* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: भातुकलीच्या खेळामधला... In the game of Bhatukali...

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/११/२३

भातुकलीच्या खेळामधला... In the game of Bhatukali...

आटपाट नगरातली ही कहाणी !


याच आटपाट नगरीत,नगरातल्या एका महामार्गावर एका बाजुला दिमाखदार महालही आहेत आणि दुस-या बाजुला याचना करत जगणारे याचकही आहेत !


नदीचे दोन काठ जणु...


एका काठावर गरीबी... एका काठावर श्रीमंती.... दोन काठांच्या मध्ये वहात असतो मध्यमवर्गीय, खुळावल्यासारखायाच नगरीत,एका ठिकाणी याचकांचा अर्थात् भिक्षेक-यांचा डाॕक्टर म्हणुन,काम करत असतांना,पन्नाशीची एक मावशी आणि तिच्या शेजारी पडलेले एक बाबा दिसले.मावशी धडधाकट होती,पण तीच्या बाजुला पडलेल्या बाबांची अवस्था अत्यंत वाईट होती. मावशीला म्हटलं,'मावशी,भीक मागण्याच्या ऐवजी काहीतरी काम करा की... '  


मावशीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं,माझ्याकडं बघत तोंड मुरडलं.पदर तोंडावर घेवुन तीने तोंड फिरवलं होतं.माझा फुकटचा सल्ला तीला आवडला नव्हता.फुकट मिळणाऱ्या गोष्टीं आवडतात.... सल्ले नाही ! 


मी बोलत असतांनाच,बाबांनी त्या मावशीला खोकत खोकत पाणी मागितलं,तीने त्यांना चार शिव्या हासडुन पाणी दिले... देतांना म्हणाली, 'मर की मुडद्या आता,आजुन किती तरास देनार हायेस ?' 


ते खुप कष्टाने उठुन बसले,पाणी पिवुन,हाताच्या पालथ्या मुठीनं तोंड पुसत,तोंड कसनुसं करत  परत पडून राहिले.जणु त्यांनी तीच्या शिव्या ऐकल्याच नव्हत्या.... बोलायला,त्यांच्या अंगात त्राणही नव्हतं... ! 


ते एका कुशीवर झोपले होते.अंगावर कुणीतरी दिलेला फुल बाह्यांचा स्वेटर होता,फाटका


पँटही ब-यापैकी फाटलेली होती.... दाढी पुर्ण पांढरी,छातीपर्यंत वाढलेली,न बोलतांही त्यांना धाप लागत होती... डोळे खोल गेलेले... जशा कवटीतल्या खोबण्या... 


बघतांना असं वाटत होतं की हाडाच्या सापळ्याला कुणीतरी कपडे घातले असावेत !  


एकूण अवस्था अत्यंत वाईट ! 

मी मावशीला म्हटलं,'बाबा,कोण आहेत तुझे मावशी ?'


माझे वडिल आहेत,असं ती मला सांगेल असं मला वाटलं... कारण दोघांच्या वयातला फरक  खुप होता... !

पण, ती वैतागुन म्हणाली,'नवरा हाय ह्यो माजा.... ! मरंना पन...' मला आवडलं नाही तीचं हे बोलणं...


मी बाबांकडे वळलो,त्यांची चौकशी करु लागलो, हे त्या मावशीला आवडलं नाही.


माझं लक्ष बाबांकडे होतं. 


'खुप त्रास होतोय का ?अॕडमिट करू का बाबा?' 


असं मी विचारलं नुसतं आणि बाबांच्या डोळ्यातनं पाणी ओघळु लागलं,त्यांनी माझ्याकडं बघत फक्त हात जोडले... ते उचलणंही त्यांना जड जात होतं... ! 


यावरुन मी काय ते समजलो !


बाबांचं वय असेल ६५/७० आणि वजन असेल २५/२७ किलो ! 


" म्हयन्याच्या पेपराची रद्दी याहुन जास्त भरते.!"


माणुस म्हातारा झाला,दुस-यांच्या नजरेतली किंमत संपली की त्याची किंमत रद्दी पेक्षाही कमी होते... ! असो....


यानंतर मी त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं.सर्व तपासण्या केल्या.जगातले सर्व काही आजार जणू या बाबांनाच झाले होते.डायबेटीस,टीबी, हाय बी.पी.किडनी फेल्युअर,काविळ,पायामध्ये जखम होऊन सेप्टीक,आणि भरीत भर म्हणून अंतिम टप्प्याताला एड्स ! 


सीनियर डाॕक्टर्सनी  प्राथमिक उपचार केले आणि मला बोलावून सांगितलं, 'अभिजित या केस मध्ये फार काही करता येणार नाही.तरीही आपण काहीतरी प्रयत्न करू.' 


बाबा २७  दिवस अॕडमिट होते.आता  बर्‍यापैकी ते माणसात आले होते.या २७ दिवसात त्यांची बायको एकदाही दवाखान्यात फिरकली नव्हती. 

दवाखान्यातच बाहेरची मेस लावुन जेवणाचा डबा आणि चहापाणी,जेवण,नाश्ता सर्व सुरू केलं.या दिवसांत बाबांची तब्येत सुधारत गेली, वजन बऱ्यापैकी वाढलं, चेहर्‍यावर तरतरी आली.परंतु बाबांना जे आजार झाले होते, त्यातले बरेच आजार कधीही बरे न होणारे असे होते.या आजारा बरोबरच त्यांना जगायचे होतं, मरेपर्यंत ! 

याच आठवड्यात म्हणजे १४ सप्टेंबर २०२०, सोमवारी, डॉक्टरांनी मला फोनवर सांगितले डिस्चार्ज देत आहोत,आता यांना घरी घेऊन जा... 


घरी ? 


घर कुठं होतं बाबांचं ? 


त्यांच्या बायकोचा तर पत्ताच नव्हता. 


डिस्चार्ज देतांना डॉक्टर म्हणाले,'अभिजीत,तुला तर माहीतच आहे,त्यांना आपण संपूर्णपणे बरं करू शकत नाही.येत्या काही दिवसांचे ते सोबती आहेत,जाताना त्यांना फार काही त्रास होऊ नये एवढंच आपल्या हातात आहे,आपण जास्त काही करू शकत नाही. देतोय त्या गोळ्या कायम सुरू ठेव..कमी त्रासात होईल मृत्यु होईल इतकंच आपल्या हातात  !'


एक डाॕक्टर त्याच्या आयुष्यात पेशंटचे अनेक मृत्यु पाहतो...पण स्वतःच्या घरातला मृत्यु पचवु शकत नाही !


माझंही तसंच झालं होतं... हा माणुस ... यांना बाबा - बाबा म्हणता म्हणता,जेवु खावु घालता घालता,माझ्याच घरातला कधी होवुन गेला कळलं नाही... ! यांच्या मृत्युच्या अपशकुनी बातमीने मी हेलावलो...आत्ता मी डाॕक्टर नव्हतोच,मी झालो होतो त्या बाबांचं पोर ! 


बाबांना मुलबाळ काही नव्हतंच ! 


हातातली गोळ्यांची चिठ्ठी घेऊन मी बाबांजवळ आलो. 


बाबा म्हणाले ,'काय म्हणाले डाॕक्टर?' 


मी आता त्यांना काय सांगणार होतो ? 


तरीही हसत म्हणालो,'सगळे भारी भारी आजार आहेत तुम्हाला बाबा,हलकं सलकं काही नाहीच झालेलं तुम्हाला... सगळे आजार मौल्यवान ....! 


बाकी काही मिळो की न मिळो,आजार मात्र लाखातले निघालेत ! 


मला नेहमीच वाटतं,असावं तर सगळंच मोठं आणि भव्य दिव्य... ! छोटं छोटं आणि चुटुक मुटुक काही असूच नये... ! 


मरावं तर देशासाठी युद्ध करुन,शत्रुवर मोठ्ठा बाॕम्ब टाकुन मरावं ...आणि त्यात शहीद व्हावं..! बसच्या सीटवरून भांडून मारामारी करुन मरण्यात काय मजा असते ?


पडलो तर हिमालयाच्या टोकावरून पडावं, रस्त्यानं चालतांना ठेच लागून पडण्यात काय मजा ? 


बुडलो तर समुद्राच्या तळाशी जावं..दहा फुटाच्या डबक्याचा तळ गाठुन बुडुन मरण्यात कसलं आलंय थ्रील? पाळावे तर वाघ - सिंह, मांजर काय कुणी पण पाळतं ! सायकल चालवतांना अॕक्सीडेंट झाला.... ? 

अरे हॕट...विमान चालवतांना अॕक्सीडेंट होण्यात चार्म आहे ! रस्त्यावरच्या कुत्र्यावर कुणीही हाड् म्हणुन दगड भिरकावतं.... पण... आपण असा दगड भिरकवावा आकाशात....आणि सुर्यानं जरा बाजुला सरकून म्हणावं... अरे हळु...लागला असता ना यार दगड मला !


ध्येय मोठं असावं... ! 

सर्वच काही भव्य दिव्यच असावं ! 


थोडी पत असलेला माणुस गेला की लोक म्हणतात "ते गेले..." 


अजुन थोडी पत असलेला माणुस गेला की लोक म्हणतात "ते देवाघरी गेले.... "


त्याहुन थोडी पत असलेला माणुस गेला की म्हणतात... "ते कैलासवासी झाले...स्वर्गवासी झाले !" 


रस्त्यावर बेवारशासारखा कुणी गेला तर लोक म्हणतात "हे सालं मेलंय.... !" 


मेलंय..पासुन कैलासवासी झाले..स्वर्गवासी झाले या शब्दांपर्यंत भिक्षेक-यांना ओढुन आणणं हाच माझा ध्यास! असो ! बाबांकडे मोठं काही ध्येय नव्हतं,पण आमच्या या बाबाला आजार मात्र मोठे मोठे झाले होते.. !


बाबांशी मी काहीतरी बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.त्यांनी कुबडी उचलत सहज विचारलं, 'माझे अजून किती दिवस शिल्लक आहेत डॉक्टर ? खोटं नका बोलू !'


मी हादरलो... म्हणजे यांना माहीत आहे तर.... !


तरी उसनं अवसान आणुन म्हणालो,'अहो बाबा, असं काहीच नाही...या अगोदर आजारांवर वेळीच लक्ष दिलं नाही म्हणून ते वाढले आहेत इतकंच... आपण करतोच आहोत उपचार तुमच्यावर,काळजी करू नका.'


ते म्हणाले, 'जाऊ द्या हो डॉक्टर,नका एवढा विचार करू. मला आता जाऊ दे वरच्या घरी...नाहीतरी पितृपंधरवडा सुरू आहे..कामात काम होऊन जाईल,काय म्हणता ? पुढल्या वर्षी माझ्या जागेवर घास ठेवा म्हणजे झालं.... हा..हा...हा...' असं म्हणून... क्षीण पणाने हसत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. 


मरणा-या माणसाच्या तोंडुन एवढा करूण विनोद मी याआधी कधी ऐकला नव्हता... ! 


'जाऊ दे बाबा,बघू आपण पुढच्या पुढे,आता कुठं सोडू तुम्हाला ? ' मी बॕग भरत म्हणालो. 


ते खाटेवरुन उठत म्हणाले,ज्या गटाराजवळुन तुम्ही मला आणलं होतं, तिथेच मला सोडा... मी तिथेच पडून राहिन...


का... ? आणि तुमची बायको ? ती तर आलीच नाही म्हणा एवढ्या दिवसात ...ते हसत म्हणाले,'ती आली नाही,आणि आता येणार सुद्धा नाही ...'

'म्हणजे ?' 

'अहो गेली ती मला सोडुन ! 

तीला मी नकोच होतो,कधी एकदा माझी ब्याद टळते असं तिला झालं होतं.दर वेळी ती मला हाकलून द्यायची,परंतु मीच तिला मुंगळ्यासारखा चिकटलो होतो.... काय करणार ?  माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता !


आता तिला चांगली संधी आली,म्हणून ती मला सोडून गेली.' मला त्या मावशीचा भयंकर राग आला.या बाबांना माझ्या गळ्यात टाकून ती स्वतः पसार झाली होती. 


माझा राग रंग बघून बाबा म्हणाले, 'तुम्ही त्रास नका करून घेऊ डॉक्टर,गेली तर जाऊ दे.तुम्ही चिंता नका करू,मला तुम्ही जिथून आणलं होतं तिथेच सोडून द्या,मी पडून राहिन,मी गेल्यावर कळेलच तुम्हाला... !' 


मला बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं पण त्या बाईचा खरोखर राग आला होता, 'मी बाबांना म्हणालो तुम्हाला राग नाही येत तीचा ? म्हणाले ,'नाही डॉक्टर,ती तरी आजारी मढं किती दिवस सांभाळणार ? 


तीच्या मते,माझ्याबरोबर संसार करून तीला कधीच काही मी देऊ शकलो नाही.तीची कोणतीही हौस मी कधीही भागवू शकलो नाही.पूर्वी मी भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असे,परंतु या आजारपणांमुळे माझा धंदा बसला, लोकांनी माझ्या उधा-या बुडवल्या आणि ज्यांचा मी देणेकरी होतो,त्यांनी वाजवुन पैशे नेले माझ्याकडुन,

आणि शेवटी आम्ही रस्त्यावर आलो... ! आमच्या दोघांच्या वयात सुद्धा खूप अंतर आहे,आमचं लग्न म्हणजे एक तडजोड होती डाॕक्टर.तीला आधीपासुनच मी नको होतो... आता संधी मिळाली,गेली सोडुन....!'


'जगू दे बिचारीला तीच्या मनासारखं....मनमोकळेपणाने...' 


बाबा हात जोडत वर पहात म्हणाले...! 


'ती गेली,यापेक्षा तीला मी जातानाही काही देऊ शकलो नाही याच गोष्टीचा पश्चाताप मला जास्त होतोय....' 


बाबांच्या या विचारांवर मी काय बोलणार ? 


आम्ही यांत्रिकपणे हॉस्पिटल च्या खाली उतरलो. बाबांच्या हातात कुबड्या दिल्या. 


मावशीच्या नावानं माझी धुसफुस सुरुच होती. बाबा म्हणाले,'जावु द्या हो डाॕक्टर .... गेली ती, खरंतर या वेळी मला तीची खुप गरज होती, पण,आता ती परत भेटणार नाही,पण मी मेल्यावर भेटली तर तीला नक्की सांगा,मी जाताना तीची खुप आठवण काढली म्हणुन... आणि हो,माझा,तीच्यावर कसलाही राग नाही म्हणावं...अजुन एक सांगा,तुला मी आवडलो नाही कधी..पण तु मला तेव्हाही आवडायचीस आणि आत्ताही आवडतेस... 


तुझ्यात मी बाई नाही,आई पाहिली गं,म्हणावं. ! 


बाबांच्या डोळ्यात आता पाणी तरळलं...!

ते पुढं चालु लागले,कुबड्या घेवुन ...

कुबड्यांवर चालतांना खट्क खट्क होणारा आवाज हा बाबांच्या हृदयातुन येत असावा का ?

स्टेथोस्कोप मधुन येणारा हृदयातला आवाज लब् - डब् असा असतो... 


मी विना स्टेथोस्कोप आज हा नविनच आवाज ऐकत होतो,खट्क खट्क !


हा कुबड्यांचा आवाज होता की...आयुष्यंभरात "खटकलेल्या" काही गोष्टी ... ?  


बाबांनी आभाळाकडं बघत,कुबडीवरचे दोन्ही पंजे आभाळाकडं नेत जोडले नी म्हणाले,'सुखी रहा माई...!'


प्रतिकुल परिस्थितीतही सोडुन गेलेल्या बायकोला "माई" म्हणणारा बाबा मला आभाळाएव्हढा उंच जाणवला ! 


तरीही मी बाबांना छेडलं... 'बाबा, म्हणजे तीला माफ केलंत तुम्ही... ? माफी दिलीत... ? 


यावर प्रसन्नपणे हसत म्हणाले,'माझ्याकडं या क्षणाला तीला देण्यासारखं एव्हढंच आहे... "माफी" ! तीच्या चुकांचं ओझं मी कशाला बाळगु डाॕक्टर ? मी तीला माफ केलं,आता जाताना मला कसलंही ओझं नकोय...आत्ता तीला देण्यासारखी एकच गोष्ट माझ्याकडं होती ती म्हणजे... माफी ! 


काय बोलावं या बाबांशी कळेना ! 


या क्षणाला मला एकच वाटलं,या बाबांचे पाय धरावे.अनेक चुका करुनही तीच्या पदरात त्यांनी  माफी नावाचं सर्वात मोठं दान टाकलं होतं ! 


आपण आपल्यासाठी काही मागतो,तेव्हा ते शब्द असतात... दुस-या साठी काही मागतो तेव्हाच ते शब्द,वाणी होतात... !


बाबांचा साधा शब्द आज वाणी झाला...! 

किंमत आणि मोल यातही फरक असतोच ... !

किंमत आली की व्यवहार आला... पण,व्यवहार सोडून जो कुणाचं मोल जाणायला लागतो... तेव्हा तो स्वतःच मौल्यवान होवुन जातो !

"भाव" त्यालाच मिळतो ! 


माझा बाबा आज माफी देवुन मौल्यवान झाला... लय भाव खावुन गेला... !'


बाबांच्या विचारांनी माझ्याही मनात विचार दाटले.... कफल्लक असुनही जगातला सर्वात श्रीमंत माणुस वाटला तो मला !


बाबांच्या डोळ्यातले अश्रु आता कुबड्यांवर सांडत होते.... ! 


या अश्रुंना कसलाही रंग नव्हता... ! 


कसा असेल ? 


अपेक्षांचा "भंग" झाला की, माणसं "संग" सोडुन देतात...आयुष्यच "बेरंग" होतं .... गळणा-या आसवांना आता "रंग" कसा उरेल  मग ...? 


'निघायचं ?'  बाबांच्या या वाक्यानं  मी तंद्रीवर आलो.  


चालत चालत आम्ही रस्त्यावर येऊन उभे राहिलो,बाबा म्हणत होते,मला त्या  गटाराजवळ सोडा.... पण कसा सोडू परत यांना त्याच गटाराजवळ ? 


आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असतांना या बाबांना तीथे कसा सोडणार होतो मी  ?


डोकं काही केल्या चालेना. 

कुठं ठेवावं या बाबांना ???


अशा विचित्र परिस्थितीत कोणताही वृद्धाश्रम त्यांना स्वीकारणार नाही याची मला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे कुठे फोनाफोनी करायचा प्रश्नच नव्हता. 


पुढं काय करता येईल ? 

डोकं चालेना ! 

विचार करत रस्त्यावरच्या फुटपाथ वर बसलो.

समोरच एक शाॕप होतं ! 

या शॉपला मी कधीही उघडलेलं पाहिलं नाही, वर्षानुवर्षे ते बंदच आहे. 


या शॉप च्या पुढे पाय-या पाय-यांचा एक कट्टा आहे आणि याच कट्ट्यावर एक शेडसुद्धा आहे. 

एक माणूस आरामात इथं झोपला तर त्याला ऊन वारा आणि पाऊस लागणार सुद्धा नाही.


माझे डोळे चमकले ! 


तात्पुरतं इथेच त्यांना ठेवलं तर ?

माझ्या डोक्यात चक्रं सुरु झालं... ! 

गटाराशेजारी ठेवण्यापेक्षा या शेड असलेल्या कट्ट्यावर बाबांना ठेवलेलं केव्हाही चांगलंच. 


पण या दुकानाचे मालक काय म्हणतील ? 


बघू,विचारतील तेव्हा सांगु,त्यांच्या पाया पडु... दिल्या शिव्या तर खावु... असा विचार करून उठलो. 


पहिल्यांदा कट्टा झाडुन साफ केला,घरातून अंथरूण पांघरून आणून कट्ट्यावर अंथरलं. बाबांसाठी कपडे घेतले.आता याच कट्ट्यावर बाबांची सोय केली आहे, १४ सप्टेंबर २०२० रोजी सोमवारी,त्यांना हे तात्पुरतं घर करुन दिलंय... !


कट्टा कुणाचा ? देतंय कोण ? राहतंय कोण ? 


आयजीच्या जीवावर बायजी उदार !


आसो,बाबांचं तात्पुरतं घर तरी तयार झालं... !


आता रोजच्या जेवणाचं काय ? 


मग एका खानावळीत जाऊन बाबांसाठी दोन वेळचा जेवणाचा डब्बा घरपोच द्यायला सांगितला.समोरच्या चहाच्या टपरीवर  दोन वेळच्या चहाची सोय केली.

खानावळ वाल्यांनी विचारलं किती दिवसांसाठी हवा आहे डब्बा ? 


दुरून बाबा झोपलेल्या ठिकाणी कट्ट्याकडे बोट दाखवत म्हणालो, ते बाबा जोपर्यंत तुम्हाला तिथे दिसत आहेत तोपर्यंत डबा द्यायचा !


'आणि दिसणार नाहीत तेव्हा ?' खानावळीच्या मालकानं तोंडाचा चंबु करत विचारलं. 


'तेव्हा मला सांगा,तुमचा डब्बा मी कावळ्याला खाऊ घालेन...पिंडावरचा समजुन.... असं सांगून बाहेर पडलो.'


खरंतर डॉक्टरांनी या बाबांचं आयुष्य काही दिवसांपुरतंच आहे,असं स्पष्ट सांगितलं आहे.


पण बघु,आम्ही प्रयत्न करतोय,बाबांचं पोर म्हणुन,बाबांचा शेवटचा प्रवास तरी सुखाचा व्हावा... ! शॉप चे मालक आलेच कधी मला विचारायला तर पाया पडून त्यांना सांगेन, 'आयुष्यात सगळ्याच ठिकाणी हरलेले हे बाबा आहेत.कुटुंबाने यांना नाकारलंय,काही दिवसांचे ते सोबती आहेत,आपणच यांचं कुटुंब होवुया का थोडे दिवस ? 


भातुकलीचा आपण एक खेळ खेळुया का ...?  


तुम्ही त्यांचे भाऊ व्हा,मी मुलगा,मनिषा सुन आणि सोहम नातु होईल ! 


तुमचं हे शेड म्हणजे आपलं छोटं घर आहे, आपण नात्यांचा इथं खेळ मांडु... बाप,सासरा, भाऊ आणि आजोबा म्हणुन बाबा भुमिका निभावतील ! तुमच्या या घरातुन दुस-या कायमच्या घरी जाईपर्यंत आपण हा भातुकलीचा डाव मांडुया का ? प्लीज सर... 


माहित नाही यावर ते काय म्हणतील....?


आज आम्ही जे केलंय.... मला माहित नाही... बरोबर की चुक ? योग्य की अयोग्य ? 


प्राप्त परिस्थितीत सद्सद्विवेक बुद्धीला जे पटलंय ते केलंय... ! निरोप घेत म्हणालो... '  बाबा, जाऊ आता परत भेटुच !'


'डाॕक्टर जातो म्हणु नये,येतो म्हणावं...!' 

'बरं बाबा, येतो मी ...!' 

गाडीला किक मारत हसत मी निरोप घेतला.


निघतांना लगबगीने जवळ येत म्हणाले.... 'डाॕक्टर मी गेल्यावर मला बघायला याल ना ? 

नाही म्हणजे....' 


ते अडखळले.... माझा हात हातात घेवुन डोळ्यात पाणी आणुन भावुक होत कमरेत वाकले... अजुन बोलायचं होतं त्यांना...


पण..पुढची वाक्यं बोललीच गेली नाहीत त्यांच्याकडुन ..


कुबड्या घेवुन,वाकलेला तो ३० किलोचा हाडांचा सांगाडा,त्यांच्या मृतदेहाला बघायला यायचं आमंत्रण देत होता ... झुकुन आणि वाकुन...  किती ही अगतिकता ?


हजारो आमंत्रणं आजपर्यंत आली असतील मला पण मी मेल्यावर मला बघायला या,अग्नी द्यायला या... हे असलं पहिलंच आमंत्रण मला आलं होतं ! यावेळी डोळ्यातनं पाणी काढायचं नाही असं खुप ठरवलं होतं मी,पण रडवलंच या बाबांनी मला शेवटी ...! 


डोळ्यातलं पाणी पुसत गाडीवरुन पुन्हा उतरलो. 


बाबांना जवळ घेवुन म्हणालो,बाबा, 'तुम्हाला काही होणार नाही...पण मरण कुणाला चुकलंही नाही.... 


'माझ्या अभिजीत नावापुढं मी तुमचं नाव जोडलंय,तुम्ही जर माझ्या आधी गेलात तर मुलगा म्हणुन मीच तुमच्यावर अंत्यसंस्कार करणार ... !'


माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना...आणि त्यांच्याही....


आता बाबांच्या चेह-यावर समाधान दाटलं... डोळ्यांत ते स्पष्ट दिसले...तोंडातल्या तोंडात ते पुटपुटले,'चला म्हणजे मरतांना तरी मी बेवारस म्हणुन नाही मरणार....' 


असं म्हणुन अंताला टेकलेला हा बाबा हमसुन हमसुन रडायला लागला,म्हणाला मला पोर नाही आणि बाळ नाही,पण आज या वयात बाप झालो मी...या  वयातही बाप झालो मी... !


पालथ्या मुठीनं डोळे पुसत बाबा कुबड्या टेकत टेकत रडत कट्ट्याजवळ निघाले...जातांना चारदा मागे बघुन हात हलवत होते,हात जोडुन नमस्कार करत होते... !


भातुकलीच्या खेळामधल्या माझ्या या बापाला मी मनोमन नमस्कार केला...! 


सहज शेडकडे नजर गेली...या शेडवर एक कावळा काव -काव करत खाली बघत होता... ! 


मी मनोमन हात जोडले...'हे काकराजा, भातुकलीचा आमचा हा खेळ...!  मला एव्हढ्यात मोडायचा नाही...कहाणी ही अधुरी ठेवायची नाही...


एक विचारु काकराजा ? 

सांग का जीव असे जोडावे ? 

का दैवाने फुलण्याआधीच फुल असे तोडावे ? 

या प्रश्नावर ऊत्तर नव्हते.... !


काकराजाच्या डोळा तेव्हा दाटुन आले पाणी... आणि वदला,मला समजली शब्दांवाचुन भाषा...भातुकलीचा हा खेळ अखंड चालु दे,मीच उडुन जातो दूर देशा... !' 


शेडवरला कावळा उडुन गेला... 

बाबा आता निवांत झोपले होते... निर्धास्त ... निश्चिंत... !


भातुकलीच्या खेळामधल्या बापाची ही जिंदगानी... 

अर्ध्यावरचा डाव जोडला...अशी ही गोड कहाणी... !!!

१५ सप्टेंबर २०२० मंगळवार !


डॉ. अभिजीत सोनवणे

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर