* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: असं जीवन पाणपिपुलीचं.! Such is the life of a water pipe.!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/३/२४

असं जीवन पाणपिपुलीचं.! Such is the life of a water pipe.!

झिलानी म्हणजे पाणथळ जागा ओलसर जमिनींनी ती व्यापलेली असते.समोर नवेगाव बांधचे स्वयंभु जलाशय उपसागरासारखे पूर्वेकडे पसरलेले आहे.हिरव्या निळ्या डोंगरात अजून अंधार रेंगाळत आहे.शुक्राच्या चांदणीचं तळ्यात पडलेलं प्रतिबिंब मोठं लोभस वाटतंय. जलाशयाच्या लाटांवर अ‌द्भुत सावल्या पसरल्या आहेत.

त्या झुंजुमुंजु प्रकाशात सहासात धीवर जाळे पसरून कमरेएवढ्या पाण्यातून फेर धरून पुढं पुढं सरकत आहेत.

दोघं धीवर त्यांच्या विरुद्ध दिशेनं पाण्यावर काठी बडवीत माशांना जाळीकडे खेचत आहेत.पाण्यासारख्या पारदर्शी मासोळ्या उड्या घेत जाळ्याकडे जात आहेत. पूर्वेकडे तांबडं फुटत आहे.त्या पार्श्वभूमीवर धीवरांच्या सावळ्या आकृती स्फटिकाप्रमाणे वाटणारे जाळ्यांचे धागे-जाळीची टोकं एकत्रित आणण्याकरिता एकमेकांकडं हळूहळू सरकत असलेले धीवर आणि त्या पाण्यात पडलेल्या त्यांच्या तरल,असमान सावल्या दिसत आहेत.


पूर्व दिशा उजळू लागली तसे ते जलाशय प्रकाशमान होऊ लागले.आकाश निरभ्र होतं. तरी कुठं कुठं पर्वतांच्या शिखरावरील हिरव्या झाडीत पांढऱ्या ढगांचा एखादा पुंजका दिसत होता.तोदेखील आता सोनेरी भासत होता. बांधावरच्या घनदाट आंब्यातून येणाऱ्या 'क्वाक्, क्वाक्,

क्वाक्' या स्वरानं मी थबकलो.इकडं तिकडं पाहिलं.वाटलं हा आवाज तर टरकूचा पाणकोंबडीचा वाटतो.पण ते पाखरू न दिसताच,भुर्रकन झिलानीत गेल्याचा आवाज आला.झिलानीकाठच्या उंच कातळावर बसलो, की चोहोबाजूनं पाखरांचे अद्भुत स्वर कानावर यायचे.

कवड्याचे अरण्यगीत गुंजत असायचे. आकाशातून किर् किर् किर् किर् करीत राव्यांचा थवा उडत जायचा,

भारद्वाजाचे बुगु बुगु असायचे.बुलबुलांची गोड किलबिल,मैनेचा कलकलाट,नाचऱ्याची चिर् चिर्,सुंदर मनोलीची गोड चिव चिव असायची.


प्रभातकाळी आपल्यात आनंद स्फुरवू शकेल असा अन्य गायक पक्ष्यांशिवाय कोणी नाही.


या झिलानीत पाणपिपुलीची एक जोडी व त्यांची तीन पिलं राहात होती.माझी चाहूल लागताच पाणपिपुलीनं सिक्... सिक्... सिक्... सिक्...आवाजानं धोक्याची सूचना दिली. पाणपिपुल्या झिलानीकाठच्या देवभातात लपल्या.पिलं कमळाच्या पानापानांवरून किलबिलत त्यांच्यापाठोपाठ धावली.हा माणूस निरुपद्रवी दिसतो असं पाहून त्यांनी हळूहळू देवभातातून झिलानीत प्रवेश केला.दोघं कमळाच्या रुंद पानांवरून कुशलतेने हळुवार चालत होते ! पिलं मात्र त्यातल्या अंगाने पातळ असलेल्या पाणपिपुलीबरोबर,पानापानांवरून दुडदुडत असायची.

