त्याने युद्ध संपल्यावर युद्धातील अनुभवांवर पुस्तकं लिहिणं हे साहजिकच होतं,पण त्याचं 'अँड नो बर्डस सँग' हे पुस्तक टीकाकारांनी आणि जाणकारांनी डोक्यावर घेतलं.अशा प्रकारचं हे एकमेव पुस्तक आहे.
असं त्याचं वर्णन केलं गेलंच; पण या पुस्तकाने युद्धाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जनतेला दिला , असं म्हटलं गेलं.मोवॅट सैन्यात भरती झाल्यावर 'द हेस्टिंग्ज अँड प्रिन्स एडवर्ड रेजिमेंट'च्या दुसऱ्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाला.युद्धात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात सिसिलीच्या मोहिमेत पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या तुकडीत सेकंड लेफ्टनंट मोवॅट होता.या मोहिमेत फार्लीने प्लॅटून कमांडर म्हणून एका सैनिकी तुकडीचं नेतृत्व केलं.ही मोहीम संपल्यावर त्यांची तुकडी इटलीतील युद्धआघाडीवर पाठवण्यात आली. डिसेंबर १९४३ पर्यंत एक पराक्रमी अधिकारी म्हणून मोवॅट ओळखला जाऊ लागला.१९४३ संपता संपता त्याला युद्धातल्या पहिल्या भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं.त्याचा मित्र आणि सहकारी लेफ्टनंट ॲलन पार्क याच्या डोक्यात शत्रूची गोळी शिरली.तो बेशुद्ध पडला. ती गोळी फार्लीलासुद्धा लागू शकली असती. फक्त सहा इंचाचा प्रश्न होता. त्या दिवशी खरं तर ख्रिसमस होता.तात्पुरती युद्धबंदी अमलात होती.त्या दिवशी वैद्यकीय मदत मिळणं अवघड होतं.
मिळूनही तसा फारसा उपयोग झाला नसता.मोवॅट मित्राचं डोकं मांडीवर घेऊन रडत बसला होता.या घटनेनंतर फार्लीला मानसोपचार घ्यावे लागले.तोपर्यंत त्याने दाखवलेलं शौर्य आणि त्याची कार्यक्षमता लक्षात घेऊन त्याला गुप्तचर विभागात कॅप्टनच्या हृद्यावर नेमणूक देण्यात आली.आता त्याचा प्रत्यक्ष आघाडीशी संबंध येणार नव्हता,तर माहिती संकलन, पृथक्करण आणि युद्धकैद्यांचे जाबजबाब यांद्वारे शत्रूच्या परिस्थितीची आणि मनोधैर्याची माहिती मिळवण्याच्या कामासाठी त्याची नेमणूक झाली.संपूर्ण युद्धाचा काळ त्याने इटलीत घालवला.या काळात त्याला वडिलांच्या पत्रांचा आधार होता. 'माय फादर्स सन' मध्ये या पत्रांच्या साहाय्याने त्याने युद्ध परिस्थितीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे.पुस्तकभर अशी पत्रं विखुरलेली आहेत.एक पत्र वानगीदाखल बघू या.तो लिहितो, 'हिज मॅजेस्टीच्या कॅनेडियन टपालखात्याचा कारभार काही औरच आहे. गेल्या महिन्याभरात आम्हाला एकही पत्र मिळालेलं नाही.काल अचानक मला तुमची तीन पत्रं मिळाली.
२७,२९ आणि ३० मार्चची आहेत ती.काय चाललंय काही कळत नाही.प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बहुधा अग्निबाणाच्या साहाय्याने पत्रं पोचवतात की काय?आतापर्यंत इतक्या जलदगतीने मला कधीच पत्रं मिळालेली नाहीत.याला एकमेव अपवाद म्हणजे साधारणपणे दर दोन महिन्यांनी सैन्यभरती केंद्राकडून येणारी नोटिस- 'तुमच्या जवळच्या सैन्यभरती केंद्रात सक्तीच्या लष्करी भरतीसाठी ताबडतोब हजर व्हा.' एक दिवस मी खरोखर सैनिकी गणवेषातच जवळच्या लष्करभरती केंद्रात हजर झालो तर काय होईल? त्यांची पंचाईत होईल का? काल बर्ट केनेडी एका दुर्दैवी अपघातात सापडला.त्यानेच पेरलेल्या एका सुरुंगाचा त्याच्याच हातून स्फोट झाला.त्याला किरकोळ जखमा झाल्या.गंभीर असं काही नाही,पण त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.तो परत आमच्याच रेजिमेंटमध्ये येईल याची मात्र खात्री देता येत नाही.स्टॅन केचेसन हा आता त्याच्या जागी सेकंड- इन-कमांड बनेल.दरम्यान, मला परत आघाडीवर जावं लागणार अशा बातम्या आहेत;पण त्या बहुधा वावड्याच आहेत.त्या वावड्याच ठराव्यात असं मला राहून राहून वाटतं.मी आता कॅप्टन झालोय.तेव्हा मला एका सैन्यतुकडीचं नेतृत्व करावं लागेल.मला ती जबाबदारी पार पाडण्याइतपत उत्साह वाटेल असं मला वाटत नाही.राजा आणि देशासाठी प्राणार्पण,या कल्पनेचं आकर्षण आता विरलं आहे.
बॉसनी परवाच एक संध्याकाळ माझं साहित्य वाचण्यात घालवली.(त्यांनी माझ्याकडून ते लेखन मागून घेतलं.
कुठला कॅप्टन ब्रिगेडियरची आज्ञा मोडू शकेल?) मग त्यांनी माझ्या लेखनाबद्दलचं त्यांचं मत स्पष्टपणे मला सांगितलं.त्यातल्या चुका सांगितल्या.त्यांच्या मते त्यात काही दम नव्हता.एखाद्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने लष्करात वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं ऐकायचं असतं,पण मोवॅटांचा अडेलतट्टू स्वभाव माझ्यातही आहे.ते माझ्या वागण्याने चांगलेच खवळले;पण मला ड्रिंक ऑफर करून त्यांनी नंतर माझी बोळवण केली.'मोवॅटच्या आणखी एका लेखानंतर ब्रिगेडियरनी 'तो लेख छापला किंवा पत्ररूपाने घरी पाठवला तर त्याच्यावर खटला भरला जाईल;युद्ध संपल्यानंतर काय हवं ते लिही,' असा त्याला दम दिला.तो लेख पुढे १९४४ मध्ये फार्लीने अँगसना पत्र म्हणून पाठवला.फार्ली युद्धआघाडीवर असतानाही स्थानिक जनजीवनाचे बारकावे टिपून ठेवत होता.खेड्यातील स्त्रियांची पाण्यासाठी वणवण, दैनंदिन कष्ट यांचं चित्रण त्याच्या पत्रांत आढळतं.त्या काळात इटलीतल्या खेड्यांत १५ वर्षांच्या वरचे आणि सत्तरीच्या खालचे पुरुष दिसत नसत.एक तर ते सैन्यात होते किंवा भूमिगत बनून लढत होते.त्यामुळे संसार चालवायची सर्व जबाबदारी स्त्रियांवरच असे.१९४५ मध्ये इटालियन मोहीम संपल्यावर फार्ली मोवॅट आणि त्याच्या तुकडीला हॉलंडमध्ये पाठवण्यात आलं.इथे गुप्तचर अधिकारी म्हणून बऱ्याचदा त्याला जर्मनव्याप्त प्रदेशात जावं लागत होतं.तिथल्या जर्मन सैन्याची उपासमार सुरू होती.जर जर्मनांनी शरणागती पत्करली तर त्यांच्यासाठी अत्राची पाकिटं टाकण्याची दोस्त सैन्याची तयारी होती.
या संदर्भातील गुप्त स्वरूपाची बोलणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या अधिकाऱ्यांमध्ये मोवॅटचा समावेश होता.जर्मन सैन्याने वेढलेल्या डच भागातील नागरिकांची उपासमार टाळावी, यासाठी खरं तर ही योजना होती;पण त्याचा जर्मन सैन्यालाही फायदा होणार होता.नाही तर जर्मन सैन्याने डच नागरिकांना मदतच मिळू दिली नसती.जनरल ब्लास्कोवित्झ यांच्याशी झालेली ही बोलणी यशस्वी झाली.त्यामुळे हजारो डच नागरिकांचे जीव वाचले.पुढे जर्मन सैन्यही झपाट्याने शरण आलंच,पण अनेक जर्मन शास्त्रज्ञांनीही दोस्त सैन्यापुढे शरणागती पत्करली.या महत्त्वाच्या कामगिरी
बद्दल मोवॅटलाही शौर्यपदक मिळालं.दुसऱ्या महायुद्धाची युरोपातली अखेर झाली तेव्हा त्याला लष्करात राहणार का,असं विचारण्यात आलं होतं.
मेजर' म्हणून त्याला पदोन्नती मिळू शकली असती;पण त्याने निवृत्ती स्वीकारायचं ठरवलं.'युरोपमधील युद्ध संपल्याचा एकमेव फायदा म्हणजे सक्तीच्या लष्कर
भरतीसाठी जवळच्या लष्करभरती केंद्रावर दाखल हो या नोटिसा येणं थांबलं,'असं फार्ली म्हणतो.
दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मोवॅटने त्याचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं.'जीवशास्त्र' या विषयावर पदवी मिळवल्यावर उत्तरध्रुवीय प्रदेशातील काही वैज्ञानिक मोहिमांत त्याने भाग घेतला;पण या मोहिमांमधील पुस्तकी विद्वानांशी त्याचे मतभेद झाल्यानंतर त्यातून तो बाहेर पडला.
आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवलंय त्यापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षणांमध्ये काय दिसतं त्याचा अर्थ लावणं महत्त्वाचं ठरेल असं त्याला वाटायचं.मोवॅटच्या काही पुस्तकांना बालसाहित्याची बक्षिसं मिळाली. 'लॉस्ट इन द बॅरन्स' या कादंबरीला १९५६ सालचं सर्वोत्कृष्ट पुस्तकाचं पारितोषिक मिळालं. पुढे ही कादंबरी 'टू अगेन्स्ट नॉर्थ' या नावाने प्रसिद्ध झाली.कॅनडाच्या वायव्येकडच्या हिमाच्छादित प्रदेशात चुकलेल्या दोन मुलांची ही कहाणी अंगावर काटा उभा करते.फार्ली लहानपणी एकट्याने हिवाळ्यामध्ये शीतनिद्रेतले प्राणी शोधत हिंडायचा,तेव्हा 'आपण हरवलो तर?' या भावनेने त्याला बऱ्याचदा सतावलं होतं. याशिवाय हिमवादळातून वाचलेल्या लोकांचे अनुभव तर तो नेहमीच ऐकत होता.ते त्याच्या मनात कुठे तरी मुरत होतं.त्यातून ही कादंबरी जन्माला आली,असं त्याने म्हटलं होतं.या कादंबरीला 'गव्हर्नर जनरल्स ॲवॉर्ड फॉर ज्युव्हेनाइल फिक्शन' हा सन्मान लाभला. तसंच १९५८ सालच्या कॅनेडियन लायब्ररी असोसिएशन बुक ऑफ द इअर फॉर द चिल्ड्रेन या पुरस्कारानेदेखील या कादंबरीला नावाजण्यात आलं.
फार्लीला जगभर प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या 'नेव्हर क्राय वुल्फ' या पुस्तकामुळे,या पुस्तकाचे जगातल्या ५२ भाषांत अनुवाद झाले.त्याला असंख्य पारितोषिके मिळाली.हे पुस्तक जरी काल्पनिक असलं तरी ते वास्तवावर आधारित होतं.१९४० मध्ये मोवॅटला फ्रैंक बार्नफील्ड यांच्या कॅरिबूंच्या अभ्यासात भाग घेण्याची संधी लाभली होती.क्षेत्र परीक्षण सहायक म्हणून काम करताना 'कॅरिबूंच्या संख्येचं नियंत्रण करण्यात लांडगे महत्त्वाची भूमिका बजावत असतात; ते क्रौर्य नसून तो नैसर्गिक शृंखलेचा भाग आहे,' हे मत त्याने त्याच वेळी नोंदवलं होतं.पुढे युद्धसमाप्तीनंतर १९४७ मध्ये फ्रान्सिस हार्पर या ख्यातनाम अमेरिकन निसर्ग
शास्त्रज्ञाच्या मोहिमेला क्षेत्र परीक्षण तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मोवॅटला मिळाली.वायव्य कॅनडातील उजाड प्रदेशातील कॅरिबू (बॅरनग्राऊंड कॅरिबू) - हा या अभ्यासाचा विषय होता.इथेसुद्धा कॅरिबूंच्या अस्तित्वाच्या झगड्यात लांडग्यांचं महत्त्व मोवॅटच्या लक्षात आलं.
लांडग्यांचं शिकारकौशल्य,परस्परांवरचा विश्वास, संघभावना,कळपातली शिस्त या गोष्टींनी मोवॅट प्रभावित झाला.याच मोहिमेत मोवॅटचा ल्युक ॲनोटॉलिक या पंधरा वर्षांच्या इन्युइटशी आणि त्याच्या बहिणीशी परिचय झाला. दुसऱ्या महायुद्धकाळात उत्तर ध्रुवीय वर्तुळात कधी नव्हे एवढा तीव्र हिवाळा ओढवला होता. त्यात या दोघांची संपूर्ण टोळीच नाहीशी झाली होती.हे दोघंच वाचले होते.त्यांच्याशी जमलेल्या मैत्रीतून पुढे मोवॅटचं 'पीपल ऑफ द डिअर' हे पुस्तक अस्तित्वात आलं.मोवॅटला इतर पर्यावरणशास्त्रज्ञांबद्दलही आदर वाटत असे.डायन फॉसींबद्दलच्या हकिकती ऐकून तो फारच प्रभावित झाला होता.त्यांच्या व्याख्यानांना हजर राहण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती.याचं कारण 'सी ऑफ स्लॉटर' या पुस्तकात अमेरिकी धोरणावर त्याने टीका केली होतीच,पण अमेरिकेतील मूळ स्थानिकांना (म्हणजे आपण ज्यांना रेड इंडियन' म्हणतो त्यांना) स्वायत्तता मिळायला हवी,असं तो म्हणत असे.त्यामुळे मोवॅटवर अमेरिकेत प्रवेशबंदी होती.'सी ऑफ स्लॉटर' हे पुस्तक राचेल कार्सनच्या 'सायलेंट स्प्रिंग 'इतकंच महत्त्वाचं मानलं जातं. या दोन्ही पुस्तकांनी पर्यावरण चळवळीला जागतिक स्तरावर नेलं.कॅनडाचा पूर्व किनारा आणि अमेरिकेचा ईशान्य किनारा हे पूर्वापार पारंपरिक स्वरूपाच्या मासेमारीसाठी प्रसिद्ध होते.शेवंडं (लॉब्स्टर्स), खेकडे,झिंगे अशा जलचरांची इथे रेलचेल होती. गल्फ स्ट्रीम संधिपाद प्राणी मोठ्या संख्येने आढळत.या उबदार सागरी प्रवाहामुळे या भागात हे पुढे जेव्हा यांची मागणी वाढली तसतसे या शिकारीत यांत्रिक पडाव शिरले. सागरतळ खरवडून सर्व जलचर वर काढायचे, हवे ते ठेवायचे,उरलेले परत सागरात टाकायचे,अशी ही शिकार पद्धत होती.त्याचबरोबर न्यू फॉडलंडमध्ये सील आणि वॉलरसांची निघृण हत्या सुरू होती.आफ्रिकेतील आणि आशियातील हस्तिदंताच्या व्यापारावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आल्यानंतर वॉलरस आणि सी-लायन या प्राण्यांच्या सुळ्यांना महत्त्व आलं.आंतरराष्ट्रीय सागरातही जहाजं उभी राहून स्थलांतर करणाऱ्या सील,वॉलरस आणि देवमासे यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावत.तीन वर्ष मोवॅट या जहाजांवर वावरला.जहाजांवरच्या कार्यपद्धतीचा त्याने अभ्यास केला.ही मंडळी कायद्यातील पळवाटा कशा शोधतात ते जवळून पाहिलं आणि त्यानंतर त्याचं 'सी ऑफ स्लॉटर' बाजारात आलं.त्या पुस्तकाच्या आगमनानंतर बरेच कायदे सुधारले गेले.
सागराची लूट करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर टीकेची झोड उठवली गेली.त्या कंपन्यांच्या जनसंपर्क विभागांनी मोवॅटला लक्ष्य केलं.त्याला साम्यवादी आणि राष्ट्रद्रोही वगैरे विशेषणं लावण्यात आली.या पुस्तकाच्या प्रचारार्थ त्याला अमेरिकेत जायचं होतं.त्याला कस्टम खात्याने अडवलं. त्याच्यावरच्या प्रवेशबंदीची मुदत वाढवण्यात आली.पुढे ही बंदी आणि ज्या कायद्यान्वये मोवॅटवर बंदी घातली होती तो कायदा १९९० मध्ये रद्द करण्यात आला. या त्याच्या अनुभवावर त्याने 'डिस्कव्हरी ऑफ अमेरिका' हे पुस्तक लिहिलं.
डायन फॉसींची निघृण हत्या झाल्याचं कळताच मोवॅटला जबरदस्त धक्का बसला.त्याने डायन फॉसींचं काम बघण्यासाठी रवांडात जाण्याची तयारी सुरू केली होती.फॉसींच्या कामाची दखल जगाने घ्यायला हवी असं त्याला वाटत होतं;पण गोरिलांची चोरटी शिकार करणाऱ्यांनी १९८५ मध्ये फॉर्सीचा खून केला.त्यानंतर मोवॅटने डायन फॉसींचं चरित्र लिहायला घेतलं.कॅनडात ते 'विरुंगा : द पेंशन ऑफ डायन फॉसी' या नावाने प्रसिद्ध झालं;तर अमेरिकेत ते 'वूमन इन द मिस्ट्स : द स्टोरी ऑफ डायन फॉसी अँड माउंटन गोरिलाज' या नावाने प्रसिद्ध झालं. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट न देता मोवॅटने लिहिलेलं हे एकमेव पुस्तक असावं.याचं कारण त्या काळात रवांडा धोकादायक तर बनलं होतंच,पण गोऱ्या व्यक्तींना रवांडात प्रवेश मिळवणंही अवघड झालेलं होतं.मोवॅटची बरीच पुस्तकं आत्मचरित्रात्मक आहेत, पण त्यातही त्याची निसर्गात रममाण होण्याची वृत्ती दिसून येते.किंबहुना त्यामुळेच आपल्याला ती वाचावीशी वाटतात.मोवॅटच्या लिखाणात वैज्ञानिक अचूकतेपेक्षा भावनांवर अधिक भर दिलेला असतो,अशी टीकाही त्याच्यावर झाली; पण त्याची बहुतेक पुस्तकं म्हणजे स्वानुभवकथन असल्यामुळे आणि मोवॅटला त्या प्राण्यांबद्दल मनापासून प्रेम वाटत असल्यामुळे हे घडणं अपरिहार्य होतं.शिवाय त्यामुळेच त्या त्या पर्यावरणीय प्रश्नाकडे बघण्याचा जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलायला मदत झाली.मोवॅटला नऊ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट दिली. इतरही अनेक सन्मान त्याच्या वाट्याला आले.एखाद्या पुस्तकाचं एखादं भाषांतर होणं अवघड असताना त्याच्या अनेक पुस्तकांची २०-२५ भाषांत भाषांतरं प्रसिद्ध झाली.अनधिकृत भाषांतरं तर आणखीही असतील. मुख्य म्हणजे पुस्तकांच्या मानधनातून मिळालेला सर्व पैसा त्याने पर्यावरणासंबंधींच्या चळवळींच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी खर्च केला. त्याने निसर्गसंरक्षणात मग्न असलेल्या अनेक संस्थांना आर्थिक मदत केली.
नोव्हास्कोशिया नेचर ट्रस्टच्या कार्याला मदत म्हणून त्याने त्याची दोनशे एकर जमीन देऊन टाकली.
आपल्या भटकंतीच्या आवडीतून पर्यावरण रक्षणासाठी अनेक चळवळी उभ्या करणारा हा भटक्या लेखक ६ मे २०१४ या दिवशी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने देवाघरी गेला. पण त्याची पुस्तकं वाचताना मी त्याच्यासोबत जगभर फिरलो.आजही फिरतोच आहे.
आपल्याला काय हवे आहे याबद्दल आपण प्रामाणिक असले पाहिजे आणि स्वतःशी खोटे बोलण्यापेक्षा आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी कारणे बनवण्यापेक्षा जोखीम पत्करली पाहिजे.- रॉय बेनेट
२५.०३.२४ या लेखातील शेवटचा भाग..