* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३१/१०/२५

तुझं की माझं ? Yours or mine?

जंगलाची परिसंस्था एका अतिशय नाजूक संतुलनात असते.इथल्या प्रत्येक सजीवाची एक भूमिका असते आणि परिसंस्थेमध्ये प्रत्येकाचा एक वैशिष्ट्यपूर्ण कोनाडा असतो.निसर्गाचे वर्णन अनेकदा असे केले जाते.पण दुर्दैवाने हे अचूक नाही.कारण झाडांच्या खाली जंगलाचे नियम चालतात.प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते आणि आपल्याला लागेल ते तो दुसऱ्यांकडून घेत राहतो.प्रत्येक जण तसा निर्दय असतो.पण ही व्यवस्था कोलमडत नाही कारण गरजेपेक्षा जास्त ओरबाडणाऱ्यांपासून इथे संरक्षण असते.याच बरोबर प्रत्येक सजीवाला एक जनुकीय मर्यादा असते.गरजेपेक्षा जास्त घेणारा सजीव हा परिसंस्थेत परतफेड करत नाही.त्यामुळे त्याला जगण्यासाठी जे लागते ते खलास करून तो स्वतःही तग धरू शकत नाही.

 बहुतांश प्रजातींमध्ये काही अंगभूत आचरण असते,
ज्यामुळे जंगलाचा ओरबडा होऊ शकत नाही.याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 'जे' (नीलकंठ प्रजातीचा पक्षी) नावाचा पक्षी.हा पक्षी ओक आणि बीच वृक्षाच्या या बिया खातो.पण अनेक बिया तो जमिनीत पुरून ठेवतो.यामुळे पुन्हा या झाडांची रोपटी तयार होऊन जंगलाची वाढ होऊ शकते.तुम्ही जेव्हा एखाद्या उंच,अंधाऱ्या जंगलातून चालता तेव्हा ते किराणा
मालाच्या दुकानात चालण्यापेक्षा फार वेगळे नसते.
इथंही भरपूर मेवा असतो - निदान जनावरं,
बुरशी आणि सूक्ष्मजीवांसाठी तरी असतो.साखर,
सेल्युलोज, लिग्निन आणि कर्बोदके मिळून एका झाडात लक्षावधी कॅलरीज (उष्मांक) असतात.त्याच बरोबर मौल्यवान खनिजे आणि पाणीही असते.मी किराणा मालाचं दुकान म्हटले का?नाही,याचे अधिक योग्य वर्णन म्हणजे अतिशय सुरक्षित असे गोदाम,
कारण इथं कोणीही जाऊन काहीही घेऊ शकत नाही.दरवाजा बंद आहे आणि साल जाड आहे.
त्यामुळे जर तुम्हाला तिथला गोड खाऊ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक आराखडा हवा. समजा तुम्ही सुतार पक्षी (वूडपेकर) आहात.

|या पक्ष्याला एक विशिष्ट शारीरिक रचना लाभलेली असते.त्यामुळे त्याची चोच काही प्रमाणात वाकू शकते आणि डोक्याचा स्नायू धडक पचवू शकतात. हा पक्षी डोकेदुखी न होता झाडांवर वारंवार चोच्या मारू शकतो.वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडाच्या खोडातून पाणी वर पोचवलं जात असतं,तेव्हा त्यावर ताव मारण्यासाठी सुतार पक्ष्यांच्या काही प्रजाती छोट्या फांद्यांवर बारीक भोके पाडून या रसाचे सेवन करतात.यांना 'सॅपसकर' म्हणतात. हाडांच्या या जखमेतून रक्तस्राव होतो.पण झाडाचे रक्त काही भीतीदायक नसते.ते पाण्यासारखेच असते.पण रक्त गेल्यावर आपल्याला जसा त्रास होतो तसाच झाडालाही होतो.आणि याच द्रव्यावर सॅपसकर सुतार पक्ष्यांचा डोळा असतो.जोपर्यंत सुतार पक्षी फार जास्त भोकं करत नाही,तोपर्यंत झाडाला जखमांची फार काळजी नसते,ती सहन करायची ताकद असते.
कालांतराने जखमा भरून निघतात आणि झाडाच्या सालावर मुद्दाम केलेल्या सजावटीसारखे रूप येते.

अफिड (यांना झाडाच्या उवा किंवा ग्रीनफ्लाय म्हटले जाते) हा सुतार पक्ष्यापेक्षा फार आळशी असतो.महत कष्टाने उगीच उडून झाडाला भोकं पाडण्यापेक्षा तो स्वतःचे तोंड झाडांच्या नसांमध्ये किंवा सुयांमध्ये घुसवत ठेवतो आणि द्रव्य शोषून घेतो.इतर कोणीही पिऊ शकत नाही इतके द्रव्य त्याला पिता येते.झाडाचे प्राणद्रव्य या कीटकाच्या शरीरात शिरते आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या थेंबाच्या रूपात बाहेर येते.अफिडना अशा प्रकारे भरपूर पेयपान करावे लागते कारण या द्रव्यात अत्यल्प प्रथिने असतात.प्रथिने अफिडना वाढण्यासाठी आणि प्रजननासाठी गरजेचे असते. या द्रव्याला ते गाळून घेतात आणि कर्बोदक आणि साखर न वापरता बाहेर सोडतात त्यामुळे अफिडची लागण झालेल्या झाडांच्या खाली चिकट हनीड्यू द्रव्य पडत राहते.कदाचित तुम्ही कधीतरी आपली गाडी अफिडची लागण झालेल्या मेपलच्या झाडाखाली ठेवली तर थोड्या वेळातच गाडीची काच चिकट झालेली तुम्हाला जाणवेल.

प्रत्येक झाडाला असे द्रव्य शोषणारे वैशिष्ट्यपूर्ण कीटक असतात.फर ३ (बाल्सम ट्विग अफिड), स्प्रूस (हिरवा स्प्रूस अफिड),ओक (ओक पानाचा फायलोक्सेरा),आणि बीच (वूली बीच अफिड) पूर्ण जंगलात शोषण आणि विष्ठा विसर्जन चालू असतं. झाडांची पान खाणाऱ्या जनावरांची जागा पक्की असल्यामुळे इतर प्रजाती अतिशय कष्टाने जाड सालीला भोक पाडून आतले द्रव्य घेण्याच्या मागे लागतात.सालीतून पोषण मिळविणारे वूली बीच स्केल सारखे कीटक आपल्या मेणचट चंदेरी-पांढऱ्या लोकरीने पूर्ण खोडाला वेटोळे घालू शकतात.
आपल्याला खरूज झाल्यावर जसा त्रास होतो,तसाच त्रास या कीटकांमुळे झाडालाही होतो. या जखमा भरून यायला वेळ लागतो आणि खोडावर त्याचे वर्ण शिल्लक राहतात.असे झाल्यावर बुरशी आणि सूक्ष्म जीव त्यात शिरतात आणि झाड खचत जाऊन शेवटी मरतं.त्यामुळे यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी झाड रासायनिक पदार्थ तयार करतं,यात काहीच आश्चर्य नाही.अशी आक्रमणं होत राहणार असतील तर आपले साल जाड असण्याचा झाडाला फायदा होतो.असं करून झाडं काही वर्ष तरी सुरक्षित राहतात.पण केवळ या कीटकांचा संसर्ग हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर नसतो.द्रव्य शोषणारे कीटक आपली भूक शमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडातले पोषणद्रव्य काढून घेतात.एक चौरस यार्ड जंगलातून झाडांच्या पोषणद्रव्यांतून शेकडो टन साखर हे कीटक काढून घेऊ शकतात.त्यामुळे झाडं आपला पोषणाचा साठा गमावून बसतात आणि येणाऱ्या वर्षी त्यांची वाढ कमी होते.पण काही जनावरांना मात्र हे शोषण करणारे कीटक उपयुक्त ठरतात.लेडीबगच्या आळ्या अफिड आवडीने खातात.तसेच जंगली मुंग्यांना अफिडने सोडलेले हनीड्यू द्रव्य इतके आवडते की ते चक्क अफिडच्या पार्श्वभाग चाटतात.

(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे नअनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

आपल्या संवेदनाग्रांनी अफिडला गोंजारून ते अफिडला जास्त वेगाने हनीड्यू काढून घेण्यासाठी उद्युक्त करतात.दुसऱ्या कोणाला हनीड्यूची चाहूल लागू नये म्हणून ते अफिडचे संरक्षणही करतात. जंगलामध्येसुद्धा पाळीव प्राणी आहेत ! मुंग्यांना जास्त झालेला हनीड्यू वाया जात नाही.अफिड लागलेल्या झाडाभोवती सांडलेल्या चिकट हनीड्यूवर बुरशी आणि सूक्ष्मजीव लगेच येतात आणि तिथे काळी बुरशी जमा होते.मधमाशांनाही अफिडने सोडलेले हनीड्यू आवडते.थोडंसं तिथच शोषून बाकीचं त्या आपल्या पोळ्यात घेऊन जातात.पोळ्यात ते परत बाहेर काढतात आणि त्याचाच जंगली मध बनतो.जरी फुलातल्या मकरंदाशी संबंध नसला तरीही ग्राहकांना हा मध फारच आवडतो.गॉल मिज आणि वास्प कीटक थोडे मार्मिक असतात.पानांना भोक पाडण्यापेक्षा ते पानांना प्रोग्रॅम (नकळत सूचना देणे) करतात. यासाठी प्रथम ते बीच किंवा ओकच्या पानांवर आपली अंडी घालतात.त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या झाडाचे द्रव्य शोषून घेतात.असे करताना त्यांच्या लाळेतील रसायने बाहेर आल्यामुळे पान त्यांच्याभोवती एक सुरक्षा कवच बनवायला लागते. बीज वृक्षात हे कवच टोकदार असते आणि ओक वृक्षाचे गोलसर.पण दोन्ही प्रकारच्या कवचात राहणाऱ्या कीटकांना त्यांच्या भक्षकांपासून संरक्षण मिळते.उन्हाळ्याच्या आधी पान गळून पडते आणि वसंत ऋतू आला की आतल्या आळ्या कोशातून बाहेर पडतात.यांची लागण बीच वृक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होते पण झाडाला त्याचा त्रास होत नाही.

सुरवंटांची गोष्ट वेगळीच असते.त्यांचा डोळा झाडाच्या पोषणद्रव्यावर नसतो त्यांना तर पूर्ण पान हवं असतं.
जर सुरवंटं जास्त नसतील तर झाड लक्ष देत नाही.
पण यांच्या संख्येत वाढ आणि घट चालूच असते.
माझ्या जंगलात एकदा काही ओक वृक्षांवर प्रचंड प्रमाणात सुरवंट झाले होते.ही झाडं एका दक्षिणमुखी उतारावर होती.त्या जूनमध्ये मला असं दिसलं की,
वृक्षांची नवीन पालवी पूर्णपणे नाहीशी झाली होती.झाडं थंडीत पानझड झाल्यासारखी दिसत होती.
माझ्या जीपमधून मी उतरलो तेव्हा मला वादळी पावसासारखा गडगडाट ऐकू आला. पण आकाश तर निरभ्र होते म्हणजे हा आवाज हवामानाचा नव्हता.
नाही.झाडावरून लाखो सुरवंटांची काळीकाळी विष्ठा माझ्या डोक्यावर आणि खांद्यावर टपकत होती.शी! हे दृश्य पूर्व आणि उत्तर जर्मनीच्या मोठ्या पाईन जंगलातूनही दिसते.व्यावसायिक लागवडी होणारी एकसुरी जंगलं फुलपाखरू 'नन' आणि 'पाईन लूपर'
सारख्या पतंगांच्या घाऊक प्रजननाला संधी देते.
त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी मात्र झाडं आजारी पडतात आणि मग त्यांची संख्या एकदम रोडावते.जून महिन्याअखेर झाडावरची पानं संपली की मग सुरवंटांची विष्ठा पडायची थांबते.आता झाडांना आपली सर्व शक्ती पणाला लावून पुन्हा पालवी उगवायची असते.याला तशी अडचण येत नाही.काही आठवड्यानंतर सुरवंटांच्या चराईचे नामोनिशाण दिसत नाहीत,पण झाडाची वाढ मात्र मर्यादित होते.यावर्षी झाडाची वाढ कमी झाल्याचे खोडामधील अरुंद झालेल्या वाढीच्या चक्तीतून दिसून येते.जर सलग दोन-तीन वर्ष सुरवंटांची संख्या वाढली तर मात्र झाड अशक्त होऊन वठून जाते.जंगलात फुलपाखरांच्या अळ्यांबरोबर सूचीपर्णी सॉफ्लाईजसुद्धा असतात. 'सॉ' म्हणजे करवतीने कापणे.या माशा चक्क झाडाची उती कापतात आणि त्यात आपली अंडी घालतात. झाडांना त्यांच्या आळ्यांची जितकी भीती असते तितकी प्रौढ माशांपासून नसते.अळ्यांच्या इवल्याशा तोंडातून दिवसाला बारा सूचीपर्ण खाल्ली जातात आणि लवकरच झाडाला धोका निर्माण होतो.. 

अपूर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..

२९/१०/२५

शुक्राची चांदणी / Moonlight of Venus

माझ्या लहानपणी पावसाळा आणि सुरुवातीचे थंडीचे दिवस वगळता,सोलापुरात आमच्या कुटुंबातील सारे जण रात्री घराच्या माळवदावर झोपत असू.त्या काळात मी रोज पहाटे अभ्यासाला उठत असे.रात्री झोपताना मी आईला सांगे,

'मला पहाटे उठव.'
आई मला पहाटे हाक मारी.
'अरे ऊठ.बघ ती शुक्राची चांदणी उगवली.'

त्या वेळी पहाटेचे सुमारे चार वाजलेले असत.मी त्या चांदणीकडं एकदा डोळे भरून पाहूनच अभ्यासाला सुरुवात करी,तो पार शुक्राच्या चांदणीचा रंग धुवट होईपर्यंत.नंतर उजाडलेलं असे.

दिवाळीत,नाताळात आणि उन्हाळ्याच्या सुटीत मी माझ्या बहिणीच्या गावी नळदुर्गजवळच्या दस्तापूरला बैलगाडीनं जाई.सोलापूरहून सकाळी निघालं,की नळदुर्गला पोहोचेपर्यंत दिवस मावळे.बरोबर आणलेली शिदोरी खाऊन रात्री तिथल्या देवळासमोरच्या वडाखाली मुक्काम असे.त्या वेळी झोप येईपर्यंत मी झाडाच्या पानोळ्यांतून आभाळातील चांदण्यांकडं पाही. रामा गाडीवानाला पहाटे जाग येई.तेव्हा शुक्राची चांदणी क्षितिजावर उगवलेली असे.किती तेजस्वी दिसे ती ! वाटे,'घन तमीं शुक्र बघ राज्य करी' नदीच्या खोल पात्रात तिचं प्रतिबिंब पडलेलं असे.एकदा आभाळाकडं अन् एकदा नदीकडं पाहात मी मनात विचार करी,यात अधिक सुंदर कोण दिसतंय ?

जुंपलेल्या गाडीत बसलं,की ती चालू लागे.बैलाच्या गळ्यातील घुंगुरघंटांच्या नादात गाडी पहाटेच्या वेळी माळरानातून चाललेली असे.गाडीत मांडी घालून मी शुक्राच्या सुंदर चांदणीकडं पाहात राही.माळरानातली पहाटेची वेळ मोठी अद्भुतरम्य असते.धरती गोल आहे, हे माळरानाइतकं अन्यत्र कुठं जाणवत नाही.वर निळं आकाश.आकाशात सहस्रावधी ग्रह-तारे प्रकाशत असतात.त्या सर्वांमध्ये शुक्राची चांदणी आपलं लक्ष अधिक वेधते.बालपणापासून या शुक्राच्या चांदणीशी असं नातं जुळलं,ते वाढत्या वयाबरोबर दृढ होत गेलं. कॉलेजमध्ये असताना कित्येकदा मी माळकरीण आत्याच्या गावाबाहेरील शेतावर सुटीच्या दिवशी गेलो, तर दिवसभर माळरानात भटकून रात्री तिथल्या वस्तीवरच मुक्कामाला राही.

शेतात ज्वारीचं पीक उभं असे.वाऱ्याच्या झुळकेबरोबर क्षणोक्षणी ज्वारीच्या घाटांच्या पात्यांचा सळसळ आवाज येई.शेकोटी पेटवून तिच्यासमोर आत्या जागत बसलेली असे.मधूनच कोल्हेकुई ऐकू येई.त्यामुळं माझी झोप चाळवे.मनात अकल्पित भीती उभी करी.आत्या मला हाक मारी,

'अरे,पहाट झाली,बघ.शुक्राची चांदणी उगवली.असा बाहेर तरी ये.' मी शेकोटीपुढं बसून त्या चांदणीकडं अनिमिष नेत्रांनी पाहात राही.आत्या आपल्या गोड आवाजात अभंग म्हणत असायची.

पहाटे उठायची बालपणी जडलेली ती सवय मी आयुष्यभर जोपासली.

दोन वर्षं मी दक्षिणेतील कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत होतो.पावसाळा सोडला,तर बाकी आठ महिने आमचं वास्तव्य जंगलातील राहुटीत असे.त्या वेळी देखील मला पहाटे जाग यायची.सारे विद्यार्थी आपापल्या राहुटुत गाढ झोपलेले असत.कित्येकांचा झोपेत घोरण्याचा आवाज येई,माझ्या सोबत्याला जाग येणार नाही,याची काळजी घेत मी राहुटीच्या बाहेर येई आणि खुर्चीवर बसून जंगलातील वृक्षांच्या छतावर उगवलेल्या शुक्राच्या चांदणीकडं पाहात राही.

 जंगलाभोवतालच्या स्वच्छ वातावरणामुळं आकाशाचा रंग जांभळा दिसे.त्या जांभळ्या नभोवितानातील चांदणीच्या अलौकिक सौंदर्याकडे मी ध्यानमग्न होऊन पाहात राही.ही माझी जणू एक प्रकारची ध्यान-धारणाच होती !परंतु त्यामुळं पक्षिनिरीक्षणासाठी जी शांत चित्तवृत्ती लागते, तिचा न कळत मला लाभ झाला.

शुक्राची चांदणी पहाटेला पूर्वेकडे बरेच दिवस दिसते. कधी सायंकाळी पश्चिमेस दिसते.दर वीस महिन्यांत नऊ महिने शुक्राची चांदणी पहाटेला पूर्वेकडं दिसते. सायंकाळच्या शुक्राच्या चांदणीला आदिवासी 'जेवणतारा' म्हणतात.म्हणजे ती उगवून मावळेपर्यंत त्यांची रात्रीची जेवणं उरकलेली असतात.शुक्राची चांदणी केव्हा सूर्यास्तानंतर थोडा वेळ आणि केव्हा सूर्योदयापूर्वी पहाटे दिसते,याची मी नोंद केलेली आहे.

पहाटे उगवणाऱ्या शुक्राच्या चांदणीनं मला भुरळ पाडली,त्याचप्रमाणे संधिप्रकाशात दिसणाऱ्या या चांदणीनं आकर्षित केलं आहे.संधिप्रकाशासमयी मी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उभा राही.हळूच मिणमिणती शुक्राची चांदणी क्षितिजावर डोकावू लागे. या संधिप्रकाशात तिच्या आगळ्यावेगळ्या लावण्याचा मला प्रत्यय येई.वाढत्या अंधाराबरोबर तिचं सौंदर्य वाढत जाई.रात्री प्रकाशणाऱ्या ताऱ्यांमध्ये शुक्रासारखा तेजस्वी व सुंदर असा दुसरा तारा नाही.म्हणून पाश्चात्त्य लोकांनी याला 'सौंदर्याची खाण' व 'देवता' अशा अर्थाचं 'व्हीनस' हे नाव दिलं आहे.गुरूही तेजस्वी आहे,पण त्याचं तेज शुक्रापेक्षा कमी आहे. हे दोघंही जवळजवळ असले म्हणजे जे रम्य दृश्य दिसतं,ते अवर्णनीय असतं.

नंतरच्या आयुष्यात शुक्राच्या चांदणीचं सौंदर्य न्याहाळण्याचा छंदच लागला.जंगलातील मार्गानं सायंकाळी जाताना ती समोरच उगवलेली दिसायची. साऱ्या वाटभर तिची सोबत असे.कधी कधी पहाटे वनविश्रामगृहाच्या व्हरांड्यातून ती स्पष्ट दिसायची.
ताऱ्यांचा प्रकाश दिसत नाही म्हणतात.परंतु घनदाट जंगलातील वृक्षांच्या छतावर ताऱ्यांचा सौम्य व शीतल प्रकाश पडलेला असतो.कित्येकदा पहाटेच्या वेळी मी वनमार्गानं पायी हिंडे.बांबूच्या बेटातील मोरपिशी फांद्यांआडून शुक्राची चांदणी दिसे.तिच्या सौम्य आल्हाददायक प्रकाशात मोरपंखी सावल्या जमिनीवर पडलेल्या असत.फक्त हे सारं कोमल मनानं अनुभवायची इच्छा हवी.

