* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चक्रवर्ती / Chakraborty

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२४/११/२५

चक्रवर्ती / Chakraborty


गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढे सुरु…


उंच देव्हारा बांधून त्यात त्या देवाची प्रतिष्ठापना केली. गावकरी लांबूनच बघत होते.हळू आवाजात चर्चा करत होते.देवाच्यानंतर नंबर होता पिंपळाचा.त्यादिवशी मात्र गाव कर्फ्यू लागल्यासारखं घरात बसून राह्यलं. कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांव्यतिरिक्त फक्त चक्रवर्ती डॉक्टरदाम्पत्य हजर होतं.डॉ.पटेलांनीही येणं टाळलं होतं.पिंपळ तोडायला बारा मजूर आणि बारा तास लागले.नवीनबाबूंच्या सल्ल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने तीन मोठे ट्रक आणून ठेवले होते.

त्यातूनच त्या प्रचंड वृक्षाचे अवशेष गावातून बाहेर काढले.

नवीनबाबूंना ते तोडलेलं झाड बघून त्यावर होणारी लोकांची चर्चा टाळायची होती.एवढं करूनही पुढचे पंधरा दिवस सगळा गाव त्याबद्दल दब्या आवाजात चर्चा करतच होता.


पिंपळाजवळ मजूर नि डॉक्टर दाम्पत्याशिवाय कुणीही हजर नसतानाही एक अफवा वणव्यासारखी गावभर पसरली - पिंपळावर कुऱ्हाडीचा पहिला घाव बसताच रक्ताची चिळकांडी उडाली म्हणे ! कुणी सांगत होता - कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावाबरोबर कण्हण्याचा आवाज झाडातून येत होता...!


पिंपळ तोडताना उडालेला अफवांचा धुरळा हळूहळू खाली बसू लागला.चक्रवर्तीच्या बंगल्याचं काम पूर्णत्वाकडे पोहचायला लागलं.दुर्गापूजेच्या आठवडाभर आधी नवीन बंगल्यात राहायला जायचं आहे हे नवीनबाबूंनी बजावलंच होतं.एकीकडे बंगल्यातल्या आणि दवाखान्यातल्या फर्निचरचंही काम चालू होतं. बंगल्याचं काम सुरू होताच दवाखान्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणं मागवली गेली.आता गावकऱ्यांच्या भीतीचं आणि काळजीचं रूपांतर औत्सुक्य आणि कौतुकात झालं होतं तरीही पारावरचा तो देव नि पुरातन पिंपळ लोकांच्या मनात मधूनच डोकावत होते.शेवटी एकदाचं बंगल्याचं काम संपलं.


दवाखान्याचं उ‌द्घाटन डॉ.पटेल ह्यांच्याच हस्ते नवीनबाबूंनी केलं आणि दवाखाना सुरू केला. दवाखान्यात पहिल्यासारखी गर्दी होऊ लागली.इतका चकाचक दवाखाना,मुंबईहून आणलेली भारी मशिनरी... त्यामुळे डॉक्टरांचे धर्मादाय दवाखान्यासारखे मोफत उपचार तर सोडाच पण फी भरपूर असणार,बहुदा ती आपल्याला परवडणारी नसेल असा बहुतेकांचा समज झाला.पण दवाखान्यात गेल्यावर त्यांना धक्काच बसला ! पेशंटना बसण्यासाठी असलेल्या जागेत एका कोपऱ्यात एक लाकडी बॉक्स ठेवलेला होता.त्यावर ना दोन्ही डॉक्टरांची नजर होती ना दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांची.त्या बॉक्सवर पाटी लावली होती -


तुम्हाला परवडत असेल तरच आणि तेवढीच फी ह्या बॉक्समध्ये टाकावी.


सगळ्यांनीच ह्या उपक्रमाचं स्वागत केलं.नवलाची गोष्ट म्हणजे वेटिंगरूममध्ये बसलेले इतर पेशंट्स बाहेर जाणारी व्यक्ती त्या पेटीत पैसे टाकते की नाही ह्यावर लक्ष ठेवायचे.

काही चिकित्सक मंडळी तर कोण किती पैसे टाकतं हयावरही लक्ष ठेवायची.


