* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जरा दमानं..! A little breath..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/३/२४

जरा दमानं..! A little breath..!

झाड वाढायची गती किती असते हे मला खूप वर्ष माहीत नव्हतं.ज्या बीच जंगलाचं व्यवस्थापन मी बघतो,त्यात झाडांची उंची तीन ते सात फूट इतकीच आहे.पूर्वी मी यांच्या वयाचा अंदाज जास्तीत जास्त दहा वर्ष लावला असता. पण व्यावसायिक लागवडीच्या बाहेरील विश्वात, म्हणजे नैसर्गिक जंगलात,माझा अभ्यास सुरू झाला तसं झाडांच्या वाढीचं गुपित मला उमगू लागलं.बीच वृक्षाच्या वयाचा अंदाज लावण्याची एक सोपी युक्ती आहे.त्यांच्या फांद्यांवर छोट्या गाठी असतात त्या मोजायच्या.

सुरकुत्यांचा पुंजका असल्यासारख्या या गाठी दिसतात. नवीन कोंबाच्या खाली दरवर्षी एक गाठ येते आणि फांदीची लांबी वाढत गेली की गाठ मागे पडत जाते.

दरवर्षी हे होत असतं त्यामुळे गाठींची संख्या आणि झाडाच्या वयात परस्परसंबंध लावता येतो.जेव्हा फांदीचा घेर सुमारे एक दशमांश इंच होतो तेव्हा ती गाठ सालीच्या खाली दडून जाते.माझ्या जंगलात मला एक बीचचं झाड तरुण वाटत असे.त्याच्या एका आठ इंच लांबीच्या कोवळ्या डहाळीवर मला पंचवीस गाठी दिसल्या.या झाडाच्या बुंध्याचा घेर जेमतेम एक तृतीयांश इंच होता आणि त्यावरून त्याचं वय कळून येत नव्हतं. मी जेव्हा गाठींचा हिशोब लावून त्याच्या वयाचा अंदाज घेतला तेव्हा मला ते झाड किमान ऐंशी वर्षांचं असल्याचं जाणवलं. त्या वेळेस मला हे फारच धक्कादायक वाटलं होतं,पण पुरातन जंगलातून माझा अभ्यास सुरू झाला आणि आज मला कळतंय की यात काहीच आश्चर्य नाही.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)तारुण्यात आलेल्या झाडांना झपाट्याने वाढण्याची घाई असते.एका ऋतूत ते दीड फुटापर्यंत सहज वाढू शकतात.पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांची आईच त्यांना एवढं वाढू देत नाही.आपल्या स्वतःचं आच्छादन आणि जंगलातल्या इतर झाडांच्या छत्रीमुळे तिथल्या जमिनीवर जेमतेम तीन टक्के ऊन पडतं.त्यामुळे त्या रोपट्यांच्या वाढीला ऊन कमी पडतं.३ टक्के म्हणजे काहीच नाही! इतक्या सूर्यप्रकाशात ते बिचारं झाड जेमतेम जिवंत राहण्यापुरतं प्रकाश संश्लेषण करू शकतं.

आपला घेर आणि उंची वाढवायला त्याला ताकद शिल्लक राहत नाही. बरं,या अशा कडक संस्काराच्या विरोधात बंडही पुकारता येत नाही,कारण त्यासाठीही शक्ती नसते.तुम्ही म्हणाल,संस्कार? होय,आपल्या रोपट्यांची काळजी घेण्यासाठी झाडं शतकानुशतकांच्या एका अनुभवांतून तयार केलेल्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात. 'अध्यापन' हा शब्द मी असाच नाही वापरला, ही खरोखरच 'बाळ' झाडांना शिकवण्यासाठी झाडांनी वापरली शिक्षणपद्धतीच आहे. झाडांच्या बाबतीत अध्यापन हा शब्द जंगल व्यवस्थापनातील कर्मचारी अनेक वर्षांपासून वापरत आहेत.


या पद्धतीत रोपट्यांना सूर्यप्रकाशापासून वंचित ठेवलं जातं.पण ते कशासाठी?आपलं पाल्य लवकरात लवकर स्वतंत्र व्हावं असं त्या आईबापांना वाटत नाही का? या प्रश्नाचे उत्तर झाडं 'नाही' म्हणूनच देतील.शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की जी झाडं तारुण्यात संथ गतीने वाढतात ती दीर्घायुषी होतात.

झाडांच्या बाबतीत दीर्घायुष्याची व्याख्या वेगळी असल्याचा आपल्याला विसर पडला आहे,कारण लाकडासाठी झालेल्या व्यावसायिक लागवडीत ८० ते १२० वर्षांच्या वर झाडाची वाढ होऊ दिली जात नाही.नैसर्गिक परिस्थितीमध्ये प्रौढ झाडांचा घेर पेन्सिली इतका असतो आणि साधारण माणसाइतकी त्यांची उंची होते.संथ वाढीमुळे खोडातील पेशी इतक्या सूक्ष्म असतात की त्यामध्ये हवेसाठी सुद्धा जागा नसते.पण यामुळे झाडं लवचीक राहतात आणि वादळी वाऱ्यात तग धरू शकतात.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना भक्षकांपासून संरक्षण मिळतं कारण टणक खोडात सूक्ष्मजीव शिरू शकत नाहीत.अशी वाढ झालेल्या झाडांना इजा होण्याचीही भीती नसते,कारण जखमेच्या ठिकाणी सालाची वाढ होऊन तिथे कुजण्याची प्रक्रिया थांबवली जाते.आपल्या रोपट्यांना दीर्घायू प्राप्त होण्यासाठी संगोपनाची आवश्यकता असते.पण कधीकधी यात तरुण झाडांच्या सोशिकपणाची परीक्षाच असते.आधीच्या प्रकरणात आपण पाहिलं की, बीच आणि ओकचे दाणे मातृवृक्षाच्या पायाशी पडलेले असतात.सूझान सीमार्ड या शास्त्रज्ञाने झाडांमधील मातृत्वाचा अभ्यास केला आहे.त्या म्हणतात की मातृवृक्ष आपल्या पिल्लांवर नेहमीच वर्चस्व गाजवत असतो.ही झाडं आपला वारसा पुढल्या पिढीला सोपवून जाणार असतात आणि त्यासाठी तरुण झाडांवर आपला प्रभाव पाडण्याचं काम चालू असतं.मातृवृक्ष हा जंगलातला प्रभावशाली वृक्ष असतो,

आपल्या मुळांशी असलेल्या बुरशीच्या जाळ्यातून तो जंगलातील इतर सर्व झाडांशी जोडला गेलेला असतो.

मला सापडलेलं ते 'तरुण' बीच झाड ८० वर्ष आपल्या आईच्या छायेत उभं होतं आणि त्याची आई त्या जागेवर किमान दोनशे वर्ष उभी आहे.झाडांच्या दृष्टीने दोनशे वर्षांचा कालावधी म्हणजे अंदाजे माणसाची चाळिशी.

माझ्या जंगलातल्या या तरुण झाडांना विशाल वृक्ष होण्यासाठी कदाचित अजून दोनशे वर्षं तरी शांतपणे वाट पाहावी लागणार आहे.पण त्यांच्या आईकडून ही प्रतीक्षा सुसह्य केली जाते.त्या आपल्या पिल्लांना मुळांतून जोडून घेतात आणि तिथून त्यांना साखर आणि पोषणद्रव्यांचा पुरवठा चालू असतो.आईकडून आपल्या बछड्यांची शुश्रूषा चालू असते,असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.


झाडाखाली उगवणाऱ्या रोपट्यांकडे नीट बघितलं तर तुम्हालाही कळेल की ही तरुण झाडं विशाल वृक्ष होण्याची वाट शांतपणे पाहत आहेत का वाढण्याची घाई करत आहेत? त्यासाठी एखाद्या बीच किंवा सिल्व्हर फरच्या फांद्यांकडे पहा.जर ते झाड उंचीपेक्षा जास्त रुंद असेल तर ते अजून प्रतीक्षेच्या टप्प्यात आहे.आपल्या वाढीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्यामुळे ते थोडं पसरून प्रकाशाचा शोध घेत असतं. त्यासाठी आपल्या फांद्यांना बाजूच्या दिशेने पसरवून पानांना अतिसंवेदनशील बनवतं,ज्यामुळे जो काही थोडासा सूर्यप्रकाश त्यांना सापडेल तोही वापरात आणता येईल.अनेकदा तुम्हाला अशा झाडांचे मुख्य खोडही ओळखू येणार नाही,कारण ती सपाट छपराच्या बोंसाई झाडांसारखी खूप कमी उंचीची असतात.


त्या तरुणांच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की मातृवृक्षाचं आयुष्य संपतं किंवा तो आजारी पडतो.

यौवनात असलेली ही झाडं याच क्षणाच्या प्रतीक्षेत असतात.अशी घटना उन्हाळ्यातल्या वादळात होऊ शकते.जोरदार पाऊस आला की त्यांचं ठिसूळ खोड आपलं वजन सहन करू शकत नाही आणि कोलमडायला सुरुवात होते.खाली पडताना काही तरुण मंडळी चिरडली जातात.पडलेल्या झाडामुळे जंगलाच्या आच्छादनात मोठं भगदाड पडतं आणि खालच्या बालवाडीला भरपूर सूर्यप्रकाश मिळू लागतो. आता ते मनसोक्तपणे प्रकाश संश्लेषण करू शकतात.त्यांच्या चयापचयाचा वेगही वाढतो आणि झाडाची तब्येत सुधारण्यास सुरुवात होते.ही अवस्था एक ते तीन वर्ष राहते आणि नंतर पुढची वाटचाल सुरू होते.आता बालवाडीतील सर्वांनाच जोमानं वाढायचं असतं.जे युवक थेट आकाशाच्या दिशेने वाढतात तेच स्पर्धेत टिकून राहतात.ज्यांना वाटतं की थोडं इकडे तिकडे पसरून वाढावं,ते शर्यतीमध्ये मागे पडत जातात. सरळ वर वाढ होत गेलेल्या झाडांकडून आता जंगलाच्या आच्छादनात पडलेले भगदाड पुन्हा बंद होऊ लागतं आणि आपल्या आईच्या काळात होती त्याहीपेक्षा घनदाट छाया तिथे पडते.स्पर्धेत मागे पडलेल्या युवकांचा आता वाढण्याचा मार्ग बंद होत जातो.काही वर्षांतच हार मानून ते वळून जाणार असतात.पण उंच वाढणाऱ्यांना काही कमी धोके नाहीत. भरपूर सूर्यप्रकाश मिळायला लागला की झाड आपलं साखरेचं उत्पादन वाढवतं आणि नवीन कोंबांना जास्त प्रमाणात साखर पोचते.पूर्वी सावलीमुळे कोंब टणक आणि कडवट असायचे, पण आता मात्र ते हरणांसाठी गोड चवदार खाऊ बनतात.त्यामुळे काही तरुण झाडं खाल्ली जातात आणि पुढच्या हिवाळ्यापर्यंत तरी हरणांना कॅलरीज मिळून जातात.पण आता जंगलात तरुण झाडं मुबलक असल्यामुळे येणाऱ्या काळात काही झाडं मोठी नक्की होऊ शकणार असतात.पण ज्या वेळेस एकदम सूर्यप्रकाश उपलब्ध होतो तेव्हा काही फुलणारी झाडंही आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये हनीसकल  नावाची एक वेली आहे.आपली नाजूक वेल ती त्या वाढणाऱ्या झाडांच्या फांद्यांभोवती गुंडाळून घेते आणि वर जाऊ लागते.सूर्यप्रकाश मिळताच ती भरपूर फुलोरा धरते आणि काही वर्षांतच त्या नाजूक वेली पकड जीवघेणी बनते आणि झाडाला त्रासदायक ठरते.आता अशाच वाढत राहिलेल्या वेलीला अजून किती वेळ मिळेल हा यक्षप्रश्न असतो.मोठ्या वृक्षांची वाढ झपाट्याने होऊन जंगलाचे आच्छादन पुन्हा बंद झाले तर मात्र सूर्यप्रकाश न मिळाल्याने हनीसकल कोमेजून जाईल आणि काही दिवसांत मरेल.पण जर भगदाड खूप मोठं असेल तर हनीसकल झपाट्याने वाढेल आणि घेरलेल्या झाडाला मारून टाकेल.अशा वेळेस त्या मृत झाडाच्या खोडाच्या पिळदार लाकडापासून आपल्याला छान काठी करता येते.सर्व अडथळ्यांचा सामना करत जेव्हा काही झाडं उंच आणि टुमदार होतील,तेव्हा वीस वर्षांच्या आत असलेल्या तरुणांवर पुढचं संकट बेतणार असतं.कारण उंच वाढलेली झाडं पुढच्या वीस वर्षांत वठलेल्या मातृवृक्षाचे शेजारी स्वतःचा पसारा वाढवून आच्छादनात पडलेली खिंडार पुन्हा बंद करून टाकतात.आणि मग त्या अर्धवट वाढलेल्या तरुण बीच,फर आणि पाईन वृक्षांना पुन्हा एकदा मोठा वृक्ष वठण्याची प्रतीक्षा करावी लागते.याला काही दशकं लागू शकतात.पण त्या तरुण झाडांच्या नशिबाचे फासे अगोदरच पडलेले असतात.

या उंचीपर्यंत जिवंत राहिलेल्या झाडांना आता कोणी स्पर्धक नसतात.ते जंगलाचे राजकुमार किंवा राजकन्या असतात, जे भविष्यात जंगलातील सर्वोच्च स्थान पटकावणार असतात.


०७.०१.२४ या लेखमालेतील पुढील भाग..