मार्टिन ल्यूथर किंग ज्यु.
(१९२९ जानेवारी१५-१९६८ एप्रिल ४)
"हिंसा अनैतिक आहे;कारण प्रेमापेक्षा द्वेषावर तिचा भर असतो.हिंसेमुळे समाजाचा नाश होतो आणि भ्रातृभाव अशक्यप्राय होतो.हिंसेमुळे समाजात सहकार्याऐवजी विभक्तपणाची प्रवृत्ती निर्माण होते.हिंसेमुळे पराभूत लोकांत कडवटपणा आणि विजेत्यांत पाशवी वृत्ती निर्माण होते.हिंसेचा शेवट अखेर खुद हिंसेच्याच पराभवात होतो.,नागरिक हक्कांच्या चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांनी नॉर्वेतील ऑझ्लो विद्यापीठात शांततेच्या नोबेल पारितोषकाचा स्वीकार करताना केलेले उत्स्फूर्त भाषण.
आजच्या काळातील मानवाने सर्व जगापुढे भावी काळाचे अचंबा वाटण्याजोगे चित्र उभे केले आहे.वैज्ञानिक यशाची नवी व आश्चर्यकारक शिखरे त्याने पादाक्रांत केली आहेत. माणसांप्रमाणे विचार करू शकणारी यंत्रे आणि विश्वमालेतील अनंत अवकाशाचा ठाव घेणारी उपकरणे त्यांनी तयार केली आहेत.सागर उल्लंघण्यासाठी प्रचंड पूल,तसेच गगनचुंबी भव्य इमारती बांधल्या गेल्या आहेत.
माणसाने तयार केलेल्या विमानामुळे व अवकाशयानामुळे अनंत कःपदार्थ बनले आहे,काळाला मर्यादा पडली आहे.
आणि अवकाशातून हमरस्ते केले गेले आहेत.आधुनिक काळातील माणसाने केलेल्या शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीचे हे नेत्रदीपक चित्र आहे.पण विज्ञानाच्या व तंत्रशास्त्राच्या क्षेत्रात इतकी भव्य प्रगती होऊनही आणि भावी काळात अमर्याद प्रगती होण्याची चिन्हे दिसत असूनही काही तरी मूलभूत हरपलेले आहे,असे वाटते.आजच्या जगात आत्मिक तेजाचे दारिद्र्य भासते.विशेषतः आपल्या वैज्ञानिक व तांत्रिक समृद्धतेच्या पार्श्वभूमीवर हे दारिद्र्य प्रकर्षाने जाणवते.आपण आधिभौतिकदृष्ट्या अधिक सधन झालो आहोत पण नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या अधिक दरिद्री झालो आहोत. आपण आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहार करण्यास आणि सागरात माशांप्रमाणे तरंगण्यास शिकलो आहोत,पण भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहण्याची साधी कला मात्र आपण शिकलो नाही.
प्रत्येक मनुष्य दोन जगात वावरत असतो,एक अंतर्गत व दुसरे बाह्य.अंतर्गत जग हे आध्यात्मिक आकांक्षांचे जग असून ते कला, वाड्मय,नैतिक मूल्ये व धर्म यांच्याद्वारे व्यक्त होते.बाह्य जग हे विविध साधने,तंत्रे,यांत्रिकी व्यवस्था व उपकरणे यांनी युक्त असून त्यांच्या साहाय्याने आपण जीवन कंठीत असतो.आपण आपले अंतर्गत जग बाह्य जगात का लुप्त होऊ दिले,हीच आज आपल्या
पुढील समस्या आहे. ज्या साध्यासाठी आपण जगतो,त्या साध्यावर आपण साधनांची मात होऊ दिली आहे.
थोडक्यात कविवर्य थोरो यांच्या पुढील उद्बोधक वचनात आधुनिक जीवनाचे समालोचन करता येईल,"न सुधारलेल्या साध्यासाठी सुधारलेली साधने," जर मानवजातीला अस्तित्वात रहावयाचे असेल तर मानवानी आपल्यातील नैतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील
मागासले पणा घालविला पाहिजे.वाढत्या आधिभौतिक शक्तीच्या प्रमाणात जर आत्मिक बल वाढले नाही तर जगात अधिक प्रमाणात प्रलय होईल.जेव्हा माणसाच्या स्वभावातील बाह्य प्रवृत्ती आंतरिक शक्तीवर विजय मिळवते,तेव्हा जगात वादळाचे काळे ढग जमू लागतात.
आध्यात्मिक व नैतिक मागासलेपणा ही आधुनिक काळातील माणसापुढील मुख्य समस्या आहे.माणसाच्या नैतिक ऱ्हासातून जे तीन व्यापक प्रश्न उद्भवतात,त्यांतून ही समस्या व्यक्त होते.हे तीन प्रश्न वेगवेगळे असतात,पण ते एकमेकांत गुंतलेले आहेत.हे तीन प्रश्न म्हणजे अन्याय,
दारिद्र्य व युद्ध होत.प्रथम मी वांशिक अन्यायाचा उल्लेख करतो.वांशिक अन्यायाचे पाप नष्ट करण्यासाठी चाललेला लढा हा आजच्या काळात एक मोठा लढा आहे. अमेरिकेतील निग्रोत आज जागृती झालेली दिसत आहे.स्वातंत्र्य व समानता मूर्त स्वरूपात आणण्याच्या नितांत व तीव्र श्रद्धेतून ही जागृती झाली आहे.
उद्ध्वस्त जीवनाची प्रलयंकर गर्जना
ज्या काळात सामाजिक संस्कृतीतील मूलभूत दृष्टिकोन बदलत आहे अशा काळातच आपण वावरत आहोत,असे आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड हे तत्त्वज्ञ म्हणतात.इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.ज्या गृहीत तत्त्वावर समाजव्यवस्था आधारलेली आहे,त्या तत्त्वांचे पृथक्करण केले जात आहे, त्यांना जोराचे आव्हान दिले जात आहे.आणि त्यात मोठे बदल होत आहेत.आज जग स्वातंत्र्याच्या वृत्तीने भारलेले आहे.व्हिक्टर ह्यूगोच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे या विचारसरणीला मूर्त स्वरूप लाभण्याची वेळ आली आहे.आज आपल्याला असंतोषाचा मोठा घरघराट ऐकू येत आहे.हा घरघराट म्हणजे ज्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे अशा जनतेची मेघगर्जना आहे.ही जागृत झालेली जनता गांजवणुकीच्या खाईतून स्वातंत्र्याच्या उज्ज्वल शिखरावर आरूढ होऊन एका भव्य आवाजात स्वातंत्र्याची गर्जना करत आहे.जगातील अत्यंत व्यापक असा हा विमोचनाचा काळ आहे.या काळात आगीच्या वणव्याप्रमाणे सर्व जगात स्वातंत्र्याची चळवळ पसरत आहे.आपले वंश व आपला देश यांची पिळवणूक थांबविण्याचा प्रचंडसंख्याक जनतेने निर्धार केला आहे.
प्रत्येक खेड्यात,रस्त्यावर,गोद्यांत,घरात,विद्यार्थ्यांत, प्रार्थनामंदिरांत व राजकीय सभांत स्वातंत्र्याचा हा घरघराट ऐकू येत आहे.अनेक शतकांपर्यंत ही ऐतिहासिक चळवळ या पश्चिम युरोपातील राष्ट्र व समाज यापुरतीच मर्यादित होती.बाकीच्या जगाला अनेक प्रकारे नागवण्यात ही राष्ट्र गुंतली होती.तो काळ,वसाहतवादाचे युग आता संपलेले आहे.पूर्व व पश्चिम यांचा मिलाफ होत आहे.
जगाची फेर वाटणी होत आहे.आपल्या मूलभूत दृष्टिकोनात बदल होत आहे.या घडामोडीमुळे इतिहासाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आश्चर्य वाटणार नाही.पददलित लोक कायमचे पददलित राहणार नाहीत.स्वातंत्र्याची आकांक्षा अखेर व्यक्त होतेच. अनेक शतकांपूर्वी मोझीझने कैरोच्या न्यायालयात "माझ्या लोकांना जाऊ द्या," ही घोषणा कशी केली त्याची रोमांचकारी कथा बायबलात आली आहे.अखंड चालू असलेल्या कथेचे ते जणू काय सुरूवातीचे प्रकरण होते.
अमेरिकेतील सध्याचा लढा याच अखंड कथेतील एक नंतरचे प्रकरण आहे.काही तरी आंतरिक शक्तीने निग्रोंना त्यांच्या स्वातंत्र्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून दिली आहे आणि काहीतरी बाह्य शक्तीने त्याला हे स्वातंत्र्य मिळविता येईल,हे पटवून दिले आहे.
अमेरिकेतील निग्रोंचे स्वातंत्र्याचे स्वप्न मूर्त स्वरूपात आणण्यासाठी अद्याप कितीतरी मजल मारावयाची आहे.बायबलातील आलंकारिक भाषेत सांगावयाचे म्हणजे इजिप्तमधील धुळीने भरलेल्या प्रदेशातून आम्ही निघालो आणि प्रदीर्घ व अतिशय तीव्र झोंबणाऱ्या हिवाळ्यामुळे अनेक वर्षे गोठून गेलेला तांबडा समुद्र आम्ही ओलांडला.पण आश्वासित समृद्ध प्रदेशाच्या भव्य किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचण्यापूर्वी निराशाजनक व त्रस्त करणाऱ्या वैराण मुलखातून आम्हाला जावे लागणार आहे. आम्हाला अद्यापही विरोधाची उत्तुंग शिखरे व प्रतिकाराचे प्रचंड पर्वत ओलांडावयाचे आहेत. पण धिम्या व दृढ निश्चयाने आम्ही मार्गक्रमण करीत राहू आणि अशा रीतीने निराशेच्या प्रत्येक दरीचे रूपांतर उत्तुंग आशेच्या व दयेच्या शिखरात करू.अहंकाराचा व असमंजसपणाचा प्रत्येक पर्वत नम्रतेच्या व दयेच्या साधनांनी सखल करू.
अन्यायाच्या खबदाडाचे रूपांतर समान संधीच्या सपाट प्रदेशात करू आणि पूर्वग्रहांच्या वेड्यावाकड्या स्थळांचे स्वरूप सुजाणतेच्या प्रवृत्तीने पालटून टाकू.
इतिहासातील अपूर्व शस्त्र : अहिंसा
स्वातंत्र्य,समानता,रोजंदाऱ्या व नागरिकत्व या संबंधीची मागणी सोडावयाची नाही किंवा तीत भेसळ करावयाची नाही किंवा ती लांबणीवर टाकावयाची नाही,अशी अमेरिकेतील नागरिक हक्कांच्या चळवळीतील मुख्य गटांची भूमिका आहे.त्यासाठी प्रतिकार व झगडा करावा लागला तरी आम्ही माघार घेणार नाही.आम्ही नमणार नाही.आम्ही आता घाबरणार नाही.आचार व विचार या दोन्ही दृष्टीनी अहिंसा हे आमच्या लढ्याचे अधिष्ठान आहे आणि त्याचमुळे या लढ्यातील एका सैनिकाला शांततेचे नोबेल पारितोषिक देणे समर्पक वाटले असावे.स्थूल मानाने बोलावयाचे म्हणजे नागरिक हक्काच्या चळवळीत अहिंसेचा अवलंब याचा अर्थ या लढ्यात शस्त्रास्त्रांवर अवलंबून न राहण्याचे धोरण.याचा अर्थ विषमता व गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या राजवटीचे रिवाज व कायदे यांच्याशी असहकार.
