रवंथ करणं (रुमीनेट) म्हणजे काय? खरंतर या शब्दाचा इतिहास लक्षवेधी आहे: रुमिनेअर या लॅटिन शब्दावरून या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे,ज्याचा अर्थ आहे चघळत बसणं.यामुळे जे प्राणी गिळलेलं अन्न पुन्हा तोंडात आणून चघळतात त्यांना रवंथ करणारे प्राणी म्हणतात.
एका विशिष्ट प्रकारच्या विचारात आपण वारंवार गुंतून राहतो हे दर्शवण्यासाठी हा उत्तम शब्द आहे.गाय आपलं अर्धवट पचवलेलं अन्न पुन्हा चघळण्यासाठी तोंडात घेऊन येते आणि बऱ्याच वेळा रवंथ करते.आपण जुन्या आठवणी,कल्पना आणि कालबाह्य विचार चघळण्यासाठी पुन्हा खेचून आणतो,हे मानसिक पातळीवर रवंथ करण्यासारखंच आहे.पण रवंथ करणं हे गायीसाठी आरोग्यदायी आणि नैसर्गिक असलं तरी ते माणसासाठी आरोग्यदायी आणि नैसर्गिक असण्याची शक्यता कमी आहे.
समजा,तुमच्या जवळच्या माणसाशी तुमचा एक विचित्र मतभेद झाला होता आणि तुम्ही वारंवार तेच संभाषण तुमच्या मनात घोळवत बसला आहात.कदाचित आपण दुसरं काहीतरी बोलायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं किंवा जे घडलं त्याबद्दल तुम्हाला खंत किंवा पश्चात्ताप वाटला असेल.काहीतरी चुकीचं घडल्यासारखं वाटतं म्हणून तुमचा मेंदू त्याच प्रसंगाकडे पुन्हा ओढला जातो,तिथे घुटमळतो,तिथल्या प्रत्येक कटू बारकाव्यांना प्रकाशझोतात आणतो,वेगवेगळे समज आणि गृहीतकांचा विचार करतो.थोडक्यात,रवंथ म्हणजे अतिविचार करतो.
चोथा होईपर्यंत गोष्टींचा विचार केला जातो आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही. बऱ्याचदा आपण एखादी जुनी आठवण काढतो आणि त्यामुळे इतर आठवणी जाग्या होतात. यामुळे आपण आपलं लक्ष विचलित करणाऱ्या आणि अतिविचार करण्यास भाग पाडणाऱ्या चक्रात अडकतो.तुम्ही गोष्ट चघळत राहता,पण अडचण सोडवण्याची तुमची क्षमता अधिक कमी होत जाते आणि तुमची अस्वस्थता वाढते. सांगायचं,तर तुम्ही एखादी वाईट परिकथा स्वतःला पुन्हा पुन्हा सांगणे थांबवू शकत नाही.. दुसऱ्या शब्दांत जुन्या वाईट आठवणी उकरून काढण्याचे तुम्ही चाहते असाल,तर ती रोखण्यासाठी पहिलं पाऊल असतं तुम्हाला उद्युक्त करणाऱ्या गोष्टींचा शोध घेणं.मग ती गोष्ट म्हणजे कदाचित तुमच्या घरी जाऊन तुमची जुनी खोली पाहणं असेल.कदाचित एखादं ठरावीक गाणं किंवा एखाद्या प्रकारचा खाद्यपदार्थ असेल किंवा कुणीतरी आपली परीक्षा घेत असल्याचा अनुभव असेल.ते जे काही असेल,पण तुम्हाला हे ठाऊक हवं की त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो,जेणेकरून तुम्ही कृती करू शकता.रवंथ करण्याची प्रक्रिया कोणता आकार घेते, हे समजून घेणं ही दुसरी पायरी आहे. तुम्हाला सतत खंत वाटते का? संताप वाटतो? निराश झाल्यासारखं वाटतं? तुम्ही वारंवार इतरांना दोष देता का? किंवा अपराधी वाटून घेता का ? मग हे समजून घ्या की,पुन्हा पुन्हा ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता त्या गोष्टीबदल तुम्ही जागरूक होऊन त्यापासून अंतर राखायला हवं; शिवाय ती खरी असेल की नाही याचीही शाश्वती नसते.