शुक्राच्या चांदणीच्या मी किती आठवणी सांगू? त्यातलं किती विसरावं,किती सांगावं । नवेगावबांध सरोवर आणि इटियाडोह जलाशयांच्या काठी या चांदणीच्या दर्शनासाठी मी पहाटेच्या वेळी हिंडत असे.अतिसौम्य प्रकाश पाण्यावर पडलेला आणि त्यात दिसणारं तिचं सुंदर प्रतिबिंब.जणू एखादी जलवंतीच वाटायची. जलाशयात पडलेली तिची पडछायाच आकाशातील चांदणीपेक्षा देखणी दिसे.

चैत्रात पिंपळ वृक्षाला सोन्याची पानं लागत.कधी रात्री, तर कधी पहाटेच्या समयी जंगलातील विशाल पिंपळ वृक्षाच्या गोपुरातून शुक्राची चांदणी डोकावे. पिंपळाचं आणि या चांदणीचं काही तरी सख्य असावं. वाटे,पऱ्या या चांदणीवरून अलगद या सोन्याच्या पिंपळावर उतरत असाव्यात.

असाच अद्भुत गूढतेचा अनुभव मला दरेकस्सा
नजीकच्या जंगलातील दलदलीवर येई.मी पहाडावरच्या उंच प्रशस्त शिळांवर बसून समोरच्या चांदणीकडं पाही.तिचं अलौकिक सौंदर्य असलेलं प्रतिबिंब दलदलीत पडलेलं दिसे.त्या दलदलीच्या खोलीला अंत नाही.पाताळापर्यंत ती भेदीत गेलेली. चांदणीपासून दिसते न दिसते,अशी प्रकाशाची वाट पार दलदलीपर्यंत रेखीत गेलेली.त्या वाटेवरून यक्षिणी आणि किन्नरी ये-जा करीत असल्याचा भास होई. माझ्या सोबतीला असलेला दल्लू गोंड भीतियुक्त आवाजात म्हणायचा,(पाखरमाया,मारुती चितमपल्ली,
साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,नागपूर )

"साब,आता चलू या परत.ही जागा झपाटलेली आहे. सदान्कदा इथं काहीबाही दिसल्याचे भास होतात.एक दिवस तुम्ही आपला जीव गमावून बसाल,अन् बलामत माझ्यावर येईल.पुढच्या वेळेला मी तुमच्याबरोबर येणार नाही."परंतु कुठल्या तरी अज्ञात ओढीनं आम्ही परत परत तिथं जात असू.दल्लू प्रत्येक वेळी मला हाच सल्ला देई.

मेळघाटाच्या सरहद्दीवर वाहणाऱ्या तापी नदीच्या काळ्याशार डोहात शुक्राच्या चांदणीचं प्रतिबिंब मी अनेक वेळा पाहिलं.त्या वेळची गूढता हुदाळ्याच्या शिशुलीनं द्विगुणीत होई.कृष्णामाई आणि गोदावरी यांच्या घाटांवर बसून या चांदणीकडं पाहण्यात एक अलौकिक आनंद मी अनुभवला.सागरकिनाऱ्यावरील पुळणीवर बसून तिच्याकडं पाहण्यात एक आगळा-
वेगळा सौंदर्यानुभव येतो.तसाच प्रत्यय नारळी-
पोफळींच्या झावळ्यांतून ती डोकावत असताना येतो.मला नेहमी वाटे,माझ्या सुप्त मनातील सौंदर्यभावना या शुक्राच्या चांदणीनं तर जागी केली नाही ना? तिच्याकडं दुर्बीण लावली तर ती कधी कधी चंद्रकोरीसारखी वाटे.कधी अर्धचंद्राकार,तर कधी पूर्ण चंद्राकार दिसे.हा चमत्कार पाहून ती प्रतिचंद्र आहे काय असा भास होई.चंद्र म्हणावा,तर लहान दिसते. चंद्रासारखे डाग तिच्यावर दुष्टीस पडत नाहीत,

आकाशाच्या सौंदर्यावर प्रेम करणाऱ्या बालकवींच्या नजरेतून शुक्राची चांदणी सुटली,तरच नवल. 'शुक्रोदय' या कवितेत ते म्हणतात-

दिव्याच्या मागुनि चाले - विश्व,खरें कळुनी आलें; 
केंद्र त्या सौंदर्याचा - शुक्र नभीं उगवे साचा 
मुकुट कळ्यांचा दिव्य शिरीं - पीतांबर परिधान करी, तेज विखुरलें चोहिंकडे - पुष्पांवर गगनीं उघडें...

आकाशाकडं पाहिलं असता ज्याकडं लक्ष जायचं,असं शुक्रासारखं तेज आश्चर्यानंदकारक झालं नसेल आणि इतर ताऱ्यांपेक्षा या तेजाची गती काही निराळी आहे (म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या भाषेत हा ग्रह आहे.)
असं प्राचीन ऋषींच्या लक्षात आलं नसेल,हे संभवनीय दिसत नाही. प्राचीनतम वेदसूक्तं ज्या काळी झाली, त्या काळीच ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊन गुरू व शुक्र यांच्या ठायी त्यांनी देवत्व कल्पिलं,अश्विनौ म्हणून जे देवताद्वय वेदांत प्रसिद्ध आहेत, त्यांची मूळ कल्पना गुरू-शुक्रावरूनच उद्भवली.दर वीस महिन्यांत नऊ महिने पहाटे पूर्वेस शुक्र दिसतो.त्यात बहुधा प्रत्येक खेपेस सुमारे दोन-तीन महिने गुरू त्याच्या जवळ असतो.त्यात काही दिवस तर फारच जवळ असतो.पुढं शुक्राची गती जास्त असल्यामुळं गुरू त्याच्या मागं म्हणजे पश्चिमेस राहून उत्तरोत्तर शुक्राच्या अगोदर उगवू लागतो व काही दिवसांनी शुक्र पहाटेस उगवत आहे,तोपर्यंत गुरू पश्चिमेस अस्त पावण्याची वेळ आलेली असते.म्हणजे त्यानं सगळ्या आकाशाचं भ्रमण केलेलं दिसतं.गुरू आणि शुक्र एकत्र आहेत.अशा वेळी त्याविषयी अश्विनत्वाची कल्पना झाली असावी आणि पुढं त्यापैकी एक (शुक्र) नेहमी सूर्याजवळ असतो आणि दुसरा (गुरू) सर्व आकाशात फिरतो,हे पाहून पुढील कल्पना आली असावी-

ईर्मान्यद्वपुषे वपुश्चक्रं रथस्य ये मथुः ॥ 
पर्यन्या नाहुषा युगा महारजांसि दीयथः ॥
(ऋ.सं. ५.७३.३. पा. २३)

- हे अश्वी हो,तुम्ही आपल्या रथाचं एक तेजस्वी चक्र सूर्याच्या ठिकाणी त्याच्या शोभेकरिता नियमित करिते झाला (आणि) दुसऱ्या चक्राने... तुम्ही... लोकांभोवती फिरता.

यात एक 'तेजस्वी चक्र सूर्याच्या ठायी ठेविते झाला' हे शुक्राला फार उत्तम रीतीनं लागू पडतं,तर 'दुसऱ्या चक्रानं भुवनाभोवती फिरता' हे गुरूला चांगलं लागू पडतं (भारतीय ज्योतिषशास्त्र पा. ६५).

ऋतुमानाप्रमाणं शुक्राचा रंग बदलत असल्याचा उल्लेख वराहमिहिरानं बृहत्संहितेत केला आहे. तसेच,तो त्यांची लक्षण फळंही सांगतो :

शिखिभयमनलाभे शस्त्रकोपश्च रक्ते कनकनिकषगौरे व्याधयो दैत्यपूज्ये । 
हरितकपिलरूपे श्वासकासप्रकोपः पतति न सलिलं खाद्भस्मरूक्षासिताभे ॥ - (९-४४)

- म्हणजे जर शुक्राचा वर्ण अग्नीसमान असेल,तर अग्नीपासून;रक्तासमान असेल,तर शस्त्रापासून आणि कसोटीवर घासलेल्या सुर्वणरखांसारखा असेल,तर रोगांपासून भय असतं.पोपटाप्रमाणे पिवळसर असेल, तर श्वास आणि कास रोगाची उत्पत्ती होते आणि भस्माप्रमाणं रुक्ष वा काळा असेल,तर अवर्षण पडते.

जंगलातील माझ्या घरातील खिडकीतून तर ही चांदणी पहाटे डोकावताना दिसे.मी लिहिण्याच्या तयारीत असे. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी एकदा तिच्याकडं ध्यानमग्न होऊन पाही.नंतर मी मनात विचार करायचा, की आता लिहिताना ती माझ्याकडं सौहार्दपूर्वक पाहात आहे.शांती आणि सौंदर्य यांनी मला ती भारून टाकी. माझं अंतःकरण ज्ञानमय होई.वाटे,की ती माझ्याकडं युगानयुगं अशीच कृपादृष्टीनं पाहात राहील.

जीवन सुंदर आहे.मृत्यूदेखील सुंदर असणार ! पहाटेच्या वेळी गुरू-शुक्र आकाशातील आपल्या नक्षत्रनेत्रांनी माझ्याकडं स्नेहानं पाहात आहेत,अशा शांत नक्षत्रवेळी एखाद्या नक्षत्रविकासी पुंडरिक पुष्पाप्रमाणं आपले नेत्र मिटावेत,अशी माझी इच्छा आहे.




२७/१०/२५

मी आस्तिक का नाही / Why I am not a believer

नरहर कुरुंदकर ...

