१९ व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या अज्ञात भूभागाचा शोध घेणारा साहसवीर आणि २१व्या शतकात त्याच्या शोधमोहिमेचा माग काढणारी त्याची पणती.भटकी वृत्ती आणि साहसाची ओढ लुडविग लीकहार्ट आणि कॅरी विल्यमसन यांच्या रक्तातच होती.त्यांची ही झपाटून टाकणारी गोष्ट.
ऑस्ट्रेलिया या भूखंडाचं अंतरंग शोधण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यात लुडविग लीकहार्ट हे नाव अग्रणी आहे.लुडविगचा जन्म प्रशियात झाला.एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली.त्याच वातावरणामध्ये लुडविग वाढला.बर्लिन आणि गॉर्टिजेन विद्यापीठांमध्ये त्याने निसर्गशास्त्राचा अभ्यास केला.याच काळात त्याने निसर्गाचा परिचय व्हावा म्हणून इंग्लंड,फ्रान्स,स्वित्झर्लंड आणि इटलीमध्ये क्षेत्र अभ्यासासाठी भटकंती केली.त्या काळात नवनवे भूभाग बघून तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि काहीशा चमत्कारिक वाटणाऱ्या नैसर्गिक गोष्टी जगापुढे आणायच्या,असा एक पायंडाच युरोपीयन निसर्गशास्त्रज्ञां
मध्ये रूढ होत होता.याला गमतीने 'शास्त्रीय प्रवासज्वर' (सायंटिफिक ट्रॅव्हल फीवर) असं म्हटलं जात असे.
लुडविगलाही याची बाधा झाली होती.त्याच उद्देशाने तो १८४२ मध्ये ऑस्ट्रेलियात गेला.या ठिकाणी नवे शोध लावून शास्त्रीय जगतात आपलं नाव अमर करावं,असा त्याचा विचार होता.लुडविग ऑस्ट्रेलियात पोहोचला त्या वेळी वसाहतकारांनी ऑस्ट्रेलियात पाय ठेवून जेमतेम ५० वर्षं होत होती.त्या काळात ऑस्ट्रेलियाच्या केवळ वायव्य भागात गोऱ्यांच्या तुरळक वसाहती होत्या.त्या भागाचे नकाशे उपलब्ध असले तरी त्यांत बऱ्याच उणिवा होत्या.
त्या भूभागाचे बरेच बारकावे नकाशांत अजून भरलेच गेलेले नव्हते.कारण ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात जाण्याचं धाडस कुणी अजून करत नव्हतं.उत्तर ऑस्ट्रेलियाचा बराच भूभाग तसा अज्ञातच होता.अज्ञाताचा शोध घ्यायचा निश्चय केलेल्या लुडविगला ही सुवर्णसंधी वाटत होती.
त्या काळातली ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्यावरची सर्वांत मोठी वस्ती म्हणजे पोर्ट एसिंग्टन.तिथे जायचं तर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याला समांतर असा सागरी मार्ग तेवढा उपलब्ध होता.(पुढे पोर्ट एसिंग्टनच्या पश्चिमेस डार्विन नगर वसलं आणि पोर्ट एसिंग्टनचं महत्त्व कमी झालं.पूर्व आशियाशी संपर्क साधणार प्रमुख ठाणं म्हणून डार्विन नगराला 'पूर्वेकडची खिडकी' हे विशेषण लाभलं.) लुडविगने जमिनीवरून पोर्ट एसिंग्टनपर्यंतचा प्रवास करण्याचं ठरवलं.पूर्व किनाऱ्यावरच्या ब्रिस्बेनहून सुरुवात करून १५ महिन्यांनी,डिसेंबर १८४५ मध्ये तो पोर्ट एसिंग्टनला पोहोचला.(आता हाच प्रवास विमानाने ५ ते ६ तासांत आटोपतो.) असा प्रवास पार पाडणारा तो पहिला मनुष्य होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन भूसंशोधकांमध्ये त्याचं नाव अमर झालं.त्याचा हा पराक्रम खरोखरच अद्भुत मानावा लागतो.लुडविगने या मोहिमेत एकूण ४८२७ कि.मी.चं अंतर पार केलं.त्यापैकी बहुतेक भूभाग यापूर्वी कुठल्याही गोऱ्या व्यक्तीने बघितलेला नव्हता.या प्रवासात त्याने सर्वप्रथम काही नद्यांची स्थाननिश्चिती केली.त्यामुळे त्या नव्यानेच ऑस्ट्रेलियाच्या नकाशावर दिसू लागल्या.
अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या जातींचीही नोंद अशीच नव्याने करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियाविषयीच्या शास्त्रीय ज्ञानात भर पडली.(त्यांतील काही प्राणी आणि वनस्पती आता पुन्हा जगासमोर येत आहेत.)
ही मोहीम यशस्वी होण्यास लुडविग लीकहार्टचे नेतृत्वगुण कारणीभूत ठरले होते.त्याने या मोहिमेत अन्न म्हणून स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचा काही प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न केला.हे प्रयोग काही वेळा फसले,तर काही वेळा यशस्वी झाले.यशस्वी झालेल्या प्रयोगांमुळे मोहिमेत अन्न वाहून नेण्याचे परिश्रम कमी प्रमाणात करावे लागले.दुसरं म्हणजे याआधी ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात गेलेल्या बहुतेक सर्व मोहिमांना 'स्कव्हीं' या विकाराने पिडलं होतं.हा विकार 'सी' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.लुडविगच्या मोहिमेत मात्र कुणालाही हा त्रास झाला नाही. आणखी एका गोष्टीमुळे लीकहार्टच्या मोहिमेचं महत्त्व ठळकपणे समोर येतं.या मोहिमेनंतर बरोबर एक वर्षाने ऑस्ट्रेलियाचे सर्व्हेयर जनरल सर थॉमस मिचेल यांनी सर्व साधनसामग्रीनिशी अशीच एक मोहीम हाती घेतली होती;पण ही मोहीम लीकहार्टच्या मोहिमेने पार केलेल्या अंतराच्या निम्मं अंतरही पूर्ण करू शकली नाही.
लीकहार्ट या मोहिमेवरून परतला तेव्हा सिडनी शहरात त्याचं भव्य स्वागत झालं.लोकांच्या या उत्साहाचा फायदा घेऊन त्याने लगेचच पुढची मोहीम जाहीर केली.
ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरून निघून पश्चिम किनारा गाठायचा,अशी ती मोहीम होती;पण आजारपण, अशक्तपणा,वावटळी पाऊस,गांधीलमाश्या आणि वाळवंटी माश्यांच्या हल्ल्यांमुळे झालेला त्रास यांच्या एकत्रित परिणामामुळे ८०० मैलांच्या (सुमारे १३०० कि.मी.) प्रवासानंतर दक्षिण क्वीन्सलंडमध्ये पोहोचल्या
वर ही मोहीम आवरती घेतली गेली.
या मोहिमेच्या अपयशातून सावरल्यानंतर सुमारे वर्षभराने लुडविगने एक नवी मोहीम जाहीर केली.ही मोहीम ४ एप्रिल १८४८ रोजी दक्षिण क्वीन्सलंडमधील माउंट ॲबंडन्सच्या दिशेने निघाली.मात्र लुडविगसह या मोहिमेतली सर्व सात माणसं,५० बैल आणि २० खेचरं मध्येच कुठे तरी चक्क नाहीशी झाली.त्यांचे किंवा त्यांच्या सामानाचे कुठलेही अवशेष नंतर कुणालाही सापडले नाहीत.आजतागायत अनेक आधुनिक तंत्रांचा वापर करून या मोहिमेतील काही अवशेष सापडतात का याचा शोध घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.त्या मोहिमेचं नक्की काय झालं हे अजूनही एक न उलगडलेलं कोडंच आहे.
आजवर लीकहार्टसारखे अनेक भूसंशोधक असेच नव्या भूभागांचा शोध घेताना नाहीसे झाले आहेत.त्यांतल्या काहींची नावं भूसंशोधनाच्या इतिहासात अजरामर झाली असली तरी इतर अनेक वीर अज्ञातच राहिले आहेत.
