* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/२/२५

हसरा,दुःखवादी एपिक्यूरस / Smile,sadist Epicurus

कसे मारावे हे माणसांना अलेक्झांडरने शिकविले,कसे जगावे हे त्यांना तत्त्वज्ञान्यांनी शिकविले.१९१४ सालच्या महायुद्धामुळे ज्याप्रमाणे तरुण पिढीच्या डोळ्यांसमोर भ्रमपटले दूर झाली,

त्याचप्रमाणे प्राचीन काळी अलेक्झांडरच्या जागतिक युद्धांमुळे नवीन पिढी निर्भान्त झाली.जे संशयात्मे होते,ते जीवनाच्या मूल्यांविषयी व देवाच्या विचित्र लहरींविषयी प्रश्न करू लागले.जे निरर्थकवादी होते,कशातच काही अर्थ नाही असे म्हणणारे होते,ते सर्व मानवी आशा-आकांक्षांची टर उडवू लागले.विरून जाणाऱ्या चंचल ढगांच्या पाठोपाठ पळत जाण्याप्रमाणे,मावळणाऱ्या इंद्रधनुष्याच्या पाठीमागे लागण्याप्रमाणे,या आपल्या आशा-आकांक्षा निष्फळ ठरणार आहेत;म्हणून त्यांच्यासाठी धडपडण्यात काही अर्थ नाही,असे ते म्हणत निराशावादी व दुःखवादी तत्त्वज्ञानी तर याच्याही पलीकडे जाऊन म्हणत,


"हे जीवन जरी कितीही सुखमय व आनंदपूर्ण दिसले तरी तिथे दुःखाची नांगी आहेच;अत्यंत आनंदाच्या क्षणातही दुःख लपलेले असते;प्रत्येक फुलात डंख मारणारी गांधीलमाशी असते; प्रत्येक सुखाभोवती दुःखाचा विळखा असतो! दोन झोपांमधे एक अत्यंत कटुस्वप्न म्हणजे जीवन ! जीवनाआधी शून्य;जीवनानंतरही शून्य ! दोन शून्यावस्थांमधला क्षणिक बुडबुडा म्हणजे जीवन ! हा बुडबुडा जितक्या लवकर फुटेल,हे स्वप्न जितक्या लवकर विराम पावेल,भंगेल, तितके चांगलेच." 


हेगेसियस नावाचा एक अत्यंत निराशावादी व दुःखवादी तत्त्वज्ञ होता.तरुणांनी करण्यासारखी सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे आत्महत्या,हे आपल्या विद्यार्थ्यांस पटवून देण्यासाठी तो सारखी खटपट करी.ही गोष्ट प्रतिपादण्यात त्याने सारे आयुष्य वेचले,पण तो स्वतः मात्र ऐंशी वर्षांचा होऊन अगदी स्वाभाविकपणे हे जग सोडून जाण्याची पाळी येईपर्यंत जगला! आत्महत्या करा असे तो लोकांना सांगे,पण त्याने स्वतः मात्र कधीही आत्महत्येचा प्रयत्नही केला नाही.त्याला जेव्हा कोणीतरी असा प्रश्न केला की,'जे तुम्ही लोकांना उपदेशिता ते स्वतःच कृतीत का आणीत नाही?' तेव्हा त्याने उत्तर दिले,"मला माझ्या इच्छेविरुद्ध मोठ्या कष्टाने व दुःखाने जगावे लागते आहे.मरणे किती चांगले हे लोकांना पटवून देण्यासाठी तरी जगणे मला भाग आहे! काय करावयाचे ?"


या तत्त्वज्ञान्यांच्याविरुद्ध दुसरा एक अशा तत्त्वज्ञान्यांचा वर्ग होता की,त्यांना निरर्थक दिसणाऱ्या या जीवनातही आशा-तंतू दिसल्यासारखा वाटे.जीवनाच्या या अर्थहीन दिसणाऱ्या विणावटीतही बुद्धिमान अशा विणकराचा हात दिसतो,असे ते म्हणत. या जीवनात काहीतरी हेतुमयता,योजकता आहे,हे अगदीच निःसार व पोकळ नाही.यात थोडाफार अर्थ आहे,असे त्यांना वाटे.ते 'सर्वसह'वादी स्टोइक म्हणत की,"हे जीवन आशीर्वादरूप आहे.आपणास जी संकटे वाटतात ती वस्तुतःती दुःखरूप नसून आपले मन अधिक खंबीर व गंभीर व्हावे,अधिक सामर्थ्यसंपन्न व काटक व्हावे म्हणून आपल्या मार्गात मुद्दाम टाकलेले अडथळे असतात;त्या संकटातही आईची मंगल कृपाच असते.


जे पापाची शक्ती मान्य करतात,त्यांच्यावरच जगातल्या दुःखांची व जगात जे जे असत् आहे,त्याची सत्ता चालू शकते; पापाची शक्ती मान्य करणारांनाच पाप अपाय करू शकते;

भुताला भिणाऱ्यांच्याच छातीवर भूत बसते. दुःखाला स्वतःची अंगभूत शक्ती नाही.दुःखाने रडणारा कोणीच न भेटला तर दुःख काय करील?तुमच्या दुबळेपणामुळेच दुःख प्रबळ आहे.त्या दुःखाचा इन्कार करा म्हणजे ते तुमच्यापुरते तरी नष्ट झाल्यासारखेच आहे."हे स्टोइक म्हणजे ख्रिस्तपूर्व जगातील आशावादी शास्त्रज्ञ.


यांच्या उलट दुसरे सुखवादी तत्त्वज्ञानीही होते. ते दुःख आहे असे मानीत.पण सुखोपभोगात रंगून माणसाने स्वतःला दुःखाचा विसर पाडावा असे शिकवीत,त्यांना 'उदरंभर तत्त्वज्ञ', 'शिश्नोदरपरायण तत्त्वज्ञानी'अशी नावे ठेवण्यात येत.त्यांना शांत व सौम्य अशा मानसिक व बौद्धिक आनंदापेक्षा प्रक्षुब्ध व मत्त करणारे शारीरिक आनंद आवडत.'खा, प्या, मजा करा,' हे त्यांचे ब्रीदवाक्य होते, 'उद्या एखादा अलेक्झांडर येईल व तुम्हाला मरावयास सांगेल, म्हणून मिळेल तेवढा क्षण सुखात घालावा.'असे ते सांगत. या न समजणाऱ्या जगात,या अनाकलनीय संसारात कसे वागावे हे न समजल्यामुळे हे सारे तत्त्वज्ञानी जणू प्रयोगच करू पाहत होते.या जगाशी कसे जमवून घ्यावे हेच जणू ते पाहत होते.कोणी दुःखावर भर देई;कोणी सुखावर कोणी दुःखेही आशीर्वादरूप असे सांगत,कोणी सुख मिळेल तेवढे भोगून पदरात पाडून घ्या असे सांगत.अलेक्झांडरने जी सारखी युद्धे पेटविली त्यांमुळे मानवी मन अस्वस्थ झाले होते.रबरी चेंडूप्रमाणे मानवी मन केव्हा या बाजूला तर केव्हा त्या बाजूला,केव्हा वर तर केव्हा खाली फेकले जात होते,केव्हा इकडे तर केव्हा तिकडे ओढले जात होते.कोणी त्याला आशेकडे ओढी तर कोणी निराशेकडे; कोणी त्याला भोगाकडे ओढी तर कोणी त्यागाकडे. कोणी म्हणे, 'दुःखे भोगा',तर कोणी सांगे, 'सुखे भोगा.' कोणी विषयलंपटतेचे तत्त्वज्ञान पसरवीत तर कोणी 'जे जे होईल ते ते पाहावे' असे सांगत.जगात धर्म राहिला नव्हता.जुन्या ईश्वराने मानवी व मनोरथांची वंचना केली होती व मानवजात ज्याच्यावर विश्वास टाकू शकेल असा नवीन ईश्वर अद्यापि लाभला नव्हता.'जुना ईश्वर गेला, नवीन ईश्वराचा पत्ता नाही,'अशी स्थिती होती.


