* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बिबळ्याचा पहिला बळी… Leopard's first victim...

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/९/२३

बिबळ्याचा पहिला बळी… Leopard's first victim...

मी रुद्रप्रयागला येण्याअगोदर इबॉटसनने अतिशय सुनियोजित असा एक हाकारा घालण्याची योजना केली होती.जर तो यशस्वी झाला असता तर पुढे जवळजवळ पंधरा माणसांचा जीव वाचला असता.हा हाकारा आणि त्याच्याशी संबंधित घटना खास उल्लेख करण्यासारख्या आहेत.


बद्रीनाथकडे निघालेल्या वीस यात्रेकरूंचा घोळका एकदा संध्याकाळी एका रस्त्यालगतच्या दुकानावर येऊन पोचला.त्यांच्या सर्व गरजा भागवल्यानंतर त्यांना दुकानदाराने सांगितलं की आता लवकरच अंधार पडेल आणि चार मैलावरच्या पिलग्रिम शेल्टर्सपर्यंत वेळेवर पोचायचं असेल तर त्यांना ताबडतोब निघावं लागेल.तिथे एकदा पोचलं की त्यांना कोणताही धोका नाही,त्यांच्या राहण्याजेवणाची सुद्धा चांगली सोय होईल.पण हा सल्ला त्या यात्रेकरूंना काही केल्या पटेना.त्यांचं म्हणणं असं होत की त्यांनी सकाळपासून खूप लांबचा पल्ला मारला होता आणि आता यापुढे परत ४ मैल चालणं अशक्य आहे.त्यांना फक्त जेवण बनवण्यासाठी थोडी जागा हवी होती आणि दुकानाबाहेरच्या पडवीत झोपण्याची परवानगी! यावर मात्र दुकानदाराने जोरदार विरोध दर्शवला.त्याने सांगितलं की त्याच्या दुकानाच्या आसपास तो बिबळ्या सतत येत असतो आणि तिथे उघड्यावर झोपणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.


ही सगळी वादावादी चालू असतानाच बद्रीनाथकडे चाललेला एक साधू तिथे आला आणि त्याने यात्रेकरूंची बाजू मांडायला सुरुवात केली.तो म्हणाला की जर दुकानदाराने त्यांच्यापैकी स्त्रियांना दुकानात निवारा दिला तर तो पुरुषमंडळींबरोबर बाहेर ओसरीवर झोपेल आणि जर कुठला बिबळ्या - नरभक्षक असो किंवा नसो तिथे आला आणि यात्रेकरूंशी काही आगळीक केली तर तो त्याला तोंडाने आख्खा गिळेल व फाडून टाकेल.या असल्या प्रस्तावासमोर दुकानदाराला मान झुकवावी लागली.शेवटी दहा बायकांना त्याच्या दुकानाच्या आत निवारा मिळाला व साधूला मधोमध ठेवून ती दहा माणसं ओसरीवर आडवी झाली.


सकाळी उठल्यावर यात्रेकरूंना दिसलं की साधू तिथून गायब आहे,त्याचं अंथरूण विस्कटलेलं आहे,त्याने पांघरली चादर ओसरीच्या अर्धी आत आणि अर्धी बाहेर फरफटत गेली आहे व त्यावर रक्ताचे डाग आहेत.या सर्वांचा गलका ऐकून दुकानदार बाहेर आला.एका दृष्टीक्षेपातच त्याला काय झालंय ते कळलं.उन्हं नीट वर आल्यावर त्या सर्वांबरोबर दुकानदाराने रक्ताचा माग कुठे गेलाय ते बघितलं.तो माग डोंगरउतारावर काही अंतर जात तीन सोपानशेतं ओलांडून सर्वात खालच्या शेताच्या बांधापर्यंत गेला होता.त्या उभ्या बांधाच्या कडेला त्यांना साधू सापडला. त्याच्या शरीराच्या खालचा भाग बिबळ्यानं खाल्ला होता.


त्यावेळी इबॉटसनचा मुक्काम रुद्रप्रयागलाच होता आणि तो नरभक्षकाचा ठावठिकाणा शोधण्याच्या प्रयत्नात होता.त्याच्या मुक्कामाच्या काळात कोणताही नरबळी गेला नव्हता.त्यामुळे त्याने अलकनंदा नदीच्या पलीकडच्या जंगलाच्या एका छोट्या पट्ट्यात हाकारा घालायचा बेत केला होता.दिवसा त्या बिबळ्याचं पडून राहण्याचं ठिकाण त्या जंगलात असावं असा गावकऱ्यांचा कयास होता आणि याच अंदाजाच्या आधारावर हा बेत त्याने केला होता. त्यामुळे आदल्या दिवशी ते वीस यात्रेकरू पाय ओढत दुकानाच्या दिशेने चालत होते त्यावेळी पटवारी व इबॉटसनचा नोकरवर्ग आसपासच्या गावात फिरून दुसऱ्या दिवशीच्या हाकाऱ्यासाठी सकाळी तयार राहायला बजावत होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून इबॉटसन,त्याची पत्नी आणि एक मित्र ( त्याचं नाव मला आता आठवत नाहीये) त्यांच्या मागे काही नोकर व हाकारा घालणारी जवळजवळ दोनशे माणसं रुद्रप्रयागचा झुलता पूल ओलांडून नदीपलीकडे मैलभर अंतर कापून डोंगर चढले आणि हाकायासाठी जागा घेतल्या.हाकारा चालू असतानाच इबॉटसनच्या रनरने साधूच्या बळीची बातमी आणली.आता हा निश्चितपणे रिकामा जाणारा हाकारा थांबवला गेला आणि उभ्याउभ्याच पुढे काय करायचं याची योजना आखली गेली.या योजनेनुसार इबॉटसन आणि पार्टी दोनशे हाकाऱ्यांना घेऊन चार मैलांवरच्या एका झुल्यावरून अलकनंदा ओलांडून परत मागे वळून त्या बळीच्या ठिकाणी आली तर त्याचा नोकरवर्ग डोंगराच्या रस्त्याने वाटेवरच्या गावांमध्ये जेवढी माणसं जमवता येतील तेवढी जमवत दुकानावर आली.

दुपारपर्यंत जवळजवळ दोन हजार माणसं जमली आणि दुकानाच्या वरच्या बाजूच्या डोंगरावर वरपासून खालपर्यंत हाकारा घालण्यात आला.ज्यांना इबॉटसन काय चीज आहे. हे माहिती असेल त्यांना निश्चित कल्पना येईल की हा हाकारा किती योजनाबद्ध पार पडला असेल.हाही हाकारा रिकामा गेला त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यावेळी बिबळ्या त्या भागात नव्हताच.


जेव्हा एखादा वाघ किंवा बिबळ्या स्वतःहून त्याचं भक्ष्य असं उघड्यावर सोडून देतो तेव्हा त्याचं त्या भक्ष्यामधलं स्वारस्य संपलं आहे हे गृहीत धरायला हरकत नसते.

अशावेळी तो भक्ष्यावर एकदाच भरपेट ताव मारून दोन-तीन मैल दूर एकांतात जाणं पसंत करतो;नरभक्षक असेल तर दहा- दहा मैल सुद्धा! त्यामुळे ही शक्यता होती की जेव्हा ते जंगल विंचरून काढलं जात होतं तेव्हा तो बिबळ्या दहा-बारा मैल दूर कुठेतरी गाढ झोप घेत असणार.


