* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/१२/२४

दोन बिबळ्यांचं युद्ध / The war of two leopards

आमचा रुद्रप्रयागपर्यंत पाठलाग केल्यानंतर तो बिबळ्या यात्रामार्गावरून गुलाबराईत व नंतर घळ ओलांडून एका ओबडधोबड पायवाटेवरून होता.ही वाट रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या गावांमध्ये राहणारे लोक हरिद्वारका जाता येताना वापरत असत.


बद्रीनाथ-केदारनाथची यात्रा हंगामी असते आणि हिमालयातली ही दोन ठिकाणं ज्या शिखरांवर आहेत तिथलं बर्फ वितळण्याची वेळ आणि परत हिमवर्षाव सुरू होण्याची वेळ यावर यात्रेचा हंगाम केव्हा सुरू होईल व केव्हा संपेल ते अवलंबून असतं.या दोन्ही मंदिरांच्या प्रमुख पुजाऱ्याने काही दिवसापूर्वीच हा रस्ता यात्रेकरूंना खुला झाल्याचा टेलिग्राम केला होता. देशभरातील लाखो भाविक या टेलिग्रामची आतुरतेने वाट पहात असतात त्यामुळे गेले काही दिवस यात्रेकरूंचे छोटे छोटे गट रुद्रप्रयागमधून जाताना दिसू लागले होते.


गेल्या काही वर्षात नरभक्षकाने बऱ्याच यात्रेकरूंचे बळी याच मार्गावर घेतले होते आणि त्याची सवयच पडून गेली होती की या यात्रा हंगामाच्या काळात यात्रामार्गावरून खालच्या रस्त्याने त्याच्या हद्दीपर्यंत जायचं,तिथून रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या गावांना भेटी देत देत लांब वळसा घालून रुद्रप्रयागच्या वरच्या बाजूला पंधरा मैलांवर परत यात्रामार्गावर यायचं.या लांबलचक फेरीला लागणारा काळ भले थोडा बदलत असेल पण मला त्या बिबळ्याचे माग रुद्रप्रयाग ते गुलाबराईच्या पट्ट्यात सरासरी पाच दिवसांनी दिसायचे.

त्याचमुळे बंगल्यावर परत येत असताना मी रस्ता नीट नजरेखालून घालता येईल अशी जागा शोधली आणि पुढच्या दोन रात्री एका गंजीवर आरामात बसून काढल्या.


हे दोन दिवस आसपासच्या गावातून कोणतीच विशेष बातमी आली नाही.तिसऱ्या दिवशी मी यात्रामार्गावर पुढे सहा मैल जाऊन तिथल्या एखाद्या गावाला बिबळ्याने भेट दिली आहे का ते बघायला गेलो होतो.



अशी १२ मैलांची रपेट करून दुपारी बंगल्यावर आल्यावर उशीरानेच ब्रेकफास्ट करत होतो,तेवढ्यात थकली भागलेली दोन माणसं घाईघाईत तिथे आली आणि बातमी दिली की रुद्रप्रयागच्या आग्नेयेला अठरा मैलांवरच्या भैंसवाडा गावात एका पोराचा बळी गेलाय.इबॉटसनने सुरू केलेली माहिती यंत्रणा चांगलीच काम देत होती.या प्रणालीनुसार नरभक्षकाच्या इलाक्यातील सर्व बळींची बातमी देणाऱ्यांना त्या त्या बातमीनुसार रोख बक्षिसं जाहीर केली होती.बोकडासाठी दोन रूपये यापासून सुरू होत नरबळीसाठी वीस रुपये अशी ती बक्षिसं होती.त्यामुळे आम्हाला या सर्व बातम्या अत्यंत कमी वेळात मिळत.आताच आलेल्या त्या दोन माणसांच्या हातात मी दहा दहा रूपये ठेवले.त्यातल्या एकाने माझ्याबरोबर परत भैंसवाड्यापर्यंत यायचं कबूल केलं पण दुसरा मात्र नुकताच आजारातून उठल्यामुळे लगेच अठरा मैलांची चाल त्याला झेपणार नव्हती म्हणून रुद्रप्रयागमध्येच राहणार होता.त्यांची कथा ऐकत मी ब्रेकफास्ट संपवला आणि बरोबर फक्त रायफल, काही काडतुसं आणि टॉर्च घेऊन दुपारी १ वाजता मी निघालो.बंगल्यासमोरचा रस्ता ओलांडून डोंगर चढायला सुरुवात केल्या केल्याच माझ्या सोबत्याने मला सांगितलं की आपल्याला फार अवघड वाटेने दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि अंधार पडायच्या आत पोचणं आवश्यक आहे.शक्यतो मी जेवणानंतर लगेच चढ चढून जायला नाखूष असतो पण आज मात्र इलाजच नव्हता.

पहिले काही मैल जवळ जवळ चार हजार फूट चढ चढताना मला त्याच्या वेगाशी जमवून घेणं फार जड गेलं.पण तीन मैलानंतरचा तुलनेनं सपाट भाग आल्यावर मला बळ आलं आणि त्यानंतर मात्र मी पुढे राहून वेग कायम ठेवला. 


रुद्रप्रयागला येता येता त्या दोघांनी वाटेवरच्या गावात ही सर्व बातमी दिली होती आणि ते मला भैसवाड्याला घेऊन जायला निघालेत असंही सांगितलं होतं.मी निश्चित येणार याबद्दल तिळमात्रही शंका गावकऱ्यांना नसावी;कारण वाटेवरच्या प्रत्येक गावात सर्वच्या सर्व गावकरी माझी वाट बघत थांबलेले असायचे.

त्यातल्या काही जणांनी मला शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्या बिबळ्याला खतम केल्याशिवाय कृपा करून गढवालमधून जाऊ नका अशी विनंती केली.


माझ्या सोबत्याने तर मला सांगितलंच होतं की आपल्याला अठरा मैल चालायचंय आणि जसे आम्ही एका पाठोपाठ एक डोंगर व दऱ्या ओलांडून जात होतो तसं मला समजून चुकलं की माझ्या अपेक्षेपेक्षा ही चाल फारच दमछाक करणारी आहे व तीही मर्यादित वेळात काटायची होती.


