इतिहासात प्रामाणिक दुष्ट-शिरोमणी कोणी असेल,तर तो मॉकऑव्हिली होय.ज्या काळात लोक देवदूतांप्रमाणे बोलत व डाकूंप्रमाणे वागत, त्या काळात तो होऊन गेला.तो स्पेनच्या फर्डिनंड राजाचा समकालीन होता.
फर्डिनंड ही काय व्यक्ती होती हे आपण पूर्वी पाहिलेच आहे.लोकांना विषे देऊन त्यांच्या आत्म्यांना पुन्हा आशीर्वाद देणारा पोप सहावा अलेक्झांडर व त्याचा मुलगा सीझर बोर्जियो यांचा तो समकालीन होता.त्या काळात पोपांना लग्नाची परवानगी नसे.पण त्यांना मुले असली तरी मात्र चालत ! सीझर बोर्जियो हा सत्पात्र पित्याचा सत्पात्र पुत्र होता.त्याने आपल्या वडील भावाचा खून केला व आपल्या मेहुण्याचा,तसेच जे जे मार्गात आडवे आले,त्या सर्वांचा वध केला. दंभकलेत तो पित्याप्रमाणेच पारंगत होता, दुसऱ्यांचे खून करण्यात पटाईत होता.मित्रांना मिठी मारता मारता तो खंजीर भोसकी, जेवावयास बसलेल्यांना अन्नातून विष चारी. पित्याच्या कारस्थानामुळे मध्य इटलीतील मोठ्या भागाचा तो ड्यूक झाला व स्वतःच्या कारवायांनी पश्चिम युरोपातील राजामहाराजांत मानाचे व महत्त्वाचे स्थान मिळविले.राजा फर्डिनंड,पोपअलेक्झांडर व सीझर बोर्जियो हे त्या काळातील तशा प्रकारच्या लोकांचे जणू प्रतिनिधीच होते!त्यांच्याप्रमाणे वागणारे पुष्कळ लोक त्या काळात होते.सामान्य लोकांचे लक्ष स्वर्गाकडे वळवून त्यांचा संसार हे लुटून घेत,त्यांना पारलौकिक गोष्टीत रमवून त्यांच्या ऐहिक वस्तू हे लुबाडीत,यांना न्याय व दया माहीत नसत,सत्ता व संपत्ती हीच यांची दैवते ! ईश्वराच्या शब्दावर आमचा विश्वास आहे असे हे दाखवीत;पण वस्तुतः स्वतःच्या स्वार्थाचा आवाज मात्र ऐकत.बायबल म्हणजे गुलामांचे आचारपुस्तक असे हे मानीत.ज्यांना जगात मोठेपणा मिळवावयाचा आहे, सर्व विरोध नष्ट करायचे आहेत,वैभवाच्या शिखरावर चढायचे आहे,त्यांच्यासाठी बायबलांतील आज्ञा नाहीत.पण फर्डिनंडसारख्यांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे व ते म्हणजे लोकांचे पुढारी होणे.त्यांच्या मते,एकच वर्तन योग्य असे व ते म्हणजे पशूचे वर्तन.मॅकिऑव्हिलीच्या काळातील महत्त्वाकांक्षी युरोपचे ध्येय हे असे होते.सर्व लोकांना वाटत होते की,नवे नीतिशास्त्र हवे. मात्र दंभामुळे त्यांना तसे बोलण्याचे धैर्य नव्हते.
त्यांना असे नीतिशास्त्र हवे होते की,त्याच्या योगाने कसे फसवावे व कसे चोरावे,हे शिकावयास मिळेल;सर्वांच्या डोक्यांवर बसता यावे म्हणून कोणास कसे ठार करावे हे सांगणारे नीतिशास्त्र त्यांना हवे होते.थोडक्यात म्हणजे,त्यांना चोरांचे व डाकूंचे एक क्रमिक पुस्तक पाहिजे होते.ही उणीव मॅकिऑव्हिलीने दूर केली. माणसे खरोखर जशी होती,तशी त्याने रंगविली.
माणसे जशी दिसतात,तशी नसतात.