पिंगट सोनेरी रंगाचे ते तीन गोळे गुलाबी बोटांच्या पायावर पाचूच्या वर्णाच्या कमळाच्या पानावर उभे होते.सोनेरी डोकी गंभीरपणे वाकून चिमुकल्या चोचीनं पाण्यातील भक्ष्य वेचण्याचं अनुकरण करीत होती.


वाटायचं या गोजिरवाण्या पाखरांना स्पर्श करता आले असते तर! पण उंच कातळावरून पाण्यात पडलेल्या माझ्या प्रतिबिंबाच्या रूपानं मी त्यांच्यातच असे.पानावरून चालताना एखाद्याचा पाय पाण्यात पडे.

तरंगणाऱ्या पिलाला पाणपिपुलीतला नर चोचीच्या आधारानं सावरी.परंतु त्याला चोचीनं डोक्यावर मारून शिक्षा करी.जणू म्हणायचा असं पुन्हा करू नकोस.ती पिलं पूर्ववत त्याच्या मागोमाग चालायची.नर पिलांना एखाद्या पानामागच्या आळ्या दाखवून देई.पिलं त्यावर तुटून पडत,बर्फाप्रमाणं फक्त थोडा भाग पाण्याच्या पृष्ठावर तरंगणाऱ्या चिलाच्या डकवीडच्या फसव्या जाळीतून,

पायाची बोटं न अडकवू देता,कसं अलगद चालायचं याचं तो प्रात्यक्षिक करत पुढे जायचा...एखाद्या सावलीप्रमाणं धुक्याच्या तीन पुंजक्यांसारखी दिसणारी ती तेजस्वी पिलं त्याचं अनुकरण करीत.'आज्ञेचं पालन म्हणजेदीर्घायुष्य' हा धडा ते मोठ्या गंभीरपणे गिरवीत.एकदा झिलानीवर घिरट्या घालणाऱ्या पाणससाण्याला पाहून तो घाबरला.

'सिक्ऽऽ' आवाजाबरोबर ती पिलं त्याच्या पंखाखाली आली आणि तिघांना पंखात घेऊन तो जो उडाला तो पिटुंडीच्या जाळीत गडप झाला.पिलांचे लांब पाय लोंबताना दिसत होते. मोठं विचित्र व अद्भुत दृश्य होतं ते!


'पि-पि-पियु-पि-पि-पियु' सारख्या मधुर स्वरानं तो एखाद्या वेड्यासारखा त्या आवाजाच्या दिशेनं पिलांना तृणपाती टिपताना सोडून धाव घेई. झिलानीच्या मध्यावर ती उभी होती.अंगानं थोराड तपकिरी रंगाची.पंखावर सोनेरी वर्ख. झिलानीतली गवताची पानं तोडून ती कमळाच्या पानावर घरट्याचा पाया रचीत होती.तो विलक्षण वेगानं घरट्याजवळ पोहोचला.हिरव्यागार कमळाच्या पानांवर मोत्याचा चुरा विखुरावा तसे पाण्याचे थेंब दिसत होते.अशा या पाचूच्या पायघडीवरून तो हळूहळू मोठ्या ऐटीत मान वर करून तिच्याकडे जात होता.तो तिच्या नजीक जाताच तिनं पुन्हा गवताचं पातं खुडून कमळाच्या पानावर ठेवलं.तोही तिला साहाय्य करू लागला.त्यांचा विलक्षण अनुनय चालू असता,ती घरट्यात स्थानापन्न झाली.ती मोठी अद्भुत दिसे.सूर्याची किरणं त्या झिलानीवर पडली की त्या प्रकाशात ते झिलान मोठं रम्य वाटायचं.तिच्या पंखावर अवर्णनीय रंगाच्या छटा झळकावयाच्या.इतक्यात झिलानीच्या पलीकडून कुंभार कुकड्याचा मिस्किल पण खोकण्याचा आवाज आला.चिवचिवणारी ती शहाणी पिलं जागच्या जागी निःस्तब्ध थिजली.त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले.त्यांच्या पंखासारखाच जागच्या जागी रंग असलेल्या त्या पक्ष्याचा आवाज पाणपिपुलीला आवडत नसे. त्यानंच तर एकदा त्यांची तीन पिलं गट्ट केली होती.तो त्यांचा द्वेष करी.तो धावत पिलांजवळ आला.'चिक् ऽऽ' आवाजा

बरोबर 'साई-सुट्टोऽऽ'करीत ती पोरं तुरुतुरु पळत झुडपाबाहेर त्याच्याजवळ आली.


सूर्याच्या सोनेरी प्रकाशात कमळाच्या पानापानांवरून व चिलाच्या जाळ्यातून ती पिलं त्याच्याबरोबर पुन्हा फिरू लागली.झिलानीतल्या पाण्याचा गर्द हिरवा-निळा रंग,

त्यातून वर आलेल्या कमळाच्या पानांचं छत्र,पाण्याच्या बिंदूंनी युक्त असलेली कमळपत्रं व त्यातून वावरणारी ती पिलं एखाद्या पारदर्शक छबीसारखी दिसत.ती अंड्यांतून बाहेर आल्याला आठ-एक दिवस झाले असावेत.

कमळाच्या पानापानांवरून मादी एकटी काहीतरी वेचीत होती.एखाद्या पानावर उभे राहून पाण्यातील चिलाचा पुंजका बाहेर काढून तो उलट- सुलट तपासून त्यातील कृमि-कीटक व घोंगल्या ती वेची.मध्येच थोडा - वेळ पाण्यात उतरून अलगद तरंगत समोरच्या पानावरची अळी-कोश मान वेळावून लीलेनं टिपी.कमळाच्या पानांवर चरताना पाठमोरी उभी राहिली - की ती किती सुंदर दिसे! तिचं ते उभं राहणं म्हणजे पक्षी उभं राहण्याचं अलौकिक प्रतीक वाटे. कधी कधी अशा अवस्थेत पंखाची पिसं चोचीनं स्वच्छ करू लागली की तिच्या प्रत्यंगाच्या हालचालीत तिच्या रूबाबदार,कमनीय शरीरसौष्ठवाचा प्रत्यय येई.झिलानीवर सूर्याचा प्रकाश पडला.अर्धे झिलान प्रकाशात तर अर्धे डोंगराच्या सावलीत होते. पाणपिपुली प्रकाशातून फिरत होती.कमळाच्या पानावरून तिचं प्रतिबिंब पाण्यात पडे.गळा डोके छातीचा भाग मखमली काळा.पंख कांस्य वर्णाचे.त्यावर हिरव्या-तांबड्या-पाचू रंगाच्या अद्भुत छटा सूर्यप्रकाशात दृग्गोचर व्हायच्या. तिची पिवळी चोच उठून दिसायची.कित्येक वेळा त्या चोचीच्या हालचालीवरून हिरव्या कमळवनातून ती ओळखू यायची.नर पिलांसह देवभातात गेला तो जवळजवळ तासभर दिसलाच नाही.ती दोघं एकमेकांना साद घालून संबंध अतूट ठेवीत.ती 'चुक् चुक्' करीत पुन्हा घरट्याकडे आली.निरनिराळ्या मधुर स्वरांनी तिनं त्याला साद घातली.तिच्या गोड आवाजातल्या पि-पि-पि-पि पियूच्या स्वरांनी सारं देहभान विसरून तो तिच्याकडे धावत आला.ती घरट्यात एकटी उभी होती.तो तिच्या अंगलट उभा राहिला.या वेळी जाणवलं,की मादी खरोखरच नरापेक्षा अंगानं थोराड आहे.त्यानं तिच्या चोचीपाशी चोच नेली.एकाएकी तो उडून तिच्या पंखांवर आरूढ झाला.तिनं मान खाली घातली.त्याचं सर्वांग थरथरत होतं.या मीलनानंतर ती स्तब्धपणे घरट्यात बसून राहिली.नर जो उडाला तो झिलानीकाठच्या देवधानात गेला.तेथून पंख फडफडवीत लांब पाय लोंबकळवीत जडपणे कालवा ओलांडून पलीकडच्या झिलानीत उडून गेला.ती पिलं तिच्या जवळपास तृणांकुर कुरतडत होती.तिचं त्या पिलांवर लक्ष होतं.परंतु ती पिलांजवळ मात्र जात नसे.पिलं फार जवळ येऊ लागताच ती दुसऱ्या बाजूला उडून जायची.कुणीच जवळपास नाही हे पाहून पिलं बिचारी कमळाच्या पानाच्या सावलीत,शांत उभी राहिली.त्यांची हालचाल बंद झाली.पाणपिपुली नेहमीप्रमाणं पानांवरच्या घरट्यात आली.तिनं आज एक अंडंही घातलं. ओळीत तीन अंडी दिसत होती.सूर्याच्या प्रकाशात ती एखाद्या रत्नाप्रमाणे तेजस्वी व सुंदर वाटत होती.कालदेखील तिनं एक अंडं दिलं होतं.नरमादीच्या मधुर मीलनानंतर तिनं अंडी घालायला सुरुवात केली.ती घरट्यात स्थानापन्न होताच,मधुर आवाजात त्याला साद घालू लागली.परंतु आता तो पिलांना सोडून तिच्याकडे पूर्वीइतक्या आवेगानं धावत येत नसे.आला तो पिलांना सोबत घेऊन.त्यांना पाहताच ती घरटं सोडून निघून गेली.त्या दिवशी नर 'सी-सी-सी' करीत घरट्याकडे आला.त्यानं दुरून घरटं न्याहाळलं.त्यात सुंदर रंगाची तीन अंडी होती. लगेच तो घरट्यात स्थानापन्न झाला व अंडी उबवू लागला.इतक्यात पिलांचा चिवचिवाट ऐकताच,तो धावत त्यांच्याकडे गेला.ती एखाद्या तटस्थासारखी निर्विकारपणे झिलानीच्या एका टोकाला चरत होती.घरटं सोडण्यापूर्वी त्यानं अंडी गवताच्या पानानं झाकली.


तो घरट्यात असला की पिलं निमूटपणे कमळाच्या सावलीत उभी असायची. बांधाकाठची पडाळ फुलली होती.झिलानीतली तीन शुभ्र कमळं रोज विकसित होत होती. हिरवंनिळं झिलान कुमुदाच्या फुलांनी चांदण्याप्रमाणं नित्य फुलत होतं.सायंकाळी झिलानीवरच्या सूर्याच्या परावर्तित प्रकाशात

झुडपाच्या काडीवर बसलेला पांढरा-काळा किलकिला ओलेचिंब झालेले पंख झटकताना दिसे.निरभ्र,निळ्या उंच आकाशातून सात-आठ पाणकावळे तळ्याकडे उडत जाताना दिसले. पाऊस थांबला तसं पावश्याचं ओरडणं थांबलं, सकाळी हिरव्यागार गवतावर दवाचे थेंब दिसू लागले.इतक्यात चातकाची जोडी झिलानीतल्या एका कमळाच्या पानावर येऊन बसली ती एका पानावरून दुसऱ्या पानावर जाण्याचा जणू खेळ खेळत होती.

कमळाच्या पानावरील दवानं त्यांच्या लांब शेपट्या ओल्याचिंब झाल्या. पानावर ते मोठ्या रूबाबात बसले की त्यांची लांब शेपटी पानाबाहेर येई.डोक्यावर काळी शेंडी,पांढरा गळा-पोट,काळ्या पंखांवर कवडीएवढे पांढरे ठिपके,ते पानाच्या मध्यावर खोलगट भागात साठलेल्या दवाच्या पाण्यात आपले पंख फडफडून आंघोळ करीत.तीन-चार दवाचे थेंब चोचीने हळूवार टिपीत.

कमळाच्या एका दांड्यावरून दुसऱ्या पानावर बसत.

त्यांच्या हालचालीनं अंड्यावर बसलेली मादी घरटं सोडून निघून गेली.ती सारखी 'सिक्-सिक्-सिक् सिक्' करीत काहीतरी कुरतडीत होती.मात्र तिचं सारं लक्ष घरट्याकडे होतं.आज दोन्ही पाणपिपुले घरट्याजवळ दिसत होते.ते एकमेकांशी लगट करीत होते.शेवटी एक पाणपिपुली घरट्यातील अंड्यावर बसली.मोठा अजब प्रकार होता. वाटलं,तो तिला किंवा ती त्याला अंड्यावर बसण्यास भाग पाडीत होती की काय? सकाळपासून ती तीनदा अंड्यावर बसली होती आणि तीनदा तिनं घरटं सोडलं होतं.घरट्यात आली की ती दोन्ही पायांमध्ये अंडी ठेवून उभी राही.

एकदा खाली वर मान करी.सूर्याकडे पाठ करून अंडी उबवू लागे.तो दूर झिलानीकाठी आपली पिसं चोचीनं व पायाच्या बोटांनी साफ करी.पिलं जवळच तृणपाती टोकरीत होती.दवाचं पाणी पिणाऱ्या चातकाकडे ते जरी दुर्लक्ष करीत तरी आपल्या अन्नाशी स्पर्धा करणाऱ्या पक्ष्यांना नर आपल्या जवळपास फिरकू देत नसे. त्या दिवशी पाण्यात स्तब्ध उभ्या असलेल्या ढोकरीला तिनं झिलानीतून हुसकून लावलं. झिलानीकाठच्या देवधानातील पाऊलवाटेनं एकदा टरकू,भुंग्यासारखी काळीभोर सहा-सात इवलीशी पिलं घेऊन झिलानीकडे येत होता तर त्यानं त्यांना अर्ध्या वाटेतूनच परतवून लावलं.त्या झिलानीवर त्याचं एकछत्री मुक्त साम्राज्य (जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली) होतं.एखाद्या मोठ्या सावजावर प्रथम तो 'क्वाक्' करून उंच उडी घेऊन हल्ला करी.तशी पिलं धावत येऊन त्या सावजावर तुटून पडत.


उन्हाची तिरपी किरणं तिच्या घरट्यावर पडली होती.ती हळूहळू घरट्याकडे येत होती.घरट्यात उभी राहिली होती.चोचीनं तिनं अंडी पंखाखाली सारली.सूर्याकडे तोंड करून तिनं अंडी उबविण्यास सुरुवात केली.किनाऱ्यावर टिटवीचा आवाज येत होता.तिनं आपली मान उंच सरळ केली.डोक्यावरील दोन पांढऱ्या रेघा नागिणीच्या फणीवरील आकड्यासारख्या दिसत.तिच्या पिवळ्या चंचुपुटाची हालचाल नागिणीच्या जिभेसारखी वाटायची. गुप्तधनावर बसलेली जणू नागीणच ती ! पिलं दिसामासी वाढत होती. त्यांचा रंग बदलत होता.खालचा भाग पिंगट तर वरचे अंग तपकिरी रंगाचे दिसू लागले.ढांगुळ्या पायांवर आता मुलायम पिसं दिसू लागली.पंजे कोळ्याच्या पायाप्रमाणं दिसू लागले.तो त्यांना रोज नवीन जागी नेई.त्यांना रोज नवीन पदार्थ खायला मिळत.ती शहाणी होत होती.त्यांचं सौंदर्य नित्य विकसित होत होतं.