सन १९१२ मध्ये 'टायटॅनिक' अटलांटिक महासागराच्या तळाशी गेली.तिचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी 'टायटॅन' ही सबमर्सिबलही अंत:स्फोट होऊन या वर्षी टायटॅनिकच्या जवळच बुडाली.या दुर्घटनेची माहिती आणि कारणमीमांसा देणारा हा लेख..
टायटॅनिक : मित्रहो,आपल्या सगळ्यांना टायटॅनिक सिनेमा अगदी सुपरिचित आहे.जेम्स कॅमेरुन या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला आणि लिओनाडों डी काप्रियो आणि केट विन्स्लेट या जोडीचा अभिनय असलेल्या या १९९० सालातील चित्रपटाने अख्ख्या जगातल्या तरुणाईला वेड लावले होते.यात कहाणी होती ती टायटॅनिक या,त्या काळातल्या सर्वांत मोठ्या आणि जी कधीही बुडू शकणार नाही असा दावा केला जाणाऱ्या प्रवासी आगबोटीची..
टायटॅनिकचे जलावतरण उत्तर आयर्लंडमधील साउथहँप्टन इथे दि.३१ मे,१९१९ रोजी झाले. दि.१० एप्रिल,१९१२ रोजी तिने अमेरिकेतील न्यूयॉर्कला जाण्यासाठी तिच्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली.या राजेशाही बोटीवर २,२४० प्रवासी आणि कर्मचारी होते.
दुर्दैवाने एका हिमनगावर आपटून ही "कधीही न बुडू शकणारी बोट तिच्या पहिल्याच प्रवासात दि.१५ एप्रिल,
१९१२ रोजी अटलांटिक महासागराच्या तळाशी गेली.या दुर्घटनेत १५०० व्यक्तींना जलसमाधी मिळाली.
बुडाल्यानंतर टायटॅनिक कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या किनाऱ्यापासून सुमारे साडेतीनशे किलोमीटर दूर आणि समुद्रजलपातळीच्या खाली सुमारे सुमारे ३,८०० मीटर (१२,५०० फुटांवर) अटलांटिक महासागरात विसावली आहे.हिच्या या स्थानाचा शोध एका फ्रेंच-अमेरिकन मोहिमेने दि.१ सप्टेंबर,१९८५ रोजी लावला.
ओशनगेट : ओशनगेट एक्स्पीडीशन्स ही अमेरिकन व्यापारी कंपनी २००९मध्ये स्थापन झाली.या कंपनीचा धंदा होता विविध संस्था आणि कंपन्या यांना खोल पाण्यात किंवा समुद्रतळाशी संशोधन करण्यास आवश्यक असलेल्या 'सबमर्सिबल' पुरवण्याचा.सबमर्सिबलला मराठीत 'निमज्जनीय' असा शब्द आहे;पण तो अवघड वाटत असल्यास आपण सबमर्सिबल हाच शब्द वापरू
या.
सबमर्सिबल : सबमर्सिबल म्हणजे एक प्रकारची पाणबुडी.पाणबुडी आणि सबमर्सिबल यांच्यात थोडा फरक आहे.पाणबुडी ही शक्ती, पल्ला आणि तिची कामे या बाबतीत स्वयंपूर्ण असते.स्वतःच्या शक्तीच्या बळावर बंदरातून निघणे,हवे ते अंतर कापून पाण्याच्या खाली ठरावीक खोलीवर जाणे,पाण्याखाली किंवा वर हवी ती कार्य करणे आणि परत पाण्यावर येऊन बंदरात दाखल होणे या सर्व क्रिया ती करू शकते.पण सबमर्सिबल हे एव्हढे सगळे करू शकत नाही.तिची शक्ती आणि पल्ला मर्यादित असतो.जिथे पाण्याच्या खाली जाऊन शोध घ्यायचा, तेथपर्यंत सबमर्सिकलला एक जहाज घेऊन जाते.या जहाजाला 'मातृनौका' (मदरशिप) म्हटले जाते.
त्यानंतर सबमर्सिबल पाण्याखाली सोडली जाते.
पाण्याच्या खाली असलेल्या सबमर्सिबलचा तिच्या भातृनीकेशी संपर्क असतो आणि काही मदत लागल्यास ती तसे मातृनौकेला कळवते.काम झाल्यानंतर ही मातृनौका सबमर्सिबला घेऊन परत बंदरात येते. सबमर्सिबल मनुष्याद्वारे संचालित असू शकते किंवा स्वयंसंचालित असू शकते.
