मला आठवतंय तेव्हापासून गावात पाण्याची रडच आहे. गावातले लोक गमतीने पाहुण्यांना म्हणत,
" जेवायला आमच्याकडे या पण हात धुवायला शेजारच्या गावात जा." पूर्वीच्या काळी मुलांची लग्नं व्हायलासुद्धा ह्याच कारणाने अडचण व्हायची.मुलीकडचे म्हणायचे, 'नको रे बाबा ह्या गावात लेक द्यायला!पाणी भरून भरूनच मरून जायची पोर.'
बाकी गाव मात्र दुमदार होतं.तालुक्याचं ठिकाण होतं. हवा चांगली होती.मात्र गावात पाणी नसल्याने गावाची वाढ खुंटली होती.असं म्हणतात की,ज्याची लोकसंख्या कमी होत चाललीय असं हे एक अपवादात्मक गाव आहे.गावात नोकऱ्या नसल्याने होतकरू मुलं शिक्षण झालं की,बाहेरगावी नोकरीच्या शोधात गाव सोडून जात होती.गावात फक्त छोटेमोठे व्यावसायिक आणि दुकानदार प्रामुख्याने राहत होते.त्यामुळे गावगप्पांना सगळ्यांकडे भरपूर वेळ होता.गावातल्या पारावर, दुकानांत,नाक्यानाक्यावर गप्पांचे अड्डे जमवलेले लोक दिसत.एखादी बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरे आणि त्याचं चर्वितचर्वण गावभर चाले.
( गावगोत - माधव सावरगांकर -अष्टगंध प्रकाशन )
एकदा अशीच एक बातमी गावभर चर्चेचा विषय झाली. गावातल्या पटेल डॉक्टरांचा मुलगा प्रशांत अमेरिकेत शिकत होता.त्याचा एक बंगाली मित्र आणि त्याची बायको गावात राह्यला येणार आहेत,ही ती बातमी ! बातमीला दुजोरा मिळू लागला.प्रशांतच्या मित्राने आणि त्याच्या बायकोने डॉक्टरीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं होतं.
तिथेच काही वर्षं प्रॅक्टिसही केली होती.आता त्यांना भारताच्या एखाद्या छोट्या गावात येऊन इथे प्रॅक्टिस करायची होती म्हणे.
प्रशांतकडून त्यांनी त्याच्या गावाची माहिती ऐकली आणि कुठे तरी जायचं तर ह्या गावातच जाऊ या,निदान इथे प्रशांतचे कुटुंबीय तरी आहेत.त्याचे वडीलपण ह्याच व्यवसायात आहेत. अडीअडचणीला त्यांची मदत होऊ शकेल.काही वर्षं एक नवीन अनुभव घेऊ या.
नाही जमलं तर परत अमेरिकेत येऊ.ह्या विचाराने त्यांनी इथे येण्याचा निर्णय पक्का केला.सगळ्या गावात आता दुसरा विषयच नव्हता.अमेरिकेतला डॉक्टर गावात येणार म्हणजे उठसूट उपचारासाठी जिल्ह्याच्या गावी पळायला नको.
गावात एकही डॉक्टरीण नव्हती.बाळंतपण सुईणी करायच्या.ही नवीन डॉक्टरीण आली म्हणजे बायकांचीसुद्धा आता मोठी सोय होणार होती.मग कुणीतरी म्हणालं,"नवीन डॉक्टरचं नाव चक्रवर्ती आहे म्हणे.म्हणजे राजघराण्याशी संबंध दिसतोय !"गावात बहुतांशी मराठी वस्ती होती.व्यापारीवर्गातले मारवाडी, गुजराती कुटुंबंही मराठीच बोलत.गावातली मुसलमान मंडळीदेखील 'म्हमद्या भागके भागके जाऊन वट्यावर चढ' अशाच पद्धतीचं,हिंदीला नुस्तं स्पर्श करणारं मराठी बोलत.त्यामुळे चक्रवर्ती आडनाव ह्यापूर्वी कधी कुणी ऐकलं नव्हतं.त्यामुळे डॉक्टरकुटुंब राजघराण्याशी संबंधित असावं असं सगळेजण ठामपणे सांगू लागले.गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती.