कित्येकांची तर चित्रं अथवा फोटोही आज उपलब्ध नाहीत,पण त्यांच्यामुळे पृथ्वीविषयीच्या भौगोलिक ज्ञानात भर पडली हे विसरून चालणार नाही.
लुडविग लीकहार्टच्या ऑस्ट्रेलियातील मोहिमांची पुढे त्याच्या घरात कायम आठवण काढली जात असे.कॅरी विल्यमसन आणि तिचा भाऊ बेन ही लुडविगच्या भावाच्या नातीची मुलं.ती उत्तर अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांमध्ये मोठी झाली. त्यांची आईदेखील अत्यंत अभिमानाने त्यांना लुडविगच्या पराक्रमांच्या हकीगती सांगायची. ऑस्ट्रेलियाच्या रासवट भूपदेशातल्या त्याच्या मोहिमा,त्याचं गायब होणं,अशा अनेक गोष्टींबद्दल ती बोलत असे.त्या काळात कॅरी आणि बेन,दोघं आपण ऑस्ट्रेलियात जाऊन आपल्या या चुलत आजोबांचा शोध घेत आहोत, अशी स्वप्नं बघायचे.त्या काळात ऑस्ट्रेलियाबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती.त्यांना शिकवल्या गेलेल्या जगाच्या भूगोलात उत्तर अमेरिकी भूखंड आणि ध्रुवीय प्रदेश सोडले तर त्या पलीकडच्या जगाचा केवळ ओझरता उल्लेख तेवढा होता.त्यामुळे या भावंडांचं ऑस्ट्रेलियाबद्दलचं ज्ञान तसं अत्यल्पच होतं. त्यामुळे त्यांची स्वप्नं प्रत्यक्षात येणं तसं अवघडच होतं.पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
कॅरी साहसी सहलींना जाणाऱ्या व्यक्तींना सल्ला देण्याचा व्यवसाय करत असे.अशाच साहसवीरांच्या ऑस्ट्रेलियन सहलीचं व्यवस्थापन करण्यासाठी ती एप्रिल १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियात गेली.काम पूर्ण झाल्यावर ती तिथेच राहिली आणि तिने 'अंकल लुडविग 'संबंधीची माहिती गोळा करण्याचा उद्योग सुरू केला.न्यू साऊथ वेल्सच्या शासकीय ग्रंथालयात अंकल लुडविगची अनेक कागदपत्रं होती,हे त्याशोधात तिला समजलं.त्या ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनी तशी असंख्य कागदपत्रं,पुस्तकं आणि खूप मोठा पत्रव्यवहार कॅरीला दाखवला. त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे आणखी एक स्त्री आली आणि तिने कॅरीला आपलं लुडविगशी नातं असल्याचं सांगितलं.आता त्या दोघींचा संवाद सुरू झाला.त्या स्त्रीच्या नवऱ्याचे पणजोबाही लुडविगच्या भावंडांपैकी एक असल्याने कॅरी आणि ती एकमेकींच्या नात्यातल्या निघाल्या.त्या स्त्रीने कॅरीला लुडविगसंबंधी बरीच खरी आणि काही ऐकीव माहितीही दिली.त्याचबरोबर लुडविगच्या घराण्याच्या जर्मनीतल्या लीकहार्ट शाखेचीही माहिती तिने कॅरीला दिली.कॅरी अमेरिकेत व्हर्जिनियातील अलेक्झांड्रिया या आपल्या गावी परतली.या प्रवासातच तिने निश्चय केला,की आपण एक मोहीम काढायची आणि लुडविग लीकहार्टच्या मोहिमेच्या मार्गावरून प्रवास करायचा.असा प्रवास केला तर आपल्या या पणजोबांचं काय झालं हे कदाचित कळू शकेल,असं तिला वाटू लागलं.या मोहिमेबद्दल ती म्हणते- 'खरं तर हे सर्व करावं अशी कुणी माझ्यावर सक्ती केलेली नव्हती;पण ही कल्पना माझ्या डोक्यातून जात नव्हती.कदाचित हे माझ्या हातून घडावं असं नियतीच्या मनात असावं. '
या मोहिमेचा विचार पक्का झाल्यावर कॅरी एक महिन्यासाठी सिडनीमध्ये आली.सोबत तिचा भाऊ बेनही होता.तिने आता या मोहिमेची तयारी करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केलं.हे संशोधन पूर्ण झाल्यावर तिने ठरवलं,की लुडविग पणजोबांच्या १८४४-४५ सालच्या मोहिमेच्या मार्गांचं अनुकरण करायचं,कारण त्या मोहिमेमुळे लीकहार्टचं नाव गाजलं होतं.शिवाय याच मोहिमेमध्ये त्याच्या अंताची बीजंही रोवली गेली होती.