परंतु या सुमारास सॅमॉस बेटात एक तरुण वाढत होता. त्याचे नाव एपिक्यूरस धर्म नसतानाही सुखी कसे व्हावे हे तो शिकविणार होता,देवदेवतांच्या मदतीशिवाय हे जीवन नीट कसे जगता येईल,हे शिकविणार होता.


एपिक्यूरस अलेक्झांडरच्या जन्मानंतर पंधरा वर्षांनी, म्हणजे ख्रि.पू.इ.स. ३४१ मध्ये जन्मला.त्याचा बाप अथीनियन होता.तो शिक्षकाचा धंदा करी.परंतु त्याला पगार फारच थोडा होता.त्यामुळे त्याच्या पत्नीला धार्मिक गंडे,मंतरलेले ताईत वगैरे विकून महिन्याची दोन्ही टोके पुरी करावी लागत.ती अंगारे- धुपारे,

जपजाप्य करून संसार चालवी.ती मनुष्यांना भुताखेतांपासून,

प्रेतांपिशाच्चापासून मुक्त करणारी बिनपदवीची वैदू होती.

लहानग्या एपिक्यूरसला आईच्या या फसव्या धार्मिक जादूटोण्यांत मदत करावी लागे.या गोष्टी पाहून त्याला बालपणीच धर्माविषयी मनापासून तिटकारा वाटू लागला.


अगदी तरुणपणीच आध्यात्माविषयी त्याची आवड व तीव्र बुद्धिमत्ता या दिसून आल्या.


एके दिवशी गुरुजी शिकविताना म्हणाले,"हे जग मूळच्या अव्याकृत प्रकृतीतून जन्माला आले." एपिक्यूरसने विचारले, " पण ती अव्याकृत प्रकृती कोणी उत्पन्न केली?"पंतोजी म्हणाले,"मला ठाऊक नाही.त्याचे उत्तर एखादा खरा तत्त्वज्ञानीच तुला केव्हातरी देईल."


त्याच क्षणी त्याच वेळी एपिक्यूरसने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचे नक्की केले.ज्या अव्याकृत प्रकृतीतून हे प्रत्यक्ष जगत निर्माण झाले,ती मूळची अव्याकृत प्रकृती कोणी निर्मिली या प्रश्राचे उत्तर शोधून काढावयाचे,असे त्याने ठरविले.


वयाच्या अठराव्या वर्षी तो अथेन्सला गेला.ती त्याच्या पित्याची जन्मभूमी होती.तिथे तत्त्वज्ञानातील नाना पंथांशी व संप्रदायांशी त्याचा परिचय झाला,पण कोणत्याच विचारसणीकडे त्याचे मन आकृष्ट झाले नाही.नंतर तो पूर्वे कडे गेला.तो कित्येक वर्षे ज्ञानशोध करीत हिंडत होता.तो ज्ञानाचा यात्रेकरू झाला.पौर्वात्त्य देशांतील ज्ञानाच्या सोन्याच्या लगडी आणण्यासाठी तो मोठ्या उत्सुकतेने गेला व खरोखर ज्ञानसंपन्न होऊन वयाच्या पस्तिसाव्या वर्षी अथेन्सला परत आला. अथेन्सजवळच्या एका खेडेगावातील एक घर त्याने विकत घेतले.त्या घराभोवती बाग होती.


त्याने तिथे तत्त्वज्ञान शिकविणारी 'आकाशाखालची शाळा' उघडली.मोकळी,उघडी शाळा.


तत्त्वज्ञानाचे हे उघडे मंदिर स्त्री-पुरुष दोघांसाठीही होते. कोणीही यावे व शिकावे.ही संस्था फारच लवकर लोकप्रिय झाली.

एपिक्यूरसचे श्रोते त्याचे ईश्वरविषयक नवीन नवीन व आधुनिक पद्धतीचे विचार ऐकून डोलत, तन्मय होत.ते विचार ऐकून कधी त्याच्या मनाला धक्का बसे,तर कधी अपार आनंद होई.या विश्वाचे स्वरूप काय,मानवी भवितव्य काय,इत्यादी गहन गंभीर प्रश्नांवर तो बोले.भविष्यकालीन म्हणजेच मरणोत्तर जीवन अशक्य आहे हे तो अथेन्समधील तरुण-तरुणींना पटवून देई.भविष्यजीवन नसल्यामुळे शक्य तितके आनंद व रस या जीवनातूनच मिळविले पाहिजेत,हा विचार तो त्या तरुण श्रोत्यांच्या मनावर बिंबवी.या मिळालेल्या जीवनाचाच जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे.असे तो शिकवी व पटवून देई.आपल्या काळी तो अत्यंत लोकप्रिय तत्त्वज्ञानी झाला,त्याची लहानमोठी तीनशे पुस्तके त्या वेळेस प्रसिद्ध झाली होती.जे त्याच्या प्रवचनांना उपस्थित राहू शकत नसत,ते त्याची पुस्तके विकत घेत.एपिक्यूरसची बहुतेक पुस्तके नष्ट झाली आहेत,परंतु ल्युक्रेशियस नामक प्रतिभावान कवीने 'वस्तूंचे स्वरूप' या आपल्या महाकाव्यात एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानाची संपूर्ण रूपरेषा दिली आहे.

एपिक्यूरसनंतर दोनशे वर्षांनी ल्युक्रेशियस कवी झाला.तो रोममध्ये राही.तो एपिक्यूरियन पंथाचा होता. 'वस्तूंचे स्वरूप' हे ल्युक्रेशियसचे महाकाव्य साहित्याच्या इतिहासातील एक अती अपूर्व व आश्चर्यकारक अशी वस्तू आहे. 


वास्तविक,हे महाकाव्य अती निष्ठुर तर्कपद्धती शिकविण्यासाठी लिहिले आहे;पण त्यात ती अत्यंत उत्कट भावनांनी शिकविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.भावनोत्कट भाषेने निष्ठुर तर्क शिकविणारे हे अपूर्व महाकाव्य 'मनुष्याच्या सुखाव्यतिरिक्त जगात दुसरी दैवी व उदात्त गोष्ट नाही,'असे मानणाऱ्या एका नास्तिकाने लिहिले आहे.ते म्हणजे अधार्मिकांचे-कशावरच विश्वास न ठेवणाऱ्यांचे बायबल होय.


थोडा वेळ आपण ल्युक्रेशियसला भेटीला बोलावू या व एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा थोडक्यात सांगण्याची विनंती त्याला करू या.एपिक्यूरसच्या मते जीवनाचा हेतू जीवनातला आनंद अनुभवणे हा होय.या जगात आपणाला दुसरे कर्तव्य नाही,आणखी कसलेही काम नाही.आपण दयाघन परमेश्वराची लेकरे नसून बेफिकीर निसर्गाची सावत्र मुले आहोत.हे जीवन म्हणजे या यंत्रमय श्वातील एक अकल्पित व आकस्मिक घटना होय.पण आपली इच्छा असेल,तर आपणास हे जीवन सुखमय व रसमय करता येईल,कंटाळवाणे वाटणार नाही,असे करता येईल.

आपणास आपल्या सुखासाठी दुसऱ्यावर विसंबून राहून चालणार नाही,स्वतःवरच विसंबून राहिले पाहिजे,हे विश्व विश्वंभाराने निर्मिलेले नसून अनंत अशा अवकाशातल्या अणुपरमाणूंच्या गतीतून ते कसेतरी सहजगत्या बनले आहे एपिक्यूरस हा परमाणुवादी होता.ही मीमांसा त्याने


मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनु-साने गुरुजी मधुशी पब्लिकेशन


 डेमॉक्रिटस नामक पूर्वीच्या ग्रीक तत्त्वज्ञापासून घेतली.

डेमॉक्रिटस ही फारशी कधी न आढळणारी प्राचीन काळातील अपूर्व व्यक्ती होती.एखादे शास्त्रीय सत्य शोधणे हे त्याला एखादे साम्राज्य मिळविण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे वाटे.अशी माणसे प्राचीन काळात फारशी नव्हती.हे जग कसेतरी यांत्रिक रीतीने अणुपरमाणूतून बनले आहे.या जगाच्या उपपत्तीतच पुष्कळशा महत्त्वाच्या अर्वाचीन शोधांचे बीज आहे.डेमॉक्रिटसने जणू आजच्या पदार्थविज्ञान शास्त्रातील बऱ्याचशा शोधांची पूर्वकल्पनाच केली होती.


डेमॉक्रिटसच्या या अणुमीमांसेच्या पायावर एपिक्यूरसने आपल्या तत्त्वज्ञानाची इमारत उभारली. तो म्हणे- 


आपण सारे अणूंचे संघात आहो,कोठूनतरी शून्यातून आपण येथे फेकलो गेलो असून पुन्हा त्या शून्यातच परत फेकले जाणार आहोत. हे अणू सदैव खाली असे अनंत शून्यात (पोकळीत) फिरत राहतात.कधीकधी हे अणुसंघात या किंवा त्या बाजूला कलल्यामुळे संघर्ष होतात.


 सूर्यकिरणांतील त्रसरेणू एकमेकांवर आदळतात तद्वतच हे घडते.हे अणू नाना रूपांचे व आकारांचे असतात.हे अखंड भ्रमंतीमुळे व परस्परांच्या संघर्षामुळे हळूहळू संघटित होतात.त्यांपासून नाना पदार्थ बनतात.चंद्र, पृथ्वी,तारे हे विश्व अशा रीतीने या अणूंच्या संघातांतून जन्मले,आणि आपले विश्व हे एकच अशा प्रकारचे आहे असेही नव्हे.असली अनंत आश्चर्यकारक व अवाढव्य जगे,

विश्वे,ब्रह्मांडे आहेत.त्या दुसऱ्या विश्वातही आपल्या पृथ्वीसारखीच पृथ्वी असेल व तीवर पर्वत,समुद्र,मानव, पशु,पक्षी असतील.

आपणच तेवढे या अनंत समुद्राच्या अनंत किनाऱ्यावरील वाळूचे कण आहोत,असे नव्हे. कारण हे अणू पुन्हापुन्हा त्याच त्याच प्रकारच्या समवायांत व संघांत एकत्र येतात व तशाच वस्तू पुन्हापुन्हा सर्वत्र घडतात.जेथे जेथे तशी परिस्थिती असेल,तिथे तिथे वस्तुजात.या भ्रमणशील व संघर्षशील अणूंची ही सारी हालचाल स्वंयस्फूर्त असते.तीत कोणा विश्वसूत्रचालकाचा हात नाही;तिला कोणी योजक वा मार्गदर्शक लागत नाही.देवदेवताही अणूंपासूनच बनवतात..फरक इतकाच की,माणसे ज्या अणूंपासून बनतात त्यापेक्षा हे अणू अधिक शुद्ध व निर्दोष असतात.पण या देव नाही माणसांप्रमाणेच नाशवंत असतात.निरनिराळ्या विश्वांमधल्या अनंत अवकाशांत या देवदेवता राहतात,मानवी अस्तित्वाविषयी त्यांना फिकीर नसते,मानवी जीवनाविषयी त्यांना फारसे काही वाटत नाही.शेवटच्या विनाशकालाची प्रलयाची वाट पाहत आपण पृथ्वीवर वावरतो,ते स्वर्गात इतकाच फरक देव व मानव ज्या अणूंतून जन्माला येतात;त्याच अणूंत त्यांचे पुन्हा पर्यवसान होते.


ज्याअर्थी हे अणूसारखे भ्रमणशील आहेत,एका वस्तूंतून फुटून दुसऱ्या वस्तूंत मिळतात,त्याअर्थी एक गोष्ट सिद्ध आहे की,हे जग झिजत आहे व एक दिवस ही पृथ्वीही कोळशाच्या राखेप्रमाणे,

विझलेल्या निखाऱ्याप्रमाणे शून्य होणार आहे.विझलेल्या,थंडगार होऊन गेलेल्या अनंत विश्वाच्या उकिरड्यावर ही पृथ्वीही एके दिवशी गार होऊन पडेल.एपिक्यूरसच्या योजनेत देवांचे स्थान काय हे मात्र नीट समजत नाही.त्यांना मानवाचे महत्त्व वाटत नाही, मानवांना त्यांचे वाटत नाही.एपिक्यूरसला धर्म म्हणजे एक क्षुद्र,नजीवी,अर्थहीन वस्तू वाटत असे.तरीही तो अनेक देवदेवतांवरचा विश्वास सोडावयास तयार नव्हता.अर्थातच,हे देवही नाशवंत अणू आहेत व त्याने देवनाही शून्यांच्या किनाऱ्यावरील सुखी लोकांच्या बेटावर हद्दपार करून टाकलेले आहे हे खरे,पण त्यांना बेटाच्या कडेला ओढून विस्मृतीच्या समुद्रात कायमचे लोटून देण्याचे धैर्य मात्र त्याला झाले नाही.


एपिक्यूरसच्या विश्वात या देवदेवतांचे अस्तित्व असले तरी त्यांना या सृष्टीची काही एक कर्तव्य नाही.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२२/२/२५

३.९ मज्जासंस्था-२ /3.9 Nervous system-2

सुरुवातीला माणसाला शरीराचं विच्छेदन करताना कोणत्याही प्राण्याच्या शरीरातल्या नर्व्हज ओळखणं अवघड होतं.कारण सुरुवातीला अनेकदा नर्व्हज आणि स्नायू यामध्ये गफलत व्हायची.