पेशव्यांचे सरदार विंचुरकर ह्यांनी गाव वसवलं होतं म्हणून गावात वाडे,गढ्या ह्यांची कमतरता नव्हती. बरेचसे वाडे आता मोडकळीस आले होते.पण प्रत्येकाच्या कहाण्या आणि आख्यायिका होत्या.
अशा वाड्यांमध्ये बळदं,भुयारंसुद्धा भरपूर होती.त्यामुळे आख्यायिकांना पोषक असं वातावरण होतं.
अमेरिकन पाहुणे मात्र डॉक्टर पटेलांच्याच शेजारी असलेल्या एका टुमदार घरात सुरुवातीचे काही दिवस राहणार होते आणि प्रशांतचे वडील ज्या धर्मादाय दवाखान्यात प्रॅक्टिस करायचे तिथूनच सुरुवात करणार होते.डॉ.शांतिलाल पटेल ह्यांनी त्या उभयतांसाठी दवाखान्यात दोन नवीन केबिन्सदेखील बांधून घेतल्या. गावातला प्रत्येक जण त्या बघूनही आला.आता फक्त चक्रवर्ती दाम्पत्य येण्याचीच वाट होती.
त्यांच्या येण्याचा दिवस ठरला आणि डॉ.शांतिलाल पटेल मुंबईला पाव्हण्यांना आणायला गेले.गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.धर्मादाय दवाखान्याच्या केबिन्सवर डॉ. एन. सी. चक्रवर्ती आणि डॉ.शामली चक्रवर्ती ह्या नावांच्या पाट्या लागल्या आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला ऊत आला. डॉक्टरांचं नाव न वरून म्हणजे नीतीन,नवीन वगैरे असणार.वडिलांचं नाव चिंतामणी,चंद्रकांत वगैरे असावं, असाही तर्क केला गेला.पण नंतर पटेल कुटुंबीयांकडून समजलं की,बंगाली पद्धतीप्रमाणे वडिलांचं नाव देण्याऐवजी दोन्ही आद्याक्षरं डॉक्टरांच्या स्वतःच्याच नावाची होती.डॉक्टरांचं नाव होतं सवीनचंद्र,लोकांना सगळंच नवीन होतं.आता फक्त त्या दोघांना पाहण्याचीच वाट होती.येणार येणार म्हणून गाजत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला घेऊन डॉ.शांतिलाल पटेलांची गाडी आली.घराघरांच्या खिडक्यांतून, सज्जांतून अनेक उत्सुक डोळे त्यांना पाहत होते.गाडी थांबली.डॉक्टरदाम्पत्य गाडीतून खाली उतरलं. नवीनचंद्र हे चांगले उंचेपुरे,नाकीडोळी नीटस असलेले होते.दंडाशी घट्ट असलेल्या टी शर्टच्या बाह्यांतून त्यांचे कमावलेले दंड नजरेत भरत होते.त्यांनी केस उलटे वळवलेले होते.त्यातून एक चुकार बट सारखी कपाळावर येत होती आणि ती मागे करण्याची त्यांची लकब आकर्षक होती.दिसण्यामध्ये शामली निर्विवाद भाव खाऊन जाईल अशी होती.नावाप्रमाणे सावळी असली तरी तिचे डोळे लक्षात येण्याइतके तेजस्वी होते. तिच्या धारदार नाकाला चाफेकळीचीच उपमा योग्य ठरली असती.डॉ.पटेलांशी बोलताना ती एकदा हसली आणि तिचे पांढरे स्वच्छ दात बघितल्यावर ती एकूणच सुंदर आहे असं सगळ्यांचं मत झालं.पांढरीशुभ्र रेशमी साडी तिच्या सावळ्या रंगाला शोभून दिसत होती. कपाळावरचं अन् भांगातलं लालभडक कुंकू तिच्या सौंदर्यात भरच टाकत होतं.
