* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पामटॉप / palmtop

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१९/१०/२५

पामटॉप / palmtop

एकदा वन विभागाकडून आम्हाला जमिनीवर राहणाऱ्या स्टार टॉरटॉईज कासवांची जोडी मिळाली.
टणक पाठीवर सुंदर नक्षीदार चांदण्या असणारी कासवं.ही दोन्ही कासवं आकाराने आणि वयानेही लहान होती.या कासवांचं वास्तव्य गवताळ आणि रेताड प्रदेशात असतं.निवडुंग,रानफुलं, कंदमुळं आणि मेलेल्या प्राण्यांचं मांस यावर त्यांची गुजराण होते.
भारतातल्या खडकाळ आणि गवताळ प्रदेशात प्रामुख्यानं त्यांचं वास्तव्य असतं.

या कासवांना त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला.त्यांच्या पिंजऱ्यामध्ये सहा-सात इंच जाडीचा वाळूचा थर टाकून सबस्ट्रेट तयार केला.वाळके ओंडके कल्पकतेने रचून त्यांच्यासाठी लपायच्या जागा तयार केल्या.
त्यातच पाण्याचं भांडं खुपसून ठेवलं. पिंजऱ्यामध्ये थोडे कॅक्टस आणून लावले.दररोज सकाळी बारीक चिरलेले टोमॅटो,गाजर,काकडी असा संमिश्र आहार आम्ही त्यांना देत असू,तर आठवड्यातून एकदा मटणाचा खिमा.पाव किलो खिमा हे दोघं तासाभरात फस्त करायचे.लवकरच त्यांचं बस्तान बसलं आणि मंडळी पार्कवासी झाली.

इतर प्राण्यांच्या तुलनेत या दोघांचा मुक्काम पूर्ण मूक होता.सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचं रूटिन शांततेत सुरू असायचं.अशी चार-पाच वर्षं गेली असतील.
दोघंही वयात आली,त्यांचं रुटिन बदलून गेलं.नर सतत मादीच्या मागे मागे फिरू लागला. त्याच्या या नव्या आगळिकीने मादी बऱ्याचदा वैतागून त्याच्यापासून दूर लपून बसायची;पण जेवायला बाहेर पडलं की पुन्हा नवरोबांचा पाठलाग सुरू,असं बरेच दिवस चालल.
हळूहळू तिला हा पाठलाग सुखद वाटू लागला असावा.पिंजऱ्यात फिरता हळूच आपली मान कवचाबाहेर वेळावून तो आपल्या मागे येतोय की नाही याची खात्री करून घेऊ लागली.त्यांचा रोमान्स चांगलाच बहरू लागला.

एकदा दुपारी असाच पाठलाग सुरू असताना कासवीण नेहमीसारखी पुढे पुढे जाण्याऐवजी अचानक थांबली.आश्चर्याने तोही थांबला. क्षणभरातच तिच्या थांबण्याचा अर्थ त्याला आणि पिंजऱ्याबाहेरून त्यांच्या प्रणयलीला पाहणाऱ्या आम्हाला कळला.
त्यांच्या मेटिंगचा क्षण आला होता.पुढचे दोन्ही पाय तिच्या अंगावर ठेवून तो घट्ट उभा राहिला.पुढचे दोन-तीन तास मधे मधे ब्रेक घेत त्यांचा समागम चालू होता.त्यानंतर चार-पाच महिने गेले असतील.आताशा पाठलाग प्रकरणही थांबलं होतं.दोघंही खाणं पिणं उरकल्यावर आपापले फिरताना दिसत होते.एका दुपारी कासवीण अधाश्यासारखी पाणी पिताना दिसली.वास्तविक जमिनीवर राहणारी,गवताळ-
रेताड प्रदेशात वावरणारी ही कासवं फारसं पाणी पीत नाहीत.अधाश्यासारखं पाणी पिण्याच्या या कृतीने मी थोडा गोंधळलो आणि सतर्कही झालो. सगळी कामं सोडून खुर्ची घेऊन तिथेच बसून राहिलो.पाणी पिऊन कासवीण एका कोपऱ्यात गेली.तिथली वाळू थोडीफार शाकारून एका जागी स्थिर बसून राहिली.
थोड्या वेळाने तिथल्या वाळूत तिने शू केली आणि ओल्या झालेल्या वाळूमध्ये आपल्या मागच्या दोन पायांनी खड्डा खणायला सुरुवात केली.त्यानंतर दोन तासांनी पुन्हा पाणी पिऊन आली आणि खड्डा खणू लागली.तिला कुणीही डिस्टर्ब करायचं नाही,अशा सूचना सर्वांना देऊन संध्याकाळी मी घरी गेलो.पुढचे दोन-तीन दिवस असेच गेले.पाणी प्यायचं,वाळूत शू करायची आणि ओल्या वाळूतला खड्डा खोल खणत न्यायचा असा उपक्रम कासवीने चालवला होता.चार दिवसांत खड्डा बऱ्यापैकी खोल झाला.पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून भल्या पहाटे मी त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलो,तेव्हा खड्डा पुन्हा वाळूने भरून गेलेला दिसला.मी काय ते समजलो. कासवीने त्यात अंडी देऊन वरून वाळू टाकली होती.त्यानंतर पुन्हा त्या दोघांचं वागणं अगदी नॉर्मल झालं.खाणंपिणंही पूर्वपदावर आलं.

चार महिने उलटले.एकदा सकाळी मी दूध आणि पेपर आणायला मेन गेटवर गेलो असता नेहमीच्या सवयीने कासवांच्या पिंजऱ्याजवळ डोकावलो आणि तिथलं दृश्य पाहून आनंदाने वेडा झालो. आमच्या कासवांच्या पिंजऱ्यामध्ये डॉलरच्या आकाराची इवली इवली चार पिल्लं मजेत फिरत होती.टोमॅटो,काकडी आणि पालकाच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर अक्षरशःतुटून पडली होती. आमच्या कासवांचा संसार फुलला होता. त्यांना बाळं झाली होती.न राहवून मी कुलूप उघडून पिंजऱ्यात गेलो.अंडी घातलेल्या घरट्यामध्ये उकरून बघितलं,तर अंड्यांची फुटलेली कवचं सापडली.थोडं टोकरल्यावर आणखी एक अंडं सापडलं.त्यातलं पिल्लू कदाचित मरून गेलं असेल असं वाटलं.पण कुतूहल स्वस्थ बसू देईना.त्या अंड्याच कवच हलकेच सोललं तर काय,माझ्या तळव्यावर एक छोटुकलं कासवाचं पिल्लू अवतरलं. त्याचं नीट निरीक्षण केलं तर त्याच्या पोटाखालच्या कवचामध्ये मला एक छोटं छिद्र दिसलं.त्यातून त्या पिल्लाची हृदयक्रियाही मला स्पष्ट दिसत होती. माझ्या तळहातावर जन्माला आलेल्या त्या पिलाचं नाव मी पामटॉप ठेवून टाकलं.
पोटातल्या छिद्रामुळे कासव कुटुंबातल्या या सर्वांत छोट्या सदस्याची थोडी जास्त काळजी घेण्याची गरज होती.त्यामुळे त्याला मी आमच्या बंगल्यावर घेऊन आलो.सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन 

पामटॉप दिसत छोटुकला असला तरी चांगलाच खादाड होता.काकडी,टोमॅटोची किंवा पेरूची फोड खायला दिल्यावर महाशय थेट फोडीवरच आरूढ घेऊन मुंडी खाली करून चरायला सुरुवात करत. बऱ्याचदा खाण्याच्या घाईत फोडीसकट तोल जाऊन तो थेट उताणा पडत असे.त्याला आपलं आपलं पुन्हा पालथं पडणं जमत नसे.त्यामुळे नुसतेच पाय हलवत वळवळ करत तो जागेवर गोल गोल फिरत राही.
आमच्यापैकी कुणाचं तरी त्याच्याकडे लक्ष गेल्यावर आम्ही त्याला सरळ करत असू.दरम्यानच्या काळात आमच्या घरी तो मस्त रुळला होता.पण शेवटी त्याला आपल्या भाईबंदांसोबत अन् नैसिर्गिक वातावरणात राहायला मिळणं गरजेचं होतं.महिन्याभराने त्याच्या पोटाचं छिद्र भरून आल्यावर त्यालाही आम्ही त्याच्या कुटुंबाबरोबर त्याच्या हक्काच्या घरी सोडलं.

…. समाप्त…