माझी पुतणी जोसेफिन कार्नेगी ही न्यू यॉर्कला सेक्रेटरीचे काम करण्यासाठी माझ्याकडे आली. ती अवघी एकोणीस वर्षांची होती आणि तीन वर्षांआधी तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.एखाद्या व्यवसायासंबंधीचा तिचा अनुभव तर खूपच कमी होता,जवळजवळ नव्हताच! आणि सध्या ती पश्चिम सुएझमधील एक उत्तम सेक्रेटरी म्हणून ओळखली जाते;पण आधी परिस्थिती तशी वाईट होती.तिच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणणे अत्यंत आवश्यक होते. एक दिवस मी तिला वाईट बोलणार होतो;पण मी जरा स्वतःला सावरले आणि मनाशी विचार केला की,'जरा थांब डेल कार्नेगी! थांब! तुझे वय हे जोसेफिनच्या जवळजवळ दुप्पट आहे.या तुझ्या व्यवसायाचा तिच्यापेक्षा कितीतरी पट अधिक अनुभव तुला आहे,त्यामुळे ती आत्ताच तुझ्या दृष्टिकोनातून सर्वकाही पाहू शकेल,समजू शकेल हे खरेच शक्य आहे का?आज तू तुझ्या कामात तरबेज आहेस;पण जेव्हा तू एकोणीस वर्षांचा होतास,तेव्हा कसा होतास हे तूच जरा आठव,त्या वयामध्ये किती मूर्खपणा व किती चुका तू स्वतः केल्या होत्यास ते जरा नीट आठव.त्या वेळेची आठवण ठेव.ते आठवताना बरेच प्रसंग तुझ्याभोवती आठवणींचा फेर धरतील.'आणि अशा प्रकारे भूतकाळ आठवून मी प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे स्वतःच्या मनाशी कबूलच करून टाकले की,'जोसेफिनचा एकोणिसाव्या वर्षी सुरू असलेला हा प्रयत्न, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे.'आणि खरंतर मला हे सांगायला सुद्धा लाज वाटते की, मी जोसेफिनशी त्या वेळी चार कौतुकाचे शब्दसुद्धा बोलत नव्हतो.
मग नंतर जेव्हा जेव्हा जोसेफिनच्या चुका मला दिसत आणि त्या तिला दाखवायची आवश्यकता असेल,तेव्हा मी तिला जरा वेगळ्या प्रकारे म्हणे की, 'जोसेफिन, तू थोडी चुकली आहेस;पण खरा सांगायचे तर देवाशप्पथ ही तुझी चूक मी केलेल्या चुकांएवढी वाईट नाही.एक आहे,तू या गोष्टी काही जन्मजात शिकून आली नाहीस.या आणि इतर काही गोष्टी या अनुभवातूनच शिकायच्या असतात.
तुझ्या वयाचा मी असताना जसा होतो त्यापेक्षा तू तर खूपच बरी वाटते आहेस.मी स्वतः खूप गंभीर चुका केल्या आहेत, त्यामुळे तुला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्याचा माझा प्रयत्न आणि अट्टहास नाही; पण असे वाटत नाही का की,तू यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने हे काम केले असतेस,तर जरा बरे झाले असते ?'
दुसऱ्यांच्या चुकांचा पाढा वाचण्याआधी जर एखाद्याने सुरुवातीलाच हे कबूल केले की,त्याने स्वतःसुद्धा बऱ्याच चुका केल्या आहेत,तर लोकांना त्यांचे दोष त्या व्यक्तीकडून ऐकणे तसे सोपे जाते.
