महाभारतात मांडव्य ऋषींचा उल्लेख आहे. प्राचीन भारतातील तो पहिला कीटकशास्त्रज्ञ.काट्याच्या टोकाला कीटक टोचून,त्यांचा संग्रह करून,त्याविषयी तो संशोधन आणि अभ्यास करी.मांडव्य ऋषी करीत असलेली जीवहत्या त्या काळातील समाजातील प्रतिष्ठितांना आवडली नाही.त्यांनी राजाचे कान त्याच्याविरुद्ध भरून त्याला सुळावर चढवून ठार केलं.वयाच्या एकविसाव्या वर्षी चालू केलेल्या या साधनेचा शेवट त्याच्या (३३) तेहतिसाव्या वर्षी झाला.भारतातील एका कीटक
शास्त्रज्ञाचा हा शोकान्त पाहून नंतर कोणी अशा प्रयोगात लक्ष घातलं नसावं मात्र पाश्चात्त्य देशांत याविषयीचा पाठपुरावा होत होता.सृष्टिपदार्थज्ञानी ॲरिस्टॉटल यानं कीटकांविषयी आपल्या ग्रंथांतून माहिती दिली आहे.
फ्रान्समध्ये अठराव्या शतकात रूमर हा कीटकशास्त्रज्ञ झाला;परंतु कीटकासारख्या अतिक्षुद्र जीवाचा अभ्यास करण्यात त्यानं कालापव्यय करावा,याबद्दल त्या काळातील समाजानं त्याची हेटाळणी केली.रूमर त्यामुळं निराश झाला नाही.कीटकांविषयीचं शोधकार्य चालू ठेवून,'नॅचरल हिस्ट्री ऑफ इन्सेक्ट्स' या विषयावर त्यानं बारा खंड लिहून काढले. त्याच्या हयातीत फक्त पहिला खंड प्रसिद्ध झाला.त्या वेळच्या कुरिअरसारख्या नामवंत कीटकशास्त्रज्ञानं रूमरचं लेखन अनावश्यक म्हणून निकालात काढलं होतं.
रूमरच्या मृत्यूनंतर एकशेसाठ वर्षांनी विलियम मार्टिन व्हीलर यानं इ. स. १९२६ मध्ये त्याची हस्तलिखितं वाचली, तेव्हा त्याला ती अतिशय महत्त्वाची वाटली.त्यानं ती फ्रान्समधील सायन्स अॅकॅडमीतर्फे प्रसिद्ध केली.याच शतकात जे. एच.फेबर या फ्रेंच निसर्गतज्ज्ञाचा उदय झाला. होमर महाकाव्याची रचना करून अजरामर झाला तसेच,फेबरनं कीटकांवर काव्यमय लेखन केलं,म्हणून तो 'इन्सेक्ट होमर' म्हणूनही ओळखला जातो.
कीटकांविषयीची त्याची पुस्तकं जगभर वाचली जातात. इ.स.१९१५ मध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्याचं निधन झालं. तरुण फेबरविषयी डार्विननं एका ठिकाणी म्हटलं आहे की,फेबरच्या अदम्य निरीक्षणशक्तीचं कोणीच अनुकरण करू शकणार नाही.फेबर निसर्गाशी तादात्म्य पावला होता. फेबर एकदा म्हणाला,'जर डासांविषयी आपणाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकलं, तर मानवी जीवनाचा इतिहास पुसून टाकावा लागेल.'
सॉक्रेटिसच्या शब्दांत सांगायचं म्हणजे-
'What I know best of all is that I know nothing.' (मला सर्वात चांगले माहित आहे की मला काहीही माहित नाही.')
कीटकांच्या वर्तणुकीविषयी फेबरचा व्यासंग मोठा होता.भुंगोरा,कोळी,मधमाशा,गांधीली, अळी यांचं तो निरीक्षण करीत राहिला.या कीटकसृष्टीविषयी अतिशय साध्या,सरळ,सोप्या आणि चित्रमय भाषेत त्यानं लिहिलं.कीटकांविषयीचं त्याचं समग्र वाड्मय दहा खंडांतून प्रसिद्ध झालं आहे.'वंडर्स ऑफ इन्स्टिंक्ट' हा त्याचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.प्रसिद्ध बेल्जियन नाटककार आणि कवी मॉरिस मेटरलिंक याची ख्याती जगातील साहित्य क्षेत्रात मोठी आहे. 'द लाइफ ऑफ द बी' हा मधमाशांविषयी,तसेच,'द लाइफ ऑफ द व्हाइट
अॅन्ट' हा वारूळ आणि वाळवी यांच्याविषयी ग्रंथ त्यानं लिहिला.ललित लेखनाद्वारे त्यानं शास्त्र सांगितलं.
अमेरिकन शास्त्रज्ञ एडविन वे टील याचा मधमाशांवरील 'गोल्डन थ्रॉंग' हा ग्रंथ अद्वितीय आहे;परंतु मेटर-लिंकचा ग्रंथ अनेक दृष्टींनी टील याच्या ग्रंथापेक्षा उत्तम आहे.