सूर्य अस्ताला जात होता तसा अशाच अनंत टेकड्यांपैकी एकीच्या माथ्यावरून मला समोरच्या डोंगराच्या माचीवर आमच्यापासून शंभर यार्ड अंतरावर माणसांचा घोळका दिसला.आम्हाला पाहताच त्यातली काही माणसं अलग झाली आणि डोंगर उतरायला लागली तर बाकीचे आम्हाला भेटायला पुढे आले... त्यात त्या गावचा मुखिया होता.त्याने शुभवर्तमान दिलं की त्याचं भैंसवाडा गाव पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावर आहे आणि त्याने त्याच्या पोराला पुढे पाठवून चहा तयार ठेवायला सांगितलं आहे.


१४ एप्रिल,१९२६ हा दिवस गढवाली लोकांच्या चांगलाच लक्षात राहील कारण त्या दिवशी 'रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्या'ने त्याचा शेवटचा नरबळी घेतला.त्यादिवशी संध्याकाळी भैंसवाडा गावातली एक विधवा स्त्री तिच्या मुलांना-नऊ वर्षाची मुलगी व बारा वर्षाचा मुलगा- आणि शेजारच्या आठ वर्षाच्या मुलाला घेऊन गावापासून जवळच असलेल्या एका झऱ्यावर संध्याकाळच्या जेवणासाठी पाणी भरायला गेली होती.


गढवालमध्ये सर्वत्र आढळणाऱ्या रांगेत घरं असलेल्या इमारतीमधल्या एका घरात ते कुटुंब राहत होतं.ही घरं एकमजली असतात,खालचा आखूड उंचीचा तळमजला सरपण ठेवण्यासाठी किंवा धान्य साठवण्यासाठी वापरला जातो तर वरच्या मजल्यावर बरीच राहती घरं असतात.त्यातल्या मधल्या एका घरात ते कुटुंब राहत होते.चार फूट रुंदीचा लांबलचक व्हरांडा या सर्व घरासमोरून गेला होता.पाच-सहा पायऱ्यांचे छोटे छोटे जिने अंगणातून व्हरांड्यात येत होते आणि प्रत्येक जिना दोन दोन घरं वापरायची.साठ फूट रुंद व तीनशे यार्ड लांब अशा अंगणाभोवती बुटकी भिंत बांधली होती.हे चार जण पाणी भरून येताना शेजारचा मुलगा सर्वात पुढे होता.जेव्हा ते सर्वजण जिन्यापर्यंत आले तेव्हा त्या मुलाला तळमजल्यावरच्या जिन्यामागच्या खोलीत कोणतं तरी जनावर दिसलं पण त्याला तो कुत्रा वाटल्याने,त्याबद्दल तो कुणाकडेच बोलला नाही.त्या मुलाच्या मागे विधवेची मुलगी,

नंतर ती स्वतःआणि सर्वात मागे तिचा बारा वर्षाचा मुलगा होता.

दोन तीन पायऱ्या चढल्यानंतर त्या बाईला मुलाने घेतलेली पितळी घागर पायरीवर पडल्याचा आणि गडगडत खाली गेल्याचा आवाज आला.त्याच्या निष्काळजीपणाबद्दल जरा बडबड करत तिने तिची घागर वर 'व्हरांड्यावर ठेवली आणि तिच्या मुलाने काय नुकसान करून ठेवलंय ते बघायला ती मागे वळली.पायऱ्यांच्या खाली तिला पालथी पडलेली घागर दिसली.खाली उतरून तिने ती उचलली आणि मुलाला शोधत आजूबाजूला बघू लागली.आसपास कुठेही तो न दिसल्याने तिला वाटलं की तो घाबरून कुठेतरी लपून बसलाय... तशी तिने हाका मारायला सुरूवात केली.


भांड्यांचा आवाज आणि लगोलग त्या बाईच्या हाका ऐकून शेजारपाजाऱ्यांचे दरवाजे उघडले आणि त्यांनी काय प्रकार आहे अशी चौकशी करायला सुरुवात केली. कदाचित तो मुलगा तळमजल्यावरच्या एखाद्या खोलीत लपून बसला असल्याची शंकाही बोलून दाखवली गेली. आता अंधार बराच पडल्याने शेजाऱ्याने कंदील पेटवला आणि पायऱ्या उतरून खाली येऊ लागला.एक दोन पायऱ्या उतरल्यावर त्याला ती बाई उभी होती त्या अंगणातल्या एका पांढऱ्या फरशीवर रक्ताचा थेंब दिसला.त्या माणसाचं उत्तेजित आवाजातलं बोलणं ऐकून आसपासचे लोक गोळा झाले आणि अंगणात आले.त्यातच एक म्हातारा होता आणि त्याने त्याच्या मालकाबरोबर बऱ्याच शिकार मोहिमांमध्ये भाग घेतला होता.शेजारच्याकडून कंदील घेऊन त्याने रक्ताचा माग काढत अंगण पार केलं व कंपाऊंडची भिंत ओलांडली. त्या भिंतीमागे एकदम आठ फूट खाली एक रताळ्याचं शेतं होतं... तिथल्या मऊ मातीत त्याला बिबळ्याच्या फाकलेल्या पायाचे ठसे दिसले.


गावातल्या सर्वांनी नरभक्षक बिबळ्याबद्दल ऐकलं होतं पण त्या दिवसापर्यंत हा बिबळ्या त्या गावापासून १० मैलांच्या आत फिरकला नव्हता.त्यामुळे त्या क्षणापर्यंत,त्या मुलाला नरभक्षकाने उचललं असेल अशी शंकासुद्धा कोणाला आली नव्हती.


आता मात्र काय झालंय ते कळताच त्या बाईने धाय मोकलून रडायला सुरुवात केली,तर इतर जण धावत जाऊन घरातून ढोल आणि ताशे घेऊन आले,काहींनी तर बंदूकासुद्धा आणल्या व काही मिनिटातच प्रचंड हलकल्लोळ सुरू झाला.रात्रभर ढोल बडवले जात होते आणि बंदूकांचे बार उडवले जात होते.सकाळी त्या मुलाचा मृतदेह सापडला तसं ताबडतोब दोन माणसांना माझ्याकडे पिटाळलं गेलं होतं.