कॅरीला या मोहिमेसाठी सहा आठवडे रजा मिळाली होती.तिला स्वतःचाच पैसा वापरून ही मोहीम पूर्ण करायची होती.यामुळे या मोहिमेवर खूप मर्यादा आल्या होत्या;पण हाती असलेला वेळ आणि उपलब्ध पैसा यांचा वापर करून लुडविगने जिथे जिथे पडाव टाकला अशा जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली.त्याचबरोबर प्रत्येक पडावाच्या आजूबाजूच्या भूप्रदेशाची पाहणी करायची,असंही तिने ठरवलं.लीकहार्टच्या नोंदींचा अर्थ लावायला अशा भटकंतीचा आणि निरीक्षणांचा उपयोग होईल असं तिला वाटत होतं.या मोहिमेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाचा आकडा हळूहळू वाढत कॅरीच्या आवाक्याबाहेर चालला होता.तेव्हा तिने प्रायोजक शोधायचे ठरवले.यापूर्वी तिने कुठल्याही कारणासाठी प्रायोजकत्व मिळवायचे प्रयत्न केले नव्हते. मोठ्या आर्थिक उलाढाली करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांपर्यंत कसं पोहोचायचं याची तिला अजिबात कल्पना नव्हती.
मात्र,तिच्या काही कलाकार मित्रांनी आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी यापूर्वी कुठल्या ना कुठल्या मोठ्या कंपनीच्या प्रायोजकत्वाचा लाभ मिळवला होता.शिवाय कॅरी स्वतः आठ वर्ष अशा प्रकारच्या साहसपूर्ण सहलींचं आयोजन करत होती.त्या मित्र-मैत्रिणींच्या सूचनांचा आणि आपल्या सहलींच्या आयोजन अनुभवाचा फायदा तिला झाला.तिची चिकाटी कामाला आली.ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक परिसरामध्ये सहली काढणारी सर्वात मोठी सहल आयोजक कंपनी 'न्यूमन्स पॅसिफिक'ने तिच्या साहसी सफरीचा सर्व खर्च आणि संयोजन यांचा भार उचलला.नोटबुक कॉम्प्युटर्स या कंपनीने तिला एक लॅपटॉप दिला,तर स्टेशन ट्रेल्व्ह या नभोवाणीने तिला 'उपग्रही भ्रमणध्वनी' पुरवला. यामुळे कॅरी आणि बेन सातत्याने जगाच्या संपर्कात राहू शकत होतेच,पण ते जे काही पाहत होते त्या सर्व गोष्टींच्या अंकीय प्रतिमाही जगाला दिसणार होत्या.
कॅरीला डार्विनस्थित रिक मरे नावाच्या माहितगार व्यक्तीची ओळख करून घेण्यास सांगण्यात आलं.हा रिक मरे प्रवाशांच्या छोट्या गटांना ऑस्ट्रेलियातील वाळवंटाचं आणि इतर दुर्गम प्रदेशांचं दर्शन घडवून आणण्याचा व्यवसाय करत होता.कॅरीची भेट झाल्यावर तिचं म्हणणं त्याने ऐकून घेतलं,तिच्या गरजा लक्षात घेतल्या आणि मोहिमेच्या नियोजनाची चर्चा करून त्याने आखणीची सुरुवात केली.सर्वप्रथम त्याने टेड टोबिन या तज्ज्ञ मार्गदर्शकाला या मोहिमेत सामील करून घेतलं.त्यानंतर टिम डॅनिएल या माजी सैनिकी अधिकाऱ्याला क्वीन्सलंडमधील प्रवासाचं नेतृत्व करायची विनंती केली.
टिम डॅनिएल हा ऑस्ट्रेलियाच्या 'आऊट बॅक' म्हणजे निर्जन प्रदेशात जगायचं कसं याबाबतचा तज्ज्ञ होता.
टोबिन आणि डॅनिएल हे ऑस्ट्रेलियातील वाळवंटी सहलींचे अग्रणी मार्गदर्शक मानले जातात.
कॅरीप्रमाणेच लुडविग लीकहार्टनेही खासगी प्रायोजकत्व मिळवलं होतं.त्याने आधी ऑस्ट्रेलियाचे सर्व्हेयर जनरल सर थॉमस मिचेल यांच्याकडे मदतीसाठी पत्रव्यवहार केलेला होता; पण ऑस्ट्रेलियाच्या अज्ञात भागाचं सर्वेक्षण खासगी मोहिमेने करावं,हे सर मिचेल यांना मान्य झालं नव्हतं.लुडविगला आर्थिक मदत पुरवणाऱ्यांच्यात प्रामुख्याने त्या प्रदेशातले 'रांचर्स' होते.लीकहार्टला नवी कुरणं सापडली तर आपल्या पशुधनात वाढ होईल आणि आपल्या गुरे चराईच्या व्यवसायाचा विस्तार करणं शक्य होईल असं त्यांना वाटत होतं.
कॅरी,बेन, टेड आणि टिम यांच्या 'लीकहार्ट शोध मोहिमे'ची सुरुवात ४ सप्टेंबर २००० या दिवशी सुरू झाली.
लीकहार्टप्रमाणेच त्यांनी क्वीन्सलंडच्या दक्षिण भागातील डार्लिंग डाऊन या भागातून सुरुवात केली.लीकहार्टच्या काळात या भागात झुडपंच झुडपं होती. त्यांच्या गचपणातून मार्ग काढत त्याचा प्रवास सुरु झाला होता. मधल्या काळात ही झुडपं नाहीशी होऊन त्या जागी गुरे चराई करणाऱ्यांच्या आणि तत्संबंधित व्यावसायिकांच्या छोट्टा छोट्या वस्त्या उभ्या राहिल्या होत्या.
'इथे कॅरीला आश्चर्याचा धक्का बसेल अशी एक घटना घडली.या भागात अनेक छोटे-मोठे 'लीकहार्ट ग्रुप' कार्यरत आहेत.त्यांनी लीकहार्टच्या कहाण्या आणि स्मृती जपून ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.कॅरीची मोहीम आणि तिचं लीकहार्टशी असलेलं नातं याबद्दल समजताच त्यांनी तिचं स्वागत केलं; इतकंच नव्हे,तर तिला हवी ती मदत देण्याचंही कबूल केलं.ज्यांच्या रांचमध्ये लीकहार्टच्या पडावाच्या जागा होत्या ती ती ठिकाणं त्या लोकांनी कॅरीला दाखवली,तिचा यथायोग्य पाहुणचारही केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून कॅरीला आपल्या पणजोबांसंबंधी बरीच माहिती मिळाली. ही अशी पिढ्यान् पिढ्या जपून ठेवलेल्या आख्यायिकांमधून मिळणारी माहिती कुठल्याही पुस्तकामधून मिळत नसते.
अशाच एका मुक्कामात कॅरीला जॉन गिल्बर्टची कबर बघायला मिळाली.हा जॉन गिल्बर्ट लुडविग लीकहार्टच्या मोहिमांमधील निसर्गशास्त्रज्ञ होता.कॅरी त्या कबरीचं दर्शन घेत असताना आकाशात एक घार घिरट्या घालत होती. कॅरीने गिल्बर्टची नोंदवही वाचलेली होती.त्यात एका नोंदीत 'इथे घारी फारच त्रास देतात.उघड्यावर खाणं घारींनी अशक्य करून सोडलं आहे.त्या कुठली वस्तू पळवतील याचा नेम नाही,'अशी नोंद केलेली आहे,त्याची या वेळी कॅरीला आठवण झाली.