चक्रवर्ती दाम्पत्याने आजूबाजूला पाहिलं आणि लोक आपल्याला बघण्यासाठीच आले आहेत,हे त्यांच्या लक्षात येताच त्या दोघांनीही हात जोडून हसतमुखाने चारी बाजूंना बघत वंदन केलं.त्यासरशी त्यांनी पहिल्या दर्शनातच तिथे असलेल्या लोकांना पर्यायाने सगळ्या गावाला जिंकलं.ते दोघे घरात शिरले आणि त्यांना बघायला उभी असलेली मंडळी आपापल्या अड्ड्यांवर त्यांच्याविषयीची माहिती द्यायला रवाना झाली.प्रत्यक्ष न बघताही थोड्याच अवधीत सगळ्या गावाचं चक्रवर्ती दाम्पत्याबद्दल अतिशय चांगलं मत झालं.
संध्याकाळी त्यांच्या सामानाचा ट्रक आला.दोन दिवस चक्रवर्ती जोडी पटेल कुटुंबातील नोकरांच्या मदतीने सामान लावत होती.
किरकोळ मदतीसाठी सुतार आणि इलेक्ट्रिशियन बोलावले होते.शामलीच्या बरोबरीने नवीनबाबूंना घरकामात मदत करताना बघून त्यांना आश्चर्यच वाटलं.गावात घरकामात बायकांना इतकी मदत करणारा पुरुष त्यांनी पाहिलाच नव्हता.
दोन दिवसांनंतर नवीनबाबू आणि शामलीमॅडमनी दवाखान्यात यायला सुरुवात केली.एकदोन दिवसांतच ह्या धर्मादाय दवाखान्याचं जणू नशीबच पालटलं. वाढती गर्दी पाहून डॉ.पटेल चकितच झाले.इंग्रजी टोन असलेले दोघेही डॉ.चक्रवर्ती बंगाली मिश्रित हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते.लोकांना तर त्याचंही कौतुकच वाटत होतं.तेही मोडक्यातोडक्या हिंदीत त्यांच्याशी संवाद साधत होते.डॉक्टर माधवला 'माधब' कसं म्हणतात आणि उस्मानपुऱ्यातल्या गनीला 'गोनी' कसं म्हणतात अशा बारीकसारीक गोष्टींची चर्चा गावात कौतुकाने होऊ लागली.दोन्ही डॉक्टरांची स्मरणशक्ती तल्लख होती.एकदा भेटलेल्या व्यक्तीचं नाव त्यांना बिनचूक आठवत असे.थोड्या चुकीच्या पद्धतीने का होईना पण आपलं नाव लक्षात ठेवून डॉक्टरांनी उच्चारलं ह्याचं अप्रूप लोकांना वाटू लागलं.
दिवसागणिक दवाखान्यातली गर्दी वाढू लागली. दोघांच्याही हाताला चांगला गुण आहे असं सार्वत्रिकरीत्या मत तयार झालं.
