* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/१०/२५

एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens 

तर सगळी जुळवाजुळव झाली.तालमी सुरू झाल्या. कॉलेज-कॅण्टीनची नवी टुमदार इमारत होती. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर ती मोकळीच असायची. ती जागा तालमींना मिळाली.

तालमी सुरू झाल्या आणि दोन चार दिवसांतच माझ्या लक्षात आलं की दिग्दर्शक काहीच करत नाहीयेत नुस्ते खुर्चीवर बसून राहताहेत. दोन वेळा चहा पिऊन निघून जातायत ! स्कूलचे दोन तीन अनुभवी नट सोडले तर आम्ही सारेच नवीन होतो. नुस्ते एका जागी उभे राहून भाषणे वाचीत होतो. स्कूलच्या ज्येष्ठ नटांना विचारलं तर ते म्हणाले, 'हे नेहमी असंच नाटक बसवतात.आम्ही आपापसातच हालचाली वगैरे ठरवतो.' मी घाबरलोच.मी म्हणालो,'

मग आपण दुसऱ्या कुणाला तरी दिग्दर्शक देऊ या.' तर हे म्हणतात, 'इतक्या वर्षांत आमची कुणाला छाती झाली नाही - तूही त्या भानगडीत पडू नको.मेडिकलची नाटकं त्यांना पिढीजात आंदण दिली आहेत असं ते मानतात.ते दुखावले गेले तर नाटक बंदसुद्धा पाडतील !' मी भलताच हवालदिल झालो.मला नाटकात काम करण्याचा अनुभव नसला तरी एव्हाना मी खूप नाटकं पाहिली होती.'नाटकं बसवावी लागतात','प्रयोग बांधेसूद असावा लागतो' वगैरे शब्द मी भालबांच्या तोंडून अनेक वेळा ऐकलेले होते.आमच्या शाळेतले फाटक परचुरे सरांनी बसवलेले 'बांधेसूद' प्रयोग मी पाहिलेले होते.पुढे रांगणेकरांची नाटकं पाहून तर 'नाटक बसवणं' म्हणजे काय याचा बऱ्यापैकी अंदाज मला आलेला होता.भालबांची आठवण झाल्याबरोबर मला एकदम आशेचा किरण दिसला.मी भालबांच्या घरी जाऊन दाखल झालो आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.ते म्हणाले,"एक दिग्दर्शक असताना मी होऊन मधे लुडबूड करणे मुळीच बरे नाही.माझे आणि त्या दिग्दर्शकाचे फार चांगले संबंध आहेत.ते दुखावले जातील." मी म्हटले,"ते दुखावले जातील म्हणून नाटकाचा चुथडा होऊ द्यायचा का ? तुम्ही त्यांच्या नकळत तालमी घ्या ! त्यांना पत्तासुद्धा लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो.आमच्या कॅण्टीनला दोन खोल्या आहेत.एका खोलीत आमच्या अधिकृत तालमी चालतात.तुम्ही गुपचूप दुसऱ्या खोलीत भूमिगत तालमी घ्या !"नाटकाचा चुथडा होण्याचा माझा मुद्दा भालबांना पटला.आणि ते अनिच्छेने का होईना माझ्या कटात सामील झाले.आमच्या दुहेरी तालमी सुरू झाल्या. 


अधिकृत तालमीत चाललेल्या प्रवेशात ज्यांचे काम नसायचे ते तिथून हळूच सटकायचे आणि मागल्या खोलीत जाऊन भूमिगत तालमीत सामील व्हायचे.तिथे भालबा त्यांची तालीम घ्यायचे ! दुसऱ्या दिवशी त्या पात्रांत झालेली सुधारणा पाहून अधिकृत दिग्दर्शक खूश व्हायचे ! 'वंदे मातरम्'चा आमचा प्रयोग बऱ्यापैकी बांधेसूद झाला.मी आयुष्यात प्रथमच स्वेच्छेने ('अक्कल हुशारीने' म्हणता येईल - पण 'नशापाणी न करता' असं म्हणता येणार नाही कारण नाटकांची चांगलीच नशा तोपर्यंत चढली होती.) केलेला पहिला नाटकाचा प्रयोग पुण्यात लिमये मांडववाल्याच्या 'लिमये नाट्य-चित्र मंदिरात' (आजचे विजय टॉकीज) डिसेंबर १९४६ मध्ये झाला.मी स्वतः ड्रामा सेक्रेटरी असल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगाच्या आधी दोन-चार दिवस माझी प्रचंड धावपळ चाललेली होती.लिमयांकडे जाऊन पडदे निवड,नवयुग स्टुडिओतून सर्व पात्रांचे कपडे भाड्याने आण,घरोघर हिंडून नाटकात वापरलं जाणारं सगळं सामान गोळा कर.अनंत कटकटी.माझ्या भूमिकेवर एकाग्र होणं वगैरे अशक्यच होतं.

सगळ्या धावपळीत रात्री प्रयोग केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला तेही कळलं नाही.पण सुरू झाला,व्यवस्थित झाला आणि संपलाही ! लोकांना चक्क आवडला ! प्रयोग संपला आणि मग मात्र मी दीक्षित सरांच्या सिगरेटच्या धुरासारखा एकदम हलका झालो.सरळ अंतराळातच गेलो तरंगत ! खूप जणं विशेषत: दीक्षित सर आत येऊन शाबासकी देऊन गेले पण मी हवेतच । इतकी वर्षं जिवाचं पाणी करून टाकणारी भीती एकदम कुठे नाहीशी


झाली ? कशी नाहीशी झाली ? क्वचितच कुठेतरी दबा धरून बसलीही असेल.एखाद्या पडद्याच्या मागे.पण तिच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला उसंत कुठे होती ? नाटकाचा पडदा वर जायच्या आधी आपण ड्रामा-सेक्रेटरी होतो आणि पडदा वर गेल्याबरोबर आपण 'त्रिभुवन' झालो.ती भीती श्रीराम लागूला शोधत राहिलेली असणार । म्हणजे सुरवंटाला.आता बैस म्हणावं शोधत.आता तो मुळी सुरवंट राहिलेलाच नाही -फुलपाखरू झालाय ! तालमींच्या वेळी आपण ड्रामा सेक्रेटरी असल्यामुले आपल्याला अधिकृत तालीम सोडून कधी जाताच आलं नाही.मग आज एवढं सराइतासारखं त्रिभुवनचं काम आपण कसं केलं ? अरे हा कसला प्रश्न ? आपण स्टेजवर असताना आपले सगळे गुरू अवतीभवतीच तर होते.पॉल म्यूनी, कोल्मन,

सोहराब मोदी,जागीरदार,इन्ग्रिड बर्गमन,नानासाहेब,

गणपतराव सगळे आपल्याला हाताला धरून नेत नव्हते का ? असं काय काय डोक्यात काहूर माजलं होतं.त्या धुंदीत मी रात्रभर कुठेकुठे भटकत राहिलो.धुंदी ! हा शब्द मी नुसता वाचत होतो, ऐकत होतो.त्या रात्री ती अवस्था प्रत्यक्ष अनुभवली.

दुसऱ्या दिवशीचा प्रयोग मी प्रचंड आत्मविश्वासाने केला.


ग्रॅहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो! मला वाटतं ती खिडकी त्या क्षणी उघडली होती.


एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षात असताना गॅदरिंगला 'पुण्यप्रभाव' नाटक केलं. फायनल परीक्षा तीन महिन्यांवर आली असताना आणि नापास होण्याची खात्री समोर दिसत असतानाही 'वृंदावन' करण्याची संधी हातातून टाकून देणं शक्यच नव्हतं.

कदाचित ते आयुष्यातलं शेवटचं काम असणार होतं.नानासाहेब फाटकांचा 'वृंदावन' पाहिला होता आणि त्यानं मला चांगलंच पछाडलं होतं.तेव्हा खूप मन लावून मी वृंदावन' केला आणि ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये नापास झालो ! ऑक्टोबरच्या परीक्षेत मात्र पास व्हायचंच या निश्चयानं मग जोरात अभ्यासाला लागलो.पण पहिली चिंता हीच की आता कॉलेज सुटणार -तर आता नाटकं कुठे करायची ! जयंत धर्माधिकारी त्याच वर्षी फर्ग्युसनमधून बी.ए. झाला होता.त्याचीही हीच समस्या होती कॉलेज सुटलं,आता नाटकं कुठे करायची। तो कॉलेजच्या नाटकात नेमानं कामं करायचा. त्यालाही नाटकाचं चांगलंच वेड होतं. 


एक दिवस तो आणि भालबा हॉस्टेलच्या माझ्या खोलीवर आले.

काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणाले. आम्ही तिघं समोरच्या इराण्याकडे जाऊन बसलो. जयंतानं कुठल्याशा वृत्तपत्राचं एक कात्रण बरोबर आणलं होतं.दादर (मुंबई)ला 'दादर नाट्यकलोपासक' नावाची एक हौशी नाट्यसंस्था होती.तिनं हौशी नाट्यसंस्थांकरता एक नाट्यस्पर्धा आयोजित केली होती.प्रथम क्रमांकाच्या नाट्यप्रयोगाला एकशे एक रुपये बक्षीस मिळणार होतं ! जयंता आणि भालबा चांगलेच उत्तेजित झालेले होते.

एकरकमी एकशे एक रुपये मिळणं हे १९५१ साली चांगलंच आकर्षक होतं. (ते आपल्याला मिळणार असं आम्ही गृहीतच धरलं होतं.) पण त्याहीपेक्षा,नाटक करायला मिळणार हे जास्त महत्त्वाचं होतं.मग त्याकरता संस्थेचं पाठबळ हवं. आम्ही तर सगळेच कॉलेज शिक्षण संपलेले सडेफटिंग. तर मग आपण संस्था स्थापन करायची! त्यात काय ?


खरं म्हणजे त्या वेळी पुण्यात 'सोशल क्लब' आणि 'महाराष्ट्रीय कलोपासक' अशा दोन प्रतिष्ठित हौशी नाट्यसंस्था बरीच वर्षं काम करीत होत्या.त्यांची नाटकं आम्ही पाहिलेली होती.भालबा तर तोपर्यंत पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजात नाटकं बसवायला जात होते आणि जयंत काय किंवा मी काय,सतत चार-पाच वर्षं कॉलेजच्या नाटकांत कामं करून बक्षिसं मिळवत असल्यानं हौशी नाट्यक्षेत्रात बऱ्यापैकी मांहीत झालेलो होतो.तेव्हा या दोन्ही संस्थांनी आम्हांला त्यांच्यात ओढायचा प्रयत्न केलेला होता.पण एक तर त्या संस्थांमध्ये सगळी बुजुर्ग मंडळी होती आणि मुख्य म्हणजे त्यांची नाटक सादर करण्याची पद्धत आम्हांला फार भडक,जुनाट वाटायची.त्यामुळे आम्ही त्यांना टाळत होतो.

आम्हांला काही तरी वेगळं करायचं होतं ! म्हणजे नेमकं काय करायचं होतं ते माहीत नव्हतं.पण तिथं जे चाललं होतं त्याबद्दल तीव्र असमाधान होतं. आणि आपल्याला काही तरी वेगळं – अधिक वास्तवदर्शी असं काहीतरी करायचं आहे अशी एक निश्चित खूणगाठ मनाशी होती.तेव्हा आपण आपली स्वतःची संस्थाच काढली पाहिजे असं काही तरी स्वप्नाळू बोलणं आमच्यात मधूनमधून व्हायचंही.आता या नाट्यस्पर्धेत प्रयोग करण्याची संधी आली आहे तर संस्था स्थापन करूनच टाकू या म्हणून आम्ही इराण्याच्या संगमरवरी टेबलाभोवती बसून चहाचा पाचवा कप पितापिता संस्था स्थापन करून टाकली.आचार्य अत्र्यांचं 'उद्याचा संसार' नाटक करायचं हेही त्यातल्या सगळ्या भूमिकांसह ठरवून टाकलं.तीन चार तास उत्साहानं फसफसून चर्चा करून एवढा महत्त्वाचा निर्णय एकमतानं घेतला म्हणून सगळेच खूश होतो.मी फक्त हिरमुसलो.

कारण परीक्षेच्या अभ्यासापायी मला 'बॅ.विश्राम' करायला मिळणार नव्हता !भालबा केळकर वाडियाचे,जया फर्ग्युसनचा,मी मेडिकलचा,लीला देव एस.पी.

कॉलेजच्या,ताराबाई घारपुरे तर बी.ए. होऊन बरीच वर्षं झालेल्या.तेव्हा संस्थेचं नाव ठेवलं 'इंटर कॉलेजिएट ड्रॅमॅटिक असोसिएशन !' त्या वेळी इंग्रजी नाव ठेवायची पद्धत रूढ होती.भालबांनी नेहमीप्रमाणे अगदी मन लावून,खूप मेहनत घेऊन 'उद्याचा संसार' बसवलं,आणि मुंबईला जाऊन मंडळींनी स्पर्धेत प्रयोग करून चक्कच पहिलं बक्षीस मिळवलं ! पण ते दोन संस्थांत विभागून ! म्हणजे हातात पन्नास रुपये आठ आणे.पहिल्याच प्रयत्नात पहिलं बक्षीस मिळणं म्हणजे फारच उत्साहवर्धक होतं. सगळ्यांना संस्थेविषयी एकदम आपुलकी,अभिमान वगैरे वाटायला लागला.आणि पहिल्याच फटक्याला संस्थेकडे साडेपन्नास रुपये भांडवल होतं ! मग काय ? तातडीनं पुढच्या नाटकाची तयारी सुरू झाली.एवढ्या काळात माझी परीक्षा होऊन मी एम.बी.बी.एस. झालो होतो. (पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'लमाण' या आत्मचरित्रातून)


प्रगतिपुस्तक…!


विद्यार्थ्यांचे नाव : डॉ. श्रीराम लागू


जन्म : १६ नोव्हेंबर १९२७


परीक्षेचा निकाल : चौथीत नापास


प्रगतीची वाटचाल : 'वेड्याचं घर उन्हात', 'उद्ध्वस्त धर्मशाळा',


'नटसम्राट','हिमालयाची सावली' इत्यादी नाटकांतील आणि 'सामना','सिंहासन' ह्या चित्रपटातील भूमिका गाजल्या.हिंदी सिनेमात अनेक महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. 'लमाण' हे आत्मचरित्र प्रसिद्ध,सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्वपूर्ण सहभाग.अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित…. समाप्त