* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मी आईला 'दत्तक' घेतलं.. I 'adopted' my mother..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/११/२३

मी आईला 'दत्तक' घेतलं.. I 'adopted' my mother..

हा मला भेटला साधारण तीन वर्षांपूर्वी.... रस्त्यावर पडलेला होता.... मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जात होतो.

तेव्हा मला हा दिसला.... महिना जानेवारी २०१९ ! 


उघड्या अवस्थेत असलेला हा.... एका भिंती कडेला पडून होता... आधी याच्या अंगावर ब्लॅंकेट आणून टाकलं आणि त्याला एडमिट केलं होतं.....तो तापाने फणफणला होता.....


डॉक्टर म्हणाले, 'वाचण्याची शक्यता कमी आहे'.... परंतु तो वाचला....परत बाहेर आल्यानंतर पुन्हा आजारी पडला.... पुन्हा त्याला ऍडमिट केलं.... यावेळी डॉक्टर म्हणाले,'आम्ही काहीच करू शकत नाही.' 


पण याहीवेळी तो वाचला.... आणि काही काळाने पुन्हा आजारी पडला.... श्वासामध्ये घरघर चालू झाली.... मी त्याला पुन्हा एडमिट केलं.... डॉक्टर म्हणाले, 'हा काही तासांचा सोबती आहे....'


तरीही तो यातून वाचला.... 


यापुढेही दोनदा तो गंभीर आजारी पडला आणि आपण त्याला ऍडमिट केले आणि तिथेही तो वाचला.... 


मी डॉक्टरांचे आभार मानू की निसर्गाचे ????  


याला कोणीही नाही.... वडील लहानपणी वारले.... याच्या आईने याचा सांभाळ केला.... 


परंतु दहा बारा वर्षाचा असताना त्याची आई याला सोडून गेली... आई वर याचा खुप जीव होता.... ! 


आई ...आई....  म्हणून तो खूपदा तिची आठवण काढायचा! 


पाच वेळा तो वाचला गंभीर आजारातून.... 


हा चमत्कार कसा घडला मलाही कळत नव्हतं.... ! 


एकदा पूर्ण बरा झाल्यानंतर मला म्हणाला, 'सर मी आता परत रस्त्यावर झोपायला जाऊ का ?'


मी त्याला म्हणालो, 'पाच वेळा तुला वाचवला.... इतका तुझ्यावर खर्च केला.... तो तू रस्त्यावर झोपावं म्हणून का रे नालायका ?' 


तो यावर हसत लाडीगोडी लावत मला म्हणाला होता, 'मग मी तुमच्या कामात तुमाला मदत करू का ?' 


या नंतर मी त्याला माझ्या कामात मदतनीस म्हणून घेतलं ....परंतु मी त्याला जास्त पगार देऊ शकत नव्हतो.... शेवटी भिक्षेकरीच की मी ! 


एकदा त्याला म्हणालो, 'तुला आता मी भाजी विकण्याचा व्यवसाय टाकून देतो,

 तो तू कर... !' 


'व्हय.... चालतंय की सर', अस तो तेव्हा म्हणाला होता.  


आणि यानंतर मी त्याला एक सायकल घेऊन दिली.... त्या सायकलला कॅरेज लावून दिलं ....आणि त्याला भाजीचा व्यवसाय टाकून दिला.... 


त्याला सेटल करून मी त्याचा हात सोडला होता.... स्वतंत्रपणे जगण्यासाठी.... ! 


आज मला तो पुन्हा भेटला कॅम्प मध्ये....सायकलच्या कॅरेजला भाजी लावून तो धंदा करत होता .... 


ए.... मेथी घ्या वीस रुप्पय पेंडी.... वीस रुप्पय पेंडी....वीस रुप्पय पेंडी....! 


माझ्या या पोराला पाहून माझा उर भरून आला.... 


हा तोच होता ज्याला पाच वेळा मरता-मरता वाचवलं होतं....


माझ्या तोंडावर रुमाल आणि गॉगल होता....  मी त्याच्या जवळ जावून  म्हणालो, 'पाच रुपये पेंडी देतो का ?'


अर्थात त्याने ओळखलं नाही.... 