शिवाय,कोणत्याही प्राण्याच्या शरीरात अनेक प्रकारच्या नर्व्हज असतात. त्यांचंही वर्गीकरण करणं अवघडच होतं.गंमत म्हणजे नर्व्हज या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थच मुळी टेंडॉन (एक प्रकारचे स्नायू) असा आहे! त्यामुळे गोंधळाला सुरुवात तिथून आहे! बाराव्या शतकातला ज्यूइश (यहुदी) तत्त्ववेत्ता मोसेझ मैमोनीदेस यानं म्हटलं आहे,"ज्याला ॲनॅटॉमीचं ज्ञान नाही तो नर्व्हज, लिगामेंट्स आणि टेंडॉन यांच्यात सहज गल्लत करू शकतो." याशिवाय गंमत म्हणजे त्या काळी शरीराची हालचाल करणं आणि संवेदना वाहून नेणं ही दोन्ही कामं नर्व्हज करतात असं मानलं जात होतं.अर्थात, फक्त संवेदना वाहणं हे नर्व्हजचं काम असतं आणि हालचाल करणं हे स्नायूंचं काम असतं.पण त्या काळी संवेदना वाहणं काय किंवा हालचाल करणं काय हे नेमकं कसं होतं हेच माहीत नव्हतं.


फार काय, पण रिस्टॉटललाही कोणत्याही प्राण्याच्या शरीरातल्या नर्व्हज या हृदयातच उगम पावतात आणि हृदयाकडूनच नियंत्रित होतात असं वाटत होतं.याचाच अर्थ,नर्व्हज आणि स्नायू यांच्यामध्ये त्याचाही गोंधळ झालेला होता असं आता काही लोकांना वाटतंय. त्यानंतर गेलननं मात्र रिस्टॉटलची चूक सुधारली. त्याच्या मते सगळ्या नर्व्हज मेंदूतूनच निघतात,त्यामुळे मेंदू हा सगळ्यात महत्त्वाचा अवयवच असला पाहिजे.


मेंदूतून स्पायनल कॉर्ड निघतो आणि तोच हाता-पायांच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवतो हे गेलननं अनेक प्राण्यांची विच्छेदनं करून आणि प्राण्यांवर प्रयोग करून पाहिलं होतं.याही पुढे जाऊन गेलननं हातापायांमधल्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रणही याच नर्व्हजमुळे होतं हे त्यानं पाहिलं होतं.त्यामुळे संवेदना वाहून नेणं आणि हालचाली घडवून आणणं ही दोन नर्व्हजची कामं आहेत असं तो मानायचा आणि त्यासाठी चक्क सॉफ्ट आणि हार्ड अशा दोन प्रकारच्या नर्व्हज असतात असंही तो मानायचा! त्यातूनही स्पायनल कॉर्ड हा आतून पोकळ असतो,हे गेलननं पाहिलं होतं.त्यामुळे त्यातून 'निमल स्पिरिट' म्हणजे आत्मा हा या पोकळ स्पायनल कॉर्डमध्येच असला पाहिजे,त्यामुळेच सगळ्या प्राण्यांच्या शरीरात चैतन्य असलं पाहिजे असंही गेलनला वाटत होतं !


मध्ययुगातही नर्व्हज या मेंदूशी निगडित असतात अशीच धारणा होती.अकराव्या शतकाच्या सुरुवातीला इस्लामिक डॉक्टर अविसेना यानंही नर्व्हज या पांढऱ्या,लवचिक,पण तुटायला अवघड अशा असतात. त्या मेंदूला जोडलेल्या असतात आणि त्या भावनांशी निगडित असतात असंही अविसेनानं आपल्या 'कॅनन ऑफ मेडिसीन'मध्ये म्हटलं होतं.नर्व्हजमध्ये कोरडेपणा वाढला तर माणूस रागीट होतो असंही त्यानं लिहून ठेवलं होतं. त्यानंतर जवळपास एका शतकानंतर आलेल्या मास्य निकोलसनं शरीरातल्या वेगवेगळ्या भागातल्या नर्व्हज मेंदूच्या वेगवेगळ्या भागातूर उगम पावतात हे शोधून काढलं होतं. त्याप्रमाणेच आपल्या दृष्टी,आवाज,वास,स्पर्श आणि चव या पाच संवेदनांसाठी शरीरात पाच वेगवेगळ्या प्रकारच्या नर्व्हज असतात असंही त्याला वाटायचं.गंमत म्हणजे त्या काळी कोणत्या नर्व्हज वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना आणि भावना कशा वाहून नेतात याबद्दल लिओनार्डो दा विंचीसहित अनेकांनी अनेक थिअरीज काढल्या होत्या !


त्यानंतर रेनायसान्स आणि मध्ययुगात अनेक थिअरीज येत राहिल्या.पण त्यापैकी खरं तर कोणीच सजीवांच्या मज्जासंस्थेचं स्वरूप आणि कार्य पूर्णपणे व्यवस्थित सांगू शकलं नव्हतं.

जवळपास सोळाव्या शतकाच्या शेवटपर्यंत आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत काही नवे शोध आणि काही जुन्या समजुती अशा दोन्ही गोष्टी सोबतच अस्तित्वात होत्या.

त्यानंतरच्या काळात व्हेसायलियस आणि रेने देकार्त यांनीही माणसाचं आणि प्राण्यांचं डिसेक्शन केलं होतं.तरी त्यांनीही नर्व्हज म्हणजे त्या प्राण्याच्या आत्म्याला शरीरभर फिरायचे रस्ते असंच सांगितलं होतं.पण सतराव्या शतकानंतर जसजसा माणसाची प्राण्यांच्या फिजिओलॉजीचा आणि नॅटॉमीचा अभ्यासात प्रगती होत गेली,तसतशी आत्मा आणि त्याला वाहून नेणारे रस्ते ही समजूत मागे पडत गेली.


त्यात भर म्हणून १६५३ मध्ये विल्यम हार्वेनं मेंदू हा स्वतः पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही पण तरीही मेंदूला सगळं समजतं,हे सांगितलं.


 हार्वेनं ऑप्टिक नर्व्हज,ऑलफॅक्टरी नर्व्हज आणि ऑडिटरी नर्व्हज या नर्व्हज शोधल्या होत्या.शिवाय, या नर्व्हजच स्वतःजागेवरून न हलता शरीरातल्या संवेदना वाहून नेतात असंही आपल्या 'लेक्चर्स ऑन द होल नॅटॉमी' या पुस्तकात लिहून ठेवलं आहे.याशिवाय, देकार्तनं या नर्व्हजमधून कणरूपानं स्टिम्युलाय वाहतात असंही सांगितलं होतं.पण या स्टिम्युलाय म्हणजेच संवेदना कणरूपानं न वाहता विद्युतप्रवाहाच्या रूपात वाहतात हे आता आपल्याला माहीत आहे. शिवाय,संवेदना एका नर्व्हजमधून दुसऱ्या नर्व्हज मध्ये जाऊ शकतात हेही देकार्तला समजलं होतं.


१६८१ मध्ये थॉमस विलिस यानं मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरॉलॉजी हा शब्द पहिल्यांदाच वापरला. 