मॅकिऑव्हिली यथार्थवादी होता.युरोप रानटी प्राण्यांचे एक वारूळ आहे,असे त्याने दाखवून दिले व निर्लज्ज आणि बेशरम मोकळेपणाने या रानटी पशुपणात कसे यशस्वी व्हावे,हे युरोपियन जनतेस समजेल अशा भाषेत सांगितले.त्याने युरोपला पशुत्वाचे एक नवीन सूत्रमय शास्त्रच दिले.जगाने धक्का बसल्याचा बहाणा केला,पण मनात त्याला गुदगुल्याच झाल्या.! मॅकिऑव्हिलीने नेमके त्याच्या मनातलेच सांगितले होते.सुवर्णमध्याच्या कायद्याऐवजी त्याने लोखंडी कायदा दिला.ख्रिस्ताचे पर्वतोपनिषद त्याने अव्यवहार्य स्वप्न म्हणून फेकून दिले! त्याऐवजी त्याने तलवारीचे उपनिषद उपदेशिले.तोही इतरांप्रमाणे जंगलीच होता;पण तो निदान दांभिक तरी नव्हता.जंगली असून तो साळसूदपणाचा आव आणीत नसे.मॅकिऑव्हिली हा जन्माने फ्लॉरेन्स्टाइन होता. युरोपातील अनेक दरबारांत त्याला मुत्सद्देगिरीचे शिक्षण मिळाले होते. इ.स.१५०२ ते इ.स. १५१२ पर्यंत दहा वर्षे तो फ्लॉरेन्सच्या आमरण अध्यक्षाचा सॉडेरिनी याचा उजवा हात होता. युरोपातील नाटकाच्या पडद्याआड चाललेल्या भानगडी नीटपणे पाहण्याची संधी त्याला मिळाली.त्याने फ्लॉरेन्सच्या सैन्याची पुनर्रचना केली;
सॉडेरिनीची भाषणे तोच लिहून देई; सॉडेरिनीच्या पुष्कळशा कृत्यांबद्दलही तोच जबाबदार होता.लॉरेंझो डी मेडिसी याने जेव्हा सॉडेरिनीस पदच्युत केले,तेव्हा मॅकिऑव्हिलीचा खूप छळ केला गेला;आणि नंतर फ्लॉरेन्सपासून बारा मैलांवर असलेल्या एका गावी त्याला निर्वासित करण्यात आले.
फ्लॉरेन्समध्ये काय काय चालले आहे,हे तो तिथून पाहू शकत असे.पण मेडिसीच्या धोरणात ढवळाढवळ करण्याइतका जवळ तो नव्हता.राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येत नसल्यामुळे यशस्वी राजकारणी कसे व्हावे,याचे शिक्षण तो इतरांस देऊ लागला.
राजकारणावर,मुत्सद्देगिरीवर,त्याने अनेक पत्रके लिहिली.
त्याने या पत्रकांस 'शासनविषयक कापट्य' असे नाव दिले होते.'स्टेट क्रॅफ्ट' म्हणजे मुत्सद्दी होण्यासाठी करावे लागणारे क्रॅफ्ट किंवा कपट. युद्धाच्या कलेवर त्याने सात पत्रके लिहिली; विवाहावर एक उपरोधक निबंध लिहिला, एक-दोन सैतानी नाटके लिहिली;पुष्कळशा विषयलंपटेच्या यथार्थवादी गोष्टी लिहिल्या.त्याने नीतीची उलटापालट केली व रानवटांच्या जगाला बिनदिक्कत सांगून टाकले की, अप्रामाणिकपणाचे धोरणच यशस्वी होते;तोच सर्वोत्तम मार्ग ! या जगात पुढारीपणासाठी निर्दय झगडा चाललेला असतो.अशा या जगात उदात्ततेला व उदारतेला,सहृदय व सुसंस्कृत अभिरुचीला वाव आहेच कुठे? युद्ध आणि ते प्रामाणिकपणे करणे ही गोष्ट हास्यास्पद होय.तो म्हणतो,"युद्धांत प्रामाणिकपणा कधीही नसतो. जे जे कराल,ते ते चांगलेच असते.जर शत्रूला भोसकावयाचे असेल,तर निदान त्याच्या पाठीत भोसकण्याइतके तरी शहाणे व्हा. "
मॅकिऑव्हिलीचे शाठ्यनीतीचे जगप्रसिद्ध पुस्तक 'प्रिन्स' म्हणजे 'राजा' हे होय.या पुस्तकात त्याने आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.हे पुस्तक म्हणजे जुलमाचे क्रमिक पुस्तकच म्हणा ना ! मॅकिऑव्हिली हा सीझर बोर्जियाचा चाहता होता.आपल्या 'राजा' या पुस्तकात मोठेपणाचा आदर्श म्हणून त्याने सीझर बोर्जिया पुढे ठेवला आहे.बोर्जियाप्रमाणे सर्व राजांनी वागावे असे तो सांगतो.एकेकदा नवीन स्टेटचा कारभार हाती घ्यायचा असेल,आपले प्रभुत्व त्या राष्ट्रावर ठेवायचे असेल,तर बोर्जिया वागतो तसेच वागले पाहिजे,असे तो सांगतो.