सकाळी साडेनवाला दवाखाना उघडायचा.लोक त्याच्या आधीपासून रांग लावून बसलेले असत.दुपारी एकपर्यंत पेशंटना तपासणं अव्याहत चाले.बरोबर एक वाजता दवाखाना बंद व्हायचा तो साडेपाचला परत चालू होई.डॉक्टर दाम्पत्याच्या हातगुणाची आणि नियमितपणाची ख्याती पंचक्रोशीत पसरली.त्यामुळे कुठून कुठून रोगी त्यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले.रात्री नऊपर्यंत दवाखाना चालू असायचा.रविवारी मात्र पूर्ण दिवस बंद. एका महिन्यानंतर नवीनचंद्रांनी डॉक्टर पटेल ह्यांच्याकडे स्वतःचा दवाखाना सुरू करण्याविषयी आणि राहण्याच्या जागेसंबंधी चर्चा केली.डॉ..पटेलांनी त्यांना म्हटलं,"वेगळा दवाखाना सुरू करण्याची गरज आहे काय ? इथेही व्यवस्थित चाललं आहे ना."पण नवीनचंद्रांचे विचार स्पष्ट होते.त्यांनी म्हटलं, "डॉक्टरी क्षेत्रात खूप नवीन मशिन्स आली आहेत. त्यामुळे रोगाचं निदान करायला मदत होते.अर्थात त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते.इथे धर्मादाय दवाखान्यात इतक्या मोठ्या गुंतवणुकीला विश्वस्त मंजुरी देणार नाहीत.त्यामुळे आम्ही स्वतःचा दवाखाना सुरू केला तर अशी मशिन्स आम्हाला घेता येतील आणि पेशंट्सची सेवा उत्तमप्रकारे करता येईल."
डॉ.पटेलांना नवीनबाबूंचं म्हणणं रास्त वाटलं.मग दर रविवारी डॉक्टरांच्या दवाखान्यासाठी जागेचा शोध सुरू झाला.खाली तळमजल्यावर प्रशस्त दवाखाना आणि वरच्या मजल्यावर राहण्यासाठी मोठं घर अशी ढोबळ कल्पना नवीनबाबूंच्या मनात होती.अशी जागा काही मिळेना तेव्हा एखाद्या मोकळ्या जागेवर नवीन बांधकाम करावं असा विचार करून त्या दृष्टीने जागेचा शोध सुरू झाला.शामलीमॅडमना वाटत होतं,जागा अशी असावी की,ती सर्व वयाच्या पेशंट्सना यायला सोयीस्कर असली पाहिजे,त्यामुळे ती गावापासून दूर असू नये.पण गावात अशी मोकळी जागा डॉक्टरांच्या नजरेसमोर येत नव्हती.
एका रविवारी चक्रवर्ती दाम्पत्य घराबाहेर पडलं.मुख्य रस्त्यावरून चालत असताना एका ओसाड घराकडे त्यांचं लक्ष गेलं.ते घर बहुधा बरीच वर्षं बंद असावं. दारावरच्या कड्या-कोयंडेच काय,
कुलूपदेखील गंजून गेलं होतं.भिंतीही ढासळायला लागल्या होत्या.दोघांनी थांबून त्या घराविषयी विचारपूस करायचं ठरवलं. समोरच स्टोव्ह,गॅसबत्त्या दुरुस्तीचं दुकान होतं. दुकानावर ठळक अक्षरात दुकानाच्या नावाची पाटी होती - येथे वेळेवर काम होणार नाही.
अमेरिकेत असताना प्रशांतने आपल्या गावातल्या गमतीजमती सांगताना ह्या दुकानाबद्दल आणि त्याच्या विक्षिप्त नावाबद्दल सांगितलं होतं.ते आता आठवून दोघंही हसले.दुकानात एक तरतरीत तरुण बसला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर ते घर विकायला त्याचा मालक उत्सुक आहे पण गिऱ्हाईक मिळत नाही म्हणून गेली कित्येक वर्षं ते घर तसंच पडून असल्याचं कळलं. ती जागा आतून पाहण्याची दोघांनाही इच्छा झाली.तो तरुणही त्यांना मदत करायला उत्सुक होताच.त्याने तत्परतेने म्हटलं,
"तुम्ही म्हणत असाल तर आत्ता जागा दाखवतो.ते कुलूप काय,नुस्तं शोभेचं आहे.खाली खेचलं तरी उघडेल!"
बोलता बोलता तो दुकानाबाहेर आला.त्या पडक्या घराच्या दाराचं कुलूप त्याने झटक्यात खाली खेचलं आणि खरंच,तो म्हणाला त्याप्रमाणे ते उघडलंही.त्या तरुणापाठोपाठ दोघेही आत शिरले.
एखाद्या भयपटात दाखवतात तसं दृश्य त्यांना समोर दिसलं.
दरवाजा उघडल्याबरोबर दोनचार पारवे फडफड करत बाहेर उडत गेले.वटवाघळांची जोडी दिसली त्यावरून त्यांचाही मुक्काम इथेच आहे,हे लक्षात आलं.घरभर धुळीचे थरच थर होते.जागोजागी कोळिष्टकांच्या जाळ्यांनी घराचा प्रत्येक कोपरा व्यापला होता.घर बंद अवस्थेत असल्यामुळे एक प्रकारचा कुबट वास जीव गुदमरून टाकत होता.खिळखिळ्या झालेल्या खिडक्या त्या तरुणाने उघडल्या.ट्रॅक पँट नि टी शर्ट घातलेल्या नवीनबाबूंना अशा घाणेरड्या जागेत वावरताना विशेष त्रास होत नव्हता.आपल्या ट्रेड मार्क पांढऱ्या स्वच्छ रेशमी साडीसकट शामलीमॅडमही सहजपणे तिथे वावरत होत्या.घर चांगलंच प्रशस्त होतं.मागचं दार उघडून परसदारात आलं तर तिथे एक प्रचंड प्राचीन पिंपळवृक्ष दिसला.
त्याला कधीकाळी बांधलेला पार अजूनही व्यवस्थित होता.पारावर झाडाला टेकून शेंदूर लावलेला एक दगड ठेवलेला होता.त्या दगडावर वाहिलेल्या हळद-कुंकवाचं अस्तित्व इतक्या वर्षांनंतरही जाणवत होतं.परसू तसं प्रशस्त होतं.पिंपळाच्या पारामागेही दहाएक फूट जागा मोकळी होती.नवीनबाबू आणि शामली दोघंही जागा बघून खूश झाले."हे घर पाडून मोकळ्या जागेत आपण ठरवल्याप्रमाणे अद्ययावत् दवाखाना आणि प्रशस्त घर बांधून होईल." नवीनबाबूंनी शामलीला म्हटलं.
"हो,पण ह्या झाडाचं काय?" शामलीने शंका काढली.
"झाडाचं काय म्हणजे ? ते तोडावंच लागेल." नवीनबाबूंनी उत्तर दिलं.नवीनबाबूंचं उत्तर ऐकून सोबत आलेला तो तरुण दचकून म्हणाला, "डॉक्टरसाहेब,पिंपळाचं झाड कुणी तोडत नाहीत.पाप लागतं !" "हे पाहा,ह्या असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आणि तुम्ही म्हणता - तसं पाप आम्हाला अजिबात लागणार नाही.कारण ह्या ठिकाणी लोकांना बरं करण्याचं नेक काम आम्ही करणार आहोत.बरं,ते जाऊ दे.ह्या घराचे मालक कोण आहेत नि ते कुठे राहतात ?" "ह्या घराचे मालक असलेले नवरा-बायको दोघंही हयात नाहीत.त्यांना मूलबाळ झालं नाही.त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत पण ते जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. कडे कुणी फिरकत नाही." चक्रवर्तीदाम्पत्य घरी आलं.डॉ.पटेलांच्या कानावर त्या घरासंबंधीची माहिती घातली तेव्हा त्यांनीही थोडंफार त्या तरुणासारखंच मत व्यक्त केलं आणि आपण दुसरी एखादी बऱ्यापैकी जागा शोधू असं सुचवलं.पण शामली आणि त्यातल्या त्यात नवीनबाबूंना भरबाजारातली ती प्रशस्त जागा इतकी आवडली की,त्यांनी सगळे मुद्दे खोडून काढले.जागेचा सौदा लगेचच झाला.जागा विकणारा आणि घेणारा दोघांनीही घाईने हा व्यवहार खुशीने पूर्ण केला.ही अपशकुनी जागा डॉक्टरांचा विचार पालटण्याआधी विकणाऱ्याला विकायची होती आणि इतकी सोयीची आणि प्रशस्त जागा कुणा दुसऱ्याने विकत घेण्याआधी आपल्या नावावर व्हावी म्हणून नवीनबाबूंना घाई झाली होती.