याचा अर्थ प्रतिकाराच्या चळवळीत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग.अप्रत्यक्ष मार्गावर भर दिला तर जनतेला प्रत्यक्ष कृतीत सहभागी होण्याची संधी बऱ्याच वेळा मिळत नाही,असा अनुभव आहे.अहिंसा याचा अर्थ असाही आहे की,अलीकडच्या काळातील कष्टप्रद लढ्यात भाग घेतलेले माझे सहकारी बांधव इतरांना क्लेश न देता स्वतः क्लेश सहन करीत आहेत. यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे यापुढे आम्ही घाबरणार नाही किंवा नमणार नाही; पण त्याबरोबर बऱ्याच प्रमाणात हेही खरे आहे की, इतरांना किंवा ज्या समाजाचे आम्ही घटक आहोत,त्या समाजाला घाबरून सोडण्याचा आमचा हेतू नाही.गौरकाय लोकांची मानहानी करून आणि त्यांना गुलाम करून निग्रो लोकांचे विमोचन करणे हा या चळवळीचा हेतू नाही.आम्हाला कोणावरही विजय मिळवावयाचा नाही.अमेरिकन समाजाचे विमोचन करणे आणि सर्व जनतेच्या विमोचनात सहभागी होणे,हा आमच्या चळवळीचा उद्देश आहे.
वांशिक न्याय मिळविण्यासाठी हिंसेचा मार्ग अव्यवहार्य व त्याचबरोबर अनैतिक आहे. बऱ्याच वेळा राष्ट्रांनी लढाई करून स्वातंत्र्य मिळविले आहे;पण तात्पुरते विजय मिळाले तरी हिंसेमुळे चिरस्थायी शांतता होत नाही.
हिंसेमुळे सामाजिक प्रश्न सुटत नाहीत,उलट नवीन व अधिक गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.हिंसा अव्यवहार्य आहे.कारण तीमुळे अधोगती होत जाऊन अखेर सर्वांचाच नाश होतो. हिंसा अनैतिक आहे,कारण सुज्ञपणे विरोधकांना आपलेसे करण्यापेक्षा तीत विरोधकांची मानहानी करण्याची प्रवृत्ती असते,हृदयपरिवर्तन करण्यापेक्षा द्वेषावर तिचा भर असतो.हिंसेमुळे समाजाचा नाश होतो,आणि भ्रातृभाव अशक्यप्राय होतो.हिंसेमुळे समाजात सहकार्याऐवजी विभक्तपणाची प्रवृत्ती निर्माण होते.हिंसेमुळे पराभूत लोकात कडवटपणा आणि विजेत्यांत पाशवी वृत्ती निर्माण होते.खुद्द हिंसेचा शेवट अखेर खुद्द हिंसेच्या पराभवात होतो.खऱ्याखुऱ्या अर्थी अहिंसा ही माणसातील आध्यात्मिक व नैतिक मागासलेपणा घालवू पाहते.यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे हाच मागासलेपणा म्हणजे आजच्या काळातील माणसापुढील मुख्य समस्या आहे. अहिंसा ही नैतिक साधनांद्वारे नैतिक उद्दिष्टे साध्य करू पाहते.अहिंसा हे प्रभावी व न्याय्य शस्त्र आहे इतिहासात अपूर्व असे हे शस्त्र आहे. जखम न करता अहिंसा शस्त्रक्रिया करते, आणि हे शस्त्र पेलणारा माणूस स्वतः उदात्त बनतो
.अहिंसेच्या साधनावर माझा विश्वास आहे.मला वाटते,भंगलेल्या समाजाचे पुनरुत्थान करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यांनी अंधवृत्ती,भीती,अहंकार व असमंजसपणा यांच्या आहारी जाऊन आपल्या सदसद्विवेकबुद्धीकडे दुर्लक्ष केले आहे,अशा प्रचंड बहुसंख्याक लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून न्याय्य कायदा अंमलात आणण्याचा अहिंसा हाच मार्ग आहे.
