१९.०३.२४ या लेखातील पुढील भाग.।
या पुस्तकातील मर्म इतक्या उशिराने प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मानसिक जीवनातील भावनेच्या स्थानाकडे लक्ष देण्यात संशोधकांनी आश्चर्य वाटावे इतके दुर्लक्ष केले.त्यामुळे शास्त्रशुद्ध मानसशास्त्रासाठी भावनांच्या प्रांतात जाण्यासाठी प्रशस्त मार्गच उपलब्ध नव्हता.ही पोकळी भरून काढण्यासाठी स्वयंमदतीच्या पुस्तकांचा प्रवाह सुरू झाला.त्यांच्यात दिलेला सल्ला सद् हेतुपूर्ण असला तरी त्यात बरीच मोठी उणीव होती ती शास्त्रीय आधाराची.आता भावनेतील अत्यंतअतार्किकपणाबद्दल उठणाऱ्या तातडीच्या आणि गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांबद्दल शेवटी विज्ञान अधिकारवाणीने बोलू लागले आहे,मानवी हृदयाबद्दलच्या विवेचना इतकाच याविषयातील ज्ञानालाही नेमकेपणा आला आहे.अर्थात जे बुद्धिमत्तेबद्दल संकुचित दृष्टिकोन बाळगून वाद घालतात की,बुद्धिगुणांक अनुवंशाने ठरतो,जीवनातील अनुभव त्याला बदलू शकत नाहीत आणि आपली नियती मोठ्या प्रमाणात या गुणावरून ठरत असते, त्यांच्यासाठी या माहितीने आव्हाने उभी केली. त्यांच्या मतात ज्या अत्यंत आव्हानात्मक प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे तो म्हणजे आपण कोणता बदल करू शकतो.ज्यामुळे आपल्या मुलांना अधिक चांगले जीवन जगण्यात मदत होईल? ज्या परिस्थितीत भले भले बुद्धिवान धडपडतात तिथे सामान्य बुद्धीचा माणूस सहजतेने त्यातून पार पडतो,तेव्हा कोणते घटक आपला चमत्कार दाखवत असतात.याबद्दल माझे मत असे आहे की,हा फरक ज्या क्षमतेमुळे पडतो तिलाच या पुस्तकात भावनिक बुद्धिमत्ता म्हटले आहे,जिच्यात आत्मसंयम,उत्साह आणि चिकाटी आणि स्वतःला प्रेरित करण्याच्या क्षमतेचा समावेश होतो.आपण पाहणार आहोत की,मुलांना अनुवंशाने बुद्धिमत्तेच्या वारशाची कोणतीही लॉटरी लागली असली,तरी योग्य व चांगली संधी पुरवून त्यांना वरील गुण शिकवता येतात.या शक्यतेच्या पलीकडे एक नैतिक दडपण डोळे वटारून पाहत आहे.हा तो काळ आहे जेव्हा स्वार्थीपणा,हिंसा आणि कोतेपणामुळे आपल्या सामूहिक जीवनातील भलेपणाला कीड लागली आहे आणि त्यामुळे समाजजीवनरूपी वस्त्राची वीण गतीने उसवली जात आहे.इथे भावनिक बुद्धिमत्तेचा मुद्दा हा मृदू भावना,
चारित्र्य आणि नैतिक सहजप्रवृत्ती यांच्यातील दुव्यावर आधारित आहे. वाढते पुरावे मिळू लागले आहेत.
की,जीवनातील मूलभूत नैतिक दृष्टिकोन त्यांच्यात सामावलेल्या भावनिक क्षमतांमधून अंकुरित होत असतात. एखाद्यासाठी ऊर्मी हे भावनेचे माध्यम असू शकते;सगळ्या ऊर्मीच्या बीजस्थानी असते स्वतःला कृतीत व्यक्त करण्यासाठी उसळून उठणारी एखादी भावना.जे अशा तीव्र ऊमींना अधीन झालेले असतात म्हणजेच ज्यांच्यात आत्मसंयम नसतो,त्यांच्यात नैतिक विचारांची कमतरता दिसून येते.त्याच अर्थाने निःस्वार्थ परोपकार-भावनेच्या मुळाशी असलेले गुण म्हणजे समानुभूती,इतरांच्या मनातील भावनांचा वेध घेण्याची क्षमता.जिथे इतरांच्या गरजेची किंवा निराशेची काहीच जाणीव नसते तिथे इतरांची काळजी घेतली जात नाही आणि आजच्या काळात ज्याची सर्वांत जास्त गरज आहे असे नेमके दोन गुण म्हणजे आत्मसंयम आणि करुणा.