आणखी एक थोर कीटकशास्त्रज्ञ आणि लेखक युजिन माराइस याचा उल्लेख करावा लागेल. 'द सोल ऑफ द व्हाइट अॅन्ट' हा त्याचा ग्रंथ अभूतपूर्व आहे.
आपल्याकडे आर.के.नारायण आणि खुशवंत सिंग यांनी प्रसंगानुसार कीटकांविषयी इंग्रजीतून लालित्यपूर्ण लेखन केलं असलं,तरी ते जिज्ञासा आणि कुतूहल यांपोटी केलं आहे.शास्त्राचा त्याला आधार नाही.कीटकशास्त्रासारख्या क्षुल्लक वाटणाऱ्या विषयाकडं कोणी सहसा वळत नाही.
शिवाय आपले कीटकशास्त्रज्ञ त्याविषयी इतकं क्लिष्ट शास्त्रीय विवेचन करीत असतात,की ते सारं वाचकांच्या डोक्यावरून जातं.परिणामतः त्याविषयी अरुची निर्माण होते. अलीकडं कृषिविज्ञानाशी संबंधित असलेल्या कीटकांविषयी माहिती प्रसिद्ध होत असते.आश्चर्य म्हणजे,कीटकांची मराठी नावं आणि त्यांविषयीचा सोपा पारिभाषिक कोश अजूनही निर्माण होऊ शकलेला नाही.वनाधिकारी म्हणून नोकरीच्या सुरुवातीला मी डॉ.सालीम अली या प्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाच्या सहवासात आलो. त्यांच्याबरोबर पक्षिनिरीक्षण करीत असता ते म्हणायचे,'चितमपल्ली,तुम्हांला माहीत आहे ना? पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्राची,तशीच कीटकशास्त्राची माहिती पाहिजे.
त्यांना वनं आणि वनांचे प्रकार यांविषयी ज्ञान हवं. भूगोलाचा अभ्यास हवा.रसायन आणि भौतिक शास्त्रांचा परिचय पाहिजे.गणिताकडही दुर्लक्ष करून चालणार नाही.'रानकोंबड्या,चकोत्री, लावा,तित्तिर आणि रानबदकं या मृगयायोग्य पक्ष्यांच्या खाद्यसवयींचा अभ्यास करताना मला त्यांच्या पोटातून वनस्पतीच्या बियांबरोबर अनेक प्रकारच्या कीटकांचे अवशेष आढळून येत.त्या वेळी फारशी माहिती नव्हती.कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना झाडांचे शत्रू असलेल्या कीटकांचा परिचय करून देण्यात आला होता. पुण्यात मी वनसंशोधन केंद्रात काम करीत असताना आपल्याला कीटकांविषयी सखोल शास्त्रीय ज्ञान असावं,हे प्रकर्षानं जाणवलं,तेव्हा मी विचार केला,दोन-तीन वर्षांची अध्यासन रजा घेऊन या शास्त्राचा विद्यापीठात अभ्यास करावा; परंतु अनेक कारणांमुळं ते शक्य झालं नाही.परंतु कीटकांच्या अदभुत जीवनाविषयी माझ्या मनात जिज्ञासा होती.या रुचीतूनच मी ॲरिस्टॉटल,
फेबर,मेटरलिंक,टील आणि जेराल्ड ड्युरेल यांची पुस्तकं वाचली.त्यातूनच कीटकांचं जग पक्ष्यांच्या जगापेक्षाही गूढरम्य असल्याची प्रचीती आली.पक्षिनिरीक्षणाबरोबर मी वेळ मिळेल,तेव्हा कीटकांचं देखील जंगलभटकंतीत अवलोकन करू लागलो.त्यांच्या जीवनदर्शनानं मी थक्क झालो.एस. एच. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की,
'तुम्ही जर मानव नसता,तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हांला आवडलं असतं ?
त्यावर स्केफ म्हणाला,
'मला कालव-शिंपला (ऑइस्टर) व्हायला आवडेल. '
हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, 'का बरं?'
'कारण कालव-शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते.नंतर त्याचं रूपांतर मादीत होतं अन् शेवटी तो अर्धनारीनटेश्वर होतो.जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवांतून तो जातो.त्यामुळं संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं.' परीक्षकांना हे उत्तर आवडलं,हे सांगायला नकोच.
कीटकांच्या जीवनाविषयी अभ्यासाला कोठून आणि कशी सुरुवात करावी,हेच लक्षात येत नाही.आजूबाजूचा सारा परिसर नाना अवस्थांतून जाणाऱ्या,उडणाऱ्या,गाणाऱ्या,गुणगुणणाऱ्या रंगीबेरंगी कीटकांनी व्यापलेला आहे.सुमारे ७०,००,००० प्रकारच्या कीटकांची ओळख झाली आहे दर वर्षी त्यात नवनवीन कीटकांच्या जातींची भर पडत असते.या भूतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्राणि
जगतापेक्षा तिपटीनं कीटकांच्या जाती आहेत.