उद्युक्त करणारी गोष्ट घडली की,आपोआप सुरू होणाऱ्या या कथेतून मनाने एक पाऊल मागे या.जागरूकतेच्या या आधीच्या सगळ्या तंत्रांप्रमाणेच इथेही न अडकता,न गुंतता किंवा विरोध न करता उलगडत जाणाऱ्या गोष्टीचं फक्त निरीक्षण करा.अंतर राखण्याचा एक मार्ग आहे लेबल लावणं. त्या कथेला एक नाव द्या.जेव्हा आपण त्याच जुन्या आरोप आणि रागाच्या कथेत अडकत आहोत असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही विचार करू शकता,'अरे! ही तर हरिदासाची कथा आहे.' (अर्थात,आपण परत मूळ पदावर येतो.) विचार आणि भावनांमध्ये गढून जाण्यापेक्षा त्यांचं फक्त निरीक्षण केल्याने तुम्ही त्यांच्यापासून अंतर निर्माण करू शकता.
त्यामुळे,'मी निरुपयोगी आहे,'असं म्हणण्यापेक्षा 'मला आत्ता निरुपयोगी असल्यासारखं वाटतंय.' असं तुम्ही म्हणू शकता. 'मी माझ्या संधी फुकट घालवल्या.' असं म्हणण्यापेक्षा 'मला आता ते त्रासदायक प्रसंग आठवत आहेत.' असं म्हणा. त्या संवेदनेभोवती एक स्वतंत्र कुंपण घाला आणि संवेदनाच्या मर्यादा ओळखून हे तात्पुरतं आहे हे समजून घ्या.
शेवटी,आपण स्वतःला जो त्रास करून घेतो, त्यापैकी किती गोष्टी वास्तवावर आधारित असतात आणि किती फक्त आपण स्वतःला सांगितलेल्या कथा असतात ?यात तुम्ही काही विनोद करू शकत असलात तर उत्तम! जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगात विनोद शोधता तेव्हा तुम्ही मल्लखांबपटूसारखे लवचीक होता आणि तुमच्या समोर असणाऱ्या मोठ्या,भयानक अडचणीपेक्षा काहीसे मोठे होता.स्वतःला सांगा, "तर,चिंता करणारं माझं सैन्य आज दुपारी प्रचंड वेगाने माझ्याकडे येत आहे."आणि त्यात आणखी विनोद शोधण्याचा प्रयत्न करा.जेव्हा तुम्हाला तुमच्या बालपणातल्या लाजिरवाण्या घटना आठवतील तेव्हा एक छोटीशी परेड, छोटे पण हवेचे फुगे घेऊन तुमच्याकडे येत आहे असा विचार करा.
स्वतःवर हसा - किमान हे तरी समजून घ्या की,पुन्हा पुन्हा एकाच जुन्या आठवणीचं रडगाणं गाणारी तुम्ही एकमेव व्यक्ती नाही..
स्टॉप ओव्हरथिंकिंग,निक ट्रेंटन,अनु-अवंती वर्तक,मायमिरर पब्लिशिंग हाऊस
दुसरा पर्याय आहे जाणीवपूर्वक स्वतःला विचारणं आपण जे करत आहोत त्यामुळे अडचण सुटेल की फक्त विषयाचे चर्वितचर्वण होतंय ? स्वतःशी प्रामाणिक राहा.पहिल्यांदा विचार केल्यावर कदाचित त्या कल्पनेतून काहीतरी उपयोगी किंवा आत्मज्ञान मिळवून देणाऱ्या गोष्टी निष्पन्न होतील.पण बऱ्याचदा, तुम्ही एखाद्या कल्पनेचा जास्त विचार केलात तर त्यातून मिळणारा फायदा कमी असतो. विश्लेषण करण्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक ताकदीचा मार्ग आहे कृती करणं.क्षमता,अंदाज आणि काळजी यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये गोंधळून जाण्यापेक्षा कृती करा आणि स्वतःला वास्तवात घेऊन या.जाणीवपूर्वक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर,'मी फक्त विषय चघळत आहे,'असं आलं,तर तुम्ही आता लगेच एका छोट्या कृतीकडे तुमचं लक्ष वळवा.समजा,तुमच्याकडून चूक झाली की कोणताही विचार न करता तुम्ही तुमच्या मित्राला काहीतरी बोललात.तुम्हाला आता वाईट वाटतंय. ते वाक्य तुम्ही पुन्हा डोक्यात घोळवत राहता आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटतं.मग तुम्ही थांबता आणि स्वतःला विचारता,'मी समस्या सोडवत आहे की फक्त रवंथ करत आहे?' तुमच्या लक्षात येतं की तुम्ही तो विषय फक्त चघळताय.तुम्ही स्वतःला थांबायला सांगता आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जी लहानशी गोष्ट करू शकता,तिचा विचार करता..
तुम्ही तुमच्या मित्राला दुखावलं आहे,ही समस्या आहे.
माफी मागणं किंवा भेटून तुमच्यातली दरी मिटवणं हा यावरचा उपाय असू शकतो.त्यामुळे हे करा.जर तुम्ही या अडचणीचा विचार करण्यात तुमची सगळी ऊर्जा खर्च करणार असाल,तर किमान तिचा सदुपयोग तरी करा आणि गोष्टी सुधारण्यासाठी मार्ग शोधा.जर तुम्ही काही सुधारू शकत नसाल तर लक्ष विचलित करणाऱ्या एका गोष्टीकडे,माफ करण्याकडे किंवा विषय सोडून पुढे जाण्याकडे तुमची ऊर्जा वळवा.
ज्या गोष्टींमुळे तुमची परिस्थिती सुधारेल किंवा किमान त्या परिस्थितीशी जुळवून घेणं तुम्हाला शक्य होईल,त्या गोष्टींकडे तुमची चिंताग्रस्त ऊर्जा वळवल्याने पुन्हा एकदा तुम्ही वास्तवातील जगात येता.आणि न संपणाऱ्या आणि कुठेही न जाता फक्त गोल फिरत राहणाऱ्या मानसिक आंदोलनातून तुम्ही बाहेर पडता.
जर तुम्ही योग्य वेळी स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवू शकलात तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात मानसिक लवचीकता निर्माण करू शकाल. जेव्हा आपण रवंथ करत असल्याचं तुम्हाला जाणवेल ('पुन्हा एकदा मी रवंथ करण्याची सुरुवात केली आहे.पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी चघळत बसणं किती कंटाळवाणं आहे...'), तेव्हा स्वतःला ज्याकडे तुमचं सगळं लक्ष वळेल,अशा एका कामात झोकून द्या.उठा आणि उलट क्रमाने अक्षरं म्हणत तीस उड्या मारा.
आठवड्याभरात तुम्हाला जे सामान खरेदी करायचं आहे त्याची यादी करा.विणकाम करा,तुमचं टेबल आवरा किंवा शब्दांवर मनापासून लक्ष देत एखादं कठीण गाणं म्हणा.
तुम्ही काय करता याने फरक पडत नाही,तर तुम्ही स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवून रवंथ करण्याच्या चक्र बाहेर पडता येणं हे महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला काही सुचलं नाही तर तुम्ही तुमच्या पाच इंद्रियांच्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करा किंवा धावणे वा योगासने यांच्यासारख्या शारीरिक क्रिया करा.तुम्हाला स्थिरपणे बसून, मनात घुसखोरी करणाऱ्या विचारांशी लढायचं नाही,तुम्ही उठा,आवडत नसलेले विचार झटकून टाका ते काय असेल,काय असायला हवं,काय असू शकतं,
असं झालं तर काय,कदाचित.. अशा प्रकारच्या विचारांमध्ये तुमचा मेंदू गुरफटू लागला तर या मनोरचित विचारांच्या कळ्या उमलण्याआधीच खुडून टाका.एरवी आपल्याला लक्ष विचलित होणं टाळायचं असतं.पण जर आपण जागरूकतेने आणि योग्य कारणासाठी लक्ष दुसरीकडे वळवलं,तर ते एक शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं.
ज्या गोष्टीवर तुमचं अजिबात नियंत्रण नाही त्या गोष्टीची तुम्ही काळजी करत आहात का ?
तुम्ही पराचा कावळा करत आहात का ?
तर तुमच्या रवंथ करण्याने परिस्थितीमध्ये सुधारणा होते आहे का? किंवा प्रश्न सोडवला जात आहे का ?
तुम्ही जी कहाणी सांगत आहात किंवा घटनांबद्दलचा तुमचा जो समज आहे, त्यावर कोणतीही शहानिशा न करता विश्वास ठेवण्याचं काही कारण तुमच्याकडे आहे का?
रवंथ करण्याची क्रिया ही तुमची जुनी मैत्रीण आहे,जी कायम कोणत्या ना कोणत्या विषयाचा चोथा करत असते,
अशी कल्पना करा व तिला मनाने दूर सारा.अशी कल्पना करा की,आपण एक शांत,तटस्थ निरीक्षक आहोत;ज्याला आतून हे माहीत आहे की,ही फक्त कथा आहे... एक कथा.तर,ही रवंथ करणारी जुनी मैत्रीण तुमच्याकडे येते आणि म्हणते,"तुला आठवतं, काही वर्षांपूर्वी तू म्हणाला होतास की,तुला फ्रेंच बोलता येतं आणि जेव्हा कोणीतरी तुझ्याशी फ्रेंचमध्ये बोललं तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तुला समजलं नव्हतं?आठवतंय ते? किती लाजिरवाणं होतं ना ते? "
कदाचित टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमामुळे ही आठवण जागी झाली असेल किंवा हा प्रसंग जेव्हा घडला,तेव्हा तिथे हजर असणारी एखादी व्यक्ती तुम्हाला अलीकडच्या काळात भेटली असेल म्हणून ही आठवण पुन्हा जागी झाली असेल.रवंथ करण्याची क्रिया कोणत्याही प्रकारे उद्युक्त झाली असली,तरी एकदा तुम्ही त्याबद्दल जागरूक झालात की तुमच्याकडे दोन पर्याय असतात.तो संपूर्ण प्रसंग किती लाजवणारा होता आणि असं मूर्खपणा करून खोटं बोलल्याने माणूस म्हणून तुम्ही किती चुकीचे ठरलात याबद्दल तुम्ही तुमच्या त्या मैत्रिणीशी चांगली, प्रदीर्घ आणि तावातावाने चर्चा करू शकता. किंवा रवंथ करण्याच्या क्रियेला तुम्ही शांतपणे सांगू शकता,"हो,मला माहीत आहे ही जुनी गोष्ट. पण तो भूतकाळ आहे.मी त्यातून धडा घेतला आहे आणि आता मोठेपणा दाखवण्यासाठी मी तसं काही करत नाही आणि लोक माझी ती फजिती विसरूनसुद्धा बराच काळ लोटला आहे. आता मी जे करत होतो त्याकडे परत जातो."
जेव्हा ती त्रास देणारी मैत्रीण पुन्हा येईल आणि परत त्या लाजिरवाण्या प्रसंगाकडे लक्ष वेधेल तेव्हा तुम्ही तिला म्हणा,"नमस्कार,तुझ्याकडे बोलण्यासाठी काहीतरी नवीन आहे का ? तुझ्याकडे काही ताज्या कल्पना आहेत का? किंवा मी आता काय करायला हवं हे सांगता येईल का ? जर नसेल सांगता येत तर अच्छा. मी दुसऱ्या कामात व्यग्र आहे." तुमचं मन टेफ्लॉनसारखं निर्लेप आहे.सोपं आहे. आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही हे पाहिल्यावर मनातील चर्वितचर्वण आपोआप बंद होते.