कॅनडामधील ब्रेंडन येथे इ.जी.डिलिस्टोन नावाचा एक इंजिनिअर होता.त्याच्याकडे काम करणाऱ्या नवीन सेक्रेटरीबद्दल तो फारसा खूश नव्हता.जी पत्रे तो सेक्रेटरीला तोंडी सांगून टाइप करायला देत असे ती पूर्ण टाइप झाली की,त्यातील प्रत्येक पानावर दोन किंवा तीन चुका हमखास असायच्या.जेव्हा ती पत्रे त्याच्या टेबलावर सहीसाठी येत तेव्हा हे लक्षात येत असे.मि. डिलिस्टोनने ही परिस्थिती कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळली.ती अशी,
बहुतांश इंजिनिअर्सप्रमाणेच इंग्लिश भाषेवर माझे पूर्ण प्रभुत्व वगैरे नव्हते आणि इंग्रजी स्पेलिंग लिहिण्याच्या बाबतीमध्येही तसा मी बिनचूक नव्हतो.गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट शब्दांच्या स्पेलिंगमध्ये माझ्या चुका होतात.ते सर्व शब्द मी एका वहीत लिहून ठेवून, ती वही सदैव माझ्या ड्रॉवरमध्ये मी ठेवतो. माझ्या हे लक्षात आले की,या नव्या सेक्रेटरीला तिच्या चुका दाखवून किंवा डिक्शनरी वापरायला देऊन हा प्रश्न सुटणार नाही.मग जरा वेगळी युक्ती करण्याचे मी ठरवले.चूक झाल्यानंतर जेव्हा पुढील काही पत्र मी तिला टाइप करण्यास सांगत होतो,त्या वेळीच माझ्या लक्षात येत गेले,की त्यामध्ये काही चुका होत आहेत.मग मी स्वतःच टायपिस्टबरोबर बसलो आणि म्हणालो की,मला का कोण जाणे,पण हा शब्द थोडा खटकतो आहे.या अशा शब्दाच्या स्पेलिंगच्या बाबतीत मला नेहमीच जरा गोंधळायला होते. (मग तो शब्द ज्या ठिकाणी किंवा ज्या पानावर आहे ते पान काढतो.) हे बघ हं! हा तो शब्द.शब्दांच्या स्पेलिंगच्या बाबतीत मी जरा जास्तच सावध असतो,कारण आपली ही पत्रे वाचून लोक आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात. शिवाय स्पेलिंगच्या अशा साध्या चुका दिसल्या की आपली व्यावसायिक प्रतिष्ठाही जरा कमी होते.मला हे समजले नाही की,तिनेसुद्धा मी ठेवत असे तशी अडखळणाऱ्या शब्दांची वही केली की आणखी वेगळे काही केले;परंतु तेव्हापासून तिचा चुका करण्याचा वेग जाणवण्याइतपत मंदावला.इ.स.१९०९ मध्ये एका सभ्य,सुसंस्कृत राजकुमारास बर्नहार्ड व्हॉन बुलॉला तर हे शिकण्याचीच तीव्र गरज पडली.
त्या वेळी व्हॉन बुलॉ हा जर्मनीचा इंपेरियल चान्सिलर होता आणि विल्हेम (दुसरा) सिंहासनावर बसलेला होता.
विल्हेम खूपच गरम डोक्याचा, उर्मट आणि शेवटचा कैसर होता.त्याने अशा बढाया मारल्या होत्या की,आर्मी आणि नेव्हीच्या स्थापनेमध्ये त्याने खूप मोलाची कामगिरी केली आहे आणि त्या कामामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे.नंतर एक आश्चर्यकारक आणि तशी विचित्रच घटना घडली.
कैसरने खूप अविश्वसनीय आणि अतिरंजित गोष्टी सांगितल्या.अशा गोष्टी की,ज्यामुळे फक्त देशच नाही,तर सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का बसला.हे कमी पडले म्हणून कैसरने सार्वजनिक ठिकाणी अगदी जाहीरपणे त्याच्या मूर्खपणाच्या आणि मीपणाच्या पोकळ बढाया मारल्या.या गोष्टी त्याने,जेव्हा तो इंग्लंडला राजकीय पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा केल्या.यावरचढ म्हणजे हे सगळे प्रकार त्याने 'डेली टेलिग्राफ' या वृत्तपत्रात छापण्याची शाही परवानगीसुद्धा दिली.