मुखियाबरोबर गावात शिरत असतानाच मला शोक करणाऱ्या त्या विधवेचं रडणं ऐकू आलं आणि तीच सर्वप्रथम मला सामोरी आली.मला अशी दृश्य पाहण्याचा फारसा अनुभव नव्हता तरीही माझ्या अननुभवी नजरेला देखील समजत होतं ती बाई नुकतीच एका भावनिक वादळातून बाहेर आली आहे आणि आता लागोपाठ पुढचं वादळ येत आहे.मला अशा अवस्थेतल्या माणसांशी कसं वागावं हे कळत नाही त्यामुळे त्या बाईचं म्हणणं सर्वात शेवटी ऐकावं असं मी ठरवलं पण तिला त्या सर्व कथेतली तिची बाजू काहीही करून सांगायचीच होती तेव्हा शेवटी मी तिच्या मनासारखं होऊ दिलं.


जसजशी तिची कथा उलगडत जात होती तसं मला समजलं की तिला गावकऱ्यांबद्दलच्या तक्रारीला वाट करून द्यायची मला 'जर त्याचा बाप आज जिवंत असता तर त्याने धाडस दाखवलं असतं पण गाववाल्यांनी मात्र बिबळ्याचा पाठलाग करून पोरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही'असं तिचं म्हणणं होतं.मग मात्र मी सांगितलं की तिचं चुकतंय... बिबळ्याच्या दाताची पक्कड त्या मुलाच्या गळ्याभोवती पडताक्षणीच त्याची मान धडावेगळी झाली असणार आणि कोणी कितीही प्रयत्न केला असता तरी काहीच उपयोग झाला नसता.तिथे अंगणात चहा पित उभा असताना आणि माझ्याभोवती जमलेल्या शेकडो माणसांकडे पाहत असताना माझा विश्वासच बसत नव्हता की बिबळ्याच्या आकाराचं जनावर, संध्याकाळच्या प्रकाशात,कोणाच्याही नजरेला न पडता अंगण ओलांडून तळमजल्याच्या खोलीत आलं कसं आणि गावातल्या एकाही कुत्र्याला त्याचा सुगावा कसा लागला नाही? मुलाला घेऊन त्या बिबळ्याने आठ फूट भिंतीवरून खाली ज्या शेतात उडी मारली होती तिथे मी उतरलो व ओढत नेल्याच्या खुणांवरून रताळ्याचं शेत ओलांडून पुढच्या आणखी एका बारा फूट बांधावरून पलीकडच्या शेतात गेलो. या दुसऱ्या शेताच्या कडेला रानटी गुलाब चार फूट उंचीचं झुडुपांचं कुंपण होतं.या ठिकाणी बिबळ्याने मुलाच्या गळ्याभोवतीची पक्कड सोडली होती आणि कुंपणापलीकडे जायला कुठे फट सापडते का याचा शोध घेतला होता.तशी फट न मिळाल्याने त्याने मुलाला पाठीकडच्या भागात पकडून त्याच्यासकट कुंपणापलीकडे उडी मारली होती,आणि पलीकडच्या दहा फूट बांधावरून खाली गेला होता.या तिसऱ्या बांधाच्या पायथ्याला गुरांची वाट होती.या वाटेवरून थोडं अंतर चालत गेल्यावर त्याला गावातल्या माणसांचा आरडाओरडा आणि ढोल वाजवण्याचे आवाज ऐकायला आले होते.त्यामुळे तिथेच त्या मुलाला पायवाटेवर टाकून देऊन तो डोंगर उतरून खाली गेला होता.रात्रभर चालू असलेल्या गोंगाटामुळे तो दुसऱ्यांदा मात्र त्याच्या भक्ष्याकडे पतरला नव्हता.याच ठिकाणी त्या मुलाचा मृतदेह परत आणून ठेवणे आणि जवळपास कुठेतरी लपून वाट बघणे हा एकमेव पर्याय समोर होता. पण इथे माझ्यासमोर दोन अडचणी उभ्या राहिल्या.


शिल्लक राहिलेला उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…!

८/१२/२४

डॉ.आंबेडकर आणि गांधीजी / Dr.Ambedkar and Gandhiji 

१९३९ ची ऑगस्टची सहा तारीख.गांधीजींना डॉ. आंबेडकरांना भेटण्याची तीव्र इच्छा होती.त्याच दिवशी गांधीजींनी त्यांना निरोप पाठवला.


" तुम्ही तरी भेटायला या किंवा दुसरे दिवशी सकाळी आठला मीच येईन." आंबेडकरांना गांधीजींकडे येणे गैरसोईचे असेल किंवा त्यांना वेळच नसेल तर आपल्याला त्यांच्याकडे येण्यास आनंद वाटेल, असेही गांधीजींनी आवर्जून लिहिले होते.


आंबेडकर सांगलीहून नुकतेच आले होते.तशात त्यांना ताप भरला होता.तरी पण आपण गांधीजींना भेटायला येऊ असा आंबेडकरांनी प्रतिनिरोप पाठवला. दुर्दैवाने आंबेडकरांच्या तापाचा पारा १०६ वर गेल्याने ती भेट पुढे ढकलली गेली.


१४ ऑगस्टला दुपारी दोन वाजता मणिभुवन येथे गांधीना भेटण्याकरता बाबासाहेब गेले.देवरावनाईक,शिवतरकर,

प्रधान,बाबूराव गायकवाड, कद्रेकर वगैरे त्यांचे शिष्यलोक त्यांच्याबरोबर होते. 


डॉ.आंबेडकर दृष्टिपथात आले तेव्हा तिसऱ्या मजल्यावर गांधीजी आपल्या पक्षातील लोकांशी काही बोलत होते.मधून मधून ते फळेही खात होते. डॉक्टर आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी गांधींना नमस्कार केला.व ते एका सतरंजीवर बसले. मुस्लिम व युरोपियन नेत्यांखेरीज इतरांशी ज्या नेहमीच्या पद्धतीने गांधी वागत त्याच पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे दुर्लक्ष केले व ते मिस स्लेडशी बोलत राहिले.

आपल्या बाबतीत गांधींकडूनही थोडासा भेदभाव दाखवला गेला म्हणून डॉक्टरांच्या लोकांनाही क्षणभर वाईट वाटले. लगेच गांधी आंबेडकरांकडे वळले.आंबेडकरांना गांधी पहिल्यांदाच पहात होते.औपचारिक बोलणे झाल्यावर गांधींनी मुख्य गोष्टीकडे आपला मोहरा वळवला.


गांधी : मग काय डॉक्टर?तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचे आहे?