टायटॅनिक पर्यटन : ओशनगेटकडे अशा तीन सबमर्सिबल होत्या.अँटिपोडस,सायक्लॉप्स - १ आणि सायक्लॉप्स- २.सायक्लॉप्स-२ चे नंतर नामकरण करून 'टायटॅन' ठेवण्यात आले. संशोधकांना घेऊन या सबमर्सिबल समुद्रतळाशी संशोधनासाठी जायच्या.
अर्थात,त्यासाठी पैसे मोजायला लागायचे.सन २०१० पासून ओशनगेटने या सबमर्सिबल पर्यटनासाठी वापरायला सुरुवात केली.सबमर्सिबलमधून प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालून विविध बेटांची आणि किनाऱ्यांची सफर घडवून आणली जात असे.असेच एक पर्यटनस्थळ म्हणून ओशनगेटने पाण्यात बुडालेल्या टायटॅनिकची निवड केली. या सफरीसाठी २०१८ मध्ये बांधल्या गेलेल्या टायटॅन सबमर्सिबलची निवड करण्यात आली. सन २०२१ आणि २०२२मध्ये या सहली पैसे देऊन येणाऱ्या 'संशोधकासाठी आयोजित करण्यात आल्या.ही सहल खूप महाग आणि फक्त अब्जाधीशांनाच परवडेल अशी होती.असे म्हटले जाते,की या सहलीमध्ये संशोधक म्हणून जाण्यासाठी माणशी अडीच लाख डॉलर म्हणजे माणशी सुमारे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये भरावे लागत होते.
टायटॅनची शेवटची सहल : शुक्रवार,दि.१६ जून २०२३ रोजी कॅनडामधील न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्स बंदरातून पोलर प्रिन्स ही मातृनौका टायटॅन सबमर्सिबल आणि पाच प्रवासी बरोबर घेऊन टायटॅनिक सहलीसाठी बाहेर पडते. रविवार, दि. १८ जून रोजी पोटात पाच प्रवासी
घेऊन टायटॅन सबमर्सिबल पाण्यात बुडी मारते आणि तिचा टायटॅनिकच्या अवशेषांच्या दिशेने प्रवास सुरू होतो.प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे एक तास पंचेचाळीस मिनिटांनी टायटॅनचा मातृनौकेशी संपर्क खंडित होतो.
सुमारे सहा तासांच्या अवधीनंतर टायटॅन पुन्हा पाण्यावर येणे अपेक्षित होते;पण तसे काही होत नाही. त्यानंतर सुमारे दोन तासांनी कॅनडाच्या तटरक्षक दलाकडे टायटॅन सबमर्सिबल अजून न आल्याचा संदेश येतो आणि तिच्यात फक्त ९६ तास पुरेल एव्हढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे सांगण्यात येते.त्यानंतर सुरू होते ती एक आपातकालीन शोधमोहीम.कॅनडाच्या तटरक्षक
दलाबरोबरच अमेरिकेचे नौदल आणि हवाईदल, कॅनडाचे नौदल आणि हवाईदल,अमेरिकेचे तटरक्षकदल आणि फ्रान्स हे सर्व या आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत सहभागी होतात.या शोधात दूर संचालित सबमर्सिबल,पाणबुड्या शोधून काढणारी विमाने,अशी अनेक अत्याधुनिक साधने वापरात येतात.सुमारे चार दिवसांच्या शोधानंतर अमेरिकेचे तटरक्षकदल जाहीर करते, की टायटॅन सबमर्सिबल अंतःस्फोटामुळे नाश पावली आहे आणि त्यांच्या दूरसंचालित सबमर्सिबलला टायटॅनच्या शेपटाचा भाग आणि इतर काही अवशेष सापडले आहेत.
आजच्या घडीला एकशे अकरा वर्षापूर्वीची टायटॅनिक आणि आजची टायटॅन यांचे अवशेष एकमेकांपासून सुमारे ४९० मीटर (सुमारे १,६०० फूट अंतरावर समुद्रतळाशी विसावलेले आहेत आणि टायटॅनमधील पाचही जण,म्हणजे संशोधक प्रवासी,त्यांचा मार्गदर्शक आणि चालक हे मृत्युमुखी पडले आहेत.
अंत:स्फोटाची मीमांसा : टायटॅनचा अंत:स्फोट झाला असे म्हटले जाते.स्फोट आणि अंतःस्फोट या दोन्ही क्रिया क्षणार्धात घडतात.यातील फरक दाखवणारे एक सुलभ चित्र सोबत दिलेले आहे.( हे मुळ चित्र व इतर या विषयाची चित्रे आपणास प्रत्यक्ष शशिकांत धारणे,विज्ञान प्रसारक,यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञान परिषद पत्रिका - सप्टेंबर २०२३ या मासिकामध्ये बघायला मिळतील. ) स्फोटामध्ये ऊर्जा,दाब,उष्णता इत्यादींचे संक्रमण आतून बाहेर होते. स्फोट हा एखाद्या आवरणाच्या आत निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा,ते आवरण सामावून न ठेवू शकल्याने होतो;परंतु अंत:स्फोट हा बाहेरील दाबाला आवरण न टिकल्याने होतो. स्फोटात प्रसरण होते,तर अंत:स्फोटात आकुंचन होते.
पाणबुडी किंवा सबमर्सिबल या पाण्याच्या आत बुडी मारून प्रवास करीत असल्यामुळे त्यांना आणि त्यातील प्रवासी आणि उपकरणे यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे योग्य प्रकारे संकल्पन,आरेखन आणि संरचना करावी लागते. जसजशी सबमर्सिबल पाण्यात खोल खोल जाऊ लागते,तसतसा त्यावरील सर्व बाजूनी पडणारा पाण्याचा दाब वाढत जातो.साधारण ठोकताळ्यानुसार (थंब रूल),सामान्य तापमानाला दर दहा मीटर खोलीला पाण्याचा दाब (प्रेशर) १ बार (सामान्य वातावरण दाब) एव्हढा वाढत जातो.परंतु जसजसे आपण समुद्रात खोल खोल जाऊ तसतसे पाण्याचे तापमान कमी होत जाते,
घनता वाढत जाते आणि त्यानुसार पाण्याचा दाबही वाढत जातो. आपल्या या लेखाच्या संदर्भात बोलायचे झाले, तर जिथे टायटॅनिक विसावली आहे.त्या खोलीवर पाण्याचा दाब वातावरणाच्या सुमारे चारशे पट म्हणजे सुमारे ४०० बार एव्हढा असतो आणि तेथील तापमान सुमारे दोन अंश सेल्सिअस एव्हढे असते.
या खोलीवर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबमर्सिबलचे या तापमानाला आणि दाबाला टिकाव धरू शकेल अशा रितीने संकल्पन आरेखन आणि संरचना आवश्यक असते. सबमर्सिबल बनविण्यासाठी योग्य असे पदार्थ वापरणे आवश्यक असते.म्हणूनच,सबमर्सिबल किंवा पाणबुडीसाठी उच्च सामर्थ्याचे (हाय स्ट्रेंग्थ) पोलाद किंवा टायटॅनिअम किंवा अल्युमिनिअम वापरले जाते.
पाणबुडी ज्या खोलीपर्यंत जाणे अपेक्षित आहे,त्या खोलीवरच्या दाबाचा विचार करून पाणबुडीचा किंवा सबमर्सिबलचा सांगाडा आणि तिच्या दंडगोलाकृती भिंतीच्या पोलादाच्या किंवा टायटॅनिअमच्या किंवा अल्युमिनिअमच्या पत्र्याची जाडी ठरविली जाते.इसवीसन १८०० पासून आधुनिक पाणबुड्या बनवल्या जात असल्याने हे धातू उच्च दाबाखाली कसे वागतात,
त्याचप्रमाणे अनेक वेळा पाण्याखाली दाब सहन करून पुन्हा पृष्ठभागावर येणे ही क्रिया केल्याने त्याचा या धातूंवर काय दीर्घकालीन परिणाम होतो,याचाही भरपूर अभ्यास आणि अनुभव आहे.उच्च सामर्थ्याचे पोलाद किंवा इतर धातू वापरून पाणबुडी किंवा सबमर्सिबल बनवणे हे काटेकोरपणे करावे लागणारे,उच्च गुणवत्तानियंत्रण आवश्यक असणारे,अतिशय अवघड,खूप वेळ लागणारे आणि खर्चिक काम असते.