उदाहरणार्थ,त्याने हे जाहीर केले की,तोच फक्त एकटा असा जर्मन आहे की,ज्याला इंग्लंड आपला मित्र वाटतो.दुसरी गोष्ट म्हणजे जपानवर हल्ला करण्या
करिताच नेव्हीला त्याने अजून बळकट केले होते.तिसरे म्हणजे की,त्यानेच इंग्लंडला रशिया आणि फ्रान्स यांच्यासमोर गुडघे टेकण्यापासून वाचवले होते आणि साउथ आफ्रिकेतील बोअर्सचा पराभव करण्यासाठीचा सर्व आराखडा त्याचाच होता आणि त्यामुळेच इंग्लंडला यश मिळाले.हे आणि आणखी असे बरेच काही!शंभर वर्षांच्या शांततामय काळामध्ये त्या वेळेपर्यंत कुठल्याही युरोपियन राजाच्या तोंडातून अशा प्रकारचे विपरीत,
विचित्र आणि बेताल शब्द बाहेर पडले नव्हते. मधमाश्यांच्या एखाद्या पोळ्यातून घोंघावणाऱ्या माश्या एकदम बाहेर पडाव्यात तसेच काहीसे घडले.इंग्लंड क्रोधीत झाले.जर्मन मुत्सद्दी संतापून लालेलाल झाले.
अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कैसर पार बावचळला आणि त्याने व्हॉन बुलॉला सुचवले की,आता या सगळ्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घ्यावी.कैसरने इच्छा केली की, व्हॉन बुलॉने हे जाहीर करावे की,त्यानेच राजाला असे सर्व बोलण्याचा आणि करण्याचा सल्ला दिला आणि म्हणून सगळी जबाबदारी ही बुलॉची असावी.
व्हॉन बुलॉने या प्रकाराला विरोध केला आणि तो म्हणाला, "महाराज, जर्मनी काय किंवा इंग्लंड काय,मी राजाला हा सल्ला देऊ शकेन यावर कोणाचा विश्वास तरी बसेल का?" ज्या वेळी व्हॉन बुलॉच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडले, तेव्हा त्याच्या डोक्यात एक धोक्याची घंटा ठणाणली आणि आपण एक फार गंभीर चूक केली आहे,
हे त्याला जाणवले.हे ऐकून कैसर उसळलाच.कैसर म्हणाला, "मी तुला गाढव वाटलो का? तुझे असे म्हणणे आहे की ज्या चुका तू करू शकत नाहीस,त्या मी केल्या आहेत?" व्हॅन बुलॉच्या एक मात्र लक्षात आले की,असे बोलण्यापूर्वी त्याने राजाची निदान थोडीतरी स्तुती करायला हवी होती; पण आता त्याला उशीर झाला होता.
नंतर थोडा विचार करून केलेली ही चूक सुधारण्यासाठी त्याने एक चांगली गोष्ट केली.ती म्हणजे या प्रकारच्या टीकेनंतर त्याने आता कैसरची स्तुती करण्यास प्रारंभ केला आणि चमत्कार झाला.
आता तो प्रेमाने आणि आदरपूर्वक कैसरला म्हणाला, "महाराज, मी तुम्हाला असे सुचवणे हे तर माझ्या अकलेच्या बाहेरचे काम आहे.सर्व बाबतीत आपण माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात.अर्थातच मिलिटरी आणि नेव्ही या क्षेत्रांतला अधिकार तर फक्त आणि फक्त आपलाच आहे. हे एवढेच नाही,तर नैसर्गिक शास्त्रसुद्धा तुम्ही जाणता.महाराज,आपण जेव्हा बॅरोमीटर, वायरलेस टेलिग्राफी,राँटजेन रेज या सगळ्याबद्दल बोलता तेव्हा मी किती अडाणी आहे,याची मला जाणीव होते आणि लाजही वाटते.कारण शास्त्र शाखेशी माझा कसलाच संबंध नाही.रसायनशास्त्र,पदार्थविज्ञान हे तर मला कधी समजणारच नाही असे वाटते; पण ऐतिहासिक ज्ञान त्यामानाने जरा बरे आहे आणि राज्यशास्त्राचा माझा अभ्यासही दांडगा आहे आणि मुत्सद्देगिरी मला चांगली जमते."हे ऐकून कैसरचा चेहरा उजळला.व्हॉन बुलॉने त्याची जी स्तुती केली होती,त्यामुळे त्याला अभिमान वाटला.व्हॉन बुलॉने त्याला उच्च पदाला नेऊन ठेवले होते आणि त्याच्यासमोर तो नतमस्तक झाला होता. या अशा परिस्थितीमध्ये कैसरने कसलीही चूक माफ केली असती.तो त्याला उत्साहाने म्हणाला,"मी तुला म्हटले होतेच की,आपण दोघे एकमेकांची कमतरता भरून काढू शकतो.आता आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहू,नक्कीच राहू!"
कैसरने व्हॉन बुलॉचा हात हातात घेऊन अभिवादन केले.एकदा नाही तर बऱ्याच वेळा.नंतर दिवसभर तो खूप खुशीत होता इतका की,एकदा तर मूठ आवळून ओरडून तो म्हणाला की, जर कोणी व्हॉन बुलॉच्या विरुद्ध माझ्याकडे काही कागाळी केली,तर मी त्याच्या नाकावर ठोसा मारीन.
व्हॉन बुलॉने वेळेवर स्वतःला सावरले; पण तो एक हुशार आणि मुत्सद्दी व्यक्ती असूनसुद्धा ही चूक केली होती.त्याने स्वतःचे दोष सांगूनच बाकी विषयाला सुरुवात करायला हवी होती.स्वतःकडे थोड्या प्रमाणात कमीपणा घेऊन समोरच्या व्यक्तीचे गोडवे गायल्याने आणि स्तुतीची काही वाक्ये बोलल्याने संतापी,अपमानित कैसरसुद्धा जिगरी दोस्त बनतो,तर विचार करा की,नम्रपणा आणि स्तुती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काय जादू करेल... योग्य पद्धतीने जर त्याचा अवलंब केला, तर मानवी संबंधात खरोखर चमत्कार घडतील.
आम्ही जरी आमची चूक सुधारू शकलो नाही तरी आपली स्वतःची चूक कबूल करून समोरच्याची वागणूक बदलण्यात मदत मिळते.(डेल कार्नेगी-मित्र जोडा- मंजुल पब्लिशिंग हाऊस-अनु- कृपा कुलकर्णी )
याचा प्रत्यय आम्हाला टिमोनियम,मेरीलँडच्या क्लरेंस यांच्या उदाहरणामार्फत येतो.क्लॅरेंसच्या लक्षात आलं की त्याचा पंधरा वर्षीय मुलगा डेविड सिगारेट ओढू लागला आहे.क्लरेंसने आम्हाला सांगितले, "उघड आहे की त्याचं सिगारेट ओढणं मला आवडलं नव्हतं.पण त्याची आई अन् मी दोघेही सिगारेट ओढत होतो. याप्रकारे आम्ही प्रत्येक वेळी त्याच्यासमोर एक वाईट उदाहरण ठेवत होतो.मी डेव्हिडला सांगितलं की मी त्याच्या वयात सिगारेट ओढण्यास सुरुवात केली होती आणि निकोटीनसमोर मीसुद्धा हरलो आहे.आता ती सोडणं माझ्यासाठी अशक्य आहे.मी त्याला सांगितलं,सिगारेट ओढण्यामुळेच मला कफचा इतका त्रास होत होता आणि मी त्याला हेसुद्धा सांगितलं की त्याने स्वतःच मला सिगारेट सोडण्याबद्दल अनेक वेळा सल्ला दिलाय.
"मी त्याला सिगारेट सोडण्यावर फार मोठे भाषण दिले नाही,त्याच्या धोक्यांबद्दल कुठला इशारा दिला नाही आणि त्याला सिगारेट ओढायला मनाईसुद्धा केली नाही.मी त्याला फक्त सांगितलं की मला सिगारेट ओढायची सवय कशी लागली आणि त्यामुळे मला किती नुकसान झेलावं लागलं."त्याने याबाबतीत काही वेळ विचार केला आणि मग निर्णय घेतला की तो कॉलेज पूर्ण होईपर्यंत सिगारेट ओढणार नाही. या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेलीत, पण डेव्हिडने अजूनही सिगारेटला हात लावला नाही.
भविष्यातही तो सिगारेट ओढणार नाही.
"या चर्चेनंतर मीसुद्धा सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या परिवाराच्या मदतीने त्यात यशस्वी झालो."
एक चांगला नेता या सिध्दान्ताचं पालन करतो.
कुणावर टीका करण्याआधी आपल्या चुका कबूल करा.