आनंदी राजपुत्र
जॉन,माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट मी तुला सांगतो.ही गोष्ट आहे एका पुतळ्याची आणि एका पाकोळीची.बऱ्याच जणांना ही एक बालकथा आहे असं वाटतं.ऑस्कर वाइल्ड यांनी ही गोष्ट लिहिली आहे.
कदाचित तूही ती याआधी वाचली असावीस.ही गोष्ट मी लहान असताना नव्हे,तर वयस्क झाल्यावर माझ्या वाचण्यात आली याचा मला खरंच खूप आनंद आहे.
अशा वेळी जेव्हा माझं मन संवेदना आणि ओलावा हरवत चाललं होतं आणि माझ्या हृदयाचा ताबा अहंकाराने घेतला होता.तू जर ही गोष्ट तुझ्या लहानपणी वाचली किंवा ऐकली असशील,तर आता मी सांगतो म्हणून पुन्हा एकदा वाचशील का? कारण ही बालकथा नाहीये.तर ही प्रेमाची सुंदर गोष्ट आहे.ही गोष्ट वाचली,की माझ्या डोळ्यांत पाणी येतं,पण हृदय मात्र आनंदानं ओसंडून जातं.ही गोष्ट मी तुला थोडक्यात सांगणार आहे.कारण पुढं तुला मी जे काही सांगणार आहे त्याच्याशी या गोष्टीचा अगदी जवळचा संबंध आहे.चल तर,त्या आनंदी राजपुत्राच्या आणि त्या पाकोळीच्या दुनियेतून एक फेरफटका मारून येऊया.
त्या नगराच्या मध्यभागी असलेल्या प्रशस्त चौकात एका उंच चबुतऱ्यावर आनंदी राजपुत्राचा पुतळा विराजमान झालेला होता. त्या पुतळ्याला डोक्यापासून पायांपर्यंत सोन्याचा पत्रा जडवलेला होता आणि पुतळ्याच्या डोळ्यांमध्ये मौल्यवान नीलम रत्नं बसवलेली होती.
त्याच्या तलवारीच्या मुठीमध्ये एक मोठ्ठा माणिक झळाळत होता.एके रात्री त्या नगरात एक पाकोळी उडत उडत आली.थंडी वाढण्याआधी स्थलांतर करावं या विचारानं त्या पाकोळीचे बाकीचे मित्र कधीचे निघून गेले होते. ते सगळे इजिप्तकडं गेले होते,पण ही पाकोळी चुकून मागं राहिली होती.उडत असताना पाकोळीला उंच चबुतऱ्यावरचा आनंदी राजपुत्राचा तो पुतळा दिसला आणि त्याच्या पायांमध्ये असलेल्या जागेत थोडा आराम करावा म्हणून पाकोळी खाली उतरली.
झोपी जाण्याआधी त्या पाकोळीनं चौफेर नजर फिरवली आणि डोळे मिटणार इतक्यात, पाण्याचा एक मोठा थेंब तिच्या अंगावर पडला. 'अरेच्चा! आकाशात एकही ढग दिसत नाही आणि आता पाऊस कुठून पडतोय?' तिनं डोकं वर केलं आणि बघते तर काय,त्या आनंदी राजपुत्राचे डोळे पाण्यानं भरले होते आणि त्याच्या सोन्याच्या गालांवरून अश्रू ओघळत होते.पाकोळीच्या मनात कळ उठली. राजपुत्राबद्दल तिच्या मनात कणव आली.
'तुम्ही कोण आहात?' पाकोळीनं विचारलं.
"मी आनंदी राजपुत्र आहे"
"पण तुम्हाला रडायला काय झालं?"
आनंदी राजपुत्र सांगू लागला,"जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा अश्रू कशाला म्हणतात मला माहीतच नव्हतं. विशाल महालात मी लहानाचा मोठा झालो.तिथं दुःख कशाला म्हणतात हे कळलंच नाही कधी,लोकांच्या वेदना,त्यांची आर्तता माझ्यापर्यंत कधीच पोहोचली नव्हती. मी दिवसभर महालातल्या बगीच्यात सवंगड्यांबरोबर
हुंदडायचो आणि रात्री देखण्या, तरण्या मुलींबरोबर नाचगाणी चालायची. महालाभोवती एक प्रचंड भिंत होती आणि त्या भिंतीबाहेर वेगळं जग असू शकतं,ही जाणीव माझ्या मनाला कधीच शिवली नाही.जग केवळ सौंदर्यानं नटलेलं आहे असा माझा समज होता.
"सगळेजण मला आनंदी राजपुत्र म्हणायचे." तो पुढे म्हणाला "आणि खरंच मी खूप आनंदी होतो आणि जीवनाची भरपूर मजा घेत होतो.माझं सगळं आयुष्य मजामस्ती करण्यातच संपून गेलं. माझ्या मरणानंतर मला आता हे उच्चासन मिळालं आहे.इथून मला माझ्या देशातल्या प्रजेची दुःखं,त्यांच्या वेदना,त्रास,गरिबी, उपासमारी सगळं काही दिसतं.माझं हृदय शिशाचं आहे.
त्याचा भावनांशी संबंध असता कामा नये.पण तरीही मला रडू येतंच." "इथून थोड्या अंतरावर,"आनंदी राजपुत्र पुढं सांगू लागला,"एका गल्लीमध्ये एक मोडकळीला आलेलं घर आहे.त्या घराची एक खिडकी उघडी आहे.त्या खिडकीतून मला एक स्त्री खुर्चीवर बसलेली दिसते आहे.
तिचा निस्तेज चेहरा काळजीनं आणखीनच काळवंडला आहे.त्या खोलीच्या कोपऱ्यातल्या खाटेवर तिचा आजारी मुलगा मला दिसतो आहे.तो तापानं फणफणला आहे.
आणि त्याला खायला मोसंबी हवी आहे. पण त्याच्या त्या गरीब बिचाऱ्या आईजवळ त्याला द्यायला भाताच्या पेजेशिवाय दुसरं काहीही नाहीये.ते पोर रडत आहे."
"पाकोळी,माझी चिमुकली सखी,तू माझ्या तलवारीच्या मुठीतला हा माणिक त्या गरीब स्त्रीला नेऊन देशील का? माझे पाय या चबुतऱ्याला जोडले आहे,नाहीतर मी स्वतःच गेलो असतो गं."माझे मित्र इजिप्तमध्ये माझी वाट बघत असतील." पाकोळी उत्तरली, "ते सगळे नाईल नदीवर लिलीच्या मोठमोठ्या फुलांभोवती छान घिरट्या घालत असतील."पाकोळी,पाकोळी,माझी चिमुकली सखी," आनंदी राजपुत्र म्हणाला,फक्त एक रात्र इथं थांबून मला मदत करशील का? ते पोर भुकेनं व्याकूळ झालं आहे आणि त्याची आई काहीच करू शकत नाहीये.आनंदी राजपुत्राची ती तळमळ,त्याचं दुःख बघून पाकोळीला खूप वाईट वाटलं.इथं थंडी वाढते आहे.पाकोळी म्हणाली,
पण मी एक रात्र इथं थांबून तुमचं हे काम नक्कीच करू शकते.तुझे खूप खूप आभार सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला.पाकोळीनं तलवारीच्या मुठीतला तो मोठ्ठा माणिक चोचीत पकडला आणि अंधारात त्या नगरामधून, घरांच्या कौलांवरून उडत ती दिसेनाशी झाली. जेव्हा पाकोळी त्या मोडकळीला आलेल्या घराजवळ पोहोचली तेव्हा त्या स्त्रीचा डोळा लागला होता.झटकन् खिडकीतून आत शिरत पाकोळीनं तो माणिक तिच्यासमोर,टेबलावर ठेवला आणि पाकोळी तिथून उडून गेली.
परत आल्यावर पाकोळीनं राजपुत्राला घडलेला वृत्तान्त सांगितला.आणि मग ती पाकोळी शांत झोपी गेली.
सकाळी उठल्यावर पाकोळी राजपुत्राला म्हणाली,
इजिप्तमध्ये मी करण्यासारखं तुमचं काही काम असेल तर सांगा,मला आता पटकन् निधायला हवं.पाकोळी,
पाकोळी,माझी चिमुकली सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला,तू अजून एक दिवस थांबलीस तर खूप बरं होईल.माझे मित्र इजिप्तमध्ये माझी वाट बघत असतील,पाकोळी म्हणाली,उद्या ते नाईलचा दुसरा धबधबा पार करून जातील.
पाकोळी,पाकोळी,माझी चिमुकली सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला,नगराच्या दुसऱ्या टोकाला इथून बरंच लांब,एका घराच्या पोटमाळ्यात मला एक तरुण दिसतो आहे.तो थंडीनं गारठला आहे. त्याच्याजवळ आग पेटवायला लाकडं नाहीयेत आणि खायला अन्नही नाहीये.भुकेनं व्याकूळ झालेला त्याचा चेहरा मला बघवत नाहीये.
"ठीक आहे मी थांबते अजून एक रात्र,पाकोळी म्हणाली,त्याला पण माणिक नेऊन द्यायचा आहे का?आनंदी राजपुत्र म्हणाला,अरेरे पण माझ्याजवळ तेवढा एकच माणिक होता.आता माझे हे डोळे शिल्लक आहेत.
हजारो वर्षांपूर्वी भारतातून आणली गेलेली ही मौल्यवान नीलम रत्नं आहेत.त्यातलं एक तू काढ आणि त्या तरुणाला नेऊन दे.म्हणजे तो ते रत्न जवाहिऱ्याला विकेल आणि आलेल्या पैशातून स्वतःसाठी अन्न आणि शेकोटीत घालायला लाकडं खरेदी करू शकेल.
नाही राजकुमार,मी असं अजिबात करणार नाही,पाकोळी रडू लागली.
पाकोळी,पाकोळी, माझी चिमुकली सखी, राजपुत्र म्हणाला,मी सांगतोय तसं कर,मी विनंती करतो तुला.
पाकोळीनं राजपुत्राच्या डोळ्यातून नीलमचा मौल्यवान खडा काढला आणि त्या तरुणाच्या दिशेनं भरारी घेतली.
परत येऊन पाकोळी राजपुत्राच्या खांद्यावर विसावली.
आणि ती राजपुत्राला तिनं आधी बघितलेल्या निरनिराळ्या देशांतल्या गमतीजमती सांगू लागली.माझी चिमुकली सखी,पाकोळी,राजपुत्र म्हणाला,तू मला खूप छान छान गोष्टी सांगितल्यास.पण सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट असते गरिबी,लोकांचं असहाय्य असणं,यापेक्षा मोठं कोडं कोणतंच नसतं.पाकोळी,लाडके,तू या नगरावरून एक फेरफटका मार आणि तुला जे काही दिसेल ते मला येऊन सांग.पाकोळी नगरावरून उडू लागली.तिनं अगदी काळोख्या,अरुंद गल्ल्यांचा फेरफटका मारला. सुतकी चेहऱ्याची लहान लहान पोरं भकास नजरेनं इकडंतिकडं बघत बसलेली तिला दिसली.एका पुलाच्या कमानीखाली काही मुलं ऊब मिळावी म्हणून एकमेकांना बिलगून झोपलेली तिला दिसली.ती मुलं कण्हत होती, रडत होती,
भूक लागली आहे,खायला हवं आहे,तिथला पहारेकरी मात्र त्यांच्यावर खेकसत होता, ए निघा,ही झोपायची जागा नाही.निघा इथून,मग ती मुलं पावसात दिसेनाशी झाली.परत जाऊन पाकोळीनं राजपुत्राला तिनं बघितलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.आनंदी राजपुत्र म्हणाला,माझ्या पूर्ण शरीरावर सोन्याचा जाड पत्रा जडवलेला आहे.तुला जमतील तसे त्याचे तुकडे काढ आणि ते त्या बिचाऱ्या पोरांना,तुला दिसतील त्या गरिबांना नेऊन दे.पाकोळीनं तुकड्या-तुकड्यानं त्या पुतळ्यावरचं सगळं सोनं काढलं आणि गरिबांमध्ये वाटून टाकलं.आता राजपुत्राचा पुतळा पूर्ण उघडा, इतर पुतळ्यांसारखा सामान्य दिसत होता. पाकोळीनं वाटलेल्या सोन्यातून गरिबांनी पोटासाठी अन्न खरेदी केलं.पोराबाळांच्या चेहऱ्यांवर पुन्हा हसू उमटलं आणि भरल्या पोटानं ती रस्त्यांवर बागडू लागली.