त्याला प्रजेच्या कल्याणाची पर्वा नसे.राजाचा स्वार्थ कसा साधेल एवढेच तो पाही.पंधराव्या व सोळाव्या शतकांत युरोपातील नीती कशी होती,या बाबतीत हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट टीका होय.
या पुस्तकाची नीट कल्पना यावी म्हणून त्यातील मॅकिऑव्हिलीच्या जणू 'दहा आज्ञा'च,अशी दहा सूत्रे पुढे दिली आहेत.
१.स्वतःचा फायदा पाहा.
२.स्वत: शिवाय दुसऱ्या कोणाला मान देऊ नका.
३.साधुतेचे ढोंग करून दुष्ट आचरण करा.
४.जे जे शक्य असेल ते ते मिळवा,घ्या.
५.कंजूस असा.
६.पशुवत् वागा.
७.संधी सापडेल,तेव्हा तेव्हा दुसऱ्यांना फसवा.
८.शत्रूंना ठार कराच करा;पण जरूर तर मित्रांनाही.
९.दुसऱ्याशी वागताना दया दाखविण्यापेक्षा शक्ती दाखवा.
१०.युद्धाशिवाय कशाचाही विचार करू नका..
११.यातील प्रत्येक आज्ञा आपण जरा नीट पाहू या.
१.'स्वतःचा फायदा पाहा ही त्याची पहिली आज्ञा.
मॅकिऑव्हिली हा नैतिकदृष्ट्या अंध होता. हे सारे जग एक आहे,ही कल्पनाही त्याला शिवली नव्हती.! हा मानवसमाज म्हणजे भावाभावांचे एक कुटुंब आहे;सुख-दुःखांत त्यांनी परस्परांशी एकरूप व्हावे,असे त्याला कधीही वाटले नाही.माणसे म्हणजे इतस्ततःपसरलेले रानटी पशूंचे कळप आहेत;अडाणी पशूंचे गट आहेत,
असेच तो मानी! या जगात काही भोळे लोक आहेत,
काही दुष्ट पशू आहेत.दुष्टांनी भोळ्याभाबड्यांना स्वतःच्या सेवेसाठी राबवावे,असे त्याचे स्पष्ट मत होते.या भोळसटांवर जुलूम करणे,त्यांना चाबूक दाखविणे,हाच खरा मार्ग, याच रीतीने त्याचा उपयोग करून घेता येईल,असे तो म्हणे.जंगलचा कायदा असा आहे की,तुम्ही जर दुसऱ्याला हीनदीन न कराल,तर दुसरे तुम्हास हीनदीन करतील.बळी तो कान पिळी!म्हणून तो म्हणतो की,जे बलवंत आहेत त्यांनी आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवावा व दुबळ्यांनी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी गडबड करू नये,अशा अर्थाचे कायदे करावेत.प्रबळांची सेवा करणे हे दुबळ्यांचे कर्तव्य आहे.प्रबळांचे कर्तव्य मात्र एकच व ते म्हणजे स्वतःची सेवा करणे,स्वतःचा स्वार्थ साधणे.
