* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय… Gift card only twenty rupees...

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/११/२३

भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय… Gift card only twenty rupees...

साताऱ्याचे श्री. प्रकाश देवकुळे या अवलिया माणसाचं नाव अनेक जणांना निश्चित माहिती असेल.

कलावंत माणूस.... ! 


"माणूस" म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस...! 

दिलीप कुमार यांच्यावर अतिशय प्रेम...


इंग्लिश ग्रीटिंग कार्ड ला मराठी बाज देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा...!


या माणसाने मला मुलगा समजून पोटाशी धरले…आणि मायेची सवय लावून एकाकी टाकून अचानक सोडून सुद्धा गेले... 


माझ्याशी बोलताना नेहमी ते "आब्या लेका..." या वाक्यानंच सुरुवात करायचे... ! 

मी त्यांना काका म्हणायचो. 

एके दिवशी काकूंचा मला फोन आला आणि म्हणाल्या,'काकांनी बनवलेली जवळपास दोन ते अडीच हजार ग्रीटिंग कार्ड घरात पडून आहेत, ती तुला देते,तू या दिवाळीनिमित्त तुझे मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक आणि जवळचे लोक यांना ती भेट दे.'


'तुझ्या ताब्यात ती ग्रीटिंग कार्ड आली तर काकांना बरं वाटेल', हळव्या आवाजात काकू बोलल्या होत्या...


मी ही सर्व ग्रीटिंग कार्ड घरी घेऊन आलो आणि मनातल्या मनात आता ही ग्रीटिंग कार्ड कोणा कोणाला द्यायची याचा विचार करायला लागलो. 


काकू म्हणाल्या होत्या,'ही ग्रीटिंग कार्ड दिवाळीनिमित्त तुझे मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक आणि जवळचे लोक यांना ती भेट दे.'


आता माझी "मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक आणि जवळचे लोक" म्हणजे माझी याचक मंडळी...! 


यांना ही ग्रीटिंग कार्ड देऊन काय उपयोग ? 


ग्रिटींग कार्डने काय पोट भरणार आहे थोडंच त्यांचं ? 


की दिवाळी गोड होईल त्यांची ... ?


आणि झटकन मनात एक विचार चमकून गेला... 


होय,ही ग्रीटिंग कार्ड या याचक मंडळींना दिली तर त्यांचं पोटही भरेल आणि दिवाळी सुद्धा गोड होईल... ! 


१०० आणि १५० रुपयांचं हे एक ग्रीटिंग कार्ड जर माझ्या याचक कुटुंबाला दिलं आणि त्यांनी ते रस्त्यावर फिरून अगदी वीस रुपयात जरी विकलं तरी त्यांना याचे पैसे मिळतील..! 


१००-१५० रुपयांचं कार्ड 20 रुपयांत कुणाला नकोय.? 


ठरलं तर मग... ! 


या ग्रीटिंग कार्ड चे १००/१०० चे गठ्ठे केले आणि आज मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून, माझ्या कुटुंबातल्या अंध-अपंग अशा २५ बांधवांना हे गठ्ठे ते बसतात.तिथे जागो-जागी नेवुन दिले. 


२० रुपयाला एक याप्रमाणे हे विकले तर १०० ग्रीटिंग कार्ड चे रू.२००० दिवाळी सुरू होण्या अगोदर यांना मिळतील. हातात ही भेटकार्ड पडल्या पडल्या अनेकांनी तर रस्त्यांतच ग्रिटींग कार्डची मांडणी सुद्धा केली... 


आणि रस्त्यावरच्या येणा-या जाणाऱ्या कडे पाहुन आवाज देवु लागले... 


चला घ्या वीस रुप्पय... वीस रुप्पय... भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय ...! 


माझ्यासमोरच बघता बघता व्यवसाय सुरुही झाला. 


अर्थात सर्व ठिकाणी बोहनी माझ्या नी मनिषाच्या हातची !


आनंदाची बाब अशी,की यातील अनेक मंडळी मला म्हणाली,विक्रीतील काही पैसे आम्ही तुम्हाला परत करु म्हणजे,त्या पैशातुन तुम्हाला 'आमच्यासारख्या आजुन  दोगाचौगांना मदत करता येईल...!'त्यांना हे असं वाटायला लागणं,याहुन मोठा आनंद कोणता असेल ??


मंगला थिएटर शिवाजीनगर,कॕम्प परिसर,सेंट अँथनी चर्च,शनिवारवाडा परिसर याठिकाणी २० रुपयांत कुणी अंध अपंग बांधव ग्रिटींग कार्ड विकतांना दिसला तर बेशक तो माझा "नातेवाईक आणि आप्तेष्ट " समजावा !

माझ्या नात्यातल्या या "माणसांना" कष्टकरी व्हायचंय... गांवकरी व्हायचंय... !  यांना भीक देवुन परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी होण्यासाठी मदत करु,या दिवाळीत. ! 


फटाके उडवुन पाच सेकंदांची रोषणाई करण्यापेक्षा फक्त एक दिवा लावु, कुणाच्यातरी आयुष्यात कायमचा "प्रकाश" उजळवु,या दिवाळीत ... !


सगळी ग्रीटिंग कार्ड याचक मंडळींमध्ये विक्रीसाठी वाटून संपली आणि मी भानावर आलो... 


मी जे केलं ते काकूंना आवडेल का ???


मग मी काकूंना भीत भीत फोन लावला आणि मी जे केलं ते सविस्तर सांगितलं... खरंतर मी आधीच सांगून परवानगी घ्यायला हवी होती. 


पण आधी करायचं आणि नंतर कबुली द्यायची ही वाईट खोड माझी आधीपासुनचीच...


असो...!


फोनवरच माझं बोलणं झाल्यानंतर पलीकडे शांतता होती. मला वाटलं,मी जे केलं,ते काकूंना ते आवडलं नसावं.बर्‍याच वेळाने पलीकडून एक अस्पष्ट हुंदका ऐकू आला...! 


थरथरत्या आवाजात काकू म्हणाल्या..., 'लग्न झाल्यापासून प्रत्येक दिवाळ सण आम्ही दोघांनी मनापासून साजरा केला.पण या दिवाळीला मात्र ते नाहीत... !'


'रस्त्यात भेटून प्रत्येकाच्या हातात ग्रीटिंग कार्ड देऊन,शुभेच्छा देण्यात आणि घेण्यात त्यांना खूप आनंद वाटायचा... !' 


'आज वेगळ्या पद्धतीने नेमकं तु तेच केलंस... तू नुसत्या शुभेच्छा नाही दिल्यास,तर या लोकांच्या आयुष्यात ख-या अर्थानं आनंद फुलवलास.... आज काका असते तर त्यांनी तुला डोक्यावरच उचलुन घेतलं असतं.... आज तु जे केलंस,मला वाटतं हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरेल...! 


यापुढे काकू काहीच बोलल्या नाहीत... पण मला मात्र फोनवर हुंदके ऐकू येतच राहिले... ! 


मी फोन ठेवला आणि माझ्या कानावर हाक आली..., 'आब्या लेका....'


मी चमकून इकडं तिकडं पाहिलं... पण आसपास कुणीच नव्हतं. 


का कुणास ठाऊक पण,

माझं लक्ष आभाळाकडे गेलं... 


आज आभाळ सुद्धा काकांच्या रुपात हसत आहे,असा मला भास झाला... !


मनोमन प्रकाश देवकुळे काकांना नमस्कार करुन,मी ही माझ्या मंडळींच्या आवाजात आवाज मिसळला.... 


चला घ्या वीस रुप्पय... वीस रुप्पय... भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय... !!!


१०  नोव्हेंबर २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे 

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर