नवनव्या प्रसंगांना सामोरं जात असताना गेलनला अनेक गोष्टी शिकायला मिळत.ते सगळे उपचार करताना तो शारीरिक आणि मानसिक विकारांवर उपचारपद्धती विकसित करत असे. त्यासाठी तो विविध प्रकारच्या वनस्पती आणि खनिजं यांच्यापासून औषधं बनवून पाही. त्यामधून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे तो आपल्या उपचारपद्धती आणखी सुधारणा करे. त्यानं औषधं तयार करणं आणि ती रुग्णांना घेण्याविषयीच्या सूचना देणं (म्हणजेच फार्मसी) याविषयी अनेक पुस्तकं लिहिली!ग्रीकांना एकूणच विज्ञानाची आवड होती.आपण ज्या जगात राहतो त्या जगाविषयी सगळं समजून घेण्यासाठी आधी आपल्या परिसराची शास्त्रीय दृष्टिकोनातून ओळख करून घेतली पाहिजे असं त्यांना वाटे.याच धर्तीवर गेलनला वैद्यकशास्त्र हे विज्ञान मानलं जावं असं वाटे. त्यादृष्टीनं त्याची प्रचंड धडपड सुरू असे.प्रयोगांमधून मिळणारी माहिती आणि त्याला दिलेली आपल्या स्वतःच्या निरीक्षणांची जोड या दोन गोष्टींची सांगड घालून आपला हेतू साध्य होईल अशी त्याला खात्री वाटे.तसंच अंधश्रद्धा आणि खरं ज्ञान यांच्यातला धूसर फरक एकदम स्पष्ट करून त्या पूर्णपणे वेगळ्या झाल्या पाहिजेत यासाठी तो प्रयत्नशील असे.त्यानं यासाठी आपल्या हयातीत ३०० च्या वर पुस्तकं आणि लेख लिहिले.
दुसऱ्या शतकात,चार रोमन राज्यांच्या दरबारी वैद्य म्हणून सेवा करताना जखमांवर उपचार करण्यासाठी गेलन अनेक प्रकारची हत्यारं वापरे त्यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या सुऱ्या होत्या.त्यातली एक सुरी माणसाच्या शरीरातून रक्त वाहून जाण्यासाठी वापरली जाई.त्यामुळे माणसाच्या शरीरात साठून राहिलेलं विष निघून जातं असा समज होता.गळू फोडून त्यातून पू वाहून जाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.गरम करून शरीरावर झालेल्या जखमेतल्या किंवा इतर कारणांमुळे झालेल्या संसर्गाला हलकेच जाळून टाकण्यासाठी आणखी एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.शरीरातल्या हाडात अडकलेला शस्त्राचा भाग काढून टाकण्यासाठी अजूनच एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.वाकडं झालेलं हाड सरळ करण्यासाठी चौकोनी पात्याची स्टीलपासून बनलेली एक बोथट सुरी होती.त्या काळातली ही प्रगत हत्यारं पाहिली की फारच आश्चर्य वाटतं.
आपला चार वर्षांचा करार १६१ साली संपल्यावर वयाच्या ३१ व्या वर्षी गेलननं दुसरं काहीतरी करायचं असं ठरवलं.कारण आता त्याच्या कामात तोचतोचपणा यायला सुरुवात झाली होती.पुन्हा जन्मगावी परतण्याऐवजी त्यानं आता इटलीचा प्रवास करून रोममध्ये जायचं ठरवलं.
प्रत्यक्षात त्याला रोमला पोहोचायला एक वर्षांहून जास्त वेळ लागला.तिथे पोहोचताच त्यानं युडेमस नावाच्या त्याच्या वडिलांच्या मित्राची भेट घेतली.पण ते आजारी असल्यानं त्यांनी गेलनला त्यांच्या दुसऱ्या मित्रांना भेटायला जायचा सल्ला दिला.गंमत म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात रोमन लोकांना डॉक्टर म्हणजे अगदी कुचकामी लोक वाटायचे.घरात कुणी आजारी पडलं तर त्याला कुटुंबातल्याच कुणीतरी औषधी वनस्पती आणि जादूटोणा यांच्यासारखे उपचार करून बरं करावं अशी त्यांची इच्छा असे.त्यामुळे ग्रीसमधून पकडून आणलेले गुलाम हेच फक्त डॉक्टर्स बनायची नामुष्की पत्करायचे.त्यांना क्वॅक्स (म्हणजे एकदम फालतू) असं म्हटलं जाई. म्हणूनच हे नाव तोतया किंवा जुजबी डॉक्टर्ससाठी अजूनही वापरतात!