डायनोसोर अस्तित्वात होता,तत्पूर्वी तीनशे कोटी वर्षांपासून कीटकसृष्टी पृथ्वीवर आहे.त्यांच्या आवाजानं आजूबाजूचं वातावरण भरलेलं आहे. अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना वाघ,सिंह,हत्ती,
गेंडे पाहायचे असतात.त्यांचं लक्ष चुकूनही या अदभुत कीटकांच्या जगाकडं जात नाही.
माझ्यासारखा पक्षिप्रेमी जंगलातील ओढ्याकाठी हिंडताना कीटकांचं अनायासे दर्शन झाल्यावर त्यांना अधिक वेळ न्याहाळीत असतो.
एक दिवस ओढ्याच्या काठानं जात असता शिकारी गांधीलमाशी उडताना दिसली.मी तिच्याकडं पाहू लागलो.
तिनं तोंडात अळी धरली होती.उडत- उडतओढ्याकाठच्या भुसभुशीत दरडीवर असलेल्या बिळातील घरट्याकडं ती जात होती.तिच्या तोंडातील अळी गांधीलमाशीपेक्षा आकारानं मोठी होती.गांधीलमाशीनं मला पाहिलं असावं.
कारण घरट्याजवळ येताच ती क्षणभर अस्वस्थपणे पिंगा घालू लागली.नंतर ती बिळाजवळ अलगद उतरली.
घरट्याचं छिद्र तिनंच तयार केलं होतं.पुढच्या पायानं माती उकरून ती मागच्या पायानं बाहेर काढून टाकीत होती.
मी तिच्याकडे एकाग्रतेनं पाहात होतो.वळसे घेत गेलेल्या छिद्रात बेशुद्धावस्थेत असलेल्या अळीसह तिनं प्रवेश केला.सुरक्षित ठिकाणी त्या अळीला ठेवून ती त्यावर अंडी घालणार होती. अतींद्रिय ज्ञानाच्या साह्यानं ती नांगीनं अळीच्या छातीजवळ असलेल्या मज्जातंतू केंद्रावर असा काही नियंत्रित दंश करते,की भक्ष्य तर जिवंत राहावं;मात्र त्याची हालचाल होऊ नये.अशा अवस्थेत अळी निश्चेष्ट पडली असता,अंड्यांतून बाहेर येणाऱ्या अर्भकांना अनायासे भोजन मिळतं.तसेच,ती सुरक्षितही राहतात.
पाखरमाया - मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,नागपूर
अळी आत ठेवून ती नंतर बाहेर उडत आली.घरट्याचं छिद्र तिनं रेतीच्या कणांनी बंद केलं. घरट्याचा मागमूस लागू नये,तसेच आजूबाजूच्या वातावरणाशी ते एकरूप व्हावं,म्हणून गवताच्या काड्या घरट्याभोवती तिनं टाकल्या आणि ती तिथून निघून गेली.नंतर योग्य वेळी परत येताना ती तोंडात वाळूचा खडा आणून या घरट्याचा बंद दरवाजा फोडते.
मी मनात विचार करीत होतो की,
'शिकारीसाठी दूरवर गेल्यावर गांधीलमाशी आपलं घरटं पुन्हा कशी शोधून काढीत असेल? तिला दिशांचं ज्ञान कसं होत असेल ? गांधीलमाशी परत या घरट्याकडं येईल,तेव्हा आतील अर्भकाचं रूपांतर पंख फुटलेल्या गांधीलमाशीत झालेलं असेल का?'
परवा मी केशिराज संकलित 'दृष्टांत पाठ' वाचताना भींगरुटीएचा दृष्टांत वाचून थक्क झालो.
भींगरुटी असे : ते कीटकीतें पाहे:
धरी : कांटा रोवी :
नेऊनि आपुलेया घरांतु घाली : दार
लींपौनि जाए ।
एउनि मागुती मातें खाईल म्हणौनि
भेणें तीएतें चींती :
चिंतीत चिंतीतां तीसीहि पाख नीगति :
तेही तीएसारीखी होए ।। (९६)
मला असं सांगायचं नाही,की महानुभाव पंथातील अनुयायांना शास्त्रीय दृष्टी होती; परंतु रानावनांतून भटकंती करणाऱ्या महानुभावांच्या नजरेतून गांधील
माशीविषयीचं निरीक्षण सुटलं नव्हतं.त्यांनी ते सहज पाहिलं.परमेश्वर आणि भक्त यांविषयीचं जे तत्त्वज्ञान सांगायचं ते गांधीलमाशी व अळी यांच्या साह्यानं त्यांनी अतिशय काव्यमय शैलीत सांगितलं आहे,ते मला खूप आवडलं.