पाकोळी राजपुत्राजवळ परतली आणि म्हणाली, राजकुमार,आता मी तुमचा निरोप घेते आहे.आनंदी राजपुत्र म्हणाला,पाकोळी,पाकोळी, माझी चिमुकली सखी,तू आणखी एक रात्र थांबलीस तर फार बरं होईल.
तिथं पुढच्या चौकात एक आगकाड्या विकणारी मुलगी उभी आहे.तिच्या आगकाड्या डबक्यात पडल्या आणि भिजून एकदम खराब झाल्या आहेत.जर तिला पैसे कमावता आले नाहीत तर तिचे वडील तिला खूप मारतील आणि ती रडेल.तिच्या पायात बूट नाहीत,मोजे नाहीत आणि बिचारी उपाशीही आहे.माझा हा दुसरा डोळा काढ आणि तिला नेऊन दे म्हणजे तिची मार खाण्यापासून सुटका होईल.तुम्ही म्हणत असाल,तर अजून एक रात्र मी तुमच्याजवळ थांबते,पाकोळी म्हणाली,पण दुसरा डोळा काढायला मला जमणार नाही. तुम्ही ठार आंधळे होऊन जाल,पाकोळी, पाकोळी,माझी चिमुकली सखी,राजपुत्र
म्हणाला,मी सांगतोय तसंच कर. (THE LOVE RUMI KNEW या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद,रुमी:आनंदघन-
सेरदार ओस्कान,अनुवाद-प्रमोद नाईक,मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे)
पाकोळीनं राजपुत्राचा दुसरा डोळा काढला आणि त्या चौकाकडे भरारी घेतली.त्या आगकाड्या विकणाऱ्या लहान मुलीचा पाकोळीला खूप राग आला होता,रागातच तिने ते मौल्यवान रत्न त्या मुलीच्या हातात ठेवलं.मग पाकोळी राजपुत्राकडं परत आली.आता तुम्ही आंधळे झाला आहात,पाकोळी राजपुत्राला म्हणाली,"आता मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.नको,माझी चिमुकली सखी, जा तू,राजपुत्र म्हणाला, आता तू इजिप्तला निघून जावंस.नाही,मी तुमच्या जवळच राहाणार,पाकोळी निश्चयानं म्हणाली आणि राजपुत्राच्या पायाजवळ विसावली.
थोड्याच वेळात तिथं बर्फ पडायला सुरुवात झाली आणि आसमंत गारठून निघाला.बिचारी पाकोळी थंडीनं पार गारठून गेली होती,पण तिच्या लाडक्या राजपुत्राला सोडून जाणं तिला अजिबात मान्य नव्हतं.पाकोळीचं राजपुत्रावर खूप प्रेम होतं.आपल्या पंखांची फडफड करत ती कशीबशी स्वतःला ऊब द्यायचा प्रयत्न करू लागली.पण आता फार काळ तग धरणं शक्य नाही हे पाकोळीला माहीत होतं.आता एकदाच, शेवटचं,तिच्या लाडक्या राजपुत्राच्या खांद्यावर जाऊन बसण्याइतकीच ताकत तिच्या अंगात उरली होती.पाकोळी मोठ्या कष्टानं राजपुत्राला म्हणाली,अलविदा,राजकुमार,मी तुमच्या हाताचं चुंबन घेतलं तर चालेल का?"
अरे वा,माझी चिमुकली सखी,तू इजिप्तला जायचं नक्की केलंस तर!आनंदी राजपुत्र म्हणाला,मी खूप खूश आहे.तू इथं थांबून माझी खूप मदत केली आहेस.खरं तर तू माझ्या ओठांचं चुंबन घेतलं पाहिजेस कारण तू मला खूप आवडतेस,हो,मी चालले आहे,पाकोळी म्हणाली,पण इजिप्तला नव्हे,मी चालले आहे मृत्यूच्या गावाला,आणि मृत्यू म्हणजे निद्रेचंच दुसरं रूप म्हणायचं,बरोबर ना?
तिनं आनंदी राजपुत्राच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि त्याच्या पायांशी कोसळली,शेवटची.
अगदी त्याच क्षणी ते आश्चर्य घडलं,आनंदी राजपुत्राच्या पुतळ्यामधून काही तरी तुटल्यासारखा आवाज आला.शिशापासून बनलेलं त्याचं हृदय,त्याचे दोन तुकडे झाले होते.
दुसरा दिवस उजाडला.त्या नगराचे नगराध्यक्ष आणि पालिकेचे अधिकारी त्या चौकातून चालले होते.
चबुतऱ्यासमोरून जाताना नगराध्यक्षांनी त्यांच्या बग्गीचा पडदा उघडून आनंदी राजपुत्राच्या पुतळ्याकडं पाहिलं.
अरे देवा,आनंदी राजपुत्राच्या पुतळ्याची इतकी दुर्दशा कशी काय झाली? ते उद्गारले,तलवारीतला माणिक निखळला आहे.डोळे गायब आहेत आणि सोन्याचा कणसुद्धा शिल्लक नाहीये, याची अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी कशी काय झाली?कला शिकवणारे प्राध्यापकही सोबत होते.त्यांनी मुक्ताफळं उधळली, तसूभरही सौंदर्य उरलं नाहीये याच्यात.आता काय उपयोग या पुतळ्याचा?"
मग सर्वानुमते असं ठरवण्यात आलं,की आनंदी राजपुत्राचा तो पुतळा पाडायचा आणि तो निरुपयोगी धातू वितळवून त्याचा कुठं तरी वापर करायचा.
किती अद्भुत आहे हे,फौंड्रीचा मुकादम म्हणाला,हे तुटलेल्या हृदयाचं शिसं फौंड्रीत वितळत नाहीये.हे टाकून दिलेलंचं बरं,म्हणून त्यानं ते कोंडाळ्यात फेकून दिलं.तिथंच त्या पाकोळीचं कलेवर पडलं होतं.या नगरातल्या सर्वांत मौल्यवान दोन गोष्टी मला आणून दे.देवानं त्याच्या जवळच्या दूताला आज्ञा दिली.त्या देवदूतानं राजपुत्राचं ते शिशाचं हृदय आणि पाकोळीचं कलेवर उचललं आणि देवाकडं नेऊन दिलं.अगदी योग्य निवड केलीस,देव म्हणाला, आता माझ्या स्वर्गीय उद्यानात हा पक्षी सदैव गात राहील आणि या सुवर्णनगरीत आनंदी राजपुत्राचा सदैव गौरव केला जाईल.
समजलं ना जॉन,माझ्या प्रिय मित्रा,त्या पाकोळीला जिवंत राहण्यापेक्षा आनंदी राजपुत्राची सोबत जास्त महत्वाची वाटली. त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठीच पाकोळीनं मरणालाही आनंदानं मिठी मारली.आनंदी राजपुत्राचं प्रेमसुद्धा तितक्याच ताकदीचं होतं. पाकोळीचा विरह सहन न झाल्यानं राजपुत्र अक्षरशः तुकडे तुकडे होऊन गेला.
मला त्या आनंदी राजपुत्राचा पुतळा हे अहंकाराचं स्मारक होतं असंच वाटत आलंय. पण त्या अहंकारातसुद्धा प्रभूचं तेज वसलेलं होतं.तो प्रेमळ आणि दयाळू तर होताच,पण त्याची दयाबुद्धी आणि प्रेम प्रत्यक्षात उतरायला एका पाकोळीचं त्याच्या आयुष्यात येणं गरजेचं ठरलं.तसंच आपल्या अंतरात वसलेलं प्रेम उफाळून येण्यासाठी,
आपल्या प्रेमाच्या ताकदीनं कुणी तरी आपल्याही अहंकाराच्या चिंधड्या उडवणं गरजेचं ठरतं.