आपला प्रवास
भावनेबद्दल अधिक वैज्ञानिक मर्मदृष्टी पुरवणाऱ्या या पुस्तकातील प्रवासात मी तुमचा मार्गदर्शक बनणार आहे.आपल्या जीवनातील आणि आपल्या भोवतालच्या जगातील अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या काही क्षणांना या यात्रेत मोठ्या प्रमाणात समजून घेता येईल.या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि भावनांना बुद्धिमान कसे करावे हे समजून घेणे.
ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रातील एखाद्या निरीक्षकाचे सुक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरील निरीक्षणामुळे त्याच्या निरीक्षणाचा अर्थच बदलून जातो,तसाच काहीसा परिणाम या ज्ञानाचा होणार आहे, भावनेच्या क्षेत्राची काही प्रमाणात दखल घेता येईल.पुस्तकाच्या पहिल्या भागात मेंदूच्या भावनिक आराखड्याविषयी,रचनेविषयी नवीन शोधांवर प्रकाश टाकला आहे.हे शोध जीवनात जेव्हा आपल्या भावना सगळ्या तर्कशुद्ध विचारांवर कुरघोडी करतात अशा क्षणांविषयी आपल्या मनातील गोंधळ दूर करतात. त्यांच्यामुळे राग आणि भीतीच्या किंवा उत्कटता आणि आनंदाच्या क्षणांवर राज्य करणाऱ्या मेंदूच्या रचनेतील परस्परक्रिया समजून घेता येतील.ते समजले म्हणजे आपल्या विशुद्ध हेतूंच्या मुळाशी सुरुंग लावून त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आपल्या भावनिक सवयी आपण कशा शिकतो हे स्पष्ट होईल;तसेच आपल्या अत्यंत विघातक किंवा स्वतःला पराभूत करणाऱ्या भावनिक ऊर्मीना आवर घालण्यासाठी आपण काय करू शकतो हे समजेल.सर्वांत जास्त महत्त्वाचे म्हणजे या मेंदूविषयक माहितीमुळे आपल्या मुलांच्या भावनिक सवयींना वळण लावण्याची अमूल्य संधी हाती आली आहे.या प्रवासातील आपला दुसरा मुख्य टप्पा असेल तो हे पाहण्याचा की,मेंदूच्या या रचनेमुळे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत उपजत क्षमता भावनिक बुद्धिमत्ता कशी कार्यान्वित होते.उदा.भावनावेगावर लगाम कसा घालावा,इतरांच्या मनातील खोलवरच्या भावना कशा वाचाव्यात,नातेसंबंधाना लाघवीपणे कसे हाताळावे वगैरे.थोडक्यात,ॲरिस्टॉटलने सांगितल्यानुसार,"योग्य माणसावर,योग्य प्रमाणात,योग्य वेळी,योग्य कारणाने आणि योग्य मार्गाने कसे रागवावे" हे समजेल.
ज्या वाचकांना मज्जातंतूविषयक माहितीत रस नाही ते सरळ या भागाकडे वळू शकतात. 'बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे सांगणारा हा विस्तारित नमुना जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या विशेष क्षमतांच्या केंद्रस्थानी भावनांना ठेवतो. तिसरा भाग तपासून पाहतो की,या क्षमतेमुळे काही अत्यंत महत्त्वाचे बदल कसे होतात,फरक कसा पडतो;या क्षमता आपले मूल्यवान नातेसंबंध कसे टिकवून ठेवू शकतात किंवा त्यांच्याअभावी नाते कसे बिघडू शकते,
आपण जिथे काम करतो तिथली बाजारमूल्ये,दडपणे आपल्या व्यावसायिक जीवनाला नवा आकार देत आहेत आणि अगदी व्यवसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या भावनिक बुद्धिमत्तेकडून अभूतपूर्व वाटा वसूल करीत आहेत आणि सतत धूम्रपानमुळे जसा शारीरिक स्वास्थ्याला धोका निर्माण होतो तसाच धोका विषाक्त भावनांमुळे कसा निर्माण होतो,आपले स्वास्थ्य आणि निरामयतेचे रक्षण करण्यासाठी भावनिक संतुलनाची कशी मदत होते वगैरे.
आपल्याला मिळालेल्या आनुवंशिक वारशातून आपल्या
पैकी प्रत्येकाला विविध भावनांवर स्थिरावण्याची विविध बिंदूची एक शृंखला उपजतच लाभत असते.जी आपला स्वभाव निश्चित करते;पण भावनावस्थेत कार्य करणाऱ्या मेंदूच्या मज्जामंडळांची जुळवून घेण्याची क्षमता असाधारण असते.त्यामुळे आपला स्वभाव म्हणजे आपली नियती नव्हे.चौथ्या विभागात दाखवून दिले आहे की, आपण आपल्या लहानपणी घरात आणि शाळेत जे भावनिक धडे गिरवत असतो त्यावरून हे ठरत असते की,आपण भावनिक बुद्धिमत्तेच्या मूलभूत घटकांना आत्मसात करण्यात कितपत प्रावीण्य मिळवू शकू अथवा मिळवू शकणार नाही.याचा अर्थ असा की भविष्यात आपले जीवन नियंत्रित करणाऱ्या आवश्यक भावनिक सवयी लावून घेण्यासाठी बाल्यावस्था आणि किशोरावस्था हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो.
पाचव्या भागात याचा शोध घेतला गेला आहे की,जे परिपक्वता मिळवू शकत नाहीत आणि भावनिक प्रांतावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरतात त्यांच्यासाठी कोणकोणते धोके वाढून ठेवलेले असतात,भावनिक बुद्धिमत्तेच्या कमतरतेमुळे नैराश्य किंवा हिंसामय जीवनापासून,खाण्याविषयक विकृती आणि मादक द्रव्यांच्या आहारी जाण्यापर्यंत कित्येक धोक्यांची व्याप्ती कशी वाढत जाते.या भागात असे पुरावे देण्यात आले आहेत की,मुलांचा जीवनप्रवास योग्य मार्गाने व्हावा म्हणून प्रगत शाळांमधून मुलांना भावनिक आणि सामाजिक कौशल्ये कशी शिकवली जातात.या पुस्तकात कदाचित अस्वस्थ करणारी एकमेव माहिती दिली आहे जी पालक आणि शिक्षक यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात केलेल्या सर्वेक्षणातून मिळाली आहे.या सर्वेक्षणातून असे दिसून येते की,जागतिक पातळीवर वाढता कल दिसून आला आहे.
की,या पिढीतील मुलं मागच्या पिढीतील मुलांपेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक त्रस्त आहेत. अधिक एकाकी आणि निराशाग्रस्त,अधिक रागीट आणि बेशिस्त,अधिक अस्वस्थ आणि चिंतेला अधिक बळी पडणारी,अधिक आवेगी आणि आक्रमक बनत चालली आहेत.
यावर काही उपाय असेल तर माझ्या मते तो हा आहे की,आपण आपल्या मुलांना जगण्यासाठी किती सज्ज करतो हे पाहणे.सध्या आपण आपल्या मुलांचे भावनिक शिक्षण केवळ योगायोगावर सोडून दिले आहे ज्याचे परिणाम खूपच भयानक असू शकतात.यावर एक उपाय म्हणजे शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांचे मन (बुद्धी) आणि हृदय एकत्र करून विद्यार्थ्याला सर्वांगीण शिक्षित करण्यासाठी शाळा काय करू शकतात याचा विचार एका नव्या दृष्टिकोनातून व्हायला हवा.जिथे वर्गांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे मूलभूत घटक मुलांच्या मनात खोलवर रुजवण्याच्या उद्दिष्टाने शिकवले जात असतील अशा नूतन वर्गांना भेटी देऊन आपला हा प्रवास संपणार आहे.मला वाटते की,आता तो दिवस दूर नाही की,जेव्हा आत्मजाणीव,आत्मनियंत्रण आणि समानुभूतीसारख्या आवश्यक मानवी क्षमता आणि श्रवण कौशल्ये (ऐकण्याची कला),संघर्ष सोडवणे आणि सहकार्य या बाबींच्या विकासाला शालेय शिक्षणाचा एक अविभाज्य भाग मानले जाईल,त्यांना नियमित शिक्षणक्रमात सामावून घेतले जाईल.
The Nichomachean Ethics या ॲरिस्टॉटलच्या पुस्तकात सद्गुण,चारित्र्य आणि चांगले जीवन याविषयी घेतलेल्या शोधात त्याच्यासमोरील आव्हान आहे आपल्या भावनिक जीवनाचे व्यवस्थापन बुद्धिपूर्वक करण्याचे,
हुशारीने भावना हाताळण्याचे. आपल्या उत्कट इच्छा,
आवेग यांना योग्य दिशा देण्यातच शहाणपणा असतो,
भावना आपल्या विचारांना,मूल्यांना आणि जीवन टिकवून ठेवायला मार्ग दाखवतात;पण त्या खूप सहजतेने पथभ्रष्ट होऊ शकतात आणि त्या वारंवार पथभ्रष्ट होतातच.
ॲरिस्टॉटलने पाहिले तसे भावना या समस्या नाहीत तर समस्या आहे.त्यांच्या उचितपणाची आणि त्यांच्या अभिव्यक्तीची.प्रश्न हा आहे की,आपण आपल्या भावनांना कसे बुद्धिमान बनवू शकतो,रस्त्यांवर सभ्यता कशी नांदावी आणि आपल्या सामुदायिक जीवनाला इतरांची काळजी घेणारे कसे बनवता येईल.
लवकरच या ठिकाणी भेटू ….काहीतरी समजून घेण्यासाठी…!