दुसऱ्या दिवशी आम्ही लपत छपत भक्ष्याजवळ गेलो पण रात्री बिबळ्या तिथे परतलेला नाही हे कळल्यावर जरा निराशाच झाली कारण आदल्या दिवशी आमच्यापैकी एकाला उचलण्यात अपयश आल्यावर तरी तो भक्ष्याकडे परत येईल अशी आमची अपेक्षा होती.दिवसभर इबॉटसन त्याच्यासाठी पाठवून दिलेलं ऑफिसचं काम उरकत बसला तर मी रायफल घेऊन जरा आसपासच्या जंगलातून फेरफटका मारून यायचं ठरवलं.इथे जमीन जरा टणक होती,शिवाय पाईनच्या सुयांसारख्या पानांनी आच्छादली होती.त्यामुळे कुठेही माग मिळणं शक्य नव्हतं.ज्या डोंगरापलीकडे दाट जंगल आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्या डोंगरावरून कडेकडेने मी निघालो.इथेही शोध घेण्याचं काम अवघडच गेलं कारण तिथे दाट झुडुपं होती व पाऊल ठरू नये असे खोल कडे होते.पण ह्या भागात जनावरं मात्र पुष्कळ होती आणि जिथे जिथे पायवाटा ओलांडून जात होत्या तिथे मला भेकर,घुरल,रानडुक्कर किंवा एकट्यादुकट्या 'सराव'चे (पहाडी सांबर) ठसे मात्र दिसले.एक खूप जुना 'स्क्रेपमार्क' (जमीनीवर पायाने खरवडल्याच्या खुणा) सोडला तर बिबळ्याचा मात्र काही माग दिसला नाही. आमचं जेवण चालू असताना रुद्रप्रयागवरून पाठवलेला जिनट्रॅप येऊन पोचला.दुपारी आम्ही तो घेऊन भक्ष्या
जवळ गेलो.तिथे तो सापळा काळजीपूर्वक लावला आणि संपूर्ण मृतदेहामध्ये सायनाईड पेरून ठेवलं.मला किंवा इबॉटसनला या विषाचा कधीच अनुभव नव्हता.
नैनितालहून निघताना एका डॉक्टर मित्राशी माझी या संदर्भात थोडी चर्चा झाली होती.तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की त्या नरभक्षकाला मारण्यासाठी ते जे काही शक्य आहेत ते सर्व मार्ग वापरावेत अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. पण या बिबळ्यावर विषाचा काही परिणाम होत नाही असं.आढळून आलेलं आहे.त्यावेळेला त्याने मला सल्ला दिला की मार्जार कुळातील सर्व जनावरांसाठी सायनाईड हे योग्य विष आहे त्यामुळे मी ते वापरून पाहावं.मी ही माहिती इबॉटसनला दिली होती आणि काही दिवस अगोदर सायनाइडच्या कॅप्सूल तिथे पोचल्याही होत्या,त्यातल्याच काही कॅप्सूल आम्ही बिबळ्याने खाल्लेल्या भागात पेरून ठेवल्या.
आज रात्री बिबळ्या तिथे येण्याची शक्यता होतीच पण काल त्याने आम्हाला भक्ष्याजवळ पाहिलं असल्यानं आम्ही जवळपास कुठेही बसायचं नाही असं ठरवलं.
पायवाटेजवळच पाईनचं एक मोठं झाड होतं.ते आम्ही निवडलं व त्यावरच एक ऐसपैस मचाण बांधलं.निळ्या ज्योतीच्या स्टोव्हवर इबॉटसनने बनवलेलं जेवण जेवल्यावर आम्ही मचाणावर गवताची गुबगुबीत गादी तयार करून त्यावर जागा घेतल्या.एकमेकांशेजारी चांगले पाय ताणून झोपून सिगरेट पिता येईल इतकं ते मचाण मोठं होतं. आज तरी आमचा उद्देश भक्ष्याच्या दिशेकडून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष ठेवायचं एवढाच असल्याने ते शक्यही होतं.आम्ही आळीपाळीने पहारा देत राहिलो.
यावेळी सापळा लावण्यासाठी विशिष्ट अशी पायवाट नसल्याने बिबळ्या त्यात सापडेल अशी फक्त आशाच करणं आमच्या हातात होतं.रात्री एकदा एका भेकरांने अलार्म कॉल दिला खरा पण ज्या दिशेने बिबळ्या येईल असा अंदाज होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेकडून ! तांबडं फुटल्यावर आम्ही चहा करून प्यायलो.भक्ष्याला भेट दिली.तेव्हा ते आहे तसंच पडलं होतं.ब्रेकफास्ट लवकर उरकून इबॉटसनने रुद्रप्रयाग सोडलं.मी सामानाची बांधाबांध करून गावकऱ्यांशी निरोपाच्या गप्पागोष्टी करत होतो.तेवढ्यात त्या गावापासून चार मैलांवरच्या एका खेड्यात बिबळ्याने गाय मारल्याची खबर घेऊन काही माणसं आली.त्यांना संशय होता ही गाय नरभक्षक बिबळ्यानेच मारली असावी कारण आदल्या रात्री म्हणजे माझा व इबॉटसनचा पाठलाग केला होता त्या रात्री-अगदी पहाटेच्या सुमारास त्याने गावच्या मुखियाचं घर फोडण्याचा प्रयत्न केला होता.नंतर संध्याकाळी घरापासून शंभर यार्डावर जंगलात त्या गायीला मारण्यात आलं होतं. त्यांच्या विनंतीवरून मी परत एकदा नैनितालला जाणं लांबणीवर टाकलं व माझ्याबरोबर जिनट्रॅप आणि विषाच्या कॅप्सूल्स घेऊन त्यांच्या गावात गेलो.मुखियाचं घर शेतातल्या एका उंचवट्यावर बांधलं होतं व घराकडे जाणारी पायवाट काही अंतर मऊ चिखलासारख्या मातीवरून जात होती.
याच ठिकाणी मला बिबळ्याचे पगमार्क्स मिळाले.मी डोंगर चढून येत असतानाच मुखियाने मला पाह्यलं होतं व त्याने माझ्यासाठी गरम गरम ताज्या दुधाचा आणि भरपूर गूळ घातलेला चहा तयार ठेवला होता.
अंगणातच उभं राहून मी हा भरपूर गोड पण फर्मास चहा पित असताना मुखियाने माझं लक्ष दोन दिवसांपूर्वी घर फोडण्याच्या प्रयत्नात बिबळ्याने दरवाजाची जी अवस्था केली होती त्याकडे वेधलं.सुदैवाने छताच्या दुरुस्तीसाठी त्याने तासलेले काही ओंडके घरात आणून ठेवले होते आणि सुरक्षिततेसाठी ते दरवाजाला आतून लावले होते. मुखिया म्हातारा होता आणि संधिवाताचा पेशंट होता त्यामुळे त्याने गाय दाखवण्यासाठी त्याच्या पोराला माझ्याबरोबर पाठवलं आणि मधल्या काळात माझ्यासाठी व माझ्या माणसांसाठी त्याच्या घरातली एक खोली तयार केली.एकदम धडधाकट असलेली ती गाय मला गुरांच्या वाटेच्या जरा वर एका छोट्या सपाट जमीनीच्या तुकड्यावर पडलेली आढळली.यावेळची परिस्थिती जिनट्रॅप ठेवण्यासाठी आदर्श होती.गायींची पाठ जंगली गुलाबाच्या झुडपाला टेकली होती. तिचे पाय फूटभर उंचीच्या बांधाला तटले होते.पुढचे दोन पंजे गायीच्या पुढच्या मागच्या पायांच्या मध्ये ठेवून बांधावर बसून बिबळ्याने रात्री तिचं मांस खाल्लं होतं.गायीच्या पायांमधली जमीन खणून मी माती बाजूला ठेवली.
बिबळ्याने जिथे पंजे ठेवले होते त्या ठिकाणीच मी सापळा पुरला, त्यावर थोडी पानं आणि माती पसरून ठेवली आणि अगदी पूर्वीप्रमाणेच त्यावर वाळलेली पानं,काटक्या वगैरे टाकल्या.तिथे कोणीही आलं असतं तरी तिथे मी काही उद्योग करून ट्रॅप लावलाय हे त्याच्या लक्षात सुद्धा आलं नसतं.
हे सर्व मनासारखं झाल्यावर मी परतलो आणि भक्ष्य व मुखियाचं घर यांच्या मधोमध एका झाडावर चढून गरज लागेल तेव्हा भक्ष्याकडे पतरण्याच्या तयारीत बसलो.
कालीज फीझन्टची एक जोडी त्यांच्या पाच पिल्लांबरोबर काही वेळापासनं माझ्या झाडाखाली फिरत होती. मी त्यांच्याकडे बघत असतानाच अचानक त्यांनी कशाचं तरी सावट घेतलं आणि ते खाली दरीत उडत उडत गेलं.काही सेकंदानंतर एक भेकर माझ्या दिशेला पळत आलं माझ्या झाडाखाली उभं राहून काही वेळ भुंकल्यावर आलं तसं चवड्यावर पळत डोंगराकडे निघून गेलं.त्यानंतर विशेष काहीच झालं नाही.
रायफलच्या साईट्ससुद्धा दिसू नयेत इतका अंधार झाडाखाली पडल्यावर भी खाली उतरलो आणि माझे रबरी तळाचे बूट घालून गावाच्या दिशेने निघालो. मुखियाच्या घरापासून शंभर यार्डावर ही पायवाट तीस यार्ड लांब व वीस यार्ड रुंद अशा मोकळ्या हिरवळीच्या तुकड्यावरून जात होती.या हिरवळीवर डोंगराच्या दिशेला एक मोठा खडक होता.इथे पोचल्यावर मला अचानक आतून जाणीव झाली की आपला पाठलाग होतोय ! या परिस्थितीचा मी उपयोग करून घ्यायचं ठरवलं.मऊ चिखलाच्या जमीनीवरून दोन लांब ढांगा टाकून मी त्या खडकाच्या मागे पोचलो.माझी नजर आता मी भक्ष्याच्या दिशेला केंद्रित केली.जवळ जवळ दहा मिनिटं मी त्याच स्थितीत होतो पण आता अंधार दाटून यायला लागल्यानं मी सर्व तऱ्हेची खबरदारी घेऊन मुखियाच्या घरात गेलो.रात्री केव्हातरी मुखियाने मला उठवलं व दरवाजावर ओरखडे काढण्याचा आवाज येत असल्याचं सांगितलं.दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला तेव्हा समोर धुळीतच नरभक्षकांचे पगमार्क्स दिसले.त्याचा माग काढताना मला कळलं की मी काल संध्याकाळी जे जे केलं होतं ते ते त्यानंही केलं होतं.मी पायवाट ज्या ठिकाणी सोडली होती त्या ठिकाणी त्यानेही सोडली होती.मऊ जमीन ओलांडून खडकापाशी आला होता,
अगदी घरापर्यंत माझ्या मागे मागे आला होता.त्यानंतर त्याने घराभोवती बऱ्याच चकरा मारल्या होत्या.
घर सोडल्यानंतर त्याने परत पायवाट पकडली होती.जेव्हा मला दिसलं की ते माग भक्ष्याच्या दिशेने जातायत तेव्हा माझ्या आशा गगनाला भिडल्या कारण मला तोपर्यंत अंदाज आला नव्हता की माणसाबरोबरच्या आठ वर्षाच्या साहचर्यानंतर नरभक्षक बिबळ्या किती हुशार होऊ शकतो! आता मी पायवाट सोडली व थोडा उंचावरच्या भागाकडून भक्ष्याकडे निघालो.थोड्या अंतरावरून मला दिसलं की भक्ष्य गायब आहे.जिकडे मी ट्रॅप पुरला होता तिथली जमीन, त्याचे पगमास सोडले तर जशीच्या तशी होती!
पूर्वीप्रमाणेच याहीवेळी त्याने त्याचे पंजे गायीच्या पायाच्या मध्ये ठेवले होते पण यावेळेला त्याने एकमेकांपासून लांब ठेवले होते.बरोबर त्या ट्रॅपच्या लिवरवर! जर मध्ये ठेवले असते तर या लिवर्समुळे ह्या ट्रॅपचा जबडा बंद झाला असता.अशाप्रकारे सुरक्षित अवस्थेत त्याने खायला सुरुवात केली होती व नंतर भक्ष्याला वळसा घालून गायीचं डोकं तोंडात धरून तिला जंगली गुलाबाच्या काट्यांमधून काही अंतर ओढत नेऊन डोंगरावरून खाली दरीत ढकलून दिलं होतं.खाली काही अंतरावर ती गाय एका ओकच्या झाडावर तटून अडकली होती. कदाचित स्वतःच्या कामगिरीवर खूष होऊन आता त्याने परत गुरांची वाट पकडली होती. त्याच्या मागावर काही अंतर गेल्यानंतर मात्र यापुढे माग दिसेनासे झालें.
आता बिबळ्या भक्ष्यावर परत येण्याची आशा संपुष्टात आली होती.तरीही मनाचं समाधान म्हणून मी.त्या गायीच्या मृतदेहामध्ये भरपूर विषाचा डोस पेरून ठेवला.मी काल विषाचा उपयोग केला नव्हता;खरं सांगायचं तर विष वापरण्याची कल्पना मला त्याहीवेळी कधी भावली नव्हती आणि आजही आवडत नाही.
दुसऱ्या दिवशी भक्ष्याची तपासणी केल्यावर मला दिसलं की विष पेरलेलं सर्व भाग बिबळ्याने खाल्ला आहे.यावेळी हे काम नरभक्षकाचं नसून योगायोगाने तिथे आलेल्या दुसऱ्या बिबळ्याचं आहे याची मला इतकी खात्री होती की गावात परतल्यावर मी मुखियाला सांगितलं की आता मी इथे थांबत नाही,पण जर कोणाला या बिबळ्याचा मृतदेह सापडला आणि त्याची कातडी त्याने पटवाऱ्याला दिली तर मी त्या व्यक्तीला शंभर रूपये देईन.एक महिन्यानंतर या बक्षिसावर दावा सांगितला गेला व त्याची कातडी पटवाऱ्याने पुरून टाकली.
सामान पॅक करायला फार वेळ लागला नाही.दुपारीच आम्ही आमच्या नैनितालच्या दूरच्या प्रवासाला सुरुवात केली.चटवापिपल पुलाकडे जाणाऱ्या छोट्या पायवाटेवर असताना आमच्या समोरून एक धामण पायवाट ओलांडून गेली.मी तिच्याकडे बघत असताना माझ्या मागेच असलेला माधोसिंग मला म्हणाला, "ती बघा साहेब,तुमच्या अपयशाला जबाबदार असलेली सैतानी शक्ती आता इथून निघून जातेय."
गढवालच्या लोकांना नरभक्षकाच्या दयेवर जगण्यासाठी सोडून निघून जाण्याची माझी कृती तुम्हाला निर्दयी वाटेल.अगदी मलाही तसंच वाटत होतं,त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांमधूनही यावर टीका झाली.कारण या बिबळ्याच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रामध्ये येत होत्या.पण मला हे सांगावसं वाटतं की अतिशय तणावाखाली फार काळ आपण टिकाव धरू शकत नाही.मी मागचे काही आठवडे गढवालमध्ये राहिलो,
दिवसभर मैलोन मैल जंगलं तुडवली,असंख्य रात्री जागून काढल्या,नरभक्षकाचा हल्ला झाल्याच्या बातम्यांचा पाठपुरावा करण्यासाठी गावागावातून तंगडतोड केली,आणि कित्येक रात्री अतिशय अवघडलेल्या स्थितीत काढल्या.आता मात्र माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती.जिथे नरभक्षकाच्या तावडीत सहज सापडू शकलो असतो अशा एकाकी ठिकाणी बसून बसून आता मला रात्रभरडोळे उघडे ठेवणंसुद्धा अशक्य होत चाललं होतं.
ज्या रस्त्यांवर फक्त तो आणि मीच असायचो अशा रस्त्यांवरून चालत असताना आतापर्यंतशिकलेल्या सर्व युक्त्या वापरून झाल्या होत्या.एवढं होऊन सुद्धा त्याला
नशिबाचं जबरदस्त वरदान मिळाल्यासारखं त्याने मला आतापर्यंत सतत हुलकावणी दिली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी परत रस्ता तपासल्यानंतर पगमार्कसवरूनच समजायचं की काल माझा पाठलाग झालाय.भुकेल्या नरभक्षकाकडून आपला पाठलाग होणं ही घटनाच न्यूनगंड निर्माण करणारी असते. अशा त-हेने शरीराने आणि मनाने थकलेल्या अवस्थेत आता मी फार दिवस रेटणं हे गढवाली जनतेसाठी तर काही फायद्याचं ठरणार नव्हतंच पण कदाचित मलाही माझ्या जीवाची किंमत द्यावी लागली असती.
स्वतःहून ओढवून घेतलेलं हे काम तात्पुरतं थांबवलं तर आपल्यावर टीका होईल हे माहीत असूनसुद्धा माझा निर्णय योग्य आहे ह्याबद्दल मी ठाम होतो.त्यामुळेच संधी मिळताच मी परत येईन असं आश्वासन तिथल्या रहिवाशांना देऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो.
१३.०१.२४ या लेखातील पुढील भाग..