अणुयुद्धांची भयानक समस्या..
अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करणाऱ्यांना आपल्या संदेशाचे समालोचन पुढील सुलभ शब्दांत करता येईल.अन्यायाविरुद्ध सरकारी व इतर अधिकृत यंत्रणांनी जरी आवश्यक ती उपाययोजना प्रथम केली नाही.
तरीसुद्धा आम्ही अन्यायाविरुद्ध उघडउघड झगडू.आम्ही अन्यायी कायदे मानणार नाही किंवा अन्याय्य रिवाजापुढे नमणार नाही.अर्थात आम्ही हे सर्व शांतपणे, उघडपणे,
आनंदाने करू,कारण हृदयपरिवर्तन करणे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही अहिंसेच्या साधनाचा अवलंब करीत आहोत,
कारण शांततावादी समाज हे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडून हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू,पण त्यात अपयश आले तर आम्ही प्रत्यक्ष आचरणाने हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू.
वाटाघाटी करण्यास आणि तडजोडी करण्यास आमची नेहमीच तयारी आहे.पण आम्हाला जे सत्य वाटते त्याचा आविष्कार व्हावा म्हणून जरूर तेव्हा क्लेश सहन करण्याची व प्रसंगी प्राण देण्याची आमची तयारी आहे.वांशिक अन्यायाच्या समस्येला प्रतिकार करण्यासाठी हे जे साधन स्वीकारले गेले आहे, त्याला पूर्वी यशही आले आहे.मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या प्रबळ सत्तेविरुद्ध याच साधनाचा उत्कृष्ट रीतीने उपयोग केला,आणि अनेक शतकांच्या राजकीय वर्चस्वातून व आर्थिक पिळवणुकीतून भारतीय जनतेची मुक्तता केली.
गांधीजींनी फक्त सत्य,आत्मबल,अहिंसा व धैर्य या अस्त्रांचा उपयोग केला.गेल्या दहा वर्षांत अमेरिकेतील निःशस्त्र स्त्री-पुरुषांनी अहिंसेच्या नैतिक शक्तीची व परिणामकारकतेची कृतीने साक्ष पटवून दिली आहे.हजारो अज्ञात व निर्भय निग्रो व गौरकाय तरुणांनी शिक्षणाला तात्पुरता रामराम ठोकून देहदंड सोसला.अन्यायाच्या उष्णतेने रणरणत असलेल्या वाळवंटात त्यांचे धीरोदात्त व शिस्तबद्ध कार्य म्हणजे आल्हाददायक हिरवळच होय.
त्यांनी सर्व अमेरिकन लोकांना लोकशाहीच्या महान जलाशयाकडे पुन्हा नेले आहे.अमेरिकन राष्ट्राच्या संस्थापकांनी राज्यघटना व स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करून ही लोकशाहीची समृद्ध जलाशये खोदली आहेत.
एक दिवस सर्व अमेरिकेला त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल.(गांधी नावाचे महात्मा, संपादक - रॉय किणीकर,साहाय्यक,अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स)
माणसाचे दौर्बल्य व अपयश यांची मला चांगलीच जाणीव आहे.अनेकजण अहिंसेच्या परिणामकारते
विषयी शंका घेऊन हिंसेचा उघड पुरस्कार करतात;
पण शतकानुशतकांच्या वांशिक अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी अहिंसा हे सर्वात व्यवहार्य व नैतिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट साधन आहे अशी माझी अद्यापही खात्री आहे.
उर्वरित भाग पुढील ०२.०४.२४ रोजीच्या लेखामध्ये…!