२.दुसरे सूत्र 'स्वत: शिवाय दुसऱ्या कोणाला मान देऊ नका' हे आहे.तो लिहितो,दुसऱ्याच्या मोठेपणास जो कारणीभूत होईल,तो स्वतःच नष्ट होईल.
दुसऱ्यांचे हितसंबंध तोपर्यंत वाढवावेत, दुसऱ्यांना तोपर्यंतच गौरवावें,की जोपर्यंत त्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेता येईल.पण ते अधिक लोकप्रिय होऊ लागले,तर त्यांना ठार करावे.
महत्त्वाकांक्षी मनुष्याला प्रतिस्पर्धी असणे बरे नव्हे;ते नाहीसे केलेच पाहिजेत.यशस्वी राष्ट्राला एकच धनी असावा,एकच हुकूमशहा असावा;बाकी सर्वांनी त्याचे गुलाम असावे.राजाने दुसऱ्यांपासून नजराणे घ्यावेत, दुसऱ्यांकडून स्तुतिसुमनांजली घ्यावी,पण स्वतः मात्र कोणाचीही स्तुती करू नये;कोणालाही देणगी वगैरे काही देऊ नये.
३.'साधुतेचे ढोंग करून दुष्ट आचरण करा' हे तिसरे सूत्र.वाईटच करा,पण चांगले करीत असल्याची बतावणी करण्यास चुकू नका. अप्रामाणिकपणा व दंभ यावर मॅकिऑव्हिलीचा विश्वास होता.मुत्सद्द्याने कधीही मनातील गोष्ट मोकळेपणाने सांगू नये,असे तो प्रांजळपणे म्हणे.आपण भलेपणाने वागणे अहितकर होय.पण भलेपणाचे सोंग करणे मात्र फायदेशीर असते. जो अत्यंत चांगुलपणाने राहण्याची पराकाष्ठा करील,तो साधुतेचा आदर्श होऊ इच्छील,त्याचाच शेवटी या भोंदू व दुष्ट जगात नाश होईल.मॅकिऑव्हिली म्हणतो,"आपली सत्ता राहावी,दुसऱ्यांना लुटता यावे,म्हणून राजाने न्यायबुद्धी,भूतदया,माणुसकी,विश्वास वगैरेंना रजा दिली पाहिजे.या सद्गुणांच्या विरुद्ध,यांच्या उलट त्याने वागले पाहिजे;पण आपण अशा रीतीने वागतो असे प्रजेला कळू मात्र देता कामा नये.राजा उदार आहे,दयाळू आहे,
धार्मिक आहे,न्यायी आहे,असेच प्रजेला सतत वाटेल,
अशी खबरदारी त्याने घेतली पाहिजे.राजा प्रजेला वस्तुतःचिरडून टाकीत असतानाही तो आपले रक्षण करीत आहे,असेच ज्याला प्रजेला भासविता येईल,तोच खरा यशस्वी राजा ! "ओठांवर दया जरूर असू दे,पण पोटात मात्र पापच असू दे,अशी राजांना मॅकिऑव्हिलीची शिकवण आहे.
४.'जे जे शक्य असेल ते ते मिळवा,घ्या' हे चौथे सूत्र.स्वार्थी असा,लोभी असा,जे जे मिळविता येईल,ते ते मिळवा.मॅकिऑव्हिलीच्या दुष्ट स्मृतीप्रमाणे राजाने स्वतःच्या इच्छापूर्तीशिवाय अन्य कशाचाही विचार करू नये,दुसऱ्यांच्या हक्कांची काळजी करू नये.शक्य ते सारे लुटा,विरोध करणाऱ्यांना गप्प बसवा,पण उदार असण्याची शेखी मिरविण्यास मात्र चुकू नका.तथापि अती लोभ नको;पण तो वाईट आहे म्हणून नव्हे,तर त्यात धोका आहे म्हणून. परकीयांची लुटालूट करणे फार चांगले;मात्र ते सूड घेऊ शकणार नाहीत,असे असावे.स्वतःच्याच प्रजेवर फार कर बसवाल तर बंड होण्याची शक्यता असते.राजाला प्रजा रागाने पदच्युत करील अशी भीती असते.थोडक्यात सांगायचे,तर दुबळ्यांना लुटा व प्रबळांच्या बाबतीत सावध राहा.अशा रीतीने वागाल तरच तुम्ही मोठे व्हाल.
५.'कंजूष असा' हे पाचवे सूत्र.कृपणपणा करा. मॅकिऑव्हिली आपल्या पाशवी नीतिशास्त्रात पुढे सांगतो की,शक्य तो दुसऱ्याच्या पैशांतून खर्च चालवावा व स्वतः चा पैसा वाचवावा.आपल्या प्रजेचे मनोरंजन करण्यात राजाने उधळपट्टी करू नये.स्वतःच्या पैशाने खावे,पण मेजवान्या वगैरे देऊ नयेत.प्रजेसाठी खूप द्रव्य खर्च केल्यास उदारात्मा म्हणून कीर्ती होईल.पण लवकरच जवळचे सारे संपेल,प्रजेवर अधिक कर बसवावे लागतील व शेवटी नाश होईल.स्वतःच्याच देशात उभारलेल्या व मिळविलेल्या पैशांतून उदारपणा दाखविणाऱ्या राजाचा शेवटी विनाश होतो."स्वतःचे जे आहे ते देऊन टाकाल तर शेवटी पस्तावाल."पण युद्धात परकीयांपासून लुटून आणलेल्या पैशाने उदारपणा खुशाल दाखवावा. प्रजेचे वाट्टेल तितके मनोरंजन करावे.कारण त्यामुळे प्रजा राजाला उदार म्हणेल,
इतकेच नव्हे तर त्याच्यासाठी ती लढायला व मरायलाही सदैव तयार राहील.
६.'पशुवत् वागा' हे सहावे सूत्र.राजाने सौम्य वा मृदुप्रकृती असून कधीही चालणार नाही.सर्वांना गुलाम करणे हे राजाचे काम.मॅकिऑव्हिली सांगतो,"सीझर बोर्जिया समकालीन राजांहून श्रेष्ठ आहे;कारण तो सर्वांहून अधिक दुष्ट आहे." (पण या दुष्टपणामुळेच या सीझर बोर्जियाचे भाग्य अस्तास गेले हे मॅकिआव्हिलीला दिसले नाही.)स्पेनचा राजा फर्डिनंड याच्या दुष्टपणाचीही मॅकिऑव्हिलीने स्तुती केली आहे. मॅकिऑव्हिली म्हणतो,"पशू असेल तोच यशस्वी राजा होऊ शकेल.जे न्यायाचे भक्त आहेत, दुष्टपणाचे वैरी आहेत,दयाळू आहेत, ज्यांच्याजवळ माणुसकी आहे,
अशा सम्राटांची शेवटी वाईट गत होते.चांगुलपणा अंती फलदायक ठरत नाही.प्रजेने नेहमी आज्ञा पाळावी व सैनिकांनी आदर दाखवावा म्हणून राजाने सदैव कठोरच राहिले पाहिजे.स्वतःमधील माणुसकी मारून त्याने पशूच झाले पाहिजे. "
७.'संधी सापडेल तेव्हा तेव्हा दुसऱ्यांना फसवा' हे सातवे सूत्र प्रतिस्पर्ध्यास चिरडण्यासाठी मनुष्याने जाणूनबुजून पशू झाले पाहिजे,असे मॅकिऑव्हिलीचे मत आहे.राजाने सिंहाप्रमाणे भीषण व कोल्ह्याप्रमाणे धूर्त झाले पाहिजे. "कोल्ह्याप्रमाणे ज्याला नीट वागता येते,तोच नीट यशस्वी होऊ शकतो."न्यायापेक्षा बळाची प्रतिष्ठा अधिक आहे.कापट्य सत्याहून बलशाली आहे. राजाने वचन-पालनाच्या भ्रमात कधीही राहू नये. या जगात कोणीच दिलेले वचन पाळीत नाही. "सारेच लोक चांगले असते तर असा उपदेश करणे चुकीचे झाले असते;पण लोक दुष्ट असतात,त्यांचा कोणावरही विश्वास नसतो,म्हणून आपणही कोणावर विश्वास ठेवू नये." राजाला तर वचन मोडणे फारच सोपे असते." दिलेला शब्द मोडण्यास राजाला शेकडो सबबी सांगणे शक्य असते." कारण बहुतेक लोक शुद्ध नंदीबैल असतात.फसवले जाण्यासाठी,नकळत लुबाडले जाण्यासाठी हे जग सदैव तयारच असते.अर्वाचीन काळातील मुत्सद्देगिरी व व्यापारधंदा यांचा मॅकिऑव्हिलीच जनक आहे ही गोष्ट आपणास दिसून येईल.यशस्वी होणारा मुत्सद्दी वा धंदेवाला हा मॅकिऑव्हिलीच्या सांगण्याशीच अधिक जवळ असतो. व ख्रिस्ताच्या आज्ञांपासून फार दूर असतो,असे दिसून येईल.पण ते जाऊ द्या.मॅकिऑव्हिली
चे 'राजा' हे पुस्तक आपणास अद्यापि पाहायचे आहे.
८.'शत्रूना तर ठार कराच करा;पण जरूर तर मित्रांनाही' हे आठवे सूत्र.ज्या युगात मॅकि ऑव्हिली राहत होता ते माणुसकीला पारखे होते.सोळाव्या शतकातील प्रमुख खेळांपैकी प्राण्यांची शिकार व नास्तिकांना जाळणे हे दोन खेळ लोकप्रिय होते,करमणुकीची ही आवडती साधने होती.त्या काळातील एका सम्राटाला मनुष्याच्या पचनक्रियेची सर्व माहिती समजून घेण्याची इच्छा झाली.एखादा वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी दोन बेडूक फाडतो,त्याप्रमाणे त्या सम्राटाने दोन जिवंत माणसांची आपल्यासमोर चिरफाड करून घेतली व आपली ज्ञानतृष्णा भागविली.शेकडो वर्षे लढाया सारख्या चालू असल्यामुळे मनुष्यांची हृदये दगडासारखी झाली होती;
मानवी प्राणांची किंमतच नाहीशी झाली होती,खून म्हणजे एक मामुली बाब वाटे,मित्रांची फसवणूक म्हणजे जणू मान्य कायदा! जीवनाच्या या शिकारीत अशा गोष्टी क्षम्यच नव्हेत तर कर्तव्यही भासत,त्यामुळे मॅकिऑव्हिलीचे बोलणे लोकांना पटकन पटे. त्याच्या तर्कशास्त्रातले हे सारे दुवे ऐकायला ते तयार असत.
९.( दुसऱ्यांशी वागताना ) दया दाखविण्यापेक्षा शक्ती दाखवा' हे नववे सूत्र.दुसऱ्यांच्या बाबतीत दयेपेक्षा दुष्टता व बळजोरी यांचाच प्रयोग करीत जा.मॅकिऑव्हिलीने एक सर्वसामान्य नियम सांगून ठेवला आहे.की,
आपल्याबद्दल लोकांना प्रेम वाटण्यापेक्षा भय वाटणे अधिक बरे.एखाद्या प्रतिस्पर्धी राजाचे सर्वस्व हिरावून घेतल्यावर त्याला निःसंतान करा.काम अर्धवट सोडू नका, पुरे करा.नाही तर एखादा नातलग उद्या उभा राहून सूड घेऊ पाहील.महत्त्वाकांक्षी माणसाने अर्धवट दुष्ट असून भागणार नाही.दुष्टपणा करायचाच असेल,तर सदसद्विवेकबुद्धीची नांगी मोडून टाका.पण तुमच्या दुष्टपणास सीमा नसली,तरी त्याला रीत मात्र अवश्य हवी. तुम्ही एखादा देश घेतला किंवा एखाद्याला लुबाडले, तर जो काही दुष्टपणा करायचा असेल तो त्याच वेळेस करा.म्हणजे हळूहळू सारे विसरले जाईल. एकाच तडाक्यात सारे करून घ्यावे.पण कृपा करायची असेल,तर ती मात्र तीळतीळ करावी; म्हणजे तिची सारखी आठवण राहील.पण सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे शक्य तो दया न दाखविणे, कृपेची खैरात न करणे.
हुकूमशहाने बळाच्या जोरावर सत्ताधीश राहिले पाहिजे,
प्रेमाच्या जोरावर नव्हे.प्रजेची सदिच्छा हे त्याचे बळ नसावे;तर स्वत:ची शक्ती हे त्याचे बळ असावे.
आता मॅकिऑव्हिलीची शेवटची सर्वांत महत्त्वाची व रानटी आज्ञा पाहायची.कोणती बरे ती? खाली दिली आहे..
१०.'युद्धाशिवाय कशाचाही विचार करू नका' हे दहावे सूत्र.मॅकिऑव्हिली या पशुत्तमाचा युद्ध हाच मुख्य धंदा असला पाहिजे.मॅकिऑव्हिली सांगतो की,राजाने आपणास वधाच्या कलेला संपूर्णपणे वाहून घेतले पाहिजे."जो राज्यकर्ता आहे.त्याच्या ठिकाणी एकच कला पाहावी;ती म्हणजे युद्धाची कला." राजाने लष्करी गोष्टीशिवाय कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नये. शांततेच्या काळात त्याने सदैव युद्धाची तयारी करीत राहिले पाहिजे.राजाचे संभाषण,त्याचा अभ्यास,त्याचे खेळ,त्याचे वाचन,त्याचे गंभीर चिंतन,त्याचे विचार,या सर्वांचे ध्येय एकच असले पाहिजे व ते म्हणजे युद्ध.
आपल्या लोकांना कसे जिंकून घ्यावे,मानवजातीला कसे गुलाम करून टाकावे,याचाच ध्यास त्याने घ्यावा.
मॅकिऑव्हिलीन शासनपद्धतीत सारे रस्ते युद्धाकडे जातात आणि आजपर्यंत युद्धच सर्वत्र जारी आहे.
कारण मॅकिआव्हिलीचेच शिष्य सर्वत्र राज्य करीत आहेत.वाईट राज्य करीत आहेत.मॅकिऑव्हिलीने दिलेली राजनीतीच जगातील सर्व लष्करी हडेलहप्प्यांची व मुत्सद्द्यांची नीती आहे.
माणसामाणसांतील व्यवहारात आपण थोडे तरी बरे वागू लागलो आहोत.पण राष्ट्राराष्ट्रांतील व्यवहारात मात्र आपण साम्राज्यवादी स्वार्थाचे आंधळे धोरणच चालवीत आहोत.मुत्सद्देगिरी,कपट व रानटी पिळवणूक हेच धोरण सतत चालू आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांत आपण मॅकिऑव्हिलीच्या कपटनीतीचे अनुकरण करतो; एवढेच नव्हे तर तिचे कौतुक करतो.जगातील आजकालचे प्रमुख मुत्सद्दी,नामांकित इतिहासकार व काही मोठे तत्त्वज्ञानी(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,सानेगुरुजी) मॅकिऑव्हिलीचेच शिष्य आहेत.अर्वाचीन काळातील अती बुद्धिमान लॉर्ड बेकन सांगतो की,राजकारणात पुष्कळसा दंभ असावा;व थोडासा प्रामाणिकपणा असावा.आठव्या हेन्रीचा प्रधान थॉमस क्रॉमवेल हा मॅकिआव्हिलीचे 'प्रिन्स' हे पुस्तक राजकीय शहाणपणाचे सार मानी.एकोणीसाव्या शतकातील मोठा इतिहासकार मेकॉले म्हणतो,'या 'प्रिन्स' पुस्तकात पुष्कळच उदात्त भावना आहेत." १९१४ सालच्या महायुद्धात लाजिरवाणी कत्तल साडेचार वर्षे चालली होती,तिचे कारण हेच की, जगातील सारे मुत्सद्दी मॅकिऑव्हिलीच्या उपदेशाप्रमाणे वागत होते.तोंडाने ते केवढीही मोठी तत्त्वे पुटपुटत असले,तरी त्यांचा व्यवहार मॅकिऑव्हिलीच्या सारखाच होता.आजचे सारे साम्राज्यवादी मुत्सद्दी,हुकूमशहा,योद्धे, मानवजातीचे नानाविध स्वरूपांतील छळवादी, सारे मॅकिऑव्हिलीचेच अनुयायी आहेत.