दवाखाना नवीन जागेत सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच एका अडलेल्या बाळंतिणीची केस आली. तोपर्यंत आजूबाजूच्या गावातही सुईणीच बाळंतपण करायच्या.त्या आपल्या कामात पारंगत असत. त्यातल्या त्यात सावित्रीबाई तर फारच हुशार होत्या. त्यांच्याविषयीची एक गोष्ट लोक आवर्जून सांगतात -


एकदा सावित्रीबाई एका प्रतिष्ठित घरातल्या सुनेच्या बाळंतपणासाठी गेल्या होत्या.बाळाची जन्मवेळ जवळ यायला लागली आणि बाळ पायाळू जन्मणार अशी चिन्हं दिसायला लागली.कुटुंबप्रमुख स्त्री काळजीत पडली.

सावित्रीबाईंनी एक उदबत्ती मागवली आणि नवजाताच्या अस्पष्ट दिसणाऱ्या पायाच्या अंगठ्याला ती जळती उदबत्ती निमिषमात्र टेकवली.गर्भाशयातल्या बाळाने पटकन् पाय आत ओढून घेतला आणि ते गर्रकन् पोटातल्या पोटात फिरलं.बाळ पायाळू न होता कुटुंबाला हवं तसं नॉर्मल जन्मलं.चिंतेचं कारण उरलं नाही !


तर अशा ह्या कुशल सावित्रीबाईंनीही त्या अडलेल्या बाळंतिणीच्या केसपुढे हात टेकले होते.अशा अवस्थेत जिल्हयाच्या दवाखान्यात नेणंही अशक्य होतं.त्या काळात तिथेही सिझेरियनच्या केसेस दुर्मिळ होत्या आणि गावात तर अशी एकही केस झाली नव्हती. अशावेळी त्या चिंताग्रस्त कुटुंबाला डॉ.शामलींची आठवण झाली.ते ताबडतोब त्या अडलेल्या बाळंतिणीला घेऊन डॉ.

शामलींच्या दवाखान्यात आले. अमेरिकेत शिकलेल्या आणि प्रॅक्टिस केलेल्या डॉ. शामलींसाठी ही केस अगदीच किरकोळ होती. बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली.बाळंतिणीच्या कुटुंबाला इतका आनंद झाला आणि त्यांना इतकी कृतज्ञता वाटली की,ते अख्खं कुटुंब डॉ.शामलींच्या पाया पडायला लागलं.त्यांच्या कुटुंबप्रमुखाने फी विचारली तर डॉ.शामलींनी कोपऱ्यात ठेवलेल्या त्या बॉक्सकडे बोट दाखवलं.


ह्या केसनंतर डॉ.शामलींच्या कौतुकाच्या वर्षावात लोकांच्या मनातली पिंपळाची ती उरलीसुरली सावलीही नाहीशी झाली.खेड्यापाड्याच्या अडाणी बायका तर 'डागतरीन बाईला देवाचं वरदान आहे' असं मानायला लागल्या.

एकमेकींशी बोलताना त्या असा उल्लेख करून म्हणत,


"बय गं,आक्रीतच झालं ! बाईचं पोट फाडून पोर बाहेर काढलं अन् पोट परत शिवून बी टाकलं..."


ह्या प्रसंगानंतर गावातल्या तरुणींची तर डॉ.शामली नायिकाच झाल्या.अनेक बाबतींत त्यांचं अनुकरण होऊ लागलं.भांगात कुंकू भरण्याची फॅशन गावच्या विवाहित स्त्रियांमध्ये आली.कळस म्हणजे भडक लाल,हिरव्या, भगव्या रंगाच्या बॉर्डर असलेल्या पांढऱ्या आणि मोतीया रंगाच्या रेशमी साड्या एका हुशार दुकानदाराने 'शामली साडी' अशी जाहिरात करून विकायला सुरुवात केली !


एकंदरीत नवीनबाबू,शामली हे डॉक्टरद्वय ह्या लहानशा गावात रमले.रुळले.स्वतःकडे पाहायला आता त्यांना वेळ मिळू लागला होता.लोकांना विश्वासात घेऊन दवाखाना शनिवारी अर्धावेळच उघडा ठेवायला त्यांनी सुरुवात केली.गावाच्या बाहेर मामलेदार कचेरीनंतर आणि कोर्टाच्या आधी एक क्लब होता.नवीनबाबू आणि अर्थातच शामलीदेखील क्लबच्या सभासद होऊन दर रविवारी सकाळी क्लबमध्ये टेनिस खेळायला जाऊ लागले.एकदा शनिवारी संध्याकाळी नवीनबाबू आणि शामली एसटी स्टँडला लागून असलेल्या रस्त्यावरून पुढे गावाबाहेर पायीपायी फिरायला चालले होते. रस्त्यावरून पुढे गावाबाहेर साधारण तीनेक फर्लांग गेल्यावर एक छोटासा गाडी रस्ता पुढे गेलेला त्यांना दिसला.तो पुढे कुठे तरी धानोरे नावाच्या गावाकडे जात होता म्हणे.दोन्ही रस्त्यांच्या तिठ्यावर एक अर्धवट बांधकाम दिसलं.पूर्ण झालेला जो भाग दिसत होता तो उत्कृष्ट होता.डॉ.शामली म्हणाल्या,"आपलं आत्ताचं घर भरवस्तीत आहे.दवाखान्याच्या जागेसाठी नक्कीच सोयीचं आहे.पण राहायला अशी एखादी रमणीय जागा हवी.ह्या जागेचा आकार थोडा विचित्र आहे.एकूण जागा त्रिकोणी आहे." ह्या जागेसंबंधीही हे डॉक्टरद्वय डॉ.पटेलांशी बोललं. पुढचा भाग साठ फुटापर्यंत आणि तो निमूळता होत शेपटासारख्या टोकाला जेमतेम दोन फूट झाला होता. अशा जागेला व्याघ्रमुखी जागा म्हणतात आणि ती राहायला अशुभ मानली जाते.असं डॉ.पटेलांनी त्यांना सांगितलं.ह्यावेळीसुद्धा दोघांनाही ती जागा आवडल्यामुळे ती त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि आपल्या हौसेप्रमाणे बांधकाम पूर्ण करायला सुरुवात केली. ह्यावेळी 'जागा घेऊ नका' असा सल्ला मात्र गावातल्या कुणीच दिला नाही.


आता गावात येऊन डॉ.चक्रवर्तीद्वयांना एक वर्षं झालं होतं.ते त्यांच्या स्वतःच्या घरात राहयला गेले तेव्हा दुर्गापूजा जवळ आली होती.आता पुन्हा एकदा दुर्गापूजा आली.ही पूजा दणक्यात करायची असं ठरलं.दोघेही तयारीला लागले.बंगाली मिठाया बनवण्यासाठी बाहेरून आचारी बोलावले.सगळ्या बंगल्याला दीपमाळांनी सजवलं. गावातल्या काही खास जवळच्या लोकांना त्यांनी जेवायला बोलावलं.अगदी काटूनकुटून निमंत्रणं केली तरीही दीडशे माणसं झाली होती.इतर लोक संध्याकाळी प्रसादाला आणि नास्त्याला आले होते.


कार्यक्रम खूप धूमधडाक्यात झाला.नवीनबाबू पांढरा कुर्ता आणि बंगाली पद्धतीचं धोतर नेसून सोगा खांद्यावर टाकून लोकांचं आगत-स्वागत करत होते. लांब,काळेभोर केस मोकळे सोडलेल्या,

पांढऱ्या रेशमी साडीतल्या डॉ.शामली स्वतःच दुर्गा वाटत होत्या.डॉ. शामली विजेसारखी हालचाल करत सर्वत्र वावरत होत्या.बायाबापड्यांनी मनातल्या मनात हजारवेळा त्या दोघांची दृष्टी काढली.डॉक्टर पटेलांच्या पत्नीने तर शामलींना काजळाची लहानशी तीटसुद्धा लावली आणि अशीच तीट शामलींनी नवीनबाबूंना लावावी असंही सुचवलं.नवीनबाबू जरा थकलेले पाहून शामलींनी त्यांना विचारलं तेव्हा 'काही विशेष नाही' म्हणत त्यांनी शामलींचं बोलणं उडवून लावलं.आणखी तासाभराने मात्र ते शामलींना म्हणाले,"मी जरा वरती जाऊन पडतो. थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटतंय.तू पाहुण्यांकडे बघ." डॉ.शामलींनी त्यांचं ब्लडप्रेशर बघितलं.ते अगदी व्यवस्थित होतं.त्यामुळे शामली खाली आल्या आणि पाहुण्यांमध्ये मिसळून गेल्या.


सगळ्यांचं हवं-नको बघून नंतर सर्वांना निरोप देऊन डॉ. शामली वर बेडरूममध्ये गेल्या तेव्हा नवीनबाबू तापाने फणफणलेले दिसले.अर्धवट झोपेत ते अधूनमधून कण्हत होते.डॉ.शामलींनी त्यांना पॅरासिटामॉल दिली. पांघरूण घालता घालता त्या म्हणाल्या,


"नवीन,तुझी खूपच धावपळ झालीय.श्रमाने ताप आलेला दिसतोय.उद्याचा दिवस आराम कर.खाली दवाखान्यातदेखील येऊ नकोस.तुझे पेशंट मी बघेन."


डॉ.नवीन ह्यांनी मान डोलवली आणि परत त्यांना ग्लानी आली.

डॉ.शामलीही थकून गेल्या होत्या.नवीनची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी शेजारच्या बेडरूममध्ये जाऊन अंग टाकलं पण त्यांना झोप काही येईना डॉ. नवीन ह्यांना त्या लग्नाच्या आधीपासून ओळखत होत्या. दोघेही कलकत्त्यात शेजारीच राहत होते.आजपर्यंत डॉ. शामलींनी नवीनना आजारी पडलेलं पाहिलं नव्हतं. नियमित भरपूर व्यायाम करणाऱ्या दणदणीत प्रकृतीच्या नवीनना कधी साधा तापदेखील आलेला शामलींना आठवत नव्हता.रात्री मध्येच त्या नवीनच्या बेडरूमध्ये गेल्या.त्यांच्या कपाळाला हात लावून पाहिला तर त्यांचं संपूर्ण अंग घामाने डबडबलेलं होतं.हलकेच त्यांचा घाम टिपून त्यांना थोपटून शामली झोपायला गेल्या.दुसऱ्या दिवशी सकाळी नवीनचा ताप उतरला.

त्यांना फ्रेशपण वाटत होतं.पण शामलींनी त्यांना आराम करायला लावला.दोन दिवसांनंतर डॉ.नवीन ह्यांनी परत त्यांच्या नियमित आयुष्याला सुरुवात केली.पण साधारण आठवडाभराने त्यांना गळून गेल्यासारखं वाटलं म्हणून संध्याकाळचे त्यांचे पेशंट्स डॉ.शामलींनी तपासले.ह्या वेळेला नवीनना अधूनमधून चक्करही येत होती.दोन दिवस ते अंथरुणावरच होते.आता मात्र डॉ. शामलींना काळजी वाटू लागली.त्यांनी डॉ.पटेलांशी चर्चा केली आणि नवीनच्या सगळ्या टेस्ट्स केल्या. सगळ्या नॉर्मल आल्या पण नवीनचा बारीक ताप आणि थकवा काही कमी होत नव्हता.


हळूहळू नवीनचं वजन कमी होऊ लागलं.डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसू लागली.शामली नवीनना घेऊन डॉ. पटेल ह्यांच्या सोबतीने मुंबईच्या प्रख्यात डॉक्टरांकडे गेल्या.पुन्हा सगळ्या टेस्ट्स झाल्या पण निदान काही झालं नाही.बारीक ताप असे पण थोडासाच.थकवा येतच होता.गावाबाहेरचा बंगला तयार झाला होता पण तो बघायला जायचा उत्साह शामलींना नव्हता.थोडा बदल व्हावा म्हणून त्यांनी नवीनबाबूंना आग्रह करून क्लबमध्ये नेलं.पण नवीनबाबूंना चक्कर येऊ लागली म्हणून पाच मिनिटांतच ते तिथून निघाले.आता गावकऱ्यांमध्येही डॉक्टरसाहेबांच्या प्रकृतीच्या चिंतेचं सावट पसरलं.ह्या देखण्या जोडप्याला कुणाची तरी दृष्ट लागली असंही त्यांना वाटू लागलं.


एक दिवस अचानक नवीनबाबू शामलीला म्हणाले,"आपण नवीन बंगल्यात राहायला जाऊ.गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत कदाचित मला लवकर बरं वाटेल."


डॉ.पटेल ह्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने शामलींनी आवश्यक सामानासह नवीन बंगल्यात बस्तान हलवलं. दोन दिवस बरे गेले.पण नंतर परत पहिले पाढे पंचावन्न. सुरुवातीचे काही दिवस शामली तिथूनच दवाखान्यात येत-जात होत्या.पण त्यांची फारच धावपळ होऊ लागली होती.त्यामुळे डॉ.पटेलांना त्यांनी दवाखाना सांभाळण्याची विनंती केली आणि स्वतः नवीनबाबूंची सेवा करायला त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ राहू लागल्या.

नवीनबाबू आता फारच खंगले होते.त्यांचे कपडे त्यांना ढगळ होऊ लागले होते.एक एक पाऊल टाकणं जड जात होतं.घरातल्या घरात ते व्हील चेअरवर फिरत.डॉ.शामली त्यांना सकाळी -संध्याकाळी बंगल्याच्या बागेत फिरवत असत.आपल्या डॉक्टरांना असं व्हील चेअरवर बघून बंगल्याजवळच्या रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या लोकांना फार वाईट वाटे.


एक दिवस डॉ.पटेलांना 'ताबडतोब या' असा डॉ. शामलींचा निरोप गेला.नवीनबाबूंना रक्ताची मोठी उलटी झाली होती आणि ते कोमात गेले होते.आठ दिवस ते कोमातच होते.गावातल्या प्रत्येकाने त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.काहींनी मृत्युंजयाचे पाठ सुरू केले.शंकराला अभिषेक तर सतत चालूच होता.पण अखेर नवव्या दिवशी नवीनबाबूंची जीवनयात्रा संपली. गावातल्या एकाही घरात त्या दिवशी चूल पेटली नाही. गावाने एवढी मोठी अंत्ययात्रा पहिल्यांदाच पाहिली.हे सगळं होत असताना डॉ.शामली दगडी चेहऱ्याने शांत होत्या.त्यांच्या डोळ्यांतून एकही टिपूस निघाला नव्हता. त्यांच्या सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या.


आठ दिवस झाले.गाव अजून त्या धक्क्यातून सावरलं नव्हतं तोच त्याला आणखी एक धक्का बसला.डॉ. शामलींनी परत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता.डॉ.पटेलांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी मुंबईपर्यंत येण्याची विनंती केली होती.गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी एक सभा घेतली.त्या सभेत ठरल्याप्रमाणे चारपाच पुरुष त्यांच्या कुटुंबीयांसह गावाबाहेरच्या बंगल्यात डॉ.शामलींना भेटायला गेले. त्यांनी डॉ.शामलींनी अमेरिकेला परत जाऊ नये म्हणून गावाच्या वतीने विनंती केली.त्यातल्या एका पोक्त स्त्रीने डॉ.शामलींना आपल्या कुशीत घेतलं.त्यांच्या तोंडावरून हात फिरवत ती म्हणाली,


"बयो,तू गावातच राहा गं.माहेरवाशिणीसारखी आम्ही तुझ्यावर माया करू. तझी काळजी घेऊ..."


आता मात्र शामलींच्या भावनांचा बांध फुटला.उर फुटल्यागत त्या रडू लागल्या.त्यांचं आतापर्यंत बाहेर न फुटलेलं रडू बाहेर येणं आवश्यक होतं,हे सगळ्यांना समजत होतं.त्यामुळे कुणीही त्यांची समजूत न घालता त्यांना मनसोक्त रडू दिलं.रडण्याचा भर ओसरल्यावर स्वतःला सावरत पण शून्यात बघत डॉ.शामली म्हणाल्या, "आता माझा इथला शेअर संपला.इथल्या प्रत्येक गोष्टीत माझी आणि नवीनची स्वप्नं गोठलेली आहेत. मी आता इथे राहणं अशक्य आहे.आमचा प्रांत वेगळा,देश वेगळा.भाषाही वेगळी.तरीही तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याची आठवण बरोबर घेऊन मी जात आहे."


शामलींना मुंबईपर्यंत सोडून डॉ.पटेल परत आले. शामलींच्या दोन्ही घरांच्या आणि दवाखान्याच्या चाव्या आता त्यांच्याकडे होत्या.त्याचं त्यांनी काय करायचं ह्याचा निर्णयही शामलींनी त्यांच्यावरच सोपवला होता.डॉ.पटेलांनी गावाबाहेरचा बंगला आवरला. बाजारपेठेतलं घर आवरलं.ते बंद करण्यापूर्वी सगळीकडे एकदा त्यांनी फेरी मारून बघावं म्हणून दवाखान्याच्या मागच्या दरवाजातून ते परसात आले तर काय आश्चर्य !


मध्यभागी पिंपळाचं एक छोटंसं रोप तरारून वर आलं होतं.त्याची दोन छोटी पानं विजयी मल्लाने फड जिंकल्यानंतर हवेत बाहू पसरून आनंद व्यक्त करावा तशी दिमाखाने हवेत डुलत होती.