पण पायवाट-वारुळाचं सैन्य अजूनही बरचसं शाबूत होतं.एकूण प्रजेपैकी पंधराएक टक्के सैनिक होते. मजबूत चिलखती पायदळ होतं,हे.साधारण कामकरी मुंगीच्या दुप्पट आकार असायचा,
सैनिकांचा.सैनिक मुंग्यांचा बाह्य सांगाडा जाड आणि चिवट असायचा. त्यात खड्डे आणि उंचवटे घडून मजबुती आणिकच वाढलेली असे.शरीराच्या मध्याच्या चिलखतापासून दोन दणकट काटे कंबरेला संरक्षण द्यायला निघालेले असत. आणखी दोन काटे पुढे मानेला संरक्षण देत.डोक्याचा सांगाडा शिरस्त्राणासारख्या रचनेचा असे.जर कोणी या हत्यारबंद चिलखतधारी सैनिकांवर हल्ला केला,तर सैनिक शिंगं आणि पाय चिलखतात ओढून,अंग आक्रसून पूर्ण शरीराचीच ढाल करत असत.
साध्या कामकरी मुंग्यांनाही लढता येत असे,पण त्यांचं चिलखत हलकं असे.त्या नेटानं उभं ठाकून लढत नसत. त्यांचा मुख्य गुण म्हणजे वेगवान,चपळ हालचाली करता येणं.शत्रूभोवती रिंगण धरून पळताना मध्येच कमकुवत भागावर हल्ले करणं.एखादा पाय,एखादं शिंग धरून शत्रूला जखडून ठेवणं.असं शत्रूला जेरबंद केलं, की वारुळातल्या इतर मुंग्या येऊन शत्रूला दंश करायच्या,
त्याचे लचके तोडायच्या,त्याच्यावर विषारी द्रव्यं फवारायच्या,आणि शेवटी अनेक लहानशा मुंग्या मिळून मोठ्या शत्रूला मारून टाकायच्या.एखाद्या मोठ्या सांबराला किंवा नीलगाईला रानकुत्रे मारतात,तसेच डावपेच कामकरी मुंग्या वापरतात.
माणसांमध्ये हलक्या पायदळानं शत्रूच्या मशीन-गन ठाण्यांवरचे हल्लेही याच तंत्रानं केले जातात.
तर राणी मुंगी मेली तेव्हा पायवाट वारुळापाशी अशी दहा हजार सैनिक-कामकरी फौज होती.राणी मेल्यावर मात्र नवे सैनिक,नवे कामकरी घडणं संपलं.जे सैनिक, कामकरी होते ते वयस्क,म्हातारे व्हायला लागले. पायवाट वारुळाचं सगळ्यात शेजारचं वारूळ म्हणजे ओढ्याकाठचं वारूळ,ते पायवाट वारुळापेक्षा वयानं आणि आकारानं लहान होतं.आता मात्र ते शेजाऱ्याच्या दबळेपणातून फायदा कमवायला सज्ज झालं.एका पहाटे ओढ्याकाठच्या वारुळातनं एक अभिजन मूंगी निघाली.तिच्यामागे साध्या कामकरी मुंग्यांचा एक गट होता.ओढा अभिजन मुंगीन पायवाट वारुळाची स्थिती तपासायचं ठरवलं होतं.नेमकी स्थिती तपासणं सोपं नव्हतं.दोन वारुळांमध्ये सुमारे वीस मीटर अंतर होतं,
दोन हजार मुंग्याइतक म्हणा.सरळ वाटेनं हे अंतर एखादी मुंगी सहाएक मिनिटात ओलांडू शकली असती. पण वाट सोपी नव्हती.एक सेंटिमीटर लांब मुंगीच्या नजरेन पाहिलं तर मोठाले अडथळे होते.माणसांना झाडोऱ्याचं बेट दिसतं तसा एखादा गवताचा पुंजका मुंग्यांना दिसायचा.काड्याकाटक्या रस्त्यात पडलेल्या ओंडक्यांसारख्या दिसायच्या. माणसांना सपाट वाटणारी वाळू खडकाळ जमिनीसारखी वाटायची.
पाऊस ही तर मोठीच आपत्ती.मुंग्यांच्या अंगावर एक थेंब पडणं,आणि माणसांना अग्निशामक दलानं जोरदार नळाच्या झोतानं हाणणं,हे सारखंच समजायला हवं.एखादा बारका ओघळही मुंग्यांना एरवी कोरड्या पात्रातल्या महापुरासारखा वाटायचा.ओढा-अभिजन मुंगीला पायवाट वारुळाच्या क्षेत्राचा रस्ता आठवत होता,कारण ती एकदा तिकडे गेली होती. पण आता तिनं पूर्वी आखलेली फेरोमोन वासाची वाट पुसली गेली होती.
आता तिचा भर होता सूर्याची जागा पाहून वाट आठवण्यावर.आता सूर्य उगवतो आणि मावळतो.दिवसभर त्याची जागा सतत बदलत असते. पण मुंग्यांच्या मेंदूंमध्ये घड्याळ असावं तशी काळ मोजायची क्षमता असते.माणसांच्या मेंदूंना न जमणाऱ्या नेमकेपणानं मुंग्या सूर्याच्या बदलत्या जागांवर लक्ष ठेवू शकतात.बदलत्या जागेप्रमाणे कोन कसेकसे बदलतात, हेही मुग्या जाणू शकतात.आपल्या नोकोबीच्या जंगलात सूर्य दिवसभरात कसा प्रवास करतो.हे मुंग्याना माहीत असतं.तो पूर्वच्या तळ्याकाठच्या झाडांमधून उगवतो, आणि वारुळांच्या थेट वरून पश्चिमेच्या जंगलात मावळतो.कोणत्यावेळी तो कुठे असेल,हे मुंग्यांना नेमकं माहीत असतं.पण तरीही मुंग्या अधूनमधून थांबतात, आणि आजूबाजूचा भाग डोळ्यांनी तपासतात. आठवणीतल्या खुणा तपासून आपण कुठे आहोत याचा अंदाज घेतात.एकदोन शेजारीशेजारी वाढलेली रोपटी, पानांमधून गोलाकार दिसणारा,आकाशाचा तुकडा, एखादी दाट सावली,अशा या खुणा असतात. आणि सोबतच वास-चवीचं वातावरणही असतं, आधीच्या फेऱ्यांमधून आठवणारं.या एका आठवणींच्या प्रकाराबाबत आपण माणसं फार कल्पनाही करू शकत नाही.
ओढा-अभिजन मुंगीचं शरीर खालच्या जमिनीच्या दोनेक मिलिमीटर वर होतं.ती आपली शिंगं खाली वाकवून,जमिनीजवळ नेऊन वेगानं धावत होती.शिंगं डावीउजवीकडे वळवत होती.
वास,त्यांचं मिश्रण,ते तीव्र होताहेत की मंदावताहेत,सारं नोंदून तिच्या बारीकशा मेंदूत एक नकाशा उमटत होता.
सडणारा,कुजणारा पाचोळा,त्यावर जगणाऱ्या बुरश्या आणि जिवाणू,या प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा वास असतो.मुंग्यांना तो 'दिसतो'.दर चौरस मीटरमध्ये अशा अडीच-तीन लाख वासांचं मिश्रण असतं,आणि मुंग्यांना ते वास येतात आणि आठवतातएखादा वास सांगतो, "इथे अन्न आहे." दुसरा सांगतो,"इथे धोका आहे."सगळ्या संदेशांचा अर्थ क्षणोक्षणी लावत मुंग्या जगत असतात.
त्या अर्थ लावण्यातूनच त्यांचं टिकून राहणं आणि मरून जाणं ठरत असतं.आणि आपल्याला ह्या प्रचंड तपशिलानं भरलेल्या विश्वाची जेमतेम कल्पना करता येते.ओढा-अभिजन मुंगी पायवाट वारुळाच्या दिशेनं चालली होती,पण तिला त्या वारुळात जायचं नव्हतं.तिची 'मंझिल' होती,एक दोन्ही वारुळांमधलं मैदान.मैदान फारतर दीड-दोन वितींचं होतं,पण मुंग्यांच्या मापांत ते प्रचंड मोठं होतं.आणि या मैदानात ओढा-अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार यांना भेटले पायवाट अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार.पायवाट अभिजन मुंगीनं राणीचा मृत्यू पाहिला होता.नंतरच्या सत्तास्पर्धेतून स्वतःचं वारूळ जरासं स्थिरावताना पाहिलं होतं.आता ती अन्न शोधत आपल्या वारुळाच्या क्षेत्राच्या अगदी बाहेरच्या सीमेवर आली होती.हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले,आणि त्यांच्यात एक किचकट नाच चालू झाला.हा माणसांमध्ये असतो तसा नाच नव्हता.खरं तर तो एक सामना होता, दोन वारुळांमधल्या स्पर्धेसारखा.दोन्ही बाजूच्या मुंग्या पुढ्यातल्या बाजूची ताकद आजमावत होत्या.दुसऱ्याची ताकद तपासतानाच स्वतःच्या ताकदीची जाहिरातही केली जात होती.असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका वाटत नव्हता.
मृत्यूचा तर नाहीच,पण जखमांचाही धोका नव्हता.शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं होतं हे;पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं.त्यातनं आपली सुरक्षा वाढेल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.
या सामन्याच्या वेळी ओढ्याकडेचं वारूळ पूर्ण जोमात होतं.
आसपासच्या कोणत्याही वारुळाला हरवू शकेल, इतकी त्याची ताकद होती.मरू घातलेल्या पायवाट वारुळाला हरवण तर फारच सोपं होतं.ओढा-राणी सहा वर्षांची होती.माणसांच्या मापात तीसेक वर्षांची.भरपूर अंडी देत असायची.वारूळभर तिच्या राजस फेरोमोन्सचा सुगंध होता.वारुळाची जागाही चांगली,
सहज न खचणारी होती.एक बाजू ओढ्यानं, आणि दूसरी बाजू एका कोरड्या घळीनं सुरक्षित होती. इतर कोणतं वारूळ जवळ येणार नाही,असे तेज उतार वारुळाचं रक्षण करत होते.हे काही ठरवून झालं नव्हतं. केवळ योगायोगानं ओढा-राणीला मोक्याची जागा सापडली होती.जागा निवडण्याची बुद्धी राणी मुंग्यांमध्ये नसते.तर ओढा-अभिजन आणि तिचे साथीदार,पायवाट-अभिजन आणि तिचे साथीदार,असा मोठा जमाव मैदानात आला.दोन्ही बाजूंकडून साधारण सारख्याच संख्येनं मुंग्या होत्या.दोन्ही वारुळांच्या काही मुंग्या मात्र आपापल्या घरी जाऊन आणखी कुमक आणायच्या प्रयत्नांत होत्या.सगळ्या मैदानाभोवती लहान-लहान खड्यांवर चढून दोन्हीकडच्या मुंग्या शत्रूवर लक्ष ठेवत होत्या.घराकडे परतणाऱ्या प्रत्येक मुंगीला सौम्यसा शत्रूचा वास येत होता.त्यामुळे ती कोणाशी लढायला बोलावते आहे,ते कळत होतं.आता नुसत्या अभिजन आणि कामकरी मुंग्याच नव्हेत,तर सैनिक मुंग्याही मैदानावर येऊन पोचायला लागल्या. तासाभरात मैदान दोन्हीकडच्या शेकडो मुंग्यांनी फुलून गेलं.पण ही युद्धाची सुरुवात नव्हती.माणसांची सैन्यं जशी एकमेकांना घाबरवायला मिरवणुका काढतात, आपापसातच सराव-युद्धं खेळतात,तसा हा प्रकार होता. भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच.
शक्तिप्रदर्शन करणारी प्रत्येक मूंगी आकारानं मोठी दिसायचा प्रयत्न करत होती.पोटात द्रव भरून पोट फुगवली जात होती.पाय ताठ करून जास्त उंच दिसायचा प्रयत्न केला जात होता.कोणी तर खड्यांवर चढून आणिकच उंच होत होत्या.असं 'छाती फुगवून' चालताना दुसऱ्या वारुळाच्या मुंग्यांना मुद्दाम घासत जाणं,धक्के देणं,सारं सुरू होतं.आणि काही लहानशा मुंग्या शत्रूचा हिशेब मांडत होत्या.दुसऱ्या वारुळाकडे किती मुंग्या आहेत,त्यांची ताकद किती आहे, खाऊन-पिऊन जोमदार आहेत की नाहीत,सगळं नोंदलं जात होतं.जर शत्रूच्या मुंग्या आपल्याकडच्यांपेक्षा जास्त वाटल्या,तर आणखी मुंग्या बोलावल्या जात होत्या.हे जर जमलं नाही,तर शत्रूला आपोआप आपला दुबळेपणा कळण्याचा धोका होता.पायवाट-वारूळ राणी मुंगी मरण्याआधीही जरा दुबळं वाटायला लागलं होतं.त्यांचा प्रयत्न असायचा,की सामने आपल्या वारुळाजवळ व्हावेत;म्हणजे जास्त संख्याबळ दाखवणं सोपं जाईल.विशेषतः सैनिकांना जर लवकर मैदानात उतरवता आलं,तर शक्तिप्रदर्शन सोपं व्हायचं. अर्थात,शत्रूची ही पीछेहाट ओढा-मुंग्यांना पायवाट वारुळाची खरी स्थिती सांगतच असायची.आता तर पायवाट-वारुळाकडे पर्यायच नव्हता.त्यांना घराजवळ राहणं सक्तीचं होतं;आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्राही कमी होत होतं.
१३.१०.२५ या लेखातील भाग क्रमश:हा क्रम मागे पुढे आहे…धन्यवाद