* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२५/७/२३

निर्माता शेक्सपियर भाग २

या नाटकात टिमॉन हा एकच सिनिक नाही. अपेमॅन्टस नावाचा तत्त्वज्ञानीही सिनिकच आहे.मानवजातीचा मूर्खपणा पाहून तोही नाक मुरडतो;पण टिमॉनची दुःखी विषण्ण कटुता व अपेमॅन्टसचा उपहासात्मक चावटपणा यात फरक आहे.मानव मानवाशी माणुसकी विसरून वागतो,हे पाहून टिमॉनला जीवन अशक्य होते. पण तेच दृश्य पाहून अपेमॅन्टस उपहासाने हसतो.त्याला जणू सैतानी आनंद वाटतो.टिमॉन हे जग नाहीसे करून ज्यात प्रेमळ मित्र असतील,असे नवे जग निर्मू पाहतो. पण अपेमॅन्टस जगाला नावे ठेवतो,जग सुधारू इच्छित नाही.

अथेन्समधील एक सरदार त्याला "किती वाजले? किती समय आहे?"असे विचारतो.तेव्हा तो उत्तर देतो,

"प्रामाणिक असण्याचा हा समय आहे." पण आजूबाजूला जरासे प्रामाणिक जग दिसले तर मग जगाची टिंगल कशी करता येईल ? 'जग वाईट असावे. म्हणजे गंमत पाहता येईल.' अशी अपेमॅन्टसची वृत्ती आहे.मित्रांची कृतघ्नता पाहून टिमॉनला मरणान्तिक यातना होतात,प्राणांतिक वेदना वाटतात,अपेमॅन्टसला ती मोठ्याने हसण्याची संधी वाटते! एकाच नाटकात टिमॉन व अपेमॅन्टस यांची पात्रे रंगविणारा फारच सूक्ष्मदर्शी असला पाहिजे.त्याला स्वभावदर्शन फारच सूक्ष्म साधले आहे.बारीकसारीक छटा दाखविणे फार कठीण असते.

पण शेक्सपिअर स्वभावदर्शनात अद्वितीय आहे.

टिमॉनशिवाय अपेमॅन्टसला पूर्णता नाही,अपेमॅन्टसशिवाय टिमॉनला पूर्णता नाही.दोघांच्याद्वारे मिळून जगातील अन्यायाला शेक्सपिअर उत्तर देत आहे.जगाचा उपहास करणारा शेक्सपिअर या दोघांच्या डोळ्यांनी बघून उत्तर देत आहे. 'हॅम्लेट'मध्ये व्यवहारी माणसाचे,संसारी शेक्सपिअरचे,रामरगाड्यात पडलेल्या शेक्सपिअरचे जगाला उत्तर आहे.त्याच प्रश्नाला जगातील अन्यायाला त्याने उत्तर दिले आहे. जगातील नीचता पाहून टिमॉन आत्महत्या करतो.अपेमॅन्टस हसतो,पण हॅम्लेट काय करतो? तो खुनाचा सूड घेऊ पाहतो.हॅम्लेट टिमॉनपेक्षा कमी भावनाप्रधान आहे,पण अपेमॅन्टसपेक्षा अधिक उदार वृत्तीचा आहे. तो जगातील अन्यायाला शासन करू पाहतो.जुन्या करारातील 'डोळ्यास डोळा', 'दातास दात', 'प्राणास प्राण', 'जशास तसे' हा न्याय त्याला पसंत पडतो.

जगातील अन्याय पाहून हॅम्लेटच्या मनावर जशी प्रतिक्रिया होते.तशीच सर्वसामान्य माणसाच्या मनावर होते.


टिमॉनप्रमाणे तो जगापासून पळून जात नाही किंवा अपेमॅन्टसप्रमाणे जगाचा उपहासही करीत नाही.तो विचार करीत बसतो.या सर्व जगाचा अर्थ काय याची मीमांसा करीत बसतो.पण शेवटी त्याच्या भावना जेव्हा पराकोटीला पोहोचतात,तेव्हा तो प्रहार करतो.मात्र तो प्रहार दुष्ट कृत्यांवर नसून दुष्ट कृत्य करणाऱ्यांवर असतो आणि असे करीत असता तो आपल्या शत्रूचा व स्वतःचाही नाश करून घेतो.


'सूड घेणे हेच जणू जीवनाचे उदात्त ध्येय'असे हॅम्लेटला वाटते.या सूड घेण्याच्या पवित्र कर्माच्या आड त्याच्या मते ऑफेलियाचेही प्रेम येता कामा नये.हॅम्लेटचे जग एकंदरीत जंगलीच आहे.जरी तिथे तत्त्वज्ञानाचे विचार व सुंदर सुंदर वाक्ये ऐकावयाला आली तरी सूडभावना हेच परमोच्च नीतितत्त्व म्हणून येथे पूजिले जात आहे असे दिसते.हॅम्लेट नाटकातले सारं काव्य दूर केल्यास ते अत्यंत विद्रूप वाटेल.त्यात थोडीही उदात्तता आढळणार नाही.हॅम्लेट हा एक तरुण व सुंदर राजपुत्र असतो.त्याची बुद्धी गमावून बसतो.पित्याचे भूत आपणास खुनाचा सूड घेण्यास सांगत आहे.असे त्याला वाटते व त्याचे डोके फिरते.तो मातेची निंदा करतो व ज्या मुलीशी तो लग्न करणार असतो,तिला दूर लोटून देतो.ती निराश होऊन आत्महत्या करते.तो तिच्या भावाला व बापाला ठार मारतो.नंतर आईला मारून तो स्वतः ही मरतो आणि हे सर्व कशासाठी ? तर भुताला दिलेल्या सूड घेण्याच्या वचनाच्या पूर्ततेसाठी! सूडाच्या एका गोष्टीसाठी ही सारी दुःखपरंपरा ओढवून आणणे वेडेपणाचे वाटते.एका सूडासाठी केवढी ही जबर किंमत! या नाटकाचे 'दारू प्यायलेल्या रानवटाने लिहिलेले नाटक' असे वर्णन व्हॉल्टेअरने केले आहे ते बरोबर वाटू लागते.सारे मानवी जीवन मानवी जीवनाचे हे सारे नाटकसुद्धा एका दारुड्यानेच लिहिले आहे असेच जणू आपणासही वाटू लागते.

पण शेक्सपिअर जीवनाकडे फार संकुचित दृष्टीने पाहतो असे म्हणणाऱ्या संकुचित दृष्टीच्या टीकाकाराचे हे मत आहे.शेक्सपिअरच्या प्रज्ञेचा व प्रतिभेचा केवळ एक किरण हॅम्लेटमध्ये दिसतो.मानवी जीवनातल्या अनंत गोष्टींतील सूड ही केवळ एक गोष्ट आहे.त्याप्रमाणेच हॅम्लेटमध्ये शेक्सपिअरच्या अनंत विचारसृष्टीतील एकच गोष्ट दिसते.ते त्याचे वा जगाचे संपूर्ण दर्शन नव्हे. शेक्सपिअर हा जादूगार आहे.तो निसर्गाचे पूर्णपणे अनुकरण करू शकतो.त्याने हॅम्लेटला स्वतःच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची मूर्ती बनविलेले नाही.हॅम्लेटद्वारा स्वत:च्या बुद्धीचा फक्त एक भाग त्याने दाखवला.अनंत पात्रांद्वारा त्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे.सृष्टी आपले स्वरूप विविधतेने प्रकट करते.कोठे एक रंग, कोठे दुसरा,कोठे हा गंध,कोठे तो.तसेच या कविकुलगुरूचे आहे.त्याच्या नाटकी पोतडीत हॅम्लेटमधल्या विचारांपेक्षा अधिक उदात्त विचार भरलेले आहेत.निसर्ग कन्फ्यूशियसला प्रकट करतो.तद्वतच हॅम्लेटलाही निर्मितो.पण जगाचे पृथक्करण करताकरता,प्रयोग करताकरता, निसर्गाला व शेक्सपिअरला सुडापेक्षाअधिक उदात्त व सुंदर असे काहीतरी दाखवायचे असते. हे जे काहीतरी अधिक सुंदर व अधिक उदात्त आहे,ते आपणाला 'टेंपेस्ट'मध्ये पाहण्यास मिळेल.


'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात शेक्सपिअर जगातील अन्यायाला उपहासाने उत्तर देतो.हॅम्लेटमध्ये जगातील अन्यायाची परतफेड सुडाने करण्यात आली आहे.पण टेंपेस्टमध्ये अन्यायाची परतफेड क्षमेने करण्यात आली आहे.टिमॉन व हॅम्लेट यांच्याप्रमाणेच प्रॉस्पेरोही दुःखातून व वेदनांतून गेलेला आहे. पण दुःखाने तो संतापत नाही तर उलट अधिकच प्रेमळ होतो.त्याच्या हृदयात अधिकच सहानुभूती उत्पन्न होते.ज्यांनी त्याच्यावर आपत्ती आणलेली असते,त्यांच्याबद्दलही त्याला प्रेम व सहानुभूती वाटते.तो जगाला शिव्याशाप देत नाही.जगाचा उपहासही करीत नाही.तर आपल्या मुलांच्या खोड्या पाहून बाप जसा लाडिकपणे हसतो, तसा प्रॉस्पेरो हसतो.

टेंपेस्टमध्ये उपहास व तिरस्कार यांचा त्याग करून जरा अधिक उदात्त वातावरणात शेक्सपिअर एखाद्या हृदयशून्य देवाप्रमाणेच मानवाची क्षुद्रता आणि संकुचितता पाहून मिस्कीलपणे हसतो.तो एखाद्या राजाला सिंहासनावरून खाली खेचतों व 'हा तुझा डामडोल,ही तुझी ऐट सर्व नष्ट होऊन किडे तुला खाऊन टाकणार आहेत.त्या किड्यांना मासे खातील व ते मासे एखाद्या भिकाऱ्याच्या पोटात जातील.' असे त्याला सांगतो.पण टेंपेस्टमध्ये जरा रागवायचे झाले,तरी तो रागही सौम्य व सुंदर आहे.या नाटकात कडवट व विषमय उपहासाचे उत्कट करुणेत पर्यवसान झाले आहे.


आता आपण टेंपेस्टमधील कथा जरा पाहू या. प्रॉस्पेरो हा मिलनचा ड्यूक.तो हद्दपार केला जातो.तो आपल्या मुलीसह एका जादूच्या बेटावर राहतो.तिचे नाव मिरान्दा.

त्याच्या भावानेच त्याला मिलनमधून घालवून दिलेले असते.भावाचे नाव न्टोनिओ.नेपल्सचा राजा अलोन्सो याच्या मदतीने तो भावाला हाकलून देतो.प्रॉस्पेरो व त्याची तीन वर्षांची मुलगी यांना गलबतात बसवून तो ते समुद्रात सोडून देतो.हे गलबत सुदैवाने या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.तिथे प्रॉस्पेरो मुलीला शिकविण्यात व मंत्रतंत्राचा अभ्यास करण्यात वेळ घालवतो. एरियल नामक एक विद्याधर असतो व कॅलिबन नामक एक राक्षस असतो. त्या दोघांना वश करून तो त्यांना आपली सेवा करावयास लावतो.एके दिवशी एक गलबत त्या बेटाच्या बाजूने जात असते.गलबतात एका लग्न समारंभाची मंडळी असतात,ट्यूनिसहून ही मंडळी इटलीस परत येत असतात.या मंडळीत राजा अलोन्सो व ॲन्टोनिओ हे असतात.यांनी प्रॉस्पेरोला हद्दपार केलेले असते.राजाचा भाऊ सेबॅस्टियन व मुलगा फर्डिनंड हेही त्यांच्याबरोबर असतात.


प्रॉस्पेरो आपल्या मंत्रसामर्थ्यानि समुद्रावर एक वादळ उठवतो.ते गलबत वादळातून जात असता या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.प्रॉस्पेरो एरियलला सर्व उतारूंना वाचवण्यास सांगतो. पण वाचवल्यावर त्यांना बेटावर चारी दिशांना अलग अलग करण्याची सूचना देतो.फर्डिनंड बापापासून वियुक्त होतो व बाप मेला असे वाटून शून्य मनाने भटकत भटकत प्रॉस्पेरोच्या गुहेकडे येतो.वस्तुतः तो तिकडे जादूमुळे खेचला गेलेला असतो.मिरान्दाची व त्याची तिथे दृष्टिभेट होऊन दोघांचे परस्परांवर प्रेम जडते.

एक शब्दही उच्चारला जाण्यापूर्वी हृदये दिली घेतली जातात.


पण बेटाच्या दुसऱ्या एका भागावर सेबॅस्टियनने व ॲन्टोनिओ राजाचा खून करण्याचे कारस्थान करीत असतात.तर कॅलिबन व गलबतातून आलेले काही दारूडे खलाशी प्रॉस्पेरोचा खून करू पाहतात.हे बेट मंतरलेले असल्याचे त्यांना माहीत नसते.हे पाहुणे ज्या जगातून आलेले असतात त्या जगातील अनीतिविषयक प्रचार व मूर्खपणा येथेही करू लागतात.तेव्हा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान प्रॉस्पेरो त्यांचे सारे रानवट बेत हाणून पाडतो.राजाला व त्याच्याबरोबरच्या लोकांना त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल शासन करावे असे प्रॉस्पेरोला प्रथम वाटते.पण एरियल दैवी विचारांचा असल्यामुळे तो प्रॉस्पेरोला अधिक थोर दृष्टी देतो व सांगतो, "राजा, त्याचा भाऊ आणि तुझा भाऊ सारेच दुःखी व त्रस्त आहेत.

त्यांच्या दुःखाचा पेला काठोकाठ भरलेला आहे.त्यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे.तुझ्या जादूचा त्यांच्यावर फार परिणाम झाला आहे.तू त्यांना पाहशील तर तुझेही हृदय विरघळेल.तुझ्या भावना अधिक कोमल होतील." यावर प्रॉस्पेरो विचारतो,"विद्याधरा,तुला खरेच का असे वाटते?" एरियल उत्तर देतो, "मी मनुष्य असतो,तर माझे हृदय विरघळले असते.माझ्या भावना कोमल झाल्या असत्या." तेव्हा प्रॉस्पेरो म्हणतो, "तू अतिमानूष आहेस.

जणू वायुरूप आहेस.तरीही जर तुला त्यांच्याविषयी इतकी सहानुभूती वाटते,तर मग मी मानव असल्यामुळे, त्यांच्याच जातीचा असल्यामुळे,मला का बरे वाटणार नाही? त्यांच्याप्रमाणेच मीही सुख-दुःखे भोगतो,मलाही वासनाविकार आहेत.मग मला माझ्या मानवबंधूविषयी तुला वाटतात,त्यापेक्षा अधिक प्रेम व दया नको का वाटायला ? त्यांनी केलेले दुष्ट अन्याय आठवून माझे हृदय जरी प्रक्षुब्ध होते.तरी माझ्यातल्या दैवी भागाने,उदात्त भावनेने मी आपला क्रोध जिंकीन व दैवी भागाशीच एकरूप होईन.एरियल,जा.त्यांना मुक्त कर."


टिमॉनने सिनेटरांजवळ काढलेले उद्गार व प्रॉस्पेरोचे हे एरियलजवळचे उद्गार त्यांची तुलना करा.म्हणजे मानवी अन्यायाकडे मानवी दृष्टीने पाहणे व अमानुष दृष्टीने पाहणे यातील फरक लक्षात येईल.


प्रॉस्पेरो अती मानुष आहे.शेक्सपिअरने किंवा सृष्टीने निर्मिलेला अत्यंत निर्दोष व सर्वांगपरिपूर्ण असा मानवी स्वभावाचा नमुना म्हणजे प्रॉस्पेरो. हा शेक्सपिअरच्या सृष्टीतील कन्फ्यूशियस होय. हृदयात अपरंपार करुणा व सहानुभूती असल्यामुळे नव्हे;तर त्याची बुद्धी त्याला 'क्षमा करणे चांगले' असे सांगते.म्हणून तो क्षमा करतो. ज्या जगात राहणे प्रॉस्पेरोस प्राप्त होते,त्या जगात भांडणे व द्वेष,मत्सर,महत्त्वाकांक्षा व वासनाविकार,फसवणुकी व अन्याय,वंचना व स्पर्धा,पश्चात्ताप व सूड यांचा सर्वत्र सुळसुळाट आहे! पण प्रॉस्पेरोसचे मन या जगातून अधिक उंच पातळीवर जाऊन,या क्षुद्र धुळीपलीकडे जाऊन विचार करू लागते.तो जीवनाची कठोरपणे निंदा करीत नाही.तो स्मित करतो व जरासा दुःखी असा साक्षी होऊनच जणू राहतो. त्या मंतरलेल्या बेटावर मिरांदाला आपल्या पित्याहून वेगळी आणखी माणसे दिसतात,तेव्हा ती आश्चर्यचकित होते.पिता वगळल्यास अन्य मानवप्राणी तिने आतापर्यंत पाहिला नव्हता. नवीन माणसे दिसताच ती एकदम उगारते, "काय आनंद! अहो, केवढे आश्चर्य! किती सुंदर ही मानवजात! किती सुंदर व उमदे हे जग. ज्यात अशी सुंदर माणसे राहतात!" पण प्रॉस्पेरो मुलीचा उत्साह व आनंद पाहून उत्तर देतो, "तुला हे जग नवीन दिसत असल्यामुळे असे वाटत आहे!" अनुभवाने त्याला माहीत झालेले असते की,या जगातील प्रत्येक प्राणी जन्मजात सैतान आहे. या सैतानांना कितीही उपदेश केला तरी तो 'पालथ्या घड्यावर पाणी' या न्यायाने फुकटच जातो. त्याचा कोणाही माणसावर विश्वास नसतो,तरी तो सर्वांगसुंदर प्रेम करतो. शेक्सपिअरने निर्मिलेल्या पात्रांपैकी प्रॉस्पेरो हे सर्वोत्कृष्ट आहे.एवढेच नव्हे,तर खुद्द शेक्सपिअरच जणू परमोच्च स्थितीतील प्रॉस्पोरोच्या रूपाने अवतरला आहे असे वाटते. प्रॉस्पेरोप्रमाणेच खुद्द शेक्सपिअरही एक जादूगारच आहे.

त्याने आपल्या जादूने या जगात पऱ्या,यक्ष,गंधर्व,किन्नर इत्यादी नाना प्रकार निर्मिले आहेत.भुतेखेते,माणसे वगैरे सर्व काही त्याने निर्मिले आहे.त्याने आपल्या जादूने मध्यान्हीच्या सूर्याला मंद केले आहे.तुफानी वाऱ्यांना हाक मारली आहे.खालचा निळा समुद्र व वरचे निळे आकाश यांच्या दरम्यान महायुद्ध पेटवून ठेवले आहे.पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वत्र रणांगण पेटवून ठेवले आहे.

शेक्सपिअरचा हुकूम होताच आत्मे जागृत होऊन थडग्यातून बाहेर पडतात.थडग्यांची दारे उघडतात! महान जादूगार! 


सर्जनाची परमोच्च स्थिती अनुभवून प्रॉस्पेरोप्रमाणेच शेक्सपिअरही मग आपली जादू गुंडाळून ठेवतो.

टेंपेस्टमध्ये परमोच्च कला प्रकटवून तो आपली जादूची कांडी मोडून टाकतो व आपली जादूची पोतडी गुंडाळून ठेवून नाट्यसृष्टीची रजा घेतो.मथ्थड डोक्याच्या मानवांना उपदेश पाजून,त्यांची टिंगल करून, त्यांचा उपहास करून दमल्यावर आता तो केवळ कौतुकापुरता साक्षी म्हणून दुरून गंमत पाहत राहतो.शेक्सपिअर अज्ञातच मेला! त्याची अगाध बुद्धिमत्ता,त्याची अद्वितीय प्रतिभा जगाला कळल्या नाहीत,पण जगाच्या स्तुतीची त्याला तरी कोठे पर्वा होती ?


२१.जुलै.२०२३ या लेखातील शेवटचा भाग..

२३/७/२३

हृदयस्पर्शी जगायला सांगणारी गोष्ट

बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजा जवळून मला कोणीतरी बोलवत होते.कोण असेल बरे या उत्सुकतेने मी बाहेर गेलो.एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातील पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखे वाटत होते. 


हातातील कागद बघून त्याने विचारले, "बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का ?" होय मीच आनंद मी उत्तरलो. 


त्याचे ओठ थोडेसे थरथरले कोरड्या ओठावरून त्यांनी जीभ फिरवली व स्वतः जवळील पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले,"बाबू मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आपल्या गावाकडून आलो तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले आणि तुझी मदत मागायला सांगितले आहे".


"माझ्या वडिलांनी" मी  पुटपुटलो आणि उत्सुकतेने पत्र वाचू लागलो.


प्रिय आनंद,अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्याचे नाव रमय्या खूप कष्टाळू आहे.

काही दिवसापूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा एका अपघातात मृत्यू पावला.नुकसानभरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय.आताच्या परिस्थितीत खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे.

मी सोबत पोलिस पंचनामा आणि ईतर सर्व कागदपत्रे पाठवीत आहे.भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असे त्याला सांगितले गेले आहे.त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तेथे अनोळखी आहे.मला खात्री आहे की तू त्याला मदत करू शकशील तुझी काळजी घे,आणि शक्य तेवढ्या लवकर आम्हाला भेटायला ये ..


तुझे प्रिय बाबा. .


मी पत्र वाचत असताना रामय्या मला न्याहाळत होता क्षणभर विचार केला,आणि त्यांना आत बोलावले त्यांना पाणी देऊन त्यांनी काही खाल्लेले आहे का याची चौकशी केली."नाही, प्रवास थोडासा लांबला त्यांमुळे मी फक्त बरोबर आणलेली दोन केळी खाल्ली",रामय्या म्हणाले.


आत जाऊन मी चार डोसे तयार केले,आणि लोणच्या-

बरोबर त्यांना देऊन म्हटले,"तुम्ही खाऊन घ्या". मी बाहेर जाऊन काही फोन केले.मी परत आलो तोपर्यंत त्यांनी डोसे संपवले होते व हातात काही कागद घेऊन ते बसले होते. त्यांच्या हातात त्यांच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक २२ वर्षांचा असावा माझे डोळे पाणावले. 


"हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्मलेले सर्वजण काही ना काही कारणाने देवाघरी गेले,त्याचे नाव महेश.तो चांगला शिकला आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. मी सर्व अडचणींवर मात करीन आणि तुमची चांगली काळजी घेईन असे तो म्हणाला होता. त्या अमंगल दिवशी त्याला रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि त्यातच जागच्या जागीच त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखूष होतो,परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघीही थकत चाललो आहोत,तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिले,

ठीक आहे आता फार उशीर झालाय तुम्ही आराम करा.

असे सांगून मी देखील झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो. कॉफी पिऊन बाहेर पडलो.वाटेतच थोडसं खाल्लं आणी ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचलो.


"आनंद आता मी सर्व काम करीन तू तुझ्या ऑफिसला जा,रामय्या म्हणाले. "काही हरकत नाही मी आज रजा घेतली आहे.",मी उत्तरलो. त्यांच्याबरोबर राहून मी त्यांना भरपाईची सर्व रक्कम मिळवून दिली."मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे, त्यामुळे मी लगेच परत जातोय."रामय्या म्हणाले. "चला मी तुम्हाला बस स्टैंड वर सोडतो.",मी त्यांना बस स्टँडवर आणले बसचे तिकीट काढून दिले प्रवासासाठी बरोबर काही फळे घेऊन दिली.त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कृतज्ञता दाटून आली होती. 


ते म्हणाले, "आनंद बाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली.घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगीन व त्यांचेही आभार मानीन." 


मी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणालो, "मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही. माझे नाव अरविंद आहे.काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात.त्या आनंदचे घर अजून दोन किलोमीटर लांब होते.तुम्ही आधीच खुप थकला होतात.तुम्हाला सत्य सांगायचे माझ्या जीवावर आले.मी पत्रावरील आनंद च्या नंबरवर फोन केला चौकशी केली.आनंदच्या पत्नीने सांगितले. की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे. मी तुमच्या मित्राला फोन करून हे सर्व सांगितले खूप दुःखी झाले.जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचे आश्वासन दिले तेव्हा त्यांना बरे वाटले.

तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे.परंतु मला वाटले मी तुम्हाला मदत करावी,आणि मी ती केली.यामुळे मला फार समाधान लाभले." 


बस सुटताना रामय्या यांनी माझे हात आपल्या हातात धरले,त्यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावलेले होते."परमेश्वर तुझे भले करो" त्यांचे निघतानाचे शब्द होते.


मी वर आकाशाकडे पाहिले.मला वाटले माझे वडील तिथेच कुठे तरी असले पाहिजेत. "बाबा तुम्ही रामय्याच्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होतात,का? मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात ? तुमच्या सारख्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझे कर्तव्य बजावले आहे तुम्हाला आनंद झालाय ना ?" 

आनंदाश्रूंनी माझे डोळे भरून गेले .


दुसऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा.वाट आपोआप सापडेल.


अनामिक


परवाच कामावर निघालो होतो.पावसाने फार वाट बघायला लालली.व एकदाचा वाजत गाजत आला.

अखंडपणे पाऊस पडत होता.त्या पावसामध्ये एक व्यक्ती एका गाडीतून उतरली.कामावर जाण्यास उशीर झाला होता.मेनन रिंग कंपनीच्या पुढे त्यांना जावे लागणार होते,वेळ झालाच होता.मला काय वाटले कोणास ठाऊक मी त्यांना पाहून कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय गाडी थांबवली,बसा म्हणालो.काही क्षण गेले व ते म्हणाले,

धन्यवाद देवासारखे धावून आलात.मी म्हणालो आपण अगोदर माणूस बनूया देव ही फार पुढची गोष्ट आहे.


जो माणूस 'अधिक' चांगले होण्यासाठीचे प्रयत्न थांबवितो तो माणूस 'चांगले' होणे देखील थांबवितो.ऑलिव्हर क्रॉमवेल - ब्रिटिश राजकारणी व सैनिक (1599-1558)


ते म्हणाले माझी गाडी बंद पडली आहे.दुरुस्ती

साठी मिस्त्री जवळ लावून आलो आहे.मी 'दररोज' कुणीही हात केला तरी त्या मानसाला गाडीवरून घेवून जातो.मी त्यांचे आभार मानले. व हे चांगुलपणाचे काम नेहमीच करा,असे सांगितले.तुम्ही जे काम करता त्या कामाची प्रतिक्रिया म्हणजेच मी तुम्हाला हात न करताही गाडीवरुन घेवून आले.कारण मी 'दररोज' कुणालाही गाडीवर घेत नाही. कारण घर जवळच आहे.या कारणाने पण तुम्हाला पाहून तुम्हाला पाहून गाडीवर घ्यावे.हे मला मनापासून वाटले.हाच तुमचा चांगुलपणा सो .. लगे..रहो.!


कंपनीच्या गेटबाहेर गाडी थांबवून त्यांना उतरले.गाडी पार्किंगमध्ये लावली.मनापासून या गोष्टींचे चिंतन करतच होतो.तेवढ्यात लिओ टॉल्स्टॉय न चुकता म्हणालेत.


जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही जिवंत आहात.जर तुम्हाला इतर लोकांच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही माणूस आहात.


विजय कृष्णात गायकवाड





२१/७/२३

नवसृष्टी निर्माता शेक्सपियर

एक लाख वर्षांपर्यंत निसर्ग मानवाचे निरनिराळे नमुने बनवीत होता,मानवांवर प्रयोग करीत होता. शेवटी १५६४ साली सर्व संमीलित ज्ञान एकत्र ओतून निसर्गाने एक मूर्ती जन्माला घातली,ती शेक्सपिअर ही होय.


या जगात अनेक अनाकलनीय गूढे असतात. शेक्सपिअरसारख्यांची अलौकिक बुद्धी हे एक गूढच आहे.शेक्सपिअरचे आईबाप सामान्यांहून सामान्य होते.त्याच्या पित्याला स्वत:ची सहीही करता येत नसे.तो मोजे विणी,लोकर पिंजी,तो एका अज्ञात कुटुंबात जन्मला.आकाशात तेजाने तळपला;त्याच्या वंशात पुन्हा पुढे कोणीही चमकले नाही.शेक्सपिअरच्या पूर्वी आणि नंतरही त्याचे कूळ अज्ञातच होते.त्याला तीन मुली होत्या.त्यांपैकी दोघी दहा जणींसारख्या होत्या; पण तिसरी मात्र अगदीच अडाणी होती.


शेक्सपिअर म्हणजे निसर्गाची एक लहर होती. निसर्गाच्या हातून ही व्यक्ती नकळत जन्माला घातली गेली.तो मानवांत अती मानुष,देव होता. त्याच्या मनाची खोली कार्लाइललाही कळली नाही;जॉर्ज ब्रँडिसनेही त्या कामी हात टेकले आणि कोणाही टीकाकाराला तिचा अंत लागणार नाही,असे म्हणण्याचे धाडस मी करतो. शेक्सपिअर समजून घेणे म्हणजे सृष्टीचे गुंतागुंतीचे गूढच समजून घेणे होय.जीवनाचा हा जो विराट खेळ चालला आहे,जीवनाचे हे जे विराट नाटक चालले आहे,तेच शेक्सपिअरने थोडक्यात आपल्या नाट्यसृष्टीत निर्मिले आहे.त्याची नाटके म्हणजे सृष्टीची प्रतिनिर्मिती आहे. 


अमेरिकन कवी व तत्त्वज्ञानी संतामना एका सुनीतात म्हणतो,"शेक्सपिअरला निर्मून ईश्वराने सृष्टी दुप्पट केली."


शेक्सपिअरला जणू देवाची बुद्धी व देवाची भाषा लाभल्या होत्या!पण बाह्यतः मात्र त्याचे जीवन अगदी निराळे होते.

या कविसम्राटाचे जीवन जगातील अत्यंत नीरस जीवनासारखे होते.वयाच्या चौदाव्या वर्षी तो एका खाटकाजवळ उमेदवार म्हणून राहिला.त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सव्वीस वर्षाच्या एका बाईने त्याला किंवा त्याने तिला मोह पाडला.तिचे नाव ॲन हॅथावे.तिच्याशी लग्न झाल्यावर लवकरच स्वतःचे स्ट्रॅटफर्ड गाव त्याला सोडावे लागले. कारण हरणे चोरण्याच्या आरोपावरून त्याला अटक होणार होती.लंडनला आल्यावर तो रंगभूमीकडे वळला.तो सतरा वर्षे नाटके लिहीत होता.

नाटकात बारीकसारीक कामेही तो करी. रंगभूमीवर काम करण्याबाबत तो उदासीन होता. आपली सारी नाटके छापून काढावीत,असे त्याला कधीही वाटले नाही.धंद्यात त्याने कमाई केली व तो थोडीफार सावकारी करू लागला.ऋणकोंनी वेळेवर पैसे न दिले तर तो फिर्याद करी तो दरसाल एकदा कुटुंबीयांना भेटावयास जाई.


आयुष्याच्या अखेरीस त्याने स्टॅटफर्ड येथे एक घर विकत घेतले व तिथे तो मरेपर्यंत एखाद्या सुखवस्तू गृहस्थाप्रमाणे राहिला.रंगभूमीवरील काम करणारे वागत,तसाच तोही वागे.ते वागणे मोठेसे सुसंस्कृत अगर सदभिरुचीला पोषक होते असे मुळीच नव्हे. एकदा तर त्याने इतकी दारू घेतली की,तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली झिंगून पडला! प्रेमाची विफलताही त्याने अनुभविली होती.तो आपल्या एका सुनीतात लिहितो,"माझी प्रियकरीण जेव्हा 'मी सत्यनिष्ठ आहे' असे सांगते,तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो;पण ती खोटे बोलत आहे हे मला ठाऊक असते."नारीजनांना आकर्षण वाटेल असा पुरुष तो नव्हता,पण कधीकधी आपल्या प्रतिस्पर्थ्यांना तो प्रेमस्पर्धेत जिंकी.त्याचे कौटुंबिक जीवन सुखाचे नव्हते.ते वादळी होते.मरेपर्यंत त्याची पत्नी त्याला सतावीत होती. त्याने आपल्या मृत्यूपत्रात तिला केवळ आपला एक भिकार बिछाना चांगला होता तो मात्र ठेवला.थोडक्यात त्याची जीवनकथा ही अशी आहे.पण या हकिकतीने त्याच्या मनाचा थांग लावून घेण्यास प्रकाश मिळत नाही.मनुष्य या दृष्टीने त्याच्याच नाट्यसृष्टीतल्या कॅलिबन नावाच्या पात्राहून फार फार तर थोड्या उच्च दर्जाचा तो होता,असे म्हणता येईल.कॅलिबन हा अत्यंत क्षुद्र वृत्तीचा व क्षुद्र वासनाविकारांत लडबडलेला असा दाखविण्यात आला आहे.पण मानवजातीचा शिक्षक या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिल्यास तो पृथ्वीवरच नसून स्वर्गातील आहे,असे वाटते.तो अती मानुष वाटतो.क्षुद्र मनाच्या या मानवात तो चुकून जन्माला आला असावा,असे वाटते.


जगातील अत्यंत प्रतिभासंपन्न प्रज्ञावंतांनी शेक्सपिअरच्या बुद्धीचे मोजमाप करण्याची खटपट केली,त्याची विचारसृष्टी तर्कदृष्टीने मांडून दाखविण्याची त्यांनी पराकाष्ठा केली.पण तो खटाटोप यशस्वी झाला नाही.

टीकाकार त्याला रोमन कॅथॉलिक म्हणतात.कोणी त्याला नास्तिक म्हणतात,कोणी देशभक्त मानतात,तर कोणी युद्धविरोधक मानतात.कोणी त्याला प्रवचनकार समजतात,तर कोणी त्याला सिनिक म्हणजे कशातच अर्थ नाही,असे म्हणणारा मानतात. कोणी त्याला मानव्यवादी म्हणतात,तर कोणी 'संशयात्मा' म्हणतात.कोणी त्याला राजांचा बडेजाव करणारा म्हणतात.वस्तुतः तो यापैकी काहीच नव्हता;पण असे असूनही तो सारे काही होता असे विरोधाभासाने म्हणावे लागते.! कोणाही एका मनुष्याचे वा मानवसंघाचे जे विचार अगर त्याच्या ज्या कल्पना असू शकतील, त्यांच्यापलीकडे शेक्सपिअरचे विचार व कल्पना जात.तो विचारसिंधू होता,कल्पनाविश्वंभर होता. तो जे जे पात्र निर्मी,त्याच्या त्याच्या जीवनाशी तो तितक्याच प्रेमाने व सहानुभूतीने मिळून जाई. कॅलिबानशी तो जितका एकरूप होई,तितकाच प्रॉस्पेरोशीही.शेक्सपिअरची मनोबुद्धी मानवजातीच्या मनोबुद्धीला व्यापून राहिलेली होती,तिजशी एकरूप झाली होती.शेक्सपिअरचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न मी करणार नाही, किंवा त्याची विचारसृष्टी विवरूनही सांगणार नाही.कारण,असा प्रयत्न करणे निरुपयोगी आहे. पण मी त्याच्या विशाल मनोभूमीच्या कोपऱ्यात शिरून पाहणार आहे.त्याच्या अनंत बुद्धीच्या सागरात बुडी मारून पेलाभर शहाणपण मिळाले,तर मी आणणार आहे.या दृष्टीने शेक्सपिअरच्या तीन नाटकांकडे आपण जरा नजर टाकू या.पहिल्या नाटकात तो उपहास करणारा दिसतो,दुसऱ्यात केवळ ऐहिकदृष्टीचा दिसतो,तिसऱ्यात तत्त्वज्ञानी दिसतो.कोणती बरे ही तीन नाटके? टिमॉन ऑफ अथेन्स,हॅम्लेट,

टेंपेस्ट.


'टिमॉन ऑफ अथेन्स' या नाटकात एखाद्या ज्यू प्रेषिताप्रमाणे जगातील अन्यायांविरुद्ध तो गर्जना करतो व शिव्याशाप देतो.दुसऱ्या नाटकात तो फक्त जीवनाचे प्रतिबिंब दाखवितो,नीतीचे पाठ देत बसत नाही.जेव्हा कधी त्या वेगाने जाणाऱ्या नाट्यक्रियेत मध्येच क्षणभर जीवनावरील टीकेचे एखादे वाक्य उच्चारण्यासाठी तो थांबतो,तेव्हा जणू काय दुसऱ्या एखाद्या गोलावरून उतरलेल्या माणसाप्रमाणे या जगाला क्षुद्र व तुच्छ समजून तो फेकून देतो.!या जगाला तो फार महत्त्व देत नाही.हे जग म्हणजे मूर्खाची कथा,फुकट आदळआपट व आरडाओरड, निरर्थक पसारा असे म्हणून तो निघून जातो.पण या 'टिमॉन ऑफ अथेन्स' नाटकात जगाबद्दलचा त्याचा तिरस्कार,क्रोध ज्वालेत परिणत झालेला दिसतो.जीवन ही मूर्खाने नव्हे;तर कपटपटू सैतानाने सांगितलेली कथा असे येथे वाटते. आणि जग निरर्थक न वाटता द्रोह,नीचता,द्वेष, दंभ,कपट यांनी भरलेले दिसते.टिमॉन हा अथेन्समधील एक श्रीमंत मनुष्य आहे.तो उदारपणामुळे आपली सर्व संपत्ती मित्रांना वाटून टाकतो.त्यांना तो कधी नाही म्हणत नाही. मित्रांना त्यांच्या सावकारांचा तगादा लावला की तो त्यांचे कर्ज फेडून टाकी,मित्रांची लग्ने होत, तेव्हा त्यांना आंदण देई.त्याचा नवा संसार मांडून देई,तो त्यांना मेजवानीस बोलावी व जाताना देणग्या देई,हिरे- मोती देई.त्याचा कारभारी फ्लॅव्हियस 'हे औदार्य अखेर तुम्हाला धुळीला मिळवील' असे सांगतो.पण आपली संपत्ती संपणार नाही व आपले मित्र कृतज्ञ राहतील, टिमॉनला वाटते.फ्लॅव्हियसच्या सांगण्याकडे तो लक्ष देत नाही व शेवटची दिडकी संपेपर्यंत दुसऱ्यांना देतच राहतो.अखेर तो कर्जबाजारी होतो. त्याचे सावकार त्याला सतावू लागतात.ज्या मित्रांना आपण आपले सर्वस्व दिले,ते आपल्या संकटकाळी धावून येतील.असे त्याला वाटते.पण एकामागून एक सारे त्याला सोडून जातात;प्रत्येक जण निरनिराळ्या सबबी सांगतो व मदत नाकारतो.पुन्हा एकदा टिमॉन त्या सर्वांना मेजवानीस बोलावतो व त्यांच्यासमोर केवळ कढत पाण्याचे पेले ठेवतो.पण त्या वेळेपर्यंत आपणास त्याचे मित्र म्हणविणारे ते आश्चर्यचकित होऊन काही बोलण्याच्या आधीच तो ते कढत पाणी त्यांच्या तोंडावर व ताटे त्यांच्या अंगावर फेकतो व त्यांना घालवून देतो.


या स्वार्थी जगात निःस्वार्थीपणा म्हणजे मूर्खपणा असे तो शिकतो.जग काय हे त्याला नीट समजते.तो अथेन्स शहर सोडून जंगलातील गुहेत राहायला जातो.तिथे त्याला 'अत्यंत निर्दय पशूही माणसांहून अधिक दयाळू आढळतात. आपल्या गुहेसमोर तो कंदमुळांसाठी खणीत असता त्याला अकस्मात एक ठेवा 'पिवळा - गुलाम' - पिवळे सोने सापडते;मानवजातीला गुलाम करणारे व मानवजातीचे गुलाम असणारे सोने पाहून त्याला त्याचा तिटकारा वाटतो व तो ते पुन्हा मातीत पुरून टाकतो.पण काही नाणी मात्र कोणी मानवी प्राणी त्रास द्यावयास आले तर त्यांना देण्यासाठी म्हणून तो वर ठेवतो.


टिमॉनला सोने सापडल्याची गोष्ट अथेन्समधील लोकांना कळते व एकामागून एक ते त्याच्या गुहेकडे येतात.कवी,चित्रकार,योद्धे,वेश्या,भिकारी,डाकू,सारे येतात.पुन्हा एकदा टिमॉनची मैत्री जोडण्यासाठी ते उत्सुक होतात.तो प्रत्येकाला मूठ,दोन मुठी नाणी देतो.

एखाद्या संतप्त व तिरस्कार करणाऱ्या देवाप्रमाणे तो त्यांना म्हणतो, "जा,चालते व्हा,तुमच्या शहरात जा व हे द्रव्य पुजून ठेवा,नाही तर सूकरवत् चाललेल्या तुमच्या सुखोपभोगात खर्च करा." काही चोरांना तो द्रव्य देतो व म्हणतो,"जा,लुटा एकमेकांना,म्हणजे अधिक मिळेल.कापा गळे. जे तुम्हाला भेटतील ते सारे चोरच आहेत.जा अथेन्स शहरात व फोडा दुकाने.ज्यांचे लुटाल तेही चोरच ! चोर चोरांना लुटू देत.सारेच चोर !" हे सारे जग टिमॉनला डाकूंची गुहा वाटते.पण एक अपवाद मात्र असतो,तो म्हणजे त्याचा कारभारी फ्लॅव्हियस.तो आपल्या धन्याच्या दुःखात भागीदार असतो.फ्लॅव्हियस म्हातारा झालेला असतो.तो जेव्हा धन्याजवळ येतो, त्याला भक्तिप्रेम दाखवितो व रडतो,तेव्हा टिमॉन म्हणतो,"जगात अद्यापि थोडी माणुसकी आहे. या जगात एक फक्त एकच प्रामाणिक मनुष्य आहे.पण फक्त एकच हो! माझे म्हणणे नीट लक्षात घ्या.एकच,अधिक नाही;व तो म्हणजे हा माझा वृद्ध कारभारी." पण तो फ्लॅव्हियसला म्हणतो, "तू फसशील हो! इतके चांगले असणे बरे नव्हे. तू प्रामाणिक आहेस;पण शहाणपणात कमी दिसतोस.तू मला फसवून व छळून दुसरी चांगली नोकरी मिळवू शकशील.आपल्या पहिल्या धन्याच्या मानेला फास लागला,म्हणजे शहाणे नोकर दुसरा धनी मिळवितात.जगाची तर ही रीतच आहे.तू वेडाच दिसतोस.'


शेक्सपिअर खालच्या वर्गातील लोकांना तुच्छ मानतो,असा त्याच्यावर एक आरोप आहे. टीकाकार म्हणतात, "अशांविषयी शेक्सपिअरला सहानुभूती वाटत नसे. तो त्यांच्याबद्दल नबाबी तिरस्काराने व तुच्छतेने बोलतो.काटक्याकुटक्या,दगडधोंडे,यांच्याहून त्यांची किंमत अधिक नाही असेच जणू तो दाखवितो." अशा 'टीकाकारांना शेक्सपिअरच्या मनाची विश्वव्यापकता कळत नाही.'अथेन्सचा टिमॉन' या नाटकात शेक्सपिअरने अथेन्समधील जी मानवसृष्टी उभी केली आहे,तीत त्याचे अत्यंत प्रेमळ पात्र जर कोणते असेल,तर ते टिमॉनच्या गुलामाचे फ्लॅव्हियसचे होय.टीकाकारांच्या तत्त्वज्ञानात जितकी सहानुभूती असेल,त्यापेक्षा अपरंपार अधिक सहानुभूती शेक्सपिअरच्या अनंत मनात आहे.जीवनाकडे प्रत्येक दृष्टिकोनातून पाहणारा शेक्सपिअरसारखा द्रष्ट दुसरा झाला नाही. प्रसंगविशेषी तो शेलेप्रमाणे क्रांतिकारक होऊ शके,हीनप्रमाणे कडवट व कठोर होऊ शके, तसाच युरिपिडीसप्रमाणे निराशावादी तर बायरनप्रमाणे निस्सारवादी (सिनिक) ही होऊ शके.

स्विनबर्गप्रमाणे तो मायेतून पाहणारा होई, तर गटेप्रमाणे तत्त्वज्ञानीही होई;टेनिसनप्रमाणे तो आशावादी आणि शांतपणे शरणागती स्वीकारणारा,जे आहे ते चांगलेच आहे असे मानणाराही होई.जीवनाकडे नाना रंगांच्या चश्म्यांतून पाहणारा हा महाकवी आहे.याची दृष्टी एकांगी नाही.

'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात निराशेच्या काळ्या चष्म्यातून तो पाहत आहे.जगात कशातही सार नाही,सारा चौथा, सारे निःसार,घाण! टिमॉनचा एक मित्र अल्सिबिआडीस म्हणून असतो.(मानवजातीची कथा-हेन्री थॉमस)तो अथेन्स शहर वाचवू पाहतो;पण त्याला हद्दपारीचे बक्षीस मिळते! अल्सिविआडीस रागाने सैन्य उभारून आपला अपमान करणाऱ्या मातृभूमीवरच चालून येतो तेव्हा सीनेटर घाबरतात.ते सारे टिमॉनकडे जातात व म्हणतात, "अथेन्स संकटात आहे.या वेळेस तू ये." पण टिमॉन त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही.तो शक्य तेवढे सारे शिव्याशाप त्यांना देतो.पण शेवटी त्याच्या मनात एक विचार येतो.तो म्हणतो, "अल्सिबिआडीसच्या हातून मरण येऊ नये असे वाटत असेल तर एक गोष्ट मी करू शकेन." आणि मग तो म्हणतो,"माझ्या शेजारीच एक झाड आहे.

मला ते माझ्यासाठी कापावे लागणार आहे.मी ते तोडणारच आहे. पण अथेन्समधील माझ्या मित्रांना... साऱ्या अथेन्सलाच खालपासून वरपर्यंत रावापासून रंकापर्यंत सर्वांना माझा हा निरोप सांगा,ज्यांना ज्यांना येणारे संकट टाळायचे असेल,ज्यांना ज्यांना आपली दुःखे थांबवायची असतील, त्यांनी त्यांनी येथे त्वरेने धावून यावे.माझ्या कुऱ्हाडीने झाड पडण्यापूर्वीच या झाडावर त्यांनी स्वतःला टांगून घ्यावे."


आपल्या विषारी तिरस्काराचा शेवटचा बाण शहराकडे परतणाऱ्या त्या आपल्या नगरबंधूंवर सोडून टिमॉनने स्वतःचे थडगे खणले.तेथील खारट पाण्याच्या प्रवाहाजवळ त्याने खड्डा खणला व स्वतःचे विषण्ण जीवन संपविले. मातीतील,पृथ्वीच्या पोटातील कृतज्ञ किड्यांना मेजवानी देणेच अधिक चांगले.पृथ्वीवर चालणारा व्दिपाद मानवी पशुंपेक्षा पृथ्वीच्या पोटातले किडे व जीवजंतू किती तरी चांगले..


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये



१९/७/२३

नेहमीच भल्याचा विचार करा..

जेव्हा मी लहान होतो,त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो.

आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो.

हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या.एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, "बेटा,तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो."


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते.!आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली.!आम्ही जेवण करायला सुरुवात केली,तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती.! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला.मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो.माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,"बाळा,नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही.जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे.शेवटी तुमची हारच होईल."


 दुसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले.एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते.पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले,"बाळा,तुला जी वाटी हवी असेल ती घे."


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली!मी अंड नसलेली वाटी निवडली.मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, "बाळा,तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये.कारण जीवनात खूप अनिश्चितता असते.कधी कधी,जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो.अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये,फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे.या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही."


तिसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले,एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते.त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले,"बाळा,तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?"


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की,"आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे."


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली.जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही.परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली,तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो.!


माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले,"माझ्या बाळा,हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस,तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!"


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो.हे खरेच आहे,की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.


एक यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती..

१७/७/२३

डिक्शनरी - सॅम्युएल जॉन्सन -(१७५५)

डॉ.सॅम्युएल जॉन्सनची 'डिक्शनरी' हे जगातलं एकमेव एकहाती काम आहे.ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित केली गेली.प्रत्येक शब्दाचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा उच्चार याचा खूप सखोल विचार प्रथमच सॅम्युएल जॉन्सनच्या डिक्शनरीमध्ये करण्यात आला.'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यामधलं जे योगदान आहे,तितकंच मोठं योगदान डॉ. सॅम्युएल जॉन्सनच्या डिक्शनरीचं इंग्रजी भाषेसाठी आहे'असं अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ज्ञ नोह क्वेस्टरनं म्हटलं.आदिम काळातल्या भटक्या माणसानं जंगलातल्या गुहा,झाडाच्या ढोली अशा निवाऱ्याच्या जागा सोडून हळूहळू शेती करायला सुरुवात केली.आणि त्याच्या आयुष्याला स्थैर्य लाभलं.तो शेतजमिनीच्या ठिकाणीच आपली घरं बांधून राहायला लागला.हळूहळू तो सुसंस्कृत होत गेला;तसंच सतत नावीन्याचा शोध घेत राहिला.या सगळ्या प्रवासात संवादानं खूप मोलाची भूमिका बजावली आणि संवाद म्हटलं की त्यात भाषा आलीच.देश,प्रांत,प्रदेश,ठिकाण बदललं की भाषा बदलते.खरं तर बारा कोसांवर भाषा बदलते म्हणतात ते उगाच नाही.जग जसं बदलत गेलं तसतशी जगाला वेगवेगळ्या भाषांच्या भाषांतराची गरज भासायला लागली.आपल्या भावना,आपलं म्हणणं आणि आपले

विचार परक्या माणसांबरोबर वाटताना आपल्याला जे म्हणायचंय त्या शब्दांचे अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची म्हणजेच त्याच्या भाषेत रूपांतरित करण्याची आवश्यकता वाटायला लागली.याच खटाटोपीतून जन्म झाला शब्दकोशाचा म्हणजेच डिक्शनरीचा !


'आत्तापर्यंत अनेक भाषाकारांनी अनेक शब्दकोश जगासमोर मांडले असले तरी या सगळ्यांमधला अत्यंत परिणामकारक असा समजला जाणारा शब्दकोश म्हणजे 'अ डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज' ही डिक्शनरी तयार केली होती सॅम्युएल जॉन्सननं,सॅम्युएल जॉन्सन हा एक इंग्रजी लेखक त्याच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतल्या डिक्शनरीमुळे ओळखला जातो.गूगलनं त्याच्या ३०८ व्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्याचं डूडल बनवलं आणि त्याच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.सॅम्युएल जॉन्सन हा एक कवी,निबंधकार,

समीक्षक,चरित्रकार आणि संपादकदेखील होता. खरं तर या डिक्शनरीच्या आधीही काहींनी डिक्शनरीज तयार केल्या होत्या.डिक्शनरी तयार होण्याचं मूळ आपल्याला ११ व्या शतकात सापडतं.अकराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या डिक्शनरीज या चिनी आणि जपानी भाषांमध्ये सर्वप्रथम लिहिल्या गेल्या.त्यानंतर युरोपात म्हणजेच इंग्लंडमध्ये डझनावारी डिक्शनरीजची निर्मिती झाली.मात्र डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीची सर कशालाही नव्हती.खरं म्हणजे डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या 'डिक्शनरी'च्या छायेतच पुढे ऑक्सफर्ड 'डिक्शनरीची-देखील निर्मिती झाली.आधी प्रकाशित झालेल्या लॅटिन-इंग्लिश डिक्शनरीमध्ये डब्ल्यू,एक्स आणि वाय या अक्षरांवरून सुरू होणाऱ्या शब्दांचा समावेश केलेला नव्हता.मात्र डॉ. सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीमध्ये याही अक्षरांवरून सुरू होणान्या शब्दांचा समावेश केला गेला होता. खरं तर हा असा काळ होता,की ज्या काळात डिक्शनरीमधल्या शब्दांचे अर्थ कुठल्या तरी आख्यायिकां

