१९९५ पुण्याच्या राजभवनमधून,म्हणजे औंध इथल्या राज्यपालांच्या निवासस्थानातून आमचे आयुक्त रवींद्र सुर्वे यांना एक पत्र आलं. राजभवनमध्ये ठेवलेल्या वन्य प्राणी व पक्ष्यांना आमच्या पार्कमध्ये हलवण्याचा विनंतीवजा आदेश होता.सुर्वेसाहेबांनी माझ्यासमोर ठेवलेलं ते पत्र वाचून मी हरखूनच गेलो.सहा मोर,दहा पोपट,पाच कासवं आणि तीन शेकरू आमच्याकडे येणार होती.आम्ही ताबडतोब होकार कळवला आणि नव्या पाहुण्यांच्या आगमनाची साग्रसंगीत तयारी सुरू केली.
एके दिवशी राजभवनातले सगळे प्राणी-पक्षी घेऊन वन विभागाची गाडी आमच्या पार्कमध्ये आली.दरम्यान,खूप साऱ्या ओल्या अणि सुक्या झाडांच्या फांद्या पिंजऱ्यामध्ये लावून आम्ही चार-पाच पिंजरे तयार ठेवले होते.त्यातल्या एका पिंजऱ्यात पोपट सोडले.कासवांच्या आधीच्याच पिंजऱ्यामध्ये नव्याने दाखल झालेली कासवं ठेवली.
आम्हाला सर्वांत जास्त आकर्षण होतं ते महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूंचं. विशेष म्हणजे या तीन शेकरूंमध्ये दक्षिणी राज्यांमध्ये आढळणाऱ्या शेकरूच्या एका वेगळ्या जातीची जोडी होती.दक्षिण भारतामध्ये आढळणारे हे शेकरू आकाराने लहान असतं. त्याच्या शेपटीवरचे केस काहीसे काळसर असतात.तर भीमाशंकर परिसरात आढळणारं शेकरू थोराड बांध्याचं असते.
त्याची शेपूट चांगलीच लांब असते आणि शेपटीवर पांढरट-चंदेरी केसांची लव असते.आमच्याकडे दाखल झालेला भीमाशंकरचा रहिवासी नर होता.दक्षिणी शेकरूंच्या जोडीला आम्ही एका पिंजऱ्यात ठेवलं आणि भीमाशंकरच्या नराला स्वतंत्र पिंजऱ्यात.भीमाशंकरच्या जंगलात सापडल्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याचं नाव भीमा असं ठेवलं होतं.वनाधिकाऱ्यांना सापडला तेव्हा भीमा अगदीच बाळ होता.एका वादळी पावसाच्या रात्री सोसाट्याच्या वाऱ्यात हे बाळ आपल्या घरट्यासकट खाली पडल.पण सुदैवाने तेव्हाच एक शेतकरी आपल्या गाईंना चारून घरी चालला होता.त्याने भीमाला मायेने उचललं आणि घरी आणलं.त्याच्या बायकोने रात्रभर कापसाच्या बोळ्याने शेळीचं दूध पाजून त्याची काळजी घेतली.दुसऱ्या दिवशी एका तरुण वनाधिकाऱ्याकडे त्यांनी हे पिल्ल सोपवलं.त्या अधिकाऱ्याने भीमाला पुण्याला आणलं आणि काही दिवस घरीच सांभाळलं.पण थोड्याच दिवसांत त्याची बदली पुण्याबाहेर झाली. त्यामुळे त्याने भीमाला पुण्याच्या राजभवनमध्ये ठेवलं.