साहजिकच त्याला राग आला.... तो म्हणाला, 'तुमच्यासारख्या लोकांमुळे शेतकरी मरत आहे... हे असे बुलेट आणि कार मधून येता.... नाही तिथे खर्च करता .... आणि आमच्या सारख्या गरीब लोकांकडे बार्गेनिंग करता.... वगैरे वगैरे तो खूप काही बोलत होता....


या नंतर मी हळूच माझ्या डोक्यावरची कॅप काढली... रुमाल काढला... आणि गॉगल काढला.... 


आणि म्हणालो, 'ए येड्या, मला "वीस रुप्पय पेंडी" लय महाग वाटती,परवडत नाय.... पन्नास रुपयाला एक पेंडी देशील का.... ?


मला पाहून तो चमकला ....माझ्याकडे त्याने नीट पाहिलं ....आणि रस्त्यावर लोटांगण घातलं.... 


'अवो सर.... आवो ... तुमि.... आयला... वलकला नाय.... मापी करा.... '


गाडीवरून उतरून मी त्याला आलिंगन दिल.... अक्षरशः त्याच्या कपाळाचं आणि हाताचं चुंबन घेतलं.... 


त्याला पुन्हा हसत म्हणालो, 'मला वीस रुप्पय नको.... पन्नास रुपयांना पेंडी दे....'


तो म्हणाला, काय किंमत करता सर ?', 'आक्ख आवीष्य तूमी मला दिलं आहे.... सगळ्या पेंढ्या घीऊन जा की हो'


यानंतर त्याच्या सगळ्या पेंड्या पन्नास रुपये प्रमाणे विकत घेऊन मी रस्त्यात वाटल्या होत्या.... 


यावर तो रडत होता आणि मी हसत होतो....! 


कुणी रडताना.... हसण्याची ही माझी पहिलीच वेळ....!!


हा तोच होता.... रस्त्यात पडलेला .... 

कधीही जाईल अशा अवस्थेतला .... 

पाच वेळा अतीगंभीर अवस्थेतून सुद्धा हा वाचला...का वाचला ? कसा वाचला ?  कोणी वाचवले याला मला कळलं नव्हतं...!


याच्याच शेजारी एक आजी भाजी विकत होती.... ती आमच्या दोघातला संवाद पाहून जवळ आली आणि त्याला खुणेनं विचारलं, 'कोण आहे रे हा ?' 


त्याने,तीला काय सांगितलं मला माहित नाही, परंतु हात जोडत ती माझ्या जवळ आली होती....


मी त्याला खुणेनं विचारलं,

'आता हि आजी कोण ?' 

तो म्हणाला, 'ही माझी आई आहे'

मी चक्रावलो,मी त्याला म्हणालो,'अरे तुझी आई तर तुझ्या लहानपणीच वारली....मग ही कोण...? 


तो म्हणाला,'ही,आई माझ्यासारखीच रस्त्यावर पडली होती.... मी सावरल्यानंतर तीला म्हणालो, मी भाजी विकतो आई,त्यातली तुला थोडी देतो.... तू सुद्धा विक... ती तयार झाली आणि आम्ही दोघेही आता तुमच्या पैशातून दिलेली भाजी विकतो.... !


आई म्हणून मी तिला दत्तक घेतलंय सर....! 


तो सहजच बोलून गेला....


माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.. 


'अरे नालायका,आईबाप दत्तक घेतात रे पोरांना....आज तू आईच दत्तक घेतलीस....  रस्त्यावरच्या आईला दत्तक घेऊन आज तू "लायक" झालास रे .... तूच आज बाप झालास की रे....' 


म्हटलं, 'येड्या, तु हे कुठून शिकलास ?' 


म्हणाला सर,'मी तुमचा "आशीश्टन्ट" म्हणून काम करत होतो ना तवा शिकलो... आपुन खड्ड्यातून भायेर आल्यानंतर..... दुसऱ्याला पण  खड्ड्यातून भायेर काढायचं....  सर तुमी शिकवलं व्हतं ना.... ईसरले ना सर तुमी ? मी नाय  इसारलो...' 


मी कसा इसरेन येड्या ..... ? माझ्या आयुष्याचं गाणं आहे ते.... तुला काय आणि कसं सांगू ? 


ओहो....आत्ता मला कळलं....

तुला पाच वेळा मरताना निसर्गानं का वाचवलं ? 

"तुला एक आई दत्तक घ्यायची होती ना येड्या..... !"


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर...