* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सतत आठवणारी भाऊबीज A brother who remembers constantly

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/११/२३

सतत आठवणारी भाऊबीज A brother who remembers constantly

म्हातारी....


बरोबर दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग... आज आठवण्याचे कारण म्हणजे मागील दिवाळीत ती नव्हती... या दिवाळीत सुद्धा नव्हती आणि पुढेही कधी नसणार...!


ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी.... 

वय असावं साधारण साठीच्या आसपास...

ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची...

येता जाता मी तीला पाहायचो...मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण ती कधी दाद द्यायची नाही.... 


तीला अंधुक दिसायचं... जवळपास नाहीच...


वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे,परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली.... वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं.... 


मी तिच्या यजमानांची मैत्री करण्याचा प्रयत्न केला,परंतु त्यांनीही दाद दिली नाही मला याचं काहीच कारण कळत नव्हतं.... 


असंच वर्ष निघून गेलं...


पावसाळा सुरू झाला,एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो,माझ्या अंगावर रेनकोट होता.... सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं,ते दोघे भिजत होते... पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते.... !


सगळ्यांनीच छळलं होतं.... पाऊस बरा यांना सोडेल?


खूप वाईट वाटलं..परंतु ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते... मी तरी काय करणार ? 

तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली.... पाऊस  धो धो कोसळत होता... ते भिजत होतेच...ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिक ची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला.... 


तिला दिसत नव्हते...तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ? 


यजमानांनी तीच्या कानात काहीतरी सांगितले. 


मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली.... ए बाबा... हिकडं ये....


मी छता खाली गेलो,' मला म्हणाली तू हायस तरी कोण?  आनी आमच्या मागं का लागला हायस? तुला काय पाहिजेन.... जगू दे ना बाबा हित तरी सुखानं...


घरातून बाहेर पडलेले हे दोघे....


जगाने यांना,या ना त्या कारणाने खुप फसवले होते,आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता....


अनेकांनी यांना धोका दिला होता....


खरंच,विश्वास किंमती असेलही पण धोका खूप महाग असतो...!


पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो,मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं.... माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही झाली तर मदतच होईल याची मी त्यांना खात्री दिली...!


मी निघालो जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं... यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो,जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो.... बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल  आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.


तीचं मत आता माझ्याविषयी बदलत चाललं... मी तीला फसवणार नाही,याची तीची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला....


यानंतर तीला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली आणि ... शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं.... 


एका पायान ती अधू  होती.... तीला मग एक  व्हीलचेअर पण घेवून दिली....


आता नाती घट्ट झाली होती....


मी तीला गमतीने,प्रेमाने नेहमी "ए म्हातारे" असं म्हणूनच हाक मारायचो.तीला बाकी कशाचा नाही,पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा, बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची....


दरवेळी ती मला म्हणायची, ' म्हातारे नको ना म्हणू.... ताई म्हणत जा की मला'


मी तिचं ऐकायचो नाही..... मी तीला ए म्हातारेच म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची,तोंडातून शिव्या यायच्या,मला मस्त गंमत वाटायची..  


वर अजून म्हणायचो,'म्हातारीच तर आहेस.... तुला काय ताई म्हणायचं गं ?'  यावर  चिडून ती चप्पल दाखवायची....


लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट साड्या पैसे असं बरच काही द्यायचे.... 


दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तीला भिकेमध्ये  मिळालेल्या शर्ट पॅन्ट बूट अशा अनेक वस्तू ती मला भेट म्हणून द्यायची....बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही हे ती  माझ्या अंगाला लावून बघायची.... तीला मिळालेले फाटके बूट..... त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची.... 'होतील गं दे मी घालतो असं म्हणून,'गुपचूप मी त्या  गोष्टी घ्यायचो.... 


'व्वा...मला असाच शर्ट हवा होता' असं मी तीला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा....


'मला असाच बूट हवा होता आणि तू नेमका  आज तू तसाच दिलास' म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं.... 


भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ....


'शर्ट आणि बूट घाल बरं का..... न्हायी बसला तर फूडल्या बारीला देते' हे पण ती आठवणीने सांगायची... 


अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे.... 


ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची    संग्रहालयं उभारली....आठवणीसाठी स्मारक बांधली...खूप नंतर कळलं..... स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही....


स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात....! 

मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं...भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं...! 


तू डॉक्टर मी अडाणी,तू जरा बऱ्या घरातला मी रस्त्यावर राहणारी,असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे.... तीला मी म्हणजे तीच्या कुटुंबाचाच  एक भाग वाटतो.. ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही....ती मला तिच्याच सारखा समजते.... तिने मला तिच्याच सारखं समजणं,हा मी माझा विजय मानतो.


मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो...अद्वैत ही संकल्पना नुसती वाचली होती तीच्या मुळे मला अनुभवायला मिळाली.


लोक बाहेर सर म्हणतात,हि मला मूडद्या म्हणते...


एरव्ही,आपणास कधी वेळ असतो ? कधी आपणास फोन करू ? लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात...


ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते,' मुडद्या मेलास का जिवंत हायेस ? भयनीची काय आटवण हाय का नाय ? म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते.... 


मी हसत तीला म्हणतो,बहीण कसली तू कैदाशीन आहेस,हडळ आहेस म्हातारे ... 


मग काय .... यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो.... 


त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो.... ! 


वजन फुलाचं होत असेलही.... सुगंधाचं करता येत नाही....


अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा,परंतु त्या अगरबत्ती पासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ....? 


ती तशीच होती काटेरी फणसासारखी... बहिण म्हणून ती करत असलेली "माया" मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही.... 


तीला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता, त्या झोपड्याला तीने घर म्हणून रूप दिलं होतं.मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.लोक भीक देत होते,त्यात तिची गुजराण होत होती,परंतु माझी बहीण,भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता...


आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती....एकदा तीला म्हणालो,'अशी भीक घेण्यापेक्षा 'चार पैशे' कमव... काहीतरी धंदा आपण सुरू करू....' ती म्हणाली होती,' मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय....? '


मी म्हणालो होतो,'नाही ना,तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल  घाललं .... '


यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात.... 


यानंतर मी तीला पाच ते दहा विक्री योग्य वस्तू विकत आणून दिल्या होत्या आणि तीला म्हणालो,'बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर.'


तीने माझं ऐकलं....  मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तीने त्या फूटपाथ वरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या...... व्हीलचेयर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली.... येणार्‍या-जाणार्‍या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली.... व्यवसाय हळूहळू वाढत गेला.मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तीने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली.आता वस्तू ठेवायला घर पुरेना... हे कर्तुत्व तिचं होतं ....!


तीला मी फक्त एक हात दिला होता,तीने या संधीचे सोनं केलं.... ती आकाशात  भरारी  घेत  होती....!


कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तीच्या दारावर यायचा.... या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. 


स्वतःला जाणवते ती वेदना पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ती म्हणजे संवेदना....!


तीने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता....आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा..... कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात...? 


मी तिला मनोमन नमस्कार करायचो.


ती मला नेहमी म्हणायची,'एवढ्या लोकांचं करतोस,याचं पण पांग फेड बाबा,या अधू पोरासाठी पण कायतरी कर.... ' कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले,तो आता स्वतःच्या पायावर चालतो, यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. त्याचं सर्व छान झालं,या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल,तर तीला...!


दुसर्‍याच्या आनंदात आपलं सुख मानणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं .... बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा  होतं नसतो....!


मोठं होणं म्हणजे maturity येणं....!

किती कॅरेटचं सोनं घातलंय यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity....!

चुका  शोधायला मेंदू लागतो.... पण माफ करायला हृदय.... हे समजणं म्हणजे maturity....!


.... अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं.... तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले....कृतज्ञतेने म्हणाली,'ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा'खरंच तिची भरभराट झाली होती.... पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तीला भरभराट म्हणायचं का ? मुळीच नाही.....


काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट.... सर्वकाही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट… पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट...


चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे...


स्वतःचा विकास करत असताना,या सर्व प्रवासात तीने रस्त्यावरच्या आणखी एका व्यक्तीला हात दिला होता.... याचंच मला जास्त अप्रूप  !


दिवसेंदिवस ती उन्नती करत होती... रस्त्यावर व्यवसाय करताना तिला अनंत अडचणी सुद्धा येत होत्या परंतु त्यातून ती मार्ग काढत होती... 


फुंकर मारल्याने दिवा विझतो..... अगरबत्ती नाही....!

जो दुसऱ्याला सुगंध  देतो तो कसा विझेल....?


रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास.... मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे.... नव्हे अनुभवलाय....


स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना,आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती....!


ती शिकली नाही,तीची भाषा ओबड-धोबड आहे....पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे...! 


या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं....


भाऊबीजेच्या दिवशी तीने फुटपाथवर तीच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई अंथरली.... तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले...मी तिला ओवाळणी दिली.


तीने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला.... पेढ्याचा बॉक्स वरच भागवते म्हातारे... मला वाटलं जेवायला बोलवशील...', मी हसत  म्हणालो.


'म्हातारी म्हणू नगो ' तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत,हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली. 


'बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण...' मुद्दाम मी तिला उचकवलं .... आता पुढं काय होणार हे मला  माहित होतं...


'म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या... ' म्हणत तीने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती....

एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखी जास्त काय हवं ....?


माझ्या आईच्या वयाची ती बाई,आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो. 


तिच्या पाया पडत म्हणालो,'तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही,तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे....परंतु खरं सांगू का ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे....!' तीच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं...


तीला म्हणालो,'अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस,मात्र जेव्हा स्वतः सावरलीस

,तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस हे सारं काही एक आईच करू शकते ना ....


आता तीच्या डोळ्यात पाणी होतं.... ती म्हणाली,'पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय,रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय हे सुदा मला म्हाईत हाय,मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस .... डोक्यावर छत टाकलस .... पोटातली भूक भागवलीस....  तू माजा कुनीही नसताना माज्या साटी तू हे केलंस... मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास....


म्हणलं,चला बीन बाळंतपनाचं या वयात आपल्याला बी पोरगं झालंय.... तर संबळु या अपंग  पोराला.... आपुन बी या वयात आई हुन बगु.... मी आय झाले आन ह्यो बाप......'  तीने नवऱ्याकडे  बोट दाखवत म्हटले....!


आता डोळ्यात पाणी माझ्या होतं....!

म्हटलं, 'म्हातारे तू लय मोटी झालीस.... '


यावेळी "म्हातारी" म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली.... 


हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली... त्यातून एक शर्ट काढला .... एक साडी घेतली आणि मला म्हणाली, 'दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ? तू घिवून जा,नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे... तीला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय....' 


हा "भरजरी पोशाख" मी घेतला.... 


गाडीला किक मारली आणि तीला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो,'जातो मी माई...'


ती म्हणाली,' ए मुडद्या,जातो म्हणू न्हायी.... येतो म्हणावं.... आनी हो.... माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगोस, मला आपली म्हातारीच म्हन....मी तुजी म्हातारीच हाय....! मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो.... 


आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो..! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

डाॕक्टर फाॕर बेगर्स,१३ नोव्हेंबर २०२१