काही शतके बुद्धविचार हा भारतात मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला आणि त्यातून समाज ढवळून निघाला. ह्या मंथनातून निर्माण झालेल्या समाजाचे चित्रण मृच्छकटिक नाटकात दिसते.फार रेखीव,वस्तुनिष्ठ असे चित्रण,अतिशय उदार,स्वार्थाचा विचार न करणारा व्यापारी वर्गातला चारुदत्त हा श्रेष्ठी मृच्छकटिकाचा नायक आहे.सढळ हाताने मित्रांना मदत करताना तो अकिंचन बनलेला आहे.त्याच्या मुलाला तर आपल्यासारख्या श्रीमंत वर्गातल्या इतर मुलांप्रमाणे खेळायला सोन्याची गाडी-सुवर्णशकट हवे आहे.पण आता त्याच्या नशिबी आहे मातीची गाडी - मृत्शकट. चारुदत्तावर गावातली अति धनाढ्य गणिकर,वसंतसेना भाळली आहे.ती चारुदत्ताच्या मुलाचा आकान्त पाहून चारुदत्ताकडे आपले मूल्यवान सोन्याचे दागिने ठेवून जाते.वसंतसेनेमागे लागला आहे,जुलमी राजाचा मेहुणा, शकार.पण गणिका असूनही ती त्याला वश होत नाही. ह्याच राजाने केवळ ज्योतिषावर विश्वास ठेवून एका निष्पाप तरुण गवळ्याला तुरुंगात टाकले आहे.जेव्हा चारुदत्त आपल्या मित्र विदूषकाला वसंतसेनेचे दागिने परत करायला पाठवितो,तेव्हा तो वसंतसेनेची संपत्ती व तिच्या सहगणिकांबरोबर चाललेली श्रीमंतांच्या मुलांची चंगळबाजी पाहून थक्क होतो.हे सगळे धुरातत्त्वाला धरूनच आहे.समाजात स्वतःची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी कशी अचाट उधळपट्टी केली जाते ह्याचे नेटके वर्णन आहे.पण प्रस्थापित उच्च-नीच भाव मुकाट्याने सहन करण्याची जरूर नाही,जुलमाविरुद्ध धाडसाने प्रतिकार करून प्रचंड प्रतिष्ठा कशी प्राप्त होऊ शकते,हेही मृच्छकटिकात पुढे दाखवले आहे.जुलमी राजाचा वध करून हकनाक तुरुंगात टाकलेला गवळी तरुण स्वतः राजा बनतो.शिवाय चारुदत्त क्षमा, ्शांती अशी स्वार्थपरायणतेच्या अगदी वेगळी,बुद्धाच्या शिकवणीला अनुरूप,मूल्येही बाळगतो.ज्या जुलमी राजाच्या दुष्ट मेहुण्याने त्याच्यावर खुनाचा खोटा आरोप लादला होता,त्याला राजाचा वद झाल्यावर चारुदत्त उदार मनाने क्षमा करतो.
वसंतसेना नायकिणीच्या वाड्याचे वर्णन ह्या लावणीत, आपण किती प्रचंड खर्च करू शकतो ह्याचा दिमाख दाखवण्याच्या मानवी प्रवृत्तीचे सुरस चित्र डोळ्यापुढे उभे केले आहे.
वसंतसेना नायकिणीचा वाडा अवलोकुनी ।। जाहला दंग विदूषक मनी ।।धृ ।। चौबाजूनी चार जयाला उंच कोट बांधिले ।। तयामधि आठ चौक साधिले ।। पुढल्या दरवाजाच्या बाहिर हस्तिदंत मढविले ।। जरीचे वरती ध्वज लाविले ।। चंदन कुंकुम यांचे द्वारापुढे सडे घातले ।। त्यांवरी रंगवेल काढिले ।। चाल. ।। दोबाजूला सुवर्ण कुंभ शोभती ।। त्यांवरी फुलांचे स्थूळहार लोंबती ।। हलवी शुंडा जाणो ऐरावती ।। चाल पहिली ।। शोभित केला सुदृढ कपाटे हेमाची लावुनी ।। पहावा दुर्लभ ऐसा जनी ।। वसंतसेना नायकिणीचा वाडा अवलोकनी ।। जाहला दंग विदूषक मनी ।।१।। पहिल्या चौकामध्ये चौकडे रंगमहाल देखिले ।। तयाचे जिने जडित पाहिले ।। खर्णोखणी झुंबरे फानसे अरसे ही लाविले ।। रुजामे गजनीचे घातले ।। भरगच्चीचे पडदे लावुनि गुंडाळुनि ठेविले ।। खांब किनखापांनी मढविले ।। चाल ।। खिडक्यांवरती मोत्यांच्या झालरी ।। चौकांत चांदणी एके खांबावरी ।। वाटे आला इंद्राच्या मंदिरी ।। चा. प.।। पाहुनि शोभा करी अचंबा अहा काय ही घनी ।। कळेना पुढे अधिक याहुनी ।। वसंतसेना नायकिणीचा ।।२।। दुसऱ्या चौकामध्ये गाडिचे बैल थोर बांधिले ।। खाउनी रतिब पुष्ट जाहले ।। वेसण घालुनी लढाउ रेडे वर बांधुनि टाकिले ।। तयांच्या शिंगा तुप माखिले ।। लढाइ लावुनि मस्त एडके माघारे आणिले ।। तयांच्या माना रगडिति भले ।। चाल ।। अश्वांच्या कोणी आयालीस घांशिती ।। विंचरुनी त्यांच्या वेण्याही घालिती ।। हत्तीला कोणी जपुन रतिब चारिती ।। चा. प. ।। चोरापरि सांखळिने वानर टाकियला बांधुनी ।। पाहतो डोळे गुरकावुनी ।। वसंतसेना नायकिणीचा वाडा ।।