आंबेडकर :आपण मला आपली मतं ऐकून घेण्यासाठी इथं बोलावले आहे.कृपया आपल्याला काय सांगायचे आहे ते सांगा किंवा आपण मला काही प्रश्न विचारा व मी त्यांची उत्तरे देईन.


गांधी : (आंबेडकरांच्या रोखाने पहात) मला याची पूर्ण कल्पना आहे की तुमच्या मनात माझ्यविषयी आणि काँग्रेसविषयी कटुता आहे.अस्पृश्यतेच्या समस्येवर मी हायस्कूलमध्ये आल्यापासून विचार करीत आहे.त्यावेळी तुमचा जन्मदेखील झाला नव्हता.तुम्हाला कदाचित कल्पना असेल,या प्रश्नाचा काँग्रेसमध्ये अंतर्भाव करण्याकरिता मी अतोनात प्रयत्न केले आहेत.हा निव्वळ सामाजिक आणि धार्मिक प्रश्न असल्याने राजकारणात त्याला थारा देऊ नये,असे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. म्हणून त्याला मी विरोध केला.अस्पृश्यांच्या उद्धाराकरिता आत्तापावेतो वीस लाख रुपये काँग्रेसने खर्च केले आहेत.आणि ही खरोखरीच खेदाची गोष्टी आहे की तुमच्यासारखेच लोक मला आणि काँग्रेसला विरोध करीत आहेत.तुम्हाला आपली बाजू मांडायची असेल तर तुम्ही ते खुशाल करू शकता.


आंबेडकर : महात्माजी,माझ्या जन्मापूर्वी अस्पृश्यांविषयी विचार करायला आपण सुरुवात केलीत हे सत्य आहे.बहुतेक वृद्ध आणि वयस्क माणसे वयावर भर देण्याचाच प्रयत्न करतात.हेही खरे आहे की आपल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नाला मान्यता मिळाली.पण मला आपल्याला असे स्पष्टपणे सांगायचे आहे की निव्वळ औपचारिक मान्यतेखेरीज काँग्रेसने या प्रश्नाविषयी काहीही केलेले नाही.आपण म्हणता काँग्रेसने अस्पृश्योद्धाराकरिता वीस लाख रुपये खर्च केले.मी म्हणतो,तो सगळा पैसा पाण्यात गेला. असे आर्थिक साहाय्य मिळाले असते तर माझ्या लोकांचा दृष्टिकोन आणि त्यांची आर्थिक परिस्थिती यांत मी कमालीचा बदल घडवून आणला असता आणि त्याकरिता आपली माझी भेट यापूर्वीच होणे आवश्यक होते.पण मी तुम्हाला सांगतो की, अस्पृश्यता निवारण्याचे काँग्रेसचे हेतू प्रामाणिक नाहीत.जर खरोखरीच काँग्रेसने यात प्रामाणिकपणे लक्ष घातले असते तर अस्पृश्यतानिवारण हा तिचा एक मुख्य कार्यक्रम राहिला असता.खादीचा वापर हे जसे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे अविभाज्य कर्तव्य होते,

तसेच अस्पृश्यतानिवारणाचे ठरले असते.ज्याच्या घरात कामासाठी हरिजन स्त्री अगर पुरुष नाही,एखादा हरिजन विद्यार्थी नाही, आठवड्यातून एकदा तरी जो अस्पृश्यासमवेत जेवण घेत नाही,अशाला काँग्रेसचे सदस्यत्व नाकारणे हा उत्तम उपाय होता.अशी तुमची एखादी तरी अट आहे काय? फार कशाला?याच प्रश्नाची दुसरी हास्यास्पद बाजू बघायची तर जिल्हा काँग्रेस समितीच अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाला विरोध करीत होती व तिकडे तुम्हा लोकांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत होते....आपण असेही म्हणू शकाल की, काँग्रेसला संख्याबल पाहिजे आहे,तेव्हा अशी अट लादणे शहाणपणाचे होणार नाही. त्यावर माझे म्हणणे असे की,काँग्रेसला तत्त्वापेक्षाही लोकांची फिकीर अधिक आहे.हा माझा तुमच्यावर आणि काँग्रेसवर आरोप आहे.आपण म्हणता की, ब्रिटिश सरकार आपले मत बदलीत नाही. मलादेखील असेच म्हणावयाचे आहे की,हिंदू आमच्या प्रश्नाबाबत आपले मत बदलावयास तयार नाहीत.आणि जोवर असे आहे तोवर आमचा काँग्रेसवरही विश्वास बसणार नाही आणि हिंदूंवरही. आमचा आमच्या स्वतःच्या हिंमतीवर विश्वास आहे. आम्हाला आदर वाटतो तो देखील आमच्याबद्दलच.मोठे नेते आणि महात्मे यांच्यावर विश्वास ठेवायला आम्ही तयार नाही.मला थोडे स्पष्ट बोलू द्या.इतिहास असे स्पष्ट सांगतो की,तुताऱ्या वाजविणारे महात्मे नुसती धूळच वर उठवतात, जमिनीची पातळी उंचावत नाहीत.काँग्रेसच्या लोकांनी आमच्या चळवळीला का विरोध करावा किंवा मला तरी देशद्रोही का समजावे?"


आंबेडकर थोडेसे अस्वस्थ झाले.त्यांचा चेहरा रागाने लालेलाल झाला.डोळे आग ओकू लागले.क्षणभर ते थांबले.आणि धारदार आवाजात त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.


आंबेडकर : गांधीजी,मला मातृभूमीच नाही.


गांधी : (किंचित भारलेल्या स्वरात त्यांना मध्येच थांबवून) तुम्हाला तुमची मातृभूमी आहे.आणि माझ्याकडे राउंड टेबल कॉन्फरन्सचे जे काही रिपोर्ट्स आले आहेत त्यांवरून हेच सिद्ध झाले आहे की,तुम्ही देशाविषयी कळकळ बाळगणारे एक थोर देशभक्त आहात.


आंबेडकर : आपण म्हणता मला मायभूमी आहे. तरीही मी निक्षून सांगतो की मी खरोखरीच पोरका आहे.मी या देशाला माझा देश म्हणून कुठल्या तोंडाने म्हणू? हा धर्म तरी माझा कसा? कारण इथे आम्हाला कुत्र्यामांजराच्या पलीकडली वागणूक दिली जाते.इथे आम्हाला पाणीदेखील प्यायला बंदी आहे.कोणत्याही स्वतःविषयी अभिमान बाळगणाऱ्या या अस्पृश्याला हा देश आपला आहे असे वाटणार नाही.या देशाविषयी अभिमानही वाटणार नाही.आम्हा लोकांवर इतका अन्याय झालेला आहे आणि इतकी घोर दुःखे आम्ही सहन करीत आहोत की,यातून एखादेवेळी देशद्रोह घडला तर त्याला आम्ही जबाबदार नाही,ही जबाबदारी संपूर्णपणे देशाची आहे.मला कुणी देशद्रोही ठरवले तर त्याची मला खंत वाटत नाही.कारण या देशद्रोहाची मुळेच मुळी या देशात रुजलेली आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे खरोखरीच माझ्या हातून काही देशसेवा घडली असेल,देशाला फायद्याचे आणि उपकारक कृत्य घडले असेल तर त्याला कारण माझ्यातले देशभक्तिपर विचार हे नसून माझी सद् सद् विवेकबुद्धी हीच आहे.माझ्या लोकांचे हक्क प्रस्थापित करण्याकरिता कोणतेही देशद्रोही कृत्य करायची माझी तयारी आहे.ते पाप आहे असे मला वाटत नाही.कारण आज युगानयुगे हा अन्याय माझ्या लोकांवर लादलेला आहे.जर माझ्या देशाला माझ्या या कृत्यामधून काही इजा पोहोचली नाही तर त्याचे कारणही माझी सदसद्विवेकबुद्धी हेच म्हणावे लागेल.माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते की,माझ्या देशाला कसलाच धक्का न पोहोचवता आजवर मानवी हक्कांपासून वंचित झालेल्या माझ्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजेत." वातावरण कमालीचे तापले होते. चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.गांधी थोडे अस्वस्थ झाले.

आंबेडकरांच्या भाषणाला थोडे निराळे वळण लावायचा त्यांचा विचार होता.त्याच वेळी आंबेडकरांनी अत्यंत शांततेने त्यांना एक प्रश्न विचारला.हाच प्रश्न या मुलाखतीचे खरे उद्दिष्ट होता.


आंबेडकर : प्रत्येकाला हे माहीत आहे की,मुस्लिम आणि शीख - सामााजिक,राजकीय व आर्थिकदृष्ट्या अस्पृश्यांहून अधिक पुढारलेले आहेत.राउंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या बैठकीत मुस्लिमांच्या मागण्यांना राजकीय मान्यता मिळाली व त्यांना राजकीय संरक्षणही मिळाले.याच वेळी दलित समाजाच्या राजकीय हक्कांनाही त्यांनी मान्यता दिली.

दलितांना राजकीय संरक्षण व त्यांचे प्रतिनिधित्वही त्यांनी मान्य केले होते.आम्हाला असे वाटते की दलितांच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे. आपले या बाबतीत काय मत आहे?


गांधी : हिंदूंपासून दलितांच्या राजकीय वेगळेपणाला माझा तीव्र विरोध आहे.तो एक फार मोठा आत्मघात ठरेल.


आंबेडकर : (उठत) आपल्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल मी आपला फार आभारी आहे.या प्रश्नाबाबत आम्ही निश्चित कुठे आहोत याची पूर्ण कल्पना आता आम्हाला आली.मी आपली रजा घेतो.आंबेडकरांनी सभागृह सोडले.आपल्या हक्कांविषयीची तीव्र जाणीव त्यांच्या मनामध्ये उफाळून आली होती.ते हक्क मिळवण्याकरिता ते अविरत धडपडणार होते.(गांधी नावाचे महात्मा,संपादन : रॉय किणीकर,साहाय्यक,

अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन,पुणे...)


ही मुलाखत अशाप्रकारे खिन्न - गंभीर वातावरणात पार पडली.गांधी म्हणजे भारतीय राजकारणाचे अध्वर्यू,

हुकूमशाहा,भारतीय लोकांचे अनभिषिक्त सम्राट.असा माणूस आज एकदम बिथरला गेला होता.त्यांच्यातून विजेची एक लहर झपाटून गेली.पुन्हा गांधींशी संवाद करणे म्हणजे कायमची कटुता व न संपणारे दुःख निर्माण करण्यासारखे होते.एका हिंदू पुढाऱ्याची ही हिंमत गांधीजींना आश्चर्यात टाकणारी होती.परंतु विरोधाची धार तीव्र होती. हीच मुलाखत गांधी - आंबेडकरवादाची नांदी ठरली.


आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधींना वाटत होते की आंबेडकर हे हरिजन नसून ब्राह्मण आहेत. ते इंग्लंडला जाईपर्यंत त्यांची ही समजूत कायम होती. - अनुवाद- रॉय किणीकर


सत्याचे प्रयोग...


जरी देव्हाऱ्यातून,उठून गेले देव 

मोडला जरी,देव्हारा जपुनी ठेव । 

कापूर जळू दे,जळणे त्याचे काम 

कोसळली पृथ्वी,म्हणताना 'हे राम'।।


का कुणी पाहिले,सत्याचे ते रूप 

कुणी सांगितले रे,असत्य म्हणजे पाप। 

सत्यार्थ जन्मते,असत्य व्यभिचाराचे 

फुलतात अग्निकण,त्यातून संघर्षाचे ।।


महान जीवन गांधीजींचे 

अवतरले दुसरे सिद्धार्थ ।

 सत्य,अहिंसा अन् शांतीचे 

राजघाट हे प्रयागतीर्थ ।।


चरखा,चष्मा,चपला,चटई 

का बापूजींची हीच कमाई। 

चमत्कार तो मिठाचा मोठा 

तीन गोळ्या... मृत्यु झाला खोटा ॥


इतिहास घडविला,त्यांची झाली कीर्ति 

इतिहास तुडविला,त्यांचीदेखील कीर्ति । 

गहिरवला अश्रू,कीर्तिस्तंभावरला 

पिंडास कावळा,अजून नाही शिवला ॥


रॉय किणीकर..





६/१२/२४

आपलं आस्तित्व / Your existence

नोव्हेंबर महिन्याचा लेखाजोखा...!!!


November महिना सरला... ! 


संपुर्ण 12 महिन्यात एव्हढा एकच महिना आहे जो No ने सुरू होतो... !  


पण हा,No दरवेळी नकारात्मकता घेऊन येतो असं नाही.... ! 


No चा बोर्ड,जर्रा फिरवला तर तो "On" होतो... 


No म्हणजे... No worries.. 

No म्हणजे... No Guilt 

No म्हणजे... No Hate

No म्हणजे... No Expectations 

No म्हणजे... No Selfishness 

No म्हणजे... No hard feelings ! 


असो, 


परवा एका जुन्या मित्राचा फोन येऊन गेला सहज बोलताना तो म्हणाला की नुकताच त्याचा वाढदिवस झाला..सगळे विचारतात तोच कॉमन प्रश्न मी त्याला विचारला आता तुझं वय किती झालं? 


त्याने वय सांगितलं...! 


मनात आलं,आपण जन्माला आल्यानंतर आजपर्यंत जे काही जगलो,त्याला वय म्हणून आपण गृहीत धरतो;परंतु त्या अगोदरचे आईच्या सहवासातले नऊ महिने कोणीच का गृहीत धरत नाहीत ? 


आकड्यात सांगायचं झालं,तर जन्मानंतर आपण आजपर्यंत जे जगलो,ते अधिक नऊ महिने हे आपलं आकड्यातलं वय... ! 


खरंतर वय वाढल्याने माणूस मोठा होतच नाही,तो मोठा होतो मॅच्युरिटी वाढल्याने... !!! 


दुसऱ्याची प्रगती पाहतानाही आनंद होणं म्हणजे मॅच्युरिटी...


ज्याचा काल संध्याकाळी अस्त झाला आहे,त्याचा आज सकाळी उदय पाहणे यात आनंद वाटणे म्हणजे मॅच्युरिटी... !


स्वतःला वेदना झाल्यानंतर तर सगळेच रडतात; परंतु दुसऱ्याची वेदना पाहून आपल्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे संवेदना...वेदना आणि संवेदने मधला फरक कळणं म्हणजे मॅच्युरिटी... 


जन्माला येताना निसर्गतःशरीरात २७० हाडं असतात... माणसाचं वय वाढलं की हिच हाडं आतल्या आत जुळून २०६ होतात... 


वाढत्या वयाबरोबर अपेक्षांची संख्या सुद्धा आपण हळूहळू कमी करायला हवी...थोडं आपणही, हाडांप्रमाणेच; जुळवुन घ्यायला शिकायला हवं... हेच तर निसर्गाला सांगायचं नसेल यातून ? 


आपण जिवंत असताना सोबत घेऊन चालतो ते आपलं आस्तित्व...! 


आयुष्य जगत असताना; दुसऱ्याला आपण किती दिलं आणि दुसऱ्याकडून किती घेतलं याच्या बेरीज आणि वजाबाकी करून;मृत्यूनंतर जे शिल्लक राहतं,ते आपलं व्यक्तिमत्व...!!


फरक फक्त दृष्टिकोनाचा !


शाळेच्या चार भिंतीत काटकोन,त्रिकोण, लघुकोन आणि चौकोन सर्व कोन शिकवतात...


पण दृष्टिकोन शिकण्यासाठी आयुष्यातल्या बिन भिंतीच्या शाळेत अनुभवच घ्यावे लागतात... ! 


शेवटी अनुभव म्हणजे तरी काय ? 


बरोबर येण्यासाठी,आपण सतत केलेल्या चुकांना दिलेलं गोंडस नाव,म्हणजे अनुभव... !!! 


असो या महिन्यातल्या चुका - अनुभव, कोन -दृष्टिकोन,

वेदना - संवेदना,अस्तित्व - व्यक्तिमत्व या सर्व शब्दांचा अनुभव पुन्हा एकदा या महिन्यात आपल्यामुळे घेता आला,आणि म्हणून या महिन्याचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर !


- वेदना - संवेदना…!!


रस्त्यावर लहान मुली सोबत राहणारी एक ताई. कधी फुगे विकून कधी भीक मागून गुजराण करायची.एका गुरुवारी शंकर महाराज मठाकडे गेलो,तेव्हा कळलं,मुलीच्या आईला एका चार चाकी गाडीने उडवलं आणि तिचा जागीच अंत झाला. 


खूप हळहळ वाटली आणि बारा तेरा वर्षाच्या या मुलीचं आता कसं होणार ? अशी चिंता वाटली. 


तिथं मागायला बसणाऱ्या आज्या आणि मावश्यांकडे मी ही चिंता व्यक्त केली.त्यातली एक प्रौढ मावशी पुढे आली आणि म्हणाली,काई काळजी करू नगा डाक्टर,या पोरीला समजायला लागल्यापासनं ती मला मावशी म्हंती... आता हीजी आई मेली,मावशी म्हणून काय हीला उगड्यावर ठीवू का ? मी जिवंत हाय तवर हीचां सांबाळ मीच करणार...!'


या प्रौढ मावशीला आपण फुलं विकण्याचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.हिला सुद्धा कोणीही नाही.खूप वर्षांपूर्वी नवऱ्याचा अंत झाला... एक मूल होतं,ते कसल्याशा आजाराने लहानपणीच गेलं... 


मी तिला म्हणालो,अग पण फुलांच्या व्यवसायात थोडेफार पैसे मिळतात... त्यात अजून एका व्यक्तीचा भार तुला झेपेल का ?' 


'काय डाक्टर... आईला लेकरांचा भार वाटला आस्ता तर,कोंच्याच आईनं लेकराला नऊ म्हैने पोटात घिवून मिरवलं नसतं...एकांदा घास मी कमी खाईन,त्यात काय ? आनी कमी जास्तीला तुम्ही हाईतच की... माझ्या पाठीत धपाटा घालत ती हसत बोलली... !'  


'तसं नाही गं,कुठल्यातरी संस्थेत मी मुलीची व्यवस्था केली असती...'


'डाक्टर आविष्यात एकदा आई झाले,तवा पोरगं देवानं न्हेलं... आता पुन्ना आई व्हायची येळ आली, तवा पोरगी तुम्ही न्हेनार... 


मंजी मी फकस्त बाई म्हनून जगायचं ...मला बी मी मरायच्या आदी एकदा तरी "आई" हुंद्या की...! 


माझ्या डोळ्यात खरोखर पाणी तरळलं... !


आपण खड्ड्यातून बाहेर आल्यावर दुसऱ्याला सुद्धा बाहेर येण्यासाठी हात द्यायचा...हे सतत मी माझ्या लोकांवर बिंबवत असतो. 


आज या माऊलीने हा विचार खरोखर अंमलात आणला. 


आईच्या पदराला खिसा नसतो,पण आई द्यायची कधीच थांबत नाही... 


ती कधीच कुठेही दूर जात नाही...मनातल्या तळ कप्प्यात... ती कुठेतरी, "आभाळ" म्हणून भरून राहत असते.. 


हो आभाळच...!!! 


कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात,ज्या ढगांमध्ये पाणी भरलेलं असतं ते "आभाळ"... आणि ज्यात पाणी नसतं... कोरडं असतं ते "आकाश"...! 


आभाळ आणि आकाश यामध्ये फरक असतो ...!!! 


विज्ञान सांगतं,माणूस जगतो श्वासावर ... रक्तावर.... पाण्यावर... 


लेकरांचे श्वास,रक्त आणि पाणी,स्वतःच्या नसानसात भरून आई "आभाळ" होते,कायम लेकरांसाठी "धड-पड" करत असते...  छातीच्या डाव्या बाजूला नेहमी "धड - धड" होत असते... विज्ञान त्याला हृदय म्हणतं... ! 


डॉक्टर असूनही,छाती ठोकून सांगतो माऊली,हि "धड - धड"... त्या हृदयाची नसतेच... हि "धड - पड" असते, त्या आभाळाची... "आई" नावाच्या हृदयाची ... !!! 


'काका,मावशीनं मला चिमटा काडला,तीला सांगा ना ...'  पोरीनं खांद्याला हलवून मला भानावर आणलं...!


आता ती मुलगी;त्या मावशी सह थट्टा मस्करी करण्यात मश्गुल होती... !


मुलीला कसं सांगू ? तुला पदरात घेऊन ....तुझी आई होऊन... स्वतःला ती आयुष्यभर चिमटा काढत राहणार आहे... ! 


"एका प्रौढ महिलेने,दिला बारा वर्षाच्या मुलीला जन्म... !!!"*


हि "डिलिव्हरी" नॉर्मल नव्हती...सिझेरियन सुद्धा नव्हतं... 


हा होता फक्त मातृत्वाचा सोहळा !!!


लोक तीला याचक म्हणतात... 


आज बघता बघता ती आई म्हणून "आभाळच" होऊन गेली... 


घेता हात,आज देता झाला... 


तीचे हेच हात,मी माझ्या कपाळाला लावले आणि त्यानंतर माझं कपाळ तिच्या पायावर टेकवलं... नतमस्तक झालो... 


माझ्यासारखा एक कफल्लक,आईला दुसरं देऊच काय शकतो... ??? 


(मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण घेत आहोत)


प्रसंग दोन :


याच महिन्यात एका भीक मागणाऱ्या मुलाला छोटासा व्यवसाय टाकून दिला.... 


व्यवसाय म्हणजे काय तर,ज्या मंदिराच्या बाहेर तो भीक मागतो,त्याच मंदिराच्या बाहेर भक्तांच्या कपाळावर त्याने आखीव रेखीव असा मस्त उभा - आडवा गंध / ओम / त्रिशूळ काढायचा...त्यांना आरसा दाखवायचा...


भक्त मग खुश होऊन २ /५ /१० /२० /५०रूपये त्यांना जसे जमेल तसे पैसे देतील... ! 


हा खूप साधा सोपा व्यवसाय मी माझ्या अनेक याचकांना टाकून दिला आहे... 


यात माझी इन्वेस्टमेंट किती ? फार तर २०० ते ३०० रुपयांची.... 


अष्टगंध आणि काळा बुक्का विकत घेणे... 

तो ठेवण्यासाठी एक चांगला कप्पा असलेला स्टीलचा डब्बा देणे... 


यात पैशाची इन्व्हेस्टमेंट जास्त नसते..! 


पण भीक मागू नका रे...हे साधं सोपं काम करा रे आणि सन्मानाने जगा रे ;  हे सांगायला मला साधारण माझ्या आयुष्यातले बारा ते पंधरा महिने द्यावे लागतात...  हि मात्र माझी इन्वेस्टमेंट...!


मी काही कुठला जहागीरदार नाही,संस्थानाचा संस्थानिक नाही,कारखानदार नाही,कंपनीचा मालक नाही,हातात कसलीही सत्ता नाही... मी तरी नोकऱ्या कुठून निर्माण करू ? 


आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य,समाजातल्या रूढी - परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! 


दिवाळी आली,पणत्या विकायला द्या...


 दसरा आला,झेंडूची फुल विकायला द्या...


 गुढीपाडवा आला,साखरेच्या गाठी विकायला द्या... 


संक्रांत आली,तिळगुळ विकायला द्या... 


रंगपंचमी आली,रंग किंवा पिचकारी विकायला द्या...


आता नवीन वर्ष येईल,कॅलेंडर आणि छोट्या डायऱ्या विकायला द्या... 


असे काहीतरी मार्ग शोधतो आहे; 


अर्थात तुम्हा सर्वांच्या साथीने.... !!! 


असो... 


तर असं काम दिलेल्या या मुलाचा मला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला.तो म्हणाला,'सर तुम्ही उद्या कुठे आहात ?' 


'मी उद्या अमुक अमुक ठिकाणी आहे... का रे...?'


'सर माझी जी पहिली कमाई झाली;त्यातून मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे...' 


मला थोडा राग आला...


'दोन पैसे मिळाले,त्यात लगेच गिफ्ट वाटायला लागलास...? 


'मूर्खा,तुला काय सांगितलं होतं ? दिवसभरात जे पैसे मिळतील त्यातले ४० टक्के खर्च करायचे;पण ६० टक्के वाचवायचे... काय सांगितलं होतं तुला ?'  


'४०:६० गणित लगेच विसरलास का... ? एक तर आपले खायचे वांदे... त्यातून,जरा पैसे मिळाले की लगेच कुणालातरी गिफ्ट द्यायचं... !' 


'मला तुझं कोणतंही गिफ्ट नको आहे...पैसे वाचवायची अक्कल येत नाही,तोपर्यंत मला भेटू नकोस'... मी तूसड्यागत बोललो...


' ऐका ना सर...' तो बोलतच होता 


'तू जरा बावळट आहेस का रे... ? ठेव फोन आणि काम कर .... मला उद्या भेटायची काही गरज नाही...!' 


मी रागाने बोलून गेलो... 


एकदा व्यवसाय टाकून दिला की,माझे याचक लोक पैसे कसेही वापर करतात,उडवून टाकतात...बचत करा म्हणून सांगूनही बचत करत नाहीत आणि या गोष्टीचा मला राग आहे,आणि म्हणून बापाच्या भूमिकेतून मी त्याला रागावलो.! 


मी फोन ठेवणार एवढ्यात तो म्हणाला,'उगीच कोणालातरी नाही गिफ्ट देत सर,मला वडील नाहीत...वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा ते मला म्हणायचे;तू जेव्हा कमावशील तेव्हा मला काहीतरी छोटसं गिफ्ट दे...'


'आज ते नाहीत,म्हणून वडील समजून तुम्हालाच देतो आहे सर,प्लीज घ्या ना.... !' 


आता या वाक्यावर कोणीही विरघळून जाईल... 


पण तरीही कोरडेपणाने मी त्याला म्हणालो,'ठीक आहे,ये उद्या...' 


कारण कष्टाने मिळालेले पैसे फालतू गिफ्टवर खर्च करणे मला मान्य नव्हते... ! 


तो दुसऱ्या दिवशी दबकत दबकत आला...!


'खिशातून एक पुरचुंडी काढून मला म्हणाला,'सर हेच माझं गिफ्ट आहे...'


मी खोलून पाहिलं.... ती शेंगदाण्याची पुडी होती... आत खारे शेंगदाणे होते...


मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं...'काय आहे हे ?' 


सर माझ्या वडिलांना भाजलेले,खारे शेंगदाणे खूप आवडायचे... मी असा वाया गेलेला... बाबांच्या कोणत्याही अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही...


बाबा म्हणायचे,'तुझ्याकडून फार काही अपेक्षाच नाहीत रे नालायका .... स्वतःच्या कमाईतून चार शेंगदाणे जरी मला तू खाऊ घातलेस,तरी मी शांततेत मरेन...!' 


'एके दिवशी बाबा गेले... !' 


'बाबांच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही सर '


'मी मागे नालायक उरलो सर ...' 


जातांना ते चार शेंगदाणे माझ्यावर उधार ठेवून गेले...!' 


'स्वतःच्या कमाईतून,आज तेच शेंगदाणे घेऊन आलो आहे... सर तुम्ही खा ना...'  तो काकुळतीने बोलला... 


काय बोलू मी यावर ? मला सुचेना....!


पुडी उघडून मी हे शेंगदाणे तोंडात टाकले... 


तो गळ्यात पडून हमसून हमसून रडला... 


आज "पिंडाला कावळा" शिवला होता... !!!


जिवंत असतानाही आज मी त्याचा मेलेला बाप झालो... !!! 


सांगण्यासारखं आणखी खूप आहे....


पण लांबलेला लेख आणखी लांबेल,या भीतीने मी बऱ्याच गोष्टी लिहीत नाही... 


माहेरी आलेल्या लेकीला;आई बापाला काय सांगू आणि काय नको असं होतं... तसंच माझं सुद्धा होतं... म्हणून लेख लांबतो... .


आईबाप आहातच ...आता लेक समजून पदरात घ्या.. ! 


८० वर्षाची एक आजी....  तीचा मुलगा आणि सून काम मिळत नाही म्हणून घरात आहेत..दिवसभरात आजीला जी भिक मिळते त्यात घर चालतं.... 


 मी या सून आणि मुलाला भेटलो... 


सुनेला शिवणकाम येतं..सुनेला म्हटलं,'तुला जर शिलाई मशीन दिलं तर काम करशील का ?  आणि काम केलं तर म्हातारीला घरात आणशील का ? 


आजीला भीक मागू द्यायची नाही,या अटीवर सुनेला शिलाई मशीन दिलं आहे... 


आज सून काम करत आहे आणि आजी घरात आहे.... !


येत्या काही दिवसात तिच्या मुलाला सुद्धा काम देणार आहोत....!


अजुनही खूप काही सांगायचं आहे... 


मी तरी किती लिहू आणि तुम्ही तरी किती वाचणार ? 


थोडक्यात सांगायचं,तर नवीन वर्ष आता येईल, याचक मंडळींना आता कॅलेंडर विकायला देणार आहे... 


आज्या आणि मावश्या यांची खराटा पलटण नावाची टीम तयार करून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेऊन त्यांना गरम कपडे,स्वेटर,सत्कारात मला मिळालेल्या शाली, ब्लॅंकेट दिल्या आहेत... स्वच्छता झाल्यानंतर पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे...


अन्नपूर्णा या प्रकल्पाच्या माध्यमातून,भीक मागणाऱ्या कुटुंबांकडूनच जेवण तयार करून घेऊन ते आम्ही विकत घेत आहोत आणि रस्त्यावर किंवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना जेवणाचे डबे देत आहोत. 


रस्त्यावर असहायपणे पडलेल्या लोकांवर रस्त्यावरच उपचार करत आहोत... काहींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहोत... जगण्या आणि जगवण्याचा खेळ मांडत आहोत... 


जे दुसऱ्याच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाहीत अशांना काठ्या कुबड्या Walker देऊन त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहोत...


अनेक लोक अनवाणी आहेत,त्यांना या महिन्यापासून चप्पल देणार आहोत... 


सध्याच्या थंडीच्या काळात उघड्या नागड्या पोरांच्या अंगावर चादर चढवत आहोत... आणि म्हणून दर्गाहवर चादर चढवायला आमच्याकडे चादर उरतच नाही...


आम्ही अशिक्षित आहोत,परंतु सुशिक्षित लोकांना या महिन्यात मतदान करा म्हणून आम्ही सांगितलं...


मंदिरातून बाहेर येऊन,रस्त्यावर देवी आमची परीक्षा घेते... आपण केलेल्या मदतीमधून आम्ही रस्त्यावरच्या माऊलींना साड्या अर्पण करत आहोत... 


खुद्द देवीच रस्त्यावर दर्शन देऊन आशीर्वाद देते आणि म्हणून मग कोणत्याही मंदिरात जायची गरज उरत नाही... !!! 


या महिन्यात अजून सुद्धा खूप काही झालं आहे.... 


सांगेन पुढे कधीतरी... 


लांबलेला लेखाजोखा तुमच्या पायाशी सविनय सादर ! 


०१ डिसेंबर २०२४


डॉ अभिजीत सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स