'नरभक्षक बिबळे' ही अपवादात्मक जनावरं आहेत.त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन )


माझा स्वतःचा याबाबतीतला अनुभव खूपच मर्यादित होता,फार वर्षापूर्वी फक्त एका नरभक्षक बिबळ्याशी झालेला संपर्क इतपतच; व तोही फारच थोड्या काळाकरता.त्यामुळेच नरभक्षक बनल्यावर बिबळ्यांच्या सवयी बदलतात हे जरी मला माहीत असलं तरी किती प्रमाणात त्या बदलल्या असतील याचा अंदाज करणं अशक्य होतं.त्यामुळे निदान पहिले काही दिवस तरी इतर बिबळ्याच्या शिकारीसाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्याच पद्धतीचा उपयोग करायचं मी ठरवलं.


सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या पद्धती म्हणजे बिबळ्याने केलेल्या भक्ष्यावर किंवा त्यांच्यासाठी बांधलेल्या जिवंत जनावराजवळ जागा घेऊन बसणे;

शक्यतो बोकड किंवा मेंढा ! पण यापैकी पहिली पद्धत वापरायची असेल तर भक्ष्याचा शोध लागणं महत्त्वाचं असतं आणि दुसऱ्या बाबतीत बिबळ्याचा ठावठिकाणा शोधणं आवश्यक असतं.माझा रुद्रप्रयागला जाण्याचा मुख्य हेतू यापुढील मनुष्यहानी बंद करणं हा होता त्यामुळे बिबळ्या पुढचा नरबळी घेईल याची वाट बघणं चूक होतं.

साहजिकच एकच गोष्ट माझ्या हातात होती ती म्हणजे काहीही करून त्याचा ठावठिकाणा शोधणे,त्याला संपर्कात आणणे,एखादं जनावर आमिष म्हणून बांधणे आणि त्याच्याजवळ बसून संधीची वाट बघणे.या इथेच माझ्यासमोर फार मोठी अडचण उभी राहीली की जिच्यावरचा तोडगा आज ना उद्या निघणारच होता.मला दिलेल्या नकाशावरून कळत होतं की या नरभक्षकाचा वावर जवळजवळ पाचशे चौ.मैल एवढ्या मोठ्या प्रदेशात होता.कुठेही पाचशे चौ.मैल एवढ्या प्रदेशात एखादं विशिष्ट जनावर हुडकून त्याची शिकार करणं मोठं अवघड काम होतं.इथे तर हा सर्व प्रदेश डोंगराळ आणि रौद्र होता. अशा भागात एखादं जनावर तेही संपूर्ण निशाचर.. शोधणं मला तर प्रथमदर्शनी अशक्यप्राय वाटलं.पण नंतर ह्या प्रदेशाला समान भागात विभागणाऱ्या अलकनंदा नदीचा विचार मनात आला.


सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज होता की ही नदी बिबळ्याला कोणताही अडथळा निर्माण करू शकत नाही आणि जेव्हा नदीच्या एका अंगाला शिकार मिळणं अवघड पडतं तेव्हा तो ही नदी पोहून पार करतो.माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता.माझ्या मते कोणताही बिबळ्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःला बर्फासारख्या थंड आणि फेसाळत्या वेगवान प्रवाहात झोकून देणार नाही.त्यामुळे जेव्हा म्हणून बिबळ्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जात असेल तेव्हा तो कोणत्यातरी झुलत्या पुलावरूनच नदी ओलांडून जात असणार.