३।। धनवंताचे पुत्र विलासी कामुक होउनि भले ।। आपुल्या गृहासि जे पातले ।। त्यांस बसाया मऊ रुजामे गर्दपोस पसरिले ।। तयांवर गालीचे टाकिले ।। रत्नखचित सोंगटी बुदबळे भर्जरिपट मांडिले ।। सवे खेळाया विट बैसले ।। चाल ।। चौरंगांवर उघडुनिया पुस्तके ।। वाचायाला ठेवियली कौतुके ।। जिकडे तिकडे सर्व दिसें नेटकें ।। चा. प. ।। पानसुपारी फुले फळावळ ताटामधि घालुनी ।। ठेविली मधे मधे मांडूनी ।। वसंतसेना नाय. ।।४।। चौथ्या चौकामध्ये नाना वाद्यध्वनि ऊठती ।। धिमिद्धिमि मृदंग मृदु वाजती ।। घेउनि वीणा त्यांच्या तारा बोटांनी हलविती ।। कोणी ही सारंगी घांशिती ।। सारिगमपधनी निधपमगरिसा सप्तसूर अळविती ।। जपुनिया तालगती साधिती ।। चाल ।।
कोणी गणिका गायन अभ्यासिती ।। कोणी तिकडे नाचाया शिकविती ।। कोणी त्याला हावभाव दाविती ।। चा. प. ।। कोणी माडीवरून खिडक्यांमध्ये उभ्या राहुनी।। ऐकती फार लक्ष लावुनी ।। वसंतसेना नाय. ।।५।। या चौकामधि नानापरिंची पक्कान्ने निर्मिती ।। करावी त्यांची गणती किती । केशर कस्तुरि गरम मसाले पाट्यावर वाटिती ।। तयांचे वास फार सूटती ।। हिंग जिऱ्यांच्या देति फोडण्या घेउनि थावर हती ।। तयांची खमंगाइ पसरती ।। चाल ।। इकडे कोणी श्रीखंडे गाळितो ।। तिकडे कोणी अटिव खीर घाटितो ।। तिकडे कोणी वांगिभात उकरितो ।। चा.प.।। कोणि म्हणेना भटजीबावा हातभार धूवुनि ।। बसावे भोजनास येउनी ।। वसंतसेना. ।।६।। येथे दरवाज्यास मुलामा सोन्याचा लाविला ।। त्यावरी रत्नराशि जोडिला ।। नानाविधभूषणे कराया शिल्पीजन बैसला ।। जवळ रत्नांचा ढिग घातला ।। त्या विप्राने संपत्तीचा डौल असा पाहिला ।। मनामधि चकित होउनि राहिला ।। चाल ।। कोणी मोती सूत्राने गुंफिती ।। कोणि भूषणे रेशमांत पटविती ।। कोणी रत्ने सहाणेवर घांशिती ।। चा.प. ।। कामी आणि कामिनी विनोदें मदिरारस पीवुनी ।। बैसली करांत कर घालुनी ।। वसंतसेना. ।।७।। या चौकामधि तहेत-हेचे पक्षी बहु पाळिले ।। तयांला भव्य गेह बांधिले ।। शुक पिक मैना बोलति त्यांला पिंजऱ्यात घातले ।। ते वरी खुंट्याला टांगिले ।। कपोत सारस राजहंस ते मोकळेच सोडिले ।। फिरति डौलाने जैसे भले ।। चा.।। लावक तित्तिर यांची युद्धे किती ।। मत्त मयूरी डौलाने नाचती ।। पुच्छे अपुली पाठीवर पसरिती ।। चा.प. ।। रांवा बोले मैना डोले हेच नवल देखनी ।। जना आनंद होतसे मनी ।। वसंतसेना. ।।८।। या बागेला अद्भुत शोभा फुलझाडे आणिती ।। सुवासिक रंगित बहु दीसती ।। जाइजुई मोगरा माधवी सोनटका शेवंती ।। चमेली गुलाब आणि मालती ।। मरवा दवणा पाच सुवासिक यांचे तक्ते किती ।। लागले त्यांची न करवे मिती ।। चा. ।। त्यांतहि फारच शोभा जळमंदिरी ।। कारंजाच्या धारा उडती वरी ।। भासे पर्जन्याची दृष्टी खरी ।। चा. प. ।। त्रैलोक्यांतिल शोभा येथे आलि जमा होउनी ।। वाटले ऐसे माझे मनी ।। वसंतसेना नायकिणीचा वाडा अवलोकुनी ।। जाहला दंग विदूषक मनी ।।९।।
( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
मृच्छकटिकात दिसते की आपण किती सामर्थ्यवान आहोत हे दाखवण्याच्या अगदी वेगळ्या दोन रीती मानवी समाजात वापरल्या जातात.म्हणतात ना,सगळी सोंगे आणता येतात,पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अगदी निष्कारण पैसे उडवायला आपल्याकडे खरेच पैसे हवेत.ह्यातून श्रीमंतांची उधळपट्टी उभी झाली आहे, आणि आज तर मोठ्या प्रमाणावर असे जोखड बाळगलेले बघायला मिळते.पण आपण किती सामर्थ्यवान आहोत हे अगदी वेगळ्या प्रकारे दाखवता येते - बलदंडांना,सत्ताधीशांना त्यांच्या अन्याय्य वर्तणुकीबद्दल आव्हान देऊन.
मृच्छकटिकातला अन्यायी राजाचा वध करणारा,अगदी साध्या कुटुंबातला तरुण गवळी हा अशा आव्हानाचे प्रतीक आहे. ...अपुर्ण...