको का वेगळी रूम ? त्याशिवाय आपल्याला प्रायव्हसी कशी मिळणार?" देविका फारच लाडात आली.


"त्याचा विचार उद्या करू..." असं म्हणत रमेशनं लाईट बंद केली.


दोन दिवसांनंतर देविकानं दुपारनंतर हाफ डे घेतला. तिच्या आईला भेटून खर्चासाठी पैसे द्यायचे होते आणि जाता जाता चाळीतल्या लोकांना भेटून जाऊ म्हणून तिनं रमेशला बोलावून घेतलं.माहेरी चहापाणी आटोपलं;पण तिचा भाऊ अजून कामावरून यायचा होता.त्याला भेटायला थांबलं तर उशीर होईल म्हणून आईला पैसे देऊन दोघं चाळीकडं वळले.


दारातच भाटेकाका भेटले.त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत आत गेले,तर समोरून गण्याभाऊ आला. जुन्या मित्राला कडकडून मिठी मारली आणि चहाला घरी चल म्हणून आग्रहानं ओढून नेऊ लागला;पण सासुरवाडीत नुकताच चहा प्यायल्यानं रमेश नको म्हणू लागला,तरी गणेशनं आग्रह काही सोडला नाही.


याच्याकडून खोली भाड्यानं मिळेल का याची चौकशी करावी म्हणून देविका म्हणाली,"एवढा आग्रह करतायत भावोजी तर चला ना.चहा तर निमित्तमात्र.पाच-दहा मिनिटं तेवढंच सगळ्यांना भेटता येईल."


घरात गणेशचे वडील टी.व्ही.बघत बसले होते.आई स्वयंपाकात गुंतलेली.एवढ्या दिवसांनी रमेश बायकोला सोबत घेऊन आलाय म्हटल्यावर तिनं चपातीचा तवा उतरला.परात बाजूला सरकवून हात धुतला आणि चहाला पातेलं ठेवलं.


गणेशच्या वडिलांना रमेशची प्रगती बघून भारावून आलं."किती कष्टानं शिकलास.मुळातच लहानपणापासून शांत आणि हुशार.टपोरी पोरांमध्ये मिसळण्यापेक्षा अभ्यासात लक्ष.अतिशय नम्र.कधी कुठल्या भांडणात नाही की कुठलं व्यसन नाही." नवऱ्याची स्तुती ऐकून देविकाचा चेहरा खुलला


गणेशचे वडील आणि रमेशचे वडील एकाच मिलमध्ये कामाला होते;पण रमेश शिकला, इंजिनिअर झाला.मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मग त्यानं फ्लॅट घेतला.नंतर लग्न केलं.बायकोपण नोकरी करते दोघं मिळून कमवतात, म्हातारा-म्हातारीला सांभाळतात,याचं त्यांना बरं वाटलं.


मित्राची विचारपूस करून झाल्यावर गणेशचे वडील अधिकारवाणीनं बोलले,"वडिलांना चांगलं संभाळ रे बाबा.

फार कष्ट उपसलेत त्यानं.आम्ही दोघं एकत्रच कामाला होतो.भोंगा वाजला की आम्ही घर गाठणार आणि वेळ जावा म्हणून पत्ते खेळत बसणार.त्यावेळी टी.व्ही. नव्हता;पण तुझा बाप कधी पत्ते खेळायला आला नाही.दिवसांत ८ तास ड्युटी आणि ६-७ तास झोप.अंघोळपाणी, जेवण-खाणं आणि जाणं-येणं यात ३-४ तास. बाकीच्या ४-५ तासांत आम्ही एकतर अंथरुणावर लोळत पडणार,पत्ते खेळत किंवा फिरण्यात टाईप पास करणार.तुझा बाप मात्र एकतर ओव्हर टाईम करणार किंवा रिक्षा चालविणार.दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही सगळे सहलीला मुंबईबाहेर जायचो,तर तुझा बाप तुझ्या आईला दरवर्षी सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जायचा.

ती खानावळ चालवायची आणि हा रिक्षा.पै पै करून पैसे साठवून तुम्हाला शाळेला पाठवलं.आमची पोरं पैसे नाहीत म्हणून आर्टस्ला गेली आणि तुला मात्र त्यांनी इंजिनिअर केला. देवानंपण त्यांच्या कष्टाचं फळ दिलं आणि तुला नोकरी मिळाली.जन्मभर त्यांनी फार कष्ट उपसलेत रे बाबा.ना कुठली हौस केली ना कधी व्यसन केलं. लेकीचं लग्न आणि तुझं शिक्षण हीच त्यांची कमाई म्हणून ते चाळीतून फ्लॅटमध्ये गेले आणि आम्ही इथंच खितपत पडलोय.आमची पोरंपण शिकली नाहीत आणि आम्हीपण त्यांच्यासाठी खर्च केला नाही.तू हुशारपण आहेस आणि नशिबवानपण. म्हणून असे आई-बाप मिळाले तुला..."


काकांनी डोळ्यांत अंजन घातल्यामुळं रमेशला आई-बाबांनी केलेल्या कष्टाची चांगलीच उजळणी झाली.देविकालाही तिच्या आई-बाबांचं कष्ट आठवलं.लहानपणापासून बऱ्याच गोष्टी डोळ्यांसमोर घडल्या;पण काळाच्या पडद्याआड सगळ्या विस्मृतीत गेलेल्या.गणेशच्या वडिलांच्या आणि रमेशच्या वडिलांच्या वागण्यातील फरक यांमुळे आज रमेशला वडिलांविषयी आदर द्विगुणित झाला.वडिलांच्या कष्टाची चित्रफीत डोळ्यांसमोरून फिरत असतानाच रमेश घरी पोहोचला आणि फार दिवसांनी बाबांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडायला लागला...