आपल्या आवडत्या जोडप्याने ही जागा विकत घ्यायचा निर्णय घ्यावा आणि घर-दवाखाना बांधण्यासाठी पिंपळाचा वृक्ष तोडायचं ठरवावं,हे डॉ.पटेल ह्यांनाच काय,पण गावातल्या अनेकांना रुचलं नाही.कुणी आडूनआडून तर कुणी सरळ डॉक्टर नवीनबाबूंना-
शामलीबाईंना प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं.प्रत्येकाच्या मनात पाल चुकचुकत राहिली.डॉ.पटेल ह्यांनी तर ज्योतिषाकडे जाऊन त्याचं मतही विचारलं.त्याने 'जागा शांत वगैरे करून घराचा दोष काढता येईल पण कुठल्याही परिस्थितीत पिंपळ तोडू नये'असं बजावलं. डॉ.पटेलांनी हे नवीनबाबूंच्या कानावर घातलं पण त्यांनी वाद घालायचं टाळून पटेलांच्या बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष केलं.
मुंबईच्या प्रसिद्ध आर्किटेक्टने घराचा नकाशा तयार केला.
जिल्ह्याच्या ठिकाणच्या एका कॉन्ट्रॅक्टरवर घर बांधण्याचं काम सोपवलं.समोरच्या दुकानाचं नाव जरी 'इथे वेळेवर काम होणार नाही'असं असलं तरी चक्रवर्तीच्या घराचं काम वेळेवर सुरू झालं.
तो वाडा पाडल्यावर मोकळी झालेली ती जागा पाहून साऱ्या गावकऱ्यांचे डोळे विस्फारले.इथे एवढी मोठी जागा असेल अशी कुणी कल्पनाच केली नव्हती.वाडा पाडल्याने पिंपळ,पार आणि पारावरचा तो शेंदूर फासलेला देव रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दिसू लागले.प्रत्येक जण पिंपळ तोडल्याबद्दल मात्र नाराज होता.भीती व्यक्त करत होता.सगळ्यांनाच त्या देखण्या डॉक्टर दाम्पत्याविषयी आता काळजी वाटू लागली होती.ते दाम्पत्य मात्र स्वप्नपूर्ती होणार ह्या आनंदात होतं.दररोज सकाळी दवाखाना उघडण्याआधी थोडा वेळ आणि रविवारचा बराचसा वेळ नवीनबाबू नवीन जागेच्या साईटवर घालवत.बघता बघता घर पाडून झालं. मोकळी जागा मिळाली. तिच्यावर स्वच्छता झाली.आता वेळ होती कुऱ्हाड चालवायची.त्यासाठी मागेल तेवढी मजुरी देण्याची तयारी असूनसुद्धा मजूर काही मिळेनात.पण नवीनबाबू अशा गोष्टींनी मागे फिरणारे गृहस्थ नव्हते.त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बाहेरच्या गावांतून,गरज पडली तर बाहेरच्या प्रांतांतून मजूर आणायला फर्मावलं.कॉन्ट्रॅक्टरही जिद्दीला पेटला.त्याने प्रयत्नपूर्वक मजुरांची टोळी आणली.झाड तोडण्यासाठी म्युनिसिपालिटीची परवानगी काढली आणि मजुरांची टोळी कामाला लागली.कॉन्ट्रॅक्टर खरं तर मनातून घाबरला होता पण तसं निदान दाखवत तरी नव्हता. त्याने पारावरच्या देवाची पूजा केली.गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..