गव्हर्नर मॅडमचा भीमा खूपच लाडका होता.त्या पुण्यात असल्या की स्वतःच्या हाताने त्याला सुकामेवा खायला घालत असत.असा प्रवास करत करत आता भीमा आमच्याकडे दाखल झाला होता.जिथे जाईल तिथे लळा लावी.आमच्याकडे आल्यावरही थोड्याच दिवसांत भीमाने सगळ्यांची मनं जिंकली.फक्त पार्कवरच्या आम्हा लोकांचाच नव्हे,तर साऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा तो लाडका हीरो झाला.आयुक्त-महापौरांकडे येणारे पै-पाहुणे भीमाला बघायला हमखास पार्कवर येऊ लागले.अंगावर तांबू चकचकीत कोट, झुपकेदार शेपटी,छोटुकले कान आणि नटखट डोळे असा झकास रुबाब होता.त्याचा
त्याच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पातळीवर फांद्या बांधल्या होत्या.त्यांच्यावरून त्याला उड्या मारताना पाहून प्रेक्षक हरखून जात.त्याच्या विश्रांतीसाठी आम्ही एक घरटंही तयार केलं होतं.दुपारी आणि रात्री टुणकन उडी मारून तो त्या घरट्यात जाऊन झोपत असे.
भीमा आमच्याकडून हक्काने खायचे-प्यायचे लाडही करून घेत असे.लहानपणापासून माणसांसोबत वाढल्यामुळे असेल,पण त्याला एकटं जेवायला आवडायचं नाही.त्याच्या पिंजऱ्यातल्या ताटलीत कीपरने त्याचं अन्न ठेवून दिलं तर तो त्याकडे ढुंकूनही बघायचा नाही,पण कोणी तरी ओळखीचा माणूस जवळपास असेल तरच तो अन्नाला तोंड लावायचा.सूर्योदय झाला की स्वारी घरट्याबाहेर डोकवायची.मी हातात फळं घेऊन त्याच्या पिंजऱ्याकडे निघालो की टॉक-टॉक टॉक-टॉक आवाज सुरू व्हायचा. पिंजऱ्यात शिरण्याचा अवकाश,
भीमा थेट माझ्या खांद्यावर उडी घ्यायचा.माझ्या हातातून खाणं घेऊन खांद्यावर बसूनच तो खात असे. प्रतिभाचाही तो चांगला दोस्त झाला.तिच्या खांद्यावर बसून आवडते पदार्थ मटकावायचा.आवडत्या लोकांकडून जेवण मिळालं की स्वारी खूपच खूष असायची.
माणसांची त्याला खरोखरच आवड होती.नवख्या माणसासोबतही त्याचं छान जुळायच. एकदा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ.रेनी बोर्जेस आमच्या पार्कवर आल्या होत्या.भीमाशंकर परिसरातील शेकरूंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.त्यांच्याही खांद्यावर भीमा मनसोक्त बागडला.आयुक्त रवींद्र सुर्वे निवृत्त होऊन त्यांच्या जागी रुजू झालेल्या प्रवीणसिंह परदेशींनाही भीमाचा खूप लळा लागला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या 'राज्य मिनी ऑलिंपिक स्पर्धे'चा स्पर्धेचा शुभंकर होण्याचा मान भीमाला मिळाला.टी. रमेश नावाच्या बॉक्सरने तर या खेळांच्या उद्घाटनावेळी शेकरूच्या अंगासारखा पोशाख 'भीमा.. भीमा..' च्या तालावर नृत्य केलं. स्पर्धा सुरू असताना शहरभर भीमाची वेगवेगळे खेळ खेळतानाची मोठमोठाली कॅरिकेचर्स लागली होती.त्यामुळे इतर प्रेक्षकांबरोबरच या स्पर्धेसाठी जमलेले खेळाडूही आवर्जून आमच्या पार्कमध्ये येऊन भीमाला भेटून जात होते.भीमा सेलिब्रिटी होताना पाहण हा आमच्यासाठी मजेशीर अनुभव होता.
भीमाचं आणि प्रसिद्धीचं काही तरी नातं असावं. एकदा सूर्यग्रहण होतं.वेल्डिंग करण्याच्या काचेतून आम्ही आळीपाळीने सूर्यग्रहण पाहत होतो.सूर्यग्रहणाचा प्राण्यांच्या वर्तनावर काही परिणाम होतो का हे बघायला एक प्रेस फोटोग्राफरही आला होता.काचेतून आम्ही आकाशात नक्की काय पाहतोय याची उत्सुकता भीमाच्या चेहऱ्यावर दिसत होती.गंमत म्हणून आम्ही त्याच्या डोळ्यांसमोर काच धरली.त्यानेही त्या काचेतून सूर्यग्रहण बघितलं.त्या फोटोग्राफरने तो क्षण अचूक आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये छापूनही टाकला. पुन्हा एकदा आमचा भीमा हीरो झाला.
भीमाची आणखी एक आठवण मनात अगदी घट्ट रुतून बसली आहे.त्या वर्षी असह्य उन्हाळा होता.मे महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. बसल्याजागी घाम येऊन कपडे चिंब भिजायचे. अंगाची तलखी तलखी व्हायची.एके दिवशी तर कहर झाला.तापमान ४७ अंशांच्याही वर पोहोचलं असेल.(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन) आम्ही आणि आमचे प्राणी-पक्षी सगळेच चिडीचूप बसून होतो.पिंजऱ्यांचे पत्रे कडक उन्हाने तापून प्राण्यांची तलखी वाढवत होते.एवढ्या रणरणत्या उन्हात प्रेक्षक तरी कशाला येताहेत! अगदीच एखाद-दुसरा चुकार माणूस पार्कमध्ये फिरत होता.दुपारी दीड-दोनच्या सुमारास मी एकटाच पार्कच्या राऊंडला निघालो.सर्वच प्राणी-पक्षी मलूल झाले होते.माणसांचीच वाट लागली होती,तर बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना किती त्रास होत असेल ! चक्कर मारत मारत भीमाच्या पिंजऱ्याजवळ आलो,तर तो कुठेच दिसेना.त्याच्या नेहमीच्या जागेवर तो नव्हता,की घरट्यातही.खाली पाहिलं तर पिंजऱ्यातल्या पाचोळ्यामध्ये भीमा आडवा झाला होता.मी घाबरून त्याच्याजवळ गेलो. मोठ्याने हाक मारल्यावर तो थोडासा हलला; पण उठून बसण्याएवढी हुशारी त्याला वाटत नव्हती.मी हाका मारल्या,तसे आसपासचे कर्मचारी लगोलग धावून आले.भीमाची अवस्था पाहून त्यांनी शेजारच्या तळ्यातलं पाणी पिंजऱ्यावर मारायला सुरुवात केली;पण त्याने काही फरक पडेना म्हटल्यावर आम्ही फायर ब्रिगेडचा बंब बोलावला.तेही ताबडतोब आले आणि होज पाइपने त्यांनी अख्ख्या पक्षालयावर पाणी मारायला घेतलं.पिंजऱ्यावर जणू पाऊसच सुरू झाला.
सारेच प्राणी-पक्षी सुखावले.तापलेले पिंजरे गार होऊ लागले,तसा भीमाही सावध झाला.थोड्याच वेळात त्याला हुशारी आली. पावसात तो उड्या मारत भिजला आणि आनंदी होऊन पिंजराभर नाचू लागला.आम्हाला सर्वांना हायसं वाटलं.पुढचे दोन-तीन दिवस आगीचा बंब पाणी बरसून जात होता.त्यानंतर मात्र तापमान बऱ्यापैकी खाली उतरलं आणि आमच्या जीवात जीव आला.
भीमा आमच्यासोबत १२ वर्षं होता.त्यानंतर मात्र हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली.हालचाली मंदावल्या.आम्ही त्याच्यावर उपचार सुरू केले.सुरुवातीला त्याचा उपयोग झाला,पण नंतर त्याचं शरीर उपचारांना प्रतिसाद देईना.
आपल्या एक्झिटची वेळ जवळ आल्याचं त्याला समजलं असावं.एके दिवशी त्याने खाणं सोडलं.दुसऱ्या दिवशी मध्यरात्री कधी तरी शांतपणे तो आम्हाला सोडून निघून गेला.आजही त्याची आठवण निघाली की त्याच्या डोळ्यांतले मिश्कील भाव आठवून चेहऱ्यावर हसू उमटतं.