-वर आधारलेले असायचे.त्यांना कुठलंही ठोस प्रमाण असायचं नाही.१७३६ साली नाथन बेटली या कोशकारानं तयार केलेल्या डिक्शनरीमध्ये २५०० शब्दांची यादी दिलेली होती.सॅम्युएल जॉन्सन यानं ही डिक्शनरी उदाहरणादाखल वापरली.प्रत्येक शब्दाचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा उच्चार याचा खूप सखोल विचार प्रथमच सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीमध्ये करण्यात आला.अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ज्ञ नोह क्वेस्टर असं म्हणतो,'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यांच्यातलं जे योगदान आहे,तितकंच मोठं योगदान हे डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीचं इंग्रजी भाषेसाठी आहे.' १८ सप्टेंबर १७०९ या दिवशी इंग्लंडमधल्या लिचफिल्ड इथे डॉ. सॅम्युएल जॉन्सन याचा जन्म झाला.सॅम्युएलच्या आईचं नाव सारा आणि वडिलांचं नाव मायकेल जॉन्सन असं होतं. मायकल जॉन्सन यांचं पुस्तकविक्रीचं दुकान होतं.खालच्या मजल्यावर पुस्तकांचं दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर जॉन्सन कुटुंब राहत असे.सारा आणि मायकेल यांनी अनेक वर्षं प्रतीक्षा केल्यावर सॅम्युएल हे पहिलं अपत्य जन्मलं होतं.सॅम्युएलच्या जन्माच्या वेळी साराचं वय ४० वर्षांचं होतं.खरं तर वयाच्या दृष्टीनं मूल जन्माला घालण्यास तसा उशीर झाला होता.आणि साराचं बाळंतपणही कठीण झालं होतं.सॅम्युएलच्या जन्माच्या वेळी इंग्लंडमधल्या तज्ज्ञ सर्जनांना बोलावण्यात आलं होतं.बाळाचा जन्म सुखरूप झाला,पण जन्मल्यानंतर बाळानं रडायला हवं,तर बाळ रडलंच नव्हतं.सगळ्यांचं धाबंच दणाणलं.शिवाय बाळ दिसायला अगदीच किडकिडीत होतं.हृदयाचे ठोके मात्र व्यवस्थित सुरू होते इतकंच काय ते त्या बाळाचं नशीब! बाळाची ही अवस्था बघून त्याची आत्या तर तिथेच मागचापुढचा विचार न करता म्हणाली, 'किती मरतुकड बाळ आहे हे,हे रस्त्यावर जर पडलं तर मी उचलणारदेखील नाही.'


आपल्या अशा नाजूक बाळाकडे बघून होणाऱ्या प्रतिक्रियांमुळे सारा आणि मायकेल यांना सॅम्युएलची खूप काळजी वाटायची.खरं तर पुढे सॅम्युएलची ज्या जगप्रसिद्ध आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाशी तुलना केली गेली,त्या न्यूटनचीही अवस्था जन्मल्यानंतर सॅम्युएल-सारखीच होती.मायकेल आणि सारा सॅम्युएलला लहानपणी 'सॅम' या नावानं हाक मारत असत.सॅम जेव्हा पाच वर्षांचा झाला,तेव्हा आपल्या आईबरोबर तो पहिल्यांदा चर्चमध्ये गेला.आईबरोबर त्यानं तिथे प्रार्थनेतही भाग घेतला.घरी आल्यावर सॅमनं चर्चमध्ये ऐकलेली प्रार्थना जशीच्या तशी शब्दन्शब्द सुरात गाऊन दाखवली.साराला ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला.

आपल्या मुलाची स्मरणशक्ती बघून ती चकित झाली. आपला मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे ही गोष्ट लक्षात येताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायला लागले.

खरं तर वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच सॅमला त्याच्या आईनं घरीच शिकवायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी बूट बनवणाऱ्या एका निवृत्त माणसाकडे तिनं सॅमला व्याकरण शिकायला पाठवल.वयाच्या नवव्या वर्षापर्यंत सॅमला लॅटिन भाषाही अवगत झाली होती. त्यानंतर त्याचं पुढलं शिक्षण सुरू झालं खरं,पण तोपर्यंत त्यांच्या घरची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती.त्यातच भरीस भर म्हणून सॅमला टॉरेट सिंड्रोम नावाचा विकार जडला.या विकारात त्या रुग्णाचं त्याच्या ठरावीक मांसपेशींच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही.उदा.खोकला,शिंकणं,

डोळे मिचकावणं,मानेच्या निरनिराळ्या हालचाली.तसंच या विकारावर त्या वेळी कुठलाच उपाय नव्हता.

लहानपणी तो खूपच अशक्त आणि किडकिडीत असल्यानं त्याला दूध पाजण्यासाठी एका नर्सची व्यवस्था करण्यात आली होती.सॅमला दूध पाजणाऱ्या या नर्सला टीबी झाल्यानं त्या दुधातून सॅमला इन्फेक्शन झालं,असंही म्हटलं जातं.सॅमनं अशाही परिस्थितीत पुढलं शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला;पण घरच्या कर्जबाजारीपणाच्या परिस्थितीमुळे त्याला जेमतेम वर्षभरच तिथे शिक्षण घेता आलं. त्यातच १७३१ साली मायकेलचा मृत्यू झाला.ऑक्सफर्डमधून बाहेर पडला तेव्हा सॅमची वेगवेगळ्या भाषांमधली गती विलक्षण होती.

तसंच त्याला विज्ञान हा विषयदेखील खूपच आवडायचा.

वडिलाचा मृत्यू आणि हातात कुठलीच पदवी नाही.अशा अवस्थेत सॅम नोकरीसाठी वणवण भटकायला लागला.या प्रयत्नांमध्ये त्याला स्टॉरब्रिज ग्रामर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.सॅमची तिथली अवस्थाही वाईटच होती.त्याला शिक्षक म्हणून मान देणं सोडाच,पण एखाद्या नोकरापेक्षाही वाईट वागणूक दिली जात असे.असं असलं तरी सॅम मात्र शिकवताना अतिशय मन लावून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असे.वर्षभरात या नोकरीवरही त्याला पाणी सोडावं लागलं. त्यानंतर हेक्टर नावाच्या त्याच्या एका मित्रामुळे त्याला एका जर्नलमध्ये लिहिण्याची संधी मिळाली.याच दरम्यान त्यानं फ्रेंच आणि लॅटिन भाषेतल्या अनेक कवितांचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं.मात्र ते अप्रकाशितच राहिल. हॅरी पॉर्टर नावाच्या एका मित्राला त्याच्या आजारपणात सॅम्युएलन साथ दिली.फक्त साथसोबतच नाही,तर सॅमन हॅरीची त्याच्या मृत्यूपर्यंत देखभाल आणि सेवाशुश्रूषा केली.३ सप्टेंबर १७३४ या दिवशी हॅरीचा मृत्यू झाला. हॅरीच्या पश्चात त्याची पत्नी एलिझाबेथ आणि त्याची तीन मुलं होती.पुढे १७३५ साली सॅम्युएल जॉन्सन आणि एलिझाबेथ पॉर्टर यांनी लग्न केलं.त्या वेळी सॅम्युएलचं वय २५ तर एलिझाबेथचं वय ४६ वर्षांचं होतं! याच दरम्यान इतर ठिकाणी,इतर शाळांमध्ये नोकरी करून शिकव-ण्यापेक्षा आपण आपलीच शाळा सुरू करावी,असा विचार सॅम्युएलच्या मनात आला.त्यानं "एडिअल हाल' नावाची एक शाळा सुरू केली.सुरुवातीला या शाळेत फक्त तीनच विद्यार्थी होते.ही शाळादेखील फार काळ तग धरू शकली नाही.तसंच त्याच्या कौटुंबिक आयुष्यातही कटकटी सुरू झाल्या होत्या.एलिझाबेथ आणि सॅम्युएल यांचे आपसांत वारंवार खटके उडायला लागले. त्यामुळे १७३७ साली अखेर सॅम्युएलनं लंडन शहराचा निरोप घेतला आणि तो ग्रिनीच इथे जाऊन पोहोचला.याच काळात सॅम्युएलचा टॉरेट सिंड्रोम हा विकार बळावत चालला होता. त्यामुळे कुठेही काम करणं त्याला अशक्य झालं होतं. 'द जंटलमेन्स मॅगेझिन' या नियतकालिकात लेखक म्हणून काम करण्याची नोकरी सॅमला ग्रिनीच इथे मिळाली.१७३८ साली सॅम्युएलनं केलेलं भरीव काम लोकांच्या प्रथमच लक्षात आलं.ते काम म्हणजे सॅम्युएलने त्या वेळच्या लंडनच्या परिस्थितीवर केलेली 'लंडन' ही कविता ! या एका कवितेमुळे सॅम्युएलला लोक आता सॅम्युएल जॉन्सन असं आदरानं ओळखायला लागले.

'लंडन' ही कविता इतकी गाजली की काही लोकांनी तर ती त्यानं लिहिलीच नसून त्यानं ती कोणाची तरी नक्कल करून लिहिली,असे आरोपही केले.काही काळानंतर सॅम्युएल आणि एलिझाबेथ यांचा पुन्हा सलोखा झाला.

खरं तर एलिझाबेथचं सॅम्युएलवर प्रेम होतं.


१७४६ साली काही प्रकाशकांचा गट सॅम्युएल जॉन्सन याच्याकडे आला आणि त्यानं डिक्शनरी लिहावी,असा प्रस्ताव त्यांनी त्याच्यासमोर ठेवला.या प्रकाशकांनी सॅम्युएल जॉन्सन यानं ही डिक्शनरी तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावी असा करारही केला.या करारानुसार प्रकाशकांनी सॅम्युएल जॉन्सनला १५७५ युरोज इतकं मानधनही दिलं. (त्या वेळच्या करन्सीमध्ये!) आताच्या हिशोबानं ते २ लाख ४० हजार युरोज इतकं होईल.खरं तर हे काम तीन वर्षांमध्ये पूर्ण होण्याइतकं लहान नव्हतंच.या कामाचा पसारा किंवा आवाका इतका मोठा होता की,प्रत्यक्षात डिक्शनरीचं काम पूर्ण होण्यासाठी तब्बल एक दशक लागलं.डिक्शनरीच्या कामानं सॅम्युएल जॉन्सनला झपाटून टाकलं होतं.

रात्रंदिवस शेकडो पुस्तकांच्या गराड्यामध्ये सॅम्युएल जॉन्सन घेरलेला असायचा.जमेल तिथून या माणसानं जमेल तितकी पुस्तकं गोळा केली होती.आवश्यक ती पुस्तकं मिळवण्याचा त्याला या काळात जणू ध्यास लागला होता.खरं तर तो काळ संगणकाचा नव्हता.

हाताखाली मदत करायला फक्त एक टायपिस्ट तो काय त्याच्याजवळ होता.अशा परिस्थितीत अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली.जॉन हॉर्न यानं तर 'हे काही एका व्यक्तीनं करण्याचं काम नाही,असं म्हणून टोमणाही मारला होता.

काहींनी तर अतिशय वाईट कोशाकार म्हणून सॅम्युएल जॉन्सन याला हसायला आणि हिणवायलाही सुरुवात केली होती.एकीकडे शारीरिक दुर्बलता तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीचीही साथ नाही अशा अवस्थेत लोकांचे टोमणे आणि टीका सहन करत करत सॅम्युएल जॉन्सननं १७५५ साली अथक परिश्रमानंतर डिक्शनरी प्रकाशित केली. हेन्री हिचिंग या इतिहासकारानं असं म्हणून ठेवलंय,'सॅम्युएल जॉन्सनच्या 'डिक्शनरी' ने लोकांना इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि तिची जगभरात असलेली आवश्यकता यांची जाणीव करून दिली.'कारण त्या काळात फ्रेंच भाषा ही युरोपियन किंवा राज्य करणारी भाषा समजली जात असे.इंग्रजी भाषेला कुठलाही साचाढाचा नसलेली आणि वरवरच्या संवादाची भाषा समजली जात असे.तिला कुठलाही प्रतिष्ठेचा दर्जा नव्हता.त्यामुळे हिचिंगचं हे म्हणणं खूप महत्त्वाचं ठरतं.


यातला एक हृदयद्रावक भाग म्हणजे ज्या एलिझाबेथनं सॅम्युएलला त्याच्या पडत्या काळात साथ दिली होती;पण सॅम्युएलचं डिक्शनरीच्या निर्मितीच्या काळात तिच्याकडे साफ दुर्लक्ष झालं.या काळात तिची तब्येत बिघडली असतानाही सॅम्युएलनं तिच्याकडे जराही लक्ष दिलं नाही.

त्यामुळे अखेर कंटाळून आणि निराश होऊन ती त्याला सोडून लंडनला निघून गेली.याचा कुठलाही परिणाम सॅम्युएलवर किंवा त्याच्या कामावर झाला नाही.तो आपल्याच धुंदीत होता.काहीच काळानंतर म्हणजे १७५२ साली एलिझाबेथच्या मृत्यूचीच बातमी त्याच्यापर्यंत येऊन धडकली.तेव्हा मात्र तिनं त्याला दिलेली साथ आठवून सॅम्युअलला खूप वाईट वाटलं.त्यानं एलिझाबेथच्या आठवणीदाखल एक कविता रचली आणि आपल्या मित्राला तिच्या दफन करण्याच्या वेळी हजर राहून ती गाऊन दाखवावी असं सुचवलं; पण सॅम्युएलचा मित्र त्याच्या या वागणुकीवर इतका चिडलेला होता की,त्यानं ही गोष्ट साफ नाकारली.सॅम्युएल जॉन्सन याची 'डिक्शनरी' बाजारात येण्याआधी इंग्रजी भाषेला काही आकार आणि रूप नव्हतं.या डिक्शनरीमध्ये ४२७७३ शब्दांचा अर्थ,त्यांची व्युत्पत्ती आणि त्यांचे उच्चार समाविष्ट करण्यात आले होते. १८ बाय २० इंच अशा आकाराची ही डिक्शनरी होती.या डिक्शनरीत त्यानं प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द अवतरण चिन्हांमध्ये दिला आहे आणि त्याचबरोबर त्याच शब्दाचे समानार्थी अनेक शब्द असतील तर तेही वेगळ्या अवतरण -

चिन्हांमध्ये दिलेले आहेत.अशा अवतरणचिन्हांच्या मधल्या शब्दांची संख्या १,१४,००० इतकी होते,हेही या डिक्शनरीचं वैशिष्ट्य! डिक्शनरीच्या प्रकाशनानंतर सॅम्युएल जॉन्सनला ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडनकडून एमए (मास्टर ऑफ आर्टस इन इंग्लिश लँग्वेज) पदवीनं सन्मानित करण्यात आलं आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून त्याला डॉक्टरेटही जाहीर करण्यात आली.आता लोक सॅम्युएल जॉन्सनला डॉ.सॅम्युएल जॉन्सन म्हणून संबोधायला लागले.असं असलं तरी सॅम्युएल जॉन्सन मात्र स्वतः कधीही स्वतःच्या नावाआधी डॉक्टर असं संबोधन लावत नसे.


डॉ.सॅम्युएल जॉन्सनची 'डिक्शनरी' हे जगातलं एकमेव एकहाती काम आहे.ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित केली गेली.'ही डिक्शनरीच खुद्द त्या लेखकाचं स्मारक बनून जगात कायमस्वरूपी अस्तित्वात राहील,' असं प्रेसिडेंट ऑफ फ्लोरेन्टाईन यांनी जाहीर केलं. पुढे १५० वर्षांनंतर ऑक्सफर्डच्या निरनिराळ्या शब्दकोशांचं प्रकाशन झालं.त्यातही डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्याच डिक्शनरीतल्या व्याख्या पुन्हा वापरात आणल्या गेल्या.त्या 'जे' या नावानं वापरल्या गेल्या.सॅम्युएल जिथे जायचा तिथे तो अनेक मित्र जमवायचा.त्याची अनेक स्तरांतल्या लोकांशी मैत्री व्हायची.सॅम्युएल जॉन्सन चहाचा खूपच शौकीन होता.एकदा का तो चहा प्यायला लागला की,चक्क २५-२५ कप चहा तो सहजपणे रिचवायचा.तो जेवत असताना कोणी काही सांगायला लागला,तर तो त्याचा एकही शब्द जेवण पूर्ण होईपर्यंत ऐकून घेत नसे. इतकंच काय,पण जेवताना त्याच्या कपाळावरच्या नसा टम्म फुगत असत आणि त्याचं संपूर्ण शरीर घामानं डबडबून जात असे.व्यसनी माणसामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही,असं सॅम्युएल जॉन्सन विनोदानं म्हणायचा.

खाणं-पिणं आणि वाचन या गोष्टींपुढे त्याला दुसरं काही सुचत नसे.विख्यात नाटककार शेक्सपिअर आणि कवी वर्डस्वर्थ यांनी वापरलेल्या अनेक शब्दांचा अर्थही सॅम्युएलच्या डिक्शनरीमध्ये देण्यात आला आहे हे विशेष ! शेक्सपिअर,जॉन मिल्टन,ॲलेक्झांडर पोप,एडमंड स्पेन्सर यांचीही प्रसिद्ध कोटेशन्स त्यानं डिक्शनरीमध्ये सामील केली होती. कुठल्याही समाजाच्या दृष्टीनं आक्षेपार्ह अथवा अश्लील समजल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ देण्यातही सॅम्युएल जॉन्सन मागे हटला नाही हेही विशेष ! काळाच्या पुढे जाणारी ही गोष्ट होती.'आपला ज्या गोष्टीत कल आहे,त्याच गोष्टींबद्दलचं वाचन आपण केलं पाहिजे,'असं सॅम्युएल जॉन्सन म्हणत असे.


अखेरच्या दिवसांत सॅम्युएलचा एक डोळा अधू झाला होता आणि त्याला ऐकायलाही येईनासं झालं होतं.तसंच त्याला नैराश्यानंही ग्रासलं होतं. त्याच्या जवळच्या दोन मित्रांच्या मृत्यूनं त्याला जास्तच एकाकी वाटायला लागलं होतं. 


सॅम्युएलचा मृत्यू १३ डिसेंबर १७८४ या दिवशी वयाच्या ७५ व्या वर्षी अनेक विकारांनी ग्रस्त झाल्यामुळे झाला.

सॅम्युएल जॉन्सनला वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये शेक्सपि -

अरच्या स्मारकाजवळच दफन करण्यात आलं.(जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख) पुढे त्याचा मित्र जेम्स बोसवेल यानं सॅम्युएल जॉन्सनचं चरित्र लिहून प्रसिद्ध केलं. 'डिक्शनरी' ही जगातली पहिली डिक्शनरी नसलीतरी डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या अथक परिश्रमामुळे ती जगभरात सर्वाधिक लोकप्रिय झाली हे मात्र खरं. !


समाप्त...