मी ज्या घरात जन्माला आलो ते घर आस्तिकच आहे.माझे मामा आस्तिक,माझ्या भोवतालचे सर्व वातावरणच आस्तिक आहे.जन्मल्याबरोबर मी देखील आई,बाबा,आत्या,मावशी असेच शब्द शिकलो.मी काही असे एकदम म्हणालो नाही की, "या जगात ईश्वर नाही."माझ्या नास्तिक्याचा उदय मी जेव्हा विचार करू लागलो त्यावेळेस झालेला आहे.मी नास्तिक असलो तरी सामान्यपणे मी आस्तिकाच्या भावना दुखवीत नाही.जी वस्तू अस्तित्वातच नाही तिच्याविरुद्ध झगडण्यात मला स्वारस्य नाही.एखाद्या माणसाने जर सांगितले की, 'देव आहे' तर त्यामुळे माझे काही नुकसान होत नाही.त्यालाही इतकी बुद्धी असायला पाहिजे की 'देव नाही' म्हटल्याने त्याचेही काही नुकसान होत नाही. पण हे त्याच्या लक्षात येत नाही. 'देव आहे ' म्हटल्याने माझे काही नुकसान होत नाही. 

"मी देवळात जातो,देवाच्या पाया पडतो,सर्व धार्मिक समारभांना हजर राहतो,धर्मगुरूंच्या पाया पडतो,
माझ्या घरी होता होईतो धार्मिक समारंभ करीत नाही.जर बायको करायचेच म्हणाली तर करतो.
कुठल्याही प्रकारे अभिनिवेश नावाची जी गोष्ट आहे,ती नाही.आता माझ्यावर ही जबाबदारीच आहे की,'देव नाही' हा मुद्दा असल्याने सर्व धार्मिक माणसांच्या भावना आपण दुखावल्याच पाहिजेत असे मी मानत नाही.माझे असे मत आहे की या जगात ईश्वर नाही व हे मत मी विचारपूर्वक बनवलेले आहे.समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने हे हिताचे असेल,तर हे मत मी आग्रहाने मांडेन. आस्तिकांच्या विरोधात उभा राहीन.तिथे मी कुणाचीही भीडमुर्वत बाळगणार नाही.पण तसे काही चालत असेल तर मी उगीच कुणाशी भांडत बसणार नाही.कारण जीवनाचे माधुर्य पुष्कळसे अज्ञानाने भरलेले आहे.

 जर एखादे वेळी बायको मला म्हणाली की तुमचे आणि आमचे ऋणानुबंध गतजन्मीचे आहेत.तर मी आगाऊपणा करून असे म्हणणार नाही की हे संबंध गतजन्मीचे नाहीत;ते ह्याच जन्मीचे आहेत. कारण हे बायकोला सांगितल्यामुळे पुन्हा जेवायला मिळणार नाही.तेव्हा हे भांडण मी करणार नाही.

एकदा माझ्या आईने मला विचारले,"अरे नरहरी,तू नास्तिक,तू देव मानीत नाहीस म्हणे.अरे,मग मी मेल्यावर माझे श्राद्ध करशील की नाही?" तेव्हा मी विचारले की,मला आधी हे सांगा की,तुमच्यापैकी कोण आधी मरणार? तेव्हा आई म्हणाली,"माझी इच्छाच असेल तर अहेव मरण ही कुठल्याही बाईची इच्छा असणार!" "ठीक आहे,तू आधी मेलीस तर बाबा मागे पाहायला आहेत तोपर्यंत मी श्राद्ध करीन.जर बाबा मेले तर तू पाहायला आहेस तोपर्यंत श्राद्ध करीन.तेव्हा दोघेही मेल्यावर मी काय करीन ते मी सांगायला तयार आहे.पण ते पाहण्यासाठी तुम्ही असणार नाही.समजा मी सांगितले की,मी दोघांचेही श्राद्ध करीन अन् ते केले नाही तर तुम्हाला बरे वाटेल का?" तेव्हा आई म्हणाली,"अजिबात बरे नाही वाटणार!" "अन् समजा मी नाही म्हटले अन् पुढे करीत राहिलो तर तुम्हाला वाईट वाटेल का?" आई म्हणाली,'तसेही नाही' मग "तुम्ही ही श्रद्धा ठेवून म्हणायला हरकत नाही की "श्राद्ध होत राहणार." तेव्हा मी काही त्यांना असे म्हटले नाही,'मी काही तुमचे श्राद्ध करणार नाही.'

आजीने एकदा देव आहे हे सिद्ध करून दाखवणारा पुरावा मला दिला.नारळात पाणी हे देवाने घातले आहे तेव्हा देव आहे असे तिचे म्हणणे.मी तिच्या समाधानासाठी म्हटले,"आजपर्यंत हा मुद्दा मला कुणी पटवूनच दिला नव्हता.आजपासून 'देव आहे' असे मानायला सुरुवात करतो."

समाजातील हजारो,लाखो माणसांच्या भावना या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत.तेव्हा एवढाच जर मुद्दा असेल तर काय म्हणून त्यांच्या भावना दुखवायच्या? जर एवढाच मुद्दा असेल तर मीही माझ्या नास्तिक्याचा आग्रह धरायला तयार नाही. उगीच कुणाच्या आस्तिक्याच्या विरोधी भाषण देण्याची माझी इच्छा नाही.पण अडचणीची गोष्ट अशी आहे की मुद्दा फक्त एवढाच नाही.तर सबंध समाजातील आस्तिक्यबुद्धी ही समाजाला हानिकारक असणाऱ्या सर्व चालीरीती,परंपरा, रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा पूर्ण विनाश झाला तरी तो विनाश नसून ते प्राक्तन आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते.आणि मग समाजाच्या प्रगतीच्या सर्व शक्यता या आस्तिकबुद्धीमुळे नाहीशा व्हायला लागतात.त्या दिवशी हे सांगण्याची वेळ येते की,हा सर्व मूर्खपणाचा भाग आहे उरलेल्यांच्यासाठी व लबाडीचा भाग आहे,काही जणांसाठी.

शेवटी आस्तिक किंवा नास्तिक हे भांडण केवळ तत्त्वज्ञानापुरते नाही,हे तर भांडण सामाजिक प्रश्नांसाठी आहे.या नांदेड गावामध्ये आमचे एक मुसलमान मित्र मला म्हणाले,"इस्लामशी तुमचे काय मतभेद आहेत?" मी म्हणालो,"काही नाही. साधा मुद्दा आहे,तू मुसलमान आहेस.तुझा तुझ्या धर्मग्रंथावर विश्वास आहे.मी मुसलमान नाही,माझा धर्मग्रंथावर विश्वास नाही.माझी कोणत्याच धर्मावर श्रद्धा नसल्यामुळे धर्मग्रंथावर श्रद्धा नाही,हे बरोबर आहे ना?" तो म्हणाला, "बरोबर आहे." व उठून गेला.

सर्व धार्मिक माणसांचा बुद्दूपणा हा माझ्या जीवनामधले फार मोठे दुःख आहे.धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे.
जन्मभराच्या अभ्यासामुळे माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे कामच धर्माने सातत्याने केले आहे.
प्रगतीला अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे.मुद्दा असा आहे की कोणत्याही- देवावरच्या-श्रद्धेमुळे का होईना जर माणसे नैतिक राहिली असती तर राहू द्यात.ईश्वरावरील श्रद्धा माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडली असती तर कदाचित ईश्वराच्या श्रद्धेविरुद्ध कसे बोलावे याचा मी दहावेळा विचार केला असता. 

धर्मावरची सर्व श्रद्धा सर्व अनैतिक बाबींचे समर्थन करण्यासाठी,जगाच्या इतिहासात वापरली गेली आहे.जगाचा व भारताचा इतिहास जर पाहिला तर असे आढळते की मानवी जीवनातल्या सगळ्या अनैतिक बाबींच्या समर्थनासाठी धर्मावरची श्रद्धा शतकानुशतके वापरली गेली आहे.आणि लोकांनी ती कबूल केलेली आहे. 

पण धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता तर एकाही देवळाच्याजवळ एवढी संपत्ती जमा झाली नसती.देवाचे नाव घेऊन मटका चालवायचा.साईबाबाचे नाव घेऊन आकडा लावायचा.म्हणजे साईबाबाच्या नावाचा उपयोग जुगारीसाठी करायचा.माणसाच्या आस्तिक्यबुद्धीने स्वतःच्या सर्व भ्रष्टाचाराचे समर्थन परमेश्वराच्या नावावर हुडकून काढले.आणि म्हणून ईश्वराची कल्पना शांततेला उपयोगी पडली नाही,तर माणसे ईश्वराचे नाव घेऊन एकमेकांची डोकी फोडतच राहिली हाच जगाचा इतिहास आहे. 

सर्व हिंदू-मुसलमानांची भांडणे तशीच आहेत, सगळी ख्रिश्चनांची-कॅथलिक व प्रोटेस्टंटांची-भांडणे तीच आहेत.माणसाला शांततेनं जीवन जगायला कधीही देव उपयोगी पडला नाही.माणसाला नीतिमान व्हायला कधी देव उपयोगी पडला नाही.आणि माणसाला सगळ्या समाजाच्या बरोबर त्या समाजाच्या ऱ्हासाला थांबविण्याची प्रेरणा कधी देवाने दिली नाही.देवाचे काम Positive आहे.पण तो हिंसेला उपयोगी पडला,पापाला उपयोगी पडला,
मारामारीला उपयोगी पडला;पापाच्या समर्थनासाठी,
अन्यायाच्या समर्थनासाठी उपयोगी पडला.नाही तर तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन कसे करता? दोन हजार वर्षे तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन करीत आलात.

माणसासारख्या माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधीच तुम्ही देत नाही आणि हे काम अत्यंत पवित्र आहे असे सांगता बेशरमपणे! याला देव उपयोगी पडतो.तसेच जगातील सगळ्या अनीतीला देव उपयोगी पडतो.असा भाग असताना मग प्रश्न विचारात घ्यावा लागतो मी आस्तिक आहे हे म्हणणे- नास्तिक आहे हे म्हणणे.या म्हणण्याला समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काय अर्थ आहे?देवामुळे माणसे जर नैतिक राहिली असती तर मग देवाचे नाव घेऊ नका असे म्हणालो नसतो.उलट माणसांनी नैतिक राहावे अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही मग- श्रद्धा नसतानाही-देव आहे अशा थापा देत राहिलो असतो.ईश्वर हा शेवटी तर्कवादाचा मुद्दा नाही. शेवटी माणूस दुःखात आल्यानंतर ईश्वराचे नाव घेतो.याला आमचा काही विरोध नाही किंवा मी दुःखात आल्यानंतर देवाचे नाव घेईन असा माझा अंदाज आहे.ज्या वेळी आपण निराश होऊ त्या वेळी देवाचे नाव घेऊ,पण त्यामुळे देव आहे असे सिद्ध होते का? हा कुठला भ्रम आहे?अतिशय चतुर माणसे कोणत्या भ्रमाचे प्रतिपादन करू लागली आहेत हे समजत नाही.ज्या वेळी सगळे संपून जाईल,काहीच शिल्लक राहणार नाही,त्या वेळी देवाचे नाव घेणे हा सज्जड पुरावा आहे का? पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर चार-सहा महिन्यांनी माणसाला काही बोलता येत नाही. त्याला 'हायड्रोफोबिया' होतो त्या वेळी तो जे बोलू लागतो ते भुंकल्यासारखे वाटू लागते.पण खरे म्हणजे त्याला मरण्याची इच्छा नसते,व तो जे भुंकल्यासारखे बोलतो,तो 'मला वाचवा,मला वाचवा' असे म्हणायला लागतो,त्यामुळे काय देव आहे असे सिद्ध होते? जिथे काहीच माणसाचा उपाय चालत नाही तेथे देवाचे नाव घेता,तेव्हा देव आहे हे सिद्ध होते का? आम्ही तीर्थयात्रेला जातो तेव्हा 'राम, राम' असे शब्द म्हणतो.
त्यामुळे राम सिद्ध झाला आहे का? खांद्यावर प्रेताचे ओझे घेऊन आम्ही निघतो व तोंडाने 'रामनाम सत्य है' असे म्हणतो त्यामुळे रामनामही सिद्ध होत नाही व रामही सिद्ध होत नाही.

देव हा तर्काचा विषय नाही तर तो अनुभवाचा विषय आहे.तेव्हा ज्यांना त्याचा अनुभव असेल त्यांनी 'आहे' म्हणून सांगावे,ज्यांना तो नसेल त्यांनी 'नाही'म्हणून सांगावे.एकही अपवाद जाता कुणालाही परमेश्वराचा अनुभव आला आहे असे मला वाटत नाही.हे तुम्हांला मान्य आहे की,देव हा तर्काचा विषयच नसल्यामुळे ज्यांना तो दिसतो आहे,जाणवत आहे त्यांनी 'दिसतो आहे' असे मानावे व ज्यांना तो जाणवतच नाही त्यांनी 'नाही' असे प्रामाणिकपणे सांगावे. इतके आपण कबूल करायला तयार आहोत काय? हे जर कबूल असेल तर शेकडा ९८ धार्मिक व सश्रद्ध माणसे अप्रामाणिक आहेत असे म्हणावे लागते.

 व हाच तर माझा मुद्दा आहे की,ईश्वरावरची श्रद्धासुद्धा तुम्हाला प्रामाणिक राहायला उपयोगी पडत नाही.शांत राहायला उपयोगी पडत नाही, समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी पडत नाही. माणसाच्या ठिकाणी किमान दानत असायला पाहिजे की,
आपल्याला ईश्वरासंबंधी वाटते हे खरे बोलावे.हे खरे सांगायला देखील ईश्वराची श्रद्धा उपयोगी पडली नाही.ईश्वर अशी नेहमी प्रेरणा देत आला की 'खोटे बोल!' म्हणत रहा,'काशीस जावे, नित्य वदावे!' असे तोंडाने म्हणत राहावे,'देव आहे, देव आहे.'मला तो दिसणार नाही,पण आहे.कारण देव दिसण्याइतका मी कुठे पुण्यवान आहे? जे महान पुण्यवान आहेत त्यांना तो दिसतो व जे कुणी महान पुण्यवान आहेत ते आपल्याला कधी दिसतच नाहीत.जर देव तर्काने सिद्ध होत असेल तर 'देव आहे,' हे कुणाला कधीही सिद्ध करता येणार नाही आणि जर देव ही तर्काने सिद्ध होणारी गोष्ट नसेल व ज्यांना देवाचा अनुभव नाही त्यांनी 'देव आहे' असे मानणे,हे अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे. मी काही अणू पाहिलेला नाही,तरी मी अणू आहे असे मानतो.कारण तो पुराव्याने सिद्ध करता येतो. ज्याचा अनुभव मी घेतलेला नाही,तरी पण त्याची शक्यता मी मानतो. कारण त्या गोष्टी पुराव्याने सिद्ध करता येणाऱ्या आहेत.जे पुराव्याने सिद्ध करता येत नाही आणि प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही,ते आहे असे जर मी सांगत असेन,तर जे पुराव्याने सिद्ध करता येते व जे प्रत्यक्षाचा विषय आहे ते नाही असे मला मानले पाहिजे.हा मुद्दा Logic चा आहे.देवाच्या नादी लागून माणूस उगीचच भ्रामक युक्तिवाद करीत आहे आणि देवाच्या नादी लागून भ्रामक युक्तिवाद करीत असताना माणसाला आपण बुद्धिवादी झालो आहोत असा निष्कारण भ्रम व्हायला लागतो.मी लहानपणापासून धर्मवाङ्मय वाचले आहे. बहुतेक धार्मिक मंडळींनी जे धर्मवाङ्मय वाचलेले असते त्यापेक्षा अधिक मी ते वाचले आहे आणि माझी श्रद्धा आहे की,बहुतेक लोक धार्मिक आहेत याचे कारण त्यांनी धार्मिक वाङ्मय वाचले नाही. आणि प्रत्येक जण आपल्या धर्माचे वाङ्मय वाचायला टाळाटाळ करतो.आम्ही मूर्ख असल्यामुळे श्रद्धेने आम्ही आमच्या धर्माचे वाङ्मय वाचायला सुरवात केली,हा आमच्या नास्तिक्याचा आरंभ आहे.गेल्या वर्षी मी लहान मुलांच्या मासिकासाठी एक लेख लिहिला आहे.ती गोष्ट अगदी खरी घडलेली आहे.

उस्मानिया विद्यापीठाचे पहिले मराठी विभागाचे प्रमुख श्री.काकासाहेव जोशी हे मी लहान असताना वसमतला आले होते. त्यांना गोष्टी सांगण्याचा खूप नाद.ही सर्व धार्मिक मंडळी.तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली-देवाने एकदा काय केले-समुद्र घुसळून काढण्याचे ठरविले. मंदारला केले रवी.वासुकीला केले दावे.शेपटाकडून झाले देव,तोंडाकडून झाले राक्षस.
मग त्यांनी समुद्र घुसळून काढला.त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. देव अमृत प्याले. गैरे सारी कहाणी सांगितली व नंतर ते मला म्हणाले,"मी आता तुला ही कहाणी सांगितली.या कहाणीचे तात्पर्य काय ते सांग पाहू?" तेव्हा मी म्हणालो, "या कहाणीचे तात्पर्य असे की, जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते." तेव्हा ते भयंकर ऑफ झाले.ते म्हणाले, "असे नाही,देवांना अमृत मिळाले तेव्हा आपण देवाच्या बाजूने राहावे." मी म्हणालो, "मला तुमच्या कहाणीत जे जाणवले ते इतकेच की,जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते." तेव्हा ते म्हणाले,"तू नरकात जाशील." आमच्याकडे वयाच्या नवव्या वर्षापासून हा मुद्दा आहे- 'तू नरकात जाशील.'आमचे आदरणीय विद्वान यज्ञेश्वर कस्तुरेशास्त्री मला म्हणाले,"कुरुंदकर, तुम्ही रोज नास्तिक्याच्या गोष्टी बोलता,आपण मेल्यानंतर नरकात जाऊ याची भीती तुम्हाला नाही वाटत?" तेव्हा मी म्हटले, "नाही.आम्ही तेथे मोठा प्लॉट घेतला आहे.घर बांधण्याचे काम सुरू आहे.ते बांधून झाल्यानंतर तेथे राहायला जाऊ.पण अधून-मधून तुम्हालाही तेथे यावे लागेल." "मला कशाला तेथे यावे लागेल?" तेव्हा मी म्हणालो,"संस्कृत पाठशाळेच्या ग्रँटचे फॉर्म घेऊन हिंडेल कोण? तेव्हा ग्रँटसाठी यावेच लागेल,आठ-पंधरा दिवसांनी !"कधीही आस्तिक मंडळींना असे वाटतच नाही की, समोरच्या माणसाला तुम्ही नरकात जाल असे म्हणणे ही शिवी आहे.मी जर त्यांना असे म्हणालो की,"आपण अत्यंत मठ्ठ आहात,तेव्हा आपण नरकातच जाणार."तर त्या माणसाला असे वाटेल की, वढा विद्वान माणूस,धार्मिक माणूस;त्याला तुम्ही अशा शिव्या देता आहात? पण त्यांनी जर असे सांगितले की,तुमचा देवावर विश्वास नाही ना? मग तुम्ही नरकात जाल,तर ती मात्र आम्हाला शिवी आहे असे वाटत नाही.या सर्व धार्मिक मंडळींना आपण समोरच्या माणसाचा अपमान करतो याचा कॉमनसेन्स सुद्धा नसतो, असा माझा अनुभव आहे.एकदा माझे मामा डॉ.नांदापूरकर- यांचे गुरू चिं.नी. जोशी यांनी मला महाभारतातील आदिपर्वातील कश्यपाची कहाणी सांगितली.ते म्हणाले,"मी तुला एक गोष्ट सांगतो,त्याचे तात्पर्य तू मला सांग." मी म्हणालो, "सांगतो." त्यांनी मग गोष्ट सांगितली.कश्यपमुनींच्या दोन बायका होत्या. एकीचे नाव होते विनता,दुसरीचे नाव कद्रू.या दोघींनी एकदा सिद्ध करावयाचे ठरवले की, सूर्याच्या रथाच्या घोड्याची शेपटी पांढरी की काळी? दोघींनी प्रतिज्ञा केली की,जिचे म्हणणे खरे असेल तिने मालकीण व्हायचे व जिचे खोटे असेल तिने जन्मभर दासी व्हायचे आणि नंतर कद्रूच्या लक्षात आले की,शेपूट पांढरेच आहे.तेव्हा तिने आपल्या मुलांना- सापांना सांगितले की,शेपटीला तुम्ही मिठी मारा.तेव्हा नंतर विनता झाली दासी व कद्रू झाली मालकीण.मग पुढे गरुडाने आपल्या आईची दास्यातून सुटका केली.' अशी ही सगळी कहाणी सांगितल्यावर मला तात्पर्य विचारले.तेव्हा मी म्हणालो,"मला आधी हे सांगा पाहू की,ही कहाणी कलियुगातली आहे की त्रेतायुगातली, द्वापार की सत्ययुगातली आहे?" ते म्हणाले,"ही कहाणी सत्ययुगातली आहे." तेव्हा या कहाणीचे तात्पर्य असे की,"कलियुगात माणसे जसे द्वेष, मत्सर करणारी,लबाड,लुच्ची आहेत,तसेच सत्ययुगातील माणसेही द्वेष,मत्सर करणारी, लबाड-लुच्ची होती.जसा त्या वेळी लबाड, लुच्च्यांचा विजय होतो तसाच याही वेळेला लबाडलुच्च्यांचा विजय होतो.
"तेव्हा मामा म्हणाले, "आमचे गुरू म्हणाले की,तू नरकात जाशील.तेव्हा मी त्याला 'endorse' करतो की तू नक्की नरकात जाशील." तेव्हा माझ्या मनावर सगळ्या धर्मवाङ्मयाचे जे संस्कार झाले आहेत,ते असे आहेत.इथे जागोजागी असा उल्लेख आहे की, देवाने अमकी लबाडी केली व त्यांचा विजय झाला. देवांच्या सर्व विजयाच्या कहाण्या सर्व पुराणांमध्ये भरलेल्या आहेत व सर्व कहाण्यांच्यामध्ये लबाडीचे उल्लेख आहेत.सबंध राक्षसांच्या पराभवाच्या कहाण्या पुराणांच्यामध्ये भरलेल्या आहेत.या राक्षसांच्या पराभवांच्या कहाण्यांमध्ये त्यांचा भोळेपणा हे कारण आहे.माणसे भोळी असल्यामुळे पराभूत झाली,माणसे लबाड असल्यामुळे विजयी झाली,एवढेच जर तुम्ही सांगणार असाल- धर्मामधून,तर त्यातून प्रेरणा लबाड असणे ही मिळणार आहे,सज्जन असण्याची नाही...
ज्याला तुम्ही धर्माचे पूज्य वाङ्मय समजता त्या धर्माच्या पूज्य वाङ्मयात माणसाला नैतिक करणाची शक्ती नाही हे तुम्ही ओळखा.धर्माच्या नावाने आपण इहलोकांचे हितसंबंध बोलतो,धर्माच्या नावाने आपण इहलोकातील लबाड्यांचे संरक्षण करतो, धर्माच्या नावाने आपण सर्व प्रगतीचे अडथळे सांगतो.एवढेच जर आपण धर्माच्या नावाने करणार असलो तर मग त्याच्या विरोधी राहणे आणि आपण आस्तिक नाही हे सांगणे आवश्यक होऊन जाते.