या पार्श्वभूमीवर इतक्या सगळ्या डॉक्टर्सच्या गर्दीत आपला निभाव कसा लागणार अशी भीती गेलनला वाटत होती.पण त्याची एक मजाच आहे.आधी उल्लेख केलेले युडेमस हे त्याच्या वडिलांचे मित्र आजारी असताना रोममधल्या डॉक्टर्सनी त्यांच्यावर केलेले उपचार कुचकामी ठरत होते.त्यामुळे त्यांनी बघूयात तरी म्हणून गेलनला त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं.
गेलननं त्यांच्या आजाराचा नीट अभ्यास करून त्याच्यावर उपाय सुचवला.तो मात्र त्यांना एकदम लागू पडला आणि त्यांची तब्येत बऱ्यापैकी सुधारली.ही बातमी रोममधल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचताच त्यांची गेलनकडे रांग लागली.रोममधल्या एका सरकारी दूतावासात काम करणाऱ्या फ्लॅवियस बोईथियस नावाच्या अधिकाऱ्याच्या बायकोला गेलननं याच धर्तीवर बरं करताच खूश होऊन त्यानं गेलनला ४०० सुवर्णमुद्रांचं बक्षीस तर दिलंच,पण त्याचबरोबर आपल्या उपचारपद्धतींविषयी गेलननं व्याख्यानं द्यावीत अशी त्याला विनंती केली. गेलननं ती मान्य करताच बोईथियसनं त्याच्यासाठीची सगळी व्यवस्था केली.तसंच प्राण्यांच्या शरीरविच्छेदनाचं प्रात्यक्षिक सगळ्यांना बघायला मिळावं यासाठी त्यानं एक मोठं टेबल आणि सगळ्या अवजारांची सोयही केली.गेलनची व्याख्यानं आणि त्याची शरीरविच्छेदनाची प्रात्यक्षिकं या दोन्ही गोष्टी लवकरच रोममधल्या सुशिक्षित लोकांमध्ये करमणुकी
बरोबरच ज्ञान देणाऱ्या ठरल्या आणि 'टॉक ऑफ दी टाऊन' झाल्या.
एकदा त्यानं सगळ्या सजीवांच्या बोलण्याचा उगम हा हृदयातून नव्हे तर मेंदूतून होत असतो, हे सिद्ध करायचं ठरवलं.त्यासाठी त्यानं एका जिवंत डुकराला आपल्या शरीरविच्छेदनाच्या टेबलावर त्याचे पाय वर करून बांधून टाकलं. लगेच ते डुकर जिवाच्या आकांतानं ओरडायला लागलं.मग एका दोरीच्या साहाय्यानं गेलननं त्याच्या घशातून तोंडाकडे आवाज नेणाऱ्या वाहिन्यासुद्धा एका दोरीनं हलकेच बांधताच डुकराचा आक्रोश बंद झाला आणि ती दोरी सोडताच तो पुन्हा सुरू झाला.अशा तऱ्हेनं गेलन आता अनेक गोष्टी सप्रयोग सिद्ध करून दाखवू लागला! त्या काळातला दुसरा एक समज म्हणजे सजीवांच्या शरीरातलं रक्त एकीकडून दुसरीकडे नेण्याचं काम फक्त एकाच प्रकारच्या रक्तवाहिन्या (नीला / शिरा) च करतात,असा होता.तसंच प्राणी जिवंत राहण्यासाठी हृदयाकडून सगळ्या अवयवांकडे व्हायटल स्पिरीट नावाचा पदार्थ रोहिण्या (धमन्या) या दुसऱ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या सतत नेण्याचं काम करतात,असं लोक मानत.पण गेलनचं म्हणणं होतं, की नीला आणि रोहिण्या या दोन्ही प्रकारच्या रक्तवाहिन्या रक्त नेण्याचं काम करतात. फक्त नीला शरीरातल्या अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे नेतात आणि रोहिण्या शुद्ध रक्त हृदयाकडून इतर सगळ्या अवयवांकडे नेतात,एवढाच काय तो फरक असतो. हे सिद्ध करण्यासाठी त्यानं एका प्राण्याला त्याच्या आपल्या शरीरविच्छेदनाच्या टेबलावर बांधून ठेवलं.मग त्याच्या रोहिणीला त्यानं मध्ये थोडं अंतर सोडून दोरीनं गच्च बांधून टाकलं.त्यामुळे तिच्यामधून शरीरात प्रवास करणारं रक्त एखाद्या पाण्याच्या कालव्यात दगडाचा बांध घातल्यावर जसं पाणी अडून बसतं तसं पुढे जाणं बंद झालं. मग ज्या दोन ठिकाणी त्यानं त्या प्राण्याच्या शरीरातल्या रोहिणीला गच्च बांधलेलं होतं, त्यांच्यामध्येच त्यानं सुरीनं ती रोहिणी कापून टाकली.