अशाप्रकारे माणसाला प्राण्यांमधल्या न्यूरॉलॉजीबद्दल कळत गेलं.तसंच माणसाला प्राण्यांची नर्व्हज सिस्टिम कशी उत्क्रांत होत गेली तेही हळूहळू समजत गेलं.


मज्जासंस्थेच्या विकासाची सुरुवात ही अनेकपेशीय प्राण्यांमध्ये झाली असावी असं मानलं जातं. 


सुरुवातीला युकॅरिऑटिक प्राण्यांच्या शरीरात संवेदनशील पेशींचे काही समूह तयार झाले असं मानलं जातं.तर जेलीफिशसारख्या प्राण्यांमध्ये नर्व्हच्या जाळीसारख्या साध्या रचना सुरुवातीला निर्माण झाल्या असाव्यात.त्याच्यापेक्षा थोडी प्रगत मज्जासंस्था थोड्या वेगळ्या पाहायला मिळते.जेलीफिश हा टेनोफोरा फायलममध्ये प्राण्यांमध्ये येतो. हा फायलम उत्क्रांतीमधला सगळ्यात प्राचीन फायलम (गट) मानला जातो.त्यापेक्षा कमी उत्क्रांत प्राणी पोरीफेरा या फायलममध्ये पाहायला मिळतात.यात स्पाँज या प्रकारातले पाण्यातले प्राणी येतात.त्यांच्यात तर मज्जासंस्थाच नसते.


पण उत्क्रांतीमध्ये मज्जासंस्था कशी तयार झाली याबद्दल दोन सिद्धान्त (थिअरीज) मांडल्या गेल्या आहेत.एका थिअरीनुसार मज्जासंस्था ही सर्व फायलममध्ये स्वतंत्रपणे विकसित झाली,पण पोरीफेरा या फायलममध्ये ती तयारच झाली नाही.


तर दुसऱ्या सिद्धान्तानुसार उत्क्रांतीमध्ये मज्जासंस्था दोनदा स्वतंत्रपणे तयार झाली, असं मानतात.पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांमध्ये व्हेंट्रल नर्व्ह कॉर्डस् तयार झाले; तर पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये पाठीच्या कण्याभोवती (पेरिफेरल नर्व्हज) मज्जातंतू तयार झाले.


मज्जातंतू आणि मज्जासंस्थेची सुरुवात..


मज्जातंतूंनी काम करण्यासाठी 'ॲक्शन पोटेन्शियल' आवश्यक असतात.ते एकपेशीय युकेरियोट्समध्ये विकसित झाले. पण त्यांच्या क्शन पोटेन्शियलमध्ये सोडियमऐवजी कॅल्शियम वापरलं जातं.गटागटानं राहणाऱ्या काही ओबेलियासारख्या - युकॅरियोट्समध्ये दोन पेशींमध्ये संदेशवहन करायचं असेल तेव्हाही वापरलं जातं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

उत्क्रांतीमध्ये न्यूरॉन्स आणि पहिल्या नर्व्ह सिस्टिम्स कशा निर्माण झाल्या यावर अजूनही संशोधन चालू आहे.

(सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)


स्पॉजेस…


स्पाँजेसमध्ये सिनॅप्टिक जंक्शनद्वारे एकमेकांशी जोडलेल्या पेशी नसतात,म्हणजेच न्यूरॉन्स नसतात आणि म्हणूनच मज्जासंस्थाही नसते.पण त्यांच्याकडे सिनेंप्टिक फंक्शनमध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या अनेक जनुकं असतात.गंमत म्हणजे आताच्या अभ्यासानुसार स्पंज सेल्स 'पोस्टसायनॅप्टिक डेन्सिटी प्रोटीन' या नावाचा प्रथिनांचा एक समूह तयार करतात आणि हे प्रोटीन्स संवेदना मिळवणाऱ्या सिनॅप्ससारखंच काम करतात असं दिसून आलंय.पण अजूनही अशा रचनेचं नेमकं आणखी काय काम असावं याबद्दल संशोधन चालू आहे.स्पंज पेशी 'सिनॅप्टिक ट्रान्समिशन'नं संवाद करत नाहीत हे जरी खरं असलं तरी ते कॅल्शियमच्या लाटा आणि इतर आवेगांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात असं दिसून आलंय.स्पाँजेस खरं तर आपलं संपूर्ण शरीर आखडून घेणं आणि प्रसरण पावणं अशा सोप्या कृतींमधूनही संवादच साधत असतात.


नर्व्ह नेट्स…


जेलीफिश,कोंब जेलीज आणि त्यासारख्या इतर प्राण्यांमध्ये मध्यवर्ती मज्जासंस्थेऐवजी सगळीकडे पसरलेलं मज्जातंतूंचं जाळं असतं.बऱ्याचशा जेलीफिशमध्ये मज्जातंतूंचं जाळं कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे पसरलेलं असतं.कोंब जेलीमध्ये ते तोंडाजवळ केंद्रित असतं.


नर्व्ह नेट्समध्ये सेन्सरी न्यूरॉन्स असतात.ते रसायनं, स्पर्श आणि दृश्य या संवेदना ओळखतात.यात मोटर न्यूरॉन्सही असतात.ते एखाद्या स्पर्शाला प्रतिक्रिया म्हणून शरीर आकुंचित करू शकतात.

याशिवाय,नर्व्ह नेटमध्ये इंटरमिडिएट न्यूरॉन्स हाही एक प्रकार असतो. या प्रकारचे न्यूरॉन्स सेन्सरी न्यूरॉन्स आणि मोटर न्यूरॉन्स यांच्यात संवाद साधतात.त्यामुळे काही प्रकारांमध्ये इंटरमीडिएट न्यूरॉन्सचे गट तयार होऊन त्यांचे गँगलिया झालेले दिसतात.

उत्क्रांतीमध्ये हीच मेंदूसारखा अवयव तयार होण्याची सुरुवात होती.तर रेडियाटा गटामधल्या प्राण्यांच्या मज्जासंस्थेला त्यामानानं काही विशिष्ट रचना नसते.


नर्व्ह कॉर्ड्स…


उत्क्रांतीच्या यापुढच्या टप्प्यात नर्व्ह कॉर्ड्स तयार झाल्या.आता अस्तित्वात असलेल्या माणसासहित बहुतेक प्राणी हे बायलॅटरल म्हणजे सममितीय आहेत. या प्राण्यांच्या शरीराची डावी आणि उजवी बाजू ही एकमेकींची मिर इमेज असते.आताचे सगळे बायलॅटरल प्राणी हे ५५० ते ६०० मिलियन वर्षांपूर्वीच्या कृमीसारख्या एकाच प्राण्यापासून उत्क्रांत झाले आहेत असं मानलं जातं.


या प्राण्याच्या शरीराची मूळ रचना ही तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत एकच पोकळ नळीसारखी होती.या प्राण्याच्या तोंडाकडच्या बाजूला अनेक नर्व्हज एकत्र येऊन त्यांचा गँगलिया तयार झालेला असतो.हाच सुरुवातीचा प्राथमिक मेंदू होता.!


माणसासहित इतर सस्तन प्राण्यांमध्ये विभाजित मज्जासंस्था दिसते.म्हणजेच अशा प्राण्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये ठरावीक अंतरावर न्यूरॉन्स एकत्र येऊन त्यांचे गँगलिया तयार होतात.आणि अशा गँगलियांची एक साखळी तयार होते.प्रत्येक गँगलियामधून अनेक मोटर आणि सेन्सरी नर्व्ह उगम पावतात.ज्यामुळे शरीराच्या पृष्ठभागाचा आणि आतल्या स्नायूंचा असे दोन वेगळे भाग तयार होतात.त्यातून शरीराच्या वरच्या भागात मेंदू तयार होतो.त्यातूनच मेंदूही फोरब्रेन,मिडब्रेन आणि हाइंडब्रेन या तीन भागांत विभागला जातो.


नेलिडा…


गांडुळांसारख्या प्राण्यांमध्ये तोंडापासून ते शेपटीपर्यंत शरीराच्या लांबीच्या दुप्पट मज्जातंतूचे धागे असतात.या मज्जातंतूंचे धागे वर्म्सच्या शरीरात शिडीच्या पायऱ्यांसारख्या दिसणाऱ्या ट्रान्सव्हर्स (आडव्या) नर्व्हजनं जोडले गेलेले असतात.या आडव्या नर्व्हज त्या प्राण्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना समन्वय साधण्यास मदत करतात.सगळ्या नर्व्हज शेवटी डोक्यासारख्या भागात येऊन पोहोचतात.तर गंमत म्हणजे राऊंडवर्क्समध्ये नर आणि उभयलिंगी प्राण्यांमध्ये अनुक्रमे ३८३ आणि ३०२ न्यूरॉन्स असतात.


आर्थोपॉड्स…


इन्सेक्ट (किडे) आणि क्रस्टेशियन्स (खेकडे) यांसारख्या आर्थोपॉड्समधली मज्जासंस्था गँगलियाच्या साखळीसारख्या रचनेची बनलेली असते.या प्राण्यांमध्ये थोडा विकसित झालेला मेंदूही असतो.तो तोंड, लाळग्रंथी आणि काही स्नायू नियंत्रित करतो.बऱ्याच आर्थोपॉड्समध्ये दृष्टीसाठी कंपाऊंड डोळे असतात. वास समजण्यासाठी आणि फेरोमोन संवेदनांसाठी अँटेनासह इतरही संवेदी अवयव असतात. या अवयवांमधून आलेली माहितीवर पुढे मेंदूमध्ये प्रक्रिया केली जाते.बहुतेक कीटकांमध्ये मेंदूच्याभोवती इतर काही पेशींचं आवरण तयार झालेलं असतं.त्या पेशी कोणत्याही संवेदना वाहून नेत नाहीत,पण त्या चक्क संवेदना वाहून नेणाऱ्या नर्व्ह पेशींना पोषण पुरवतात ! अर्थात,मानवी मेंदूतल्या काही पेशीही हेच काम करतात.


मानवी मेंदूची उत्क्रांती..


आधुनिक मानवांच्या पूर्वज असलेल्या होमो हॅबिलिसचा मेंदू सुमारे ६०० घन सेमी घनतेचा होता. तेव्हापासून मानवी मेंदूची घनता आणि आकार वाढत गेला आहे.होमो नेन्डरर्थेलेन्सिसच्या मेंदूची घनता १७३६ घन सेमी झाली होती.त्यातून मेंदूचा आकार आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध असतो का याबाबत संशोधन व्हायला लागलं.पण गंमत म्हणजे आताच्या होमोसेपियन्समध्ये मेंदूचा आकार निअँडरथल मेंदूपेक्षा लहान आहे! आताच्या मानवी मेंदूचा आकार १२५० घन सेमी इतकाच असतो. शिवाय, स्त्रियांमध्ये मेंदूचा आकार पुरुषांपेक्षा किंचित लहान असतो.


गंमत म्हणजे होमो इरेक्ट्सपासून उत्क्रांत झालेला फ्लोरेस होमिनिड्स याची क्रेनियल क्षमता सुमारे ३८० घन सेमी इतकी कमी असते.हा मेंदू तर चिम्पांझीपेक्षाही लहान होता.तरीही या मानवानं होमो इरेक्ट्ससारखा अग्नीचा उपयोग केला आणि दगडाची साधने बनवली याचा पुरावा आहे.


या आणि अशाच गोष्टींतून आजच्यासारखा सेंट्रल नर्व्हज सिस्टिम आणि पेरिफेरल नर्व्हज सिस्टिम असलेली प्रगत मज्जासंस्था निर्माण झाली.

२०/२/२५

व्यक्ती आणि आग्रह / Person and Urge

काही असो मला वाटतं की,माझा माजी विद्यार्थी जेम्स एल.थॉमसची ही खरी गोष्ट वाचायचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल.


एका ऑटोमोबाईल कंपनीच्या सहा ग्राहकांनी सर्व्हिसिंगचे बिल चुकवायला नाही म्हटले. कुठल्याही ग्राहकाने पूर्ण बिलावर आक्षेप घेतला नव्हता;पण सगळ्यांचे हे म्हणणे होते की,त्यांना जरुरीपेक्षा जास्त बिल दिले गेले होते.बिल कार्डावर प्रत्येक ग्राहकाचे हस्ताक्षर होते.यामुळे कंपनीला माहीत होतं की,त्यांचा दावा खरा आहे आणि कंपनीने हीच गोष्ट ग्राहकांना पत्रात लिहून पाठविली.ही पहिली चूक होती.


क्रेडिट डिपार्टमेंटच्या माणसांनी वसुली करता ही पावलं उचलली.तुम्हाला काय वाटतं की,ते सफल झाले असतील ?


१.कंपनीचे एजंट प्रत्येक ग्राहकाच्या घरी गेले आणि त्यांना साफ साफ सांगितले की,ते त्या बिलाच्या वसुली करता आले आहेत.ज्याचा भरणा बराच काळापर्यंत झाला नाही.


२.त्यांनी हे स्पष्ट सांगितले की,कंपनी पूर्णपणे बरोबर होती,यामुळे ग्राहक पूर्णपणे चूक होते.


३.त्यांनी हे सांगितले की,ऑटोमोबाईलची जितकी समज ग्राहकांना आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त ऑटोमोबाईल कंपनीला आहे.याकरता ग्राहकांनी वाद घालायला नको.


४.परिणाम : वाद चालत राहिला.


यामधल्या कोणत्यापण पद्धतीने ग्राहक राजी झाला का? आणि त्याने आपले बिल भरले? तुम्हीच याचं उत्तर स्वतःच देऊ शकता.


ज्या स्थितीत क्रेडिट मॅनेजर कायद्याची कारवाई करण्याच्या मूडमध्ये आला होता,तेव्हाच सौभाग्याने हा मामला जनरल मॅनेजरच्या लक्षात आला. मॅनेजरने पैसे न चुकवणाऱ्या ग्राहकांची तपासणी केली आणि त्यांना हा पत्ता लागला की,हे सगळे ग्राहक बहुतेक आपल्या बिलाचे पैसे लगेच चुकते करतात.याकरता या गोष्टीची संभावना होती की, कुठे तरी वसुलीच्या पद्धतीत काहीना काही गडबड झाली आहे.

