* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: टीका करा; पण हळुवार.. criticize; But slowly..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/११/२३

टीका करा; पण हळुवार.. criticize; But slowly..

चार्ल्स स्क्वॅब एक दिवस आपल्या स्टील मिलमध्ये फिरत होते,तेव्हा त्यांनी काही कर्मचाऱ्यांना सिगारेट पिताना बघितलं.त्यांच्या डोक्यावरच पाटी लागली होती,'धूम्रपान वर्जितक्षेत्र' हे बघून स्क्वॅब पाटीकडे बोट दाखवून म्हणू शकला असता,'तुम्ही हे वाचू शकत नाही का?' पण ही स्क्वॅबची पध्दत नव्हती.स्क्वॅब त्या लोकांपाशी गेले.त्यांनी त्यांना एक एक सिगार दिली आणि म्हटलं,"हे बघा,मला तुम्ही ही सिगार बाहेर जाऊन प्यायलात तर खूप आवडेल." कर्मचाऱ्यांना माहित होतं,की स्क्वॅबनं त्यांना नियम तोडताना पाहिलं होतं.पण त्यांच्यावर स्क्वॅबचा वेगळाच प्रभाव पडला.कारण त्यांनी त्यांना एक लहानसा उपहार दिला होता.त्यांना रागावले नव्हते आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून दिली होती. अशा व्यक्तीला कोण पसंत करणार नाही ?


जॉन वानामेकरनेसुद्धा याच तंत्राचा अवलंब केला.

वानामेकर फिलाडेल्फीयातल्या आपल्या मोठ्या दुकानात दिवसातून अनेक वेळा चक्कर मारीत असत.एकदा त्यांनी दुकानात एक ग्राहक काही वेळ काउंटरवर वाट पाहताना बघितलं. कोणताच विक्रेता आणि कारकून तिच्याकडे लक्ष देत नव्हता.विक्रेते एका कोपऱ्यात उभे राहून गप्पा आणि गंमत करीत होते.वानामेकरने कुणाला काहीच म्हटलं नाही.त्यांनी गुपचुप काउंटरच्या मागे जाऊन या महिलेला सामान दिले आणि जाताना सेल्समनला ते सामान बांधून द्यायला सांगितलं.


सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेणं सर्वसाधारण लोकांना सोपं नसतं.ते लोक व्यग्र असतात आणि अनेकदा तर अतिउत्साही कर्मचारी आपल्या साहेबांना व्यग्र बघून लोकांना त्यांच्या भेटीपासून रोखतात.ऑरलँडो फुगेरिडाचे मेयर कार्ल लँगफोर्ड यांनी अनेक वर्षे आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन ठेवले होते की जनतेला त्यांना भेटण्यापासून रोखू नये.त्यांची पध्दत 'उघड्या दरवाज्याच्या' नीतीची होती. याउपर सचिव आणि प्रशासक लोक नागरिकांना त्यांना भेटू देत नसत..


कार्लला हे समजले,तेव्हा त्यावर त्याने आणखी एक जालीम उपाय शोधला.त्याच्या ऑफिसचा दरवाजाच त्याने काढून कवाडे खुली केली. या रीतीने प्रतिकात्मकरीत्या महापौराने दार काढून टाकले म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचा राज्यकारभार पारदर्शक होता,याची लोकांना जाणीव झाली.शिवाय त्याच्या हाताखालच्या लोकांनाही कार्लला काय म्हणायचे आहे ते कळले.


एक तीन अक्षरी शब्द.त्याचा उच्चार टाळल्यास समोरचा माणूस चिडणार नाही किंवा जास्ती आक्रमकसुद्धा होणार नाही.. यश आणि अपयश यांच्यातील ही सीमारेषाच म्हणा ना.हा शब्द कोणता ? तो म्हणजे 'परंतु बऱ्याच लोकांना एक अशी सवय असते की,ते प्रथमतः समोरच्या व्यक्तीची स्तुती करतात आणि नंतर 'परंतु' असे म्हणून कडक टीकासुद्धा करतात.एक उदाहरण पाहू.एखाद्या विद्यार्थ्याचा त्याच्या अभ्यासाविषयीचा दृष्टिकोन बदलायचा आहे,तर आपण म्हणतो की,'उत्तम!! खरेच आम्हाला तुझा अभिमान वाटतो.अभ्यासात तुझी प्रगती चांगली आहे;परंतु तू जर बीजगणिताचा थोडा जास्त

अभ्यास करू शकला असतास,तर तुला यापेक्षा अधिक मोठे यश मिळाले असते.'


आता या उदाहरणामध्ये त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत तो 'परंतु ' हा शब्द ऐकू येत नाही, तोपर्यंत खूप उत्साह वाटेल;पण त्यानंतर आधी केले गेलेले त्याचे कौतुक खरे का खोटे अशी शंका त्याच्या मनामध्ये येईल.त्याला असे जाणवेल की,खरेतर यांना कौतुक करायचेच नव्हते.टीका करायला एक कळ किंवा स्टार्टर म्हणून हे कौतुकाचे नाटक ! या वागण्यामुळे बोलणाऱ्यांची विश्वासार्हता ही धोक्यात येते अणि मग मुख्य हेतू साध्य होणे अवघड होऊन जाते. याबरोबरच आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाविषयीचा दृष्टिकोन बदलताना कष्ट पडू शकतात.

खरेतर आपल्याला हे टाळता येते;पण कसे?तर फक्त एक करायचे.ते म्हणजे 'परंतु' या शब्दाचा वापर न करता 'आणि' हा शब्द वापरायचा.आता आधी आपण पाहिलेले वाक्य कसे होईल ते बघू - 'उत्तम! खरेच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. अभ्यासात तुझी प्रगती चांगली आहे आणि तू जर बीजगणिताचा थोडा जास्त अभ्यास करू लागलास, तर खात्रीने तुला यापेक्षा अधिक मोठे यश मिळेल.'


अशी केलेली स्तुती त्याला जास्त आवडेल, कारण यामध्ये त्याच्या बीजगणितातील अपयशाचा उल्लेखसुद्धा नाही.

आपण आता त्याच्या वागणुकीकडे लक्ष वळविलेले आहे आणि अप्रत्यक्षरीत्या त्याची वागणूक बदलावी, अशी आपल्याला अपेक्षा आहे.यामुळे परिस्थितीमध्ये काही बदल घडण्याची शक्यता आहे.याबरोबरच तुमच्या बीजगणिताबद्दलच्या अपेक्षा त्याच्याकडून पूर्ण होण्याचीसुद्धा शक्यता आपणच निर्माण करीत आहोत.


अप्रत्यक्षपणे आपण चुकांकडे लक्ष वेधले,तर संवेदनशील व्यक्तींच्या बाबतीत याचा सकारात्मक परिणाम दिसतो;

परंतु याउलट जर आपण खुलेपणाने टीका केली,तर ते मात्र मनात कडवटपणा निर्माण करणारे ठरते.टोडे आयलंड येथील मार्गी जेकब हिने तिच्या क्लासमधील बांधकाम सुरू असताना तिथे असणाऱ्या मजुरांकडून अंगणातील पसारा कशा पद्धतीने आवरून घेतला हे आपण पाहू.


जेव्हा तिच्याकडे बांधकाम सुरू झाले,तेव्हा ज्या वेळी ती ऑफिसमधून घरी परत येई तेव्हा तिच्या असे लक्षात येत असे की,समोरील अंगणामध्ये सर्व साहित्य जसे लाकडाचे तुकडे,सिमेंटची पोती वगैरे अस्ताव्यस्त पसरलेले आहे.त्या कामगारांना बोलण्याची किंवा त्यांचा अपमान करायची तिची इच्छा नव्हती,कारण त्यांचे मुख्य काम ते उत्तमरीत्या करीत होते.एक दिवस सर्व कामगार निघून गेल्यानंतर तिने आणि तिच्या मुलांनी मिळून सगळे साहित्य आणि दगड,विटा,इत्यादी एकत्र करून अंगणाच्या एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवून दिले.


दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यातील मुकादमाला तिने जरा बाजूला बोलावून सांगितले की,काल परत जाताना तुम्ही लॉनवरील सर्व वस्तू आणि पसारा आवरून ठेवल्याने खचप बरे झाले.लॉन स्वच्छ व नीटनेटका करून परत गेल्यामुळे आता बाजूच्या लोकांनी कोणत्याच प्रकारचा आक्षेप घेतला नाही आणि खूप बरे ते आता तसे करणारसुद्धा नाहीत.गंमत म्हणजे त्या दिवसापासून कामगारांनी सर्व पसारा उचलून अंगणाच्या कोपऱ्यात नीटनेटका रचून ठेवायला सुरुवात केली आणि तो मुकादम स्वतः काम संपले की,दिवसाच्या शेवटी सर्व काही ठीकठाक केले आहे की नाही हे जातीने बघायला लागला.


एक वादाचा पण महत्त्वाचा मुद्दा; सैन्यातील राखीव दलाची शिकाऊ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्यामध्ये सहसा असतो.ते म्हणजे कॅडेट्सची हजामत! राखीव दलातील मुलांना वाटते की,ते सिव्हिलियन्स आहेत.

यामुळे त्यांना बारीक केस कापून घेणे किंवा केस बारीक ठेवणे हे मान्य नसते.


सार्जंट हालें कैसर हा ५४२ यूएसएसआर येथे प्रशिक्षक म्हणून ड्युटीवर होता.त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी आलेली राखीव दलाची एक तुकडी होती.जर तो जुन्या विचारांचा सार्जंट असता,तर तो त्या कॅडेट्सवर बरसला असता, त्यांना धमक्या दिल्या असत्या.याऐवजी त्याने 'हजामतीचा' मुद्दा हा अप्रत्यक्ष रीतीने हाताळायचे ठरवले.त्याने त्याच्या तुकडीस सांगितले की,माझ्या मित्रांनो,या पुढील काळात तुम्ही नेतृत्व करणार आहात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नेतृत्व कराल तेव्हा ते निश्चितच खूप परिणामकारक असेल आणि लोकसुद्धा त्याचे उदाहरण देतील व तुमचा आदर्श ठेवण्यास सांगतील.

तुम्हाला हे माहीत आहेच की, 'आर्मीच्या हेअरकट'बद्दल मिलिटरीमध्ये कोणते नियम आहेत. मी स्वतः आज माझे केस त्याप्रमाणे कापून घेणार आहे.कदाचित,ते तुमच्यापेक्षाही बारीक कापणार आहे. तुम्ही सर्वांनी आरशात स्वतः कडे पाहा आणि जर तुम्हास मनापासून वाटले की,'आर्मी स्टाइल हेअरकट केल्यानेसुद्धा तुम्ही आदर्श ठरू शकता, तर मग न्हाव्याच्या दुकानामध्ये जाण्याकरिता आपण ठरावीक वेळेचे नियोजन करू.


या बोलण्याचा परिणाम जसा अपेक्षित होता तसाच झाला.अनेक कॅडेट्सनी आरशामध्ये बघितले आणि दुपारी न्हाव्याकडे जाऊन आर्मी स्टाइलचा हेअरकट अर्थात सोल्जरकट करून घेतला.सार्जंट कैसरने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे कौतुक करताना म्हटले की,मला तर आत्ताच तुमच्यामध्ये उत्तम नेतृत्वगुणाचे दर्शन होत आहे.प्रसिद्ध वक्ते हेन्री वॉर्ड यांना ८ मार्च १८८७ रोजी मरण आले.पुढच्याच रविवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता लॅमन अ‍ॅबटला आमंत्रित केले होते.त्या दिवशीचे आपले भाषण प्रभावपूर्ण व्हावे याकरिता अ‍ॅबटने ते एकदा लिहिले,दोनदा लिहिले आणि त्यामध्ये बरीच खाडाखोडसुद्धा केली.त्याला जो संदेश द्यावयाचा होता तो जास्तीत जास्त प्रभावी ठरण्याकरिता त्याने खूपशी मेहनतही घेतली. त्यानंतर ते त्याने त्याच्या पत्नीला वाचूनही दाखवले.बाकीच्या भाषणांप्रमाणेच ते अतिशय सुमार दर्जाचे झाले होते.त्याचा पत्नीला त्याच्या स्वभावाची जरासुद्धा समज नसती,तर ती स्पष्टपणे म्हणाली असती की,लॅमन,हे अतिशय भयंकर आहे.हे भाषण कोणीही ऐकणार नाही. कदाचित,हे ऐकताना सगळ्यांना खूप झोपही येईल.हे ऐकताना जणू काही ज्ञानकोश कोणी वाचत आहे असेच वाटते आहे.तू एखाद्या साध्या माणसासारखे सरळ का बोलत नाहीस? तुला सामान्यांसारखे का वागता येत नाही ? तू जर हे भाषण वाचलेस,तर सगळे तुझीच चेष्टा करतील.याप्रमाणे ती म्हणू शकली असती; पण तिने तसे केले नाही.याचे कारण म्हणजे अतिस्पष्ट बोलण्याचे परिणाम तिला माहीत होते.

याऐवजी तिने त्यावर एकच शेरा मिस्कीलपणे मारला.ती म्हणाली की,तुझे हे भाषण खरेतर नॉर्थ अमेरिकन रिव्ह्यूकरिता एक उत्कृष्ट अग्रलेख म्हणून तू प्रसिद्ध करू शकतोस ! वेगळ्या शब्दांत जर सांगावयाचे,तर त्याच्या लिखाणाचे तिने तसे कौतुक केले आणि मोठ्या कौशल्याने तिने हेसुद्धा सांगितले की,हे भाषण म्हणून पूर्ण अयोग्य आहे.लॅमन अ‍ॅबटला तिचा मुद्दा ताबडतोब समजला.त्याने लगेचच ते लिखाणाचे कागद फाडून टाकले आणि मग कसलीही पूर्वतयारी न करता ज्याप्रमाणे सुचेल तसे भाषण केले..


इतरांच्या चुका सुधारण्याचा वेगळा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्याव्यात.


२१ .१०.२३ या लेखामालेतील पुढील लेख..