लगेच तिथून आधी साठलेलं रक्त भळाभळा वाहू लागलं.
म्हणजेच रोहिणीमधून रक्त जातं हा त्याचा दावा खरा होता.याच धर्तीवर त्यानं आपल्या पाठीच्या मणक्या
विषयीसुद्धा एक महत्त्वाचं प्रात्यक्षिक दाखवलं.त्यातून सिद्ध झालं की आपल्या पाठीच्या मणक्याला जर जोरदार इजा झाली तर जिथे इजा झाली असेल त्याच्या खालचा भाग लुळा पडतो,पण जर ही इजा चौथ्या किंवा त्याच्या वरच्या मणक्यावर झाली तर मात्र आपण लगेच मरतो.
अर्थात,या प्रात्यक्षिकासाठी त्याला माणसाच्या ऐवजी कोणता तरी प्राणी वापरणं भाग होतं.कुत्र्यांच्या मूत्रपिंडाचं आणि मूत्राशयाचं प्रात्यक्षिकही त्यानं दाखवलं आणि त्याचं कार्य समजावून सांगितलं. पण त्याच धर्तीवर माणसाच्या मूत्रपिंडाचं आणि मूत्राशयाचं काम चालतं हा त्याचा दावा साफ खोटा ठरला होता.!
गेलनच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी व्हायची.त्याची बोलायची शैली आणि ओघवती भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी असे.त्यामुळे क्लिष्ट विषय आणि मुद्देही तो लोकांना कंटाळा येऊ न देता समजावून सांगू शके.आपले मुद्दे तो अतिशय आत्मविश्वासानं मांडायचा.हे करत असताना तो इतर डॉक्टरांची त्यांच्या हावरटपणामुळे किंवा अज्ञानामुळे झालेल्या हास्यास्पद वृत्तीची खिल्ली उडवायचा.अनेकदा तो त्यांची नक्कल करायलाही कचरत नसे! अनेक डॉक्टर्स त्यांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या श्रीमंतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहेत असं तो जाहीरपणे म्हणे.साहजिकच अनेक डॉक्टर्स त्याच्याविरुद्ध भडकायचे.अनेकदा गेलन आणि त्यांच्यामध्ये जाहीरपणे वादावादी व्हायची. त्यातून गेलनचं नवनव्या माणसांशी शत्रुत्वही वाढायचं.कधीकधी गेलन आपल्या वक्तव्यांविषयी सरळ माफी मागून मोकळा व्हायचा आणि म्हणायचा,'मला माफ करा... मी असं पुन्हा कधी करणार नाही' आणि अर्थातच तो लगेच पुन्हा तसं करायचा! हे सगळं करत असतानाच तो पुस्तकं,लेख आणि डॉक्टरांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकाही लिहायचा. मुख्य म्हणजे अनेक रुग्णांवर उपचार करणं हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिल काम सुरूच होतं.त्या काळच्या रोमच्या सम्राटाच्या दरबारातला तो सगळ्यात मोठा डॉक्टर बनला. तसंच त्याची इतर रोग्यांना तपासायची फी जास्त असे.साधं पत्रानं कुणाला वैद्यकीय सल्ला द्यायचा तरीही तो त्यासाठी फी आकारे.अतिशय बाळबोध उपचारपद्धती आणि रोगनिदान यंत्रणा असूनही गेलन कावीळ,जुलाब,कुष्ठरोग अशा अनेक रोगांचं निदान नुसत्या निरीक्षणातून करू शके.तसंच काही जणांना काहीही झालेलं नसताना आपण आजारी आहोत असं उगीचच वाटे.(आजही असे खूप जण असतात!) त्यांना तो उगीच कसल्या तरी निर्धोक औषधांचा उपचार सुचवे.
त्यामुळे आपण कसलं तरी औषध घेऊन बरं होतोय असं खरं तर बरंच असलेल्या माणसाला वाटे आजही हे सुरूच असतं,फक्त त्याला तांत्रिक भाषेत 'प्लासेबो उपचारपद्धती' म्हणतात,इतकाच काय तो फरक !
काही काळानं गेलननं अचानकच रोम सोडायचं ठरवलं.त्याचं कारण त्यानं इतर डॉक्टरांचा कोता स्वभाव आणि त्यांच्याशी सतत होणारी भांडणं असं दिलेलं असलं तरी ते खरं नसावं.रोमची सत्ता मार्क्स ऑरेलियस आणि ल्युशियस व्हेरस यांच्या हाती आल्यापासून रोम सतत युद्धात गुंतलेलं होतं.या युद्धातून परतणाऱ्या सैनिकांनी त्यांच्याबरोबर प्लेगची साथ आणली. डॉक्टर असूनही गेलनला प्लेगची भयंकर भीती वाटे कुठल्याच डॉक्टरला त्या काळी हा रोग कुठून येतो आणि कशामुळे होतो हेच माहीत नसल्यामुळे तो बरा कसा करायचा हा प्रश्नच पडत नव्हता.या प्लेगनं एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश जनतेला संपवून टाकलं! बहुतेक यामुळेच तातडीनं गेलननं त्याचं सगळं सामानसुमान विकून टाकलं आणि तो आपला गाशा गुंडाळून पेरॉममला परत गेला.तिथे तो इसवी सन १६८ सालापर्यंत होता.मग रोममध्ये युद्ध सुरू होतं,त्यामुळे रोमच्या राजानं गेलनला पुन्हा वैद्यकीय सेवेवर यायचं आमंत्रण दिलं.तिथे थोडे दिवस काम केल्यावर त्याला त्याचा कंटाळा आला.मग त्यानं मार्क्स ऑरेलियस या राजाला आपल्याला पर्गेमॉनला परतू द्यायची विनंती केली.तिथे राजाच्या कॉमोडस नावाच्या मुलाची काळजी घ्यायचं काम करायचं त्यानं कबूल केलं. पण ते जरा अवघडच होतं.कारण कॉमोडस जरा वेडसरच होता.गेलन रोमला परतल्यावर इकडे युद्धात रोमचे दोन्ही राजे दगावले.त्यांच्या पश्चात कॉमोडस राजा बनला.त्याची काम करायची पद्धत भयानक असल्यामुळे तो अतिशय वाईट राज्यकर्ता होता.पण तरीही गेलन त्याची मनोभावे सेवा करत होता.१९२ साली कॉमोडसची एका कटात हत्या झाली,आणि त्याची जागा सेप्टिमस सेव्हेरस नावाच्या नव्या राजानं घेतली.आता गेलन त्याचा राजवैद्य बनला.
त्याच वर्षी रोममधल्या शांती मंदिराला आग लागली आणि त्यात गेलननं तिथे ठेवलेली अनेक हस्तलिखितं आणि टिपणं नष्ट झाली. आपल्या आयुष्याची शेवटची दोन दशकं गॅलेननं रोममध्येच काढली.तिथे त्यानं बहुतेक सगळा वेळ लिखाणात घालवला.त्याच्या काही पुस्तकांची नावं तरी बघा : 'बोन्स फॉर बिगिनर्स', 'ऑन द युजफूलनेस ऑफ पार्ट्स ऑफ द बॉडी.' एकदा तर म्हणे गेलन एका वेळी बाराजणांना त्याच्या १२ वेगवेगळ्या पुस्तकांचा मजकूर डिक्टेट करत होता आणि ते १२ जण त्याची १२ पुस्तकं एकाच वेळी लिहीत होते! एकूण वैद्यकशास्त्रात गेलनचं नाव अजरामर झालं हे निश्चित !
१३.०९.२०२३ या लेखातील भाग २ रा समाप्त..