याकरता त्यांनी जेम्स एल.थॉमसला बोलावलं आणि त्याला सांगितलं की,तो या वसूल न होणाऱ्या बिलांची वसुली करेल.


मिस्टर थॉमसने काय पावलं उचलली हे त्यांच्याच शब्दांत ऐका.


१.प्रत्येक ग्राहकाकडे मीपण एक जुनं बिल वसूल करायला गेलो होतो.एक असं बिल ज्याच्या बाबतीत आम्हाला माहीत होतं की,आम्ही पूर्णपणे बरोबर आहोत;परंतु मी या बाबतीत एकपण शब्द नाही सांगितला.मी सांगितलं की,मी हे माहीत करून आलोय की,कंपनीने त्यांच्या करता काय केलं आणि काय नाही केलं.


२.मी हे स्पष्ट केलं की,जोपर्यंत मी ग्राहकांची पूर्ण गोष्ट ऐकत नाही,तोपर्यंत मी या बाबतीत आपलं मत नाही सांगू शकतं.

मी त्यांना सांगितले की,कंपनी नेहमीच बरोबर नसते आणि कंपनीकडूनपण चुका होऊ शकतात.


३.मी त्यांना सांगितले की,माझी रुची केवळ त्यांच्या कारमध्ये होती आणि आपल्या कारबद्दल आपण जितके जाणतो तितके कोणी दुसरा नाही जाणू शकत.आपल्या कारच्या मामल्यात ते सगळ्यात मोठे विशेषज्ञ आहेत. 


४.मी त्यांना बोलू दिलं आणि मी पूर्ण रस घेऊन आणि सहानुभूतीने त्यांची गोष्ट ऐकत राहिलो.तेच त्यांना हवे होते.


५.शेवटी जेव्हा मित्रत्वाचं वातावरण बनलं,तेव्हा मी पूर्ण मामल्याला त्याच्या विवेक आणि अंतरात्मावर सोडून दिलं.मी आदर्शवादी कारणांचा सहारा घेतला.मी म्हटलं,"आधी मी तुम्हांला सांगू इच्छितो की,मला असं वाटतं की,कंपनीने या प्रकरणाला व्यवस्थितरीत्या नाही सांभाळलं.कंपनीच्या लोकांमुळे तुम्हाला खूपच त्रास आणि असुविधा झाली.असं व्हायला नको होतं.मी माझ्या कंपनीकडून तुमची माफी मागतो.आतापर्यंतच्या चर्चेतून मी समजलो की,तुमच्यात खूप धैर्य आणि समजदारी आहे.याकरता आता मी तुमच्याकडून एक मदत मागतो आहे.दुसरा कोणीच हे काम तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने नाही करू शकत.कारण याच्या बाबतीत कोणा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुम्ही जास्त जाणता.हे राहिलं तुमचं बिल.मी तुमच्यावर भरोसा करू शकतो.

याकरता मी हे तुमच्यावर सोडून देतो की,तुम्ही आम्हाला किती देऊ शकता.हे तुमचं बिल आहे आणि तुम्हाला जितके पैसे द्यायचे आहेत तितके देऊ शकता. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल." ग्राहकांनी बिलाचे पैसे पूर्ण चुकवले का ? चुकवले आणि त्यांना असं केल्यामुळे रोमांचक अनुभवपण मिळाला.बिलाची राशी १५० डॉलर्सपासून ४०० डॉलर्समध्ये होती;परंतु काय ग्राहकाने स्वार्थपूर्ण वागण्याचा परिचय दिला? हो त्यांच्यातल्या एकाने असं केलं.एका माणसाने या विवादित पैशाच्या जास्तीत जास्त भरणा केला आणि यापेक्षाही मोठी गोष्ट ही की,या सगळ्या सहा ग्राहकांनी पुढच्या दोन वर्षांत आमच्या कंपनीकडून नवीन कार्स विकत घेतल्यात.थॉमसचं म्हणणं आहे,"अनुभवाने मला हे शिकवलं की,जेव्हा ग्राहकांच्या बाबतीत कोणती माहिती नाही मिळू शकली,तर हे मानणं योग्य होईल की तो इमानदार,गंभीर आहे आणि बिलाचा भरणा करायला इच्छुक आहे;परंतु तेव्हाच जेव्हा त्याला हा विश्वास होईल की,बिल बरोबर आहे.याला वेगळ्या पद्धतीने आणि बहुतेक अधिक स्पष्टपणे याप्रमाणे सांगू शकतो की,ग्राहक बहुतेक इमानदार असतात आणि बिलाचा भरणा करू इच्छितात.या नियमाला खूपच कमी अपवाद असतात आणि माझा विश्वास आहे की,अशा लोकांना जर जाणीव करून दिली की,तुम्ही त्यांना इमानदार समजता,तर ते तुमच्या बरोबर इमानदारीनेच वागतील.


आदर्शवादी सिद्धान्तांचा आधार घ्या.


१८.०२.२५ या लेखामधील दुसरा शेवटचा भाग…

१८/२/२५

व्यक्ती आणि आग्रह / Person and Urge

मी मिसुरीच्या जेसी जेम्सच्या भागात मोठा झालो होतो.मी मिसुरीच्या कियर्नेमध्ये जेम्स फार्ममध्ये गेलो,जिथे जेसी जेम्सचा मुलगा अजूनही राहत होता.त्याच्या पत्नीने मला किस्से ऐकवले की, कोणत्या प्रकारे जेसी ट्रेन्स आणि बँकांना लुटायचा आणि लुटलेल्या पैशांना गरिबांमध्ये वाटून टाकत होता म्हणजे ते त्यांची गहाण ठेवलेली जमीन सोडवू शकतील.जेसी जेम्स स्वतःला त्याच प्रकारे आदर्शवादी आणि परोपकारी समजत होता,जसा की डच शुल्ट्ज,क्राउले किंवा अल केपोन किंवो 'गॉड फादर' समजतात.


खरं तर असं आहे की,तुम्ही ज्या लोकांना भेटता त्यातले जास्त करून स्वतःला चांगले आणि निःस्वार्थ समजतात.


जे.पियरपोंट मॉरगनने एकदा सांगितलं होतं की, कोणतेही काम करण्याच्या मागे माणसाकडे साधारणतः दोन कारणं असतात.पहिलं कारण वास्तविक असतं आणि दुसरं ऐका-बोलायला बरं वाटतं.हे सांगायची जरूरत नाहीये की,प्रत्येक माणूस वास्तविक कारण जाणतो;परंतु आम्ही सगळे लोक आतून आदर्शवादीअसतो म्हणून आम्ही त्या कारणांच्या बाबतीत विचार करणं पसंत करतो जी ऐका-बोलायला चांगली वाटतात.  यामुळे जर तुम्ही लोकांना बदलू इच्छिता,तर आदर्शवादी कारणांचा सहारा घ्या.


काय हा आदर्शवादी उपाय बिझनेसमध्ये कामी येतो?


या बघू या...


ग्लेनोल्डन,पेनसिल्व्हेनियामध्ये फॅरेल-मिशेल कंपनीच्या हॅमिल्टन जे.फॅरेलचंच उदाहरण घ्या. फॅरेलला एका चिडक्या भाडेकरूने घर सोडून जायची धमकी दिली होती.खरं तर करारानुसार त्याला चार महिने तिथेच राहायचं होतं,तरीपण त्याने ही नोटीस दिली होती की,तिथून तत्काळ घर सोडून जातो आहे.करार काहीही झाला तरी.


फॅरलने सांगितलं की,ह्या लोकांनी माझ्या घरात थंडीचा ऋतू घालवलेला होता,जेव्हा घरं पूर्ण वर्षात सगळ्यात महाग असतात.मला माहीत होतं की, शरद ऋतूच्या आधी नवीन भाडेकरू मिळणं कठीण आहे.मी स्वच्छ बघू शकत होतो की,भाड्याची कमाई माझी पूर्ण बुडणार आहे आणि विश्वास ठेवा मी पूर्णपणे वेडा झालो होतो.


खरं तर मी असं केलं असतं की,मी त्यांच्याकडे जाऊन त्याला लीजचा करार परत वाचायचा सल्ला दिला असता.मी सांगितलं असतं की,जर त्याने घर रिकामं केलं तर त्याला पूर्णच्या पूर्ण भाडे एक रकमेत चुकवावं लागेल आणि मी न्यायाचा उपाय करून त्याच्याकडून पैसे वसूल करू शकलो असतो आणि मी तेच केलं असतं.पण मी रागानी वाद वाढवण्याऐवजी दुसऱ्या टेक्निकचा उपयोग करण्याचा निश्चय केला.मी म्हणालो की,मिस्टर डो, मी तुमची गोष्ट ऐकली आहे आणि मला अजून पण विश्वास बसत नाही की तुम्ही घर रिकामं करताय. अनेक वर्षांपासून भाड्यानी घर देण्यामुळे मला मानवी स्वभावाचं बरंच ज्ञान झालं आहे आणि तुम्ही जेव्हा हे घर घ्यायला आले होते तेव्हाच मी पाहिलं होतं की,तुम्ही वचनाचे पक्के आहात.मला आताही असंच वाटतं म्हणून मी तुमच्या समोर हा जोखमीचा प्रस्ताव ठेवतो आहे.


हा राहिला माझा प्रस्ताव,यावर काही दिवस विचार करा आणि मगच मला उत्तर द्या.जर तुम्ही पहिल्या तारखेपर्यंत येऊन मला हे सांगाल की,तुम्ही अजूनही घर सोडू इच्छिता तर मग मी तुम्हाला वचन देतो की,मी तुमच्या निर्णयाला शेवटचा निर्णय मानेन.मी तुम्हाला जाऊ देईन आणि हे मानेन की, तुमच्याबद्दलची माझी समजूत खोटी होती;परंतु माझा अजूनही विश्वास आहे की,तुम्ही आपल्या वचनाचे पक्के आहात.तुम्ही कराराचे पालन कराल. आपण तर माणूस आहोत किंवा बंदर आणि पर्याय निवडणं बहुतेक आपल्या हातात असतं.पुढच्या महिन्यात तो भाडेकरू आला आणि त्याने मला आपणहून भाडं दिलं.त्यांनी सांगितलं की,त्याने आणि त्याच्या पत्नीने यावर चर्चा केली आणि थांबण्याचा निर्णय घेतला.ते या निष्कर्षावर आले की,त्यांच्या सन्मानाला वाचवण्याचा त्याच्याजवळ हाच एकुलता एक उपाय होता की,ते लीजच्या करारानुसार चालतील.


जेव्हा लॉर्ड नॉर्थक्लिफला नको होतं की,पेपरवाले त्याचा एक खास फोटो प्रकाशित करतील,तर त्यांनी संपादकाला एक पत्र लिहिलं.पत्रात काय त्यांनी लिहिलं होतं 'कृपया माझा तो फोटो छापू नका, कारण मी त्या फोटोला पसंत करत नाही?

'नाही, त्यांनी एक आदर्शवादी गोष्ट सांगितली.त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनात असलेल्या आईच्या प्रती प्रेम आणि सन्मानाच्या भावनेचा सहारा घेतला. त्यांनी लिहिलं,'कृपा करून माझा तो फोटो छापू नका.तो फोटो माझ्या आईला पसंत नाही आहे.' जॉन डी.रॉकफेलर ज्यूनियरला आवडत नव्हतं की, पेपरवाले कॅमेरामन त्यांच्या मुलांचे फोटो घेतील. त्यांनी हे नाही सांगितले की,मला माझ्या मुलांचे फोटो घेतलेले आवडत नाहीत.नाही त्यांनी आपल्या आतल्या आवाजाचा सहारा घेतला जो मुलांच्या नुकसानापासून वाचवतो.त्यांनी हे सांगितले की, तुमच्यापैकी अनेक लोकांची मुले असतील आणि तुम्हाला तर माहीतच आहे की,मुलांचा इतका प्रचार होणं त्यांच्या दृष्टीनं चांगलं नसतं.


प्रत्येक व्यक्ती ही आग्रह पसंत करते.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनुवाद- कृपा कुलकर्णी,मंजुल प्रकाशन.


मॅनचा गरीब मुलगा रायरस एच के. कर्टिस जेव्हा आपलं करियर सुरू करत होते ज्यात त्यांना द सॅटरडे इव्हनिंग पोस्ट आणि लेडिज होम जनरलचा मालक करून करोडोंची कमाई करून दिली.ते आपल्या लेखकांना तितके पैसे देऊ शकत नव्हते, जितके त्यांचे प्रतिस्पर्धा देऊ शकत होते.ते फक्त पैशांकरता प्रसिद्ध लेखकांकडून लेख लिहून घेऊ शकत नव्हते.याकरता त्यांनी आदर्शवादाचा सहारा घेतला.

उदाहणार्थ,त्यांनी लिटील विमेनची अमर लेखिका लुईसा मे अल्कॉटलापण आपल्या समाचार पत्रात लिहिण्याकरता राजी केलं आणि त्यांनी हे तेव्हा केलं जेव्हा ती आपल्या प्रसिद्धीच्या शिखरावर होती.त्यांनी हे कसं केलं? शंभर डॉलरचे चेक देऊन जो त्यांचा नाही;पण त्यांच्या फेव्हरेट चॅरिटीच्या नावावर होता.


संदेहवादी व्यक्ती इथे हे सांगू शकते की,हे सगळं नॉर्थकिफ आणि रॉकफेलर किंवा कुण्या भावूक कादंबरीकाराकरता योग्य असू शकेल; पण मी हे बघणं पसंत करेन की,हे त्या कठोर लोकांच्या बरोबर कसं सफल होईल,ज्यांच्याकडून मला वसुली करावी लागते.


तुमचं बरोबर असू शकतं.कुठलाही सिद्धान्त सगळ्या बाबतीत सफल होत नाही.प्रत्येक व्यक्तीला लागू पडत नाही.जर तुम्ही त्या परिणामांपासून संतुष्ट आहात जे तुम्हाला आज मिळत आहे,ते तुम्हाला बदलायची काय गरज आहे? परंतु जर तुम्ही असंतुष्ट आहात तर हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखांमध्ये…!