गिल्बर्ट आदिवासींच्या भाल्यांना बळी पडला होता.
त्यामुळे लीकहार्टच्या मोहिमा आणि त्याचं नेतृत्व यांच्यावर प्रश्नचिन्ह लागलं होतं. लीकहार्टची मोहीम यशस्वी झाली खरी,पण ती बऱ्याच अडथळ्यांमधून पार पडली होती. मोहिमेत सुरुवातीला दहा सदस्य सामील झाले होते.त्यांतले दोघं लवकरच मोहीम सोडून निघून गेले.गिल्बर्टचं निधन झालं.त्याच हल्ल्यामध्ये आणखी दोघं गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान,मोहीम अर्ध्यावर असतानाच त्यांनी बरोबर घेतलेलं अन्न संपलं.
पोर्ट एसिंग्टनपर्यंतच्या प्रवासाला किती वेळ लागेल याबद्दलचा लीकहार्टचा अंदाज साफ चुकला. याला अनेक कारणं असली,तरी इथला अवघड भूभाग पार करण्यात असलेल्या अडचणी हे त्यांतलं प्रमुख कारण होतं.एकदा एक नदी ओलांडताना अचानक आलेल्या पुरामुळे मोहिमेतले बरेच घोडे वाहून गेले होते;बरीच शिधासामग्रीही वाहून गेली होती.अलीकडच्या बऱ्याच इतिहासकारांनी ही कारणं विचारात न घेता लीकहार्टला 'आगाऊ, गर्विष्ठ आणि चुका न सुधारणारा' ठरवलं आहे. लीकहार्ट आपल्या सहकाऱ्यांच्या जिवावर मोठा बनला,
असंही म्हणण्यात आलं आहे.( हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन )
लुडविग लीकहार्टच्या विरोधात लोकमत का गेलं असावं,या प्रश्नाचा कॅरीने खोलात शिरून अभ्यास केला त्या वेळी एक वेगळीच वस्तुस्थिती समोर आली.
ऑस्ट्रेलियात त्या वेळी इंग्रजी बोलणाऱ्यांचं वर्चस्व होतं.लुडविग जर्मन होता. त्याचं इंग्रजीवर म्हणावं तितकं प्रभुत्व नव्हतं. यामुळे त्याच्या मोहिमेतील इतर सदस्यांशी त्याचा भाषिक मेळ बसू शकत नव्हता. त्यात तो उच्चशिक्षित होता;तर त्याच्या मोहिमेत एक कैदी, एक पंधरा वर्षांचा मुलगा आणि एक अशिक्षित मेंढपाळ होता.
त्यांच्याशी संवाद साधणं लीकहार्टला अवघड गेलं.तो अतिशय शिस्तप्रियही होता.त्यामुळेही त्याचे इतर सदस्यांशी खटके उडाले असावेत.पण याची उणीव त्याने आपल्या नोंदी आणि रोजनिशी लेखनातून भरून काढलेली दिसते.ज्यांनी ज्यांनी त्या लेखनाचा अभ्यास केला त्यांना त्या काळात लीकहार्टने जे मिळवलं,ज्या अवघड परिस्थितीला त्याने तोंड दिलं त्याचं कौतुकच वाटतं.कॅरी विल्यमसनने या प्रवासानंतर तिच्या शोध
मोहिमेवर एक पुस्तक लिहिलं असून,आता ती तिच्या चुलत पणजोबांच्या मोहिमेवर माहितीपट करते आहे.
लीकहार्टच्या अखेरच्या मोहिमेवर त्यातून प्रकाश टाकता येईल असं तिला वाटतं.लीकहार्टच्या प्रवासाच्या खुणा जतन करून ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांना ऑस्ट्रेलियातील चाहतेही मदत करत आहेत हे विशेष...