असे दोन पूल या भागात होते.एक रूद्रप्रयागमध्येच होता आणि दुसरा रुद्रप्रयागपासून वरच्या अंगाला बारा मैलांवरच्या 'चटवापिपल' इथे होता.या दोन पुलांच्या मध्ये एक झुला होता. हाच तो झुला... ज्यावरून इबॉटसन व त्याच्या पार्टीने हाकाऱ्याच्या दिवशी नदी ओलांडली होती.एक उंदीर सोडला तर इतर कोणत्याही प्राण्याने ओलांडला नसेल असा हा ब्रिज म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेल्यांपैकी सर्वांत भयानक चीज होती.हाताने वळलेल्या, धुक्यामुळे आणि जुन्या झाल्याने,काळपट पडलेल्या गवताच्या दोन समांतर केबल्स जवळजवळ दोनशे यार्ड रुंदीच्या फेसाळत्या, बर्फासारख्या थंड आणि वेगवान पात्रावरून पलीकडे गेल्या होत्या.हा प्रवाह पुढे शंभर याडीवर दोन खडकांच्या भिंतीमध्ये मोठ्या गर्जना करून आदळत होता.इथेच एकदा पाठलागावर असलेल्या रानकुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी एका भेकराने जीवाच्या आकांताने लांब झेप घेऊन नदी ओलांडली असल्याची कथा ऐकिवात होती.या दोन समांतर केबल्समध्ये पावलं ठेवण्यासाठी गवताच्याच सैलसर दोरांनी बांधलेल्या इंच अर्धा इंच रुंदीच्या व विषम लांबीच्या कामट्या शेवटपर्यंत जात होत्या.हा एवढा भयानक प्रकार कमीच वाटला म्हणून की काय कोण जाणे पण त्यातली एक केबल जरा सैल पडली होती आणि त्यामुळे या सर्व कामट्यांचा केबलशी ४५" चा कोन झाला होता.जेव्हा मी ह्या भीषण झुल्याला पहिली भेट दिली तेव्हा मी तिथे टोल घेणाऱ्या माणसाला "ह्या झुल्याची कधी तपासणी किंवा डागडुजी केली आहे का?" हे विचारण्याचा मूर्खपणा केला होता.एका पैशाच्या मोबदल्यात माझं आयुष्य खर्ची घालण्याची परवानगी देताना तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला की या झुल्याची तपासणी वगैरे कधी होत नाही पण पूर्वी एकदा त्यावरून जाणाऱ्या कोणा एका माणसाच्या वजनाने तो जेव्हा तुटला तेव्हा तो बदलून दुसरा झुला लावण्यात आला आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या मणक्यातून जी थंड शिरशिरी गेली ती मी पलीकडे जाईपर्यंत तशीच राहीली.


तर असा हा झुला ओलांडणं ही नरभक्षकाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती.आता उरले दोन झुलते पूल!मला आता खात्री पटली की जर मी ते दोन पूल बंद करू शकलो तर बिबळ्याला नदीच्या एका बाजूला स्थानबद्ध करू शकेन आणि माझं काम निम्म्याने हलकं करू शकेन.


आता पहिलं काम हे होतं की याक्षणी बिबळ्या नदीच्या कोणत्या बाजूला आहे हे तपासणे, शेवटचा म्हणजेच त्या साधूचा बळी हा चटवापिपल पुलापासून जवळच एका गावात नदीच्या डाव्या अंगाला झाला होता. ह्या घटनेनंतर साहजिकच सर्व लोकांनी खबरदारीचे उपाय दुपटीने जारी केले असणार त्यामुळे बिबळ्याने निश्चित नदी ओलांडलीच असणार पण हे वाचल्यावर तुम्ही विचाराल की इतकी खबरदारी घेऊनसुद्धा एका गावात पाच पाच बळी कसे गेले? मी एवढंच उत्तर देऊ शकतो की अशी सावधानता व प्रयत्न सतत करण्यालाही मर्यादा असतात.

इकडची घरं खूप छोटी आहेत आणि त्यात संडास वगैरेची सोय नसते.त्यामुळे नरभक्षक आपल्यापासून दहा-पंधरा मैल दूर आहे असं कळल्यावर एखादा माणूस,बाई किंवा मूल निसर्गनियमांनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत एखाददुसरा क्षण दरवाजा उघडण्याचा धोका पत्करणं साहजिक आहे आणि ज्या संधीसाठी नरभक्षक कदाचित कित्येक रात्री वाट बघत असेल ती संधी त्याला मिळत असणार..!