Courtesy Pralhad Mistri

हा लेख मला व्हाट्सअप द्वारे सतीश खाडे यांच्याकडून मिळालेला आहे.







२५/१०/२५

सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

पण पायवाट-वारुळाचं सैन्य अजूनही बरचसं शाबूत होतं.एकूण प्रजेपैकी पंधराएक टक्के सैनिक होते. मजबूत चिलखती पायदळ होतं,हे.साधारण कामकरी मुंगीच्या दुप्पट आकार असायचा,

सैनिकांचा.सैनिक मुंग्यांचा बाह्य सांगाडा जाड आणि चिवट असायचा. त्यात खड्डे आणि उंचवटे घडून मजबुती आणिकच वाढलेली असे.शरीराच्या मध्याच्या चिलखतापासून दोन दणकट काटे कंबरेला संरक्षण द्यायला निघालेले असत. आणखी दोन काटे पुढे मानेला संरक्षण देत.डोक्याचा सांगाडा शिरस्त्राणासारख्या रचनेचा असे.जर कोणी या हत्यारबंद चिलखतधारी सैनिकांवर हल्ला केला,तर सैनिक शिंगं आणि पाय चिलखतात ओढून,अंग आक्रसून पूर्ण शरीराचीच ढाल करत असत.


साध्या कामकरी मुंग्यांनाही लढता येत असे,पण त्यांचं चिलखत हलकं असे.त्या नेटानं उभं ठाकून लढत नसत. त्यांचा मुख्य गुण म्हणजे वेगवान,चपळ हालचाली करता येणं.शत्रूभोवती रिंगण धरून पळताना मध्येच कमकुवत भागावर हल्ले करणं.एखादा पाय,एखादं शिंग धरून शत्रूला जखडून ठेवणं.असं शत्रूला जेरबंद केलं, की वारुळातल्या इतर मुंग्या येऊन शत्रूला दंश करायच्या,

त्याचे लचके तोडायच्या,त्याच्यावर विषारी द्रव्यं फवारायच्या,आणि शेवटी अनेक लहानशा मुंग्या मिळून मोठ्या शत्रूला मारून टाकायच्या.एखाद्या मोठ्या सांबराला किंवा नीलगाईला रानकुत्रे मारतात,तसेच डावपेच कामकरी मुंग्या वापरतात.


माणसांमध्ये हलक्या पायदळानं शत्रूच्या मशीन-गन ठाण्यांवरचे हल्लेही याच तंत्रानं केले जातात.


तर राणी मुंगी मेली तेव्हा पायवाट वारुळापाशी अशी दहा हजार सैनिक-कामकरी फौज होती.राणी मेल्यावर मात्र नवे सैनिक,नवे कामकरी घडणं संपलं.जे सैनिक, कामकरी होते ते वयस्क,म्हातारे व्हायला लागले. पायवाट वारुळाचं सगळ्यात शेजारचं वारूळ म्हणजे ओढ्याकाठचं वारूळ,ते पायवाट वारुळापेक्षा वयानं आणि आकारानं लहान होतं.आता मात्र ते शेजाऱ्याच्या दबळेपणातून फायदा कमवायला सज्ज झालं.एका पहाटे ओढ्याकाठच्या वारुळातनं एक अभिजन मूंगी निघाली.तिच्यामागे साध्या कामकरी मुंग्यांचा एक गट होता.ओढा अभिजन मुंगीन पायवाट वारुळाची स्थिती तपासायचं ठरवलं होतं.नेमकी स्थिती तपासणं सोपं नव्हतं.दोन वारुळांमध्ये सुमारे वीस मीटर अंतर होतं, 


दोन हजार मुंग्याइतक म्हणा.सरळ वाटेनं हे अंतर एखादी मुंगी सहाएक मिनिटात ओलांडू शकली असती. पण वाट सोपी नव्हती.एक सेंटिमीटर लांब मुंगीच्या नजरेन पाहिलं तर मोठाले अडथळे होते.माणसांना झाडोऱ्याचं बेट दिसतं तसा एखादा गवताचा पुंजका मुंग्यांना दिसायचा.काड्याकाटक्या रस्त्यात पडलेल्या ओंडक्यांसारख्या दिसायच्या. माणसांना सपाट वाटणारी वाळू खडकाळ जमिनीसारखी वाटायची.

पाऊस ही तर मोठीच आपत्ती.मुंग्यांच्या अंगावर एक थेंब पडणं,आणि माणसांना अग्निशामक दलानं जोरदार नळाच्या झोतानं हाणणं,हे सारखंच समजायला हवं.एखादा बारका ओघळही मुंग्यांना एरवी कोरड्या पात्रातल्या महापुरासारखा वाटायचा.ओढा-अभिजन मुंगीला पायवाट वारुळाच्या क्षेत्राचा रस्ता आठवत होता,कारण ती एकदा तिकडे गेली होती. पण आता तिनं पूर्वी आखलेली फेरोमोन वासाची वाट पुसली गेली होती.


आता तिचा भर होता सूर्याची जागा पाहून वाट आठवण्यावर.आता सूर्य उगवतो आणि मावळतो.दिवसभर त्याची जागा सतत बदलत असते. पण मुंग्यांच्या मेंदूंमध्ये घड्याळ असावं तशी काळ मोजायची क्षमता असते.माणसांच्या मेंदूंना न जमणाऱ्या नेमकेपणानं मुंग्या सूर्याच्या बदलत्या जागांवर लक्ष ठेवू शकतात.बदलत्या जागेप्रमाणे कोन कसेकसे बदलतात, हेही मुग्या जाणू शकतात.आपल्या नोकोबीच्या जंगलात सूर्य दिवसभरात कसा प्रवास करतो.हे मुंग्याना माहीत असतं.तो पूर्वच्या तळ्याकाठच्या झाडांमधून उगवतो, आणि वारुळांच्या थेट वरून पश्चिमेच्या जंगलात मावळतो.कोणत्यावेळी तो कुठे असेल,हे मुंग्यांना नेमकं माहीत असतं.पण तरीही मुंग्या अधूनमधून थांबतात, आणि आजूबाजूचा भाग डोळ्यांनी तपासतात. आठवणीतल्या खुणा तपासून आपण कुठे आहोत याचा अंदाज घेतात.एकदोन शेजारीशेजारी वाढलेली रोपटी, पानांमधून गोलाकार दिसणारा,आकाशाचा तुकडा, एखादी दाट सावली,अशा या खुणा असतात. आणि सोबतच वास-चवीचं वातावरणही असतं, आधीच्या फेऱ्यांमधून आठवणारं.या एका आठवणींच्या प्रकाराबाबत आपण माणसं फार कल्पनाही करू शकत नाही.

ओढा-अभिजन मुंगीचं शरीर खालच्या जमिनीच्या दोनेक मिलिमीटर वर होतं.ती आपली शिंगं खाली वाकवून,जमिनीजवळ नेऊन वेगानं धावत होती.शिंगं डावीउजवीकडे वळवत होती.

वास,त्यांचं मिश्रण,ते तीव्र होताहेत की मंदावताहेत,सारं नोंदून तिच्या बारीकशा मेंदूत एक नकाशा उमटत होता.


सडणारा,कुजणारा पाचोळा,त्यावर जगणाऱ्या बुरश्या आणि जिवाणू,या प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा वास असतो.मुंग्यांना तो 'दिसतो'.दर चौरस मीटरमध्ये अशा अडीच-तीन लाख वासांचं मिश्रण असतं,आणि मुंग्यांना ते वास येतात आणि आठवतातएखादा वास सांगतो, "इथे अन्न आहे." दुसरा सांगतो,"इथे धोका आहे."सगळ्या संदेशांचा अर्थ क्षणोक्षणी लावत मुंग्या जगत असतात. 


त्या अर्थ लावण्यातूनच त्यांचं टिकून राहणं आणि मरून जाणं ठरत असतं.आणि आपल्याला ह्या प्रचंड तपशिलानं भरलेल्या विश्वाची जेमतेम कल्पना करता येते.ओढा-अभिजन मुंगी पायवाट वारुळाच्या दिशेनं चालली होती,पण तिला त्या वारुळात जायचं नव्हतं.तिची 'मंझिल' होती,एक दोन्ही वारुळांमधलं मैदान.मैदान फारतर दीड-दोन वितींचं होतं,पण मुंग्यांच्या मापांत ते प्रचंड मोठं होतं.आणि या मैदानात ओढा-अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार यांना भेटले पायवाट अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार.पायवाट अभिजन मुंगीनं राणीचा मृत्यू पाहिला होता.नंतरच्या सत्तास्पर्धेतून स्वतःचं वारूळ जरासं स्थिरावताना पाहिलं होतं.आता ती अन्न शोधत आपल्या वारुळाच्या क्षेत्राच्या अगदी बाहेरच्या सीमेवर आली होती.हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले,आणि त्यांच्यात एक किचकट नाच चालू झाला.हा माणसांमध्ये असतो तसा नाच नव्हता.खरं तर तो एक सामना होता, दोन वारुळांमधल्या स्पर्धेसारखा.दोन्ही बाजूच्या मुंग्या पुढ्यातल्या बाजूची ताकद आजमावत होत्या.दुसऱ्याची ताकद तपासतानाच स्वतःच्या ताकदीची जाहिरातही केली जात होती.असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका वाटत नव्हता.

मृत्यूचा तर नाहीच,पण जखमांचाही धोका नव्हता.शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं होतं हे;पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं.त्यातनं आपली सुरक्षा वाढेल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.


या सामन्याच्या वेळी ओढ्याकडेचं वारूळ पूर्ण जोमात होतं.

आसपासच्या कोणत्याही वारुळाला हरवू शकेल, इतकी त्याची ताकद होती.मरू घातलेल्या पायवाट वारुळाला हरवण तर फारच सोपं होतं.ओढा-राणी सहा वर्षांची होती.माणसांच्या मापात तीसेक वर्षांची.भरपूर अंडी देत असायची.वारूळभर तिच्या राजस फेरोमोन्सचा सुगंध होता.वारुळाची जागाही चांगली,

सहज न खचणारी होती.एक बाजू ओढ्यानं, आणि दूसरी बाजू एका कोरड्या घळीनं सुरक्षित होती. इतर कोणतं वारूळ जवळ येणार नाही,असे तेज उतार वारुळाचं रक्षण करत होते.हे काही ठरवून झालं नव्हतं. केवळ योगायोगानं ओढा-राणीला मोक्याची जागा सापडली होती.जागा निवडण्याची बुद्धी राणी मुंग्यांमध्ये नसते.तर ओढा-अभिजन आणि तिचे साथीदार,पायवाट-अभिजन आणि तिचे साथीदार,असा मोठा जमाव मैदानात आला.दोन्ही बाजूंकडून साधारण सारख्याच संख्येनं मुंग्या होत्या.दोन्ही वारुळांच्या काही मुंग्या मात्र आपापल्या घरी जाऊन आणखी कुमक आणायच्या प्रयत्नांत होत्या.सगळ्या मैदानाभोवती लहान-लहान खड्यांवर चढून दोन्हीकडच्या मुंग्या शत्रूवर लक्ष ठेवत होत्या.घराकडे परतणाऱ्या प्रत्येक मुंगीला सौम्यसा शत्रूचा वास येत होता.त्यामुळे ती कोणाशी लढायला बोलावते आहे,ते कळत होतं.आता नुसत्या अभिजन आणि कामकरी मुंग्याच नव्हेत,तर सैनिक मुंग्याही मैदानावर येऊन पोचायला लागल्या. तासाभरात मैदान दोन्हीकडच्या शेकडो मुंग्यांनी फुलून गेलं.पण ही युद्धाची सुरुवात नव्हती.माणसांची सैन्यं जशी एकमेकांना घाबरवायला मिरवणुका काढतात, आपापसातच सराव-युद्धं खेळतात,तसा हा प्रकार होता. भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच.


शक्तिप्रदर्शन करणारी प्रत्येक मूंगी आकारानं मोठी दिसायचा प्रयत्न करत होती.पोटात द्रव भरून पोट फुगवली जात होती.पाय ताठ करून जास्त उंच दिसायचा प्रयत्न केला जात होता.कोणी तर खड्यांवर चढून आणिकच उंच होत होत्या.असं 'छाती फुगवून' चालताना दुसऱ्या वारुळाच्या मुंग्यांना मुद्दाम घासत जाणं,धक्के देणं,सारं सुरू होतं.आणि काही लहानशा मुंग्या शत्रूचा हिशेब मांडत होत्या.दुसऱ्या वारुळाकडे किती मुंग्या आहेत,त्यांची ताकद किती आहे, खाऊन-पिऊन जोमदार आहेत की नाहीत,सगळं नोंदलं जात होतं.जर शत्रूच्या मुंग्या आपल्याकडच्यांपेक्षा जास्त वाटल्या,तर आणखी मुंग्या बोलावल्या जात होत्या.हे जर जमलं नाही,तर शत्रूला आपोआप आपला दुबळेपणा कळण्याचा धोका होता.पायवाट-वारूळ राणी मुंगी मरण्याआधीही जरा दुबळं वाटायला लागलं होतं.त्यांचा प्रयत्न असायचा,की सामने आपल्या वारुळाजवळ व्हावेत;म्हणजे जास्त संख्याबळ दाखवणं सोपं जाईल.विशेषतः सैनिकांना जर लवकर मैदानात उतरवता आलं,तर शक्तिप्रदर्शन सोपं व्हायचं. अर्थात,शत्रूची ही पीछेहाट ओढा-मुंग्यांना पायवाट वारुळाची खरी स्थिती सांगतच असायची.आता तर पायवाट-वारुळाकडे पर्यायच नव्हता.त्यांना घराजवळ राहणं सक्तीचं होतं;आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्राही कमी होत होतं.


१३.१०.२५ या लेखातील भाग क्रमश:हा क्रम मागे पुढे आहे…धन्यवाद 


२३/१०/२५

एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens 

तर सगळी जुळवाजुळव झाली.तालमी सुरू झाल्या. कॉलेज-कॅण्टीनची नवी टुमदार इमारत होती. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर ती मोकळीच असायची. ती जागा तालमींना मिळाली.

तालमी सुरू झाल्या आणि दोन चार दिवसांतच माझ्या लक्षात आलं की दिग्दर्शक काहीच करत नाहीयेत नुस्ते खुर्चीवर बसून राहताहेत. दोन वेळा चहा पिऊन निघून जातायत ! स्कूलचे दोन तीन अनुभवी नट सोडले तर आम्ही सारेच नवीन होतो. नुस्ते एका जागी उभे राहून भाषणे वाचीत होतो. स्कूलच्या ज्येष्ठ नटांना विचारलं तर ते म्हणाले, 'हे नेहमी असंच नाटक बसवतात.आम्ही आपापसातच हालचाली वगैरे ठरवतो.' मी घाबरलोच.मी म्हणालो,'

मग आपण दुसऱ्या कुणाला तरी दिग्दर्शक देऊ या.' तर हे म्हणतात, 'इतक्या वर्षांत आमची कुणाला छाती झाली नाही - तूही त्या भानगडीत पडू नको.मेडिकलची नाटकं त्यांना पिढीजात आंदण दिली आहेत असं ते मानतात.ते दुखावले गेले तर नाटक बंदसुद्धा पाडतील !' मी भलताच हवालदिल झालो.मला नाटकात काम करण्याचा अनुभव नसला तरी एव्हाना मी खूप नाटकं पाहिली होती.'नाटकं बसवावी लागतात','प्रयोग बांधेसूद असावा लागतो' वगैरे शब्द मी भालबांच्या तोंडून अनेक वेळा ऐकलेले होते.आमच्या शाळेतले फाटक परचुरे सरांनी बसवलेले 'बांधेसूद' प्रयोग मी पाहिलेले होते.पुढे रांगणेकरांची नाटकं पाहून तर 'नाटक बसवणं' म्हणजे काय याचा बऱ्यापैकी अंदाज मला आलेला होता.भालबांची आठवण झाल्याबरोबर मला एकदम आशेचा किरण दिसला.मी भालबांच्या घरी जाऊन दाखल झालो आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.ते म्हणाले,"एक दिग्दर्शक असताना मी होऊन मधे लुडबूड करणे मुळीच बरे नाही.माझे आणि त्या दिग्दर्शकाचे फार चांगले संबंध आहेत.ते दुखावले जातील." मी म्हटले,"ते दुखावले जातील म्हणून नाटकाचा चुथडा होऊ द्यायचा का ? तुम्ही त्यांच्या नकळत तालमी घ्या ! त्यांना पत्तासुद्धा लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो.आमच्या कॅण्टीनला दोन खोल्या आहेत.एका खोलीत आमच्या अधिकृत तालमी चालतात.तुम्ही गुपचूप दुसऱ्या खोलीत भूमिगत तालमी घ्या !"नाटकाचा चुथडा होण्याचा माझा मुद्दा भालबांना पटला.आणि ते अनिच्छेने का होईना माझ्या कटात सामील झाले.आमच्या दुहेरी तालमी सुरू झाल्या. 


अधिकृत तालमीत चाललेल्या प्रवेशात ज्यांचे काम नसायचे ते तिथून हळूच सटकायचे आणि मागल्या खोलीत जाऊन भूमिगत तालमीत सामील व्हायचे.तिथे भालबा त्यांची तालीम घ्यायचे ! दुसऱ्या दिवशी त्या पात्रांत झालेली सुधारणा पाहून अधिकृत दिग्दर्शक खूश व्हायचे ! 'वंदे मातरम्'चा आमचा प्रयोग बऱ्यापैकी बांधेसूद झाला.मी आयुष्यात प्रथमच स्वेच्छेने ('अक्कल हुशारीने' म्हणता येईल - पण 'नशापाणी न करता' असं म्हणता येणार नाही कारण नाटकांची चांगलीच नशा तोपर्यंत चढली होती.) केलेला पहिला नाटकाचा प्रयोग पुण्यात लिमये मांडववाल्याच्या 'लिमये नाट्य-चित्र मंदिरात' (आजचे विजय टॉकीज) डिसेंबर १९४६ मध्ये झाला.मी स्वतः ड्रामा सेक्रेटरी असल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगाच्या आधी दोन-चार दिवस माझी प्रचंड धावपळ चाललेली होती.लिमयांकडे जाऊन पडदे निवड,नवयुग स्टुडिओतून सर्व पात्रांचे कपडे भाड्याने आण,घरोघर हिंडून नाटकात वापरलं जाणारं सगळं सामान गोळा कर.अनंत कटकटी.माझ्या भूमिकेवर एकाग्र होणं वगैरे अशक्यच होतं.

सगळ्या धावपळीत रात्री प्रयोग केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला तेही कळलं नाही.पण सुरू झाला,व्यवस्थित झाला आणि संपलाही ! लोकांना चक्क आवडला ! प्रयोग संपला आणि मग मात्र मी दीक्षित सरांच्या सिगरेटच्या धुरासारखा एकदम हलका झालो.सरळ अंतराळातच गेलो तरंगत ! खूप जणं विशेषत: दीक्षित सर आत येऊन शाबासकी देऊन गेले पण मी हवेतच । इतकी वर्षं जिवाचं पाणी करून टाकणारी भीती एकदम कुठे नाहीशी


झाली ? कशी नाहीशी झाली ? क्वचितच कुठेतरी दबा धरून बसलीही असेल.एखाद्या पडद्याच्या मागे.पण तिच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला उसंत कुठे होती ? नाटकाचा पडदा वर जायच्या आधी आपण ड्रामा-सेक्रेटरी होतो आणि पडदा वर गेल्याबरोबर आपण 'त्रिभुवन' झालो.ती भीती श्रीराम लागूला शोधत राहिलेली असणार । म्हणजे सुरवंटाला.आता बैस म्हणावं शोधत.आता तो मुळी सुरवंट राहिलेलाच नाही -फुलपाखरू झालाय ! तालमींच्या वेळी आपण ड्रामा सेक्रेटरी असल्यामुले आपल्याला अधिकृत तालीम सोडून कधी जाताच आलं नाही.मग आज एवढं सराइतासारखं त्रिभुवनचं काम आपण कसं केलं ? अरे हा कसला प्रश्न ? आपण स्टेजवर असताना आपले सगळे गुरू अवतीभवतीच तर होते.पॉल म्यूनी, कोल्मन,

सोहराब मोदी,जागीरदार,इन्ग्रिड बर्गमन,नानासाहेब,

गणपतराव सगळे आपल्याला हाताला धरून नेत नव्हते का ? असं काय काय डोक्यात काहूर माजलं होतं.त्या धुंदीत मी रात्रभर कुठेकुठे भटकत राहिलो.धुंदी ! हा शब्द मी नुसता वाचत होतो, ऐकत होतो.त्या रात्री ती अवस्था प्रत्यक्ष अनुभवली.

दुसऱ्या दिवशीचा प्रयोग मी प्रचंड आत्मविश्वासाने केला.


ग्रॅहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो! मला वाटतं ती खिडकी त्या क्षणी उघडली होती.


एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षात असताना गॅदरिंगला 'पुण्यप्रभाव' नाटक केलं. फायनल परीक्षा तीन महिन्यांवर आली असताना आणि नापास होण्याची खात्री समोर दिसत असतानाही 'वृंदावन' करण्याची संधी हातातून टाकून देणं शक्यच नव्हतं.

कदाचित ते आयुष्यातलं शेवटचं काम असणार होतं.नानासाहेब फाटकांचा 'वृंदावन' पाहिला होता आणि त्यानं मला चांगलंच पछाडलं होतं.तेव्हा खूप मन लावून मी वृंदावन' केला आणि ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये नापास झालो ! ऑक्टोबरच्या परीक्षेत मात्र पास व्हायचंच या निश्चयानं मग जोरात अभ्यासाला लागलो.पण पहिली चिंता हीच की आता कॉलेज सुटणार -तर आता नाटकं कुठे करायची ! जयंत धर्माधिकारी त्याच वर्षी फर्ग्युसनमधून बी.ए. झाला होता.त्याचीही हीच समस्या होती कॉलेज सुटलं,आता नाटकं कुठे करायची। तो कॉलेजच्या नाटकात नेमानं कामं करायचा. त्यालाही नाटकाचं चांगलंच वेड होतं. 


एक दिवस तो आणि भालबा हॉस्टेलच्या माझ्या खोलीवर आले.

काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणाले. आम्ही तिघं समोरच्या इराण्याकडे जाऊन बसलो. जयंतानं कुठल्याशा वृत्तपत्राचं एक कात्रण बरोबर आणलं होतं.दादर (मुंबई)ला 'दादर नाट्यकलोपासक' नावाची एक हौशी नाट्यसंस्था होती.तिनं हौशी नाट्यसंस्थांकरता एक नाट्यस्पर्धा आयोजित केली होती.प्रथम क्रमांकाच्या नाट्यप्रयोगाला एकशे एक रुपये बक्षीस मिळणार होतं ! जयंता आणि भालबा चांगलेच उत्तेजित झालेले होते.

एकरकमी एकशे एक रुपये मिळणं हे १९५१ साली चांगलंच आकर्षक होतं. (ते आपल्याला मिळणार असं आम्ही गृहीतच धरलं होतं.) पण त्याहीपेक्षा,नाटक करायला मिळणार हे जास्त महत्त्वाचं होतं.मग त्याकरता संस्थेचं पाठबळ हवं. आम्ही तर सगळेच कॉलेज शिक्षण संपलेले सडेफटिंग. तर मग आपण संस्था स्थापन करायची! त्यात काय ?


खरं म्हणजे त्या वेळी पुण्यात 'सोशल क्लब' आणि 'महाराष्ट्रीय कलोपासक' अशा दोन प्रतिष्ठित हौशी नाट्यसंस्था बरीच वर्षं काम करीत होत्या.त्यांची नाटकं आम्ही पाहिलेली होती.भालबा तर तोपर्यंत पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजात नाटकं बसवायला जात होते आणि जयंत काय किंवा मी काय,सतत चार-पाच वर्षं कॉलेजच्या नाटकांत कामं करून बक्षिसं मिळवत असल्यानं हौशी नाट्यक्षेत्रात बऱ्यापैकी मांहीत झालेलो होतो.तेव्हा या दोन्ही संस्थांनी आम्हांला त्यांच्यात ओढायचा प्रयत्न केलेला होता.पण एक तर त्या संस्थांमध्ये सगळी बुजुर्ग मंडळी होती आणि मुख्य म्हणजे त्यांची नाटक सादर करण्याची पद्धत आम्हांला फार भडक,जुनाट वाटायची.त्यामुळे आम्ही त्यांना टाळत होतो.

आम्हांला काही तरी वेगळं करायचं होतं ! म्हणजे नेमकं काय करायचं होतं ते माहीत नव्हतं.पण तिथं जे चाललं होतं त्याबद्दल तीव्र असमाधान होतं. आणि आपल्याला काही तरी वेगळं – अधिक वास्तवदर्शी असं काहीतरी करायचं आहे अशी एक निश्चित खूणगाठ मनाशी होती.तेव्हा आपण आपली स्वतःची संस्थाच काढली पाहिजे असं काही तरी स्वप्नाळू बोलणं आमच्यात मधूनमधून व्हायचंही.आता या नाट्यस्पर्धेत प्रयोग करण्याची संधी आली आहे तर संस्था स्थापन करूनच टाकू या म्हणून आम्ही इराण्याच्या संगमरवरी टेबलाभोवती बसून चहाचा पाचवा कप पितापिता संस्था स्थापन करून टाकली.आचार्य अत्र्यांचं 'उद्याचा संसार' नाटक करायचं हेही त्यातल्या सगळ्या भूमिकांसह ठरवून टाकलं.तीन चार तास उत्साहानं फसफसून चर्चा करून एवढा महत्त्वाचा निर्णय एकमतानं घेतला म्हणून सगळेच खूश होतो.मी फक्त हिरमुसलो.

कारण परीक्षेच्या अभ्यासापायी मला 'बॅ.विश्राम' करायला मिळणार नव्हता !भालबा केळकर वाडियाचे,जया फर्ग्युसनचा,मी मेडिकलचा,लीला देव एस.पी.

कॉलेजच्या,ताराबाई घारपुरे तर बी.ए. होऊन बरीच वर्षं झालेल्या.तेव्हा संस्थेचं नाव ठेवलं 'इंटर कॉलेजिएट ड्रॅमॅटिक असोसिएशन !' त्या वेळी इंग्रजी नाव ठेवायची पद्धत रूढ होती.भालबांनी नेहमीप्रमाणे अगदी मन लावून,खूप मेहनत घेऊन 'उद्याचा संसार' बसवलं,आणि मुंबईला जाऊन मंडळींनी स्पर्धेत प्रयोग करून चक्कच पहिलं बक्षीस मिळवलं ! पण ते दोन संस्थांत विभागून ! म्हणजे हातात पन्नास रुपये आठ आणे.पहिल्याच प्रयत्नात पहिलं बक्षीस मिळणं म्हणजे फारच उत्साहवर्धक होतं. सगळ्यांना संस्थेविषयी एकदम आपुलकी,अभिमान वगैरे वाटायला लागला.आणि पहिल्याच फटक्याला संस्थेकडे साडेपन्नास रुपये भांडवल होतं ! मग काय ? तातडीनं पुढच्या नाटकाची तयारी सुरू झाली.एवढ्या काळात माझी परीक्षा होऊन मी एम.बी.बी.एस. झालो होतो. (पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'लमाण' या आत्मचरित्रातून)


प्रगतिपुस्तक…!


विद्यार्थ्यांचे नाव : डॉ. श्रीराम लागू


जन्म : १६ नोव्हेंबर १९२७


परीक्षेचा निकाल : चौथीत नापास


प्रगतीची वाटचाल : 'वेड्याचं घर उन्हात', 'उद्ध्वस्त धर्मशाळा',


'नटसम्राट','हिमालयाची सावली' इत्यादी नाटकांतील आणि 'सामना','सिंहासन' ह्या चित्रपटातील भूमिका गाजल्या.हिंदी सिनेमात अनेक महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. 'लमाण' हे आत्मचरित्र प्रसिद्ध,सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्वपूर्ण सहभाग.अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित…. समाप्त