टायटॅनचा अंत:स्फोट झाल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी त्याची कारणमीमांसा मांडली आहे. तज्ञांना वाटणारे सर्वांत महत्वाचे कारण आहे.टायटॅनची बांधणी,टायटॅनचा पुढील आणि मागील भाग टायटॅनिअमचे दोन अर्धगोल वापरून बनवलेला होता,तर या दोन गोलांना जोडणारा मधला १४२ सेंटिमीटर व्यासाचा, १२७ मिलिमीटर जाडीचा आणि २.४ मीटर लांबीचा दंडगोलाकृती भाग हा प्रक्रिया केलेल्या कार्बन धाग्यांच्या (कार्बन फायबर) कापडाचे ४८० थर एकावर एक गुंडाळून बनवला गेला होता.याला मजबुती आणण्यासाठी त्यात परिवलयाच्या (हूप) दिशेने धागे टाकले होते. अशा प्रायोगिक प्रकारची ही पहिलीच सबमर्सिबल होती.तज्ज्ञांचे मत असे,की कार्बन धाग्यापासून बनविलेल्या गोष्टी हलक्या वजनाच्या असूनसुद्धा मजबूत असतात हे जरी मान्य केले,तरी या पदार्थाचा उच्च दाबाखाली समुद्राच्या पाण्यातील वर्तनाचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही आणि अनुभवही नाही. याशिवाय दुसरा महत्त्वाचा आणि न अभ्यासला गेलेला मुद्दा म्हणजे 'श्रांती' (फटीग) जेव्हा एखादी गोष्ट अथवा यंत्राचा भाग सतत चक्रीय बलाला (सायकलिक लोड) सामोरा जातो,तेव्हा काही कालांतराने त्याच्या गुणधर्मांत आणि त्यामुळे सामन्यांत बदल होतो,कमतरता येते आणि तो अचानक नादुरुस्त होऊ शकतो किंवा मोडून पडू शकतो.फेल होऊ शकतो.याला श्रांती म्हणतात.
आपल्या रोजच्या जीवनातले श्रांतीचे उदाहरण घेतले म्हणने ही संकल्पना पटकन लक्षात येईल.आपण एक धातूची तार घेऊन वाकवती तर ती तुटत नाही परंतु तीच तार आपण वीस-पंचवीस वेळा वाकवली आणि सरळ केली,तर ती तुटते. तार तुटण्यासाठी हे वाकवून सरळ करण्याचे आवर्तन किती वेळा करावे लागेल,ते धातू-धातूवर अवलंबून असते.कार्बन धाग्यांचा अजूनही श्रांतीसाठी पूर्ण अभ्यास झालेला नाही.
टायटॅनिक च्या बाबतीतही असेच घडले असू शकेल,असे तज्ञांचे मत आहे.टायटॅनने याआधीही बुड्या मारून टायटॅनिक अवशेषांच्या सहली केल्या होत्या.प्रत्येक सहलीमध्ये ती समुद्रतळाशी गेली,की तिला उच्च दाब सहन करावा लागला असणार.त्यानंतर ती पुन्हा समुद्रपृष्ठावर आली.की तिच्यावर फक्त वातावरणाचा दाब असणार. म्हणजे दरवेळी ती एक बार ते चारशे बार,अशा दाबाचे आवर्तन पूर्ण करणार.या आवर्तनीय किंवा चक्रीय दाबामुळे निर्माण झालेल्या श्रांतीमुळे तिचे कवच फेल होऊन अंत:स्फोट झाला असू शकतो,असे तज्ज्ञांचे मत आहे.
या कार्बन धाग्यांपासून टायटॅनच्या संदर्भात अनेक संस्था आणि व्यक्तींनी ओशनगेटला इशारे दिले होते.सन २०१५मध्ये जेव्हा ओशनगेट 'डोअर मरीन' या कॅलिफोर्निया स्थित संस्थेकडे त्यांचा अनुभव परामर्श घेण्यासाठी गेली होती, त्या वेळी त्या कंपनीच्या अध्यक्षांनी कार्बन धाग्यांचा वापर करण्याबाबत नकारात्मक सल्ला दिला होता.त्याचप्रमाणे,मरीन टेक्नॉलॉजी सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 'समानव जलांतर्गत वाहन समिती'ने टायटॅनचे प्रमाणन (सर्टिफिकेशन) करून घेण्याचाही सल्ला दिला होता.
परंतु,ओशनगेटने या कोणाच्याच सल्ल्याला भीक घातली नाही.उलट,ओशनगेटचे म्हणणे असे होते,की या सबमर्सिबलच्या धंद्यात खूपच अनावश्यक असे नियमन आहे,ज्यामुळे संशोधन, नवीन कल्पना आणि विकासाला वाव मिळत नाही.जर ओशनगेटने योग्य रितीने प्रमाणन करून घेतले असते,तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती.