* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस Philosopher Emperor Marcus Aurelius

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/११/२३

तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस Philosopher Emperor Marcus Aurelius

रोमच्या पहिल्या आठ सम्राटांपैकी पाचांचे खून झाले! या आठानंतरच्या सम्राटांपैकी पुष्कळसे मारेकऱ्यांकडून मारले गेले! खरोखर रोमन साम्राज्याचा साराच इतिहास कट,कारस्थाने,खून,लुटालुटी,आक्रमणे,,डाकुगिऱ्या,लंपटता व विश्वासघात यांनी भरलेला आहे.आक्रमण करीत जाण्याचे रोमनांना जणू काय बाळकडूच मिळत असे. 'स्वार्थ व आपण' यांची शिकवण त्यांना जणू आईच्या दुधाबरोबरच मिळे.'प्रत्येक जण स्वतःसाठी;जो मागे रेंगाळेल त्याला सैतान धरील',ही म्हणच जणू त्यांच्या धर्माची शिकवण होती! रोमन राजसत्ता तद्वतच प्रत्येक रोमन व्यक्तीही आपल्या बंधूना धूळ चारून,त्यांच्या आशा,त्यांचे मनोरथ किंबहुना त्यांचे देहही धुळीस मिळवून स्वतः पुढे येण्याची खटपट करीत असे.रोम इतर देशांना त्याप्रमाणेच रोमन माणूस इतरांना - स्वकीयांनाही लुटूनच पुढे आला पाहिजे,असा जणू नियमच होता!प्रत्येक जण पुढारी होण्याची खटपट करी.अशा विषारी व मारक वातावरणात वाढणारे सम्राट पुढे भलेबुरे करण्याची सर्व सत्ता हाती येताच साधी माणुसकीही गमावून बसत;यात काय आश्चर्य?

ते रानटी पशुंप्रमाणे वा दैत्यांप्रमाणे वागत;यात काय नवल? फारच थोड्या सम्राटांनी शांततेचे व विवेकाचे जीवन जगण्याचा यत्न केला.पण आक्रमक पिसाटांच्या दुनियेत त्यांचेही काही चालत नसे.अशा विवेकी सम्राटांविरुद्ध महत्त्वाकांक्षेने वेडे झालेले सारे माथेफिरू उभे राहत.मूर्खपणाचे राष्ट्रीय धोरण चालविल्यामुळे भोगावी लागणारी फळे मग अशा चांगल्या राजांच्याही वाट्यास येत. 


गादीवर येताच त्यांना सर्वत्र कटाचे व कारस्थानाचे दूषित वातावरणच दिसे.सर्वत्र संशय व धोका! आपल्या पूर्वीच्या सम्राटांनी सुरू केलेल्या पण त्यांच्या हयातीत न संपलेल्या युद्धांना या विवेकी सम्राटांनाही तोंड द्यावे लागे. पूर्वीच्या सम्राटांनी उत्पन्न केलेली भांडणे व युद्धे यातून शांती व सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडे,ती युद्धे यशस्वी करावी लागत.ती भांडणे निभावून न्यावी लागत. सम्राट म्हणून त्यांच्या नावाने नवी द्वाही फिरताच पूर्वजांच्या मूर्खपणाशी व अपराधांशीही ते बांधले जात.त्या अपराधी व सदोष धोरणाच्या शृंखला त्यांनाही जखडून टाकीत.


'सुखी' म्हणून संबोधिले जाणारे रोमचे सम्राट रोमन गुलामांपेक्षाही अधिक दुःखी असत.अशा या रोमन सम्राटांपैकीच शहाणा;पण अती दुःखी सम्राट म्हणजे मार्कस ऑरेलियस.


मार्कस ऑरेलियस हा सम्राट अँन्टोनिनसचा मानलेला दत्तक मुलगा.तो वयाच्या अकराव्या वर्षापासूनच स्टोइक पंथाच्या सहनशील तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला.स्टोईक यतिधर्मी होते.ते दुःख दैवी मानून त्याची पूजा करीत.दुःख भोगावे लागले तरच ते स्वतःला सुखी व भाग्यवान समजत.आत्मा बलवान व्हावा,मन खंबीर व्हावे म्हणून ते कठीण फळ्यांवर झोपत, खाली काही अंथरीतही नसत.ते एक जाडेभरडे वस्त्र अंगावर घेत,ते अंगाला खुपे.तरुण मार्कस ऑरेलियसही अशा हठयोगाचे आचरण करू लागला.पुढे जेव्हा मन व बुद्धी ही परिपक्व झाली,तेव्हा त्याने या मूर्खपणाच्या बाह्य गोष्टींचा व देखाव्यांचा त्याग केला.पण त्या पंथाच्या तत्त्वज्ञानातील मुख्य गाभा मात्र त्याने कधीही सोडला नाही. सम्राट अँन्टोनिनस व मार्कसची आई या दोघांनीही त्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी उत्तेजन दिले व त्या काळातील अत्यंत नामांकित आचार्य त्याच्या अभ्यासासाठी ठेवले. त्यांच्या योग्य देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली त्याने केवळ तत्वज्ञानातच प्रगती केली असे नव्हे,तर काव्य,इतिहास व ललितकला यांचाही चांगला अभ्यास केला.

तो स्वभावतःच विद्याप्रिय होता.


मनाचा विकास होत असता तो अत्यंत सुखी होता.

पुढारीपणा त्याच्या ठायी नव्हता.एक अज्ञात तत्त्वज्ञानी म्हणून राहावे,अशीच त्याची इच्छा होती.पण देवाची इच्छा त्याने सम्राट,वैभवशाली राजाधिराज व्हावे,अशी होती.तो आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१६१

मध्ये) सम्राट झाला.प्लेटो ज्याची वाट पाहत होता,तो राजर्षी शेवटी सिंहासनावर आला. 


पण प्लेटोचे स्वप्न प्रत्यक्षात येणे अद्यापि फार दूर होते.

प्लेटोच्या रिपब्लिकमधील तत्त्वज्ञानी राजाला सज्जन व सुसंस्कृत लोकांच्या राष्ट्रावर राज्य करायचे असे;पण मार्कस ऑरेलियसला मूर्ख व गुंड बहुजन समाज असलेल्या राष्ट्रावर राज्य करायचे होते.


इतिहासाच्या चलच्चित्रपटात मार्कस आपल्या डोळ्यां -

पुढून जातो,तेव्हा त्याच्या ठिकाणी आपणास दोन व्यक्ती दिसतात.तो म्हणजे प्राचीन काळचा डॉ.जेकिल वा मि.हाईड होय.रात्रीच्या प्रशांत वेळी तो स्वतःचे हृदय संशोधन करणारा भावनाप्रधान कवी व ज्ञानोपासक दिसतो.हे जग अधिक चांगले कसे होईल,येथे सुखी लोक कसे नांदू लागतील याविषयीचे आपले विचार तो मांडी व त्यातून योजना निर्मी,पण दिवसा मात्र तो शस्त्रास्त्रांच्या खणखणाटात रोमन विजयासाठी बाहेर पडे.शरण जायचे नाही व दया दाखवायची नाही या रोमन तत्त्वांप्रमाणे विजयी सेनानी म्हणून धावपळ करताना व दौडा मारताना तो दिसतो.


मार्कस ऑरेलियस याच्या या द्विविध स्वरूपाचे त्याच्यातील सौम्य कवी व कठोर योद्धा या दोघांचेही थोडे दर्शन आपण घेऊ या.


मार्कस ऑरेलियस हा भला माणूस होता.पण त्याला संगत मात्र भली मिळाली नाही.तो दुष्ट संगतीत सापडलेला सुष्ट होता.


त्याने आपली डायरी लिहिली आहे.ती त्याची चिंतनिका होती.प्राचीन काळातील ते एक उत्कृष्ट पुस्तक आहे. आपण कसे व्हावे व कोणती तत्त्वे आचरणात आणावीत,याबाबतचे आपले सर्व विचार त्याने या चिंतनिकेत लिहिले आहेत. 


पण काय करावे हे कळले,तरी तसे करणे मात्र तितकेसे सोपे नसते.प्रत्यक्ष प्रसंग येताच त्याला तत्त्वांचा विसर पडतो;तत्त्वांप्रमाणे वागण्याची हिंमत होत नाही.

त्याला पुरेसे नीतिधैर्यच नसते. "मार्कस ऑरलियस या नात्याने रोमच माझे शहर व माझा देश असले,तरी मानव या दृष्टीने सारे जगच माझा देश आहे,"असे त्याने चिंतनिकेत लिहिले असले,तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपण जगाचे नागरिक आहोत याचे स्मरण त्याला राहत नाही,आपल्या रोमनपणाची जाणीव त्याच्या ठायी बलवत्तर होते. 


वास्तविक,तो युद्धाचा द्वेष्टा आहे.तो लिहितो, "माशी पकडता आली की कोळी नाचू लागतो, ससा सापडला की माणसाला आनंद होतो,थोडे मासे जाळ्यात अडकले की कोळ्याला हर्ष होतो, डुक्कर किंवा अस्वल मारता आले की शिकायला आनंद होतो,तर युद्धात कैदी पकडले की लढवय्यास आनंद होतो (Sarmatian Prisoners). पण या साऱ्यांच्या मनातले तत्त्वज्ञान पाहिले तर सारे एकजात डाकूच नाहीत का ठरत?" पण असे लिहिणाऱ्या मार्कसच्याच कारकिर्दीचा बराचसा भाग मात्र युद्धे लढण्यातच गेला,शत्रूना पकडण्यात व ठार मारण्यातच खर्ची पडला! 


न्यायापेक्षा रणकीर्तीचीच चाड आपणास अधिक असल्याबद्दल वाईट वाटून तो आपल्या चिंतनिकेत आपल्या दुबळेपणाबद्दल स्वत:वर कोरडे उडवितो; "सम्राट म्हणून जर जीवनातील उदारता तुला दाखविता येत नसेल तर जा, कोपऱ्यात जाऊन बस;व तिथे निर्दोष व निर्मळ जीवन जग;व तिथेही जीवनाची उदारता वा उदात्तता तुला दाखविता येत नसेल,तर या जगातून चालता हो...असे निघून जाणेदेखील तुझ्याने घडले,तर ते एक अत्यंत स्तुत्य असे सत्कृत्यच होईल."त्याने असे लिहिण्याचे धैर्य दाखविले तरी,सम्राट झाल्यामुळे उदात्तता दाखविता येत नव्हती; तरी त्याला सत्तात्याग वा प्राणत्याग करण्याचे धैर्य मात्र दाखविता आले नाही.मार्कसवर आपणाला दुबळेपणाचा आरोप करता येईल; पण जाणुनबुजून केलेल्या दुष्टतेचा आरोप मात्र मुळीच करता येणार नाही. 


रॅम्से मॅक्डोनाल्डप्रमाणेच,तो शांततेच्या काळात व शांत वृत्तीच्या माणसांत वावरण्यास योग्य होता.

आजच्या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे त्या काळचे रोमन साम्राज्यही संकटात होते. पुष्कळशा वसाहतीत बंडे माजली होती.मार्कसची इच्छा नसूनही सम्राटपदावर असल्यामुळे त्याला बंडखोरांविरुद्ध चालून जावे लागले,त्यांची बंडे मोडावी लागली,आपल्या ध्येयाशी विसंगत धोरण पत्करावे लागले. मानवजातीच्या स्वातंत्र्यापेक्षा 'रोम जगाची अधिराज्ञी आहे' यावर त्याची अधिक श्रद्धा होती व सिंहासनावर आपण राहावे,याची त्याला अधिक तळमळ लागली होती.मार्कसच्या बाबतीत अखेरचा निकाल देण्यापूर्वी आपण स्वतः त्याच्या स्थितीत जाऊन पाहिले पाहिजे. आज आपण ब्रिटिश सत्तेचे प्रमुख चालक असतो तर आपणांपैकी कित्येकांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचे धैर्य दाखविता आले असते? मार्कसचीही नेमकी अशीच स्थिती होती. अर्थातच मार्कस जर बुद्ध असता तर तो वेगळ्या रीतीने वागला असता.पण तो बुद्ध नव्हता.जगाचे भले करावे म्हणून बुद्धाने राज्यत्याग केला.मार्कसने राज्यपदासाठी भले करण्याचे सोडून दिले.हिंदुस्थानने जगाला 'शांती देणारे महापुरुष' दिले. रोम 'जास्तीत

जास्त तत्त्वज्ञानी योद्धा' निर्माण करू शकले." 


मार्कस प्रथम रोमन सम्राट होता व नंतर मानवजातीवर प्रेम करणारा होता हे नीट ध्यानात धरले तर मग आपणास त्याने ख्रिश्चनांचा छळ का केला हे समजू शकेल,थोडी कमी-जास्त माणसे मारली गेली म्हणून वैतागण्याइतका वा विरक्त होण्याइतका कच्चा शिपाई तो नव्हता. शिपाईगिरी त्याच्या रक्तात अधिक भिनलेली होती.ख्रिश्चन लोक रोमन देवदेवतांविरुद्ध बोलत,नवीन राज्य येणार वगैरे भविष्यकथा सांगत. साहजिकच रोमन राज्याला यात धोका आहे असे वाटे.ख्रिश्चनांचे प्रमुख पुढारी ठार मारून त्यांना दडपून ठेवणे हे 'राज्याचे पालनकर्ते' या नात्याने आपले कर्तव्य आहे,असे मार्कसला वाटे. बंड मोडून तो पुन्हा आपल्या हस्तिदंती तत्त्वज्ञान मंदिरात येई तेव्हा तो लिही, "मी दुसऱ्यांना हेतुपुरस्सर वा उगीचच दुःख दिलेले नाही." त्याच्या या लिहिण्यात दंभ नसून सत्यता असावी असे वाटते.


दैवदुर्विलास हा की,मार्कस हा सत्याची तळमळ असणारा माणूस होता.कृत्रिमता वा दंभ त्याच्या ठायी मुळीच नव्हता.स्वत:च्या राष्ट्राची सुरक्षितता किंवा प्रतिष्ठा धोक्यात असता तो सीझरच्या अहंमन्यतेने शासन करी;पण स्वतःचा जीव धोक्यात असताना मात्र तो एखाद्या संताच्या उदारतेने क्षमा करी! त्याचा अँव्हिडिअस कॅशियस नामक एक सेनापती होता.

त्याने त्याला मारण्याचा कट केल्याचे त्याला कळले तेव्हा कॅशियसविरुद्ध काहीही करण्याचे नाकारून तो म्हणाला, "तो दोषी व अपराधी असेल तर आपल्या कृतकर्माचे फळ तो भोगील." कट फसला व कॅशियसचाच कोणीतरी खून केला.मित्रांनीच नव्हे; तर राणी फॉस्टिना हिनेही कॅशियसच्या घराण्यातल्या सर्वांना ठार करावे असे परोपरीने विनविले,निदान स्वतःच्या रक्षणासाठी तरी ही गोष्ट करण्याबद्दल विनविले; पण मार्कसने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. तो म्हणाला, "पित्याच्या पापासाठी मुलाबाळांनी शासन का बरे भोगावे? त्यांचा काय अपराध ? कटात सामील होण्याबद्दल कॅशियसने अनेक प्रमुख रोमन नागरिकांना लिहिलेल्या पत्रांचे भेंडोळे त्याच्यापुढे टाकण्यात आले.

तो गड्डा पाहून त्याने काय केले असेल? एक शब्द न बोलता त्याने ती सारी पत्रे 'अग्नेय स्वाहा' केली व नंतर पुन्हा चिलखत चढवून तो दुसऱ्या एका युद्धावर जाण्यासाठी,रक्तपातासाठी तयार झाला, एकाच वेळी सम्राट व सामान्य मानव म्हणून तो जगू इच्छित होता.

त्यासाठी त्याची धडपड चालू होती.पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.त्यामुळे त्याच्या जीवनातील आनंद गेला व त्याच्या जागी निराशा आली. 


तो जगाविषयी व एकंदर जीवनाच्या मूल्यांविषयी तिरस्काराने बोलू लागला,कशातच काही अर्थ नाही असे म्हणू लागला.उमर खय्याम किंवा कोहेलेथे याप्रमाणेच कित्येक शतकांपूर्वी बोलताना तोही आपणास दिसतो.तो लिहितो - "ही दुनिया म्हणजे केवळ वाफ आहे.हा संसार निःसार आहे.येथे सदैव झगडे व मारामाऱ्याच आढळणार,आपण या जगात क्षणाचे पाहुणे आहोत.मरणोत्तर कीर्ती ! पण तिचे आपणास काय होय? क्षणभर कीर्ती मिळते.पुन्हा सारे विसरूनही जातात.या मानवी जीवनात हा काळ म्हणजे एक क्षण एक बिंदू.सारे क्षणिक आहे,चंचल आहे,बदलते आहे.आपली प्रजाही दुबळी आहे.अंतर्दृष्टी फार मंद असते.वस्तूंचे अंतरंग कळत नाही.हे शरीर तर सडणारे आहे.आत्मा म्हणजे वायूची एक क्षणिक झुळूक! दैवात काय असते हे कळत नाही,कीर्ती मिळते त्यातही काही अर्थ नसतो.लोक विचार न करताच टाळ्या वाजवितात,

स्तुती करतात.आणि आपण मेल्यावर स्मरण कशाचे करायचे ? पोकळ,शून्य वस्तू, तिचे ?" हे सारे जीवन बाह्य अवडंबर आहे.हे सारेच क्षणिक देखावे,बुडबुडे आहेत.मार्कस ऑरेलियस,त्याचे वैभव,त्याच्या महत्त्वाकांक्षा,त्याची युद्धे,त्याचे विजय,त्याचे यश,सारे सारे पोकळ व निःसार आहे.अनंत बुडबुड्यांतले हेही बुडबुडे! पण त्याचे स्टोइक वळण त्याला धीर देई.

आपल्या नशिबी आलेले पोकळ राजवैभव तो सहन करी. "जे वाट्यास आलेले आहे,ते दैवाने दिलेले आहे. ते अपरिहार्य आहे.ते सहन करा."असे स्टोइक तत्त्वज्ञान सांगते.आपण देवाच्या हातांतली बाहुली आहोत,आपले जीवन त्याच्या इच्छेसाठी आहे,आपल्या मनःपूर्तीसाठी नाही.तो लिहितो,"माझे काय व्हावे,माझ्या नशिबी काय यावे,याचा विचार देवांनी केलाच असेल;व तोच योग्य असणार.त्यांनी खास माझ्या बाबतीत जरी विचार केला नसेल तरी या विश्वाच्या सर्वसाधारण कल्याणाची चिंता त्यांनी केलीच असेल.यासाठी या विश्वसंसारात जे माझ्या नशिबी येईल ते विश्वयोजनेनुसार आहे असे समजून मी आनंदाने सहन केलेच पाहिजे,त्यातच समाधान मानले पाहिजे. 


माझ्या बाबतीत जे जे घडत आहे,ते ते अनंत काळापासून तसे योजिलेलेच आहे."आपल्या आत्म्याच्या खिन्न आदशांत,बघून मार्कस स्वतःची पुढीलप्रमाणे कानउघाडणी करतो; "घाबरू नको.नशिबाने जे ताट वाढून ठेविले आहे ते गोड करून घे.जे दैवाने दिले आहे.त्याच्याशी जमवून घे.दैवाला तुझ्या जीवनाचे वस्त्र जसे विणायचे असेल,तसे विणू दे.तेच तू अंगावर घे.देवांना चांगले कळते,अधिक कळते,सर्वांत जास्त समजते." पण त्याच्या तत्त्वज्ञानाने त्याचे समाधान झाले नाही.त्याच्या जीवनात खोल निराशा होती. त्याची महत्त्वाकांक्षा शेवटपर्यंत अपुरीच राहिली.त्याला हवे होते शांती-समाधान,पण मिळाला पोकळ मोठेपणा


त्याला वैभव लाभले,शांती लाभ झाला नाही.आपल्या अप्राप्य ध्येयाकडे तो एखाद्या भणंग भिकाऱ्याप्रमाणे पाहत राही व अर्धवट धार्मिक अशा शब्दजंजाळात - शाब्दिक धुक्यात -तो आपले ध्येय अदृश्य करून टाकी.त्या अर्धवट धार्मिक शब्दांवर तरी त्याचा पूर्ण भरंवसा कोठे होता ?


इ.स. १८०चा हिवाळा आला. मार्कस एकोणसाठ वर्षांचा झाला होता.उत्तरेस जर्मनांशी लढताना त्या कडक थंडीत त्याची प्रकृती बिघडली,त्याचे सारे शरीर जणू गोठले,गारठून गेले! घरी रोमकडे परतण्यापूर्वीच तो मेला.. त्याची कारकीर्द अयशस्वी झाली.त्याचे जीवन अपयशी होते;ते पाहून फार वाईट वाटते. (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस))


त्याच्या मनात असलेल्या उदात्ततेनुसार तो वागता,तर तो महापुरुष झाला असता.पण अखेर तो कोण झाला?धंदेवाईक सैनिकांच्या शहरातला एक विजयी सेनापती,इतक्याच नात्याने तो शिल्लक राहिला.त्याने मिळविलेल्या विजयातूनच पुढच्या युद्धाचे बीजारोपण झाले व त्यातच शेवटी रोमचा नाश झाला. 


माकडातून उत्क्रांत होत होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी आपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली.पुढे आणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला. मारण्याची,संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला.त्यानंतर दोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले.हिंसेची साधने अधिकच प्रखर अशी तयार झाली.मारण्याच्या पद्धतीत अधिक कौशल्य आले.लोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला.त्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली,आणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धी पूर्णतेस पोहचली,मानवाच्या मत्थड मेंदूला 'हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे'.ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील.संहार करण्यापेक्षा हितकर व उपयोगी अशा दुसऱ्या उद्योगात वेळ दवडणे अधिक चांगले,ही गोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.


मनुष्य अगदी मत्थड प्राणी आहे.फारच हळूहळू त्याची प्रगती होत आली आहे;.आणि जी काही थोडीफार प्रगती झाली, तीही सारखी अखंड होत आली असेही नाही.कधी प्रगती तर कधी अधोगती,

असे सारखे चालले आहे.उंचावरून कितीदा तरी हा प्राणी खाली घसरला आहे;वर चढून पुन्हा कितीदा तो खाली पडला आहे.